अवकाशाचं आकारपण

यशवंत देशमुख

माझ्यासाठी चित्र हे अवकाशमय होत जाण्याची क्रिया आहे. मनातलं हे अवकाश, जे दिसू शकत नाही. फक्त जाणवणारं असं. मला अभिप्रेत असलेलं अवकाश असं की एखाद्या अंधाऱ्या गाभाऱ्यात हळू हळू विरत जाणाऱ्या घंटेच्या नादसारखा किंवा पाण्यातल्या पसरत जाणाऱ्या तरंग लहरींसारखा. असं अवकाश की जिथे स्वतःला स्वतःचा स्पर्श जाणवू नये. चित्रं काढणं म्हणजे माझ्यासाठी अशी काहीशी अवकाशात विरत जाण्याची क्रिया आहे.

मिट्ट काळोखातल्या अवकाशापेक्षा माझे अवकाशाचे संदर्भ उजेडातले जास्त असतात. माझ्या चित्रातले आकार सुद्धा एखाद्या प्रखर प्रकाशात करकरीत स्पष्ट दिसावे असे. अशा उजेडात आकार किंवा वस्तू एवढी स्पष्ट असावी की त्या वस्तूचं वस्तूपण तेच असावं जे तिथे आहे, अगदी निःशंक. अंधुकशा प्रकाशात एखादी वस्तू दोरी आहे की साप असा संभ्रम निर्माण करणारी भावना मला नकोशी वाटते.

आकारातून अवकाशाचे संदर्भ शोधत असताना, अवकाशाची जाणीव महत्त्वाची ठरते. रेखाचित्रात फक्त रेषेतून अस्पष्ट जाणिवा होतात, मनात त्या जास्त गृहीत धरल्या जातात. रेखाचित्राचं प्रत्यक्ष चित्र रंगवतांना त्याबद्दलची अनुभूती, पोत आणि रंगाच्या माध्यमातून आपण नव्याने परिभाषित करत असतो. तेव्हा या रंगांच्या माध्यमातून हे अवकाश मला नक्की कसं हवं आहे, हलकं की गडद, आतून उजळणारं की मृतवत, की नुसताच पृष्ठभाग वाटावा असं हे मला स्पष्ट होत जातं. त्यामुळे माझ्या चित्रातील रंग करड्या छटांकडे झुकलेले दिसतात. ह्या छटा दर्शकाला चित्राच्या आत घेतात. चित्राची सुरुवात किंवा अंत व्हायला काळा किंवा पांढरा, कधी दोन्हीही रंग छटा असतात. हे काही त्याचं गणित नाही, पण ते असतात. कधी गुलाबी रंगही प्रामुख्याने येतो. या रंगातून प्रतीत होणारं अवकाशाचं भान विशेष वाटतं, खूप वैयक्तिक पण असावं. तसाच निळा रंगही. काळ्या रंगातून प्रतीत होणारा शून्यत्वाचा भास जसा विशेष आहे, तसाच निळा रंगही. जातकुळी तीच पण त्याचं निळेपण सुद्धा गंभीर वाटतं.

चित्रातले आकार हे घनता, वेग टाळून साकारतात, जिथे फक्त आकाराच्या बाह्यरेषा आकारपण जाणवून देतात. या सगळ्या जाणिवांचा आढावा घेतो तेव्हा, विदर्भासारख्या उन्हाळी भागात व्यतित झालेला माझा लहानपणीचा काळ आठवतो. तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा, मुख्यतः उन्हाळ्यातील रखरखीतपणाचा परिणाम मनावर खोल बिंबला गेला असावा. व्यक्तिपरत्वे हे अनुभव वेगळे असूही शकतील. पण माझा अवकाशाचा हा संदर्भ या परिणामातून आला असावा.

सपाट प्रदेश, दूरवर दिसणारी या टोकापासून त्या टोकापर्यंतची क्षितिज रेषा, आणि वर मोकळे आकाश. बाभळीच्या बनातल्या सावली न् जाळ्या, तुरळक निंबाची, आंब्याची झाडे. यातला सगळा उघडेपणा अंगावर येणारा. विहिरीत किंवा अंगणातल्या रांजणात डोकावून बघितल्यावर खोल गेलेलं नजरेच्या टप्प्यातील अवकाश, घराच्या आतील खोल्यांमधला काळोख दिलासा देणारा वाटायचा. या सगळ्यांचे परिणाम माझ्या सर्जनशीलतेवर झाले असावेत. यातून निर्माण होणारी अभिव्यक्ती ही प्रांतीय वाटू शकेल, पण तसं होत नाही. कारण जुन्या आठवणींची चित्रं काढण्यापलीकडची माझी पायरी आहे. या अनुभवातून येणारी अभिव्यक्ती जास्त दृश्यात्मक होत जाते, स्वयंभू होत जाते. आणि तशीच वैश्विकही.

back

यशवंत देशमुख मुंबईस्थित दृश्यमाध्यम कलाकार आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रदर्शनांमधून देशमुख सहभागी झाले आहेत.

One comment on “अवकाशाचं आकारपण: यशवंत देशमुख

  1. Dr. Madhuri Kathe

    Approach towards visual experience of an artist is wonderful soul stirring. I love the colours textures aesthetic appeal.
    Thank you for the Article.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *