प्रज्ञा दया पवार

पडलेल्या चमच्याची कथा

marathienglish

back

‘ही कथा तुला कशी वाटली?’

‘कोणती?’

‘अरे, कुर्रतुल ऐन हैदरची.. फोटोग्राफर.’

‘का गं तुला नाही आवडली?’

‘नाही तसं नाही. आवडली नावडली असं नकोस विचारू. म्हणजे मला जरा प्रश्‍न पडलाय, काय आहे काय ही कथा? कथापण कशात आहे तिचं? घडणं या अर्थानं बघशील तर..’

‘म्हणजे? विनोदीच बोलतेयस तू. घडणं हे इतकं अत्यावश्यकच आहे का?’

‘तसं नाही रे, काही तरी घडण्याशिवायची पण असू शकते ना कथा – नथिंग अँड बिइंगनेसची!’

‘नाऊ आय विल शो यू समथिंग. कुर्रतुलच्या कथेतला तो तिच्या, म्हणजे नायिकेच्या रूममध्ये रात्री जातो. सर्दी-पडशाने चांगलाच बेजार झालेला असतो. तो तिला म्हणतो,

‘मुझे बडी सख्त खासी उठ रही है ।’

‘अच्छा’

लडकीने दवाई की शीशी और चमचा उसे दिया । चमचा नौजवान के हाथ से छूटकर फर्श पर गीर गया । उस ने झुककर चमचा उठाया और अपने कमरे की तरफ चला गया ।

‘आता मात्र कमालच झाली तुझी.’

‘अगं असं बघ, चमचा खाली पडणं आणि उचलणं यातून काय झालं तर कथेत तीन-चार ओळींची भर पडली. डिटेलिंग म्हण हवं तर. कथेच्या आशयसूत्राशी ही घटना जोडली गेली आहे. असं नक्कीच नाही. पण हे असंच का आलं असावं? असं का नाही कुर्रतुलनं लिहिलं, की तो तिच्या हातातून चमचा घेत असताना त्याच्या पायावरून उंदरानं उडी मारली आणि त्या गडबडीत चमचा खाली पडला. किंवा अधिक फिल्मी पद्धतीनं म्हणजे, कपडे बदलत असतानाच दारावर टकटक झाल्यानं तिनं घाईघाईत जो किमोनो अंगावर चढवला त्याची बटनं गडबडीत खालीवर लागली होती. दोन बटनांमधल्या फटीतून जे काही दिसू पाहात होतं त्यावर त्याचं लक्ष खिळून राहिलं. आणि तो पाहतोय हे तिच्याही लक्षात आलं. मग तो आणखीनच अवघडला आणि त्याच गडबडीत तिनं त्याच्या हातात दिलेला चमचा खाली पडला. असं लिहिलं असतं तर कुर्रतुलला किमान आठ-पंधरा ओळीचं फुटेज सहज खाता आलं असतं.’

‘बस्स् कर रे तुझा चहाटळपणा.’

‘अगं पण कुर्रतुलनं असं का लिहिलं नाही तर तसं घडलंच नाही म्हणून. म्हणजे झालं असं असावं, की कधीतरी कुर्रतुल तिच्या एखाद्या मित्राबरोबर हॉटेलमध्ये गेली असेल आणि त्यावेळी जसं जसं घडलं तसं तसं तिनं या कथेतल्या पात्राच्या संदर्भात घडवलं.’

‘म्हणजे तुला म्हणावयाचंय तरी काय?’

‘तू असं का नाही करत, तूच एक कथा लिही ना, आपल्या जयपूरच्या कॉन्फरन्सबद्दल।’

‘कॉन्फरन्सवर कथा? पण त्यात कसली आलीय कथा?’

‘का बरं? तिथे तर चमचा पडण्यापेक्षा थिमॅटिकली रेलेव्हंट अशा कितीतरी गोष्टी घडल्या!’

‘तू म्हणजे ना..!’

 

स्पाईस जेटचं प्लेन जयपूरच्या सवाई मानसिंग इंटरनॅशनल एअरपोर्टच्या धावपट्टीवर उतरू लागलं. वसिम-वर्षा आपापल्या बॅगा हातात घेऊन लॉबीमध्ये उभे राहिले. दीड-दोन तासांत ते इथे पोहचले होते. एव्हाना बाहेर काहीसं अंधारून आलं होतं. प्लेनच्या बाहेर पाय टाकताच जयपूरच्या प्राॅव्हर्बियल गुलाबी थंडीनं त्यांना वेढून टाकलं. सांताक्रूझच्या मानानं हे एअरपोर्ट फारच लहानगं वाटत होतं. ते बाहेर पडले. सी.डी.एस.चे कार्यकर्ते डेलेगेट्सच्या स्वागताचे बॅनर्स हातात घेऊन उभे होतेच. त्यांनी लगोलग हॉटेलपर्यंत नेण्याची व्यवस्था केली.

हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत दोघं पूर्ण गारठून गेले होते. विमानतळापासून हॉटेलपर्यंतच्या दहा-बारा किलोमीटरच्या प्रवासात वाटेत तीनचारदा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर जयपूरमधलं घटलेलं तापमान एखाद दोन डिग्रीच्या फरकानं आपलं अस्तित्व पुन्हा पुन्हा जाणवून देत होतं.

दिग्गी पॅलेस. नावातलं पॅलेस उगाचच नव्हतं. ही एका राजाची हवेलीच होती. जिथनं राजा आपल्या शंभरेक किलोमीटर दूरवर असलेल्या संस्थानाचा कार्यभार चालवत असे. मॅनेजरनं रूममध्ये सामान पोहचवण्याची व्यवस्था केली. आलिशान रूम. सागाचा नक्षीदार डबल नव्हे तर टिबल बेड! त्यावर व्हाइट बेडशीटस्. दोन गुबगुबीत मोठ्या रजया. भलं मोठं बाथरूम. सागाचं अँटिक फर्निचर. सर्वात महत्त्वाचं आणि अत्यावश्यक म्हणजे हीटर. वसिमनं लगेच हीटर सुरू केला.

 

राजस्थान सरकारचा या सेमिनारच्या आयोजनात सहभाग असल्यानेच इतकी श्रीमंती व्यवस्था होऊ शकली होती, हे स्पष्ट होतं. एकूण राजस्थानमधला अनुभव रॉयल असणार होता. प्लेनचं तिकीट अर्थातच सी. डी. एस. नं पाठवलं होतं. पण फक्त वर्षाचं.

तिकीट पाहून वसिम खंतावला होता. त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं. सेमिनारच्या निमित्तानं जयपूरमध्ये एक मिनी हनीमून होईल असं त्यांनी ठरवलेलं. पण हे सगळं सी.डी.एस.च्या सीमा नंदाला नीट सांगण्यापूर्वीच त्यांनी वर्षाचं तिकीट पाठवून दिलं होतं. ई-मेलनं.

वसिम ‘प्रयास’ मध्ये नसला तरी पत्रकार असल्यानं आणि त्यातही एनजीओ बीटवरच काम करत असल्यानं त्याचं येणं आवश्यकच आहे, असं सी.डी.एस.ला पटवण्याचा वर्षानं पुरेपूर प्रयत्न केला होता. त्याला फारसं यश येत नाही म्हटल्यावर तिनं आपल्या नसलेल्या गायनिक प्रॉब्लेमचा हवाला देत त्याचं माझ्याबरोबर असणं किती आवश्यक आाहे हेही कळवळून सांगितलं. तर त्यावर ‘यू डोन्ट वरी. वुई हॅव ऑल द नेसेसरी मेडिकल हेल्प अ‍ॅट हँड. माय मदर इज ए गायनॅकॉलॉजिस्ट. शी वील पर्सनली लूक आफ्टर यू.’ असा आश्वस्त करण्याच्या हेतूनं पाठवलेला परंतु यांना रेस्टलेस करून सोडणारा मेसेज पाठवला होता.

मग पुन्हा फोनाफोनी करून, मेल्स पाठवून वसिमचा येण्याजाण्याचा खर्च आम्हीच करू, पण त्याची निदान राहण्याची व्यवस्था होईल का? आणि मुख्य म्हणजे त्याला सेमिनार अटेण्ड करता येईल का याची खातरजमा करून झाली. मग मात्र सीमा नंदाने आनंदानं या गोष्टीला संमती देत वसिमचं तिकीटही पाठवून दिलं. इथं आल्यावर पैसे द्या म्हणाली. ओके. वसिम-वर्षानं नि:श्वास सोडला. पण एक प्रॉब्लेम उरला होताच. दोघांचं तिकिट एकाच प्लेनचं असलं तरी वेगवेगळ्या वेळेस बुक झालेलं असल्यानं प्लेनमध्ये वेगवेगळं बसण्याचा दुर्धर प्रसंग आपल्यावर येणार का या विचारानं वसिमच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्यात आणखी गडबड म्हणजे बोर्डिंग पाससाठी दोघे वेगवेगळ्या रांगेत उभे राहिले. प्लेनमध्ये शिरल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की एका रोमध्ये पण लॉबीच्या दोन साईडस् ना त्यांच्या सीटस् आल्या आहेत.

वर्षाच्या शेजारी आंग्लाळलेला लूक असलेली एक मध्यमवयीन बाई बसली होती. तिच्या हातात जाडजूड इंग्रजी पुस्तक होतं. वसिमनं तिला ‘एक्स्क्यूज मी’ करत ‘वुई आर टुगेदर, कॅन यू प्लीज एक्स्चेंज यूअर सीट विथ मी’ असं विचारलं. ‘ओह श्युअरली’ म्हणत ती पुस्तक बंद करत उठली आणि वसिमच्या सीटवर जाऊन पुन्हा पुस्तकात डोकं खुपसुन बसली.

प्लेनचं टेकऑफ. खरं तर ते प्लेन म्हणजे एशियाड बसपेक्षाही जास्त क्राऊडेड वाटत होतं. लॉबीच्या दोन्ही बाजूला तीन तीन सीटस्. एका लायनीत सहा सीटस्. विमानात अशा चाळीसेक लायनी. म्हणजे जवळपास अडीचशे लोक बसलेले. असं असूनही या फ्लाइंग एशियाडला नजर अंदाज करत वसिम-वर्षा एकमेकांत खोलवर बुडाले. मध्येच शेजारी झालेल्या कसल्याशा हालचालीनं वर्षानं बाजूला बघितलं तर ती आंग्लाळलेला लूक असलेली बाई त्यांच्याकडे बघत होती. वर्षानं वसिमला दापण्याचा प्रयत्न केला. पण वर्षाच्या दापण्यातला ड्रॅमॅटिकनेस वसिमला नेहमीच तिच्याकडे अधिक खेचत असे.

दिग्गी पॅलेसमध्ये पोहचल्याबरोबर एका सरदार व्हॉलंटिअरने येऊन आत्यंतिक नम्रपणे सांगितलं, की डिनरची व्यवस्था सवाई मानसिंग स्टेडियममध्ये केलीय. तुम्ही फ्रेश व्हा. मी बाहेर गाडीत थांबतो. तुम्हाला घेऊनच जाणार आहे. मग आणखी दोन-तीन किलोमीटरचा प्रवास.

तिथं पोहचल्याबरोबर समोर उलगडलेल्या दृश्यानेच वर्षा-वसिम सुखावले. पुलसाइडलाच बुफे डिनरची व्यवस्था होती. थोड्या थोड्या अंतरावर शेकोट्या पेटवल्या होत्या. आणि बहुतेकांच्या हातात ड्रिंक्सचे ग्लास होते. मागे राजस्थानी संगीताचा लाइव्ह कार्यक्रम सुरू होता. एकूण थंडीचा नामोनिशाण मिटवण्याची प्रत्येक गोष्ट तिथे हजर होती. आलेल्यांचा परिचय सीमा नंदानं करून दिला. त्यात ती प्लेनमधली आंग्लाळलेला लूक असलेली बाई पण होती. तिनं वसिम वर्षाकडं स्लाय लूक टाकला. हे कपल इथं असल्याचं तिला काहीसं आश्‍चर्य वाटलं. रात्री उशिरा ते रूमवर पोहचले.

हीटरमुळे रूम बर्‍यापैकी कोमट झालेली. वर्षाच्या पीरियडचा थर्ड डे. म्हणजे चालूचंय अजून. त्यात प्रेझेंटेशन उद्या दुपारीच असल्यानं तिनं तिचा पेपर काढला. स्टापवॉच लावून वाचला. बारा मिनिटं. प्रत्येकाला दहाच मिनिटं दिलेली होती. मग आणखी थोडं एडिटिंग करून झालं. एव्हाना एक वाजून गेला होता. उद्घाटनाचं सत्र झाल्यानंतरच्या पुढच्याच सेशनमध्ये तिला पेपर वाचायचा होता. टेन्शन.

सकाळी टेन्शनमध्येच ते उठले. ब्रेकफास्टसाठी डायनिंग रूममध्ये आले. तिथे ब्रेकफास्ट बुफेसारखा मांडून ठेवलेला. भाजीपुरी, इडलीपासून जिलेबी, गुलाबजामपर्यंत सर्व इंतजाम होता. वर्षानं सँडविच तर वसिमनं पुरी भाजी घेतली. ते बाहेर उन्हात येऊन बसले. तिथे एक फॉरेनर बसला होता. त्यानं वर्षा-वसिमला आपल्या टेबलला जॉइन व्हायला सांगितलं.

वसिमनं विचारलं, व्हेअर आर यू फ्रॉम.

ग्रीस. वुइ ऑफन कम हिअर फॉर ज्युवेलरी बिझनेस.

तेवढ्यात त्याची बायको आली. तिची ओळख त्याने दोघांना करून दिली.

सेमिनारसाठी ते दोघं आल्याचं ऐकून तो म्हणाला, वुई टू वूड हॅव लाईकड् टू अटेंड द कॉन्फरन्स. बट वुई हॅव सम वर्क टू डू.

सी यू अ‍ॅट नाईट.

सी या.

 

सेमिनार हॉल. त्यांच्या रूमपासून अवघ्या दोन मिनिटांवर. खरं म्हणजे तो हवेलीतला मुख्य राजमंडपच होता. सेंट्रलाइज्ड ए.सी. आणि मंचाच्या दोन्ही बाजूला दोन भलेमोठे डिस्प्ले स्क्रीन्स, या मॉडर्न बाबी राजमंडपाच्या एकूण पारंपरिक रचनेशी काहीशा विसंगत वाटत होत्या. उद्घाटन होणार होतं मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांच्या हस्ते. पण गुजर आंदोलनाचा भडका उडाल्याने त्या येऊ शकल्या नाहीत. अर्थात दिवसभरात त्या नक्कीच कधीतरी येऊन जातील, असं संयोजकांकडून सांगण्यात आलं.

उद्घाटन सत्र झालं. लंच ब्रेकनंतर पहिलाच पेपर वर्षाचा होता. संयोजकापैकी एकानं डेव्हलपमेंट इन द एज ऑफ ग्लोबलायझेशन या मुख्य थीमची ओळख करून दिली. वर्षानं डेव्हलपमेंट ट्रॅप्ड इन कम्युनल अ‍ॅटमॉस्फिअर या सबथीमवर पेपर तयार केला होता. तिच्या मांडणीमध्ये जसा हिंदुत्वाचा मुद्दा आला तसा कॉम्पिअर अस्वस्थ झाला. पाचव्याच मिनिटाला त्यानं वर्षाला लवकर आटपा. वेळ संपत आलीय, असं सांगायला सुरूवात केली. वर्षा गडबडली. तिनं तयारी बरोबर दहा मिनिटांची केली होती. मग काहीभाग स्किप करून तिनं पुढचं वाचायला सुरुवात केली. पण कॉम्पिअरचा धीर सुटत चालला होता. राजस्थान प्रशासनातले काही उच्चाधिकारी तिथे असल्यानं त्याला टेन्शन आलं होतं. जसा वर्षच्या मांडणीत नरेंद्र मोदींचा उल्लेख झाला तसा त्यानं पुन्हा एकदा वेळ संपल्याचं वर्षाला सांगितलं. एव्हाना सातच मिनिटं झाली होती. वर्षानं शेवटचा परिच्छेद वाचून थांबते असं त्याला सांगितलं.

I am going to end the presentation with narrating one of the most depressing happening of the recent months. I have already mentioned that hindutva and globalisation are the twin challenges that development processes face. But as is much too clear these are the challenges that India herself faces. A person who takes pride in trampling democratic values and paints himself as the most suitable boy for development in the age of globalisation has become chief minister again through apparently democratic processes. It’s the greatest mockery of democracy. How are we, as conscientious activists, going to face the invidious reality that’s the greatest challenge before us.

वर्षानं बोलणं थांबवलं. हा पूर्ण वेळ वसिम एकाग्र होऊन तिच्या उच्चारांवर, मुद्द्यांवर, चेहर्‍यावर आपसूक उमटणार्‍या हरेक विभ्रमावर लक्ष ठेवून होता. तिचं सगळं बोलणं होईस्तोवर तो खुर्चीच्या पुढच्या कडेवर सरसावून बसला होता. तिचा पेपर झाला. काही वेळ ब्रेक झाला. तीन-चार जणांनी येऊन तिचं अभिनंदन केलं. ज्येष्ठ राजकीय अर्थशास्त्रज्ञ अमियकुमार बागची यांनी वर्षाचं विशेष अभिनंदन केलं. वर्षा-वसिम हलके झाले.

नांदेडहून आलेली एक कार्यकर्ती सकाळी म्हणत होती की आज प्रणव मुखर्जीनी क्लार्कस् अमेरमधलं डिनर स्पॉन्सर केलेलं आहे. त्यामुळे ते कालच्या डिनरपेक्षाही भारी असणार! एकदम रॉयल. मागे मी एकदा दिल्लीला गेले होते तेव्हा भेटले होते त्यांना. कदाचित ओळखतीलही ते मला!

पण तिथं गेल्यावर उलगडा झाला, की प्रणव मुखर्जींनी डिनर स्पॉन्सर केलेलं असलं तरी हे प्रणव मुखर्जी वेगळे होते, मंत्रिमहोदय नव्हे! हे मुखर्जी आर्टिस्ट होते. त्यांनी महाश्वेता देवीच्या एका कथेवर आधारित ‘अँड द डेड ट्री गिव्हज् नो शेल्टर’ असा एक दीर्घांक बसवला होता. जो डिनरपूर्वी सर्वांनी पाहणं आवश्यक होतं! त्यामुळं सीमा नंदानं सगळ्यांना बागेत गोल करून बसवलं. जयपूरचं तपमान तीन डिग्री सेल्सियसपेक्षा खाली उतरलं होतं. पण नाटक पाहिल्याशिवाय डीडीमुक्ती नव्हती. डिनर अँड ड्रिंक्स.

अतिशय पॉलिश्ड प्रयोग. इंटिमेट शो. इंटुक – अॅंटीलेफ्ट शो. प्रयोग पावणेदोन तासांचा. दीडेक तासांचा भाग संपल्यावर सीमा नंदा आली आणि प्रत्येक डेलेगेट्सच्या कानाशी लागत म्हणाली, इफ यू डोन्ट वॉन्ट टू टॉर्चर युअरसेल्फ इन द कोल्ड, यू कॅन गो फॉर डिनर. इटस् रेडी! म्हणजे डिनर अ‍ॅरेंजमेंट होईस्तोवरच नाटकाचं महत्त्व होतं तर! पडत्या फळाची आज्ञा मानून काहीजण उठले. काहीजण बसूनच राहिले. वर्षानं वसिमला ओढून नेलं. आणि मग डीडी. जेवताना जवळपास सर्व टेबलांवर प्रणव मुखर्जींच्या नाटकावर चर्चा चालू होती. ‘मुझे तो बिल्कूल अच्छा नही लगा. महाश्वेता देवी की स्टोरी की कितना डिस्टॉर्ट किया है’, ‘इटस् लाइक युजिंग रेव्होलेश्युनरी मेथडस् ऑफ स्ट्रीट प्ले टू कन्व्हे अँटी रेव्होल्युशनरी मेसेज!’ वगैरे वगैरे.

जेवून वर्षा वसिम दिग्गी पॅलेसला परतले. तोवर रात्रीचे साडेबारा झालेले होते. प्रेझेंटेशन संपल्यानं वर्षा काहीशी रिलॅक्स झाली होती. वसिम पण जाम खूश होता. विशेषत: रात्री डिनरमध्ये पिण्याची सोय यदाकदाचित नसली तर अडचण येऊ नये म्हणून त्यानं सकाळीच घेतलेली ओल्ड मंकची बाटली अबाधित राहिली होती.

झोपायच्या तयारीत असताना ती नाइटसूट चढवायला लागली तसा तो तिला म्हणाला, ‘अगं, कशाला घालतेस? दिवसभर तर गुंडाळून बसली होतीस ना कपड्यांवर कपडे. लेटस् स्लीप स्टार्क नेकेड इन द जयपूर पिंक कोल्ड!’

‘नाही! माझे तर दात वाजताहेत कडाकडा.’

‘अगं पण दोन दोन रजया आहेत ना. त्या घेऊ एकावर एक.’

‘नाही.’

‘पण का?’

‘मला झोपायचंय.’

‘मला पण झोपायचंय ना! मी काही करत नाही तुला. एकमेकांना चिकटून झोपायला काय हरकत आहे?’ तो तिचे कपडे काढू लागला.

‘तू माझ्यावर जबरदस्ती करतोयस.’

‘हीटर आहे सुरू. रूम तापेल ना हळूहळू.’

‘एकदा नाही म्हटलं की नाही. तू झोप हवं तर कपडे काढून.’ वर्षानं बेडवर आडवं होत रजई डोक्यावरून ओढून घेतली.

वसिम वैतागला. तो आधीच नागवा झालेला. मग खाली जमिनीवर नुसत्या कार्पेटवर जाऊन झोपला.

वर्षानं पाहिलं. ती पण वैतागली.

वसिम, वेडेपणा करू नकेस. प्रचंड थंडी आहे. असा काय झोपतोस? अशानं आजारी पडशील, वर ये.

तुझ्या शेजारी?

नाही. तिकडं.. पलीकडे.

मग मी येणार नाही. तू झोप ना निवांत. मी हीटरसमोर झोपलोय ना! तुझा काय प्रॉब्लेम आहे?

वर ये ना रे!

नाही.

वर्षानं बरीच तणतण केली. पण ती बेडखाली उतरली नाही. मग चिडवत म्हणाली, तुला थंडी वाजत नाही ना? मग बाथरूममध्येच जाऊन झोप ना!

वसिम उठला आणि तडक बाथरूमध्ये गेला. तिथं लटकवलेला टर्किश टॉवेल त्यानं खाली पसरला आणि त्यावर झोपून गेला. दुसरा टॉवेल अंगावर ओढून घेतला. वर्षा त्याला हाका मारत राहिली.

पण तो ओही देईना.

इतका वेळ बाथरूममध्ये काय करतोय म्हणून वर्षा बघायला गेली तर हा तिथं झोपलेला!

वसिमनं डोळे बंद करून घेतले होते. ती जवळ येईल असं त्याला वाटत होतं.

काय करावं तिला समजेना. एकदम काहीतरी तिच्या डोक्यात लकाकलं. ती मेन डोअर उघडून बाहेर आली. आणि रूमबाहेरच्या अंधार्‍या कॉरिडॉरमध्ये थोड्या अंतरावर असलेल्या केनच्या सोफ्यावर जाऊन लवंडली. गुडूप अंधारात ती त्याला दिसणं शक्यच नव्हतं. शेवटी तिला हवं तसंच घडलं. दरवाजा उघडल्याचा आवाज त्यानं ऐकला होता.

ही बाहेर गेली की काय? आता मात्र त्याची फाटली. धडपडत तो उठला. घाईघाईनं कपडे घालून रूमबाहेर पडला.

कॉरिडॉरमध्ये वेड्यासारखा फेर्‍या मारू लागला. तिला सगळं दिसतं होतं. त्याची प्रत्येक हालचाल ती टिपत होती. तिला हसू येऊ लागलं. कशी खोड मोडली. त्रास काय फक्त यालाच देता येतो आपल्याला?

कुठे गेली? इतक्या रात्री हॉटेलमधून बाहेर पडलीय, तिला कुणी धरलं तर?

तो तिला हाका मारू लागला.

त्यांच्या सुइटच्या मागे एक कौलारू बसकं घर होतं. तिथं जाऊन त्यानं पाहिलं. तिचा पत्ता नाही. मग तो समोरची लॉन क्रॉस करून हॉटेलच्या मुख्य व्हरांड्यात आला. तिथं काही मुलं त्याला दिसली. त्यांना विचारावं की विचारू नये त्याला कळेना. किती विचित्र गोष्ट ना, की याची बायको या वेळेला बाहेर पडलीय आणि तो तिला शोधत फिरतोय!

वर्षा पण एकदम ठार वेडीय. रात्रभर भटकत बसेल कुठे कुठे.

कुणालाच काही न विचारता त्याने अख्खं दिग्गी पॅलेस पालथं घातलं. कुठेच ती दिसेना.

वसिमला कडक थंडीत घाम फुटला.

पुन्हा तो रूमवर आला. तर रूममध्ये वर्षा बेडवर झोपलेली. वसिम तिला जाऊन बिलगला. कुठे गेली होतीस? मुंबई वाटलं की काय तुला हे? किती घाबरलो मी… एकदम रडायलाच लागला.

त्यावर ती कशी जिरवली म्हणत हसू लागली. हसता हसता तिचे डोळेही तुडुंब भरून आले.

पुन्हा मस्ती करत, खिदळत दोघं एकमेकात बुडून गेले.

..रात्री कधीतरी महाश्वेता देवींच्या कथेतली श्रीमंत पालकांच्या मुलांना स्तनपान करून करून खंगत गेलेली नायिका आणि प्रणव मुखर्जी वर्षाच्या स्वप्नात आले. पण स्वप्नातला प्रणव मुखर्जी नाटकवाला नव्हता, मंत्रिमहोदय होता. तो तिच्या लोंबणार्‍या सुरकुतलेल्या थानातून तिला अनिवार प्राशून घेत होता. आणि नायिका मायेनं त्याच्या केसावरून हात फिरवत स्वत:लाच कोसत होती. असा कसा आटला माझा पान्हा? इतका कसा आटला?

प्रणव मुखर्जींच्या त्वचेला हजारो जिभा फुटल्या होत्या. काळ्याकभिन्न अंधाराला लपालपा गिळून टाकणार्‍या जिभा.

 

आज शेवटची रात्र जयपुरातली. कॉन्फरन्स संपलेली असल्यानं दिल्लीपर्यंतचे पार्टिसिपंटस् लगेच निघून गेले. ज्यांचं फ्लाइट सकाळी होतं, असेच दूरदूरचे काहीजण थांबलेले. मग आजच्या डिनरची सोय आणखी चौथ्या ठिकाणी केलेली. तिथे जायला आज बस होती. हे हॉटेलमात्र जयपूर शहरातलं होतं. आकारानं छोटंच वाटलं बाहेरून पण आत गेल्यानंतर कळलं की तिथे एक अंडरग्राऊंड फ्लोअर होता. क्युबिकल हॉटेल. हॉटेलच्या एकूण रचनेपासून ते फर्निचरपर्यंत ब्राईट कलर्सचे चौकोन. डिनरमध्ये फारसा चॉईस नव्हता. तीनचार आयटम्स. ड्रिंक्समध्येही दोन दिवस होता तसा वाईड चॉईस नव्हता. पण आज पिऊ नये की काय असा विचार दोघांच्या मनात घोळत होता. मग सीमा नंदाच्या नवऱ्यानंच आग्रह केला. ग्लास भरले. चिअर्स म्हणून सुरुवात करताच अमिय कुमार बागची आणि अलाहाबादचा एक हिंदीचा प्राध्यापक तिथं आले.

‘मे वुई जॉईन यू, मॅडम?’

‘ग्लॅडली.’

वसिमनं त्यांना विचारलं, ‘विल यु टेक व्होडका? वुई आर हॅविंग इट.’

बागचींनी वाईन घेतली. ‘आय एम ए लव्हर ऑफ वाईन, नो आदर ड्रिंक.’

वसिम-वर्षा बागचींच्या एकूण पर्सनॅलिटीनं फ्लोअर झालेले. बेंगॉली बाबू. त्यात व्हेटेरन पोलिटिकल इकॉनॉमिस्ट. ओरिजिनल स्टॉलवर्ट. चेहर्‍यावर सॉफ्टनेस. वसिमला तर बागचींना बघून हबीब तन्वीर, अम्लान दत्त, राम बापटांची आठवण झाली.

‘आय डीड माय पोस्ट ग्रॅज्युएशन इन पोलिटिकल सायन्स, आय अ‍ॅम स्टुडंट ऑफ राम बापट, राजेंद्र व्होरा…’

‘आय हॅव मेट बापट कपल ऑफ टाइम्स. हर्ड हिम स्पीक.’

हिंदीचा प्राध्यापक वर्षाच्या पिण्यानं फ्लोअर झालेला.

‘आप अपेले आये है?’

‘मै अकेला ही हूँ.’

‘आप ने शादी नही की?’

वर्षा खळखळून हसली. ती बागचींकडे वळत म्हणाली, ‘वुई हॅव रिसेंटली मॅरिड.’

‘दॅट लूक्स! आय लाईकड् युवर प्रेझेंटेशन, वर्षा. ग्लोबलायझेशन अँण्ड कम्युनॅलिझम आर द ट्विन चॅलेंजेस टुडे.’

वर्षाची नसलेली अन् वसिमची असलेली कॉलर ताठ झाली होती.

जयपूर एअरपोर्टवर लगेजच्या चेकअपच्या वेळी वसिमच्या बॅगेतली जयपूरातली ओल्डमंकची बाटली स्कॅनरमध्ये सी थ्रू झाली. काहीतरी क्रिमिनल अ‍ॅक्टिव्हिटी घडल्यासारखा प्रसंग तिथे क्षणार्धात उभा राहिला. रांगेतले मागचे सगळे इंटरेस्टनं वसिम-वर्षाकडे बघू लागले. वसिमचा चेहरा कसनुसा झाला.

ही बॅग तुम्हाला तुमच्याबरोबर नेता येणार नाही.

पण..

लगेजमध्ये पाठवा.

ती बाटली ओतूनच देऊयात ना, वर्षानं सुचवलं.

ओतताय कशाला, या सिक्युरिटीलाच द्या ना, खूश होतील ते, रांगेतल्या मागच्यानं सुचवलं.

यातलं काहीही करणं वसिमनं नाकारलं. सगळे आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करत त्यानं बॅग सिक्युरिटीच्या ताब्यात दिली.

अशा तऱ्हेनं जयपुरातली ओल्डमंक मुंबईला सिव्हिल मार्गानं पोहचली. तिच्याबरोबर अर्थातच वसिम-वर्षा पण.

‘पण हे सारं झालं डिटेलिंग – जशाच्या तशा पडलेल्या चमच्याला जसाचा तसा पर्याय म्हणून. पण ही कथा आहे ना गं? समजा दामटून कथा म्हणायचं ठरवलं तरी तिच्यातलं मुख्य आशयसूत्रं कोणतंय मग?’

‘ते शोधायला आपण हरिश्चंद्र थोरात नाही तर उदय रोटेला सांगूयात ना. आजचे आणि उद्याचे समीक्षक ना ते! उगाच आपल्या डोक्याला नस्ता ताप कशाला?’

‘पडलेल्या चमच्याची कथा’ ही कथा अफवा खरी ठरावी म्हणून (शब्द पब्लिकेशन्स, मुंबई, दुसरी आवृत्ती, २०१०) या कथासंग्रहातून घेतली आहे.

प्रज्ञा दया पवार या मराठीतील दलित-स्त्रीवादी कवयित्री आहेत. त्या कथा आणि नाट्य-लेखनाबरोबर स्तंभलेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *