हिमांशू भूषण स्मार्त

आपला ठावो न सांडिता



back

बाभळीचे वाकडे बुंधे, फक्त भरदार असत नाहीत, ते घट्ट असतात. टणक. जमिनीतनं ते केवळ अन्न नाहीत घेत पाषाणांचा घट्टपणा शोषून घेतात. बाभळीच्या मुळांनी पाषाणांची माती होते आणि त्यांचा टणकपणा बाभळीच्या बुंध्यात शिरून बुंधे घट्ट करतो. बुंध्याला टेकून उभारलं की आधार वाटतो आणि मिठी मारली की निर्भय वाटतं. बुंध्यांची साल, उभार आणि खाचांची. टेकड्या-डोंगरांसारखे अनवट-रेखीव उभार आणि द-यांसारख्या अद्भुत-अनाकलनीय खोबणी. सालीचा एखादा ढपला पडला तर आत लाल रंग. बाभळीच्या अन्नातून आलेला लाव्हा पिकून त्याचं गरदार फळ झाल्यासारखा. बुंध्यावर एकमेकांना छेदणार्‍या गच्च फांद्या. अर्ध्या चिमटी एवढ्या पानांची दळं. शुभ्र काटे आणि कोवळ्या सूर्यासारखी पिवळीजर्द फुलं. कुठं कुठं, शेंगांचे राखाडी-पांढरे खुळखुळे. पण हे सगळं वेगळं दिसत नाई. सगळं बाभळीच्या स्वायत्त घाटात विरघळलेलं. बुंध्याशी उभारून वर पाहिलं तर निळ्या आकाशानं बाभळीत शिरून स्वतःला मिटवून घेतलय. त्याला बाभळीच्या काट्यांचा शुभ्र आणि शेंगांचा राखाडी-पांढरा रंग आलाय. आकाशाचं निळेपण, पिवळ्या फुलांच्या आणि फिक्या हिरव्या पानांच्या रंगात पार पालटलय. बाभळीतनं दिसतंय ते आकाश बाभळीचं. झाड बदललं की आकाश बदलेल. बाभळी खालनं शिंशपाखाली गेलं की आकाशाच्या निळेपणावर, फिक्या पोपटी मऊशार रंगांचे ठसे येतील. त्याला, शिंशपाच्या हलक्या पिवळ्या-पांढर्‍या बुंध्या-फांद्यांच्या गहिर्‍या छटा येतील. शिंशपाचं आकाश बाभळीपेक्षा खुलं. सुलभ. बाभळीचं आकाश घट्ट, गुंतागुंतीचं. व्यामिश्र. असंच, जितकी झाडं तितकी त्यांची आकाशं. शिंशपाखाली निळी झाक असणारा मऊ पोपटी उजेड आणि बाभळी खाली घट्ट काळसर उजेड.

बाभळीचं खोड, खोबण-उभारांनी भरलेलं आणि एखाद्या-एखाद्या उभारावर दबून काळे कोळी बसलेत. बुंध्यांच्या खोबण्यांधून काळसर तांबूस मुग्यांची अखंड रांग वाहतीये. जितकं जवळ जाल तितकी तिची गती वाढल्यासारखी वाटते. रांगेतल्या पहिल्या मुंगीनं स्वतःत वेग निर्माण केलाय, मग तिची लहर होऊन एकेक मुंगी व्यापत तो शेवटच मुंगीत पोहोचलाय. पण पहिली आणि शेवटची मुंगी कुठाय? खोबणीत फक्त वाहती मुंग्यांची रांग. आणि उभारांवर काळे कोळी. केसाळ पायांचे. पाय ताणून उठले की दिसतात बसले की अदृश् होतात. काही काळ जणू बाभळीच्या एखाद्या सूक्ष्म अंशाला जाग येऊन त्या जागेचे कोळी होतात. बुंध्याजवळ गेलं की चार-सहा कोळी उठतात. धावतात. आणि दुस-या उभारावर जाऊन बाभळीचे होतात. बुंध्यापासून लांब जावं तर कोळी नाईत. खोबण्यांमधल्या वाहत्या मुंग्या नाईत. मुंग्याही, बाभळीचा प्राण उघडा पडून वाहताना दिसावा तशा. लांब गेलं की फक्त बाभळ. कुणालाच का वेगळं नाहीये दिसायचं? आणि ही काही गणवेशधारी समानता नाई. कवायतीनं येणारी एकसंधता नाई. कोळी तिरके धावतात. त्यांच्या धावण्याची दिशा जोखता येत नाई. मुंग्यांची दिशा निश्चित. कोळी उभारांवर धावताना मुंग्यांच्या दिशा छेदतात. पण त्यांच्या गतीचा प्रवाह अडवत नाईत. डाळिंबी डोळ्यांचे, तांबूस पाठींचे भारद्वाज बाभळीत आले तरी, बाभूळ, बुंधा, फांद्या, काटे फुलं, शेंगा, मुंग्या, कोळी आणि आकाश यांच्या एकपणात ओरखडा उमटत नाई. भारद्वाजाची बाभळ होते आणि बाभळीचा भारद्वाज. त्याच्या खोलातून आल्यासारख्या आवाजांचा घुमाराही बाभळीच्या घुमार्‍यासारखा, गाभ्यातून एकजीव होऊन येतो. बाभळीच्या परिघावर, कोवळ्या फांद्यांच्या टोकांना सुगरणीचे खोपे टांगलेत. ते नरांनी बांधले. माद्यांनी स्वीकारले. त्यात सुगरणीची पिलं वाढली. सुगरणी मोठ्या होऊन उडाल्यावर ते माळ-मुनियांनी वसवले. त्यांच्या टोकांवर छिद्रं पाडली. तिथनं ये-जा केली. काही मुनिया; सुगरणींसारखं, खोप्यांच्या लोंबत्या नळीतनं आत-बाहेर करायला शिकल्या. त्यांची पिलं वाढली. उडून गेली. पक्षांच्या विणी वाढवलेले खोपे, बाभळीनं तिच्या घाटाचं द्रव्य म्हणून राखून ठेवले. आता पुढच्या मोसमात पक्षी येतील, तेव्हा काही खोपे बाभळीची पिकली फळे गळल्यासारखे गळून गेलेले असतील. त्यांचे खालच्या जमिनीत खत झालेले असेल. काही खोपे वार्‍यावर उडणार्‍या एकेक धाग्याने थोडे थोडे घटत राहतील. बाभळीची पानं पिकून वार्‍यावर वाहतात तसे खोप्यांचे धागे वाहतील.

पुढच्या मोसमात; सुगरणी-मुनिया येण्याआधी, साता समुद्रापलीकडून वटवटे येतील. लाल कंठांचे माशीमार येतील. दरम्यान बाभळीच्या फुलांच्या रंगांचे सुभग बाभळीत वावरतील. कवडे होले घुमत बसतील. नाचणांच्या शेपट्या पंख्यासारख्या पसरतील. या सगळ्यांचे रंग बाभळीला येतील. इतकं सगळं होईल पण आपल्याला काही दिसणार नाई. आवाज ऐकू आले तरी ते बाभळीचेच वाटतील. बाभळ, पक्षांच्या- सिकाडांच्या आवाजात बोलेल. संध्याकाळी हळूहळू अंधार पसरायला लागेल. बाभळ सालीसारखा घट्ट होत जाणारा अंधार पांघरेल. आता बाभळ अंधाराची आणि अंधार बाभळीचा. बाभळीला उजेड करून काहीही दाखवायचं नाई. अंधाराची सालं काढून, तिला उजेडानं नग्न व्हायचं नाई. रात्रीचा दाट अंधार, संध्याकाळचा शामल उजेड, पहाटेचा पांढुरका अंधार, सकाळचा कोवळा उजेड आणि दुपारचं सलग-एकसंध ऊन्ह हीच बाभळीची वस्त्रं. ती मुद्दामहून परिधान करावी लागत नाहीत. प्रहर बदलला की ती आपोआप बदलतात. आपण कितीही टक लावून पहात बसलो तरी हा वस्त्रपालट आपल्याला दिसत नाई. तो झाला की दिसतो फक्त. बाभळीभोवती पांगारे आहेत, करंज आहेत, गारवेलीची गचपणं आहेत, कोळशिंद्याची काटेदार गर्दी आहे. उंच निलगिरी आहे आणि निलगिरीच्या टोकावर फांद्यांच्या बेचक्यात तुरेवाल्या गरुडाचं घरटं. अजस्त्र. यंदा गरुडानं दोन पिली वाढवली. बाभळीचं भवताल गिळायला येणार्‍या शहराची कणखर पावलं पडून उठलेला कंप, जमीन हलवून टाकत असतानाही दोन्ही पिली भरदार पोसली आणि त्यांनी स्वतंत्र वस्ती शोधायला उड्डाण केलं. उत्तरेकडं उडत गेलं तर शहर लागतं म्हणून तरुण गरुड दक्षिणेकडे उडत गेले.

अर्थात गरुड कुठेही उडत गेले तरी, त्यांच्या उड्डाणात शहर येणार. दोन्ही गरुडांना स्वतंत्र वस्त्या शोधायला लागणार. भरदार फांद्यांचे, बेचके असणारी झाडं शोधून त्यांना घरटी रचावी लागणार. घरट्यांसाठी शुष्क काटक्या आणाव्या लागणार. विणीतल्या अनुनयासाठी-प्रणयासाठी उड्डाण करायला खुलं आकाश शोधायला लागणार. विरघळून, एक होता येईल असं एखाद्या बाभळीभोवतीचं भवताल शोधावं लागणार. त्यांच्या स्मृतीत असं भवताल घट्ट नोंदवलेलं आहे पण त्यांच्या डोळ्यांना ते दिसेल काय? विरघळून जाता येईल असं भवताल सापडलं नाही तर गरुड उघडे पडतील. त्यांना असं उघड्यावर जगता यायचं नाई. उघड्यावर त्यांना घरटी रचता यायची नाईत. त्यांची पिली वाढायची नाईत. गरुडांना, ते जन्मले त्या बाभळीच्या भवतालात परत जाता यायचं नाई. तिथं दोनच गरुडांना जागा. आणि कदाचित ते परत येतील तेव्हा शहर बाभळीच्या भवतालात पोहोचलेलं असेल. झाडांचा लाकूडफाटा झालेला असेल. रात्र झाली की शहरात चिक्कार उजेड होईल. शिल्लक झाडांच्या बुंध्यांना माळा गुंडाळून त्यांच्या अंगाखांद्यावर उजेड खेळवलेला असेल. काळ कोळ्यांची मृत शरीरं वार्‍यावर उडून गेलेली असतील. कोळशिंद्याचं नाव नसेल. असं काहीही शिल्लक नसेल ज्याचा रंग गरुडांना येईल आणि त्याला गरुडांचा.

तूर्तास या भयाचा सूक्ष्म कंप असला तरी त्याची जाणीव नाई. आणि बाभळीला आणि तिच रंगगोपित भवतालाला नष्टचक्राची जाणीव असते तरी की नाई कुणास ठाऊक? बाभळ कित्येक वर्षं जीवनात विरघळून जाणारं रंगगोपन साकारते. सांभाळते. ग्रीष्मातलं चटका देणारं ऊन्ह असतं. शहराच्या आसमंतात तप्त मृगजळाच्या लाटा उठत असतात. लांबून शहर मृगजळानं वाहतं झाल्यासारखं वाटतं. वाहतं झाल्यासारखं पण जागा नं सोडणारं. मायावी. ग्रीष्माचा आवेगी फुफाटा चारी दिशांना पसरलेला असतो. पळस-पांगारे-बहावे ही दीप्ती-धग शोषून घेतात. तिची फुलं करून, त्यांच्या घोसांनी स्वतःला शांतवत राहतात. शुष्क गवत उडून जाऊन जमीन उघडी पडलेली असते. कुठं कुठं गवताचे गड्डे शिल्लक असतात. आईबापांनी; धोका जाणवणारा टाहो केला की टिटवीची पिलं गवताच्या गड्ड्यांच्या रंगांची होऊन, त्यात मिसळून जातात. पाय पोटात दुमडून घेतलेले. भुईगेंदाच्या शुष्क चेंडूंचे रूप धरून टिटवीची पिलं जमिनीत अदृश्य होतात. शोधून थकायला झालं तरी दिसत नाईत. आपण अधीर झालेलो असतो. माथ्यावर पिलांचे पालक प्राणपणानं ओरडत उडत असतात. आपल्या माथ्यावर सूर मारल्यासारखे धावत येतात. खाली जमिनीवर अदृश्य झालेली टिटवीची पिलं आहेत आणि उंच निलगिरीच्या झावळ्या-पानांच्या छायेत गुप्त झालेले गरुडायत. विणीनंतरचा थकवा, कणाकणानं भरून काढणारे. झाडांच्या तळाला जमलेल्या पाचोळ्याशी संधान साधलेले रातवे आहेत. लावे आहेत. फांद्यांच्या बेचक्यात डोळे मिटून बसलेले पिंगळे आहेत. गारवेलीच्या गचपणात फटाकड्यायत. लाजर्‍या पाणकोंबड्यायत. गारवेलीच्या फांद्यांच्या रंगांचे वटवटेयत.

एकमेकांत असतात तेव्हा या सार्‍यांनाच कशाचं भय नाई. एकमेकांच्या रंगांचं, एकमेकांचे रंग-आवाज घेऊन सर्जित-विसर्जित होणारं त्यांचं-त्यांचं एक ब्रम्हांडाय. स्वतंत्र. बाभळीचं भवताल एका तळ्याच्या काठीये आणि तळ्याच्या पलीकडं वाहनांनी वाहणारा रस्ता. रस्त्यांवरून वाहणारं जग मात्र परस्परात विरघळून न जाणारं. जितक्या वस्तू तितकी नावं. जितकी माणसं तितकी नावं. ही स्वतंत्रता नाई. ही परस्थता. प्रत्येकाला आपापल्या जागी काईतरी हवय. आपापली जागा नकोय, आपापल्या जागी काईतरी हवय. ते रस्त्यांनी पोहोचवावं. पोहोचवणारे रस्ते नसतील तर रस्त्यांना फाटे फोडावेत. रस्ते, अंतरं कमी करणारे. रस्ते, भोग पोहोचवणारे. रस्ते, बाभळीच्या भवतालातली स्वायत्तता भंगवून टाकणारे. छेदणारे. रस्ता न ओलांडता आलेल्या कीटकांना चिरडणारे. रस्ते, अभेद्य. निरिच्छ. काहीही अंगाला न लावून घेणारे. बाभळीच्या रंगात रंग न मिसळणारे. बाभळीचे न होणारे. नुसते रस्ते. बाभळीच्या भवतालाचं एकमेकात असणं, ज्यांच्या जन्मदात्यांना अमान्याय असे आज्ञाधारक रस्ते. रस्ता शिरलेल्या बाभळीच्या भवतालाचं फाटत जाणं आपल्याला ऐकू येत नाई. रस्त्यानं पुसून टाकलेलं रंगगोपन आपल्याला दिसत नाई. कारण आपल्याला कमी झालेली अंतरं दिसत असतात. रस्ता पोहोचतो त्या टोकावरचे लाभ दिसत असतात. रस्त्यांनी वाहून आणलेलं माणसांचं एकांड जग रंगगोपनाला घाबरतं. ते आलं की तळ्याकाठी, काठांच्या रंगाचे होऊन बसलेल्या वंचकांना जागा बदलाव्या लागतात. माणसांच्या जगाला उजेड लागतो. अंधाराशी त्याचं शत्रुत्व असतं. माणसांच्या जगाला कोरडीठाक जमीन लागते. ओलीशी त्याचं शत्रुत्व असतं. पाणी मुरलेलं दिसलं की माणसं घाबरतात. आणि पाण्याची पाळंमुळं पार खणून काढतात. माणसांची घरं बाभळीसारखी आकाशाला मिठी मारत नाईत. कवेत घेत नाईत. एक तर ती आकाशाला गिळायला धावतात किंवा आकाशापासून पळ काढतात. फुललेल्या गुलमोहराखाली, लाल सावली पडावी तसं होत नाही माणसांच्या घरांचं. बाभळीतून-शिंशंपातून-सावरीतून चांदणं पाझरतं आणि झाडांच्या बुंध्यांना चांदण्याची धवल, वाहती आभा येते. पांढरफळीच्या झुडपातनं पाझरलेल्या चांदण्याचे बारीक कण होतात. अर्जुनाच्या सालीवरनं वाहताना, चांदण्याच्या छोट्या-छोट्या आकाशगंगा होतात. अशावेळी अर्जुन, अर्जुनही असतो आणि ब्रम्हांडही. निलगिरीच्या गळून पडलेल्या पानांचा उग्र गंध, बटदवण्याच्या अस्फुट पण अद्भुत गंधात मिसळतो. रस्ता आला की हे सगळं कापरासारखं उडून जातं. बुंधे कापल्याचे थरकाप उडवणारे आवाज येतात. जमीन ओरबाडून काढणार्‍या यंत्रांची अजस्त्र घरघर येते. नांगरटीला आलेल्या शेतामधल्या ट्रॅक्टरचा ओरडा आणि त्याच्यावर वाजणार्‍या गाण्याची आकस्ताळी कर्कश्यता येते. पक्षांच्या आवाजांचे माणसांनी लावलेले अर्थ येतात. माणसांची स्वच्छता येते. माणसांची घृणा येते. माणसांचं भय येतं. माणसांची जिज्ञासाही, बाभळीच्या भवतालाला उघडं पाडण्याची शक्ती घेऊन येते. ती शमली, की बाभळीचं जीवनानं लिप्त रंगगोपन, स्पष्टीकरणाच्या अलिप्ततेनं अप्रस्तुत होऊन जातं.

आपण जीवनतृष्णेतून-जीवनेइच्छेतून घडलेल्या भवतालाच्या नकलेला-रूपस्वीकाराला म्हणतो रंगगोपन. तसंही असतंच ते निःसंशय. पण माणूस वजा केला तर अख्खं जीवनच असतं रंगगोपन. कुणी, रंगगोपनाला छद्म म्हणतात. छद्मावरण. जीवन; रूप लपवत नाई-नकलत नाई. ते, रूपांना विरघळवून टाकतं. रूपाचे हट्टी काठ होत नाईत. दोन रूपांचे किनारे जवळ आले की त्यांचं प्राणतत्त्व एकमेकाला सामावून घेतं. पाण्याच्या काठावर गवत वाढलं की ते पाणीदार होतं आणि गवताच्या काठावरचं पाणी लवलवतं. ग्रिष्मात जलाशय सुकतात. पाणी गवतापासून लांब जातं. तेव्हा गवत भूमीत विरघळून जातं. गवताच्या बिया, मातीचा रंग घेऊन गुप्त होतात. त्या फक्त;  बिया टिपणार्‍या, मातीचा रंगाच्या  पक्षांना दिसतात. पुन्हा पाऊस येतो तेव्हा पाणी वाढतं, गवत वाढतं. गवता-पाण्याच्या काठाचे प्राण भेटतात. विरघळून जातात.

पाठीशी बाभळीचं भवताल आणि डोळ्यांपुढं सुकत गेलेलं पाणी ठेवून बसलं की आपलं उपरेपण जाणवतं. असं काय झालं की आपल्या अस्तित्वाला भयाचं रूप आलं? आपल्या चाहुलीत नाशाची धडधड आली? आपल्या श्वासात लालसेचा रेटा आला? आपल्या नजरेत, विरघळ भाजून टाकण्याची धग आली? आपल्या स्पर्शात वांछेची भगभगीत जाणीव आली? असं काय झालं, ज्यानं आपण बलवान झालो पण आपली एकात्म होण्याची तरलता संपली? काहीही झालं तरी माणूस म्हणून मिळालेलं बळ झटकता येत नाई. काहीही झालं तरी बाभळीचं-शिंशपाचं-गरुडाचं होता येत नाई. या स्वतंत्र तुकड्यावरच्या, एकांड्या उत्क्रांतीचं काय करायचं कळत नाई. रंगगोपनासाठी जीवनाचं कसं असायचं कळत नाई.

छायाचित्रे: हिमांशू भूषण स्मार्त

हिमांशू भूषण स्मार्त हे मराठी नाटककार असून कविता, ललित गद्य आणि संशोधनात्मक लेखनही करतात. ते भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, कोल्हापूर तसेच ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ येथे नाटक या विषयाचे अध्यापन करतात.

One comment on “आपला ठावो न सांडिता: हिमांशू भूषण स्मार्त

  1. Dr Sharvari Mirgunde

    Very nice writeup, keen observations !

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *