डॉ. संजय बोरुडे

चिवरवाट आणि इतर कविता



back

जळणे भाग आहे ..

खांडववनाला 
लावलेली आग
अजूनही ताजीच आहे
धनिकांची इंद्रप्रस्थे
वसवण्यासाठी 
झाडांना
कोणत्याही काळात
जळणे भाग आहे!

***

चिवरवाट 

नात्यांना गेलेला तडा 
नि काळा कचकचीत 
डाग घेऊन 
कसे जगायचे असते मित्रा? 

सोयीनुसार वाकणारी,
तत्वांचा 
पायपोस करणारी सखी
केव्हा देईल जहर 
याचा नेम नसतो दोस्ता.. 

कुठलीच पूजा देत नाही 
कोणतेच फळ 
नि बेवारशी प्रार्थना 
नेहमीच लुटल्या जातात..


सत्य असते 
क्रूर एकाकीपण आणि 
करकरीत जगण्याचा 
सुनसान आलेख.. 

म्हणूनच कोणाही 
सिद्धार्थाला
अटळच असते 
यशोधरेकडे 
भिक्षा मागणे !

त्याच्या तारुण्याचा 
बळी देऊनच त्याला 
तुडवावी लागते 
दु :खशोधाची 
चि व र वा ट !   

***

आईना 

कोंडयाचा केला मांडा 
निजंला ठिवला धोंडा
काळजाच्या गं बोंडाला 
हयो काळजीचा गोंडा..  

खारया पाण्याची गं वाट 
तुळशीच्या दिव्याला 
तळतळीचा शाप
देव्हाऱ्याच्या देवाला

सारवल्या भितीत
रडंतो रोज आईना 
जिवाची झाली दैना 
घरात दुख माईना

देह झाला पंढरपूर 
डोळ्याला चंद्रभागा 
तुक्याच्या अभंगाला 
देईना विठू जागा..!  

***

सत्यासंबंधी दोन उद्गार.. 

मित्रहो,
केसांनी गळा कापल्याच्या 
कहाण्या 
अजूनही धुगधुगताहेत 
कोपऱ्यातल्या 
विश्वासाच्या चुलीत.. 

युक्तिवाद कितीही 
मधुर असले तरी 
तुम्ही उतरतच जाता 
मनातून बेहाल.. 
भावनांचा फेसाळ समुद्र 
आणला जरी पापण्यांआड
तरी जखमी स्वप्नांवर
जिभेने लावलेली मिठागरे
तोडत राहतात
सर्जनाचे गगनचुंबी महाल.. 

वास्तव समजून घ्या, राजेहो 
एकटाच येतो माणूस आणि 
एकटाच जातो.. 
स्तनांचा कर देताना 
मरून पडलेल्या 
नांगेलच्या चितेत 
उडी घेणारा तिचा नवरा 
कैद दंतकथेत..

इथे चलनालाच परमेश्वर
समजणारी 
उगवली आहे नवी दुनिया.. 
नाही म्हटलं तरी 
घरातच सापडतो एखादा 
हाडाचा बनिया.. 

सत्य नसते कोलांटउडया
किंवा या बोटांवरची थुंकी 
त्या  बोटांवर करण्याची चलाखी.. 
आपली नसनस ओळखणारा 
नसतो इतका गाजरपारखी.. 

सत्यासाठी विषाचा प्याला 
प्यावाच लागतो 
कुठल्याही सॉक्रेटिसला.. 
तेव्हा कुठे पुढच्या कैक पिढ्या 
मागत राहतात माफीनामे.. 

इतक्या वर्षांच्या उत्क्रांतीनंतरही 
सॉक्रेटिसच्या मागे जाणारा,
सत्तेला जाब विचारणारा अनुयायी 
नाही कमावता आला.. 
शेवटी फुकटच गेला 
तो 
विषाचा प्याला.. !

***           


जिवा चंदनाची बाधा 

पुन्हा आली हाक त्यांची 
चला दहीहंडी फोडू.. 
सवंगडी जमा झाले 
चला, काढा पुन्हा चेंडू .. 

यमुनेच्या तीरावर 
पुन्हा कदंब हसला..
डोहामध्ये कालियाच्या
पुन्हा तरंग उठला.. 

थबकल्या गवळणी 
गाई गुरे हंबरली ..
यशोदेच्या घरामध्ये 
पुन्हा वाजली मुरली.. 

पुन्हा  जागले गोकुळ
शोधी कन्हैयाला राधा.. 
येतं वेणूचा गं नाद 
जिवा चंदनाची बाधा..! 

***

डॉ. संजय बोरुडे हे सर्जनशील लेखक, कवी, अनुवादक आणि इतिहास अभ्यासक आहेत. त्यांचे दोन कवितासंग्रह, कथासंग्रह, अनुवाद, समीक्षा-लेखन तसेच इतिहासासंबंधी पुस्तके प्रकाशित झाली आहे. त्यांना भाऊसाहेब शिंगाडे (वर्धा), पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील ( प्रवरानगर), ना.घ.देशपांडे (मेहेकर) असे काही .पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा इंग्रजी कवितासंग्रह पॅरिज (पेंग्विन आणि रँडम हाऊस संयुक्त) कडून प्रकाशित झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *