वेणू पारिजात

स्थलांतरित मी



back

बालपणी मी स्थलांतरित पक्ष्यांच्या गोष्टी वाचल्या होत्या आणि काही वर्षांपूर्वी मी दोन ब्यागा आणि खूप साऱ्या भावनांसह अमेरिकेत आले. या सर्व प्रवासामध्ये माझ्यात काही मूलभूत बदल झाले. माझे असणे आणि माझे सोयीस्कररित्या नसणे हे हळूहळू घडत गेले. याचे माझ्यावर खोल परिणाम झाले आहेत. काही माणसे, काही घटना  माझा घट्ट हिस्सा बनल्या आहेत. कळत आणि नकळत कालांतराने मी या सगळ्याकडे जेव्हा मागे वळून बघते तेव्हा करुणा आणि प्रेम या दोन भावनांनी माझे अवकाश दाटून येते. या सगळ्या गोष्टींनी आणि त्यातल्या माणसांनी मला भरभरून दिले, काहींनी प्रश्न दिले, काहींनी उत्तरे दिली, काहींनी अनुभूती दिली, काहींनी भीती दिली, काहींनी प्रेम दिले, काहींनी मदत मागितली, काहींनी सत्य दाखवले. अशा या गोष्टी. म्हणजे “एक आटपाट गाव होते..” अशा गोष्टी नाहीत. तर, “मला तुला काही तरी सांगायचे आहे..”, “त्या दिवशी काय झाले की..” अशा गोष्टी. साध्या पण माझ्या गोष्टी.   

संध्याकाळची प्रार्थना 

आम्ही सिऍटलजवळच्या एका उपनगरात राहत होतो. थंडीचे दिवस होते त्यामुळे लवकर अंधार पडायचा. खरेतर हा माझा दुसराच हिवाळा होता पण मला वेगळाच आराम आणि दिलासा वाटायचा या कडाक्याच्या थंडीत. एकही पान नसलेली झाडे म्हणजे झाडांचा सापळाच, पावसाची रिपरिप, धुके मला आराम देई. घरापासून लांब एक घर आहे ही भावना दृढ होण्याचे ते दिवस. आपण काहीसे सावरतो आहोत, भारतातले आपले घर आपली वाट बघत तिथेच असणार आहे अशी मनाची समजूत काढायचे दिवस. अशाच एका थंड दिवशी मी भारतीय वाणसामानाची यादी करत होते. अंधार पडायच्या आत हे सगळे घेऊन यायचे असे मी ठरवले. टॅक्सी बोलावली. दुकानात गेले. सामानाच्या दोनचारच पिशव्या झाल्या. पुन्हा टॅक्सी बोलावली. गाडी खूप लांब नव्हती, ड्रायव्हर लगेच आला. तो वाकून खाली उतरला आणि त्याने सामान ठेवायला मदतीसाठी हात पुढे केला. तसे काहीच जड नव्हते. मी औपचारिक ‘थँक यू’ म्हणत आत बसले. तो पण जुजबी हसला. तो खूपच धिप्पाड होता. त्याचे डोळे निळसर हिरवे होते. आता गाडी मुख्य रस्त्याला लागली आणि आम्ही लांबच लांब गाड्यांच्या रांगेत सामील झालो. अपघात झाल्याने सगळे थांबले होते. मी दूरवर पाहिले तर लांब रांगा, गाड्यांचे लुकलुकणारे दिवे, झाडांचे सापळे, आणि गुलाबी आकाश असे दिसत होते.

बऱ्याच काळच्या शांततेनंतर ड्रायव्हरने मला एक प्रश्न विचारला,”तू भारतीय आहेस का?”. मी पटकन हो म्हणाले. त्याचा पुढचा प्रश्न थोडा वेगळा वाटला. “तुम्ही संध्याकाळी प्रार्थना करता का??”. “प्रार्थना तर मी कधीही करू शकते..” मी पुढे काही बोलण्याच्या आत तो पटापटा सांगू लागला, “मी अफगाणिस्तनांतून ४-६ महिन्यांपूर्वी एक रेफ्यूजी म्हणून आलो. वेगवेगळी कामे केल्यानंतर ड्रायव्हर झालो. माझी लहान बहीण, भाऊ, आणि आई -वडील अजूनही गावीच आहेत. त्यांच्याशी माझे बोलणे होतेच असे नाही. भाऊ सकाळी कामावर गेला तर तो घरी परत येईल का, आला तर कधी परत येईल काही खात्री  नसते. माझ्या गावी सगळेच भीषण आहे.” आता त्याने एकदम मागे वळून बघितले आणि विचारले,”तू या जगात शांतता येऊ दे अशी प्रार्थना करशील का?” मी त्याच्याकडे बघितल्यानंतर तो खूपच लहान वाटला. त्याचे डोळे पाणीदार आणि लाल झाले होते. त्याचे रुंद खांदे ओझ्याने दबल्यासारखे वाटले. बाहेरच्या गुलाबी वातावरणात आता औदासिन्य दाटून आले होते. तो खूपच आकसून गेला होता.  माझ्याकडे कुठली तरी असामान्य शक्ती आहे आणि तो याचना करत होता असे काही वाटून गेले. पाण्यामध्ये शाईचा थेंब पडावा तशी हतबलता मी त्याच्या चेहऱ्यावर पसरताना बघितली. आता चांगलेच अंधारून आले होते. कातरवेळ म्हणतात ती हीच का ती?

घरी पोहोचल्यानंतर मी गाडीचे दार बंद करताच तो निघून गेला. मी त्या दिवशी पहिल्यांदा विचार केला, मी खरंच कधी विचारपूर्वक प्रार्थना केली आहे का? ‘आपल्याशी संबंध नसणाऱ्या आणि असणाऱ्या सर्वांचे भले होऊ दे’ असा मी जाणीवपूर्वक विचार केला होता का? काही चेहरे क्षणिक समोर येतात तर काही सहप्रवासी असतात, मी मोठ्यांदा म्हणाले, “या जगामध्ये शांतता आणि सौख्य नांदू दे.” त्या टॅक्सीवाल्याचे मला नाव आठवत नाही पण त्याचे दुःखाने आणि वेदनेने भरलेले डोळे मला आठवतात. असहाय्य हतबलता आणि अनिश्चितता जेव्हा आपल्याला घेरते तेव्हा आपण खूप एकटे झाल्याची भावना येते. आणि तो ते सगळॆ माझ्याशी पंधरा मिनिटांत बोलून गेला. मी सुन्न झाले. रोज रात्री झोपताना आपल्या प्रिय लोकांशी मी कधी बोलू शकेन या बेचैनीने मी कधीच डोळे मिटले नव्हते. जेव्हा दुपारी तीन वाजता अंधार पडतो ना तेव्हा मन आपोआपच ऊब शोधते. आपल्या हक्काच्या घरामध्ये आणि भोवताली आपली माणसे शोधते. त्यांच्या आपल्याजवळच्या आठवणी आणि खुणा ताज्या करण्यासाठी सगळे प्रयत्न होतात. आपल्यातले आणि त्यांच्यातले अंतर कमी करण्यासाठी जर आपला संपर्कच होऊ शकत नसेल तर मनाची समजूत काढायची तर कशी! या सगळयामध्ये जमेल त्या भाषेत अनोळखी माणसासमोर भावना व्यक्त करायला त्याला केव्हढाले बळ एकवटावे लागले असेल!

आयुष्यात मी पहिल्यांदा माझ्या सुखाकडे कृतज्ञतेने बघत होते. मला माझे घर आणि प्रिय व्यक्तींना सोडून येण्यासाठी कोणी भाग पडले नव्हते किंवा इतर कुठल्या कारणाने माझ्यावर तशी वेळ आली नव्हती. जनजीवन विस्कळीत होऊन जीव मुठीत घेऊन देश सोडायचा विचार तर मनात आलाच नव्हता. अमेरिकेत येण्याचा माझा निर्णय हा वैचारिक स्वातंत्र्याची एक छटा होता. आमचे मायदेश वेगळे होते. सांस्कृतिक जडणघडण वेगळी होती. एका माणसाने दुसऱ्या माणसाकडे मदत मागितली होती. हे सरळ आणि सोप्पे वाटले आणि त्याने मला अनेक माणसांशी जोडले ते एक माणूस म्हणून. हिवाळ्यात येणाऱ्या औदासिन्याने, माझ्यापेक्षा इतक्या वेगळ्या माणसाची वेदना मी वाटून घेऊ शकले. भीषण असते ते जग, जे इतरांना रम्यदेखील वाटते.

थंड प्रदेशातील हिवाळे हे सवयीचे नसतात. बऱ्याच लोकांना ते अवघड जातात. प्रत्येकाचे कारण वेगळे. बाहेर पांढरट अंधुक प्रकाश, पाने गळून गेलेली झाडे, बोचरी थंडी, क्वचित भेट देणारा सूर्य, हे सगळे मायदेशीच्या आठवणी आणि मन झुरवत राहतात. अशा संध्याकाळी लोकांना एकटे वाटते. मन कुठे कुठे भरकटते. मला रवींद्रनाथ टागोरांची काबुलीवाल्याची गोष्ट माझ्या आजोबानी सांगितली होती. तेव्हा लोक कामानिमित्त बाहेरच्या देशात जातात हे समजले होते. आपणही असेच बाहेर पडू आणि आपल्याला घराची आठवण येईल, आपण व्याकुळ होऊ हे समजण्याच्या आतच आजोबा गेले आणि मी अमेरिकेत आले. जेव्हा हा ड्रायव्हर भेटला तेव्हा हे सगळे ताजे झाले. पण मला त्याच्यासारखी ‘घर’ या संकल्पनेबद्दल अनिश्चितता वाटली नव्हती. प्रिय लोकांच्या असण्याबद्दल कधीच शंका नव्हती. हे सगळे होऊन बरीच वर्षे झाली. अशाच एका संध्याकाळी जेव्हा थंडी वाढली, मळभ आले, पाऊस पडला आणि आठवणींचा पूर आला तेव्हा माझ्या शिक्षिका निर्मला पोतनीस यांची ही प्रार्थना आठवली आणि त्यांचा मायाळू चेहरा समोर आला. शाळा सुटताना आम्ही हे म्हणायचो आणि नंतर दोन मिनिटे शांत बसायला सांगितल्यावर डोळे किलकिले करून बघायचो. संध्याकाळची प्रार्थना.

दिसाकाठी थोडे शांत बसावे
मिटुनी डोळे घ्यावे क्षणभरी
एकाग्र करोनि आपुल्या मनाला
आपण पाहावे निरखोनी
सर्वांसाठी मैत्री प्रेम आणि आदर
आहे ना भरोनि अंतरात
भांडण सोडावे प्रेम द्यावे घ्यावे
सर्वांसाठी गावे मंगल गाणे.

पियानो 

आम्ही उपनगरातून डाउनटाउनला राहायला आलो तेव्हाची ही गोष्ट. खूप सुंदर इमारतीच्या सातव्या मजल्यावर एका आटोपशीर अपार्टमेंटमध्ये आम्ही राहत होतो. सगळे कसे चकचकीत, अत्याधुनिक होते. मला हे घर खूप आवडायचे. याला अनेक कारणे होती. एक तर सगळे कसे चालत जाण्याच्या अंतरावर. सार्वजनिक वाहतुकीचा पुरेपूर वापर. सुंदर बगीचे, काही मित्रदेखील जवळ राहायचे, तळ्याकाठी फिरायला जाणे, कॉफी पीत बाकावर बसून पुस्तक वाचणे हे सगळे इथे राहून करता येई. इमारत पण सुंदर होती. गच्चीवर भाजीपाल्याचे वाफे होते, ते सर्वांना वापरता येत. सभासदांसाठी जिमखाना होता. व्यपस्थापन पण नीटनेटके. मला या सगळ्या गोष्टींचे आकर्षण वाटे आणि आपण अशा ठिकाणी राहतो म्हणजे काहीतरी वेगळेच. आता माझे विचार बदलले आहेत. त्या टप्प्यावर मी खूप शिकत होते, घडत होते. मी आदराने बघते त्या दिवसांकडे. 

आमच्या घराच्या बाहेरच्या खोलीला एक मोठी खिडकी होती. समोरच्या इमारतींमधील घरे म्हणजे प्रत्येक खिडकीत वेगवेगळी दुनिया उलगडत असे. छोट्या ब्रिजवरून जाणारी दोन डब्यांची रेल्वेगाडी, सिग्नलला थांबणाऱ्या गाड्या, शाळेला जाणारी मुले आणि त्यांचाहात घट्ट धरून ठेवणारे पालक. समोरच्या इमारतीमध्ये वृत्तवाहिनीचे कार्यालय होते. तिथे बाहेरच थोडेफार कॅमेरे आणि दिवे उभे करून ते शूटिंग करत. ते बघायला मला फार आवडायचे. अनेक खिडक्यांमध्ये छोटी विश्वे. मला नेहमी वाटायचे, यातल्या प्रत्येकाची एक गोष्ट आहे, आणि मी समोरच्या खिडकीमधल्या गोष्टीत राहते. अशी मालिकाच सुरू आहे. या सगळ्यामध्ये कुठूनतरी पाश्चात्य शास्त्रीय संगीत ऐकू येई. रोजच्या गोष्टींमध्ये याची भर पडली होती. मला फारसे संगीत समजत नव्हते. पण ते खूप सुखदायक वाटायचे. हळूहळू मी इंटरनेटवर माहिती वाचत आणि ऐकत संगीतकार, त्यांच्या रचनाओळखायचा प्रयत्न करत गेले. एक दिवस तर पडदे उघडे ठेवून बाहेर वाकून आवाज कुठून येत आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला पण काही नीट समजत नव्हते.

आता या घरी राहायला येऊन चांगले तीन महिने झाले होते. ते संगीत या अनेक खिडक्यांच्या जगाची पार्श्वभूमी झाले होते. कुठे कोणी शून्यात नजर लावे, कोणी मुलांबरोबर अभ्यास करत असे, तर कोणी टीव्ही बघत असे, कोणाकडे खूप पाहुणे आलेले दिसत तर कुठे तरी नुसताच दिवा जळत असे. पण खिडक्यांमधील मालिका अखंड सुरु. सकाळचे काम झाल्यानंतर पुस्तक घेऊन सोफ्यावर बसायचे हा माझा एक छंद. दुपारी पडदे ओढायचे, अर्धवट खिडकी उघडायची आणि वाचत बसायचे हा माझा ठरलेला कार्यक्रम. हा वेळ मला खूप हवाहवासा वाटायचा. एक दिवस मला काही कारणाने बाहेर जायचे होते. आज दुपारी वाचन होणार नव्हते. मी बाहेर पडले. दरवाजा बंद करण्यासाठी किल्ली शोधू लागले. पर्स रिकामी करून बघितली, मग घरातले नेहमीचे कोपरे बघितले, लिफ्टच्या आजूबाजूला, दाराच्या मागच्या बाजूला, कॉरिडॉरच्या सुरुवातीला बघितले.  डोक्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी. या सगळ्यांमध्ये मी शंभर वेळा तरी घराचे दार उघड बंद केले असेल. मी सकाळी काम संपवून आले याचा अर्थ मी किल्ली वापरली होती. अचानक इथे दिवस सुरू असलेल्या गोष्टीमध्ये वादाला आल्यासारखे झाले. आपण किल्ली कशी हरवू शकतो, या विचाराने मी गांगरले होते. असे कसे झाले, आपण विसरलो कसे, काय झाले असावे, आता दंड भरून नवीन किल्ली घ्यावी लागेल, कुठे गेली ती किल्ली? अशा अनेक ओशाळून टाकणाऱ्या प्रश्नांच्या वादळात मी दारातच उभी होते. इतके दिवस सुंदर जाणाऱ्या माझ्या युटोपियन दिनक्रमाला मोठा धक्का बसला होता.

मी माझ्याच विचारात आणि किल्लीच्या कोड्यात उभी होते. तेवढ्यात शेजारच्या आजी बाहेर आल्या. आमची फारशी ओळख नव्हती. त्या जुजबी बोलायच्या ते पण कधीतरी लिफ्ट मध्ये भेटल्या तर. त्यांचे एक मांजर होते. मी आजींना फारसे बाहेर पडताना पण बघितले नव्हते कधी. त्यांनी मला काय झाले याबद्दल प्रश्न विचारले,”तुझ्या खुडबुडीमुळे मी बाहेर आले, काय झाले”? आजींना किल्लीबद्दल सांगितले, सकाळी किल्ली वापरली होती आणि आता ती सापडत नाही.  मी थोडीशी घाबरले आहे हे बघून आजी म्हणाल्या, “आधी श्वास घे, पाणी पी. तू घराच्या आत जाऊ शकतेस आणि खाली ऑफिसमध्ये दुसरी किल्ली लगेच मिळते. आभाळ कोसळलेले नाही.” तेवढ्यात लिफ्टमधून एक माणूस आमच्या दिशेने चालत आला. आजींनी माझ्या पाठीवर हात ठेवला. मला सांगितले की हे त्यांचे पियानोचे शिक्षक आहेत. त्यांच्या तासाची वेळ झाली आहे आणि ते दोघे आत निघून पण गेले. मी तशीच कोडे सुटल्यासारखी उभी होते. दरवाजा बंद झाल्यावर मी ‘थँक यू’ म्हणाले. पटकन आत गेले, पुस्तक वाचत बसले. आज पडदे सरकवले नव्हते. संगीताने आम्ही दोघी एकत्र आलो होतो. मला आता रोजच्या गोष्टींना तिची साथ मिळत होती असे वाटले. परदेशातल्या माझ्या परफेक्ट घरात राहताना मी न लाजता कोणाकडे तरी मदत मागू शकत होते. शिष्ट वाटणाऱ्या आजी माझ्या रोजच्या आयुष्यात त्यांच्या संगीताने खूप काही देत होत्या. बीथोवेनची सहावी सिंफनी ऐकत मी किल्ली नंतर शोधावी या विचारात हरवून गेले.

आता जेव्हा मी या गोष्टीचा विचार करते तेव्हा मला आपण एखादी शॉर्टफिल्म बघतो ना, तसे वाटते. नवीन जोडपे आपल्या आयुष्याचा ताळमेळ बसवत छोटे-छोटे आनंद आणि लहानसहान कुरबुरींमधून वाट काढत आहे. शेजारच्या म्हाताऱ्या बाई आणि त्यांची मांजर आहे. त्यांच्या आयुष्याला वेगळी करणारी एक लाकडी भिंत आहे. त्या आजीबाईंचे स्वतःमध्ये राहणे आणि माझे सगळ्या गोष्टींना सामावून घेण्याच्या प्रयत्नांचे जाळे. परदेशात जेव्हा मी गर्दीत जात असे, तेव्हा तीव्र इच्छा असायची की कोणीतरी आपल्याला हाक मारावी, अचानक दिसले म्हणून चार सुखाच्या गोष्टी कराव्यात. आज भाजी आणायला गेल्यावर हे अमुक भेटले, त्यांनी ते तमुक विचारले. असे चेहरे नव्हते माझ्या निखालस दिनचर्येत. अशी अनेक अनोळखी माणसे पण आता खूप जवळ राहतात, जवळ वाटतात आणि त्याहीपेक्षा जवळ असतातच. हे समजायला किल्ली हरवावी लागते.

अचकूल

काही कारणाने मी पोलंडला गेले होते. खूप विचारानंतर ऑशविट्झ आणि बिरकनाऊला जायचे ठरवले. मनात खूप प्रश्न होते आणि थोडीशी धाकधूक पण. आपण या विषयावर खूप वाचलेले असते. चित्रपट बघितलेले असतात. मला स्पष्ट आठवते ते ‘हॅनाची सुटकेस’ हे कॅरेन लिविन यांचे पुस्तक मी खूप लहान असताना वाचले होते.

इतिहासाच्या पुस्तकात हिटलरबद्दल समजले होते. पण या सगळ्याचे गांभीर्य जाणवले ते ‘पियानिस्ट आणि ‘शिंडलर्स लिस्ट’ हे सिनेमे कॉलेजात पहिल्यांदा बघितल्यानंतर. लहानाचे मोठे होताना या सगळ्या गोष्टी समुद्राच्या खूप पलीकडे आणि आपला फारसा काही संबंध नाही अशा लोकांच्या बाबतीत आणि ठिकाणी घडल्या असाच समज होता. दुसरे असे की डॅनियल लिबेन्स्कीड नावाच्या प्रसिद्ध आर्किटेक्टने बांधलेल्या ज्यू म्युझियमबद्दल एक सुंदर फिल्म बघितली होती. त्यामुळे एक भीती आणि उत्सुकता होती. मला एक डेथ कॅम्प बघायला जायचे म्हणजे नक्की काय या भावनांचा किंवा अशा भावनिक प्रतलाचा काही अनुभवच नव्हता.

अखेर मी टूर बुक केली. सांगितलेल्या ठिकाणी बसची वाट बघत उभी राहिले. माझ्याबरोबर बरेच लोक बसची आणि गाईडची वाट बघत होते. आम्ही सगळेच वेगवेगळ्या भाषा बोलत होतो. आमचे मायदेशही वेगळे होते. आम्ही वेगवेगळ्या वयोगटांतले होतो. नुसतेच एकमेकांकडे बघून स्मित करत होतो. लांब लांब उभे होतो. मी तर एकटीच होते. मला काय करायचे कळत नव्हते. मी थोडीशी अस्वस्थ पण होते. बस वेळेवर आली. आम्हाला सगळे नियम आणि वेळा कशा पाळायच्या याची माहिती दिल्यानंतर गाडी सुरु झाली. पोलंड खूप सुंदर देश आहे. आजूबाजूचा परिसर, भरपूर झाडे बघत बस हायवेला लागली. आता गाईडने अजून माहिती द्यायला सुरुवात केली. इतिहास, दाखले, सध्याचे चित्र याचे थोडेफार तपशील. मी पहिल्यांदाच गाईडकडे निरखून बघितले. मध्यमवयीन आणि कष्टाळू होता. त्याचा चेहरा खूप दयाळू वाटला. कधीकधी फार काही न बोलता तुमचा जीवनप्रवास समजतो ना तसे त्याच्याकडे बघितल्या बघितल्या त्याचे त्याच्या कामाबद्दलचे प्रेम आणि प्रामाणिकपणा दिसून येत होता. अशा व्यक्तींबद्दल मला खूप आदर वाटतो.

तासाभरात आम्ही एका वाहनतळावर पोहोचलो.  सगळीकडे आमच्यासारख्याच बस होत्या. ऑशविट्झचे फोटोत बघितलेले गेट कुठे दिसत नव्हते. आम्हाला सांगण्यात आले की व्यवस्थापनाला सोपे जाण्यासाठी त्यांनी वाहनतळाला लागून नवीन प्रवेशद्वार बांधले आहे जे मुख्य कॅम्पकडे घेऊन जाते. गाईडने आम्हाला एका मोठ्या दाराजवळ नेले. तेथे आमचे ओळखपत्र आणि बॅगा तपासल्या. आता आम्ही एका ओळीने जिना उतरून मोठ्या हॉलमध्ये आलो. तिथे सगळ्यांना हेडफोन देण्यात आले. त्यातून आम्हाला गाईडचे बोलणे नीट ऐकू येणार होते. त्याने पुन्हा एकदा सगळे नियम समजावून सांगितले. आमचा १०-१२ लोकांचा ग्रुप होता. आमच्या समोर एक सरकते दार उघडले आणि एका लांब पॅसेजमधून आम्ही चालत होतो. अंधुकशा उजेडाची तिरीप त्या चिंचोळ्या वाटेच्या शेवटी येत होती. दोन्ही भिंतींवर तिथे आणल्या गेलेल्या प्रत्येक माणसाचे नाव लिहिले होते. ती नावे वाचण्याची ध्वनिफीत लावली होती. त्याचा आवाज लांबून येत आहे असे भासत होते. पॅसेजच्या शेवटी आकाश जाणवत होते. आमच्या पावलांचा आवाज घुमत होता. खूप विचारपूर्वक हे सगळे बांधण्यात आले आहे याची ती पहिली खूण. आम्ही दबकत चालत होतो पण आमच्या पावलांचा आवाज काही पाठ सोडत नव्हता. मला खूप अडकल्यासारखे झाले, कधी एकदा स्वच्छ प्रकाश बघते असे. ती चिंचोळी वाट, तो आवाज वेगळेच वाटत होते. आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही सगळे हे प्रोसेस करत होतो. आम्ही सगळ्यांनीच उसासे टाकले आणि उघड्या आकाशाकडे बघितले. आता समोर होते ते कॅम्पचे गेट. तो माहिती देत होता. जर्मनमध्ये लिहिलेल्या शब्दांचा इंग्रजीत अर्थ सांगत होता. मानवी क्रौर्याच्या सीमा ओलांडून इतिहास झालेल्या इमारतींकडे आम्ही पाणावलेल्या डोळ्यांनी बघत होतो. इथल्या वस्तू, गॅस चेंबर आणि तारेचे कुंपण हे एक वेगळेच जग होते. कधी कोणीही जगू नये असे. भिंतींवरचे नखांचे ओरखडे, लहान मुलांच्या बुटांचे ढीग, लोकांचे चष्मे, कृत्रिम पाय आणि कुबड्या, अशा अनेक पीडितांच्या वस्तू बघून पोटात कालवत होते. तिथल्या भिंती फोडून बाहेर यावेसे वाटत होते. लोकांना दिल्या गेलेल्या गणवेशांची अवस्था बघून आपल्या अंगावरचे कपडे फाटल्यासारखे वाटत होते. गॅस चेंबरच्या आतमध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई होती. तिथे लादलेल्या मृत्यूच्या खुणा सगळीकडे पसरल्या होत्या. लाखो लोकांच्या अत्याचाराच्या साक्षीदार भिंती भग्न आणि विषण्ण करत होत्या.

आता अनोळखी असणारे आम्ही जवळ जवळ उभे होतो. गाईडचा प्रत्येक शद्ब आरपार भेदून जात होता. सर्व गोष्टींची माहिती दिल्यानंतर आम्हाला बिरकनाऊला नेण्यात आले.तिथे खूप चालावे लागत होते. ऊनपण खूप होते. स्त्रियांचे आणि लहान मुलांचे कक्ष पाहिले. तिथल्या भिंतींवर लहानांसाठी मोठ्यांनी काही चित्रे काढली होती. मृत्यूला इतक्या जवळून बघताना आणि कवटाळताना कुठून आशा जागी ठेवण्याची इच्छा येत होती या लोकांना! लहान मुलांना गुंतवण्यासाठी कोळशाने काढलेली चित्रे बघून रोज त्यांना कशाला सामोरे जावे लागत असेल याची जाणीव होते. विनाशासारखं सत्य समोर असताना लहानांचे जीव आणि निष्पाप मने जपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले असावेत असे वाटते.  समजण्याआधीच मरावे लागले असेल, जे वाचले असतील त्यांना भानावर यायला खूप वेळ लागला असेल. मला आपण रोज राहतो ती दुनिया खरंच सुंदर आहे असे वाटले, या सगळ्यांशी काही संबंध नसणारी. उध्वस्त केलेले गॅस चेंबर्स आणि मोडके रेल्वेचे रूळ म्हणजे भरकटलेल्या मानवी संवेदनांचे रूपक होते. पाय जड झाले होते. निरभ्र आकाश डोळ्याला स्वच्छ दिसत होते पण वेगळेच जडत्त्व आले होते. प्रत्येक पाऊल कष्टाने उचलायला लागत होते. आमच्या ग्रुपमधल्या एका जोडप्याला त्यांच्या आजीचे नाव मृतांच्या यादीत सापडले. तिचे निधन झाले त्या दिवसाची नोंद होती. त्यांची वेदना बघून आम्ही सगळेच रडलो. 

टूरच्या शेवटी गाईडचे आभार मानून आम्ही निघालो. दिवसभर अनोळखी असणाऱ्या चेहऱ्यांची आता जास्तच सोबत वाटत होती. पांढऱ्या शर्टाला खळ घालून इस्त्री करावी तसे आमचे सकाळी आविर्भाव होते. एकदम तटस्थ, निश्चल, आणि तोच शर्ट दिवसभर घातल्यानंतर कसा सुरकुतावा आणि मळावा तसे आम्ही झालो होतो. खांदे उतरले होते. मानवी इच्छा या जगामध्ये काय घडवून आणू शकते याचे दाखले आम्ही एकत्र पहिले होते. आम्ही सकाळी स्वतःच्या वेगळ्या साच्यात होतो. आमची जडणघडण वेगळी, देश वेगळा, वेश वेगळा पण आम्ही असे का एकत्र आलो? आमचे स्वतःबद्दलचे अचकूल समज निखळून पडले होते. धर्म, वर्ण, लिंग, जात, भाषा, वय, देश, वेश आणि ज्या काही भेद-अभेदाच्या प्रमाणमूल्य गोष्टी होत्या त्या धुळीमध्ये पुसल्या होत्या. आम्ही फक्त माणसे होते. माणसे जे काही करू शकतात हे इतक्या जवळून पाहिल्यानंतर कारुण्याने आम्ही जवळ आलो होतो. आता आमच्यामध्ये ओझे राहिले नव्हते. 

गाडीतून उतरताना कोणी गाईडचा हात हातात घेत होते तर कोणी आलिंगन देत होते. त्याने अशा रोज किती लोकांना रिकामे होताना बघितले असेल. मला ही माणसे परत भेटणार नव्हती पण आम्ही आज जे काही एकत्र अनुभवले होते त्यातून आयुष्याच्या खूप मोठ्या प्रचितीने आम्ही जोडले गेले होतो. दुसरे कोणीही न राहता, फक्त माणसे म्हणून. या जगात आपल्या कल्पनेच्या आणि विश्वासाच्या पलीकडे लोक आजही अस्वस्थ आहेत, त्रस्त आहेत याची जाणीव झाली होती.

ओळ 

माझा आणि मैदानी खेळांचा तसा काही संबंधच नव्हता. पळण्याच्या शर्यतीत ट्रॅकवरून चालणारी मी. लंडनमध्ये राहायला लागल्यापासून जशी पावसाची सवय झाली तशी विविध खेळांच्या सामन्यांची पण माहिती झाली. उन्हाळा सुरु झाला कि बीबीसीवर विम्बल्डन बघायचे. मला तर गुण कसे मोजायचे इथपासून सुरुवात होती. पण मला  मनापासून टेनिस आवडायला लागले. हळूहळू समजायला लागले. टीव्हीवर बघणे ठीक पण प्रत्यक्षात विम्बल्डनचे तिकीट मिळवणे कठीणच. तसे स्वप्नात पण येत नाही. एक तर तुम्हाला लॉटरीमध्ये नाव टाकावे लागते. त्यात यशस्वी न झाल्यास ते दररोज काही तिकीटे विकतात. त्यासाठी मोठी रांग असते. काही लोक तर आदल्या रात्री तंबू घेऊन तिथे बाहेरच्या मैदानावर तळ ठोकून रांगेत आपला नंबर मिळवतात. सकाळी ९.४५ ला तिकीटघर उघडते आणि रांग पुढे सरकते. नवीन लोक येतच राहतात. हा सगळा एक सोहळा असतो. सगळे कसे व्यवस्थित. कुठेही धक्काबुक्की नाही की कुठे गोंधळ नाही. ओळीत येणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या क्रमांकाचे एक कार्ड मिळते. तो तुमचा क्रमांक दुसरा कोणीही घेऊ शकत नाही. तिथे खूप माणसे काम करतात. मदतीला हजर होतात. अगदी सगळे सुसज्ज असते तुमचा ओळीतील अनुभव रम्य करण्यासाठी. इथल्या लोकांना नियम बनवायला आणि ते पाळायला खूप आवडते. हा माझा अनुभव.

मी गेले तीन वर्षे तिकिटांच्या लॉटरीमध्ये अपयशी ठरल्यानंतर हे सगळे झाले. विम्बल्डन म्हणजे फारच उत्सुकतेचा विषय आणि मला सापडलेले नवे टेनिसप्रेम. विम्बल्डनच्या जगप्रसिद्ध क्यूबद्दल खूप ऐकले तर होतेच. पण आपण जायचे का नाही ते ठरत नव्हते. खूप विचारमंथनानंतर दुसऱ्या दिवसाचे सामने बघायचे आणि क्यू जॉईन करायचे ठरले. रात्री १.३० वाजता रेनकोट, पाण्याची बाटली आणि एक सफरचंद घेऊन मी विम्बल्डनला पोहोचले. थोडी भीती होतीच. रात्री माणसे असतील का? काही हवे असेल तर काय करायचे? पण कुठले काय, खूप गर्दी होती. तिथे पोहोचल्यानंतर स्वयंसेवकाने मला ओळीच्या शेवटी जायला सांगितले. तिथे मला ७५९ क्रमांकाचे क्यू कार्ड मिळाले. तो माझा नंबर होतो, जो कोणीही घेऊ शकत नव्हते. एका कर्मचाऱ्याने मला सांगितले की मी आता सहा वाजेपर्यंत झोपू शकते. लोक येतच राहतील . इथे सगळी सोय होती. पिण्याचे पाणी, खाण्याचे ठेले, भरपूर स्वच्छतागृहे. खरेच माणसे रांगेत येतच होती आपला नंबर लावायला. मी गवतावरच आडवी झाले. माझ्या पुढे १८-१९ वर्षांची मुले होती. काही क्षणांतच माझ्या मागे दोन बायका आल्या. माझ्या आजूबाजूचे सगळेच गवतावर आडवे झाले होते. मला हे इतके सगळे नवीन होते. कुठे कोणी घोरत होते तर कोणी गप्पा मारत होते. मला झोप येत नव्हती. तेवढयात पावसाचे थेंब पडू लागले. माझ्या शेजारच्या बायकांनी माझ्या डोक्यावर छत्री ठेवली. मी उठून छत्री त्यांना  परत देणार तेवढ्यात त्यांतली एक बाई म्हणाली, “मी आणि माझी मुलगी झोपू शकतो एका छत्रीमध्ये. तुला ठेव ती”. मी त्या माय-लेकींचे आभार मानले. माझ्या डोक्यात चालू असलेल्या विचारचक्रांमुळे मला काही झोप आली नाही. माझे इकडेतिकडे निरीक्षण चालूच होते. बरोबर सहा वाजता कर्मचारी जोरात सगळ्यांना उठवू लागले, “सहा वाजले, उठा उठा”. ते तंबू आणि इतर सामान आवरून ठेवण्याच्या सूचना देत होते. आता सगळे दिवसा येणाऱ्या लोकांच्या व्यवस्थापनासाठी सज्ज झाले होते. मी उठून बसले. रांग तर चांगलीच मोठी झाली होती. हजारो लोक दिसत होते. मायलेकींबरोबर गप्पा सुरु झाल्या. मला समजले की त्या अनेक वर्षे येत आहेत आणि त्या स्कॉटलंडला राहतात. आम्ही कॉफी आणली आणि गवतावर बसलो. माझी ही पहिलीच वेळ आहे हे समजल्यावर त्या खूप खुश झाल्या. आज कुठले सामने होणार आहेत, कोण खेळणार आहेत याची माहिती दिली. आता आजूबाजूचे गट आमच्या गप्पांत सामील झाले आणि सगळेच जण आपापले अनुभव सांगू लागले. ते तिथे का आले आहेत, किती वर्षं येत आहेत वगैरे वगैरे, आता कशी गर्दी वाढली आहे, पूर्वी कसे होते इत्यादी. मी एकटीच होते आणि सगळे नवीन. मला तर त्यांनी फारच समजुतीने सगळे सांगितले. बीबीसी आणि इतर वृत्तवाहिन्यांचे लोक पण कॅमेरे घेऊन रांगेतल्या लोकांना प्रश्न विचारत होते.मला या सगळ्याची मज्जा वाटत होती. विम्बल्डनची रांग तुम्हाला इतर लोकांशी कशी जोडते हे मी शिकले. रांगेत येण्याचे प्रत्येकाचे कारण अद्वितीय वाटले. प्रत्येकाच्या कथा पण सुरस अगदी माझ्यासारख्याच. दिवसभराचे सामने पार पाडण्यासाठी आम्ही सर्वजण शक्तीचे एक युनिट बनलो होतो.

रांग पुढे सरकत होती. बघत बघता सकाळचे ८ कधी वाजले हे समजलेच नाही. याचे कारण म्हणजे, काटेकोर शिस्तबद्ध नियोजन, व्यवस्थापन आणि ओळीतली माणसे. माझ्या ओळीतल्या नव्या मित्रांना मी प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. “अजून किती वेळ चालावे लागते”? “किती वाजता आपण आत जाऊ”? माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. एकजण म्हणाले की ते गेली तीस वर्षे ओळीत उभे राहून तिकीट घेत आहेत. ओळीत उभे राहणे हा विम्बल्डनचा अविभाज्य घटक आहे. कर्मचारीसुद्धा रात्रंदिवस ओळीत उभ्या असणाऱ्या लोकांशी आदराने वागत होते. त्यांच्या मते आम्ही बाकीचे आयुष्य थांबवून ओळीत उभे आहोत त्यामुळे आम्हाला चांगलाच अनुभव यायला हवा. आमच्या प्रत्येकाचे जसे रांगेत येण्याचे  टेनिसप्रेम हे कारण होते तसेच उत्कट इच्छा आणि विचारही होते. त्या वातावरणामध्ये आम्ही एकमेकांकडे खूप आदराने बघत होतो. आम्ही ८-१० लोकांनी एकमेकांचे फोन क्रमांक घेऊन दुपारचे जेवण एकत्र करायचे ठरवले.  विम्बल्डनचे तिकीट हे त्या दिवसाचे असते, तुम्ही त्या दिवशी होणारे सर्व सामने बघू शकता. ओळीतल्या पहिल्या ५०० लोकांनाच सेन्टर कोर्टचे तिकीट मिळते आणि माझा नंबर तर ७५९ होता. अखेर ती घटिका अली. एक कर्मचारी हातात बांध्याचे पट्टे घेऊन “कोर्ट १ की सेन्टर कोर्ट” असे विचारत होता. अर्थातच मी सेन्टर कोर्ट मागितले आणि माझ्या ओळीतल्या मित्रांनी पण. आम्ही एकच जल्लोष केला. माझी पहिलीच वेळ असून मला सेन्टर कोर्ट मिळाल्याने  सर्वांनी माझे कौतुक केले आणि मला केवढी अनमोल संधी मिळावी याची जाणीवदेखील करून दिली. माझ्यासाठी ते पण खुश झाले होते. माझा आनंद द्विगुणित झाला. असे लोक जेव्हा तुमच्या आनंदात सामील होतात तेव्हा त्या आठवणी जन्मभराच्या असतात. हातात सेन्टर कोर्टचा पट्टा बांधून आम्ही सगळे तिकिटाचे पैसे भरायची वाट बघत होतो. एका कर्मचाऱ्याने विचारले, “कोणी एकटे आहे”? माझ्या मित्रांनी माझ्याकडे बोट करत त्याचे लक्ष वेधले. मला आठव्या ओळीतले पुढचे एकच राहिलेले तिकीट देण्यात आले. अखेर १० वाजून १५ मिनिटांनी मी सेन्टर कोर्टच्या बाहेर उभी होते.

नव्या मित्रांनी सामन्यांचे वेळापत्रक कसे बघायचे, महत्वाचे खेळाडू कुठे खेळणार आहेत हे समजावून सांगितले. एकत्र जेवायचे ठरवून आम्ही एक्सप्लोर करायला निघालो. मी लहान मुलांचा पहिला सामना बघितला. त्यानंतर प्रसिद्ध हेनमन हिलला भेट दिली. ज्या लोकांना शो कोर्टची तिकिटे मिळत नाहीत ते इथे मोठ्या स्क्रीनवर गवतावर बसून बघू शकतात. त्याची मज्जा तर काही औरच. इतकी वर्षे ज्याचे कौतुक ऐकले होते ते स्ट्रॉबेरी आणि क्रीम खायचे होते.  रात्रभर ओळीत थांबूनदेखील ते खाण्यासाठी पुन्हा एकदा रांगेत उभी राहिले. तिथे परत तोंडदेखल्या गप्पा. “तुम्ही कधी आलात?”, “अरे वा, लॉटरीचे तिकीट का?” असे जुजबी बोलून मी पुढे. आम्ही रात्रीच्या ओळीतले सगळे पुन्हा भेटलो एकत्र जेवलो आणि सेन्टर कोर्टमध्ये जाऊन बसलो. मी घरच्यांना कळवले आणि ‘मला टीव्हीवर बघा’ असे सांगितले. पंचांच्या मागच्या खुर्चीवर मी बसले आहे. आनंद आणि नावीन्याने लहान मुलांची चॉकलेट गोळ्यांच्या दुकानात होते तशी माझी अवस्था होती.

दुपारी एक वाजता खेळ सुरु झाले. सहा सामने होणार होते. सेन्टर कोर्टवाले आम्ही नशीबवान. बाहेर पाऊस कोसळत होता. आत सेन्टर कोर्टचे छप्पर बंद करण्यात आले. आम्ही सर्व सामने विनाव्यत्यय बघू शकणार होतो. आज रॉजर फेडरर तिथे आला होता. त्याचे सगळ्यांनी उभे राहून स्वागत केले. खेळ सुरु झाल्यावर सगळे कसे चिडीचूप, शांत! टाचणी पडली तर आवाज येईल असे. सर अँडी मरी यांचा रोमांचकारी खेळ पहिला. दिवस कसा गेला ते समजलेच नाही. अजूनही पाऊस पडतच होता. दिवसाच्या शेवटी अनेक लोकांनी स्मरणिका दुकानातून छत्र्या विकत घेतल्या. सर्व काही भिजत होते. माझ्या रात्रीच्या मित्रांचा निरोप घेऊन, पुढच्या वर्षी परत रांगेत भेटायचे ठरवून मी निघाले. रस्त्यावर विम्बल्डनच्या छत्र्यांचा समुद्र दिसत होता. स्टेशनच्या रस्त्यावर अजून मित्र बनवले आणि साऊथ फिल्ड स्टेशनच्या आत जाण्यासाठी पुन्हा एकदा मी रांगेत सामील झाले. आमच्यापैकी प्रत्येकजण अजून कथा, आजचे अनुभव, आवडते खेळाडू, सामनापत्रिका, याबद्दल बोलत होते. अखंड देवाणघेवाण चालू होती. आयुष्यात पहिल्यांदा भेटलेल्या लोकांच्या जवळ येण्यासाठी ही ओळ कारणीभूत ठरली. तो दिवस, सेन्टर कोर्टवरच्या टाळ्या, रॉजरचे हास्य, अँडी मरेचा विजय, रात्री आडवे झाल्यावर टोचणारे गवत आणि माझे ओळीतले मित्र एका सुरेख चित्रफितीसारखे होते. ज्याचे फोटो डेव्हलप करायचे आणि आठवणी साठवून आणि जपून ठेवायच्या.

काय दिवस होता! रांगा लावणे ही कला आहे. तुमच्या सोबत घडणाऱ्या गोष्टीत धीर धरायला शिकवते. गेल्या १८ तासात मी अनेक ओळींचा भाग बनून खूप लोकांशी जोडले गेले होते. आम्ही तिथे होतो कारण आम्हाला ते करायचे होते, टेनिसबरोबरच एक उत्कट इच्छा आणि त्यामागची प्रेरणा बघून मी इतरांचा आदर करायला शिकले. मध्यरात्री सगळे सोडून तुम्ही तिथे येता म्हणजे तुम्ही तुमच्या भावनेशी  प्रामाणिक असता, आणि हो, धीर धरल्याने तुमचा सगळ्या गोष्टींकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. सहानुभूती आणि अनुभूतीने तुम्ही जोडले जाता. रेल्वेमधून उतरताना एक बाई म्हणाल्या, “एखादी गोष्ट घडत नाही असे वाटत असेल तर विम्बल्डनच्या ओळीत येऊन उभे राहावे , सगळे घडत जाते.” विम्बल्डनचे सामने त्या ओळींमधल्या माणसांमुळे अधिक अविस्मरणीय आणि रम्य वाटत होते. असा दिवस पुन्हा पुन्हा यावा आणि ही माणसे परत भेटावीत अशी इच्छा होत होती.

स्थलांतरित मी 

या गोष्टी खूप वैयक्तिक कोशातून आल्या आहेत. बरेच काही व्यक्त करताना आणि विशेषतः लिहिताना मला भावनिक आंदोलनांना सामोरे जावे लागले आहे. एक भारतीय मुलगी म्हणून जे स्वातंत्र्य उपजत मिळाले, हक्क म्हणून उपभोगले त्यांची जाणीव या दोन देशांमध्ये राहताना झाली. बाहेर पडल्यावर वेगळे एकटेपण होते. जिथे समाजात आवर्जून समाविष्ट होण्याची गरज नियतीने आणि माझ्या निर्णयाने अधोरेखित केली. माझ्याकडे असेलेल्या आणि मिळालेल्या स्वातंत्र्याबरोबरच हक्काचा विचार करताना, जे असे भेटले की ज्यांनी उपभोगापेक्षा अधिक भोगले होते आणि ते अव्यक्त होते, त्यांच्या अस्तित्वाबद्दल आदर आणि प्रेम वाटू लागले. जे अभिव्यक्त होत नाहीत त्यांच्याकडॆ वेगळ्या नजरेने बघायला शिकले. त्यांचे असणे मान्य करायला शिकले. भारतातून अमेरिकेला जाणे, अमेरिकेतून इंग्लंडला येणे सोपे नव्हते, आणि अगदी मी ठरवले तसे तर अजिबातच नव्हते. पण या प्रवासात भेटलेल्या माणसांनी ते नितांत सुंदर केले, जरी ते घडत असताना तसे वाटले नसले तरीही. या सर्व माणसांची मी आभारी आहे. सकाळी चाऱ्यासाठी उडून जाणारे पक्षी संध्याकाळी जसे त्याच झाडावर परत येतात तशा माझ्या या स्थलांतराच्या गोष्टीसुद्धा पुन्हा पुन्हा स्वातंत्र्याच्या मार्गावर येऊन विसावतात. 

छायाचित्र (टाईल इमेज): वेणू पारिजात

वेणू पारिजात या भरतनाट्यम नर्तिकेने मुंबई विद्यापीठातून परफॉर्मिंग आर्ट्समध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. वेणू तिच्या अमेरिका आणि इंग्लंडमधील काळातील अनुभवांचे कथन आणि लेखन करते. वेणू नृत्यदिग्दर्शन, क्युरेशन, लेखन आणि संशोधनात तिची सर्जनशीलता गुंतवून ठेवते. सध्या लंडनमध्ये राहणारी, वेणू नृत्य शिकवते आणि भावनिक साक्षरता आणि सादरीकरण यामध्ये संशोधन करत आहे.

8 comments on “स्थलांतरित मी: वेणू पारिजात 

  1. Mangala Muley

    SUPERB

    Reply
  2. Manjusha Deshpande

    It is great article indeed. I have been studying Migration and its various features. This article will be valuable contribution for my study. Congratulations

    Reply
  3. Akanksha Patil

    Khup khup sundar!! Please keep writing!

    Reply
  4. Ruchi Shivkumar Dang

    Excellent

    Reply
    • Dr Kranti Vibhute

      Venu Very nice expressions of the feelings touched heart. Dr Kranti Vibhute kolhapur

      Reply
  5. Bela shyam joshi

    Exremely amazing post.

    Reply
  6. Sanjay Daiv

    Brilliant! Heartwarming to know that you write so well. Talented daughter of talented parents! Very effortless writing. Keep it up 🙂

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *