सुज्योत पारखे

हरवलेला मी कोण?



back

ट्रेन जशी सुटली पुण्यातून मुंबईसाठी, तशी नव्या विचारांना वाट मिळाली. परंतु या प्रवासात स्वतःमध्ये काय काय बदल होत जातील हे कोणास ठाऊक होतं! रंगीत स्वप्न घेऊन निघालो खरं, परंतु माझा स्वभाव, त्या स्वभावाची पाळंमुळं इथेच राहतील असं वाटलं नव्हतं. मुळात मी खरा कुठं, कधी वागतो हेच कळायला मार्ग नसतो. माणसाचा स्वभाव प्रत्येक व्यक्ती, ठिकाणागणिक बदलतो का हो?

मुळात संचार आमच्या, तुमच्या, आपल्या पूर्वजांपासून चालत आला आहे. त्यामागची कारणंसुद्धा तशीच असावीत. पूर्वी मानवाने गरजेसाठी संचार केला आणि आत्तासुद्धा संचार चालू आहे, गरजेसाठीच. फक्त गरजेची कारणं बदलतात. सामाजिक, आर्थिक, भौगोलिक अशा वेगवेगळ्या स्तरावर ती गरजेची कारणं बदलू शकतात. संचार करणारं फक्त शरीर असतं का? काही वेळा सवयी, स्वभाव, मन आपण आहे त्या जुन्या जागी ठेऊन येतो. तो साप जसा कात टाकतो ना अगदी तसंच! जशी जागा बदलते तसे माणसाचे व्यक्तिमत्त्व बदलत असेल. हे खूप व्यक्तिनिष्ठ आहे परंतु अनेकांच्या बाबतीत घडत असावं. गेली ६ वर्षे हा खेळ खेळतोय, स्प्लिट पर्सनॅलिटीचा..

पुण्यात होतो तेव्हा, घरात हव्या त्या सगळ्या गोष्टी मिळत गेल्या. आवडतं क्षेत्र मिळालं. तेव्हा एक-दोन वर्ष पुण्यातच काढली. पण तेव्हा स्वतःचं अस्तित्व कधी जाणवलं नाही. जेव्हा स्वतःचं असं काही अस्तित्व उलगडायला लागलं तोवर मुंबईमध्ये आलो. तेव्हा स्वतःसाठी खर्च तरी किती करायचा हेच कळत नव्हतं. चांगलं-वाईट, सोयीस्कर जीवन म्हणजे काय हे कोणाला समजलंय का आत्तापर्यंत? त्यामुळे बाहेर राहताना स्वतःचं सगळं स्वतः करायचं एवढंच ठाऊक होतं. कुठे थांबायचं आणि कुठे नाही हे कधी समजलं नाही. जेव्हा मुंबईमध्ये आलो तेव्हा सगळं नवीन होतं, नवीन जागा, नवीन मित्र, नवीन राहण्याची ढब, नवीन प्रवास करण्याची ढब, यात स्वतःला सक्षम करण्याच्या स्पर्धेत स्वतःला शोधायचं राहून गेलं…. मी खरा सुरू कुठून झालो हेच मला माहित नाही राव..! मुंबईसाठी निघताना अन् पुण्यातून जाताना, “या सगळ्यात मी, माझं अस्तित्व, माझा अवकाश कुठं आहे?” हा प्रश्न कायम पडतो..! कारण संपूर्ण कधी पुण्यातून गेलोच नाही आणि पुन्हा संपूर्ण कधी पुण्यात परतलोच नाही.

कसली सल आहे जी मनामध्ये कितीही टॉर्च लावून पाहिली तरी दिसत नाही. पण सलत राहते. संचार ही गोष्ट माझ्यासाठी खूप मन विचलित करणारी ठरते. जाऊदे, कुठे आपण कायमचं राहायला आलोय इथे? हा विचार पुणे आणि मुंबईच्या मध्ये रुतून बसलाय! पुण्यात यायला निघालो की मन शांत असतं, बेफिकिर असतं. पुण्यात गेलं की सगळं वाऱ्यावर सोडून मी जगण्याचा प्रयत्न करतो. प्रवास बदलतो, एक बिनधास्त फिरण्याची मुभा असते, हाताखाली गाडी असते, चार नेहमीचे मित्र, जुन्या जागा, जुन्या गप्पा या सगळ्या मध्ये मी दिवस ढकलत नसलो तरी, “अर्रर्र खूप कमी दिवसांसाठी मी आलोय, पुन्हा मुंबईत जायचंय” हा विचार मला पुण्यात संपूर्ण उतरू देत नाही. एक दोरी नेहमी मागे बांधलेली असते. ती ताणली की जाणीव होते त्या विश्वाची जे मी मागे टाकून आलोय, काही दिवसांसाठी. मग सुरू होतात प्रश्न. 

नक्की कुठे सुरू होतोय मी? कुठून आलोय मी? माझं अस्तित्व नक्की कुठे आहे? हे शोधण्यासाठी फिरत असतो, आभाळं न्याहाळत स्वतःला शोधत बसतो माझं अवकाश –  फुलांच्या गंधामध्ये, झाडाच्या खोडामध्ये, पाण्याच्या रिंगणात, मावळत्या सूर्यात अन् या सगळ्यांच्या भावविश्वातून अवतरलेल्या चित्रात आणि कवितेत. पण कधी कधी ती सल तशीच राहते. तेवढ्यात पुन्हा मुंबईला जायची वेळ येते. त्याच्या आधीच्या दिवशी माझ्या मनाची अस्वस्थता मला कधी संपूर्ण होऊ देत नाही. ती दोरी सतत मला ओढू लागते. जाणीव करून देऊ लागते माझ्या त्या अस्तित्वाची. मग मी माझं अर्धवट शरीर आणि मन घेऊन मुंबईसाठी पुन्हा निघू लागतो. जाताना नक्कीच एक मुळापासून बांधलेली दोरी पुण्यात असतानाच मला पुण्यात खेचत असते. शेवटी ही ओढ प्रेमळ वाटते. पण ताणल्यावर त्रास तितकाच होतो.

मुंबईत आलो की धावपळ सुरू होते. संपूर्ण होण्याची धावपळ, स्वतःला शोधायची धावपळ. संपूर्ण  पुण्याच्या आठवणी घेऊन आलेलो मी इकडे पुन्हा माझं वेगळं मन घेऊन वावरू लागतो. मग त्या आठवणी सोनचाफ्यासारख्या चार दिवस दरवळतात आणि सुकून जातात. मग पुन्हा तेच प्रश्न, नक्की कुठे सुरू होतोय मी? कुठून आलोय मी? माझं अस्तित्व नक्की कुठे आहे? हे शोधण्यासाठी फिरत असतो मुंबईच्या बाजारपेठा, लोकलमधले चेहरे, खाचखळग्यातले सूर्यास्त, काटकोणातली आभाळं अन् या भावविश्वातून अवतरलेल्या चित्रात आणि कवितेत. मुंबईत राहायचं म्हणजे खर्च होतो. त्यात चार-पाच वेगवेगळ्या भागांतून आलेल्या मित्रांसोबत राहायचं म्हटलं की आर्थिक बाजू सांभाळावी लागते. त्यांची वेगवेगळी मनं समजून घेत चालत राहावं लागतं. सामाजिक रीतीभातींचं वेगळं ओझं. मुळात कॉलेजलाईफमध्ये असताना या गोष्टींचा विचार जास्त होतो. परंतु त्यात समतोल साधत सुरुवातीला हवं तेवढाच खर्च करायची सवय मुंबईने लावली होती. त्याचा फायदासुद्धा आहे अन् तोटासुद्धा. 

अशा अनेक सवयी, स्वभावाची पाळंमुळं नक्की रुजली कुठं? त्यांचा जन्म कुठला? हे शोधणं फार जिवावर येतं. जसजसं आपण गावं बदलत जातो तशा सवयी  परिस्थितीनुसार बदलतात. मग नक्की मी सुरू कुठं झालो हे कोडं काही सुटत नाही. संचार चालू राहतो, दोऱ्या ओढू लागतात. गावं जोडली जातात तशा दोऱ्या वाढतात. त्या दोऱ्यांचा गुंता होतो. मग या स्वभावाच्या जाळ्यात नेमका मी कुठे आहे हे शोधायच्या प्रयत्नात अडकून बसतो. या  पुणे-मुंबईच्या संचाराच्या दोऱ्या एवढ्या आहेत की स्वभावाचं भलंमोठं जाळं बनलंय. त्या दोऱ्यांपैकी खरा मी कोण? टेकडीवरचा सूर्यास्त अन काटकोणातला सूर्यास्त यात हरवलेला मी कोण? लोकलच्या गर्दीतली हवा अन् गाडीवरचा वारा यात हरवलेला मी कोण ? भर सकाळची स्लो मॅरेथॉन अन टेरेसवरची शतपावली यात हरवलेला मी कोण? 

कुठंतरी थांबण्यासाठी पळतोय म्हणून संचार अजून सुरूच आहे.

सुज्योत पारखे याने जून २०२२ मध्ये सर जे. जे.  कला महाविद्यालयात रेखा व रंगकला विभागातून पदवीपर्यंतचे  शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तो त्याच संस्थेत क्रिएटिव्ह पेंटिंग विभागातून पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. पुण्यातील बाणेर शहराचा रहिवासी, सुज्योत कॅनव्हासच्या पलीकडे लेखन व कवितेच्या रुपांतूनही व्यक्त होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *