सुधीर बेडेकर

दि. के. बेडेकर: एक ओळख

०३

back

॥एक॥

‘आठवणींना चालना’ या १९७१ मध्ये लिहिलेल्या एका लेखात दि. के. बेडेकरांनी पुढीलप्रमाणे लिहिले आहे:

“तो १९२९ चा जुना काळ आठवला म्हणजे आता मला कळून येते की तेव्हा मी फार एकाकी होतो. माझे समजत्या वयातील सारे बालपण आईवडिलांपासून वेगळे असे गेले होते व माझा सारा जीव माझ्या आईवर होता. ती १९२७ साली वारली आणि माझे सारे ममतेचे पाश तुटल्यासारखे झाले. मी त्यामुळे विचित्र व विक्षिप्तही झालो होतो. हार्डीच्या (कादंब-या व कवितांमधल्या) विलक्षण करूण उदास वातावरणाशी माझे मन एकरूप झाले. मी माणसांचा जिव्हाळा शोधत होतो. या माझ्या शोधामुळे इतरांनाही माझ्याबद्दल जिव्हाळा वाटू लागे. वाङमय, तत्वज्ञान, मार्क्सवाद, देशभक्ती या सा-या गोष्टी त्यावेळी माझ्या स्वप्नातही नव्हत्या. सारे अंधुक व निराधार होते.”

“आपण माणूस आहोत व शोधतो आहोत, पण काय शोधतो आहोत ? अशा प्रश्नाने माझे मन त्यावेळी कमालीचे अशांत झाले. थिऑसॉफीचे तत्वज्ञान मांडणारी पुस्तके मी त्यावेळी आस्थेने वाचत होतो. मग रवींद्रांची गीतांजली व इतर वाङमय वाचू लागलो. हळूहळू थिऑसॉफीवरची माझी श्रध्दा ओसरत नाहीशी झाली. मी नास्तिक बनून माणसांवरच सारी श्रध्दा ठेवायला शिकलो.”

“एखाद्या वर्षभरातच हे सारे मनातले बदल घडत असताना माझे लक्ष चित्रकलेत रमू लागले. आणि योगायोगाने अल्लाबक्ष या चित्रकाराशी परिचय होऊन त्यांच्या चित्रकला शिक्षणाच्या विद्यालयात मी जाऊ लागलो. अल्लाबक्ष हे लाहोरचे प्रसिध्द चित्रकार होते व कराचीत स्थायिक झाले होते. भाविक मुसलमान असून त्यांनी काढलेली कृष्ण व गोपींची अनेक चित्रे प्रसिध्द आहेत. त्यांनी काढलेले एक रथचक्र हाती घेणा-या श्रीकृष्णाचे तैलचित्र त्यांनी मला दिले ते आजही माझ्याजवळ आहे.”

दि.के. बेडेकर

अल्लाबक्षकडच्या शिक्षणाच्या आधीसुध्दा लहानपणापासून बेडेकर चित्रे काढत असावेत. १९२७ साली त्यांनी काढलेले एक कुत्र्याचे स्केच आहे व त्यावर ‘स्टुडंट विश्वकर्मा कॉलेज’ असे त्यांच्या अक्षरात लिहिलेले आहे. त्या काळच्या मध्यमवर्गीय घरात रांगोळी, भरतकाम वगैरे रूपात काही कलाव्यवहार चालत असे. लहानपणी उज्जैन, ग्वाल्हेर व इतरत्र ठिकठिकाणी झालेल्या वास्तव्यामुळे अनेक मंदिरे, शिल्पे व  वास्तु त्यांच्या दृष्टीस पडल्या असाव्यात. या सगळ्याचे त्यांच्या कलादृष्टीवर संस्कार होत गेले. वयाच्या बाराव्या वर्षी १९२२ साली एलिमेंटरी व १९२४ साली इंटरमिजिएट या तत्कालिन मुंबई सरकारच्या चित्रकलेच्या परीक्षा त्यांनी दिल्या होत्या. अर्थात पेशा म्हणून चित्रकार होण्याचे तेव्हा त्यांच्या गावीही नव्हते.

अल्लाबक्ष यांच्याकडे त्यांनी बरेच महिने शिक्षण घेतले. दुस-या एका ठिकाणी त्यांनी म्हटले आहे, “अल्लाबक्ष मिश्र एक्लेक्टिक शैलीत चित्रे रंगवत. कधी ते पाश्चात्य वास्तववादी पध्दतीने काम करत, तर कृष्ण, राधा व गोपींची त्यांची चित्रे मात्र मिश्र, भावनाप्रधान शैलीतली आणि अतिशय रोमॅंटिक दृकप्रत्यय देणारी असत. ते ‘भारतीय’ शैलीतसुध्दा रंगवत, त्यात अजंठातल्या चित्रांमधले सुरेख रेषाकाम व राजपूत शैलीतल्या काही गोष्टी यांचे मिश्रण असे. अर्थात त्या १९३० च्या काळात मला या सगळ्या गोंधळाबद्दल काहीच कळत नव्हते. अल्लाबक्ष हा एक अत्यंत भाविक, पापभिरू व नम्र माणूस होता. तो कधीही कसलीही बढाई मारत नसे किंवा गर्विष्ठपणे पवित्रा घेत नसे. त्याच्याइतका निर्मळ, आढ्यता व ढोंगीपणापासून मुक्त माणूस मी आजवर पाहिला नाही. तो भाविक मुसलमान होता पण राधाकृष्णांची चित्रे रंगवत असे. कारण त्याच्या म्हणण्यानुसार राधाकृष्णाचे प्रेम हे हीर-रांझाच्या वा लैला-मजनूच्या प्रेमासारखेच होते.”

“त्यांनी मला काही महिने शिकवले आणि मग म्हणाले आता तू शांतिनिकेतनला नंदलाल बोस यांच्याकडे जायला पाहिजेस. इंजिनियरिंगचे करियर सोडून द्यायचे मी ठरवले त्याच्या पुष्कळ आधी हे घडले. पण त्यांचा हा सल्ला माझ्या मनात पक्का बसला होता. जेव्हा माझ्या जीवनातले अरिष्ट तीव्र झाले तेव्हा मी वडिलांना वा दुस-या कोणालाही न सांगता कराची सोडली. अल्लाबक्षांचा निरोप घ्यायला मी गेलो, पण त्यांनाही कॉलेज सोडून शांतिनिकेतनला असल्याबद्दल काही सांगितले नाही. फक्त त्यांनी दुरुस्त्या केलेले माझे स्केचबुक बरोबर घेतले आणि निघालो.”

ह्या वेळी दि.कें.चे वय एकोणीस-वीस होते. त्यांनी म्हटल्याप्रमाणे अत्यंत अस्वस्थ, उदास व एकाकी मनोवस्थेत ते त्यांच्या जीवनात आलेल्या ‘क्रायसिस’ मधून मार्ग काढण्यासाठी चाचपडत होते. हे सारे समजून घ्यायचे तर त्यांच्या तत्कालिन चरित्रात थोडेसे जायला हवे. त्यांचा जन्म ८ जून १९१० रोजी सातारा येथे झाला. पाचवीपर्यंत शालेय शिक्षण तेथेच झाले. नंतर मात्र वडिलांच्या बदल्यांमुळे कारवार, उजैन, इंदूर, पुणे अशा ब-याच ठिकाणी त्यांना रहावे लागले. कराची येथे १९२८ साली इंटर सायन्स उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी कराचीच्या इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश घेतला. त्यांचे वडील सरकारी सार्वजनिक बांधकाम खात्यात इंजिनियर होते व सक्कर धरणाच्या कामामुळे त्यावेळी कराचीला होते. खरेतर दि.कें.ची इच्छा डॉक्टर होण्याची होती, त्यांच्या आईलाही मनापासून तसे वाटत होते. पण वडिलांसमोर त्यांचे काही चालणे शक्यच नव्हते. त्यांचे वडील एक अतिशय कर्तव्यकठोर, कडक व भ्रष्टाचाराला वा-यावरही उभे राहू न देणारे अधिकारी होते. तत्वज्ञान, गीता, अमृतानुभव इत्यादींचे ते अभ्यासक होते. टिळकपंथी असल्याने मुलगा इंजिनियर झाल्यावर स्वत:चा व्यवसाय सुरू करून इंग्रजांच्या ‘घृणास्पद गुलामी’ चाकरीतून मुक्त होण्याची त्यांची योजना होती. त्यांच्या उग्र व कठोर स्वभावामुळे आणि त्या काळच्या पध्दतीच्या कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाच्या एकाधिकारशाहीमुळे दि.कें.च्या भावनाशील, संवेदनाक्षम व सुधारक वृत्तीच्या आईला पुष्कळ मानसिक क्लेश सहन करावे लागत. याच्याबरोबर तेराचौदा बाळंतपणांमुळे – यापैकी फक्त तीन मुले जगली – व आजारांमुळे शारिरिक यातनांची सोबतही होती. लहानपणापासून हे सगळे पहाणा-या दि.कें.च्या संवेदनाक्षम मनात वडिलांबाबत दुरावा व बंडखोरीची भावना आणि आईवर जिवापाड प्रेम उद्भवले नसते तरच नवल. या सगळ्यामुळे नंतरही आयुष्यभर त्यांच्या मनात स्त्रियांच्या दु:खाबद्दल फार तीव्र जाण व कणव होती. आई १९२७ मध्ये वयाच्या चौतिसाव्या वर्षी निर्वतल्यावर, त्यांची मनस्थिती वर म्हटल्याप्रमाणे सैरभैर झाली.

चित्रकार: दि.के.बेडेकर

हा काळही प्रचंड उलथापालथींचा व वैचारिक वादळांचा होता. देशात सर्वत्र गांधीजींच्या १९३० च्या चळवळीचे वातावरण होते. काँग्रेसच्या आंदोलनाची दिशा बदलणा-या नेहरूंच्या अध्यक्षतेखालच्या प्रसिध्द लाहोर अधिवेशनाला दि.के. उपस्थित राहिले होते. एका अराजकतावादी पंजाबी तरूणाशी त्यांची चर्चा चाले. भगतसिंग व सशस्त्र क्रांतिकारकांचे नाव तरुणांच्या ओठांवर होते. कम्युनिस्ट कार्यकर्त्यांवर राष्ट्रद्रोहाचे खटले चालू होते. तत्वज्ञान, राजकारण वगैरेंचे त्यांचे वाचन चालू होतेच. पण जीवनाच्या त्या टप्प्यावर ह्या सगळ्याने प्रेरित होण्याऐवजी चित्रकार होण्याचा रस्ता दि.कें.नी निवडला व ते शांतिनिकेतनला गेले.

पण हा निर्णय फार काळ टिकणार नव्हता.

बोलपूर स्टेशनवर उतरून मग पुढे ते शांतिनिकेतनला पोचले. गुरुदेव त्यावेळी तेथे नव्हते. नंदलालना ते पहिल्यांदा भेटले ती एक साधी कुटी होती. खोलीत काहीही फर्निचर नव्हते. नंदलाल खालीच जमिनीवर बसले होते. यांनाही बसायला एक बसकर दिले गेले. प्रश्नोत्तरे झाली. समोरच्या भिंतीवर एक लहानसे, बारा बाय बारा इंचांचे पेंटिंग होते. त्यात मध्ये दरवाजा असलेली एक झोपडी होती आणि दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना चौकोनी खिडक्या होत्या, ज्या त्यांना डोळ्यांसारख्या वाटल्या. दि.के. शांतिनिकेतनमध्ये राहू लागले. जेवढ्या तपशीलात त्यांनी अल्लाबक्षबद्दल लिहून ठेवले आहे तेवढी नंदलाल बोस व शांतिनिकेतनमधील वास्तव्याबद्दल त्यांना आठवण नव्हती. एकतर तेथे ते फारच कमी,  दोनतीन महिने होते व त्यातही बराच काळ मलेरियाने आजारी होते. आजारपण वाढल्याने शेवटी संस्थाचालकांनी वडिलांना बोलावून घेतले आणि शांतिनिकेतनचा अध्याय तेथेच संपला. त्याच वर्षी १९३० साली त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात तत्वज्ञान विषय घेऊन प्रवेश घेतला.

॥दोन॥

येथे दि.कें.च्या जीवनाचा दुसरा, चळवळींचा व कम्युनिस्ट पक्षकार्याचा कालखंड सुरू झाला आणि तो पुढची वीस वर्षे टिकला. विद्यार्थी असतांनाच १९३० साली त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात जंगल सत्याग्रहात भाग घेतला. ग्रामीण जीवन, शेतक-यांची हलाखी, चळवळ आणि पोलिस यांचा त्यांना अनुभव आला. त्याचबरोबर तरूण काँग्रेस व कम्युनिस्ट कार्यकर्त्यांशी परिचय झाला. बनारसमध्येही विविध राजकीय प्रवाहांमधल्या चर्चा व वादविवाद चालत. या सगळ्यातून ते शेवटी मार्क्सवादाकडे वळले. १९३२ साली बी.ए. झाल्यावर त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे काम करायचे ठरवले व ते मुंबईत आले. त्यांनी त्या काळच्या बोल्शेव्हिक गटात प्रवेश केला, हा गट पुढे १९३४ साली कम्युनिस्ट पक्षात विलीन झाला. त्यानंतर  मुंबई, नागपूर, अजमेर इत्यादी ठिकाणी त्यांनी रेल्वे व इतर कामगारांमध्ये संघटना बांधण्याचे काम केले, त्याचबरोबर पक्षाचे प्रचारकार्यही केले. अमरशेख, अण्णाभाऊ, गवाणकरांच्या लाल बावटा पथकाशीही त्यांचा संबंध असे. बनारस व दिल्ली येथेही ते काही काळ होते. संवेदनशील, चिकित्सक अशा त्यांच्या वृत्तीमुळे पक्षातील संघटन व नेतृत्व पध्दतींमधील काही अपप्रवृत्ती त्यांना फारशा रुचत नसत. तसेच मानवजीवनाच्या सर्वांगांना कवेत घेऊ पहाणा-या चिकित्सक दृष्टीमुळे पक्षातल्या सैध्दांतिक व वैचारिक व्यवहाराबाबतही ते समाधानी नसत आणि स्वतंत्रपणे त्यांचा अभ्यास चालू असे. असे असले तरी जवळपास वीस वर्षे त्यांनी निष्ठापूर्वक पक्षाचे कार्य केले. १९३४ नंतर ते जास्त करून पुण्यात पक्षकार्य करत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या एकदोन वर्षात पक्षाने घेतलेल्या राजकीय भूमिकांशी, विशेषत साहसवादी डावी ‘रणदिवे लाइन’ व तत्सम धोरणांशी मतभेद झाल्याने दि.के. इतर काही सहका-यांबरोबर १९५० साली पक्षातून बाहेर पडले.

याच काळात १९३६ पासून त्यांनी लेखनास सुरूवात केली होती. त्यांच्या एकंदर लेखनाकडे कालक्रमानुसार नजर टाकली तर असे दिसते की सुरूवातीच्या काही वर्षात त्यांनी मुख्यत राजकीय विषयांवर लिहिले आहे, वृत्तपत्रीय लेखन केले आहे. मार्क्सविचार, भारतीय तत्वज्ञान व धर्म, तसेच साहित्य व कला या क्षेत्रात स्वतंत्र व मूलगामी स्वरूपाचे चिंतन मांडण्यावर त्यांनी १९४५ नंतर जास्त लक्ष दिलेले दिसते.

कामगार नेते आणि विधीमंडळ सदस्य एन. एम. जोशी यांचे पत्र

चित्रकलेच्या दृष्टीने बोलायचे तर या सगळ्या धकाधकीच्या काळातली सुदैवाची गोष्ट म्हणजे डिसेंबर १९४० ते एप्रिल १९४२ अशी सव्वादीड वर्षे त्यांना घडलेला तुरूंगवास ! बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये असताना त्यांनी रंगवलेली प्राध्यापकांची व सोबतच्या विद्यार्थ्यांची पोर्टेट्स आहेत. त्या वेळच्या एका स्केचबुकावर ‘लेक्चर्स जरा कमी इंटरेस्टिंग होती  तेव्हा टिपलेली चित्रे ‘ असा शेराही आहे. पण तुरूंगवासातच त्यांना चित्रकलेसाठी खरा निवांतपणा व सवड मिळाली. देवळीचा हा विशेष तुरूंग खास धोकादायक कैद्यांसाठी व राजबंद्यांसाठी होता. तेथे देशातले नाना मतांचे जहाल कार्यकर्ते, समाजवादी व साम्यवादी नेते एकत्र आले होते. फैज अहमद फैजसारखे साहित्यिक व विचारवंत होते. त्यांच्यामध्ये सतत जोरदार चर्चा व वादविवाद होत. अन्नसत्याग्रह व अन्य रूपात तुरूंगांतर्गत संघर्ष चालू असे. येथे दि.कें.नी हेगेल, मार्क्स यांच्या तत्वज्ञानाचा व इतरही सखोल अभ्यास केला. या सगळ्याबरोबरच शांतपणे त्यांची चित्रकला चालत असे. सभोवताली जवळपास शंभर मैल परिसरात वाळवंट सोडून दुसरे काही नव्हते. ह्या रूक्ष व कठोर तुरूंगाचा मुख्य इंग्रज कमांडंट मात्र रसिक माणूस होता. दि.कें.च्या ‘विचित्रां’च्या छंदाची सुरूवात कशी झाली व पुढे  कागद, रंग व ब्रश त्यांना कसे मिळू लागले याचे वर्णन त्यांनी स्वत:च या पुस्तकातल्या  ‘निसर्गशिल्पे’ या मुलाखतवजा लेखात केले आहे. त्या वेळची बरीच चित्रे आज उपलब्ध आहेत. एक स्केचबुक त्यांनी एका कॉम्रेडला भेट म्हणून देऊन टाकले होते, पण कैदेतून सुटल्यावर त्याने ते अगत्याने माझ्या आईकडे पाठवले.

डॉ.सुशीला परांजपे यांच्याशी बालपणापासूनच्या अनेक वर्षांच्या मैत्रीनंतर १९३८ साली त्यांचा विवाह झाला. मुलगी सुकन्या आगाशे (१९४४) व मुलगा सुधीर (१९४६) यांचा जन्म याच कालखंडात झाला.

॥तीन॥

पक्ष सोडल्यावर पुढील आयुष्यात अभ्यास, संशोधन व लेखन कार्याला पूर्णपणे वाहून घ्यायचे त्यांनी ठरवले. काहीएक अर्थार्जनही आवश्यक होते. त्यांनी १९५४ साली पुणे विद्यापीठातून तत्वज्ञान विषयात एम.ए. पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर नाशिकच्या हं.प्रा.ठा. कॉलेजमध्ये अध्यापन (१९५४ ते १९५७), पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या अर्थविज्ञान या नियतकालिकाचे व काही ग्रंथांचे संपादन (१९५८ ते ६२ व पुन्हा १९६७ ते १९७०) आणि वाईच्या विश्वकोश मंडळात संपादन (१९६२ ते १९६४) अशी कामे त्यांनी केली. याचबरोबर अनेक सामाजिक, वैचारिक व साहित्यिक उपक्रमांमध्ये ते सहभागी असत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पत्रिकेचे त्यांनी एप्रिल १९६१ ते मार्च १९६३ या काळात संपादन केले. समाजापासून दूर राहून ‘स्कॉलरशिप’ला वाहून घेण्याचा त्यांचा पिंड नव्हता. व्याख्याने, चर्चा, परिसंवाद याचबरोबर सर्व वयाच्या अभ्यासक, लेखक व कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद सतत चालू असे. विशेषत तरूणांच्या चळवळी आणि लेखन यांच्याबद्दल त्यांना विशेष आस्था असे. ते एकदा म्हणाले होते, उगीचची नम्रता बाजूला ठेवून बोलायचे तर मी आणखी बरेच सैध्दांतिक योगदान करू शकलो असतो, पण त्याग अन् हौतात्म्याचे आकर्षण आणि एकाकीपणाच्या धास्तीमुळे वाटणारी संवादाची गरज यांच्यामुळे माझ्या आयुष्यातला पुष्कळ वेळ वाया गेला.

चळवळीतून बाहेर पडल्यानंतरच्या तुलनेने स्थैर्य लाभलेल्या या शेवटच्या वीस-बावीस वर्षांच्या काळात त्यांनी तत्वज्ञान, धर्म, यातु व मिथ्यकथा, साहित्य व कला, समकालिन सामाजिक व सांस्कृतिक समस्या अशा अनेकविध क्षेत्रांतील विषयांवर विपुल लेखन केले. त्यांच्या प्रसिध्द झालेल्या एकंदर सतरा-अठरा ग्रंथात आणि शेकडो लेखांमध्ये ते ग्रथित आहे. परंतु यामध्ये ललित साहित्याच्या समीक्षेच्या तुलनेने जुन्या वा आधुनिक, भारतीय वा पाश्चात्य चित्रशिल्पकलांवरचे, या पुस्तकात संग्रहित केलेल्या लेखांसारखे लेखन कमी प्रमाणात आहे. तसेच ते स्वत: पुन्हा चित्रकलेकडे वळल्याचेही दिसत नाही. याला अपवाद एकच होता तो म्हणजे ‘विचित्रां’ची निर्मिती. तुरूंगवासानंतरही ती अखंड चालू राहिली. या पुस्तकातील लेखांवरून त्यांच्या या छंदाची चांगली कल्पना येते. ही शिल्पकला अशा स्वरुपाची होती की ती फावल्या वेळात, येताजाता करण्याजोगी होती, अत्यल्प खर्चाची होती व तिला फारशा साधनसामुग्रीची गरज नव्हती. भोवतालच्या वस्तुजाताकडे कलावंताच्या दृष्टीतून पहाण्याचीच काय ती गरज होती. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या कलेमध्ये परिसरातल्या इतर माणसांना, विशेषत मुलांना, सहज सामावून घेता येत असे. त्यात सर्जनशीलता असे, गंमत असे, आनंद व प्रेम भरलेला संवाद असे.

॥ चार ॥

दि.के.बेडेकरांच्या या आयुष्याच्या अन् जीवनदृष्टीच्या संदर्भात त्यांच्या कलाचिंतनाकडे व कलाकृतींकडे कसे पहाता येईल ? त्यांचे संपूर्ण जीवन भोवतालच्या जगाशी संवाद साधण्याचा प्रयास होता : त्यातल्या रंगरूपांनी भरलेल्या निसर्गसृष्टीशी, समाजाशी व इतर माणसांशी,  आणि स्वत:च्या आतल्या खोलवरच्या गाभ्याशी. संवादासाठी, म्हणजे सक्रीय व सर्जनशील, जिव्हाळ्याचा व प्रेमाचा संबंध जोडण्यासाठी त्यांची धडपड होती. हाच त्यांच्या व्यक्तित्वाचा कंद होता. या धडपडीतच माणसाला ख-याखु-या माणूसपणाचा लाभ होतो अशी त्यांची धारणा होती, मनोवृत्तीसुध्दा होती. या धडपडीसाठी सर्जनशील व चिकित्सकपणे स्वीकारलेले मार्क्सचे मानवचिंतन, त्याची इतिहासमीमांसेची दृष्टी व एकंदर विचारपध्दती हा त्यांना यथोचित आधार वाटला. इतरही प्रतिभाशाली तत्वज्ञांची, वैज्ञानिकांची, कलावंतांची व क्रांतिकारकांची  अशी धडपड त्यांना अभ्यासातून व समीक्षेतून समजून घ्यावीशी, आपलीशी करावीशी वाटत होती.या दृष्टीने त्यांनी आधीच्या कालखंडात प्रत्यक्ष क्रांतिकारक चळवळीतील कृतिशील सहभागाचे माध्यम अंगिकारले. नंतर त्यांनी मुख्यत बुध्दिनिष्ठ विचारांचे माध्यम स्वीकारून अभ्यास व चिंतन  केले. तत्वचिंतन, सामाजिक-राजकीय विश्लेषण व साहित्यकलासमीक्षा या क्षेत्रांमध्ये, स्वतंत्र प्रज्ञेने सत्याचा मूलगामी शोध घेणा-या लेखनात त्यांचे हे चिंतन व्यक्त झाले आहे. आवश्यक ती वैचारिक शिस्त पाळूनच अर्थात हे वैचारिक लेखन झालेले होते. पण त्यांच्या व्यक्तिमत्वात वैचारिक व कलात्मक ही दोन अंगे यांत्रिकरित्या अलगपणे नांदणारी नव्हती, दोन्हीमध्ये खोलवरचे आंतरिक नाते होते. त्यामुळे त्यांच्या वैचारिक लेखनातसुध्दा मानवी जिव्हाळा, उबदारपणा, संवादक्षमता आणि म्हटले तर सौंदर्यसुध्दा प्रत्ययाला येत रहाते, अगदी हेगेलसारख्याचे जटिल व अमूर्त तत्वज्ञान ते समजावून सांगत असतानाही हा प्रत्यय येतो, असे अनेकांनी नोंदवले आहे.

पण कृतिशीलता आणि वैचारिक निर्मिती याबरोबर प्रत्यक्ष कलात्मक सर्जनाद्वारा देखील जीवनाचा शोध घेण्याची त्यांची धडपड चालू असे. तशी उर्मी नाना रूपात त्यांच्या जीवनात व्यक्त होत असे. शब्द हेच त्यांनी स्वत:च्या अभिव्यक्तीचे मुख्य माध्यम मानले व त्यातही वैचारिक लेखनाला प्राधान्य दिले. पण त्यांनी १२ कथा व ७७ कविता व गीते असे ललित साहित्य लिहिलेले आहे. काही काळ ते बासरीही वाजवत असत. चित्र व शिल्प कलांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या निर्मितीची ओळख या पुस्तकात होत आहे. त्यांनी काही चित्रकलेला प्राधान्याने वाहून घेतलेले नव्हते, तशा प्रकारची साधना त्यांची नव्हती. रंगरेषाआकारांच्या जादूला त्यांनी छंद या स्वरूपातच ठेवले. पण जेव्हा आपण त्यांचा मानवजीवनाच्या गाभ्याला हात घालण्याचा एकंदर ‘प्रकल्प’ समोर ठेवतो, त्यासाठीचा त्यांचा प्रत्यक्ष कृतीपर, तात्विक-वैज्ञानिक आणि कलात्मक प्रवास पहातो, आणि त्याचा एक भाग म्हणून त्यांच्या चित्रशिल्पांकडे बघतो, तेव्हा ही साधी चित्रे व शिल्पे एक वेगळेच रूप धारण करतात आणि अधिक अर्थपूर्ण होतात असे वाटल्यावाचून रहात नाही.

दि.कें.ची एक आठवण तसे पाहिले तर काहीशी व्यक्तिगत आहे, पण येथे चरित्राची ओळख करून देतांना ती सांगायला हरकत नसावी. त्यावेळी आम्ही खेडला म्हणजे आताच्या राजगुरूनगरला रहात होतो. माझी आई तिथल्या आरोग्यकेंद्राची मुख्य डॉक्टर होती. मी तेव्हा सातआठ वर्षांचा असेन. एका रात्री, दोनअडीच वाजता त्यांनी मला हलवून जागे केले, डोळे मिटून ठेव म्हणाले आणि अंगणात नेऊन चटईवर उताणे पडायला सांगितले. मग म्हणाले आता उघड डोळे. निरभ्र स्वच्छ काळ्याभोर अफाट आकाशात असंख्य तारे चमचमत होते. तशा मला गोष्टी फारशा आठवत नाहीत, पण आजही मला ते लखलखणारे आकाश डोळ्यांसमोर दिसते. दि.के. माझ्याकडे प्रेमाने हसत पहात होते. नंतर आमचे बरेच बोलणे झाले. ता-यांविषयी, ग्रहगोलांविषयी. त्यांनी मला टायको ब्राही, केपलर, गॅलिलिओविषयी सांगितले. ब्रूनोला कसे जिवंत जाळले त्याविषयी सांगितले. तारे आपल्याला चमचमताना का दिसतात हे त्यांना ठाऊक नव्हते, नंतर पुस्तकात वाचून सांगेन म्हणाले. मग म्हणाले, आता बडबडू नको, नुसते बघ. या एका प्रसंगातून त्यांच्या व्यक्तित्वाच्या गाभ्यावर प्रकाश पडतो असे मला वाटते.

३ मे १९७३ या दिवशी वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी मुंबई येथे कर्करोगावरील शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचे निधन झाले.

छायाचित्र सौजन्य: सुधीर बेडेकर

(आपल्या वडिलांविषयी सुधीर बेडेकरांनी लिहिलेला हा लेख चित्रवेध (संपादक: सुधीर पटवर्धन) या दि.के . बेडेकरांच्या चित्रांचा आणि कलाविषयक लेखनाचा समावेश असणा-या आगामी काळात प्रकाशित होणा-या पुस्तकासाठी लिहिला आहे.)

सुधीर बेडेकर सामाजिक-राजकीय व वैचारिक-सांस्कृतिक विषयांवर लिहिणारे लेखक. सत्तरीच्या दशकात ‘मागोवा’ व नंतर ‘तात्पर्य’ या दोन डाव्या विचारांच्या मासिकांचे श्री. बेडेकर संपादक होते.

4 comments on “दि. के. बेडेकर: एक ओळख

  1. मधुरा

    दि. के. बेडेकरांनी नोव्हेंबर 1951 च्या ‘सत्यकथे’त अरविंद गोखले यांच्या ‘मंजुळा’ या कथेची समीक्षा करताना लिहिलेला, ‘मंजुळेला गवसलेला माणूस’ हा लेखक अक्षरशः थक्क करून टाकतो… तो लेख वाचनात आल्यापासून बेडेकरांच्या व्यक्तित्वाविषयी मनात अपार कुतूहल निर्माण झालं. सुधीर बेडेकर यांच्या या लेखामुळे ते कुतूहल तर शमलंच, शिवाय एक छान व्यक्तिचित्र वाचल्याचा आनंदही लाभला, त्याबद्दल मनापासून आभार…

    Reply
  2. डॉ . सुनील शिंदे

    सौंदर्यशास्र , टीकाटिप्पणी आणि तर्कशुद्ध रसग्रहण यांबाबत ची दि . कें ची मांडणी समतोल राहिली .

    Reply
  3. pramod mujumdar

    दि.कें.च्या व्यक्तीगत जीवनाविषयी प्रथमच वाचलं.

    Reply
  4. Sharmishtha kher

    Touching and enriching picture of Di. Ke. Bedekar.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *