वंदना भागवत

दुकानांचे आव्हान आणि इतर कविता



back

दुकानांचे आव्हान

लालसा आणि गमावलेपण यांची आपली आपली स्थानिक भाषा असते
अगदी नेमकी..
समुद्र असं मनात येतं तेव्हा खाऱ्या पाण्याचा सपकारा तोंडावर बसतो
नाहीतर पायाखालची वाळू सरकत जाताना तळव्यांना कळते
आपला आपला समुद्र असतो
न बोललेल्या पण आत असलेल्या शब्दांचा
त्यात प्लॅस्टिकची आवरणे, बाटल्या, कागदांचे बोळे, टी.व्ही. वरच्या कर्कश्य चर्चा 
फेकून प्रदुषित करतील अशी भीती वाटून
मनाच्या तळाशी सांभाळलेल्या शब्दांचा.
मग आपण इतरांना आपल्या गरजा समजतील इतपतच भाषा वापरतो.
खरी भाषा आत खोलवर ठेवून देतो. 

अलीकडे ती आतवरची भाषा वापरायची संधी मिळत नाही. 
शहराचा माहोलच बदलला आहे. 
चकचकीत. भरगच्च. विकट.
आपल्या आपल्या शब्दांच्या बागेत बसून कढ काढायची उबळ जबरदस्त. 
तेव्हा मग झडझडून उठते.
आतली भाषा न बोलताही समजू शकणाऱ्या वैशालीला फोन करते.
दुकानांचे आव्हान घेतले पाहिजे हे आम्हाला माहिती आहे.
आमच्या तशा तुरळक पण नेमक्या वोर्डरोबचं पान उलटायला आम्ही सरसावतो.

आम्ही दोघी खरेदीला जातो. 
डील्स, बाय वन गेट वन फ्री, न्यू डील अशा शब्दांशी सामना करायला.
दोघींच्या तऱ्हा वेगळ्या आहेत.
वयानुसार आमच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. 
पण एकमेकींचे कपडे अदलून बदलून घालता येतात म्हणताना 
आम्ही एकमेकींना अशी आव्हानं घेताना बघत असतो. 

अलीकडे आपल्या वयाबरोबर आपल्या शब्दांचंही वय झालं असं वाटतं 
तेव्हा मग "हाऊ कॅन आय हेल्प यू मॅम?" असं म्हणणाऱ्या तरुण, गणवेषातल्या, 
हसण्याची प्रॅक्टिस केलेल्या मुलींशी बोलायला मजा येते. 
त्या माझ्या पांढऱ्या केसांकडे आणि सुकलेल्या बोटांकडे आशंकेनं बघत किंचित 
थबकतात.
नक्की कशाची मदत हवी असेल मला असं वाटून निवडलेल्या कपड्यांची पिशवी घेऊन 
बरोबर चालतात. 

मी माझा शब्दकोश उघडते. त्यालाही तसं वावडं नसतं अशा मुलींशी बोलायचं.
शेवटी त्याचे शब्द त्यांच्याच घरांतून आलेले असतात कोणे एके काळी.
आता शहरी चकाकी लावून नीट ठेवून दिलेले असले पुस्तकांतून म्हणून काय झालं!
रात्र रात्र जागून वाचलेल्या पुस्तकांचा थकवा जाण्यासाठी 
कल्पनाशक्ती परत एकदा मूलभूत गरजांकडे नेलेली बरी पडते.
वैशाली कायम म्हणत असते- थेट कपड्यांत शिरावं. 

अर्थांनी जडशीळ झालेला शब्दकोश
स्वप्नांसाठी भलभलते पर्याय सहजी मांडू शकतो. 
पण भोवताली बायकांच्या कपड्यांनी करकचून बांधून ठेवलेली संस्कृती भलतं सलतं बोलत असते.
शब्दांचे अर्थ विकृत करायला कितीसा वेळ लागतो रंगांच्या राजकारणात?
शब्दकोशाची पानं फाडून रंगांच्या बादलीत बुडवली की शूरपणे बोंबलता येतं.
तेव्हा मग कपड्यांमध्येच शिरावं हे बरोबर. 

मी वैशालीबरोबर पलाझो आणि क्रॉप टॉपच्या विभागात शिरते.
’मॅम लॉंग कुर्ते इथे नाहीत. समोर तिथे आहेत.’ असं सांगणाऱ्या सेल्सगर्लकडून मी पिशवी घेते
आणि तिला टाटा म्हणते.
वैशालीनं एव्हाना गुढघ्यावर फाटलेल्या जीन्सचे ढीग उलथायला सुरुवात केलेली असते.
"उन्हाळ्यातही वापरता येतात, वारं जातं आत." म्हणत ती हसते.
तसं तर कुठे कुठे वारं लागण्याची गरज आहे असं मनात येऊन मी हसते.
असंख्य निवडींचे पर्याय असणाऱ्या दुकानांत 
आम्ही आमच्या लिंगभावी उपसंहिता लिहीत असतो.
मी माझे नेहेमीचे लाल रंगाच्या छटांचे कपडे घेऊन 
[माझ्या वयाला न शोभणाऱ्या असं दिनेशचं म्हणणं आहे.] 
आणि ती कोणी सहसा घेणार नाही अशा चमत्कारिक डिझाईन्सचे आणि रंगसंगतींचे 
कपडे घेऊन.
या वस्तूंनी बनलेल्या जगात आपलं वस्तुपण नाकारणारे कपडे निवडायचे ही कठीण 
गोष्ट आहे.
शब्द उच्चारण्याइतकीच.
समानार्थी वाटणारे पण नेमकी छटा पकडणारे. श्लेष वेदनेनी चमकणारे. शब्द.
सरस्वतीनं वीणावादन थांबवून, हातातला ग्रंथ खाली ठेवून
स्क्रॅबल खेळायला उतरावं तसा
तुकड्या तुकड्यांनी आम्ही आमचा संवाद सांधत जातो.  

अंधाऱ्या खोलीत चाचपडत हिंडणं, टेबललॅंपच्या उजेडात डोळे फाडून हवा तो देखणा शब्द मिळवणं
अशा काव्यात्म धडपडीत मी असते.
वाक्यामध्ये भलताच घुसलेला शब्द लगेचच बिनसलेल्या मनाची लक्षणं सांगतो असं म्हणतात
पण हल्ली माझी स्थलांतरित शब्दांशी मैत्री झाली आहे
त्यामुळं बिनसलेपणाची व्याख्या पुरुषांच्या घट्ट मनस्क शब्दांशी जोडलेली आहे याची खात्रीदेखील.

वैशाली ट्रायल रूममधून मला बोलावते. 
तिची जीन मांड्यांवर वरपर्यंत फाडलेली आहे.
"कशी दिसते माहिती नाही. पण अगदी चड्डीच्या आतपर्यंत गार वाटतं आहे." ती खिदळत सांगते. 
जीन पॅंटची व्याख्या बदलूया का? 
’भटकंती करताना ढुंगण आणि पाय शाबूत ठेवणारा व घाम आल्यास 
मांडीवरील कातरलेल्या खिडकीतून हवा खेळती ठेवणारा वस्त्रप्रकार.’  
मी तिला लगेचच व्याख्या करुन देते. 

तिची मांडी-दाखव जीन आणि माझा बेंबी-दाखव कुडता घेऊन आम्ही दुकानाच्या बाहेर 
पडतो. 

***
गोष्टीची गोष्ट

अदितीचा फोन आला 
नेहेमीसारखीच खिदळत म्हणाली,
"अगं बघ ना अमनला सारख्या गोष्टी लागतात, अगदी माझ्यासारख्याच
 लहानपणी गोष्ट म्हटली की शेपूची भाजीपण मला खाता यायची. 
आणि किती छान असतं ना ते गोष्टींचं जग-
गोष्टीच खऱ्या वाटायला लागतात आणि मग आपण प्रेमात पडतो गोष्टीच्या.
एकदम गोष्टीच्या वाटेवर चालायला लागतो."

हरारी तेच म्हणतो असं मी तिला सांगता सांगता थांबते 
कारण तिचा प्रेमकथांवर भारी जीव आहे. हरारीचा नाही.
सामूहिक हिंसेच्या प्राक्तनाला आता तेवढाच उतारा आहे- प्रेमकथांचा.

खरं तर प्रेम हा शब्द फार मळला आहे.
माणसाच्याच गोष्टींनी भरला आहे. 
प्राणी पक्षी देखील नीतीकथांच्या पिंजऱ्यात माणूस बनवून कोंडले आहेत
माणसाला पशु-पक्ष्यांच्या नीतीकथा शिकता यायला हव्यात
प्रेमकथांची व्याप्ती आणि खोली वाढवायची तर.

माणसाला वाटतं फक्त त्याच्याच कथा असाव्यात इथल्या किनाऱ्यांशी.
मी व्हेलची गोष्ट सांगू? किंवा मग प्रवाळांची? किंवा नामशेष होत चाललेल्या कित्येक प्रजातींची?
मी अदितीला म्हणते.
गोष्ट इथे अवतरो! ती मुलाबाळांना सांगितली जावो! 
मुलंबाळं अवघ्या प्राणिजातासोबत माणसाला सुखाने नांदताना पाहोत!
आमेन!

आमच्या पिढीने घडवलेल्या गोष्टींपैकी ही एक.
खचाखच भरलेल्या हॉटेलमध्ये--जपानमधलं म्हणूयात? 
खरं तर कुठलंही चालेल, चीन, व्हिएतनाम, थायलंड, जिनिव्हा, पॅरीस, लंडन, न्यूयॉर्क, सॅन होजे..
तर जपान--
व्हेल स्पेशल डिशेस संपल्यावर
व्हेलचे उरलेले तुकडे खारवून ठेवल्यावर
हॉटेलवाल्यानं
व्हेलचा सांगाडा समुद्रात टाकून दिला.
फुकुशिमाचं अणुत्सोर्जित पाणी त्या सांगाड्याला झोंबलं
तसा तो झपाट्यानं आर्क्टिककडे निघाला.

जाताना कॅलिफोर्नियातल्या इंडियन भूमीवर जळालेल्या घरात
त्सुनामीची लाट घुसली तेव्हा तो व्हेलचा सांगाडा ते घर शोधून आला
माणसांचे उत्पात फुकुशिमाच्या किरणोत्सारापेक्षा विखारी

आर्क्टिकवर कदाचित आपला डीएनए सांभाळला तर 
नव्याने उभारता येईल आपलं अस्तित्व 
माणूस संपून गेला की.
त्यानं आपलं हजारो मैल पसरणारं गाणं म्हणायला सुरुवात केली
लाटांमधून थेट अंटार्क्टिका गाठलेल्या व्हेल्सशी बोलणारं

समुद्रभर हिंडणाऱ्या बोटींनी ती गाणी पकडली आणि
ग्रीक फ्यूरीज याव्यात तशा बोटी आर्क्टिककडे झेपावल्या,
शेवाळात गुंतलेले, अनाघ्रत बर्फाच्या लाद्यांवर विसावलेले व्हेल्स
आता या फ्यूरीजना कसे थांबवतील?
त्यांनी ओझोनचं प्रेतवस्त्र पसरलं 
फ्यूरीज त्यावर उतरल्या तसं गुंडाळून त्यांना भिरकावून दिलं अंतराळात
व्हेल्सच्या गाण्याने ओझोनच्या धांदोट्या शिवून टाकल्या
समुद्र आता खुला झाला समुद्रपक्ष्यांसाठी
व्हेल्सनी त्यांची युगाची झोप संपवली 
ते तयार झाले पुनर्जन्मासाठी
कुठे कुठे गाडले गेलेले माणसाचे सापळे 
त्यांनी त्यांच्या म्युझियम्समधून ठेवले 
त्यांच्या मुलांना दाखवायला सर्वात खतरनाक प्रिडेटरचा नमुना म्हणून.

अदिती हसली. म्हणाली, "मला काही समजली नाही तुझी गोष्ट.
मी अमनला सांगितलं आहे प्रेम एवढीच गोष्ट खरी
बाकी सगळं कितीही वाटलं भारी तरी ते मनावर घ्यायची नाही जरुरी.
प्रेम कसं कोणावरही करता येतं. अगदी दगडावरदेखील. 
फक्त स्वतःला विसरावं लागतं प्रेमात."

अदितीवर माझा जीव आहे यासाठीच
ती गोष्टी सोप्या करुन सांगते.

***
इलाज

"मी खरं तर तुम्हाला काही सांगण्यात अर्थ नाही
गेले काही दिवस मी तेच तेच बोलते आहे 
आणि तुम्हीही उलटतपासणी केल्यासारखं तेच तेच विचारता आहात
तुम्हाला माझा आजार समजून घ्यायचा तर तुमची समज बदलावी लागेल
तुमचा विश्वास नाही मला सतत आवाज ऐकू येतात कानात यावर?
तसा तर 
माझापण नाही तुमच्यावर.. तरी सांगते,
तुम्हाला माहितीय? रस्त्यावरच्या फुटलेल्या नळांमधून 
पाणी वाहात माझ्या घरातले कमोड भरुन टाकतं
त्यातदेखील हे सगळे आवाज तुंबलेले असतात.
मी फोनवर बोलते तेव्हाही ते कानात गच्च गर्दी करतात.
टी.व्ही.वर ऐकते गलबलाट
सगळ्यांच्या चेहेऱ्यांवर कोरे मुखवटे असतात
कळत नाही कोण बोलतंय ते
म्हणताना सगळेच सारखेच बोलतात
कोणी बलात्कारांबद्दल, कोणी कोरोनाबद्दल, कोणी शिजणाऱ्या कटांबद्दल..
कोणी भोवतालच्या आलबेल शांततेबद्दल.
नाही ऐकायचंय मला 
मरणाविषयीच बोलायचंय ना? बोलूयात?  
मला माहितीय मरण काय असतं ते.
तोंडावर दाबलेली उशी आपल्याला दूर करता येऊ नये असं मरण
मी भोगते रोज. आवाजांची उशी घट्ट दाबलेली असते माझ्या तोंडावर. 
श्वास घेता येत नाही की बोलता येत नाही. 
वर्तमानपत्रातली काळी अक्षरं कागद सोडून अंगावर येतात
मुंगळ्यांच्या फौजांसारखी नाहीतर
बुड्या घ्यायला भरवलेल्या कुंभमेळ्यासारखी

रस्त्यांवरुन चालताना विरलेल्या डांबरातून खालचे गोटे वरती येतात
गाडलेल्या मुंडक्यांसारखे- कोणाची असतील ही इतकी मुंडकी?
मी मुलांना विचारते
ती हसतात आणि चकारी फिरवत पुढे जातात
वरुन माणसांना टिपणारे ड्रोन्स फिरत असतात आणि ते मुलांना माहिती असतं
युध्दकर्त्यांच्या नजरेखाली चकारी फिरवत रस्त्यावरुन खेळणं मुलांनी
फुकुशिमाच्या स्मशानावरुन ऑलिंपिकची ज्योत पळवणं मुलांनी
म्हणजे आपली गर्भाशयं नेमबाजीच्या सरावासाठी समोर टांगणं. 
त्यांना ओसाड शेतात पेरुन त्यांच्याच पिकाच्या पोळ्या बनवून 
खाताना मी पाहिलं आहे कितींना."

तिला बाजूला घेत, हातांनी वेढून घरी आणताना
माझ्या डोक्यात विचार सुरु असतो
ही तर काही ऐकणार नाही
पुन्हा पुन्हा त्या मानसोपचार तज्ज्ञाला तेच ऐकवत राहाणार-
आवाज खरे असतीलही पण ते तिच्या कानातले आहेत
तेव्हा इतरांना ते ऐकू जाणार नाहीत हे तिनंपण ऐकलं पाहिजे.
तिनं कशाला विश्वाचं आर्त तिच्या मनी घ्यायचं?
जिना चढून घरात आल्यावरच मी तिला सोडते
ती तिथंच उभी राहाते परकेपणानं
मग मी तिला हाताला धरुन स्वयंपाकघरात नेते
खुर्चीत बसवते. "पाणी पितेस ना?" 
ती समोरच्या रेफ्रिजरेटरकडे बघत असते.
"सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यात ठेवली आहेत हो ना?"
असं मला विचारुन हसते.
तिच्या ताणाच्या रेषा निवळलेल्या बघून मी पण हसते
फ्रीजमधून संत्र्याचा रस काढून ग्लासात भरते
तिच्यासमोर ठेवते.
ती त्याच्याकडे बघत म्हणते, 
"आपण सकाळी निश्चिंत उठतो आणि 
रात्री शांत झोपतो याची उत्तरं आपल्या या फ्रीझमध्ये आहेत. 
खरा प्रश्न हे असंच असतं हे आपण आवडून कसं घ्यायचं?
हे कसं सोसायचं? याचा आहे, हो ना?"

आम्ही झोपतो- ती तिच्या बेडवर- मी माझ्या.
जांभईखेरीजची झोप डोक्यात ठेका धरते
’झोप बाळा झोप बाळा, 
कोणती भाषा कसला चाळा
दररोजचा अर्थ निराळा
झोप बाळा झोप बाळा
दोन गाड्या तीन टीव्ही प्रत्येक घरी
इंटरनेट लहरी 
झोप बाळा झोप बाळा
फार तर जाऊ पुस्तकांतून गाऊ
कुणी परिच्छेद, कुणी पाने
कुणी तळटीपा, कुणी मौने
झोप बाळा झोप बाळा
कोणता लळा कोणता जिव्हाळा 
असेल उतारा दुःखांवर आपल्या
कोण सांगेल? कसं कळेल?
सगळंच नुसतं गरागरा
येऊ देत येईल ते- जाऊ देत जाईल ते- 
गोळी घेतलीस? बधीर होत 
झोप बाळा झोप बाळा.’ 
 
छायाचित्र सौजन्य: के. मृदुला

वंदना भागवत लोणावळा येथील वरिष्ठ महाविद्यालयात २५ वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापन. अक्षरनंदन शाळेची संस्थापक समिती सदस्य. प्रसिध्द साहित्य: ‘स्तब्ध’, ‘शिट्टी’ [कथासंग्रह], ‘अव्याहत वाटा वेदनांच्या..’ [कादंबरी] ‘कथा गौरीची’, ‘कमल देसाई: एका आकलन’, स्त्रीवाद, साहित्य आणि समीक्षा’ [समीक्षात्मक लेखन], ‘संदर्भांसहित स्त्रीवाद: स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व ‘, अक्षरमुद्रा [संपादन] 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *