प्रदीप वैद्य

कहाणी‘गजब कहाणी’ची



back

२०१० च्या ऑगस्ट-सप्टेंबरमधली गोष्ट असेल. मी दुपारी भाजी किंवा काहीतरी खरेदी करत असताना मोहितचा कॉल आला. त्याने मला एका कादंबरीबद्दल सांगितलं आणि म्हणाला की या कादंबरीवर काही सुचतंय का ते पाहा ना? मोहितने यापूर्वी असं बऱ्याचदा केलं होतं आणि त्या त्या वेळी मी त्याने सांगितलेल्या त्या ऐवजावर काही काम करावं नि ते मोहितला आवडावं असंच आमच्यातलं समीकरण तोवर झालं होतं. एरवी मोहित असं जे काही असे ते स्वतः घेऊन येत असे आणि माझ्या हातात ठेवत त्यावर काम करायला सांगून जात असे. यावेळी मात्र मोहित पुण्यात नव्हता त्यामुळे त्याला ज्या कादंबरीचं नव्या नाटकाच्या शक्यतेसाठी महत्व वाटत होतं ती मलाच शोधावी लागणार होती. खरं तर त्या दिवशी इतर काहीच काम नव्हतं असं नाही. पण तो काळच आमच्या झपाटलेपणाचा काळ होता. मी तेव्हा डेक्कन भागात होतो. हातातलं काम झटपट संपवून मी डेक्कनच्या एकदोन दुकानांमधे चाचपणी केली पण तिथे काही ती कादंबरी मिळेना तेव्हा सरळ वेस्टएन्डला जायचं ठरवलं. रिक्षा केली आणि कॅम्पात गेलो. तिथे ते पुस्तक माझी वाट बघत असल्यासारखं समोरच मांडलेलं, किंवा मांडणीत उभं असलेलं मला दिसलं .. किंवा चक्क ‘भेटलं’ असंच म्हणता येईल. 

जोझे सारामागो: An Elephant’s Journey

तसं चांगलं जाडजूड पुस्तक बरं का.. ते पुस्तक झटक्यात उचलत त्याच पावली मी परतलो. आणखी काही काही कामं होती बाहेरची ती करताना लक्ष मात्र सतत त्या सोबतच्या पुस्तकात घोटाळत होतं. या पुस्तकाबद्दल सांगताना मोहित मला एवढं नक्की म्हणाला होता की हत्ती, माहूत आणि त्यांचं भारतीय असणं या सगळ्यातून तुला काही जुळवता आलं तर बघ. 

मी कादंबरी वाचू लागलो तसा तिच्यातून बाहेरच पडू शकत नव्हतो. पानामागे पान, प्रकरणामागे प्रकरण वाचतच गेलो. आजकालच्या बिंजवॉचिंगप्रमाणे ..  विलक्षण वेगळाच अनुभव देणारं लेखन माझ्या समोर होतं. उपहासाने ओतप्रोत भरलेली वर्णनं, शालजोडीत लपेटलेला विनोद, बखरींची असावी तशी जुनी आणि लांबलांब वाक्यांची भाषा, सतत काही न काही विरोधाभासाने रंगलेलं चित्र उभं करत नेण्याची हातोटी आणि एक से एक वाक्यं समोर आणत चाललेलं हे पुस्तक जवळजवळ एका बैठकीतच मी वाचून पूर्ण केलं.

यातून काही नाटक होऊ शकेल का हे बघ असं सांगून कुणी वाचायला सांगितलेलं असल्याने अधूनमधून हा विचार डोक्यात घुमायला लागून चित्त विचलित होत होतंच. मग ते नाटकाच्या विचारातलं रमणं बाजूला सारून पुन्हा मूळ कादंबरीवर चित्त आणावं लागत होतं. 

एकूणात कादंबरी वाचून झाल्यावर मी जोझे सारामागो आणि ही कादंबरी यांच्याबद्दल वेबवर जे जे मिळालं ते ते वाचत गेलो. आधीपासूनच कम्यूनिस्ट पार्टीचे सदस्य असलेले सारामागो शेवटची काही वर्षं स्वतःला ‘नॉन कन्फॉर्मिस्ट’ मानू लागले होते हे माझ्या वाचनात आलं.  मूलभूत मानवी मूल्यांची बेमुर्वतपणे होणारी तुडवातुडव, सार्वजनिक पातळीवर पसरवली जाणारी धादांत असत्यं, राजकारण्यांमधली मानवतेविषयीची अनास्था आणि असंवेदनशीलता हे मुद्दे त्यांच्या लेखनात  वारंवार येतात. धर्म आणि त्या संबंधात लिहिताना अनेकदा देव, येशू यांचं चित्रणही मानवांप्रमाणे स्खलनशीलच, नव्हे तर प्रसंगी क्रूर केल्यामुळे अनेकदा ते वादाच्या आणि राजकीय सेन्सॉरशिपच्या कचाट्यात सापडलेही होते. सारामागो वारल्यानंतर साधारण वर्षभराने मी त्यांचं लेखन वाचायला सुरूवात केली होती. 

कादंबरीचं कथानक एका वाक्यात सांगायचं तर ही एका हत्तीच्या, राजकीय मनसुब्यांमधून उद्भवलेल्या  युरोपातल्या यात्रेची कहाणी आहे. पण या कादंबरीचा पसारा मात्र भरपूर मोठा आहे. लवाजमा असावा तसा अगदी. राजेराण्या, सरदार, सरंजामी कारभार, विक्षिप्त निर्णय, लहरीपणा, सैनिकांचे ताफे, शहरात स्वागत करायला येणारी जनता, इतर कर्मचारी असं बरंच काही आणि त्यात या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेले सॉलोमन (हत्तीचं नांव) आणि शुभ्रो हा माहूत. पण नाटक करायचं तर ते आटोपशीर असणं महत्वाचं होतं. विचारचक्र सुरू झालं. मी मग कागदावर आराखडे करू लागलो. हत्ती कुठून निघाला कुठे कसा कसा नेला गेला .. आणि या सगळ्या प्रवासातले महत्वाचे टप्पे / घटना कोणत्या वगैरे लिहून, नव्हे कागदांवर रेखाटलं. नकाशे पाह्यले. सध्या हा सर्व भाग कोणकोणत्या राजकीय सीमारेषा मिरवतो आहे याचा अभ्यास केला.  सन १५५१ मधल्या ज्या राजेरजवाड्यांचे उल्लेख कादंबरीत आहेत त्यांच्याविषयी काही मिळतं का पाहू लागलो. आणि या सगळ्यातून माझ्या हाती नाटकाच्या कथावस्तूची साधारण आठ प्रकरणं लागली. मी नाटक लिहायला घेतलं. साधारण दिवाळीच्या आधीचा काळ होता. मला नाटकाचं पहिलं प्रकरण दिसायला लागलं ते सॉलोमन हत्तीच्या युरोपातल्या एका ठिकाणी पडलेल्या मुक्कामाच्या एका रात्रीचं. नाट्यलेखनाबाबत एक संकेत असतो. हा संकेत काही मी तेव्हा शिकलो नव्हतो. पण इतरांच्या नाटकांच्या अनाहूत अभ्यासातून मला तो आत्मसात झाला होता आणि नंतर रंगभानच्या निमित्ताने झालेल्या अभ्यासात मला तो शब्दांत मांडता येऊ लागला असा संकेत. तो असा की, कथानकाच्या कालपट्टिकेवर जितक्या पुढे (नंतर) सुरूवात करता येईल तितक्या पुढे नाटकाची सुरूवात केली पाहिजे. माझ्या या नाटकाची सुरूवात कादंबरीच्या कथानकाच्या साधारण पहिल्या पंचमांशानंतर होत होती याचं मला समाधान वाटलं. या लेखनाला नांव काय असावं याबद्दल नंतर बराच खल झाला आणि शेवटी गजब कहाणी असं नांव ठरलं, पण लेखन सुरू करताना ‘हत्तीच्या यात्रेला’ असं ‘वर्किग टायटल’ मी दिलं होतं. या संपूर्ण कादंबरीची कथनात्मक आणि अतिरंजित भाष्यांची जी शैली आहे ती मला तशीच ठेवायची होती हे माझं ठरलं. बखर सांगितली जात असावी असा एकूण खाक्या सांभाळायचा हे ठरलं होतं. ते करताना मला एक वेगळाच लहजा सापडू लागला होता आणि त्याची एक वेगळी गंमत मला जाणवू लागली होती. त्यामुळे नंतर नंतर तो मी काही ठिकाणी जाणीवपूर्वक साधायचा प्रयत्न करू लागलो. म्हणजे असं की लांबलचक वाक्यामधे, अमुक, तमुक, ढमुक अशा चार पाच सहा गोष्टी चालू असतानाच सातवी गोष्ट होत होती हे सांगणं .. म्हणजे त्या कथनात हे होत असतानाच, त्यात दुसरीकडे ते होत असतानाच .. असतानाच.. असतानाच .. असं फिरत फिरत ते वाक्य एखाद्या महत्वाच्या (नाट्यपूर्ण संदर्भावर येऊन) आदळायचं किंवा आदळवायचं.  उदाहरणार्थ

२ :   आणि त्या तशा रात्री .. या दूरदेशीच्या आकाशावर, रात्र सरकून चांगलीच वर आली असताना, आणि त्याचवेळी चंद्रावरती, एक मोठा ढग आला असताना, आणि त्या ढगामुळे, सगळ्या जमिनीवर, काळा रंग चढला असताना .. मी त्या काळ्या सावल्यांसारख्या झाडांखाली, म्हणजे, माझ्या पोटात, बेंबीखाली, जोराची कळ आलेली असताना, आता हा एकच पर्याय उरला, म्हणून जवळच्या एका टेकाडावर चढलेला असताना, आणि बरी जागा बघून, सोबतच्या शिपाईगड्यांकडे पाठ करून, माझी तुमान खाली सरकवून, पोटातली कळ, तिथे खाली, जमिनीवर सरकवत असतानाच, चंद्रावरून तो एक मोठा ढग, बाजूला सरकला, आणि मला जो देखावा समोर दिसला, त्यामुळं, माझ्या तोंडून नकळत बाहेर पडलं ”हा ss !” आता त्या दूर देशीच्या शिपाईगड्यांना, माझं नि मला त्यांचं, बोलणं काहीही कळत नसताना .. माझ्याकडं पाठ केलेल्या त्या शिपायांना वाटून गेलं, की, माझी कळ थांबल्याचाच हा परिणाम .. ते आपले त्यांच्याच नादात गुंतलेले असताना .. आता, मला काय दिसलं, ते त्यांना काय ते सांगायची, नवीनच घाई, माझ्या पदरी आली .. घाईघाईनं, तिथलंच गवत उपटून, मी स्वतःची साफसफाई करायला वापरून, आणि घाईघाईतच, तुमान वर सरकवताना, ”ही खाजखुजली तर नसेल” अश्या विचारात पडलेला असताना, त्या शिपायांपाशी आलो, आणि मला जे दिसलं होतं ते त्यांना सांगू लागलो ..

अशा प्रकारच्या वर्णनांच्या आणि वेगळ्या भाषेच्या नाट्यमयतेशी मी तादात्म्य पावू लागलो. त्यामुळे अर्थातच माझं मला (लिहिताना मजा येत असली तरी) हे कळत नव्हतं की नाटक म्हणून हे कसं वठेल. मी पहिला प्रवेश लिहून पूर्ण केला ते दिवस धनत्रयोदशीचा होता. मी मनात हूरहूर घेऊनच तो प्रवेश मोहितला ईमेलने पाठवला. मला वाचत असताना गंमत तर वाटत होती, पण इतरांना काय वाटेल? हा प्रश्न त्यांनी वाचून काही कळवल्यावरच सुटणार होता. दिवाळीच्या दिवसांत आमचा नात्यातल्या काहीजणांचा एक ग्रूप आहे तो ग्रूप न चुकता भेटत असतो. दिवाळीच्या फराळासाठी आम्ही सगळे त्या दिवशी सकाळी जमलो होतो आणि तेव्हाच फोन वाजला. मोहित-सागर फोनवर होते. तो कॉल त्यांनी पहिल्या प्रवेशाचं वाचन संपल्यासंपल्या लगेचच न राहावून केला होता. त्यांना ते सगळंच फार आवडलं होतं आणि त्याची मजा येऊन येऊन ते हसायचे थांबतच नव्हते. पाऊण तास तरी हा कॉल चालला.. नातेवाईक जरा वैतागलेच पण माझ्यासाठी हा कॉल, पुढे जायची अपरिमित ऊर्जा देऊन गेला. 

पहिल्या प्रवेशात मला जाणवलेल्या आठ प्रकरणांपैकी दोन प्रकरणं एकत्र आली होती. त्यामुळे पुढे आणखी सहा प्रवेश लिहिले आणि मी नाटक आटोपतं घेतलं. काही पसारा मी मुद्दामच टाळला. हत्ती व्हिएन्नाला पोहोचल्यानंतर थेट उपसंहार केला आणि नाटक संपवलं. 

या संपूर्ण कथेच्या नाटकातल्या प्रत्यक्ष कथनासाठी हत्ती, हत्तीचा माहूत आणि त्यांच्या जथ्थ्याचा म्होरक्या अशी तीन पात्रं मी योजली होती. म्होरक्या हा त्या जथ्थ्यातले विदेशी सैनिक आणि हत्ती किंवा शुभ्रो यांच्यातला दुवा म्हणूनही महत्वाचा होता. मोहितने जिबरीश म्हणजे बडबड भाषेचा वापर इतर सैन्यासाठी केला. ही भाषा त्याने स्पॅनिशसारखी वाटणारी राखली. पहिलं प्रकरण वाचून झाल्यावर जेव्हा हे नक्की झालं की हत्तीच्या भूमिकेत गीतांजली कुलकर्णी असेल, तेव्हा हत्तीच्या वाट्याला कोणते मजकूर येतील, माहूत शुभ्रोच्या वाट्याला कोणते आणि म्होरक्याच्या वाट्याला कोणते या निवडीसाठी मला नेमके आधार सापडत गेले. 

काही ठिकाणी मी स्वातंत्र्यही घेतलं. सारामागो यांची कादंबरी काही राजकीय भाष्य करतेच. त्याची धार रंजनात्मक परिणाम न घालवण्याइतपतच ठेवली. मला हे नाटक कोणत्याही एकाच विचारसरणीच्या दावणीला बांधायचं नाही आहे, हे ही मी ठरवलं होतं. माझं लेखन मानवता, संवेदनशीलता आणि शब्दांच्या पलिकडे असलेल्या नेणिवेतल्या बाबींभोवती विशेषतः केंद्रित होत राहिलं. राजकीय व्यक्ती, राज्यकर्ते आणि त्यांच्या असंवेदनशीलतेवरचा उपहास अर्थातच राखला गेला. एकूणात राज्यकर्त्यांची अवडंबराची आणि कांगावखोर मानसिकता आणि तिच्या समोर कोमल असं नातं. सहृदयता, संवेदना यांची होणारी गळचेपी, पायमल्ली अशी सर्व रचना मला दिसू लागली. आणि ती मी करत गेलो. 

एकूणात या कादंबरीचं नाटक होऊ शकेल असं सामान्यतः कुणाला वाटलं नसेल, तर ते आम्ही केलं, करू शकलो. याचा आनंद आहेच पण त्याहीपेक्षा आनंद याचा आहे की ते सर्व माझ्यापासून सुरू होऊ शकलं. मी मोहितसाठी अनेक रूपांतरं केली. पण ती सर्व मूळ नाटकंच होती. इथे एक कादंबरी होती, ती ही इतकी वेगळ्या ढंगाची. कादंबरीतून नाटक साकारत गेलेले हे ‘गजब कहाणी’चं हे रूपांतर त्यामुळेच अतिशय वेगळंच आहे. पुढे त्याचं हिंदी रूप साकार होतानाही माझ्या मूळ मराठी रूपांतरापासून ते जास्त ढळू शकलं नाही हे ही मी इथे आवर्जून सांगेन. 

या लेखानतही माझा एक प्रवास होता आणि हा सर्व प्रवास मला नाट्यक्षेत्रात आज मी जिथे आहे तिथे आणण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा मानतो मी. त्यामुळेच या मूळ कादंबरीच्या सुरूवातीलाच लिहिलेलं हे वाक्य मला या सर्व प्रवासानंतर महत्वाचं वाटतं: In the end, we always arrive at the place where we were expected!

***

प्रदीप वैद्य यांनी केलेले जोझे सारामागो: An Elephant’s Journey या कादंबरीचे गजब कहाणी या नावाने केलेले नाट्यरुपांतर ‘हाकारा’च्या २० व्या आवृत्तीत वाचायला मिळेल. आसक्त,पुणे निर्मित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित गजब कहाणी या नाटकाचे अनेक प्रयोग महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेर केले आहेत.

छायाचित्र: आसक्त, पुणे.

प्रदीप वैद्य हे नाट्यप्रशिक्षक, लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार,संगीतकार आणि प्रकाशयोजनाकार म्हणून ३५ वर्षे सतत कार्यरत. नाट्यलेखक आणि रूपांतरकार म्हणून प्रायोगिक रंगभूमीवर विपुल प्रमाणात काम केलं आहे. रूपांतरित केलेल्या नाटकांपैकी चैत्र (मूळ – फाल्गुनी/रविंद्रनाथ टागोर), तिची सतरा प्रकरणे (मूळ – Attempts On Her Life – Martin Crimp), एक रिकामी बाजू (मूळ – Tissue – Louise Page), गजब कहाणी (मूळ कादंबरी – An Elephant’s Journey – Jose Saramago) आणि उणे पुरे शहर एक (मूळ – बेंडा काळू ऑन टोस्ट गिरीश कार्नाड) ही नाटकं खूप गाजली. सध्या प्रदीप वैद्यलिखित काजव्यांचा गांव, हुताशनी, कोरा कॅनव्हास आणि उत्खनन ही नाटके रंगमंचावर सादर होत आहेत. नाट्यक्षेत्रातील आश्वासक कामगिरीबद्दल डॉ. श्रीराम व दीपा लागू यांच्या रूपवेध प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार हा पुरस्कार २०१२ मधे प्रदीप वैद्य याला दिला गेला आहे. अभिनेत्री आणि लेखिका असलेली त्याची पत्नी रुपाली भावे हिच्यासोबत, पुण्यात “द बॉक्स” या नव्या प्रकारच्या कला-अवकाशाची निर्मिती त्याने अलिकडेच केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *