रंगनाथ पठारे

सातपाटील कुलवृत्तांत



back

श्रीपती

आधी काळ सांगतो. कारण गोष्टी काळात घडत असतात. माणसांचं आयुष्य सामान्यतः ज्या वेगात वाहतं, त्या वेगाच्या नजरेत काळ हा स्थळापासून सुटा, स्वतंत्र आणि सार्वभौम म्हणता येईल असा असतो. त्याच्यावर भूमीचा अधिकार चालत नाही, या अर्थाने तो सार्वभौम. तो त्याच्या मर्जीनेच फक्त वाहतो. गोष्टीला स्थळही आवश्यकच असतं. स्थळ आणि काळ यांच्या चार मितींच्या अवकाशात गोष्ट घडत असते. स्थळाच्या तीन मिती आणि काळाची एक. तरीही, गोष्टीला नियत करण्यात ही काळाची मिती सर्वात प्रमाथी. म्हणून आधी काळ सांगतो.

१२८९ मध्ये अल्लाउद्दिन खिलजी याने पैठणवर स्वारी केली होती. तोवर रामदेवराव जाधव दक्षिणापंथाचा सम्राट होता. पण त्याची राजवट आधीच खिळखिळी झाली होती. स्वतः रामदेवराव लढवय्या नव्हता आणि राजकारणाचा वकूब त्याच्याकडे कमीच होता. भरीत भर म्हणून तो लंपट देखील होता. त्याच्या आधी महादेव जाधवाच्या काळातच प्रधान हेमाद्री उर्फ हेमाडपंत याने ‘चतुर्वर्गचिंतामणी’ नावाचा ग्रंथ रचला होता. त्यामुळे व्रते, उद्यापने यांचा सुळसुळाट झालेला होता. त्याचा उपद्रव ब्राह्मणेतर जनसामान्यांस अतोनात होऊ लागला होता. रामदेवराव जाधवाच्या कारकिर्दीत हा प्रक्षोभ फार वाढीला लागला होता. महानुभाव चक्रधर यांनी अशा गोष्टी फोलकट असल्याचे प्रतिपादन केले. त्याला प्रचंड प्रतिसाद सामान्य माणसांनी दिला. अनेक राजस्त्रिया सुद्धा स्वेच्छेने उघड वा गुप्तपणे चक्रधरस्वामींच्या शिष्या झाल्या. देवतांच्या अर्चनेने मिळणारे पुण्य दुय्यम दर्जाचे आहे. त्याची गरजच नाही. तुम्ही मला अनुसरा. असे त्यांचे म्हणणे होते. ते लोकांना सोपे वाटे आणि पटे. परिणामी अनेकांनी देवळांमधील रुद्रलिंगे उपटून फेकली. या अधर्म्य कृत्यांचे खापर ब्राह्मणांनी राजावर फोडले. त्याचा राग येऊन रामदेवराव जाधवाने अनेक ब्राह्मणांस ठार केले. याचा परिणाम म्हणून अनेक सनातनधर्मी क्षत्रिय राजापासून फुटून निघाले. ब्राह्मण तर राजाच्या विरुद्ध होतेच. हरिहरादी देव रामदेवावर कोपले आणि वसिष्टादि गुरूंनी त्याच्या दरबाराचा त्याग केला. पिढीजात क्षत्रिय आणि ब्राह्मण यांनी असा बहिष्कार टाकल्यावर रामदेवरावाने पातेणे उर्फ पाठारे जातीचे लोक आणि पळशे ब्राह्मण यांच्या सहाय्याने राज्यशकट कसाबसा चालू ठेवला. पातेणे हे जातीने जरी क्षत्रिय होते तरी धंद्याने प्रत्येनस् व प्रतिहारी म्हणजे पोलीस व रखवालदार होते. उच्च सेनापतित्व करण्याचे कसब त्यांना नवीन होते. पळशे ब्राह्मण हे पलाश ब्राह्मण. मगध देशचे. परके. त्यांची मुळे इथे रुजलेली नव्हती. एकूणात तो तो धंदा करण्यास अपात्र अशा लोकांना सोबत घेऊन रामदेव राज्य करत होता. राजयंत्र खिळखिळे झालेले होते. मांडलिक सम्राटाला किंमत देईनासे झाले होते. १२८९ मध्ये अल्लाउद्दिन खिलजी याने पैठणवर स्वारी केली त्यावेळी अशी परिस्थिती होती. या स्वारीत रामदेवराव आणि त्याचे पातेणे सरदार यांचा पराभव झाला. जबर खंडणी घेऊन अल्लाउद्दिन परत गेला. यानंतर सहा वर्षांनी म्हणजे १२९५ मध्ये अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर दुसरी स्वारी केली. तोवर रामदेवाचे राजयंत्र आणखी जास्त खिळखिळे झालेले होते. म्हणून अल्लाउद्दिनाने, यावेळी दाती तृण धरून शरण यावे अशा अर्थाची पत्रे किल्ल्यात पाठवली. त्यास रामदेवाने जुमानले नाही. युद्ध झाले. त्यात हसन आणि हुसेन हे खिलजीचे पुत्र कामी आले. तरीही अंततः तो विजयी झाला आणि चिकार लूट आणि खंडणी घेऊन परतला. यानंतर रामदेव केवळ नामधारी उरला. खिलजीने त्याचा नूर इतका उतरविला की तो स्वतःच करभार देणारा शूद्र मांडलिक म्हणून केवळ उरला होता. अल्लाउद्दिनाची ही देवगिरीवरची दुसरी स्वारी होण्याच्या आधी साधारण एक वर्ष म्हणजे साधारणतः १२९४ च्या सुमाराला रामदेवाचा एक पुत्र बिंबदेव जाधव याने त्याच्या काही पातेणे सरदारांसह कोकणात मोठी सेना पाठविली होती. रामदेवराव यास एकूण पुत्र चार. थोरल्या शंकरदेव याची स्थापना त्याने प्रतिष्ठान उर्फ पैठण येथे केली होती. दुसरा केशवदेव देवगिरीस होता. तिसरा बिंबदेव हा उदगीर प्रांती होता. आणि सगळ्यात धाकटा प्रतापशा अलंदपूरपाटण येथे हेमाडपंत याच्यासह होता. राज्याची या प्रकारे घडी बसवून स्वतः रामदेव आलटून पालटून पैठण आणि देवगिरी येथे असे. या साऱ्या व्यवस्थेच्या अल्लाउद्दिन खिलजीने चिंधड्या उडविल्या होत्या. कारण ही व्यवस्थाच मुळात अनुभवी योद्धे आणि शासक यांच्या अभावात पळसे आणि पातेणे यांच्या फोलकट आधारावर उभी होती. या पार्श्वभूमीवर बिंबदेव जाधव हा चलाख आणि प्रतिभावानच म्हटला पाहिजे. अल्लाउद्दिन खिलजीची पैठणवरील स्वारी त्याने अनुभवली होती. ती अखेरची असणार नाही हे त्याला कळले होते. आपल्या पित्याच्या राजयंत्राचा त्याच्यापुढे टिकाव लागणार नाही याचाही अंदाज त्याला आला असेल. आपल्याला स्वतःसाठी आणि शक्य झाल्यास देवगिरीच्या रक्षणासाठी सुद्धा अधिक स्पेसकॅलक्युलेटेड रिट्रीट साठी का होईनाआवश्यक आहे, हे त्याने जाणले असेल. कोकणातील शिलाहारांची सत्ता खिळखिळी झाल्याचा अहवाल त्याने घेतला असेल. तिथले बाकीचे रांगडे लोक आपल्या युद्धाचा फारसा अनुभव नसलेल्या सैन्यासमोर देखील टिकाव धरू शकणार नाहीत, हे त्याला जाणवले असेल. किंवा कदाचित खिलजीने पराभूत केलेल्या रामदेव जाधवाची सुद्धा ती चाल असेल. अल्लाउद्दिनाने देवगिरीवर चाल केली तेव्हा बिंबदेव उदगीरास होता. तिथून त्याने गुजरातेच्या बाजूने स्वारी करून सालेरमोलेर, नंदुरबार, वडानगरपर्यंत चाल करून ठाणेकोकणात प्रवेश केला. गुजरातेत जाऊन देवगिरीवर चालून आलेल्या खिलजीस गुजरातेतून माळव्याच्या बाजूने पायबंद देण्याचा बिंबदेवाचा हेतू असावा. त्याचा हा डाव ओळखून खिलजी देवागिरीहून चपळतेने निघाला आणि त्याने आपला रस्ता बदलला. त्यामुळे माळव्याकडे जाण्याचे रहित करून बिंबदेव ठाणेकोकणात घुसला. तिथे नागरशाचा पुत्र त्रिपुरकुमुर यास खाली रेटून १२९६ मध्ये माहीम येथे राजधानी करून बिंबदेवाने आपल्या पातेणे सरदारांची माहीम बेटात स्थापना केली. तिथे बिंबदेवाने नऊ वर्षे राज्य केले. बिंबदेवाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र प्रतापशा जाधव गादीवर आला. सुमारे ३७ वर्षे जाधवांचे राज्य कोकणप्रांती होते. नागरशा आणि त्याचे पुत्र त्रिपुरकुमुर व केशवदेव यांनी ते १३३३ मध्ये संपवले. तिकडे रामदेवराव जाधव १३११ त वारला. खिलजी याने १३१९ मध्ये देवगिरीची सद्दी कायमची संपवली.

हे सगळे इतिहासाच्या दप्तरात सटीक उपलब्ध आहे. आपल्या कथेसाठीचा काळ अल्लाउद्दिनाच्या पैठणवरील स्वारीच्या आगेमागे म्हणजे १२८९ च्या सुमाराला सुरू होतो. आणि तो बिंबदेव जाधव याची माहीम येथे स्थापना झाल्यानंतर म्हणजे १२९६ नंतर काहीसा रेंगाळत संपतो. आपल्या कथेचा नायक आहे, शिरपती. तो पातेणा, पैठणजवळच्या डोंगरकिनी नामक गावात राहणारा. आपण पातेणे किंवा पाठारे आहोत ते त्याला माहीत नाहीय. त्या गावात सगळेच पातेणे. उरलेले लोहार, सुतार, कुंभार, चांभार असे काही लोक. गावाची स्थापनाच मुळी एका पातेण्याने केलेली. जात म्हणून वेगळी माहिती असण्याची गरजच तितकी नव्हती. त्याच्या गावातून तो दुसऱ्यांदा बाहेर पडला तेव्हा त्याला ते एका किरवंताकडून योगायोगाने समजले. पहिल्यांदा तो घोडेस्वार होऊन बाहेर पडला ते अल्लाउद्दिन खिलजीच्या पैठणवरील स्वारीत, खिलजीच्या बाजूने लढण्यासाठी. लढाईला जा, लूट घेऊन ये असे त्याच्या बापाने त्याला बजावून बजावून सांगितले म्हणून. दुसऱ्यांदा तो बाहेर पडला ते काही दिवसांनी पैठण नगरी पाहण्यासाठी. तिसऱ्यांदा मात्र तो कायमसाठीच बाहेर पडला. चारदोन रोजांसाठी डोंगरकिनीला आलागेला असेलही कदाचित, पण त्याचे कायमचे राहण्याचे ठिकाण किंवा त्याचे एकूण सगळे जगणेच बदलले. शिरपतीच्या जगण्याच्या गोष्टीसाठी स्थळकाळाचा इतका अवकाश पुरेसा आहे.

:१:

शिरपती चार-चौघांसारखाच होता. म्हटलं तर थोडासा वेगळा. दोन-तीनशे वस्तीच्या लहान गावात राहणारी माणसं एकमेकांपेक्षा कितीशी वेगळी असणार? कळत्या वयाचा होण्याच्या किती तरी आधीपासून तो मेंडका म्हणजे मेंढपाळ होता. त्यांच्या सहवासातच त्याचा अधिकांश वेळ जात असे. तसं चार-चौघांसारखं त्याचं लग्न सुद्धा झालेलं होतं आणि त्याला एक तीन-चार वर्षे वयाचा मुलगा सुद्धा होता. ते असतंच. त्यात वेगळं ते काय? पण शिरपती अंगयष्टीने रगदार होता, अत्यंत बळकट होता. अर्थात त्याचीही त्याला खास अशी जाणीव नव्हती. म्हणजे असं की तरुण वयात रग ही असतेच. आणि बालपणीपासून मेंढीच्या दुधाचा अंतर्भाव त्याच्या खाण्यात स्वाभाविकपणेच होता. ते दूध गोडसर आणि एडक्यासारखी ताकद देणारं असतंच. पचविण्याची क्षमता तेवढी हवी. त्याच्यात ती परंपरेनं आलेली होती. दुपारच्या जेवणाला नुसती भाकरी असली की त्याचं भागे. सोबतीला दुभत्या मेंढीचं ताजं दूध नेहमीच मुबलक उपलब्ध असे. दूध काढायच्या तांब्यातच भाकरी कुस्करायची आणि तयार झालेला मऊ काला आनंदाने ओरपायचा. ब्रम्हानंदच केवळ! भाकरी नसेल तर नुसत्या दुधावर काम चालून जात असे. दूध काढण्यासाठी भांडे नसले तर तो सरळ मेंढीच्या कुशीत शिरून तिच्या सडांना तोंड लावत असे. अशा रीतीने तो दुग्धपान करत असताना त्याच्या मेंढ्या सुद्धा आनंदाने शांत उभ्या राहत असत. त्याच्या आणि त्यांच्यामधल्या नात्यात ही प्रौढ समज नेहमीच होती. त्यांच्या कोवळ्या कोकरांना शिरपती ज्या प्रेमाने हातांनी धरून आपल्या छातीशी घेत असे, गोंजारत असे, ते त्या मेंढ्यांच्या वत्सल नजरेतून सुटण्याजोगे नसे. त्यांना बोलता येत नसले तरी त्याच्या तोंडातून निघणाऱ्या आवाजाचा अर्थ लावण्यात त्या वाकबगार होत्या. त्यांच्यासोबत त्याला करमे. त्यांना सोडून राहण्याची वेळ सहसा त्याच्यावर आलेली नव्हती. एकदा फक्त दिल्ली नावाच्या त्याने न पाहिलेल्या, न ऐकलेल्या गावाचा एक राजा अलोदिन खिलची म्हणून होता, तो पैठणच्या राज्यावर चढाई करण्यासाठी आला असताना त्याच्या बापाने त्याच्यासाठी घोडा पैदा करून देऊन त्याला लढाईवर पाठवले होते. अलोदिन खिलचीच्या बाजूने लढण्यासाठी. त्यात त्याचे काही महिने व्यर्थ गेले. तलवारबाजी, दांडपट्टा चालविणे, भालाफेक करणे या गोष्टी खेळाचा भागच असत संध्याकाळच्या. लेजीम खेळणे जसे नैसर्गिक तशाच या गोष्टी. पण लढाईची भानगड त्याला तितकी आवडली नव्हती. माणसांचं माणसांशी काहीही वैर नसताना, अगदी ओळखदेख नसताना असं एकमेकांवर चालून जायचं आणि मारायचं हा खेळ त्याला मंजूर नव्हता. आणि लुटालूट तर बिलकूल नामंजूर होती त्याला. त्या घाबरलेल्या बाया, लहानी मुलं; त्या तशा मनाला विव्हल करणाऱ्या हवेत कोणाचं काही लुटायचं हे त्याला महाभयंकर वाटलं होतं. तिथं एके ठिकाणी बाईवर बळजोरी करणाऱ्या त्याच्या बाजूच्या पुरुषाला त्यानं चांगलंच बदडून काढलं होतं. घरी परतला तेव्हा त्यानं काहीच लूट आणलेली नाही, हे त्याच्या बापाच्या लक्षात आलं आणि बापानं त्याला बदडून काढलं होतं. तेव्हाच, याच्यानंतर कधीही लढाईला जायचं नाही असं शिरपतीनं मनातल्या मनात ठरवून टाकलं होतं. त्याच्या बापाच्या नजरेत सारं सरळ होतं. लूट आणायची नाही तर लढाईला जाण्यात काय मतलब? तिथं जायचं म्हणजे एकतर लढता लढता मरायचं किंवा लूट घेऊन परतायचं, असं ठरलेलं असतंय. बापानं हे त्याला बजावून बजावून सांगितलेलं होतं. तरीही शिरपतीला ते जमलं नाही. त्याच्या बापानंच मुळात ठरवून टाकलं की अशा नादान मुलाला पुन्हा लढाईला पाठवायचं नाही. अशा आतबट्ट्याच्या व्यवहाराचा काय उपयोग? घोड्याची खर्ची सुद्धा अंगावर आली, याला काय म्हणायचं? मेला असता एकवेळ तर खास काही बिघडलं नसतं. त्याच्या बापाचा वसबूड थोडाच झाला असता? वसबूड म्हणजे वंशाचं संपणं. तो नसता झाला. त्याच्या बापाला आणखी मुलं होती. आणि आणखी होण्याची संधी सुद्धा सहज होती. शिरपतीचा वेल सुद्धा त्याच्या मुलाच्या रूपाने होताच. हिशेब साधा होता : तो मेला असता तर खास काय बिघडलं नसतं. पण मिळकतच आणायची नाही याला काय अर्थ? शिरपतीला हा साधा हिशेब समजला नव्हता .त्याच्या ही साधी गोष्ट लक्षात आली नव्हती. तो मनाने एखाद्या एडक्यासारखा सरळमार्गी, आदबशीर आणि शांत स्वभावाचा होता. त्याला त्याच्या बापाचा तरी काय इलाज? त्याच्या या अशा स्वभावामुळेच त्याची पुढच्या काळात एडके नावाच्या उदगीरच्या बिंबदेव राजाच्या एका सरदाराच्या हाताखालील दुसऱ्या ओळीतल्या मानकऱ्याशी भेट झाली आणि त्याचं आयुष्य बदललं असं सुद्धा म्हणता येईल. अर्थात शिरपतीचा एडक्यासारखा स्वभाव आणि मानकऱ्याचं आडनाव यात अतर्क्य योगायोगाखेरीज दुसरं नातं सांगता येणार नाही.

ज्या गावात शिरपती राहात होता, ते गाव राजाच्या राजधानीपासून म्हणजे पैठणपासून सत्तावीस योजने दूर होतं. त्या काळाच्या हिशेबानं हे अंतर काही कमी नव्हतं. आणि डोंगराळ मुलुखात होतं हे गाव. कमी पावसाचं. मेंढ्या पाळणं हाच सगळ्यात किफायतशीर धंदा होता. बाकी शेती जमेल तशी. आणि लढाया होत तेव्हा काही लूट आणता आली तर नशीब फळफळण्याची संधी देखील असे. पुष्कळ तरुण मुली राजधानीच्या नगरात मानकरी लोकांच्या घरी कुणबिणी म्हणून काम करत. त्यातल्या काही पैका घेऊन गावी परतत आणि लग्न-याव करत सुद्धा. पण त्यांच्या कुटुंबांना प्रतिष्ठा नसे. त्यांना दासी-बटक्यांची अवलाद म्हणून ओळखलं जाई. पण पैक्याच्या जोरावर ही अवलाद काही काळातच बाकी सगळ्यात सोयीस्करपणे मिसळून जात असे. अर्थात कुणबीण म्हणून काम करणाऱ्या मुलीच सहसा परतत नसत. नगरातील मानकऱ्यांच्या घरातलं सुखोप्याचं जिणं सोडून कोण कशासाठी गावात माती खायला येणार? गावाचं नाव डोंगरकिनी. लढाईचा तो महिन्या-दोन महिन्यांचा काळ वगळला तर शिरपतीचं जन्मापासूनचं सारं आयुष्य याच गावात सुखासमाधानात साजरं झालेलं होतं. मेंढ्यांच्या सहवासातच जगण्याचा आनंद शोधणाऱ्या त्या सरळमार्गी माणसाची जगण्यापासून आणखी कसलीही अपेक्षाच नव्हती. तो अगदी सुखी होता. एखाद्या दणकट एडक्यासारखा नैसर्गिकपणेच सुखी होता. त्याची बायको यमी ही त्याच गावातली होती. शहाणी होण्याच्या आतच तिचं शिरपतीशी लग्न झालं होतं आणि तशाच स्थितीत त्याच्या शय्येत तिला जावं लागलं होतं. त्याविषयी तिची तक्रार अजिबात नव्हती. तसा रिवाजच होता. तिचा शिरपतीवर खूप जीव होता. पण तो शब्दात व्यक्त करण्याची संधी तिला नव्हती. कधी व्यक्त करणार? भेट फक्त शय्येत. तिथं शब्दाविण संवाद. तरीही त्या संवादातून ती तिला जे व्यक्त करायचं ते करत असे. आणि ते त्याच्यापर्यंत पोहोचत देखील असे. शय्या जवळपास रोजचीच असे. पण एक मुलगा होऊन चार वर्षे लोटली तरी तिला दिवस गेलेले नव्हते. एकूण सगळ्या तरुण आणि प्रौढ बाया दीड-दोन वर्षांच्या अंतराने बिनचूक बाळंत होत असताना हिला मात्र काहीही होत नव्हते. अर्थात त्याविषयी कोणाची तक्रार सुद्धा नव्हती. बाईचा पाळणा जितका लांबचा तितकी तिची संतती रगदार निपजणार असा संकेत रूढ होता. ‘कशी मेंढीवानी रगील ह्ये रांड’, तिची सासू कौतुकाने म्हणत असे. खरं तर ती या तिच्या सासूसारखीच होती. सासूचा स्वतःचा पाळणा तरुण वयात सहा वर्षांचा होता. नंतर तो पाच, चार असा बारीक होत गेला होता. वय वाढलं की रग कमी होत जाते, त्याचा परिणाम. तरीही तिला चार मुलं झालेली होती. त्यातलं एकही दगावलेलं नव्हतं. शिरपती थोरला. धाकटे दोन भाऊ. आणि सगळ्यात धाकटी एक लेक होती. यात आणखी भर पडण्याची मजबूत शक्यता होतीच होती. यमी खरोखरच एखाद्या मेंढीसारखी बळकट आणि आज्ञाधारक होती. शब्दांचा निष्कारण व्यय तिच्या स्वभावात नव्हता. नाही म्हणणे तिला माहीत नव्हते. एखाद्या सुनेच्या ठिकाणी यापेक्षा आणखी काय हवे?

गावात सगळेच कुणबी. कुणबिक हीच वहिवाट होती. जोडीला गाया, मेंढ्या पाळायचा रिवाज होता. सुतार, लोहार, कुंभार, चांभार, न्हावी यांसारख्या जातींची गरजेपुरती वस्ती होती. शेतीला पूरक आणि शेतकऱ्यांच्या जीवनव्यवहारासाठी गरजेचे ते ते होते. साळी, कोष्टी नव्हते. आपल्या घोंगड्या आणि वाकळी शेतकऱ्यांनी स्वतःच विणायच्या, असा रिवाज होता. लंगोटी आणि कोपरी असा पोशाख. त्यासाठीचे कापड कोणत्या तरी दुसऱ्या साळी-कोष्ट्यांच्या गावातून आणावे लागे. मुंडासी असत. पायात खेटरं घालायचा रिवाज होता. आणि या सगळ्या वस्तू फाटून चिरगुटाच्या अवस्थेला पोहोचल्यावर सुद्धा शिवून, सांदून वापरल्या जात. कारण त्यांची दुर्मिळता आणि त्यांचं महाग असणं. वर्षातून एकदा करवसुलीसाठी कोणी तरी जाडा, शेंडी राखलेला माणूस येत असे. त्याचा पोशाख वेगळा असे. डोक्यावर पगडी, ओठांवर झुबकेदार मिशा, कानात सोन्याची भिकबाळी, अंगात बाराबंदी आणि कमरेला धोतर. खेरीज अंगावर सोडलेले मोकळे उपरणे सुद्धा असे. त्याची खेटरं मऊसूत आणि भरपूर तेल दिलेली चमकदार असत. तो भरपूर माल- धान्य, तेल, डाळी, कठान-निठान असे गाड्यांवर लादून घेऊन जात असे. तो मानकरी यांचा माणूस आहे, अशी दबल्या आवाजात चर्चा असे. मानकरी हे गावचे मालक. अशा अनेक गावांचे ते मालक होते. त्यांना कुणीही पाहिलेले नव्हते. पाटलांनी कदाचित पाहिलेले असेल. त्यांच्या त्या माणसासमोर अगदी लवून वागायचा रिवाज होता. पाटील जिथं त्याच्या समोर कराकरा लवत असे, तिथं बाकीच्यांचा प्रश्नच नव्हता. पुरेसा कर भरला नाही की त्या जाड्या शेंडीवाल्याचे पित्त खवळत असे. एकदा अशाच एका कर देऊ शकत नसलेल्या कुणब्याला त्याने सर्वांसमक्ष चाबकाने फोडून काढले होते. कुणब्याची पाठ रक्ताळली होती. आणि ते करता करता घामाघूम होऊन चक्कर येऊन तो जाडा शेंडीवाला खाली पडला असताना मार खाणाऱ्या कुणब्याने आदबीने त्याच्या जवळ जात त्याला उठवले आणि त्याचा दूर पडलेला चाबूक त्याच्या हाती दिला होता. आणि स्वतः आधी जसा जमिनीवर पालथा झोपलेला होता तसा पुन्हा मार खाण्याच्या बेताने झोपला होता. हे असे कसे असू शकते किंवा कधीही न दिसणारा आणि वावरात न राबणारा एखादा माणूस मालक कसा असू शकतो, मानकरी कसा होतो, असे प्रश्न शिरपतीच्या मनाला कधी शिवले सुद्धा नव्हते. जन्मणे, जगणे, शेतात राबणे किंवा मेंढ्या वळणे जसे नैसर्गिक तसेच हे त्याच्यासाठी होते.

अलोदिन खिलचीच्या बाजूने लढण्यासाठी शिरपती जेव्हा पैठण नगरीत शिरला तेव्हा मात्र त्याला आश्चर्याचे अनेक धक्के बसले होते. आयुष्यात पहिल्यांदा तो एक नगरी बघत होता. तिथं रामदेव नावाचा कोणी तरी खूप मालदार राजा राहत आहे, अशी आधीच खिलचीच्या सैन्यात चर्चा होती. तिथं दाबजोर लूट तर मिळेलच, पण तिथल्या बायाही फार नामांकित असल्याची बोलवा होती. त्या कशाही असल्या तरी त्याचं काय असा प्रश्न शिरपतीला पडला होता. पण तो त्यानं मनात ठेवला होता. खेरीज काही काही लोक फार वेगळ्याच न कळणाऱ्या भाषेत बोलत असल्याचं त्याला जाणवलं होतं. त्या परक्या मुलखातल्या दिल्लीकडच्या लोकांची भाषा वेगळी आहे असं एक जण म्हणाला, ते त्याला पटलं होतं. शिरपती पैठण नगरीजवळ आला तेव्हा त्याला आधी तिथली तटबंदी दिसली. ती अत्यंत भव्य आणि त्याने कधीही न पाहिलेली होती. आतली घरं एकेक अगदी सुंदर मजल्या-मजल्यांची, रंगवलेल्या भिंती, मोठाल्या खिडक्या, नक्षीचे दरवाजे, प्रशस्त ओटे, रुंद रस्ते, दिव्यांचे खांब, देवालये, दीपमाळा, उद्याने. आणि माणसे, हत्ती, तलवारी, सगळे चमकदार. त्याला वाटलं, हे देवांनी स्वतःसाठी बांधलेले नगर आहे. कारण एका फिरस्त्याने देवनगरीचे केलेले वर्णन त्याने ऐकलेले होते. अर्थात ते तसे नाही हे त्याला लगेच कळले होते. देवांनी जगावं तशा वैभवात जगणारी ती तुपट अंगांची माणसं फारच फुसकी होती. इतक्या उत्तम स्थितीत राहणारी ती माणसं अगदीच भेकड होती. त्यांना शस्त्रं चालवता येत नव्हती. ज्या काहींना ते जमत होते, त्यांचा सहज पाडाव झाला होता. ते मारले गेले होते किंवा पळून गेले होते. खिलचीच्या सैन्यातले काही मेले होते. पण त्याचा विजय झाला होता. रामदेव राजा शरण आला होता. सोने-नाणे, जड-जवाहीर अशी प्रचंड लूट आणि खंडणी खिलचीला मिळाली होती. खेरीज त्याच्या सैन्यानेही भरपूर लूट केली होती. रस्त्याने येताना आसपासच्या खेड्यात लुटालूट करायची नाही अशी खिलचीची सक्त ताकीद होती. पण तिथे, त्या पराभूत नगरीत त्याने आपल्या सैन्याला मोकळे सोडले होते. तिथं उडालेला हाहाःकार, आया-बायांचं किंचाळणं, त्यांची काढली गेलेली धिंड, घरात घुसून केले गेलेले बलात्कार या सगळ्यांमुळं शिरपती मनानं लढण्याला विटला होता. तिथून तो परतला तेव्हा मनात आधी तो हाहाःकार जास्त राहिला. खेरीज त्या नगरीचं वैभवही राहिलं. म्हणूनच पुन्हा एकदा तो पैठण नगरीस गेला होता. पुन्हा एकदा ती पाहण्यासाठी. लढाईनंतर कदाचित पाच-सहा महिन्यांनी. तिथं जाण्यासाठी त्यानं पाटलाच्या पोराला त्या नगरीचं वर्णन ऐकवलं होतं. तुला मी सगळं दाखवतो असं आमिष पुढं केलं होतं. आणि त्या पोराचा एक चांगला पोशाख स्वतःसाठी तात्पुरता कबूल करून घेतला होता. त्याला दिसलं की, त्या सहा महिन्यात किंवा जो काही वेळ गेला असेल त्यात ती नगरी पुन्हा जशीच्या तशी झाली होती. त्या दोघांनाही माहीत नसलेल्या अनेक गोष्टी त्यांनी यावेळी पाहिल्या. तुंदिलतनू बामण, पूजा-अर्चा, व्रते-उद्यापने, मिष्टान्नभोजने यांची रेलचेल होती. सहा महिन्यांआधी उडालेल्या हाहाःकाराच्या कोणत्याही खुणा तिथं शिल्लक नव्हत्या. पाटलाच्या मुलाने गावच्या मालकांचे नाव सांगून चौकशी करत त्यांच्या घराचा पत्ता सुद्धा शोधला. तिथल्या चाकरांनी त्यांची व्यवस्था एका धर्मशाळेत केली. कुणब्यांसाठीची ती धर्मशाळा यथातथाच होती. पण तीही त्यांना आरामदायी वाटली. काहीही कष्ट न करता अन्न मिळणे यासारखी त्यांना सर्वस्वी अपरिचित असलेली चैन तिथं होती. तिथून परतल्यावर गावी शिरपतीला आपल्या बापाची बोलणी खावी लागली. माराचे बोलण्यावर निभावले हेही कमी नव्हते. बापानं वृत्तांत समजावून घेतला. पोरगा नजर उघडी करून आला, याचं त्याला बरं वाटलं. म्हणाला, आता नायी सांगतानी आसं जायाचं नायी. त्या मेंढ्या पक्. त्यांची किती बेंबळ झाली. त्यानला आमचा आनभाव नायी, तुपला लळा हाये. ही बात निदानशिनी डोक्यात घ्यायची व्हती त्वा.

शिरपतीची नजर उघडी झाली होती, असं म्हणायला नक्कीच वाव होता. त्याच्या मेंडक्या नजरेत ती नगरी, तिथली माणसं, त्यांच्या हवेल्या; हे सगळं डोळे दिपवून टाकणारंच होतं. पण त्या कुणब्यांच्या धर्मशाळेत आणि इतरत्र त्याला आणखी पुष्कळ माहिती मिळाली होती. ती सगळीच त्याला नवी होती आणि त्याच्या मनाला गोंधळात टाकणारे अनेक परस्परविरोधी अभिप्राय त्यात होते. दिल्लीचा अलोदिन खिलची आला आणि ती नगरी लुटून गेला याचे कारण रामदेव राजाचा एक परधान हेमाडी नावाचा बामण होता, असा एक अभिप्राय होता. या परधानाने चक्रधर महात्मा नावाच्या साधू-पुरुषाचा छळ केला. त्याचा मारेकरी घालून दिवसाढवळ्या खून केला. त्या पापामुळे हे असे सुखाच्या जागी दुःखाचे दिवस आले आहेत. आणि हे देशाच्या लुटीचे असे जे झाले ते पुन्हा पुन्हा होत राहणार आहे. राजाने फार पाप केले आहे. अलोदिन परत येईल आणि हे राज्य बुडवून टाकील असा त्यांचा पक्का होरा होता. काहींच्या मते हेमाडी बामण हा मोठा ज्ञानी आणि जुन्या धर्माचा अभिमानी होता. त्याने अनेक ग्रंथ लिवलेले आहेत. पूजा-अर्चा, होमहवन यांचा तो अभिमानी आहे. बामणांना भरपूर दानदक्षिणा दिली की पुण्य असते, यात खोटे ते काय? बामण खुद देव असतात. त्यात काय खोट हाये काय? ह्यो चक्रधर महात्मा आपला जुना धरम बुडवायला निघाला होता, त्याचा बंदोबस्त हेमाडीनी क्याला, याच्यात त्याची चुकी काय झाली? आवो, त्यो चक्रधर महात्मा दिसायला लई छाकटा होता. निस्त्या बाया काय पण गडीमाणसं सुद्दा पाघळायचे त्याला पघून. राजाच्या दरबाराचे समदे लोकं त्याच्या भजनी लागले होते. त्यांछ्या बायका सुद्दा जायच्या. खुद हेमाडी परधानाची एक बाईल व्हती- त्यानी टाखून धिल्यासारकीच व्हती ती. तर अचानिक त्याच्या मनात तिच्या इखी भावना जागी झाली. तव्हा त्यानी तिला खोंदूखोंदू इचारलं, का आसं आस्तानी आसं कसं झालं? तव्हा ती म्हनली का म्या महात्म्याच्या तोंडातला नागवेलीच्या पानाचा उष्टा इडा खाल्ला. याच्यानी आसं करता आसं झालं. आता, तुम्ही सांगा, याच्यानी मानसाचं टकुरं फिरन का ऱ्हाईन? आणखी काहींच्या मते, चक्रधर महात्मा चांगला माणूस व्हता. त्यो दिसायला गोमटा होता, याला त्याचा काय इलाज? पण त्यो सोपा धरम सांगत व्हता. पूजापाठ, दक्षिणा, निवदबोणे यांची गरज नायी. बामणांला दान देऊन पुण्य मिळत नायी. देवाच्या संबुर समदे सारके हायेत. चक्रधर महात्मा स्वोता खुद देव होता आन त्यो माणसाच्या जल्माला आल्याला व्हता. यान्ही कैक त्याची चोंगी कापली तर ती परत जागच्या जागी जावून बसायची. मंत्रं घातले, भानामती केली. कायच उपेग झाला नायी. मंग यांनी त्याला कापला. तरी त्यो मेला नायी. गपचिप उठून त्यो तिकडं वरलीकडल्या मुलखाला गेला. त्याला बोल्हावनं आल्याबिगर त्यो जात नायी. त्या अलोदिन राजाला सुद्दा त्यानीच पाठुल्ला आसल. काहींचं म्हणणं असं होतं की, हा रामदेव काही फार चांगला राजा नाहीय. याच्या आंधी महादेव नावाचा राजा व्हता. त्यो याचा चुलता व्हता. ह्यो नाच्ये लोकांचा पोशाक केलेली टोळी घेऊन त्याच्या दरबारात घुसला. आन ऐन वेळेला तलवारी काढूनसनी यानी गादी ताब्यात घेतली. राजा महादेवाचा आमणदेव म्हणून एक मुलगा व्हता. यानी त्याचे डोळे उपसून कहाडले. ह्या काय पुण्याच्या गोष्टी हायेत? आन ह्यो हेमाडी पंडित बामण याच्या संगतीच व्हता. त्याचीच आक्कल व्हती समद्यात. त्यो महादेव राजाच्या चाकरीत आंधी व्हता ना! त्याच्यानीच ह्या बामणाला परधान क्याल्याला हाये. ह्या दोघांची सांगड व्हती. आन ह्यो रामदेव काय राज्य चालितो? त्याचे रंगढंग चाल्लेत. लोकांचं त्याला कायच घ्यानंद्यानं नायी. लढाई करनारे मोठमोठे शेनापती,आक्कलवान बामणं याला सोडून गेलेत. हायेत ते समदे पलशे आन पाताने. ते काय करणार? त्यो अलोदिन राजा आला आन यान्ला पार उताने च्या पाताने करून गेला.

ही सारी चर्चा आणि मतमतांतरं शिरपतीसाठी नवी होती. त्या साऱ्यात त्याची केवळ एक श्रोता हीच भूमिका कायम राहिली. त्याला हे कोणतेच लोक माहीत नव्हते. हेमाडी पंडित बामण, रामदेव राजा यांना त्याने पाहिलेलं नव्हतं. अलोदिन राजाच्या बाजूनी तो लढला होता. पण त्यालाही त्यानं लांबून पाहिलं होतं. चक्रधर महात्मा यांच्या कहाण्या मात्र त्यानं ऐकलेल्या होत्या. तो मोठा सत्पुरुष होता, असं त्यानं ऐकलेलं होतं. त्याच्या सारख्या सत्पुरुषाचा असा छळ केला गेला, हे चांगलं झालं नाही, असंच त्याला वाटलं. पण तेही त्यानं स्वतःशी ठेवलं. एके दिवशी त्याला एक बामण भेटला. झालं असं की : तो गंगा गोदावरीच्या काठी महादेवाच्या देवळात-तिथल्या सभामंडपात- बसला होता. तिथं संथ वाहणारी नदी, काठांवर उभी निरगुडीची बेटं, रिठे-करंजीची आणि बेल-कवठाची झाडं, त्या पल्याडची आंबा, चिंच, लिंब, बाभळीची झाडं. मोठंच प्रसन्न वाटत होतं त्याला. नदीकाठी घाट आणि ओटे बांधलेले होते. कळकट लाल रेशमी वस्त्र नेसलेला आणि डोईला शेंडी राखलेला एक काटकुळा इसम एका ओट्याजवळ उभा होता. आणखी एक काळा तगडा माणूस त्याच्या शरीराला न शोभणाऱ्या नम्रतेने तिथं लाकडाचे फोडलेले तुकडे आणून टाकत होता. ते चंदनी लाकूड आहे, हे शिरपतीने सहज ओळखलं. त्याचा गंध त्याच्यापर्यंत पोहोचला होता ना! बामणात मयत झाली का त्यांना चंदनाच्या चितेत जाळतात, असं शिरपती ऐकून होता. नदीकाठी आणि महादेवासमोर ओटा म्हणजे ही मयतीचीच जागा हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं बामणांची मयत कधी पाहिलेली नव्हती. हळूहळू लोक जमू लागले. नंतर ‘चार खांदेकरी आणि एक मडकं धरी’ असे नेहमीचे लोक आणि त्यांच्या सोबत आणखी बरेच लोक आले. आवाज, गलका मात्र अजिबात नव्हता. कारण त्यात एकही बाईमाणूस नव्हतं. ह्या लोकांच्यात बाईमाणसं मयतीला येत नाहीत, असं दिसतं, त्याच्या मनात आलं. बाईमाणसांबिगर मयतीला शोभा नाही असा त्याचा खासगी अभिप्राय पडला. च्यायसका, रडणं-गागणं, इवाळणं; काय सुदिक नायी. निस्ती मुक्याची मयत बामणांची; त्याला वाटलं. पण ते तसं नव्हतं, हे थोड्याच वेळात त्याच्या लक्षात आलं. कळकट लाल कापडातला तो शेंडीवाला माणूस खड्या आवाजात काय तरी म्हणू लागला. इकडं त्या दुसऱ्या काळ्या तगड्या माणसानं चंदनी चिता कधीचीच रचून ठेवलेली होती आणि काही एक अंतर राखून तो उभा होता. इथं शिरपती जरा गोंधळला. मयत आलीय, चिता रचून झालीय, तर मयत त्याच्याव ठिवून आगीन का देत नायीत हे लोकं; त्याला प्रश्न पडला. तो शेंडीवाला काय तरी मंत्र म्हणत होता आणि बाकीचे लोक शांत बसून होते. आणि हे असं किती तरी वेळ चालू राहिलं. शेवटी अगदी कंटाळून गेला शिरपती तेव्हा त्या शेंडीवाल्याने त्याच्या समोरचा अग्नी सिद्ध केला. मग आणखी कोणी तरी त्या मयताच्या तोंडाला तो लावला. नंतर इतरत्र. चिता पेटली. कवटी फुटल्याचा आवाज ऐकल्यावर लोक उठले आणि हळूहळू पांगले. तो काळा तगडा माणूस अंतर राखून चितेचं राखण करीत असल्यासारखा बसून राहिला. काटकुळ्या शेंडीवाल्यानं नदीत डुबकी घेतली. ते करताना देखील तो तोंडाने काही तरी म्हणत होताच. नंतर तो देवळाकडे चालत आला.

‘काय रे? काय करतोहेस?’ शेंडीवाल्यानं शिरपतीला विचारलं. आवाज खर्जातला होता. इतक्या काटकुळ्या शरीराला न शोभणारा.

‘काय नायी बुवा. सुक्षम बसलो देवाच्या दारी.’ शिरपतीची घाबरगुंडी उडाली होती.

‘सुक्षेम आहेस हे तर दिसतंच आहे. वेगळाच दिसतोस तू. इतक्या निवांतपणे स्मशानात बसलेला तुझ्यासारखा माणूस मी पाहिलेला नाहीय.’ शेंडीवाला हसला. शिरपतीच्या जीवात जीव आला.

‘देवाच्या दारी दीपमाळ आसू नायतं मसनवटा- येऊन एकच.’ तो म्हणाला.

‘हुशार दिसतोस.कोणत्या गावचा? इथला नक्कीच नाहीस.’

‘डोंगरकिनी म्हनून गाव हाये. बारीकसं. तिथुल्ला हाये मी.’

‘डोंगरकिनी? अरे डोंगरकिनी म्हणजे आता ज्यांचा अंत्यविधी झाला त्यांचंच गाव. त्यांच्याच मालकीचं. तुला माहीत नाही?’

‘नाय बॉ-’

‘तेही खरंच म्हणा. ते कधीही तुझ्या गावी आलेले नसतील. आणि एरवीही तुझा कशाला संबंध येणार अशा मोठ्या लोकांशी; नाही का?’

‘एक माणूस येतो दर वर्षी-’

‘तो यांचा माणूस. त्याला ते काम नेमून दिलेलं असतं. अशी खूप गावं यांच्या मालकीची आहेत. आता ती त्यांच्या मुलांच्या मालकीची होतील. राजा रामदेवाची कृपा आहे. ब्राह्मणांना दानधर्म करण्यात त्याचा हात धरणारं या पृथ्वीवर कोणीही नाही. तशी काही पातकंही झालीत राजाकडून. म्हणजे बाकी काहीही केलं असतं तरी चाललं असतं. पण ब्रह्महत्या म्हणजे घोर पातक. त्याला क्षमा नाही. ती त्यानं आततायीपणं केली. वेदांनी उक्त केलेला धर्म टिकला पाहिजे, असंच ते सांगत होते. त्यात गैर ते काय होतं? पण तेव्हा रामदेवाला आपला तोल सांभाळता आला नाही. सगळे विद्वान ब्राह्मण सोडून गेलेत त्याला. आणि वैदिक धर्माभिमानी क्षत्रिय सुद्धा. या अल्लाउद्दिन खिलजीच्या स्वारीनंतर आता त्याच्या ते लक्षात आलंय, हे त्यातल्या त्यात बरं. ते सुद्धा प्रधान हेमचंद्रानं लक्षात आणून दिलंय म्हणून. बाकी सगळे पळशे ब्राह्मण अन पाठारे लोक- अरे पण तू सुद्धा पाठारेच आहेस ना! म्हणजे पाठारे काही वाईट लोक नाहीत. क्षत्रियच आहेत. पण आचार क्षत्रियांचे नाहीत. आता तुझंच घे, आहे का यज्ञोपवित तुझ्या अंगावर?’

‘ते काय आस्तंय?’

‘ते हे.’ आपल्या यज्ञोपवीतावरून हात फिरवत त्यांनी दाखवलं.

‘जानवं हाये ते. तुमच्या बामण लोकांचं आसतंय-’

‘अरे! क्षत्रियांनी सुद्धा उपचारपूर्वक परिधान करायचं असतं ते. तुम्हाला तुमचा धर्म माहीत नाही. त्याला कोण काय करणार?’

‘मपला काय समंद? मी तर मेंडका.’

‘हीच तर गंमत आहे. अरे बाबा, तुझं सगळं गावच मुळात पाठारे जातीच्या लोकांचं आहे, हे तुला माहीत नसेल, पण मला आहे. आणि पाठारे सारे क्षत्रिय आहेत. तुम्ही ते संस्कार सोडलेत, ही गोष्ट खरी, पण रामदेवाचं राज्य आज तुम्हा लोकांच्या बळावरच चालू आहे.’

‘आपल्याला तर काय कळानी झालंय बॉ. बरं, हे- ज्यांची मयत झाली ते तुमचे नाथेवाईक-’

‘छे, छे रेऽऽ बाबा. ते माझे यजमान. ते उच्च कुलीन ब्राह्मण. मी किरवंत.’

‘ते काय आस्तंय?’

‘तुझा हा प्रश्न मोठा छान आहेय रे! नाव काय तुझं? मला आवडलास तू?’

‘शिरपती.’

‘श्रीपती- असं बघ, म्हणजे मी सगळं सांगतो तुला.’ शेंडीवाल्या काटकुळ्या किरवंताने त्याच्या शेजारी बैठकच मारली.

‘पन मपलं नाव तर शिरपती-’

‘असू दे, असू दे- तर त्याचं असं आहे श्रीपती, नाही –शिरपती..’

त्या शेंडीवाल्या काटकुळ्या किरवंत भटजीचं नाव अंबादास. सगळे त्याला सहसा दासोभट म्हणतात. कुलीन ब्राह्मणांच्या अंत्यविधीसाठी किरवंतांची योजना असते. म्हणजे ते ब्राह्मणच. पण हलक्या जातीचे. त्याचं दुःख भटाला आहे. पण आपण जे बदलू शकत नाही, त्याचा मनःपूर्वक स्वीकार करणं त्याला श्रेयस्कर वाटतं. वेदकाल किंवा त्याच्या आधीपासून हे असंच चालत आलंय आणि याच्या बळावरच आपले लोक टिकून राहिले आहेत, असं त्याचं म्हणणं. जन्मानुसार आपल्या वाट्याला जे कर्म आलंय, ते लीनबुद्धीने आचरल्यास पुढचा जन्म मानवी प्रजातीत आणि श्रेष्ठ आचारांती कुलीन ब्राह्मण ज्ञातीत मिळू शकतो, ही दासोभटजीची श्रद्धा आहे.

‘मागच्या जन्मी माझ्याकडून काहीतरी कुकर्म घडलं, म्हणून मी या जन्मी किरवंत झालो आहे. समोर बसलेला तो मसणजोगी ज्ञातीतला बळकट माणूस बघितलास, त्याच्याकडं उत्तम शरीर आहे. पण ते फक्त सेवेच्या उपयोगाचं. याला त्याचा किंवा आणखी कोणाचा काहीही इलाज नाहीय. तू क्षत्रिय म्हणून जन्माला आलास. पण त्याचे संस्कार नाहीत. सबब तू शूद्र. अर्थात सध्या तुम्हाला असं म्हणण्याची कोणाचीही प्रज्ञा नाहीय, तो भाग वेगळा. पण, तुला सांगतो, या पृथ्वीवर ब्राह्मण म्हणून जन्माला येणं यापरतं भाग्य नाहीय. ते भूलोकीचे देवच असतात. त्यांची सेवा करणं, त्यांना दान करणं हे सर्वोच्च पुण्य. त्या पुण्यामुळेच हे भूमंडळ स्थिर आहे. अन्यथा त्याची कधीच वाट लागली असती. हा चक्रधर पाखंडी होता. त्याच्या बोलण्याने प्रभावित होऊन लोकांनी देवळातली रुद्रलिंगे उपसून फेकली कैक ठिकाणी. केवढा अनर्थ! केवढा अधर्म! ब्राह्मणांना दान करण्याने पुण्य मिळत नाही म्हणायचा. राजाच्या दरबारातले मानकरी त्याच्या कच्छपी लागले. राजस्त्रिया त्याला भजू लागल्या. तो आपला धर्मच संपवायला निघाला होता. त्याला संपवणं आवश्यक होतं. असे पाखंडी खूप वेळा होऊन गेलेत. तरीही आपला वैदिक धर्म टिकला आहे..’ दासोभट अखंड विनाविक्षेप बोलत राहिला. इतका सश्रद्ध श्रोता त्याला याच्या आधी कधी मिळाला सुद्धा नसेल.

दासोभटाने सांगितलं ते सगळं शिरपतीला कळलं, असं अर्थातच नव्हतं. पण त्याच्या मनातली बरीवाईट; जी काही असेल ती तळमळ त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचली. देवधर्म, रीतीरिवाज, जी काही आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली रेघ आहे, ती राहिली पाहिजे, असंच त्याचं म्हणणं. ते शिरपतीला पटलं. देवच देवळातून फेकाटून द्यायचा ही चक्रधर महात्म्याची रीत त्याच्या मनाला पटली नाही. आवो, देव नायी म्हंजी पाउस नायी. मंग मेंढ्यांनी काय खावा? आन माणसांनी कसं जगावा? ही उलटी गोष्ट कायीच कामाची नायी, असा त्याचा खासगी अभिप्राय पडला. मुख्य म्हणजे त्या दोघांची त्या एका भेटीतच चांगली मैत्री झाली. बाकी पाठारे अन क्षत्रिय, राजधर्म, यज्ञोपवित या गोष्टी त्याच्या डोक्यावरून गेल्या. ‘छ्या, छ्या, आपुन मेंडके. जे हाये ते बेस हये. भटाच्या बाडा भटाला लखलाभ. पन मानुस मातर एक नंबर’ शिरपतीला वाटलं. ‘या प्रतिष्ठान नगरीत पुन्हा आलास की अवश्य भेट. अन तुला चालणार असेल तर माझ्याकडे राहायला ये.’ दासोभट म्हणाला. ‘न चलायचं काय कारन?’ शिरपतीच्या मनात आलं. ते त्यानं बोलून सुद्धा दाखवलं. ‘अरे बाबा, तुम्ही क्षत्रिय. आम्ही ब्राह्मण असलो तरी किरवंत. तुमच्या पुढे हलके!’

‘छ्या, छ्या आमच्या गावात तशी भास नायी’ शिरपती म्हणाला.

: २ :

शिरपती पैठणहून डोंगरकिनीला परतला आणि त्याचा नित्यक्रम आधीच्या पानावरून पुढच्या पानावर सुरळीत सुरू झाला. ज्ञानात भर पडली. पण ती केवळ माहितीची होती. त्याच्या जगण्यात त्यामुळं काय फरक पडणार? कधी तरी त्याला दासोभटाची आठवण येई. पण तेही काय खास नव्हतं. तो आणि त्याच्या मेंढ्या हीच त्याची खरी आणि रोकठोक दुनिया होती. आणि त्याच्यासाठी ते फार आनंदाचं होतं. मेंढ्यांशी होणारा रोजचा संवाद त्याच्यासाठी अनमोल होता. अगदी गावातली माणसं, संभाषणं, रीतीभाती, शेतीवाडी या सुद्धा त्याच्यासाठी दूरच्या गोष्टी होत्या. तशा वेळा आल्यास शब्दांचा मितव्यय करण्यावर त्याचा भर असे. अगदी शेतकामात सुद्धा त्याचा जीव रमत नसे. रानातलं खुरटं गवत, मेंढ्यांच्या सुबक हालचाली, त्यांचं निर्भर चरणं, जन्मणारी कोकरं, त्यांची देखभाल, संध्याकाळी सगळ्यांना परत आणून त्यांना वाडग्यात कोंडणं. बस्सऽऽ सुख म्हणजे यापेक्षा अधिक काय असू शकतं? दुनियेच्या अंतापर्यंतचं समजा सोडा, पण त्याच्या स्वतःच्या मृत्यूपर्यंत हे असंच चालू राहिलं असतं तरी त्याला त्याची हरकत नव्हती. किंबहुना हे असंच असणार, हे त्यानं गृहीतच धरलेलं होतं.

पण ते तसं झालं नाही. ते तसं व्हायचं नव्हतं. एक वळण आलं. अन ते इतक्या हळुवारपणे आलं की त्यातून आपलं जगणंच बदलणार आहे याची पुसटशी चाहूल सुद्धा त्याला लागली नाही. घडलं ते अगदी साधं, काहीसं वेधक होतं. त्यातून खास काही निष्पन्न होईल असं ते नव्हतं. झालं असं की एक दिवस तो नेहमीसारखा आपल्या मेंढ्या घेऊन रानात गेलेला होता. दिवस उन्हाळ्याचे होते. दुपारची वेळ असल्यानं सूर्य आग ओकत होता. शिरपती एका झुडुपाच्या सावलीच्या आसऱ्यानं पहुडला होता. मेंढ्या सुद्धा खुरट्या गवताला शोधताना जमिनीच्या तापानं नाक-तोंड पोळून भेंडाळून गेल्यासारख्या इथं तिथं घोळके करून बसलेल्या होत्या. अगदी वारासुद्धा स्तब्ध होता. दूर डोंगरांच्या रांगात उन्हाच्या हलत्या लाटा सहज दिसत होत्या. पण त्या पाहण्या इतका तवाका ना मेंढ्यांमध्ये उरला होता ना शिरपतीत. अशा बव्हंशी स्तब्ध चित्रात दूरवरून थोडीशी हालचाल दिसली, तेव्हा उन्हात होणारा भास म्हणून त्यानं त्याकडं दुर्लक्ष केलं. पण हलणारं जे काही होतं ते जसजसं निकट येऊ लागलं, तसतसा तो भास नाहीय हे स्पष्ट होऊ लागलं. हलते आकार स्पष्ट होऊ लागले. शिरपतीच्या लक्षात आलं, की तो एक मेणा होता. उघड्या अंगाने त्याला तोलून धरत चार भोई चालत होते. नंग्या तलवारी हातात धरून पुढे दोन आणि मागे दोन असे सैनिकवजा मनुष्य जबाबदारीने चालत होते. सरळच होतं. कोणातरी मानकऱ्याची घरची माणसं- बाईमाणूस आत बसलेलं असणार. जातात ते लोक असे रस्त्यानं. शिरपतीला वाटलं, पण इतक्या उन्हात ते सहसा जात नाहीत. त्याच्या मनात आलं, इतक्या जलदीचं काय निघालं आसन बॉ? पन जाउंद्या, आपल्याला काय त्याचं? त्यांच्या रस्त्यांनी ते जातीन. तरीही अंग आवरून तो उठून बसला. पण मग त्याच्या विखरून बसलेल्या मेंढ्यांच्या कळपाच्या अगदी जवळ येऊन मेणा थांबला. इतकेच नाही तर मेंढ्यांचा एक जथा ज्या खुरट्या सावलीला बसलेला होता, तिथंच त्या भोयांनी तो टेकवला, म्हणून मेंढ्या तिथून हलल्या. तलवारी हाती घेतलेले ते चार लोक चारी बाजूंनी मेण्याकडे पाठ करून उभे राहिले. भोई चालत जाऊन दूर अंतरावर थांबले. हे चाललंय काय, हा मेणा अशा आडरानात का थांबलाय? शिरपतीला कळेना. भरीत भर म्हणजे कापडात झाकलेलं काहीतरी हातात धरून एक बाई तिथून निघालेली त्याला दिसली. आणि भयंकर म्हणजे ती त्याच्याच दिशेने येतेय हे त्याला जाणवलं. अरे बापरे! ही मोठ्या घरची बाई इकडं कशासाठी येतेय? शिरपतीनं स्वतःकडं पाहिलं. अंगात बंडी अन कमरेला लंगोटी. त्याचा नेहमीचा पोशाख. उन्हापासून डोकं राखण्यासाठी एक चिंध्यावजा मुंडासं त्यानं सोबत आणलेलं होतं. ते त्यानं कसंबसं भराभर कमरेला गुंडाळलं. तो उठून उभा राहिला. त्या बाईच्या हातात लहानसं बाळ होतं, हे त्याच्या लक्षात आलं. तो पुढे झाला आणि त्याने सरळ तिच्यासमोर दंडवत घातला. मोठ्या घरचं बाईमाणूस. रीतच होती तशी.

‘उठ, उठ. त्याची गरज नाहीय. मालकीण तिकडं मेण्यात बसलेली आहे.’ बाई म्हणाली.

‘मंग तुम्ही-’

‘मी दासी आहे त्यांची. गाव किती दूर आहे इथून? पाणी मिळेल इथं कुठं?’

‘ते तिकडं गाव.’ शिरपतीने हाताने संकेत केला. दूरच होतं ते. रानापासून जितकं दूर असावं तितकं.

‘पानी पन लांबच हाये. कोनाला- बाळ आज्यारी हाये?’

‘आमच्याकडं पाणी नाहीय.’

‘मी लगीच घेऊन येतो. तुमी बसा इथं जराशिक सावलीला.’ म्हणत शिरपती हातात चरवी घेऊन पळत निघाला.

उन्ह होतं. घाईत पायात पायताण घालायचं राहून गेलं होतं. नाहीतरी पळताना त्याची अडचणच झाली असती. कमरेला गुंडाळलेलं मुंडासं मध्ये मध्ये येऊ लागलं. ते त्यानं सुरक्षित अंतरावर आल्यावर काढून टाकलं. पाय पोळत होते. पण त्याला त्याची तमा नव्हती. इतकं लहान बाळ. उन्हात तहानलेलं. अगदी सुकलेलं दिसत होतं. दुखुदुखूच आसनार. पळ शिरपती पळ.

तो पाणी घेऊन घामाघूम तिच्यासमोर उभा राहिला. ती त्या बाळाचं डोकं हलके हलके थोपटत होती. तिनं नजर उचलताच त्याची नजर झुकली. दासी-बटकी होती म्हणून काय झालं? परकी बाईच होती ना! तिनं पाण्यात बोट घालून हलक्या हातानं बाळाच्या ओठावर फिरवलं. त्याचे ओठ विलगले. ते क्षीण हसलं. त्याच्या ओठाशी पाण्याचे थेंब धरताच ते चुटूचुटू चाटू लागलं.

‘दूध मिळेल थोडं? त्याला भूक पण लागलीय.’

‘त्याला काय तोटा? कैक दुभत्या मेंढ्या हायेत. पण त्याला चलन का ते? त्याची आई-’

‘त्याची आई मेण्यात बसलीय. ह्या मोठ्या लोकात बाया त्यांच्या बाळांना अंगावर पाजीत नाहीत. अन हे बाळ कोणत्याही दाईच्या बोंडाला तोंड लावायला तयार नाहीय. कैक चार-पाच दाया झाल्या. कापसाच्या बोळ्यानं मी गायीचं थोडं पाजतेय.’

‘दाई कोण आसतीय?’

‘गरीब ओली बाळंतीण. तिनं पाजायचं असतं.’

‘आन तिच्या स्वोताच्या बाळाला?’

‘त्याचा कोण विचार करतंय? ते जाउदे. मला जरा दूध दे याच्यासाठी.’

‘जरा कशापायी, आख्खी चरवी भरून देतो. मंग पाजा कापसाच्या बोळ्यानी.’ शिरपती उठला आणि मेंढ्यात शिरला.

‘एऽऽ टिक्केऽऽ चाल इकडं व्हय.’ त्यानं आवाज दिला. तर लगेच ती टिक्की नावाची मेंढी आज्ञाधारकपणे त्याच्या निकट येऊन उभी राहिली. बाळाला मांडीवर घेऊन सावलीत बसलेली ती दासी स्त्री बघत होती. ‘हांऽऽ, चाल इकडं मपल्यासंगती.’ तो म्हणाला आणि मेंढी त्याच्यासोबत चालू लागली. ती रंगानं काळी आणि प्रौढ होती अन तिच्या कपाळावर पांढरा टिक्का होता. म्हणून ती टिक्की. शिरपती सावलीत येऊन उभा राहिला. टिक्की त्याच्या शेजारी. त्यानं चरवीतल्या पाण्यानं तिची कास स्वच्छ धुवून काढली. टिक्की शांत उभी होती. ती स्त्री अचंब्यानं बघत होती. त्यानं तिच्या सडांना हात घालून धारा काढायला सुरुवात केली. टिक्की समझदारपणे उभी होती. त्याची त्या स्त्रीशी नजरानजर झाली. तो बारीकसं हसत म्हणाला, ‘लय समाजिक हाये आमची टिक्की.’

‘तुझ्या बाकीच्या मेंढ्याही अशाच आहेत?’ तिनं विचारलं.

‘आशाच हायेत. पन इकत्या आनभाविक नायीत. ही वयस्कार हाये. आन इचं दूद पन लय ग्वाड. तुमच्या बाळाला आवडन.’ हे बोलताना शिरपतीला आठवलं, आपण कैक वेळा या टिक्कीच्या सडांना तोंड लावून दूध प्यालेलो आहोत. त्याला वाटलं, या बाळाला सुद्धा ती तसं नक्कीच पाजील. अन तसं त्यानं केलं तर ते सगळ्यात चांगलं. दूध ओढताना बाळाच्या गळ्याच्या शिरा मोकळ्या होतील.

‘तुम्ही बाळाला मपल्याकडं देता? मी त्याला सरळ ह्या टिक्कीच्या सडाला लावून पघतो. ती कायच आडचन नायी. तसं केलं त बाळाला ज्यास चांगलं. पघा बॉ-’

बाईचा बाळावर जीव होता. ती त्याची आई नव्हती अन दाई सुद्धा नव्हती. पण त्याची देखभाल करत असताना तिचा त्याच्यावर जीव जडलेला होता. पुरेसं दूध पोटात जात नसल्यानं बाळ आजारलेलं होतं. त्याच्या हट्टीपणाचं कोणालाही काही कळेनासं झालेलं होतं. अगदी वैद्यांनी त्याच्यापुढं हात टेकले होते. ते जिवंत होतं पण नाजूक होतं. हे काहीही सांगायची ती वेळ नव्हती. आणि सांगितलं तरी शिरपती त्यात काय करणार? त्यापेक्षा काय हरकत आहे? होऊन होऊन काय होईल? वाईट तर काहीच नाही. प्यायचं नसेल तर बाळ पिणार नाही. संपला प्रश्न. ती मेंढी आणि तो मेंढका यांच्यामधल्या नात्याचा चमत्कार ती समोर अनुभवत होती. तिनं एकवार समोर दूर असलेल्या मेण्याकडं नजर टाकली. मेणा स्थिर होता. शिपाई स्थिर होते. भोई आणखी दूर उभे होते. इतक्या दूर काय चाललंय ते स्पष्ट काय दिसणार? आणि दिसलं तरी वेळ नेता येईल मारून.

‘हां, घे. बघ जमलं तर.’ ती तातडीच्या स्वरात म्हणाली.

मेंढीच्या नवजात किंवा अगदी लहानग्या कोकराला तो जितक्या प्रेमानं आपल्या छातीशी तो धरत असे तितक्याच प्रेमानं त्यानं त्या बाळाला जवळ घेतलं आणि आधी त्याला टिक्कीच्या तोंडासमोर धरलं. आपल्याला काय करायचं आहे हे तिला कळावं म्हणून कदाचित. टिक्कीनं आपलं नाक पुढं करून बाळाचा वास घेतला. बाळाच्या डोईवरून हलकेच हात फिरवत, त्याला गोंजारत त्यानं त्याला तिच्या आचळांजवळ नेलं. एका हातानं हलकेच तिचं एक सड त्याच्या ओठांजवळ नेलं. टिक्की मेनकाशी होती. लोडथानी नव्हती. बाळानं एकवार डोळे उघडले. ते सूक्ष्म हसलं आणि डोळे झाकून त्यानं स्तनपान सुरू केलं. टिक्की शांत स्तब्ध स्वतःच्या कोकराला स्तनपान देत असल्यासारखी उभी होती. आणि जागत्या डोळ्यांनी चमत्कार अनुभवताना त्या स्त्रीची छाती तटतटून आली होती.

शिरपतीच्या नजरेत सुद्धा तो चमत्कारच होता. बाळाचं मनसोक्त दुग्धपान झाल्यावर त्यानं बाळाला त्या स्त्रीच्या हवाली केलं. टिक्कीच्या डोक्यावर मायेनं हात फिरवला. आणि पुन्हा आणखी दूध काढण्यासाठी तो बसला. मेंढीच्या कासेत दूध असून असून ते किती असणार? पण बाळाचं पिऊन झाल्यावरही बरंच निघालं ते. टिक्कीचा अपवादात्मक आणि समजूतदार पान्हा. दुसरं काय? आणखी एखाद्या मेंढीला आणून चरवी भरावी, की एवढंच ठीक राहील? भेसळ नको, बाळानं हे प्यायलंय तर हेच द्यावं.

‘बास का?’ त्यानं विचारलं.

‘हां, पुष्कळ झालं. चल.’

‘मी येऊ मेण्यापर्यंत,चरवी घेऊन?’

‘चल.’

ती खड्या पहाऱ्यात आत गेली. तलवारधारी भावविहीन मुद्रेने उभे होते. शिरपतीला त्यांची भीती वाटली नाही. काय चाललंय हे त्यांनाही दिसतच होतं की! चेहऱ्यावर भाव उमटू न देता जगणं हा त्यांच्या कामाचा भागच असतो. आत मालकीण बसलेली असणार. मघाशी आपण चुकून दासीला दंडवत घातला. आता आतली मालकीण आपल्याला दिसत नसली तरी ती आपल्याला बघत असणार. चला, तिला दंडवत घालू आणि निघू, असा विचार करत त्यानं जमिनीवर लोळण घेतली. आणि उठून बंडी- लंगोटीसह आल्या पावली तो परत निघाला.

‘अरे एऽऽ..’,त्याच्या पाठीवर हाक आदळली.

त्याचं नाव त्या दासीला माहीत नव्हतं. घडलेल्या प्रसंगात नावांच्या देवाण-घेवाणीची गरजच पडलेली नव्हती.

‘काय?’ तो थबकला.

‘मालकीणबाईंनी हे दिलंय तुला.’ तिनं तिच्या हातातलं नाणं त्याच्यासमोर धरलं.

‘छ्याऽऽ, छ्याऽऽ. आज्याबात नायी. ते काय इषयच नायी.’

‘घे. अरे, त्यांना वाईट वाटेल.’

‘वाटूंदे.’ तो वळला. मेण्याकडं तोंड करून त्यानं हात जोडले आणि आपल्या मेंढ्यांच्या कळपाचा रस्ता धरला.

जे झालं ते इतकं वेधक होतं की एरवी कोणाशीही फारसं न बोलणारा शिरपती गप्प राहू शकला नाही. रात्री त्याला जेवू घालणाऱ्या, त्याला ते वाढणाऱ्या त्याच्या आईला त्यानं ते यथासांग आणि रंगवून रंगवून सांगितलं. त्याची बायको यमी ते कानांमध्ये प्राण आणून ऐकत असणार याची त्याला खात्री होती. त्याची आई त्याच्या बापाला हे सगळं सांगणार याची त्याला खात्री होती. पण तो जे सांगत होता, त्याचं त्याच्या आईला काडीचंही आश्चर्य वाटलं नाही, तिनं तसं म्हटलं किंवा दाखवलं नाही, याच्यामुळं तो खट्टू झाला. टिक्कीचं त्याच्याशी वागणं त्याच्या आईला आश्चर्यकारक कसं वाटणार? कारण मेंढरांशी त्याचं असलेलं नातं त्याच्या आईला अजिबातही अपरिचित नव्हतं. आणि बाकी ते मेण्यातली बाई, ती दासी किंवा बटकी- ते काय, येत जात असतातातच. आपल्या भाबड्या मुलानं त्या बाईनं देऊ केलेलं नाणं खुशाल नाकारलं, याचं त्या माऊलीला अधिक दुःख वाटलं. ते किती किमती असणार याचा ती केवळ अंदाज करू शकत होती. ते असं दवडणं गरीबाला परवडणारं नव्हे, हे तिला कळत होतं. पण ती तसं बोलली नाही, हा तिचा चांगुलपणा. हे काहीही आपल्या नवऱ्याला, म्हणजे शिरपतीच्या बापाला सांगायचं नाही असं त्या माऊलीनं ठरवून टाकलं. कारण तसं केलं तर तो या पोराला बोल लावणार, कदाचित त्याच्या अंगावर हात टाकणार अशी शक्यता तिच्या मनात उगवली होती. यमी अबोल. ती कुठं बोलणार? पण मनातल्या मनात तिला वाटलं, हा असा पुरुष आपला नवरा आहे, ही किती श्रेष्ठ गोष्ट आहे. अर्थात तेही या शब्दात नव्हतं. तिला त्याचा अभिमान वाटला, जो कायम अव्यक्त राहणार होता. सासू-सासऱ्यां देखत नवऱ्याच्या समोर जायचं नाही, शय्येत सुद्धा त्याच्याशी बोलायचं नाही, हा रिवाज ती पाळणार होती. तरीही तिला जे वाटतं ते शय्येतल्या अबोल स्पर्शातून त्याच्यापर्यंत पोहोचेल याची तिला खात्री होती. आणि ती तिच्यासाठी अतीव समाधानाची गोष्ट होती. पण शिरपती त्याच्यापुरता या अनुभवानं इतका खट्टू झाला की आणखी कोणाशी ते बोलायचं नाही, असं त्यानं तात्काळ ठरवून टाकलं. एरवीही स्वतःच्या गोष्टी इतरांना सांगणं, हा त्याचा स्वभाव नव्हता. त्याच्या मेंढ्या ह्याच त्याच्या हृदयाच्या सगळ्यात निकटच्या. त्यांच्याशी संवाद हा त्याच्यासाठी परमोच्च आनंद. दुसऱ्या दिवशी आणि पुढचे अनेक दिवस, ‘त्या दिवशी तू किती छान वागलीस’ असं तो टिक्कीला अनेक प्रकारे शब्दांमधून, स्पर्शांमधून सांगत राहिला. स्वतःचा आनंद वाटून घेण्याचं समाधान त्यात त्याला पुरेपूर मिळालं, हे थोडकं नव्हे. ते घेऊन आयुष्य पुढे नेत राहाणं यातच जगण्याचा खरा आनंद असतो. जगण्यातली श्रीशिल्लक होण्याइतक्या सुंदर गोष्टी असतात त्या. पण ते सगळं नंतर.

शिरपतीच्या जगण्यात त्याच्या नकळत काळाची एक गुठळी होऊन गेली होती. ती इतकी हळुवार होती की ती तशी झालीय हे त्याला जाणवलं सुद्धा नाही. एक वळण आलं होतं. ते त्याला जाणवलं नाही. सहसा कोणालाही ते जाणवत नाही. शिरपती तर बिलकूल सीधा माणूस. त्याला कुठून ते जाणवणार? पण मग एके दिवशी गावात तो दरवर्षी येणारा तुंदिलतनू भिकबाळी घालणारा बामण उगवला. वसुलीला येणारा, मानकरी यांचा माणूस. आणि तो अवेळी उगवला. सुगी संपली की तो यायचा. तो येऊन गेल्याला फार दिवस झालेले नव्हते. या भाजणाऱ्या उन्हाच्या काळात तो कधीही आलेला नव्हता. तो घोड्यावर बसून आला आणि सोबत आणखी एका घोडेस्वाराला घेऊन आला. साहजिकच सगळ्या गावाचा थरकाप झाला की बुवा हे आहे काय? हा कोणतं संकट घेऊन आलाय? तो आला आणि पाटलाला म्हणाला, आपल्या गावात मेंडके किती? असतील त्या सगळ्यांना बोलवा. मेंढपाळ एकूण सात-आठच होते. ते सगळे जमले. त्यात शिरपती अर्थातच होता.

‘आठ दिवसांआधी रस्त्याने जाणाऱ्या मेण्यातील लहान बाळाला तुमच्यापैकी कोणी दूध पाजलं?’ त्यानं खणखणीत स्वरात विचारलं.

सर्वत्र स्तब्धता. हवा सुद्धा हलत नव्हती. मेंढपाळ आणि बाकी बघ्ये सगळे गप्प. कोणीच पाजलेलं नव्हतं, शिरपतीखेरीज. ते एकमेकांच्या तोंडाकडं बघू लागले. शिरपतीचं हृदय लक्कन हललं. बाळाला काही त्रास झाला? ते गेलं? अरे, पण त्यानं तर किती चुरूचुरू पिलं दूध.

‘दुपारच्या वेळी त्या मेण्यातल्या बाळाचं तोंड थेट मेंढीच्या सडाला लावून कोणी दूध पाजलं?’ बामणाचा पुन्हा खणखणीत स्वर. मेंडके गप्प. शिरपती गप्प. झालं काय बाळाला?

‘हे बघा, घाबरू नका. ज्यांच्या बाळाला दूध पाजण्यात आलं, ते मानकरी आपल्या मालकांच्या निकटचे मित्र आहेत. ते बाळ दुखणाईत होतं. पण या दुधानं त्याच्या प्रकृतीत खूप फरक पडलाय. एका चरवीत आणखी दूध तुमच्यापैकी ज्या कोणी दिलंत ते दोन दिवसांआधी संपलं.’ बामण मऊ स्वरात म्हणाला.

‘अरे ती चरवी आण रे इकडे.’ त्यानं त्याच्या सोबत आलेल्या घोडेस्वाराला संकेत केला.

शिरपतीचा जीव भांड्यात पडला. चरवी पाहताच तिथं असलेला त्याचा बाप जोरात ओरडला, ‘ही तं आमचीच हये.’

‘तुझी आहे काय? तूच पाजलंस दूध त्या बाळाला?’

‘नाय बॉ. आमचा ल्योक मेंडका हये. त्यो काय उभा तिथं. का रंऽ, एऽऽ शिरप्याऽऽऽ बोलायला कोन्ही त्वांड धरलं तुपल्यावालं? मला सुद्दा काय सांगातलं नाय काय, का आसं करतानी आसं झालं.’

बाप खूष झाला होता. एवढा मोठा बामण, त्याला पाटील सुद्दा टरकतोय, त्यो सांगतो का आसं करतानी आसं. समदं गाव नावजिन याला. आन ह्यो बयताड्या खुशाल ठोंब्यासारका उभा. आरे, चार पैशांच्या बक्षिसीसाठी तरी बोल चटाक्कीनी, बाप मनातल्या मनात करवादला.

‘नाव काय तुझं?’

‘शिरपती नाव हये त्याचं.’ त्याच्या बापानं तत्पर उताविळीनं माहिती दिली.

‘त्याला बोलू दे.’ बामणाच्या स्वरातलं वजन वाढलं.

‘शिरपती.’

‘हां, तर श्रीपती, तू फारच चांगला माणूस दिसतोस. त्या दिवशी मानकरीण बाईंनी देऊ केलेली सोन्याची मोहोर सुद्धा तू नाकारालीस.’

‘आराऽऽऽरारा, हात् तुह्याय्ये सका तुह्येऽऽ’ शिरपतीचा बाप मनातल्या मनात कळवळला.

शिरपतीला दासोभटाची आठवण झाली. त्यानेही आपला अशाच नावानं उल्लेख केला होता, हे त्याला आठवलं. या बामण लोकांच्या बोलण्यात तशी रीतच आसन, त्याच्या मनात आलं. गावात त्याची आई तोंड भरून त्याला ‘शिरपती’ म्हणत असे. बाप शिरप्या आणि बाकी लोक शिरपा किंवा शिरप्या.

‘ती काय तेवढी भारी गोष्ट नव्हती.’ शिरपती मृदू स्वरात म्हणाला.

‘असू दे, असू दे. हे बघ श्रीपती, मी मालकांच्या आज्ञेनुसार इथं आलोय. मला त्यांनी तुला घेऊन यायला सांगितलंय. हा घोडा तुझा आहे. तुझ्यासाठी पोशाख दिलेला आहे. माझ्यासोबत आलेला हा मुलगा इथं नवा घोडा पैदा करून तुझ्या मेंढीला घेऊन येईल. मानकऱ्यांना त्यांच्या बाळासाठी ती हवी आहे. आपले मालक तुझ्या मेंढीसकट तुला त्यांना भेट करणार आहेत. याच्यानंतर तू मानकरी यांच्या सेवेत रुजू होणार आहेस. अशा मोठ्या लोकांच्या निकट राहण्याची संधी तुमच्यासारख्या गावढ्या लोकांना सहज नसते, याची तुला कल्पना असेल किंवा नसेल, पण मला ती आहे. तू हा तुझा भाग्योदय आहे असंच समज. आणि हे तुझे वडील- त्यांच्यासाठी आपल्या मालकांनी या पाच मोहोरा दिलेल्या आहेत.’ बामणाचा स्वर ठाम पण मधाळ होता.

बामनानं तो रंगीत बटवा पुढं करताच शिरपतीचा बाप टुण्णकन उडी मारून पुढे झेपावला. कशाला, कशाला म्हणत शिरपती ते नाकारील या भीतीनं. मालकाची आज्ञा आहे, शिरप्याचं नशीब फळफळलंय. समदं बराबर. त्याच्यात खोट नायी. पन माव्हं काय? मला काय मिळन? असा विचार बामणाचं बोलणं ऐकत असताना त्याच्या मनात उगवलाच होता. सोन्याच्या पाच मोहोरा म्हणजे फार मोठी गोष्ट. याला म्हणतात नशीब. शिरप्या तुझं चांगलं व्हतंय. पण त्याच्या संगतानी तू आमचं सुद्दा चांगलं करून रायलास. काय पळीभर दूद पाजलं आसन त्वा त्या पोराला! वाहव्वा जी व्वा!

शिरपतीच्या बापानं बटवा हातात घेऊन बामणाला दंडवत घातला.

‘घरी जाऊन तुला आणखी काही घ्यायचं असेल, आईला, बायको-मुलांना भेटायचं असेल, ते करून ये इथं.’

‘आवो पन ती टिक्की नायी ना यायची दुसऱ्यासंगती.’ शिरपती हळूच म्हणाला.

‘ही टिक्की कोण? तिचा काय संबंध?’

‘मपल्या मेंढीचं नाव हये ते. तिचंच दूद पाजलं व्हतं त्या बाळाला. ती दुसऱ्यासंगती येणार नायी. आन दुभती हाये ती. तिचं कोकरू लहानं हाये. त्याला घ्यावा लागन.’

‘असं का? मग कसं करतोस?’

‘मीच घेतो संगती तिला घोड्यावर. तिला माघं पाटकुळी बांधीन आन कोकराला मोऱ्हं पोटाजवळ धोतरात बांधीन अज्जात.’

‘जमेल असं?’

‘नायी जमाया काय हये त्याच्यात?’

‘ठीक आहे मग.’

प्रसिध्द कथा आणि कादंबरीकार रंगनाथ पठारे यांच्या आगामी सातपाटील कुलवृत्तांत (शब्दालय प्रकाशन) या कादंबरीतील निवडक भाग ‘हाकारा’च्या सातव्या आवृत्तीत प्रकाशित करण्यास दिल्याबद्दल लेखक आणि शब्दालय प्रकाशन यांचे आभार.

रंगनाथ पठारे यांनी दुःखाचे श्वापद (१९९५), नामुष्कीचे स्वगत (१९९९), टोकदार सावलीचे वर्तमान (१९९१), ताम्रपट (१९९४), कुंठेचा लोलक (२००६), भर चौकातील अरण्यारुदन (२००८) अशा बारा कादंबऱ्या लिहिल्या आहेत. तर, अनुभव विकणे आहे (१९८३), गाभ्यातील प्रकाश (१९९८), शंखातला माणूस (२००८) आणि इतर असे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. याशिवाय, इतिहास, संस्कृती आणि साहित्याची मीमांसा करणारे लेखन आणि भाषांतराचे कार्यही पठारे यांनी केले आहे. पठारे साहित्य अकादमी (१९९९) पुरस्काराबरोबर अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे.

रंगनाथ पठारे यांच्या कथात्म लेखन प्रक्रियेची ओळख करुन देणारा इंग्रजी भाषेतील आशुतोष पोतदार यांचा लेख ‘हाकारा’च्या ‘हद्द’ च्या आवृत्तीत इथे आपल्याला वाचता येईल.

5 comments on “सातपाटील कुलवृत्तांत: रंगनाथ पठारे

  1. Jayant B. Joshi

    गोष्ट म्हणून वाचायलाा सुरुवात केली. गुंगून गेलो. कादंबरी नक्की वाचणाार. धन्यवाद,
    – जयंत

    Reply
    • Hemant Kolhapure

      Very engrossing natural realistic style. Awaiting publication .

      Reply
    • अभिषेक धनगर

      वाह. राहुल सांकृत्यायन यांच्या ‘ओल्गा ते गंगा’ मधील कथांची आठवण करून देणारे हे कथानक आहे. कादंबरीची उत्सुकता आहे.

      Reply
    • Jayashri Aher

      Impressive. Like other novels of Dr. Pathare here to we have new experiment of narrative. Time has great role to play and handled smartly. Must read the whole novel.

      Reply
  2. Sameer Gorde

    खुपच सुंदर…

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *