शर्मिला फडके

ये कौनसा गुबार है


5


back

‘धूळ’ म्हटलं की मला कमल देसाई आठवतात. 

“गोगॅंने रंगवलेल्या या सावलीत उभ्या असलेल्या ताहिती मुलींची त्वचा बघ, तांब्याच्या कळशीवर धूळ बसल्यावर दिसतो तसा रंग आहे, तो जेव्हा याच मुलींना सूर्यप्रकाशात उभं करतो तेव्हा त्या कशा चिंचेने लखलखीत घासलेल्या कळशीसारख्या चमकतात, हो ना?”

कमल देसाईंनी गोगॅंच्या ‘गोल्ड ऑन देअर बॉडीज’ चित्रातल्या ताहिती मुलींकरता तांब्याच्या कळशीवर बसलेल्या धूळीची वापरलेली उपमा ऐकून मी इतकी अवाक् की काही प्रतिसादच सुचेना. त्यावर खळखळून हसत त्या म्हणाल्या, “अगं खरंच, तू माझ्या सांगलीच्या घरात मी हौसेने जमवलेली तांब्याची भांडी बघायला हवी होतीस. मला अजिबात उत्साह आणि वेळ नसायचा त्यांना स्वच्छ राखण्याचा, मग बसायची धूळ. थरच्या थर धुळीचे. आणि ती धूळ इतकी छान दिसायची की मी अजिबात त्या धुळीवर फराटा म्हणून उमटू द्यायचे नाही.” आता मात्र त्या आणि मी दोघीही खळाळून हसायला लागलो. धुळीचे सुंदर थर, तांब्यावर धूळ बसल्यासारखी दिसणारी त्वचा.. ‘धूळ’ शब्दाचा मायनाच पूर्ण बदलून टाकला माझ्याकरता कमल देसाईंनी. पुढेही सर्जनशीलता आणि धूळ यांच्यातलं एक कमाल नातं त्यांच्यामुळेच कळलं.       

पॉल गोगॅंच्या पोलिनेशियन प्रवासावर, त्याच्या ताहिती बेटांवरील आयुष्याचं चित्रण करणा-या ‘द गोल्ड ऑन देअर बॉडीज’ या  पुस्तकाचा अनुवाद चित्रकार प्रभाकर कोलतेंनी केला होता, त्याला कमल देसाई लिहीत असलेल्या प्रस्तावनेचं शब्दांकन मी करत होते, आणि त्याकरता कमलताईंना भेटत असतानाच्या काळातला हा तांब्याच्या कळशीवरच्या धुळीचा किस्सा. फ्रेंच पोस्ट इम्प्रेशनिस्ट चित्रकार पॉल गोगॅं शहरी जीवनाला उबगलेला, कृत्रिम पॅरिशियन कलावर्तुळात त्याचा जीव गुदमरत होता, आणि म्हणून मगआपल्या चित्रकलेची नवी सुरुवात करावी, चित्रांमध्ये जिवंत, रसरशीत खऱ्या आयुष्याचे चित्रण व्हावे या हेतूने त्याने आपली आधीची सर्व चित्र विकून मिळेल तो पैसा जमा केला आणि पॅसिफिक समुद्रातल्या फ्रेंच पोलिनेशियन बेटांवरच्या वसाहतींकडे त्याने कूच केलं. तिथल्या लख्ख सोनेरी सूर्यप्रकाशात नहाणाऱ्या ताहिती बेटांवर राहून त्याने आजवरच्या आपल्या कलेला आमुलाग्र कलाटणी देणारी, ताहितियन आयुष्याची खरीखुरी चित्र काढली, ज्यांच्याकरता तो आज ओळखला जातो. गोगॅंची ही ताहिती चित्रं अक्षरश: मोहात पाडतात. कमल देसाईंना गोगॅंची चित्र आणि त्याचं एकंदरीतच आयुष्याचं कौतुकमिश्रित आकर्षण होतं. अतिशय प्रेमाने, आपुलकीने त्या ही प्रस्तावना लिहीत होत्या, त्याकरता पुन्हा पुन्हा इंटरनेटवर आम्ही गोगॅंची ही ताहिती चित्र अनेकदा न्याहाळत असू.

ताहितियन मुलींची तांबुस त्वचा सावलीत धुळकट टोनमध्ये आणि उन्हात सोनेरी झळाळीत, लखलखत्या सुवर्ण रंगात रंगवताना गोगॅंने रंगछटांच्या मिश्रणाचा, पोताचा जो अपूर्व प्रयोग केला आहे, त्याचं ते कसब कमलताईंच्या या धुळीच्या उपमेमुळेच खऱ्या अर्थाने त्यावेळी उमगलं. त्यांची चित्रांची जाण विलक्षण होती. एखाद्या चित्रावर, चित्रकारावर बोलताना त्या इतका वेगळाच, अकल्पित कोन दाखवायच्या की आपल्याला का हे बघायची दृष्टी नव्हती असं वाटावं. 

धुळीची प्रतिमा त्यांनी त्यावेळी अजून एकदा बोलताना सहजतेनं आणि चपखलतेनं वापरली. प्रस्तावनेचं काम चालू होतं त्याच दिवसांत मी माझी कादंबरी ‘फोर सीझन्स’ लिहीत होते, वाचून दाखव गं, जे लिहिलं आहेस ते, असा आग्रह त्या करत. मी जेवढं झालं होतं लिहून त्यातला काही भाग वाचून दाखवे. पुढे मग एकदा बरेच दिवसांनी आमचं फोनवर बोलणं झालं, त्या म्हणाल्या, काय लिहिलंस अजून? वाचून दाखव आता पुढचं. म्हटलं, काहीच नाही लिहिलं नंतर. सुचतच नाहीये. ब्लॉक आलाय बहुतेक लिहिण्याचा. त्यावर त्या पटकन् म्हणाल्या, “सारखा कादंबरीचा विचार करत असतेस का? त्याच त्या विचारांची धूळ बसते मनावर एकेकदा. बाहेर जा, प्रवास करुन ये एखादा. गोगॅने केलेला आठवतोय ना? रुटीन बदललंस की पुन्हा लखलखीत तांब चमकेल.” गोगॅंच्या ताहिती मुलींच्या चित्रांचा आणि त्यांनी त्यावेळी वापरलेली तांब्याच्या कळशीवरच्या धुळीची उपमा आठवून आम्ही पुन्हा एकदा हसून घेतलं. मग त्या पुढे म्हणाल्या, “अर्थात क्रिएटीव मेंदूवर अधून मधून ‘धूळ’ बसलेलीही चांगलीच. निवांतपणा मिळतो विचारांना. साचू द्यावी अशी धूळ. त्यावर काही ना काही उमटत राहतच. फार जीव नसतो त्यात, पण वेगळेपणा असतो. मग कधीतरी आपोआप उडून जाते ती. नंतर जास्त लखलखतं मन.” 

यावेळी त्यांनी केलेला ‘धुळी’चा उल्लेख मला चित्रकार गायतोंडेंच्या स्टुडिओत घेऊन गेला.  सर्जनशील मन आणि धुळीचं हे नातं त्यांनाही उमगलेलं होतं का? ‘चिन्ह’च्या ‘गायतोंडे’ विशेषांकातला एक लेख आठवला . पॅरिसला रहाणारे आर्टिस्ट सुनील काळदाते यांनी गायतोंडेंवर फिल्म करत असतानाचा अनुभव त्यात लिहिला आहे. गायतोंडे एका जीवावरच्या अपघातातून वाचले होते, पण अपंगत्व आलं होतं. पेंटींग्ज करणं त्यांनी थांबवलं होतं. अशा वेळी त्यांच्यावर फिल्म करायच्या उद्देशाने त्यांच्या दिल्लीतल्या निजामगंजमध्ये एका बरसातीत असलेल्या स्टुडिओत काळदाते आणि त्यांची टीम गेली, गायतोंडेंनी काही अटी घातल्या. त्यातली एक महत्वाची अशी होती की स्टुडिओतली एकही वस्तू हलवायची नाही, पसारा आवरायचा नाही, मुख्य म्हणजे साठलेली धूळ पुसायची नाही. फिल्म बनवताना क्रूने अतिशय काळजीपूर्वक त्यांच्या अटी जपत काम केलं. चित्रकार गायतोंडे यांच्यावरच्या त्या फिल्मच्या शेवटी गायतोंडेंच्या बोटांचे धुळीत उमटलेले ठसे बघायला मिळतात. मोठी विलक्षण फ्रेम आहे ती. गायतोंडेंच्या आयुष्यातल्या शेवटच्या या टप्प्याबद्दल, त्यांच्या चित्रकलेबद्दलच्या विचारांवर ज्यांनी वाचलं आहे, त्यांची चित्र ज्यांनी काळजीपूर्वक बघीतली आहे, त्यांना त्या धुळीतल्या ठशाचं मर्म कळू शकेल. गायतोंडे कधीच फार बोलायचे नाहीत. कोणी भेटायला येवो, ते शांतपणे एकाग्र विचारात गढून गेलेले असे बसून राहात. जपानी संगीत ऐकत राहत. 

जिवंत हालचालींचा कोलाहल असेल तिथे धूळ साचून राहत नाही, पण याचा अर्थ धूळ ही जिवंतपणाची अखेर नसते. हालचाली निमालेल्या पृष्ठभागाखालीही स्पंदन करणारं हृदय असू शकतं. अपघातानंतर हालचाली अशक्य झालेल्या, खुर्चीवर खिळून रहायला लागलेल्या, चित्रनिर्मिती अशक्य बनलेल्या अवस्थेत असताना गायतोंडेंनी मनातली निर्मितीची आस नेमकी कशी पूर्ण केली असेल? ‘मी मनातल्या मनात चित्र रंगवतो’ असं त्यांनी त्या काळात दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. अखेरच्या त्या काही दिवसांमध्ये, गायतोंडेंना त्यांचं कलाकार म्हणून जिवंत असणं धुळीच्या त्या थराआड बरकरार राखायचं होतं का? भौतिक जगाच्या गजबजाटापासून स्वत:ला वाचवायला धुळीचा हा थर त्यांनी स्वत:हून स्वीकारला असावा. कोलाहलापासून आयुष्यभर दूर राहू इच्छिणाऱ्या या चित्रकाराला साचलेल्या धुळीच्या थरात रंगांचा कोलाहलही जिरवून टाकावासा वाटला असेल. अर्थात तरीही त्यांच्या स्टुडिओत, एकांताचा भंग करणारी माणसं यायची थांबली नाहीतच, ती येत राहिली, धुळीच्या थरांवरचे त्यांचे ठसे बाहेरच्या जगापर्यंत पोचवत राहिली. 

गायतोंडेंना स्टुडिओतल्या एकांतात, आपल्या चित्रकलेच्या सामानावर, रंगांवर, इझलवर बसलेल्या धुळीत हा कलानिर्मितीतल्या अंतिम पूर्णत्वाचा झेन सापडला होता हे निश्चित. त्यांच्याच एखाद्या चित्रातून त्याचा शोध घेता येऊ शकेलही कदाचित. पहात राहिलं तर गायतोंडेंच्या कॅनव्हासवरच्या त्या खोल शेवाळलेल्या हिरव्या रंगावर किंवा शुभ्रतेच्या अथांग निळ्या किनाऱ्यावर काही तरंगते सूक्ष्म आकार सापडतातही, ते त्यांच्या मौनातल्या, खाजगी अवकाशातले धुलिकण असू शकतील. 

धूळ सहजासहजी साचत नाही. वातावरणाची एक कमाल स्थिरता त्याकरता गरजेची असते. अतिशय सूक्ष्म वेगाने आणि लयीने मग धूळ जमा होत जाते. ती नेमकी येते कुठून याचं आश्चर्य वाटावं अशा बंदिस्त जागेतही धूळ साचते. कारण धूळ असतेच. धूळ विरहीत निर्वात अवकाश निदान पृथ्वीवर नैसर्गिकरित्या नाही. आधुनिक शहरांना कितीही काचेची, स्टीलची आवरणं घातली तरी धूळ शिल्लक राहिलीच. धूळ पृथ्वीवर असते, चंद्रावरही असतेच. धूळ जगताना असते, मेल्यावरही असते. जगताना भवतालात असते, मेल्यावर चीतेच्या राखेत. वाळवंटात नवं काही उगवायची शक्यता संपलेली धूळ असते, तशीच मातीत सृजनाचा नवा कोंभ रूजवायलाही गरजेची धूळच असते. गायतोंडे म्हणूनच धूळ साठवून ठेवू पहात होते का? त्यातून नव्याने काही उगवण्याची, जन्माला येण्याची शक्यता ते जिवंत ठेवू पहात होते. कदाचित. 

सजीवाच्या जगण्या-मरण्याच्या, लय-विलयाच्या आणि अस्तित्त्वाच्या चक्राशी धुळीचं अपरिहार्य नातं आहे. धुळीत आदीम मानवाने रेघोट्या ओढल्या, आकार गिरवले, त्यातूनच संस्कृती प्रवाहित झाली. धूळ-चित्रांची अश्मयुगीन कला कदाचित म्हणूनच आजही पोस्ट मॉडर्न आर्टमध्ये आपलं स्थान अबाधित राखून आहे. फ्रेंच-अमेरिकन पेंटर, संकल्पनावादी चित्रकलेचा जनक मार्सेल दुशांच्या स्टुडिओतल्या काचेवर जमलेल्या धुळीचं मान रे या फोटोग्राफ़रने काढलेलं ‘डस्ट ब्रीडिंग’ छायाचित्र न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये लावलेलं आहे. अमेरिकन छायाचित्रकार, दादाइझममधले पेंटर मान रे दुशांचा जवळचा मित्र, त्याच्यासोबत कामही करत असे. या दोन्ही आर्टिस्ट्सच्या कलाविषयक विचारांचा, कलेकडे बघण्याच्या त्यांच्या चौकटीबाहेरच्या दृष्टीकोनाचा एकत्रित प्रत्यय या ‘डस्ट ब्रीडिंग’ छायाचित्रातून ठळकपणे दिसून आला. साचलेल्या धुळीचं डॉक्यूमेंटेशन म्हणून त्याकडे पाहिलं जातं. दुशांच्या न्यूयॉर्कमधल्या स्टुडिओतल्या एका दुर्लक्षित कोपऱ्यात असलेल्या टेबलावर बरेच दिवस एक काच, जी त्याच्या आर्टवर्क (द लार्ज ग्लास) चा भाग होती, ती पडून होती. जवळपास वर्षभर. त्यावर धूळ साचली होती. म्हणजे वर्षातल्या प्रत्येक दिवसागणिक ही धूळ थोडी थोडी त्या काचेवर साचत गेली, नवी धूळ जुन्या धुळीच्या थरावर जमत राहिली. मान रे नी ही काच पाहिली, आणि मग त्याने या धुळीने माखलेल्या काचेचं छायाचित्रण करताना अनेक तांत्रिक प्रयोग केले, दोन तासांचं दीर्घ एक्स्पोजर ठेवून हे चित्रण केलं. काचेच्या पृष्ठभागावरचे धुळीचे सूक्ष्म पोत, थर, धुळीचं नेमकं अस्तित्त्व अतिशय सुंदर तऱ्हेनं त्यात चित्रित झालं आहे. छायाचित्रण झाल्यावर दुशांने ती काच (द लार्ज ग्लास) स्वच्छ पुसली, त्याचे धुळीने माखलेले कोपरे मात्र त्याने तसेच ठेवले. आणि नंतर त्याने पातळ वॉर्निशच्या साहाय्याने त्या काचेवरचं धुळीचं अस्तित्त्व कायमचं जखडून टाकलं. 

अतिशय क्षणभंगुर अस्तित्त्व असलेल्या, फुंकरीनेही उडून जाणारी धूळ कालातीत गोठली. काचेवरच्या धूळ पट्ट्यात प्रतिबिंबित झालेलं दुशांच्या स्टुडिओतलं जग हा एक भौतिक कोन या छायाचित्राला होता, पण त्याही पलीकडे धूळ ही एक भावना आहे असा अभौतिक विचारही त्यात होता. हवेत मिसळून कधीही नाहिशी होऊ शकते म्हणून अलवार समजली जाणारी धूळ, तिच्यातलं हे वैशिष्ट्यच काढून घेतलं तर नेमकी कशी वागते? फार काही अलवार, निरुपद्रवी नाही ही धूळ, हिंसक, भितीदायक रूपही आहे धुळीला. कणाकणाने, नकळत ती साचत राहते, आणि अचानक तिचा ढीग बनतो, लहान ढीग, मग डोंगर, हलवायला अशक्य असा. धूळ हे मर्त्य जगाचं, नष्ट होणाऱ्या जगाचं प्रतीक. मान रेच्या छायाचित्रात तेच मर्त्य जग दिसतं, त्यावेळी धुळीतली नष्ट होण्याची क्षमता संपून गेली आहे. ती धूळ अमर्त्य झाली आहे. पण नंतर जेव्हा हे छायाचित्र प्रदर्शित झालं त्यावेळी धूळ हाच मध्यवर्ती विषय ठेवून अनेक वेगवेगळ्या रुपात कलाकारांनी ही धूळ  इंटरप्रिट केली. पर्यावरणीय प्रदूषण, निसर्गहानीचं प्रतीक असणारी धूळ, आण्विक धूळ, त्याचे हिंसक परिणाम पहिल्यांदाच त्या निमित्ताने भरवल्या गेलेल्या चित्र-प्रदर्शनातून समोर आले.  

धुळीच्या प्रतीकाकडे अनेक जण अनेक संदर्भांतून पाहू शकतात. त्यात जन्म-मृत्यू दोन्ही बघता येण्याची परस्परविरोधी संगती आहेच शिवाय गोठलेला, मृत काळ साचलेल्या धुळीतून पुढे प्रवाहित होण्यातली आयरनीही आहे. धूळ जमणे-धूळ उडणे या दोन्ही एकमेकांना जोडलेल्या, एकमेकांना अस्तित्त्व देणाऱ्या क्रिया. कधीही पुसून टाकता येतील अशी धुळाक्षरं मानवाने गिरवली आणि त्यातूनच चिरंतन लिपी निर्माण झाली. एकेकाळी वाळवंटाच्या धुळीतल्या रेखाटनांना सरावलेल्या हातांनी तयार केलेली अरेबिक मूलाक्षरांच्या देखण्या कॅलिग्राफीक नक्षीकामातून बनलेली गुबार चित्रे याची साक्ष देतात. 

या गुबारच्या उच्चारात घुमार आहे, वाळवंटातल्या धुळीच्या वादळांमधून निर्माण होणारा तो नाद आहे. धुळीतून निर्माण झालेल्या या कलेने धुळीचे सगळेच संदर्भ बदलून टाकले, जन्म-मृत्यू या दोन टोकांचे संदर्भ तिला होतेच, आता त्या दरम्यानचे आयुष्य व्यापून टाकणारे कलेचे सांस्कृतिक संदर्भही मिळाले, त्यातून तिचं रूप बदललं, पोत बदलला. मातीशी जोडलेली धूळ पर्शियन मिनिएचर्समध्ये बहुमोल सोन्याची झाली, अरेबिक मूळाक्षरांनी तिला पावित्र्य बहाल केलं. 

मस्तकी धूळ लावण्यातली पवित्रता भारतीय संस्कृतीतही आहेच. धूळ मिट्टीशी जोडलेल्या जन्म-मृत्यूच्या नात्याशी एकनिष्ठ राहिले ते बहुधा भारतीयच. त्यांचं सर्वस्व धुळीला मिळतं, कधी ते धूळ खातात, कधी चारतात. व्यभिचारातून जन्मलेल्या जीवाला धुळीतलं फूल बनवून टाकतात, आणि तेरे चरनोंकी धूल मिल जाये म्हणत नतमस्तकही होतात. 

परदेशी साहित्यात मृत्यूचं प्रतीक मानल्या गेलेल्या हेमलॉकच्या झाडावरून कावळ्याने झटकलेली बर्फाची धूळ काव्यात्म उदासीचं प्रतीक ठरली. ऐश्वर्याच्या, कलेच्या उन्मत्त दिखाव्यापायी निर्माण झालेली संगमरवरी धूळ मात्र जीवघेणी ठरली.   

माझ्या वैयक्तिक अनुभवातली धूळ साचलेली कधीच नव्हती. लहानपणी आजोळी, खानदेशात घालवलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमधले धुळीचे गरम, तप्त, जिवंत नि:श्वास आजही त्वचेला जाणवतात. संध्याकाळ झाली, झळा निवळल्या की अंगणातल्या तापलेल्या धुळीवर पाण्याचे शिडकावे मारुन तिला शांत केलं जाई. त्यानंतर हवा एकदम थंडगार, जादुई आल्हाददायक बनून जायची. धूळ ओलाव्यात शांत, निवांत विसावायची. मग अंगणाच्या मेरेवर बसून घराकडे परतणाऱ्या शेळ्या, मेंढ्या, गाईंच्या कळपाच्या गजबजाटात धूळ पुन्हा एकदा उठायची. ओलावलेला, मन शांतवणारा गोरज. धूळ तिथल्या रोजच्या जगण्याचा जिवंत भाग, तिला साचलेली, मृत ठरवण्याचा प्रश्नच कधी आला नाही. नंतर धुळीचे रौद्र तांडव अनुभवले ते मात्र विलक्षण आणि अनपेक्षितरित्या अंगावर धावूनच आलेले, पण तरीही मन निर्धास्त राहिले. धुळीचं भय वाटलं नाही, घृणाही नाही. हरिद्वारवरून मे महिन्याच्या अखेरीस परतत असताना, बघता बघता भर दुपारी चार वाजता अंधार दाटला, काळ्या धुळीची एक प्रचंड वावटळ, फनेलच्या आकारात समोरच्या चौकातून वर उसळली, इतस्त: उधळली. गरम हवेच्या सोसाट्यात त्या धुळीचं गोलगोल घुमत तासभर चाललेलं रौद्र तांडव आणि नंतर आलेल्या धुवांधार पावसाच्या सरीत मिटून जाणं कायम लक्षात राहिलं. 

धुळीचं हे वादळ अजून एकदा भेटायचं होतं, ते भेटलं इस्तांबुलमध्ये, सेहरान गुबार नावाने. 

इस्तांबुलच्या निळ्या सुलेमान मशिदीबाहेर आम्ही उभं होतो आणि धुळीचा पाऊस सुरू झाला. पिवळट, मातकट, मऊ धुळीच्या थराखाली काही सेकंदात आसमंतातली प्रत्येक दृश्य गोष्ट माखून गेली. आइया सोफ़ियाची गुलाबी नखरेल इमारत, निळ्याभोर इझनिक टाइल्सनी आच्छादलेला प्राचीन कॉन्स्टॅन्टिनोपल शहराच्या भिंतींमागचा हजारो वर्षं पुरातन बाजार, तुर्की चहा-कॉफीची रांगेत उभी दुकानं हे सगळं बघता बघता पिवळ्या धुळ-पडद्याआड दिसेनासं झालं. सुलेमान बाझारात नुकत्याच पाहिलेल्या पर्शियन गालिच्यात हाच यलो ऑकर रंग होता. ‘सेहरान गुबार’ येणं अपेक्षित आहे,  नाक, तोंड, डोळे नीट झाकून घ्या, अशा सूचना आमचा तुर्की सोबती शफ़ाक गेला अर्धा तास आवर्जून करत होता. जवळच्या स्कार्फ, स्टोल, गॉगल्सने जितकं शक्य तितकं झाकूनही घेतलं आम्ही, पण तो फार खुश नव्हता. त्याला आमचा इलाजही नव्हता. आमच्याकडे ना नकाब होता, ना बुरखा. जितकं शक्य तितकं पुरेसं अशी आम्ही स्वत:ची घातलेली समजूत किती अपुरी होती ते या काही क्षणांत लक्षात आलं. एक वाऱ्याची गिरकी आणि आम्ही नखशिखांत त्या पिवळ्या पडद्यात लपेटले गेलो. कानात, केसांवर धूळच धूळ. मऊ, पिवळी धूळ. अलवार हलकी धूळ. नजरेसमोरचा अवकाश पिवळ्या रंगात धुरकटला, विस्कटून गेला. तोपकापी राजवाड्या बाहेरची नक्षी, निळ्या मशिदीचा चकाकता घुमट हे सगळं आत्ता समोर होतं, कुठे गेलं? ये कौनसा दयार है? हदे निगाह तक जहां, गुबार ही गुबार है.. तब्बल पाऊण तास पिवळ्या धुळीचा समुद्र समोर उसळत होता. तोवर बंदिस्त वाहनातून शफ़ाकने आम्हाला मुक्कामाला पोचवलंही. रस्ते रिकामेच होते. तरूण, वयस्क सगळे तुर्की सेहरान गुबारमुळे बंद घरांआड होते. शहरावरचं पिवळं आवरण विरून जायला पुढचे दोन दिवस लागले. हे सेहरान गुबार आफ्रिकेतल्या सहारावरून युरोपात, मग तिथून इस्तांबुलला आमचा माग काढत आलं जणू काही. मग पुन्हा बोस्फोरसवरून उलटा प्रवास करत कदाचित मूळ वसतीस्थानाकडे, सहारातच गेलं. आमचा माग काढत आलं म्हणायचं कारण इस्तांबुल शहरात यायच्या आधी ग्रीस हद्दीजवळच्या एफेसिस या उत्खनन झालेल्या शहरातल्या पुरातन प्राचीन रोमन रस्त्यांवर ही आकर्षक पिवळी धूळ पहिल्यांदा दिसली, तिचा रंग, पोत पाहून प्रेमातच पडायला झालं. तिथल्या हजारो वर्षांपूर्वीच्या आर्टेमिस देवळाचे शिल्लक दगडी अवशेष याच रंगाचे होते. त्यांच्या हळूहळू झिजत जाण्यातूनच ही धूळ निर्माण झाली होती का? यलो ऑकर, सेपिया.. पुरातन धुळीला हाच रंग असायला हवा. काळाची पुटं सुटी होत जाताना असाच रंग चढायला हवा त्यांना. 

पर्शियन मिनिएचर्समध्ये ही धुळीची वादळं दिसतात, कोन्याच्या दारवेशांच्या गिरक्यांमध्ये गुबाराचा गोलाकार घूमार आहे.

समकालीन तुर्की चित्रांमध्येही धूळ येतच राहते. मेलिहा सोजेरी या तरूण तुर्की स्त्री चित्रकाराने आपली एक संपूर्ण चित्रमालिका धूळ मध्यवर्ती ठेवून साकारली. ‘धूळ’ हा आपल्या अस्तित्त्वाचा मूलभूत भाग आहे, धुळीतूनच जग निर्माण होते, ही तिच्या चित्रांमधली मूळ संकल्पना. मात्र धुळीची जी वादळे एकेकाळी येत आणि विरून जात, तसं आता होत नाही. धूळ येते आणि राहते, आधुनिक जगातल्या प्रदुषणाचे ठसे या धुळीतून उमटतात, धुळीचे संदर्भ त्यामुळे बदलून गेले आहेत, हेही मेलिहा आपल्या त्यातून सांगते. 

धूळ बदलली आणि त्यामुळे धुळीचे संदर्भ बदलले हे खरंच आहे. आता भेटीला येणारी सिमेंट कॉन्क्रिटची, शहरी प्रदुषित धूळ कोणालच हविशी वाटत नाही, या धुळीशी कोण कसलं नातं जोडू शकणार? तरीही ती येतच रहाणार आहे. धुळीचं अस्तित्त्व या संदर्भातून का होईना, कालातीत बनवण्यात माणसाने कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. नुकताच हिमाचलमध्ये प्रवास केला, मशोबराला जाताना झिरकपूर धाब्यावर चहा प्यायला उतरलो आणि अंगावर सिमेंट कॉन्क्रिटच्या गुदमरवून टाकणाऱ्या धुळीचा लोट आला. तोंडावर आधीपासूनच मास्क होता त्यामुळे नाकातोंडात धूळ जायची वाचली, पण धुळीचे हे एकमेव वादळ ज्याने मी अंतर्बाह्य गुदमरून गेले, भेदरून गेले. नॅशनल हायवे पाच वर हिमालयन रोड प्रोजेक्ट जोरदार चालू होता, पहाडाचा एक भाग पूर्ण ढासळला होता आणि त्या उघड्या पडलेल्या पिवळ्या मातकट छेदामधून मातीचे लाखो कण रस्त्याकरता कॉन्क्रिट कालवणाऱ्या सिमेंटच्या धुळीत मिसळत होते. त्या पहाडाच्या पाठीमागे सूर्य मावळत होता, त्याच्या लालजर्द किरणांचा झोत चिरलेल्या पहाडाच्या जखमांवर पसरला होता, वेदना पाझरत होती. ही रक्ताळलेली, आक्रंदित धूळ एकेकाळी अस्पर्शित असलेल्या देवभूमीला आपल्या पायांखाली गेली काही शतके अमानुषपणे तुडवणाऱ्या आधुनिक मानवाची निर्मिती होती. चंदीगढ ते शिमला हा एकेकाळचा सर्वात सुंदर, निसर्गरम्य रस्ता म्हणून ओळखला जात होता, शिमला कला अकादमीच्या अनेक चित्रकारांनी पिढ्यान पिढ्या या रस्त्यावर हिमाचली पहाडांच्या सौंदर्याने नटलेली निसर्गचित्रे रंगवली, आज या रस्त्याचे हे बेरूप नजरेस पडले. चित्रकार सुधीर पटवर्धनांनी औद्योगिकीकरणानंतर बदललेल्या शहराची जशी बदलती लॅन्डस्केप्स रंगवली, तशी जर कोणा हिमाचली चित्रकाराला उद्या रंगवाविशी वाटली, तर त्याच्या चित्रांमध्ये काय असेल हे आज जिवंतपणे नजरेसमोर साकार झाले होते. शिमला-चंदीगढच्या काही स्थानिक, तरूण चित्रकारांनी ‘हीलिंग हिमालयाज’ नावाने ग्राफिटी चित्रांची मालिका याच रस्त्यावर जागोजागी रंगवायला सुरुवातही केली आहे. (इमेज)  आज रंगवलेली चित्रे उद्या लगेच धुळीच्या काळ्या थराखाली फिकट होतात हे या चित्रांचं आणि चित्रकाराचं दुर्दैव! आधुनिक काळात धुळीने रंगावर मिळवलेला हा विजय समजायचा का? 

भविष्यातील उद्याचा जो काही शिल्लक असलेला काळ आहे, त्यावर चिरंतन राज्य करण्याची, मानवी संस्कृतीला गोठवून, गाडून टाकण्याची क्षमता असलेली ही आजची अमर्त्य प्रदूषित धूळ. तिच्यातून नवं सृजन जन्माला येण्याची शक्यता कदाचित कायमची धुळीला मिळाली आहे.. धुळीशी नातं तुटू नये म्हणून, मातीशी जोडलं रहावं म्हणून फार नाही, काहीच दशकांपूर्वीचा हुसेनसारखा चित्रकार कायम अनवाणी राहिला, उद्याचा चित्रकार या धुळीशी कसलाही संपर्क येऊ नये म्हणून नाका-तोंडावर मास्क आणि अंगात चिलखत घालून वावरणार हे निश्चित.  

चित्र सौजन्य: www.himachalawatcher.com

शर्मिला फडके लेखक, कला-इतिहास अभ्यासक आहेत. ‘फोर सीझन्स’ ही पर्यावरण-कला-मानवी नातेसंबंधांचे चित्रण करणारी कादंबरी, कथा, लेख तसेच समकालीन तुर्की साहित्याचे अनुवाद त्यांच्या नावावर आहेत. त्या कला-इतिहास आणि कला-आस्वादाच्या कार्यशाळा घेतात. 

3 comments on “ये कौनसा गुबार है.. : शर्मिला फडके

    • Madhu

      Awesome is right! This author has found gold in dust at various locations.
      One minor and perhaps irrelevant point: the painter Paul Gauguin’s fraud and his own caricature of his wife has been proven to be totally wrong.

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *