सुचिता खल्लाळ

पाच कविता


back

II १ II

चौकटीला न पेलवणारा मजकूर

जगण्याच्या अभिनयाला चिकटून राहताना
मी लिहू पाहतेय
चौकटीला न पेलवणारा मजकूर

एक लांबलचक अंधाराचा बोगदा
संपेलच आता म्हणतानाही बराच दूर असतो
भासमान उजेडाचा आभासी लोलक
आपली पाठ अंधाराची
अंधाराचे आपले डोळेही
हा धड दिवस नाहीय
ही धड रात्रही नाहीय
या संधिप्रकाशाच्या संदिग्धतेत
अस्पष्ट अस्तित्वावरून संथगतीने सरकत जातायंत
मरणाची थंडगार बोटं
तरी चालतायंतच पावलं खालमानेने
जगण्याचे गुलाम असल्यागत
चारचौघांसारखंच आपणही करतो सोबत रस्त्याला
आयुष्याचा बळी म्हणून
शक्तिपात झालेल्या आपल्यात नाहीय
एखादं भन्नाट उदाहरण गिरवण्याची ताकद किंवा वेडेपणा

कालभ्रम,दिशाभ्रम,स्मृतिभ्रमाचा
जळता तिढा सोडवू पाहताना
तुम्ही चुकूनही शोधू नका मला घटनांत अथवा अमूक कथानकाच्या पात्रात
या अजस्र शून्यात शून्य गतीने भोवंडताना
कदाचित मी सापडेन एखाद्या प्रतिकात किंवा मिथकाच्या गूढार्थात

मी लिहू पहातेय नेटाने
चौकटीला न पेलवणारा मजकूर
पण तुम्ही चुकूनही वाचू नका मला
मी लिहिलेल्या ओळीं
कदाचित मी गवसेन ओळींमधल्या
असंख्य रिक्त को-या अवकाशात

अशी एखादी कोरी जागा वाचताना
तुम्ही अडखळलात
तरी मला पुरेसं आहे…

 

II २ II

एका लांबलचक झोपेतून

एका लांबलचक झोपेतून उठलो आहोत आपण नुकतेच
मुठींनी डोळे चोळत भरू पाहतोय पापणीत किलकिल्या उजेडाच्या तिरप्या कनाती
अंदाज लावू शकत नाहीयंत आपण की नेमकं कधीपासून झोपेत होतो आपण
आपलं जैविक वय, काळाचा पट, कूस बदलता ऋतू
यांचंही जुळत नाहीय गणित
दिशांची, उन्हाची, सावलीची, क्षितिजाची
ही केवढी उलटापालट होऊन गेलेली
आपला गोतावळा भाईबंद मैत्र
बरंच जगून घेतलंय अवतीभवतीच्या जगानं
आपण दीर्घ झोपेत असताना
घटितांच्या, दृश्यांच्या आखीव चौकटींचे
लावता येत नाहीयंत आपल्याला अर्थ
बदलती भाषा, बदलते व्यवहार, बदलते व्याकरण
लकबी, उच्चार, पेहराव, सवयी
रक्तातली गुणसूत्रंही अनुकूलित होत ओलांडून गेलीयंत
उत्क्रांतीचे कितीतरी पुढले टप्पे
बदलाचे वारे न लागलेल्या झोपेतल्या आपल्या आतली
आपली जनुकंही मागास
एकूणच जगण्याच्या चालीरिती संदर्भात आपण
अस्खलित अशिक्षित
निबिड जंगलातून नागर वसाहतीत
चुकून आलेल्या आदिम आदिवासींसारखे
आपण नाहीयंत कळपाआत किंवा कळपाबाहेर
समकालीन अथवा कालातीत

उजेडाच्या असह्य प्रखरतेत दिवाभितागत
बुब्बुळं आकुंचून आपण हुडकतोय
झाकोळ पारंबीचं खुणेचं झाड
झोपण्यापूर्वीचं..

खरंतर तेव्हा आपल्या समजुतीनुसार
टक्क जागे असतो आपण एकटेच
आणि भवतालचा समकाल वावरतोय
झोपेत चालण्याची सवय असलेल्या
मानसिक रूग्णासारखा..

 

II ३ II

एकतर तू मान्य कर 

गैरलागू ठरवते मी
विवेकनिष्ठ वसाहतींचे नागर इतिहास
जाडजूड चोपड्यांतली संवैधानिक बकवास
जख्खपणे वहन होत आलेलं परंपरांचं गावठी महात्म्य
झापडबंद वर्तनाचे घोटीव नियम
देखण्या व्यवस्थेआडचे बाहेरख्याली विभ्रम
आजवरची समग्र तोतरी सांस्कृतिक बडबड
फोलपट पांढरपेशी वाङमयीन संपदा
मग्रुर चक्रवर्तींचे अपृष्ठवंशीय कणे

आणि ठरवते गैरलागू अशी बरीचशी तद्दन भंकसगिरी

लिहून लिहून काय आणि कितीक लिहिणाराहोत आपण
सपाटावरच्या उथळ बुडबुड्यात नाही भरता येत
तळालगतचा खरवड गाळ
आणि तिथेच तर अडकलाय ब्रम्हांडाचा अव्यक्त आत्मा
आणखी कुठवर खरडणार आहोत आपण
समकालाच्या कोऱ्या करकरीत पटावर
जन्मसपाटीपासूनची उंची आणि मरणाचे तडाखे
या दरम्यानच्या थापडा  

एकतर तू मान्य कर
आपल्यातला पारदर्शक परमेश्वर
नाहीतर लाथाडून लाव जाहीरपणे
सोय, सवय, सत्य
यांदरम्यानचा
सोयीस्कर लटकता मापातल्या पापाचा
तत्त्वज्ञ तराजू.

 

II ४ II

एक कविता दर एका मरणासाठी 

कसलं समंजस भाष्य करताहात तुम्ही
या बदलत्या ऋतूंवर
जगण्याच्या तापमानावर
संबंधांच्या हवामानावर
काळावेगळं होऊन काळासोबत जुळवून राहण्याचा
हा सहिष्णू हेका
चुरगाळून टाकतो आहे माझे आतले आकार
माखून घेतलीयंत मी रंगात माझी पाची बोटं
तर पाठमोऱ्या आयुष्यावर कोरेपण गोंदून
तुम्ही निघून जाताय मागच्या दाराने मूकपणे
अदृश्य देवदूतासारखे
आणखी किती सैल सोडाव्या मी विस्मरणात गेलेल्या
मागच्या पुढच्या जन्माच्या हाका
जमू येणाऱ्या राखेखालचे हे विझू विझू निखारे
बुजून जातायत दुर्लक्षित सत्यासारखे
तुम्ही सांगताय गाणं गायला भाषा काढून ठेऊन
घाबराघुबरा आलाप घेरून घेतोय विक्राळ जगण्याला
हळूहळू होत जातोय एक अकाली सूर्यास्त 
मावळतीचा बारकावा टिपताना
घायकुतीला येतोय आतला घनघोर सन्नाटा
ठेवेनही मी म्यान करून तहानेची लय
धडका घेत राहिल आंधळं फुलपाखरू तडकत्या आरशावर
तेव्हा तुमच्याही नकळत माझंच अस्तित्व निमूट निघून जाईल माझ्या आतून

तत्पूर्वी  शेवटाची घरघर म्हणून
तुमच्या समजूतदार जगरहाटीच्या दलदलीवर
मी घोटून घोटून उमटवेन
माझी अक्षत पोलादी लिपी
सनातन शिलालेखासारखी
आणि लिहीन
एक कविता दर एका मरणासाठी

 

II ५ II

न्हं

ह्या कोणत्या सावल्या लगडू पाहतायंत माझ्या उन्हाला
हजारो मैलाची पायपीट नांगरूनही
नाही लावता येत वाळवंटावर अशक्याचं झाड
उगवून आल्या आरंभाच्या दिवसाइतक्याच
लख्ख ताज्या जखमांचे
कासावीस सोहळे
रोज उगवतात आणि मावळतात माझ्या उन्हासोबत
लांबवर पसरलेल्या या उदास बगीच्यांवर
कुठवर धरू शकशील धपापत्या कनाती सावलीच्या हातांनी

ह्या कोणत्या सावल्या लगडू पाहतायंत माझ्या उन्हाला
उन्हं माझे डोळे
उन्हं माझे ओठ
उन्हं माझी जीभ
उन्हं माझा उष्ण श्वास
उन्हं माझा अवयवी काळोख
उन्हं माझी निरवयवी कोसळ

तुझ्या दिसागणिक कलत्या सावल्यांना बधणार नाहीत ही
अजस्र उन्हाची कडूजहर मुळं
कोणत्या मातीत बिलगून उगवून येईल देवपणाचा अलौकिक अपौरूषेय साक्षात्कार
नाही मावायची तुझ्या तर्जनीच्या टोकावर
माझ्या उन्हाची तेजाबी टिपं

मोडू नये उन्हाची ऊनपणाची सवय

माघारी घे तुझं हे अशक्याचं झाड
उकलून काढ थरथरत्या हातांनी धरलेल्या संभ्रमित कनाती
माझ्या टळटळत्या उन्हावरून

लख्ख लखलाभ असू दे मला माझं वैराण वाळवंट
उन्हाचं
पहिलून आणि शेवटून…

सुचिता खल्लाळ नांदेड (महाराष्ट्र) येथे शिक्षण विस्तार आधिकारी म्हणून कार्य करतात. त्यांचे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून कविता लेखनासाठी त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत.

5 comments on “सुचिता खल्लाळ यांच्या पाच कविता

  1. Balasaheb Matke

    अप्रतिम

    Reply
    • Avinash salapurikar

      Khupch nital aani changlya kavita aahet. mala khup khup aavdlya

      Reply
  2. Ganesh

    Very nice. I loved it.
    Rgds,
    Ganesh Kulkarni (Haryana)
    9764773257

    Reply
  3. दा.गो.काळे

    कवितेसोबत खोल गर्तेत हिंडून आल्यावरची अस्वस्थता जाणवली.खर्या अर्थाने अंधार शोधायला निघालेल्या स्रीयांच्या पीढीची कविता लीहिताहास तुम्ही मिळून सार्याजणी…..दा.गो.काळे.9421467640

    Reply
  4. डॉ. सूर्यकांत हयातनगरकर

    अतिसुंदर

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *