मूळ इंग्रजी लेख: नरेश दधीच

भाषांतर: सुनील तांबे

काळा आणि पांढरा असंच का?



back

काळा आणि पांढरा असंच का? राखाडी रंगछटांचा पट का नाही?

काळा आणि पांढरा हे दोन विरुद्ध रंग आहेत हे खरं परंतु काय काळं आणि काय पांढरं हे निश्चित करणारी त्यांच्यातील भेदरेषा अतिशय सुस्पष्ट आहे. प्रचलित शब्दकोशानुसार त्यांची सांगड डिजीटल वा अंकात्मक सुस्पष्टपणा दर्शवणार्‍या ० आणि १ म्हणजे हो आणि नाही, यांच्याशी घालता येईल. त्यामध्ये अनिश्चितता, दुविधा, अस्पष्टता यांना वावच नाही. त्यामुळे निश्चिततेचं निखालस कोडगेपणाने प्रदर्शन केलं जातं. कोणत्याही बाबीसंबंधात परिपूर्ण विधान करणं शक्य आहे का असा प्रश्न निर्माण होतो. ही परिपूर्णता मोजायची कशी?

मोजमापाचा प्रश्न आला की आपण अर्थातच आधुनिक विज्ञानाकडे वळतो. कारण सध्या तरी भरवसा ठेवण्याजोगी सर्वाधिक शक्तीशाली पद्धत तीच आहे. निखालसपणे परिपूर्ण विधान विज्ञान करतं का? असा मूलभूत प्रश्न उपस्थित केला तर त्याचं उत्तर—नाही. विशिष्ट गृहितकाच्या म्हणजे त्याची चौकट आणि त्या चौकटीच्या यथार्थतेची हमी या मर्यादेतच, वैज्ञानिक विधानं केली जातात. विज्ञानामध्ये चौकट बदलते, किंबहुना चौकटीचा अधिक विस्तार केला जातो. कारण नव्याने गवसलेल्या गहन प्रश्नाची सोडवणूक अस्तित्वात असलेल्या चौकटीत करणं अशक्य असतं. त्यासाठी अस्तित्वात असलेल्या चौकटीचा विस्तार करणं हेच उत्तर असतं. उदाहरणार्थ, न्यूटनच्या स्थितीगतीशास्त्रात सर्व पदार्थांच्या गतीचं विवरण आहे परंतु, प्रकाशाच्या गतीचं विवरण नाही. प्रकाश असतो आणि तो प्रवाही असतो, त्यामुळे त्याच्या गतीचा समावेश स्थितीगतीशास्त्रात व्हायला हवा तरच सर्व प्रकारच्या गतींचं विवरण शक्य होईल. अवकाश आणि काळ स्वतंत्रपणे परिपूर्ण आहेत ही न्यूटनच्या सिद्धांताची चौकट आहे. प्रकाशाच्या गतीला स्थितीगतीशास्त्रात सामावून घ्यायचं असेल तर आईन्स्टाईनने शोधलेल्या अफलातून सिद्धांताकडे—अवकाश व काळ यांच्या मीलनाच्या चौकटीकडे आपल्याला यावं लागतं. या सिद्धांतामध्ये अवकाश आणि काळ अलग नाहीत तर दोन्हींनी मिळून एक पूर्ण तयार होतं. चौकटीचा विस्तार करण्याचं हे अप्रतिम उदाहरण आहे. त्याचा साधा अर्थ असा की अवकाश आणि काळ या स्वतंत्र वस्तू नाहीत, त्यांचं अस्तित्व स्वतंत्र नाही. तर या दोन्ही बाबी प्रकाशाच्या वेगाने जोडलेल्या आहेत. आणि प्रकाशाचा वेग सर्व चौकटींमध्ये एकच असतो. वैश्विक गतीची संकल्पना ही यातली मेख आहे. ही संकल्पना न्यूटनच्या स्थितीगतीशास्त्राच्या चौकटीत सामावणं अशक्य होतं. कारण न्यूटनच्या स्थितीगतीशास्त्राच्या चौकटीत गती निरीक्षकाच्या स्थानावर अवलंबून होती. ट्रेनच्या गतीचं उदाहरण घेऊ, प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या निरीक्षकाला ट्रेन गतिमान आहे हे दिसतं तर ट्रेनमध्ये बसलेल्या निरीक्षकासाठी ट्रेन स्थिर आहे (ट्रेनला खिडक्या नाहीत आणि तिला धक्के बसत नाहीत हे गृहित धरल्यास).

चौकटीच्या विस्ताराची नोंद इथे करायला हवी. प्रकाशाचा वेग कुठूनही मोजला, ट्रेनमध्ये वा ट्रेनच्या बाहेर, तरी एकच असतो. निरीक्षक कुठेही असला तरी प्रकाशाचा वेग एकच मोजेल. म्हणून प्रकाशाच्या गतीला वैश्विक गती म्हणतात. त्यामुळे अवकाश आणि काळ या वैश्विक मिती, वैश्विक वेगाशी जोडल्या गेल्या. त्यामुळेच सापेक्षतावादाच्या सिद्धांताने न्यूटनच्या चौकटीचा विस्तार करून त्यामध्ये प्रकाशाच्या गतीला सामावून घेतलं. ही नव्या ज्ञानोदयाची क्रांती होती. त्यामुळे विश्व आणि निसर्ग यांच्याकडे पाहाण्याचा नवा आयाम हाती लागला. संकल्पना आणि आकलन यामध्ये क्रांती झाली.

केवळ गहन प्रश्न उपस्थित केला म्हणून हे घडलं असं सोपं स्पष्टीकरण देता येणार नाही. नैसर्गिक घटितांचा छडा लावणं हे सोपं नसतं. नैसर्गिक घटितांची सुसंगत मांडणी करणं, त्यांचा एकमेकांशी असलेल्या संबंधांची उकल करणं यासाठी अनेक बुद्धिवंतांची प्रचंड बुद्धी, ऊर्जा, कष्ट आणि वेळ यांची गरज असते. त्यानंतर नवी दिशा दिसू लागते. आपल्याला अज्ञात वा न समजलेल्या अनेक बाबी अर्थातच असतात. त्यांचा वेध घेण्यासाठी पहिली कामगिरी असते अर्थपूर्ण प्रश्नाची मांडणी करण्याची. मानवजातीला उपलब्ध असलेल्या साधनांद्वारे त्यांचं पृथक्करण करता यायला हवं आणि प्रयोगाने त्याचं उत्तर सिद्ध करता येईल अशा प्रश्नाची मांडणी करावी लागते. अनेकदा नव्या साधनांचा आणि पद्धतींचा शोध लावावा लागतो. आईनस्टाईनच्या सिद्धांताच्या चौकटीचा विस्तार करून क्वांटम सिद्धांत आणि गुरुत्वाकर्षण यांना सामावून घेण्याचा प्रयत्न गेलं अर्धशतक सुरू आहे, परंतु अद्याप तरी त्याला यश मिळालेलं नाही.

पुढचा रस्ता दाखवण्यासाठी एका आईनस्टाईनची गरज आहे. आणि आईनस्टाईन सहजपणे वारंवार भेटेल अशी अपेक्षाही निरर्थक असते. दरम्यानच्या काळात अशी परिस्थिती तयार करायला हवी की त्यातून कोणाला तरी कधीतरी क्वांटम सिद्धांत (पुंज सिद्धांत) आणि गुरुत्वाकर्षण यांचा मेळ घालण्याचा रस्ता दिसू शकेल.

परिपूर्ण विधान करण्यासाठी पूर्णपणे अचूक मोजमाप घेण्याची पद्धती आणि साधनं हाताशी हवीत. अशी मोजमापं आपल्या हाताशी नाहीत, ही आपली सध्याची न टाळता येण्याजोगी भक्कम मर्यादा आहे. वस्तूंचं स्वरुपच असं असतं की तुम्ही अधिकाधिक अचूकतेने मोजमाप घेऊ पाहाता त्यावेळी तुम्ही ज्या उपकरणाने वस्तूचं मोजमाप घेऊ पाहात असतात त्या वस्तूवर उपकरणाचा परिणाम होतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या मोजमापांमध्ये काही ना काही अनिश्चितता, अपूर्णता राहाणारच. त्यामुळे तत्त्वतः अचूक असण्यावरच काही मर्यादा येतात. त्यातून सुटका नाही. त्यामुळे अंकात्मक सुस्पष्टता—० वा १, याप्रकारचं उत्तर असू शकत नाही. किंबहुना ० आणि १ यांच्यामध्ये असणाऱ्या विविध शक्यतांच्या संदर्भातच उत्तर देणं शक्य आहे. पुंज सिद्धांतातील हायझेनबर्गच्या अनिश्चिततेच्या तत्त्वाचा हाच गाभा आहे. मोजमापाच्या अचूकतेवर असणाऱ्या या अंतिम मर्यादांची व्याख्याच या तत्त्वाने केली. काही प्रमाणातली अनिर्धार्यता अटळ आहे. सर्व प्रकारच्या मोजमापांना हे तत्त्व आणि सार म्हणूनही लागू होतं.

परिपूर्ण विधान त्यामुळे दोन तत्त्वांच्या कसाला उतरू शकत नाही. पहिलं तत्त्व—चौकटीवर अवलंबित्व म्हणजे त्याची यथार्थता वा प्रामाण्य, केवळ दिलेल्या चौकटीमध्येच असतं. दुसरं तत्त्व—अचूक मोजमापं ही निव्वळ अशक्य बाब आहे. अशी परिस्थिती असल्याने काळं आणि पांढरं, ० किंवा १ असा निवाडा करण्याची जबाबदारी सत्य शोधनासाठी विवेक आणि वस्तुनिष्ठता यांचा उपयोग करणाऱ्या व्यक्तीवर येऊन पडते. सत्यजीवनासाठी असलेली व्यक्तीची बांधिलकी आणि विनम्रता असं याचं वर्णन बृहत परिप्रेक्ष्यात करता येईल.

बावनकशी शुद्ध व सत्य यांची (सुस्पष्टपणे अंकीय) मानसिक आस आपल्या सर्वांना असते. परंतु हे साध्य होणं निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे शुद्धता आणि सत्य आपल्याला शक्यतांच्या पातळींवरच जाणवू शकतं. परिपूर्ण स्वरुपात नाही. ही बाब स्वीकारण्याची गरज आहे. त्यामुळे एकमेवाद्वितीय आणि परिपूर्ण असं काहीही नसतं. वैज्ञानिक वस्तुस्थितीचं सामाजिक प्रतलावर प्रक्षेपण केलं तर हे ध्यानी येईल की जाणून घेणं आणि त्याचं अचूक मापन करण्याबाबतची निश्चितता अशक्य आहे. त्यामुळे पर्यायी ज्ञानासाठी काही जागा आपण नेहमीच ठेवली पाहीजे. ते ज्ञानही तेवढंच प्रमाण असू शकतं. सत्य आणि वस्तुनिष्ठता यांची कास धरण्यासाठी ही बाब गरजेची आहे. हा विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय प्रतलाकडे पाहण्याची वैश्विक दृष्टी म्हणून कसा उपयोजित करायचा हा प्रश्न उपस्थित होतो. हा दृष्टिकोन शाश्वत सामाजिक मूल्य म्हणून स्वीकारणं ही आजच्या काळाची गरज आहे. आणि तेच आपल्यापुढचं आव्हान आहे.

कोणत्याही प्रामाण्याच्या कसोटीला उतरणार नाही अशा विश्वास व श्रद्धा यांचा प्रश्न इथे उपस्थित होतो. ज्या वस्तूंची परीक्षा करता येते, मोजमाप घेता येतं त्यांच्याबाबतीतही परिपूर्णता नसते, अशा परिस्थितीत ज्यांची परीक्षा करता येणार नाही वा ज्यांचं मोजमापच करायचं नसतं वा त्या कधीही जाणता येणारच नाहीत त्याचं काय करायचं, असा प्रश्नही उपस्थित होतो. उदाहरणार्थ, रामाचा जन्म अयोध्येत झाला की नाही हा मुद्दाच गैरलागू आहे परंतु ते सत्य आहे कारण लोकांचा तसा विश्वास आहे. पोस्ट ट्रुथ किंवा सत्योत्तर काळातील सत्याचं हे अप्रतिम उदाहरण आहे. वैज्ञानिक विचारपद्धती आपलीशी करणाऱ्या समाजाच्या निर्मितीच्या उद्दिष्टाशी विपरीत अशी ही बाब आहे. एखादी बाब तुम्ही चिकित्सेच्या प्रांतातून काढून घेता त्यावेळी तुम्ही फक्त विवेक आणि विज्ञान यांनाच नकार देत नसता तर जगण्याचा व काम करण्याचा विवेकवादी पायाच उखडून टाकता. हा केवळ विरोधाभास वा दैवदुर्विलास नाही, एका बाजूला आपण म्हणतो की आपल्याला खरेपणाने आणि प्रामाणिकपणे जगायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण कोणताही प्रश्न न विचारता काही बाबींची परिपूर्णता वा सत्यता स्वीकारतो? ही आधुनिक काळातील सर्वात मोठी मतांधता आणि खोटेपणा आहे. आधुनिकतेने आपल्याला विवेकाचा आयाम दिला आणि प्रत्येक बाबीची आधुनिकतेच्या ऐरणीवर ठाकूनठोकून चिकित्सा करण्याचा मार्गही दाखवला. कोणतीही बाब प्रश्न न करता स्वीकारणं म्हणजे या आयामाचा उपमर्द आहे. अशा परिस्थितीत दोन प्रश्न निर्माण होतात, आपल्या परिप्रेक्ष्यात सत्योत्तराला कसं सामावून घेणार आणि अधिक नेमकेपणे बोलायचं तर आपण आधुनिक आहोत की नाही? जगाकडे पाहाण्याची केवळ आधुनिक दृष्टीच नाही तर आपला प्रामाणिकपणा, आपल्या आणि समाजाप्रती असणारी आपली बांधिलकी याचीही कसोटी आहे.

आपण ज्या निसर्गात व विश्वात जगतो, त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी विवेकाची कास धरायची आणि प्रश्न विचारायचे हे मानक आधुनिकतेने आधुनिक विज्ञानाकडून घेतलं आहे. वैज्ञानिक नियम सर्व पदार्थांना लागू होतात त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म काहीही असतो. गुरुत्वाकर्षण हे सर्वव्यापी वैश्विक बल आहे. सर्व पदार्थांवर त्याचा अंमल असतो. या पदार्थांचा आकार, वस्तुमान, रंग इत्यादी काहीही असो. हे बल लोकशाहीवादी आहे कारण प्रत्येक पदार्थाला ते समान वागणूक देतं. सामाजिक प्रतलावर त्याचं प्रक्षेपण केलं की समता, लोकशाही आणि सेक्युलॅरिझम ही मूल्यं आपल्याला मिळतात. आधुनिकता म्हणजे विवेकाच्या मानकावर आधारित तर्क. म्हणूनच बुद्धीला तिचं आकर्षण असतं. सामाजिक क्रिया-प्रतिक्रिया विवेकाच्या चौकटीत बसवण्याचं कार्य आधुनिकतेमुळे शक्य होतं.

दुसऱ्या बाजूला, विज्ञानाने तंत्रज्ञानाला सबल करून जगाचा जगाचा आकार बदलला आणि नवी जागतिक व्यवस्था जन्माला घातली—विकसित आणि विकसनशील समाजांची. जवाहरलाल नेहरूंच्या शब्दांत सांगायचं तर वैज्ञानिक पद्धती किंवा वैज्ञानिक विचारपद्धतीचा स्वीकार केल्यानेच मागासलेल्या समाजांना मुक्ती आणि प्रगती साधता येईल. श्रद्धा, विश्वास आणि सत्योत्तर यांच्या नांगरावर उभं राहून आपण प्रगतीचं, ज्ञानोदयाचं चक्र उलट्या दिशेने फिरवतो आहोत का? कोणताही पाया नसलेला हा काल्पनिक दृष्टिकोन आहे का?

स्वातंत्र्य, समता, लोकशाही आणि सेक्युलॅरिझम या आधुनिक मूल्यांची मुळं आधुनिक विज्ञानाच्या मानकांमध्ये घट्ट रुजलेली आहेत. मात्र त्याचबरोबर हेही मान्य करायला हवं की परिपूर्णता आणि एकमेवाद्वितीयतेची आस आधुनिकतेनेच भक्कम केली आहे. आधुनिकता तिच्या चौकटीमध्येच पराभूत झाली आहे हा दैवदुर्विलास म्हणायला हवा. पूर्वनिर्धारकता आणि मोजमापाची निश्चितता या अंगभूत मर्यादांना सामावून घेण्यासाठी आधुनिकतेला आपल्या मानकांचा विस्तार करावा लागेल. परिपूर्णता आणि एकमेवाद्वितीयता यांच्या इच्छेऐवजी खरेपणा आणि प्रामाणिकपणा यांचा आधुनिकतेच्या मानकांमध्ये समावेश करायला हवा. निरीक्षण आणि प्रयोगांतून त्यांची चिकित्सा करायला हवी.

एकदा का आपण चौकट मोठी केली की पर्यायी नैसर्गिकपणेच पर्यायी दृष्टिकोन आणि सत्य एकाच वेळी नांदू लागतील. त्यांना समान प्रामाण्यही असेल. त्यांच्यामध्ये संघर्ष असण्याची गरज उरणार नाही. एखादा दृष्टिकोन बरोबर आहे असं म्हणताना दुसरा दृष्टिकोन चुकीचा असण्याची गरज नाही. एखाद्याचा विश्वास आणि अंत:प्रेरणा याबद्दल विशिष्ट मर्यादेपर्यंत अनिश्चितता आणि निकोप संशय बाळगणं ही नव्या चौकटीची निचोड आहे. प्रत्येक वस्तू व घटितांचा परस्परांशी असलेला संबंध जोडल्यावरच सभोवतालचं चित्र परिपूर्ण होतं, ही आपली मानसिक गरज असते. श्रद्धा आणि विश्वास यांचा उगम या मानसिक गरजेत आहे. परंतु अशा प्रकारची परिपूर्णता अशक्य आहे कारण आपल्याला सर्व वस्तू व घटितांचं ज्ञान होणं अशक्य आहे. त्यामुळे नेहमीच अज्ञानाचा प्रदेश राहाणार आहे. याचं अज्ञातावर केलेलं प्रक्षेपण म्हणजे श्रद्धा वा विश्वास. आपल्याला जे ज्ञात आहे आणि जे काही सिद्ध झालेलं आहे याच्या पटलावर एखाद्याची श्रद्धा वा विश्वास कितपत समर्थनीय आहे? उदाहरणार्थ, प्राचीन भारतीयांना अग्नीबाणाचं ज्ञान होतं परंतु त्यांनी त्याचा कोणताही मागमूस मागे ठेवला नाही ही समजूत. केवळ आततायी, आढ्यताखोर आणि फाजील देशाभिमानीच या प्रकारचे अकल्पनीय दावे करू शकतात.

आधुनिकतेच्या चौकटीच्या विस्ताराचं सामाजिक प्रतलावर प्रक्षेपण केलं की बहुप्रवाही आणि एकमेकांशी न जुळणाऱ्या वा बिगर एकजिनसी व्यवस्था आणि प्रणाली—मानवी समूहांच्या वा अन्य, केवळ नैसर्गिकच नाही तर विवेकाशी मेळ साधणाऱ्या आहेत हे आपल्या ध्यानी येतं. परिपूर्णतेचा, वैशिष्ट्यपूर्णतेचा आदर्श दुःसाध्य असतोच पण त्यातून मूलतत्त्ववाद जन्माला येतो. शुद्धतेची परिसीमा पार करण्याची वृत्ती बळावते. जीवन आणि समाजाला नियंत्रित करू पाहाणारी ही शक्ती अतिरेकी आहे. म्हणूनच एकात्मता नाही तर बहुप्रवाहिता वा वैविध्य यांचा पुरस्कार करणाऱ्या आधुनिकतेच्या नव्या चौकटीची गरज आहे. सत्याच्या अनेक आकलनांना या चौकटीत स्थान असेल. एकापेक्षा दुसरा—व्यक्ती, विचार, श्रद्धा, विश्वास, वर्तन, इत्यादी, श्रेष्ठ असण्याची गरज नाही. समान पायावर उभं राहून सर्वांनाच हे अवकाश व्यापता येईल.

निसर्गामध्ये शुद्ध आणि परिपूर्ण अशी स्थिती नसते. किंबहुना द्वंद्व असतं. काळा आणि पांढरा, शिव आणि अशिव, इत्यादी. प्रत्येकाला आपला विरुद्धधर्मी जोडीदार असतो. समजा एखादं अस्तित्व एकलच असेल तर त्याच्यामध्ये स्व-विरुद्धधर्मी निर्माण होतो. या द्वंद्वाचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे प्रकाश. कण आणि किरण या दोन्ही रूपात तो असतो. काही प्रयोगांमध्ये त्याचं वर्तन कणांसारखं असतं तर इतर प्रयोगांमध्ये लहरीसारखं. यामध्ये काही गैर नाही. द्वंद्वाच्या तत्त्वाचं प्रामाण्यच त्यातून दिसतं. अगदी टोकाच्या परिस्थितीतही गोष्टी नेहमीच द्वंद्वात्मक घडतात.

विरुद्धधर्मीशिवाय काहीही अस्तित्वात येऊ शकत नाही. गहन सत्यही असंच असतं. गहन सत्य (प्रोफाऊंड ट्रुथ) याचा अर्थच मुळी सत्य आणि त्याचा विरुद्धधर्मी जोडीदाराचं अस्तित्व. तेही तेवढंच सत्य असतं. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर सत्याचं बहुप्रवाही आकलन म्हणजेच गहनता (प्रोफाऊंडनेस).

अंकीय सुस्पष्टता (डिजिटल शार्पनेस) ही आधुनिक पद्धतीची सर्वात मोठी देणगी आहे हे खरं. मात्र त्याच बरोबर या पद्धतीच्या मर्यादाही जाणून घेणं गरजेचं आहे. या पद्धतीमुळे निसर्ग आणि विश्वाचं मानवी समाजाचं ज्ञान अधिक खरंखुरं आणि समग्र झालं. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा उदय झाला, आपलं जीवन आणि सामाजिक संघटनांमध्ये क्रांतीकारी परिवर्तन घडलं. आपल्या सभोवतालचं जग पूर्णपणे बदललं. या उदात्ततेचं स्वागतच करायला हवं. मात्र त्याच सोबत, परिपूर्णता आणि वैशिष्ट्यपूर्णतेची आपली आस त्यामुळे अधिक भक्कम झाली. या आसेला वैज्ञानिक आणि विवेकवादाचा पाया मिळाला. तिच्या मानकांच्या सामाजिक प्रक्षेपणाबाबत म्हणूनच आपल्याला चिंता वाटायला हवी.

वैज्ञानिक विचारपद्धतीचा स्वीकार आणि अनुकूलन यांच्या विरोधात मी युक्तिवाद करत नाही हे मी निखालसपणे सांगतो. वैज्ञानिक विचारपद्धतीच्या चौकटीचा विस्तार करून त्यामध्ये काही प्रमाणात अस्पष्टता व अनिश्चितता यांना स्थान द्यायला हवं, पर्यायी ज्ञानाची कवाडं उघडायला हवीत आणि वैज्ञानिक प्रयोगांद्वारे त्यांची चिकित्साही करायला हवी, असा माझा मुद्दा आहे.

या विस्तारीत मानकांचं सामाजिक प्रक्षेपणामुळे अंकीय खंडीततेऐवजी (डिजीटल डिस्कंट्युनिटी) सातत्याला, अक्षणुतेला (कंटिन्युटी) वैज्ञानिक प्रामाण्य मिळेल. त्यामुळे सत्याचं आपलं आकलन अधिक प्रगल्भ होईल. त्याचा सखोल परिणाम आपल्या विचार पद्धतीवर आणि पंचेद्रियांनी न जाणता येणाऱ्या वस्तू वा पदार्थांची आपण जी कल्पना करतो त्यावरही होईल.

रोचक दैवदुर्विलास असा की अखंडितता देखील अंकीय (डिजीटस्) असते. आदर्श अखंडितता अस्तित्वात असू शकत नाही. अखंडितता आणि अंकीय खंडितता हे एकमेकांचं द्वंद्व आहे, एकमेकांची प्रतिरुपं आहेत. एका शिवाय दुसरं अस्तित्वात येऊ शकत नाही. अवकाश-काळ यांची अखंडितता आणि सूक्ष्म रचनांच्या पातळीवरील पृथकता कशी जाणून घ्यायची? हा समकालीन विज्ञानापुढचा आजचा सर्वात मोठा गहन प्रश्न आहे. म्हणूनच चौकटीच्या विस्ताराची मागणी अटळ आहे. त्यासाठी आईनस्टाईनच्या पलीकडे पहावं लागेल. मात्र या विस्ताराबाबत आज तरी आपण पूर्णपणे अनभिज्ञ आहोत. हा विस्तार कसा करायचा, कोणत्या बिंदूंवर उभं राहून करायचा याबाबत आपल्याला काहीही माहीती नाही.

मला आणखी एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. परिपूर्णता आणि विशुद्धता यांच्यासंबंधात. या स्थिती निष्क्रीय असतील कारण तिथे काहीही करायला वाव नसेल. सर्जनशीलता आणि संशोधनाला वा शोधाला तिथे जागाच नाही. विशुद्ध सोन्यात किंचित तांबं मिसळल्याखेरीज म्हणजे अशुद्धतेशिवाय, सोनाराला दागिना घडवता येत नाही, अशी काहीशी ही स्थिती आहे. उदाहरणार्थ, स्वर्ग ही अशी कल्पना आहे की ज्यामध्ये सर्व काही आदर्श आणि सत्य आहे, सर्वांगांनी. ही जागा निश्चितच सुंदर आणि रम्य असेल, पण सर्जनशील जगण्यासाठी ती निरुपयोगी आहे. नव्या वेगळ्या कल्पनांशी खेळल्याशिवाय सर्जनशीलता बहरत नाही. त्यातूनच नूतन आणि भव्य निर्मिती शक्य होते. सर्व काही सत्य आणि सुंदर असेल तर तिथे नवनिर्मिती करायला कोणालाही आपली कल्पनाशक्ती पणाला लावण्याची गरज नसेल. आदर्श आणि शुद्ध या संकल्पना दर्शक म्हणून चांगल्या आहेत परंतु समाजासाठी गरजेच्या नाहीत वा आवाक्यातल्याही. समाज आणि लोक, निसर्ग आणि आपल्या सभोवतालचं विश्व, हा एक सर्जनशील प्रदेश आहे. आणि त्यामुळेच आपलं जगणं विलक्षण रंगतदार आणि मूल्यवान होतं.

सर्जनशील आणि खऱ्याखुऱ्या जगण्यासाठी काळा आणि पांढरा नाही तर करड्या वा राखाडी रंगछटांचा मोठ्ठा पट हवा वा इंद्रधनुष्य हवं. बहुप्रवाही आणि द्वंद्वात्मक अस्तित्वातच ते शक्य आहे. शुद्ध आणि विशिष्टता वा एकमेवाद्वितीयता म्हणजे श्रेष्ठत्व—एक म्हणजे एकच अस्तित्व सर्वश्रेष्ठ आहे अशी धारणा वा भूमिका. सर्वश्रेष्ठ वा सर्वात उंच जागी फक्त एकाच अस्तित्वाला जागा आहे, हा जणू काही निसर्गाचा नियमच आहे. उंचावर केवळ धारदार शिखर असेल अशी कल्पना आपण का करतो? तिथे पठारही असू शकतं, सर्व सद्गुण आणि प्रज्ञा यांना समभावाने सामावून घेणारं. बौद्धिक चाचणीच्या खेळात दोन संघात जेव्हा बरोबरी होते त्यावेळी परीक्षक निरर्थक प्रश्न दोन्ही संघांना विचारतात जेणेकरून बरोबरी तुटावी. त्यामुळे एक संघ दुसऱ्यापेक्षा उत्तम आहे हे सिद्ध होत नाही. तो फक्त योगायोगाचा खेळ असतो. दोन्ही संघ विजयी झाले असं जाहीर केलं तर आभाळ कोसळणार आहे का?

सर्व मानवी निर्मितींमधील बहुप्रवाही आविष्काराचा स्वीकार करायला आपण शिकलं पाहीजे. शांतता आणि सौहार्द रुजवण्यासाठी उन्नत आधुनिकतेची पहाट त्यातूनच होईल. बहुप्रवाहिता आणि द्वंद्व हा उन्नत आधुनिकतेचा मंत्र असेल.

चित्र सौजन्य: साल्वादोर दाली यांचे १९३१साली काढलेले ‘द पर्सिस्टन्स ऑफ टाईम’.

नरेश दधीच सैध्दांतिक भौतिक शास्त्रज्ञ असून इंटर-युनिवर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी ॲण्ड ॲस्ट्रोफिजिक्स (आयुका) चे माजी संचालक आहेत. सध्या ते आयुकामध्ये इमेरिटस प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय, त्यांनी सेंटर फॉर थेअरेटिकल फिजिक्स, जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली येथे एम ए अन्सारी चेअर (सैध्दांतिक भौतिकशास्त्र) म्हणून कार्य केले आहे. विज्ञानक्षेत्रातील संशोधन आणि अध्यापनाबरोबरच ते व्यापक सामाजिक मुद्द्यांवर वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधत असतात.   

सुनील तांबे मराठी, इंग्रजी वर्तमानपत्रातून पत्रकार. त्यांनी रॉयटर्स मार्केट लाइट या कंपनीचे संपादक म्हणून काम पाहिले आहे. तांबे यांनी गॅब्रिएल गार्सिया मार्खेज या प्रख्यात लेखकाच्या जीवन-साहित्याचा आढावा घेणा-या मार्खेजची गोष्ट या पुस्तकाचे लिखाण तसेच फ्री व्हॉईस या रविश कुमार यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *