शची जोशी

प्रवासातले पान: एक पत्र


back

प्रवासातले पान : एक पत्र  

प्रिय हाकारा, 

यावेळेस तू ‘प्रवास’ अशी हाक दिलीस आणि वाटलं नक्की लिहून काढू काही ना काही तरी आणि पाठवून देऊया. तीन एक वर्षानी अगदी खराखुरा विमान प्रवास करून दक्षिणेला बंगालच्या उपसागरच्या किनाऱ्यावर पोहोचले होते आणि सक्तीचे विलगीकरण पाळताना बहिणीच्या हातचे आयते खाणे-पिणे, घरकाम न करणे ही चंगळ असताना केवळ आणि केवळ लिखाण करणे हेच काय ते काम होते आणि तरीही अगदी साग्रसंगीत, जय्यत तयारीने लिहायला बसले तेव्हा नेमका प्रवासाच्या आधीच एखादा तांत्रिक बिघाड व्हावा तसे झाले आणि प्रवासाविषयी काय लिहावे यावरच गाडी अडली ती अडलीच पार! आवडतीने जाणून बुजून भरपूर मीठ घालावे आणि नावडतीने भीतीने अळणी स्वयंपाक शिजवावा आणि प्रचंड भूक असूनही उपाशीच राहावे तसे झाले. कविता – माझ्या हक्काची, आवडीची तिने जी पाठ फिरवली ती अजून परतली नाही आणि इतर प्रकारांत लिहून काढावे म्हटले तर कुठलाच प्रकार मनाला पटेना! आणि मग अशात एकदम स्टार्टर लागला आणि प्रवास सुरू झाला, या पत्राचा, तुझ्या हाकेला उत्तर देण्याचा .. 

पत्रांचा प्रवास मला नेहमीच भावतो, आजकाल सर्रास तक्रारवजा निरीक्षणाने किंवा तटस्थ विवेकाने सोशल मिडियावर व्यक्त होण्याच्या काळात एकमेकांशी हरवत चाललेल्या वाद – संवादाचा प्रवास पत्रातून नेहमीच सुखरूप पोहोचू शकतो, नाही का? लगेच प्रतिक्रिया देण्याची सोय नसण्याने वाचले जाते, त्यावर विचार होतो, आपल्याशीच आधी बोलून होते आणि मग समोरच्याशी जोडले जाण्याचा प्रवास उलट टपाली सुरू होतो. 

तसा, हा माझा तुझ्यापर्यंतचा प्रवास! तुला आठवतोय का ९ वीचा भौतिकशास्त्राचा वर्ग आणि त्यात शिकवलेले ‘Brownian Motion’? त्या सिद्धांतात शिकवयाचे कणांच्या हलचालींबद्दल – एक, दोन, तीन.. अनंत असे कण एकमेकांवर आपटतायत, दिशा बदलतायत, वेग पकडतायत, त्या कणांनी काहीही आखून रेखून न घेता केलेला स्वच्छंद वावर! तर हा सिद्धांत माझ्यात अगदी पुरेपूर भिनलाय असे म्हणायला हरकत नसावी! कारण तो शिकल्यापासून, मला लक्षात आले की अरे, हेच तर होतंयं की माझ्यातल्या किंवा आजूबाजूच्या कल्लोळात आणि शांततेत, दोन्हीतून सुरू असणारा विचारांचा एक उनाड भटका प्रवास – कधीही ठरवून न केलेला!

2D Random Walk 400×400.ogv; Author: Purpy Pupple

हाकारा आणि प्रवास दोन्ही शब्द एकाच ओळीत वाचले आणि पहिला थांबा झाला तो देवराईमधल्या चित्रपटाच्या शेवटाला येणाऱ्या कवितेपाशी – 

नाही हाकारा, पण उठले रान

घरटे समोर, सापडेना वाट

बेभान पाखरु, समजेना कोणा

का कल्लोळ कल्लोळ

का कल्लोळ कल्लोळ

जंगल जंगल, आक्रंदे पाखरू

खुषीतही

हलकेच त्याच्या, कानी कुजबूज

वाटसरू त्याला, दावे देवराई

देवराई चित्रपटातल्या ‘शेष’ या व्यक्तिरेखेचा प्रवास होता कल्लोळातून, काल्पनिक आणि वास्तवाच्या उंबरठ्यावरचा, आभास आणि वास्तव यातल्या फरकासहीत दोन्ही आहे तसे स्वीकारण्याचा! आणि माझा? आल्या दिवसाचा टोला परतावण्यापलीकडेही काही आहे आणि ते जे काही आहे ते माझ्यापुरत्या ‘काही’च्या शोधात इतरांनी ठरवून दिलेला जगण्याचा रस्ता सोडून माझा एकल प्रवास सुरू झाला होता कधीचाच, तो माझ्यातल्या कल्लोळाला भिडण्यासाठी, वास्तवाला समजून घेऊनही बरेचदा त्याचे काय करायचे हा प्रश्न सोडवण्यासाठी, कुठल्याही बाकीशिवायचे उत्तर गाठण्यासाठी, माझ्या उपयोगी येतो तो हा एकल प्रवास – हा प्रवास दोन मार्ग दाखवतो – उठायचे आणि चालू लागायचे तोपर्यंत जोपर्यंत कल्लोळातला गुंता सुटत नाही किंवा दुसरा मार्ग तो असा की वेसण घालून चुचकारून, गोंजारून, अंजारून, वेळ पडली तर धमकावून आपल्या हातात उपाय नसणाऱ्या गोष्टींनी अत्यंत क्लिष्ट प्रकारे विणून ठेवलेला कल्लोळ विचारांआड करायचा (तो सुटत नसतो आणि सोडून देता येत नसतो ही यातली बाकी – शेष!) आणि तो नाहीच असे समजून पुढे जात राहायचे! 

विचारांचा हा अप्पलपोटा प्रवास, ‘अमलताश’च्या संतांचा लंपन म्हणतो तसे “अगदी तंतोतंत – चौदाशे शेहचाळीस मार्गांचा!” एकाला कागदावर आणेतो दुसरा कुठल्या कुठे पळून जाऊ बघत असतो, आणि मग या सगळ्या चौखूर उंडारणाऱ्या विचारांचा कागदावर उमटवण्याचा प्रवास पूर्ण होईतो हॅरी पॉटरच्या जादुई दुनियेतल्या प्रोफेसर Snape सारखे सतत स्वतःला बजवावे लागते “भावनांना आवर घाल. मनाला शिस्त लाव.” विचार तरी कुठे मागे राहणारे? वेळेच्या गणिताला न जुमानता, क्षणात इथे – क्षणात भूतकाळात – क्षणात कपोलकल्पित भविष्यकाळात! हो-नाहीच्या लटक्या लहरींसारखे किंवा उद्ध्वस्त करणाऱ्या त्सुनामी लाटांसारखे, विचार क्षणात कुठल्या कुठे जाऊन पोहोचतात, आणि आपल्या हातात उरते त्यांच्यामागोमाग फरफटले जाणे किंवा त्यांच्या अनाकलनीय वेगावर काबू आणून त्यांना शब्दांच्या रांगेत मुकाट उभे करणे! आणि हे जमले तर कलाकृतीतून विचारांची अभिव्यक्ती मिरवायची – अजूनही जिवंत आहोत ही पावती मिळवायची, नाहीतर साचून राहायचे त्याच त्याच विचारांच्या चौकटीत, उबग आला की (आणि तो येतोच – आणि तो येण्याचीच वाट बघत असतो आपण अनेकदा) उधळून लावायची ही चौकट आणि ओढून घ्यायचे आसूड विचारांचे – कधी हव्याश्या – नकोश्या, कधी लादलेल्या – लादून घेतलेल्या, पण विचारांना सोबत ठेवायचे आणि भटकायचे, फरफटायचे सोबतीने – कारण मग कळतो तो  आपल्याच ‘विचारांतील स्थित्यंतरांचा प्रवास’ – आणि माझ्या मते हा प्रवास घडणे ही जिवंत असण्याची खरीखुरी खूण! 

विचारांना शब्दांत बांधून आणून घालेतो जी दमछाक होते ती एकदम निघून जाते जेव्हा कधी मधी एकाच शब्दाचा – आवाजाचा अनेक भाषांमधला साम्य दर्शवणारा प्रवास अचानक समोर उलगडला जातो आणि अगदी काहीच शब्दच नव्हते त्या काळापासून हा व्यक्त होण्याचा प्रवास सुरूच आहे की! प्रागैतिहासिक काळखंडाचा अभ्यास करणारे संशोधक जेव्हा शोध घेत जातात टप्प्याटप्प्याने उत्क्रांत होत गेलेल्या अवयवांचा, तंत्रांचा, समूहाचा तेव्हा शब्दांशिवाय जगणाऱ्या, व्यक्त होणाऱ्या मानवी प्रजातींच्या प्रवासाची सांगड निसर्गाशी किती घट्ट बांधली गेलीये ते समजते! मेंदूच्या विचार करू लागण्याच्या टप्प्यांमधला प्रवास हा लाखों वर्षांच्या काळाच्या मोजपट्टीवर बघताना आत्ताचे आपण किती अनावश्यक गोष्टींची पुटं विचारांवर चढवून बसलो आहोत हे दिसते. आपण ज्या शतकात आहोत ते शतक एकूणच मानवी अस्तित्वाच्या प्रवासाला कलाटणी देणारे असेल – विश्वाच्या उगमाचा शोध घेऊ पाहणारी, ‘बिग बँग’पर्यंतचा वेध घ्यायच्या प्रवासावर असणारी जेम्स वेब ही अवकाशातली दुर्बिण खरेतर माणसाच्या दुर्दम्य ध्येयाने अनंताला दिलेली एक हाक आहे आणि त्याच वेळी प्रगतीच्या असमान वेगाखाली सरसकट तुडवले जाताना, द्वेषाच्या राजकारणात सोलवटून निघताना, अनियंत्रित कट्टरतेचा, स्वार्थी धर्मांधतेचा बळी होताना, गटाने किंवा तटस्थ राहूनही आपण दुसऱ्याची सोडा पण स्वतःची तरी सुटका करू शकणार आहोत का? उत्क्रांतीच्या ह्या टप्प्यावर आपण अधोगतीचा प्रवास सुरू करू लागलोय की काय असा प्रश्न पडतो!

‘प्रवास’ या हाकेला प्रत्युत्तर देताना ते कवितेच्या रूपात येईल की कथेच्या की आणखी कशाच्या हा विचार केला नव्हता, लिहायला बसू आणि बघू शब्द कोणती रांग पकडतायत असा विचार केला, आणि Brownian Motion चा धडा गिरवलेले विचार सुटले कुठल्या कुठल्या प्रवासावर – वैयक्तिक आणि व्यावहारिक स्तरावर घडत असणाऱ्या काही घटनांची मध्ये मध्ये गिरमिट सुरूच होती, त्यांना दामटवून बाजूला ठेवत होते, तेव्हा बा . भं. च्या ओळी या प्रवासात सोबतीला आल्या कुठूनतरी आणि मला परत एकदा नव्याने त्याच ओळींमधून शांत करून गेल्या, तो या पत्राच्या निमित्ताने माझा जो प्रवास सुरू आहे त्यातला हा आणखी एक सुंदर थांबा ठरला – 

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?

जुने शब्द सुने होऊन वाजतात कसे बद्द निसूर?

दूरचे रंग, दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?

कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव?

रागरोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?

माझा ह्या ओळींच्या सोबतीने बऱ्याचदा झालेला प्रवास दरवेळेस आणखी थोडा जास्त समृद्ध करून जातोय! वयाच्या एका टप्प्यावर प्रचंड राग होता एकूणच ‘गोष्टी आहेत त्या अशा का आहेत?’ या मुद्द्यावर, तेव्हा ‘तोडून’ किंवा ‘सोडून’ टाकणे हा रस्ता भुरळ घालायचा, अजूनही घालतो! त्यावेळेस ‘दूर’ होण्यात ‘त्रास’ करून घेऊन आलेले शहाणपण असायचे, ‘बद्द निसुरतेत’ शब्दांना मौन घ्यायला लावायचे, पुढच्या प्रवासाची ओढ असायची आणि त्या अनोळखी रस्त्यावरचे ‘रंग-गंध’ यांनी वेधून घेतले की त्यांनीच वेढूनही जावे ही आस असायची, ती पुन्हा दूर होण्यातले शहाणपण येईपर्यंत! मग त्याच्या पुढच्या टप्प्यावर दूर होण्यातला त्रास होईनासा झाला, शहाणपणाची टाकी पूर्ण भरून घेऊनच नवा रस्ता पकडला जाऊ लागला, शब्दांना स्वतःला हवे तसे ऐकून घेता येण्याचे कसब गाठण्याचा यत्न सुरू झाला, रंग-गंध यांना बगल देऊन ‘एकट्या एकट्या’ जीवाची हौस पुरवणे सुरू झाले, राग सरला होता – इतरांवरचा, पण स्वतःवरती कीव काही आली नव्हती, स्वतःवरचा राग मात्र ओसरत नव्हता! आणि आज अनेक वर्षानी पुढचा टप्पा या ओळींनी गाठून दिला – ‘जवळची दूर’ होण्यात त्रास, दुःख न वाटता समजूतदारपणा दिसला – हे असेच घडायचे होते! ‘बद्द निसुरतेला’ शब्द कारणीभूत नाहीत हे जाणवले, रंग-गंध दूरचे असले तरी प्रत्येकवेळेस ते अनोळखीच असण्याची गरज नसते, ‘एकट्या एकट्या’ जीवाची हौस मागे सरून माझ्या म्हणून जमवलेल्या – सोडलेल्या सर्व गोष्टींशिवायचा एकटेपणा आकळला, कीव येण्यात कमीपणा न वाटता स्वतःला काहीएक सूट देता आली, आणि ह्या सगळयात ओळींच्या सोबतीने झालेल्या प्रवासात मिळालेला शांतपणा – अवर्णनीय! काही प्रवासांचे थांबे हे फक्त उपभोगायचे, त्यांना शब्दांत कोंडता येत नाहीत हेच खरे! 

याआधीही तू हवीशी नकोशी साचत जाणारी ‘धूळ’ आणि ‘अडथळा’ होऊन राहिलेल्या कृत्रिम, नैसर्गिक रचनेची हाक देऊ केलीस तेव्हा त्या दोन्हीच्या निमित्ताने सुरू झालेला माझा तुझ्यापर्यंत पोहोचायचा ‘प्रवास’ आज ह्या पत्रातून पूर्ण होतोय त्यामुळे खूप भारी वाटतेय! 

अशीच तुझी हाक जगाच्या कानाकोपऱ्यातला प्रवास करत माझ्यापर्यंत पोहोचत राहावी. अजून काय! 

हाकाराच्या प्रतिसादात, 

आणखी एक प्रवासी पक्षी 

ता. क. कुठल्याही प्रवासा इतकाच त्यात येणारा थांबाही तितकाच महत्त्वाचा असतो आणि त्या थांब्यानंतरचा पुन्हा सुरू होणारा प्रवासही! हाकाराचा हा थांबा तसाच – परत एकवार व्यक्त होण्याच्या माझ्या प्रवासाला उमेद देणारा आहे! 

श्रेयनिर्देश: 

‘कल्लोळ कल्लोळ’ कविता – देवराई चित्रपटातील अभिनेता श्री. अतुल कुलकर्णी यांची कविता 

‘अमलताश’मधील संत – कथाकार श्री. प्रकाश संत यांच्या घराचे नाव अमलताश आहे 

लंपन – प्रकाश संत यांच्या ललित लेखनातील मध्यवर्ती लहान मुलाची व्यक्तिरेखा 

बा. भ. – बा. भ. बोरकर, मराठी भाषेतील कवी व लेखक 

‘कळत जाते तसे’ कविता – बा. भ. बोरकर यांची एक कविता 

“भावनांना आवर घाल. मनाला शिस्त लाव.” – Professor Snape – J. K. Rowling या लेखिकेच्या जगप्रसिद्ध Harry Potter या कादंबरी-विश्वातील एक व्यक्तिरेखा आणि त्याच्या तोंडी असलेल्या “Control your emotions. Discipline your mind” या वाक्याचे मराठी भाषांतर 

Image credits: Abstract bokeh background, overlay particles by Elovich at Source Adobe Stock.

Gif Animation File – Title: 2D Random Walk 400×400.ogv; Author: Purpy Pupple https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/a/a9/2D_Random_Walk_400x400.ogv

शची जोशी – पुणे शहरात मुक्कामाला आलेलं सोलापूरकडचं रानवारं. वाचनाची आवड असल्याने शब्दांशी असलेलं मैत्र Shachi Says या पर्सनल ब्लॉगवर व्यक्त करते. वाचनाइतकीच भटकण्याची आवडही असल्याने सध्या ‘Mitrandir Journeys’ च्या माध्यमातून फिरस्तीचा अनुठा अनुभव वाटाड्यांसाठी तयार करून देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *