मंगेश नारायणराव काळे

करून घेता आला पाहिजे गोष्टीचा शेवट



back

१.

करून घेता आला पाहिजे गोष्टीचा शेवट
वेळच्या वेळी नि पुन्हा नव्याने रचता
सांगता आली पाहिजे गोष्ट

म्हणजे गोष्ट तर होत नस्ते कधीच पुरातन जुनाट कालबाह्य
कैक पिढ्यांपासून चालून चालून सांगणाऱ्याच्या ओठावर थकलेली
म्हणजे काहीच नस्तं जुनं, पुराणं टाकून देण्यासारखं गोष्टीत कधीच
फार्तर होतात काही जागा निर्माण नव्याने नि आशय, विषयात
करता येतो फेरबदल किंवा करता येते चरित्रांची अदलाबदल आपल्या सोयीनुसार

म्हणजे जरी नसला बदलत माणसाचा मूळ स्वभाव
नि वाच्यार्थ्यानं जरी नसेल बदलत त्याचं चरित्र
सटवाईनं कपाळावर कोरलेलं त्याच्या अटळ
तरीही गोष्ट तर घडतच असते विधीलिखित पुनःपुन्हा

किंवा आहे तसाच त्या चरित्राचा प्रवेश करता येतो नव्यानं
काळाचा जुना कशीदा बदलवून, डकवून एक नवा चेहरा
म्हणजे आता आपल्यासमोर ही जी काय अमुक एक गोष्ट
रचली गेली आहे नि त्यातली सगळी चरित्रं नकोशी वाटूनही

सांगणाऱ्याने तिला ढकलली आहे फ्रन्टवर नि क्रमप्राप्त झाले आहे
ऐकणेही सांगणाऱ्याची मन की बात प्रत्येकासाठीच. म्हणजे तसे फर्मानच
काढले गेले आहे उद्याच्या नागरिक घडवणाऱ्या अनुदानित प्रयोगशाळांमध्ये
नि तसाही ऐकण्याशिवाय तरी काय पर्याय उरलाये
कथेकऱ्यानंच गोष्ट ऐकण्याची सक्ती केलीय म्हटल्यावर
म्हणजे गोष्ट सुरू व्हायच्या सुमारास अगदी सहजगत्या कथेकऱ्यानं अगदी खुबीनं
या गोष्टीतल्या राज्याची सगळी सूत्र सोपवली आहेत राजाच्या हाती गोष्टीतल्या गोष्टीत

२.

म्हणजे आता जो काय राजा असल्याचं सांगितलंय
कथेकऱ्यानं गोष्टीत जीवाचा कान करून ऐकणाऱ्या प्रत्येकालाच
त्याचा फक्त वर्तमानच ठळक केला जात असल्याचं लक्षात येवू लागलंय
श्रोत्यांच्या म्हणजे जे काय जास्तीचे कुतूहल असणारे प्रेक्षक वाचक
श्रोते आहेत या ऐकणाऱ्यांच्या गर्दीत त्यांनी तर आग्रह धरला आहे
गोष्टीतल्या राजाचे पूर्वसूरीचे चरित्रही विशद करण्याचा

नि ही तर नैसर्गिक अशी मागणीय गोष्टीतल्या प्रत्येक
चरित्राचे चरित्र समजून घेण्याची म्हणजे त्याशिवाय व्हर्च्युअल
का होईना कसे रिलेट होता येणारेय ऐकणाऱ्याला गोष्टीतल्या गोष्टीशी गोष्टीत

म्हणजे आता जो काय राजा असल्याचं नि त्याची सार्वभौम सत्ता सर्वदूर प्रस्थापित झाल्यानं
तो कितीय महान नि चक्रवर्ती असल्याचं जे रसभरीत निरूपण केलं जात आहे कथेकऱ्याकडून
तो तर कालच्या गोष्टीत अगदी वेगळाच असल्याचं सांगितलं होतं अगोदरच्या कथेकऱ्यानं
म्हणजे ती जरी एका नृशंस नरसंहाराची गोष्ट असली काळीमा फासणारी
मानव्याला नि त्या गोष्टीला वर्तमानाचा एक मोठा संदर्भ आहे हे लक्षात घेतले तर
कालच्या गोष्टीत जो होता एक कारस्थानी, कट-कारस्थानं रचून
स्वतःची सत्ता बळकट करणारा, महत्त्वाकांक्षी हत्यारा तो अचानक
कसा काय आपले चरित्र बदलवून येवू शकतो नव्या गोष्टीत राजाच्या रूपात?
म्हणूनच या अनुत्तरित प्रश्नाजवळच थांबलीये गोष्ट काही वेळ
नि कथेकऱ्यानेही उबळ आल्याचे दर्शवून घेतला आहे एक दीर्घपॉज
म्हणजे किती भयावह होती ती गोष्ट की आपल्याला नकोशी असलेली
सगळीच चरित्रं समूळ नष्ट करण्याचाच घाट घातला होता त्यानं बेमालूम
आपल्या सार्वभौम नकाशातून नि अंमलबजावणीही घडवून आणली होती
तडफेने त्याच्या कार्यप्रवण तत्पर प्रणालीने अस्मिता जागवून म्हणजे ती गोष्ट
होती एवढी परिणामकारक की अजूनही अनुभवता येतो त्या सुन्न करून टाकणाऱ्या
गोष्टीतला जाळ, ध्वनी-प्रतिध्वनी, गर्जना, किंकाळ्या, टाहो, शोक, हुंदके डोळ्यातले
नि व्हर्च्युअली केलं थोडं जास्त इमॅजिन तर भरूनही आणता येते मूठभर राख प्रत्येकालाच
बेचिराख झालेल्या गोष्टीची गोष्टीतल्या गोष्टीत.

३.

इथे ज्या अर्थी कथेकऱ्याला गोष्ट सांगण्याचे हक्क बहाल केले
गेले आहेत गोष्टीतल्या संविधानाकडून टेक्नीकली नि या लाखोंच्या
जनसमुदायाकडूनही हिरीरीने हीच गोष्ट ऐकवण्याचा आग्रह
केला जात आहे उच्चरवात तर मूठभर नकोशांना तर ऐकावीच
लागणारेय चरित्राची अदलाबदल करून रचलेली गोष्ट निमूट

४.

गोष्ट ऐकण्यापूर्वी कथेची एकूण मांडणी चरित्र फॉर्मचाही
विचार अस्तोच महत्त्वाचा नेहमीच कथनात्मक साहित्यात
म्हणजे हा तर गोष्टींचाच देश आहे अभूतपूर्व म्हटल्यावर तर
नॅचरली गोष्टीची संरचना समजून घेणे अधिक ठरते इष्ट केव्हाही
गोष्टीच्या पूरक आशयाजवळ पोहोचण्यासाठी

नि गोष्टीत झालेल्या बदलांची जर असेल नोंद ऐकणाऱ्याजवळ तर
कथेकऱ्याचा गोष्ट सांगण्यामागचा हेतूही समजून येतो घेता बिनदिक्कत
म्हणजे कथेकऱ्यानं कालच्या गोष्टीतल्या चरित्रांचे रकानेच लीलया
टाकलेयत बदलून नि बहाल केल्या आहेत त्यांना पटावरच्या मोक्याच्या जागा
म्हणजे नुस्तीच अदलाबदल नाहीये केलेली चरित्रांची तर जुनेच
चरित्र आले आहे नव्या अवतारात देदिप्यमान नि अवतारांची
एक मोठी परंपरा असलेल्या या सार्वभौम देशात तर नव्या अवतारासाठी
असतेच एक मोठी जागा मोकळी सोडलेली आपल्या पूर्वजांनी अर्थातच
म्हणजे गोष्टीचा पट तर तोच आहे आजा-पणजांच्या गोष्टीतून आलेला
नि रचला गेलेला नि चालत आलेला सालोसाल ओलांडून आपल्यापर्यंत
म्हणजे केवळ मथितार्थ तर बदललाय तेवढा कालौघात गोष्टीचा म्हटलं तर

म्हणजे नकोशी असलेली गोष्ट ऐकायची नसेल
तर पुन्हा नव्यानं वेगळी गोष्ट सांगण्याची तरतूद
असली गोष्टीतल्या संविधानात तरी सध्याची सुरू असलेली गोष्ट
पूर्णपणे सांगितल्या जाण्याचा नैसर्गिक व न्याय अधिकार दिला गेलाय कथेकऱ्याला
नि आताच्या या कथेकऱ्याची गोष्ट तर नुकतीच झाली आहे सुरू..

५.

म्हणजे अट तर नाहीचये अशी कोणतीच
की परंपरागत गोष्टच सांगितली पाहिजे नव्यानं
जशीच्या तशी किंवा आठवेल तशी जोड-तोड करून
सरमिसळ करून स्मरणातल्या दोन-चार गोष्टींची
किंवा सुरूवात, मध्य, शेवटाची अदलाबदल करून
किंवा आवडतीच्या जागी नावडती नि राजाच्या जागी रंक
भूत प्रेत पिशाच्च यक्ष किन्नर राक्षस पोपटात जीव असलेला
किंवा सात समुद्र सात डोंगर सात नद्या ओलांडून आलेला राजपुत्र
किंवा सूतपुत्र, मुलगा, गरीब शेतकऱ्याचा ज्याला सापडते शेवटी
जमिनीतले धन पुरातन किंवा अलीकडची पलीकडची ऐकलेली वाचलेली
ससा-कासवाची, लाकूडतोड्याची प्रामाणिक किंवा चतूर कोल्ह्याची निळ्या

किंवा अगदी वर्तमानातली, चुलीवरचे अन्नच संशयास्पद ठरवलेल्या
मृत्यूदंडास पात्र ठरलेल्या कुण्या एका निरपराध अखलाखची
किंवा भुकेसाठी भाकरी चोरणारा किंवा गळफास घेऊन व्यवस्थेला
बोल लावणारा कुणी दलित पददलित मुस्लीम हक्काचा देशद्रोही म्हणता येणारा
केवळ संशयावरून मारला जावू शकणारा किंवा ‘ब्र’ उच्चारणारा कुणीही
म्हणजे खच्चून भरलाय वर्तमान या महानतम देशाचा अशा अनेक रक्तरंजित गोष्टींनी

शेवटी देशच आहे हा गोष्ट सांगणाऱ्यांचा ऐकणाऱ्यांचा म्हटल्यावर
तर सांगताच येणार आहे कुणालाही नव्याने रचलेली कोणतीही गोष्ट
नि ऐकताही येणार आहे आपापल्या चार भिंतीच्या आत दडून, लपून
कुणालाही ऐकू जाणार नाही एवढ्या हळुवार आवाजात दहशतीच्या सावटात
म्हणजे गोष्ट सांगितलीच पाहिजे या गोष्टीप्रधान देशात असं तरी कुठाय
किंवा नियम तर नक्कीच नाहीये कुणी केलेला पूर्वीपासून आजतागायत
म्हणजे नुस्त्या गमती-जमती, ज्योक, टाईमपास, फेकाफेक, गाणं बजावणं
हसणं, खिदळणं, नुस्त्या गप्पा, चॅटिंग तास न्‌ तास, सार्वजनिक चव्हाट्यावर

काहीही म्हणजे काहीही करता येणं शक्य आहे गोष्ट सांगण्याशिवाय इथे
पर्पजली संविधानाच्या चौकटीत राहून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली
जास्तीचे स्वातंत्र्य न मागता निमूट व्यवस्थेविरूद्ध चुकूनही ब्र तर उच्चारला
जाणार नाही ना याचे तारतम्य ठेवून नि मुलाहिजा ठेवून राजाचा अर्थातच
म्हणजे शक्यय का खरंच हे सगळं गोष्टीतल्या गोष्टीत अगदी आताही?

६.

म्हणजे पाहता येईल का गोष्टीला पर्याय म्हणून कवितेकडे?
म्हणजे कविता तर सगळ्यात जालीम गोष्टय या पृथ्वीतलावरती
नि इतिहासातली पहिला ‘ब्र’ उच्चारणारी, बोल लावणारी
करता येईल का तिचा वजूद गारद नि करता येईल का
तिला बटीक म्हणजे जे काय धारदार पातं असतं ना कवितेचं
लख्ख, वीजेसारखं तळपणारं ते करता येईल का बोथट?

म्हणजे गाता येईल का पुन्हा एकदा भाटासारखं दरबारात श्रीमंताच्या
नि रचता येतील का तिचे शब्द गहाण ठेवून कवनं दरबारात
म्हणजे रसभरित वर्णनं, शौर्याच्या गाथा, रचता येतील का खासगींच्या?
म्हणजे घडवता येईल का नव्याने शब्द न्‌ शब्द कवितेचा
नम्र निमूट, आज्ञांकित गुलाम अनिर्बंध सत्तेचा?

म्हणजे अटय, मज्जावये इथे गोष्टी सांगण्याला
तर कसा करता येणारेय अपभ्रंश कवितेचाही या परिघात
नि समूळ नष्ट करता येणारेय पृथ्वीतलावरून कविता?

म्हणजे कोणता अल्टरनेटीव्हये गोष्ट सांगू पाहणाऱ्याजवळ
कवितेशिवाय या सुजलाम सुफलाम देशात उरलेला?

७.

म्हणजे युद्धंय हे लुटुपुटीचं
ओरबडून घेण्यासाठी सुरू झालेलं गोष्टीतल्या गोष्टीत
म्हणजे नाहीये कुणाजवळ कोणतंच शस्त्र तरीही रक्तबंबाळ करता येतं
साध्या नखांनीही ओरबडून पार त्वचा काढता येते छिलून सराईतपणे
अगदी जन्मतःच नख लावता येतं नाळेला नि सुटं करता येतं अर्भक
त्याच्या रक्तमासाच्या परंपरेतून, पाडता येतं एकटं कायमचं त्याला समुहातून

म्हणजे सामंजस्याचा करारचये झालेला की एखाद्या समुहानं पडावं तुटून
पाडावा हवा त्याचा मुडदा क्षणार्धात नि लोकक्षोभ म्हणून का होईना
हळहळ करावी व्यक्त गोष्टीतल्या गोष्टीत म्होरक्याने टि्वट करून
म्हणजे कसं शक्यय शंभर कोटीची उड्डाणे घेतलेल्या या महाकाय प्रदेशात
की कुण्या यत्किंचितासाठी प्रत्येक वेळी धावत यावं साक्षात राजानं
गोष्टीतला नागरिक म्हणून आपलीच तर जबाबदारीये की सेफ ठेवायचंये स्वतःला

नि शांतता वार्ता तर सुरूचयेत ना निघेलच आज ना उद्या तोडगा काही
तोवर खर्चली गेली थोडीफार चिल्लर तर थोडीच तोशीस लागणारेय खिशाला राजाच्या
म्हणजे देशाचा इतिहास देदिप्यमान घडवायचाय म्हटल्यावर तर ही जबाबदारीचये ही सगळ्यांची

८.

खरं तर हा खेळंय परंपरागत काहीतरी द्यायचंय काहीतरी घेवून
रचायचे आहेत इमले व्हर्च्युअली नि साजरे करायचेत उत्सव
म्हणजे हक्काच्या जागा मिळवण्यासाठीचा खटाटोपय का हा सुरू?

म्हणजे एकापेक्षा एक भयंकर खेळयेत क्षणार्धात नेस्तनाबूत करणारे गोष्टीत
म्हणजे प्यादीच आहेत सगळी म्हटल्यावर तर सगळीच सरकवली जाणार आहेत
पुनःपुन्हा इकडून तिकडे नि गुलामीचं तंत्र शिकवलं जाणारेय शिस्तीत सगळ्यांना

नि हा तर साक्षात लुटुपुटुचा खेळंय साक्षात गोष्टीतला म्हटल्यावर तर
नियमांचा आग्रह तरी कसा धरता येणारेय कुणालाच इथे हट्टाला पेटून?
म्हणजे व्हर्च्युअलीये हा खेळ हाडामासाच्या जिवंत माणसाकडून खेळला जाणारा
म्हणजे हॅपीनेसच्या घोड्यावरून दौडत येणारा मायावीये खेळ हा सुलभ स्वस्त

म्हणजे किती इझीये या खेळाचं सूत्र की सगळीचेय सोय या खेळात करून ठेवलेली
म्हणजे होता येतं रिॲक्ट करता येतो डिबेट क्षणार्धात अगदी कठीणातलं कठीण
कोडंही येतं सोडवता कुणालाही इतकं सोपं करून टाकलंय सगळं या गोष्टीतल्या खेळात
म्हणजे होता येतं कनेक्ट क्षणात समुद्रापल्याड कुणाशीही कधीही ओळखीचा असो की अनोळखी
नि डिस्कनेक्टही होता येतं घरातल्या घरात म्हणजे कोणताच निर्बंध नाहीये या खेळात गोष्टीतल्या

म्हणजे इथे होता येतं रत पाहिजे तो जोडीदार कल्पून
नि योजून होता येतं स्खलित यथेच्छ भोगून एकट्यानेच व्हर्च्युअली
होता येतं कुणालाही पाहिजे ते लौकिक अलौकिक पराक्रमी शूरवीर योद्धा
काहीच दिलं जात नाही घेतलं जात नाही हरवत नाही सुटत नाही काहीच
म्हणजे जात धर्म पंथ मैत्री ऋणानुबंध नाती गोती नाहीचये सक्ती कोणतीच
सांभाळण्याची कम्पलसरी कुणावरही या गोष्टीतल्या सार्वभौम राज्यात

म्हटलं तर ही एक गोष्टंय व्हर्च्युअल
हाडामासाच्या माणसाला केव्हाही कुठेही कधीही रचता येणारी
किंवा म्हटलं तर रिमेकये हा जुन्याच गोष्टींचा नव्याने केला गेलेला कालौघात

९.

म्हणजे असेल का पृथ्वीवर गोष्टीशिवायचा प्रदेश?

म्हणजे सांगितलीच गेली नाही किंवा ऐकलेली नाही कुणीच
किंवा घडली नाही नि सुचली, रचली, घडवली गेली नाही
अशी एकही गोष्ट असा प्रदेश असेल का गोष्टीविहीन या गोष्टीत?

म्हणजे आज वर्तमानात, काल, परवा अगदी हा प्रदेश पहिल्यांदा
आबाद झाला त्या प्राचीन, पुरातन थेट अश्मयुगापासून केव्हाही
रचली गेलीच नसेल गोष्ट असा असेल का एखादा कुँवार इलाखा गोष्टीशिवायचा?

म्हणजे कसं शक्य आहे की आबाद आहे प्रदेश माणसांनी
जिथे झाले दोनाचे चार, चाराचे आठ, आठाचे सोळा
पटीत गिन्ती वाढत गेलेल्या मानवी समुहात कोणतीच गोष्ट
सांगितली न जाणं, घडणं, घडवणं कसंय शक्य तेव्हाही नि आताही?

म्हणजे गोष्टीतूनच तर झालाय माणसाचा जन्म म्हटल्यावर तर
अशक्यचय ही घटना. म्हणजे इथेच तर भेटली होती इव्ह पहिल्यांदा
आपल्या खापर खापर पणज्याला नि खाल्लं होतं चोरून फळ

म्हणजे ही तर एक भन्नाट थ्रिलर घटनाय
म्हटल्यावर कसा असू शकेल गोष्टीशिवायचा प्रदेश?
म्हणजे इथून-तिथून अर्ध्या पृथ्वीच्या जिथे जिथे पसरले होते
सार्वभौम राज्य नि जिथे जिथे होती नांदत मानवी कौम तिथे
रूजलाय डी. एन. ए. चंगेजखानाचा प्रत्येक वंशाच्या गर्भाशयात
तर तो कसा राहू शकणारेय इतिहास घडवल्याशिवाय गोष्टींचा?

नि रामायण महाभारत पुराणे दंतकथा बखरी मौखिक
लिखित असं जे काय आहे ना कल्पित वास्तव जे वाहत आलंय
पिढ्या न्‌ पिढ्यांपासून थेट रक्तमांसातून आपल्यात तिथे तर
गोष्टीशिवायच्या मानवी इतिहास भूत वर्तमानाची कल्पनाचेय अशक्य

नि तरीही गोष्टीपुरता का होईना धरला गृहीत गोष्टीशिवायचा प्रदेश
नि राजाची ष्टोरीही मानली रिअल वास्तवदर्शी अगदी आज घडणारी
तर पृथ्वीच्या नकाशावर नेमका कुठे लोकेट करता येणारेय हा प्रदेश?

म्हणजे एखादा लहानसा भूप्रदेश समुद्र काठ लाभलेला
नि वाळवंटही सोबतीला हातात हात धरून वसलेला
शोधता येईल का कुणाला असा एखादा गुर्जर प्रदेश गोष्टीशिवायचा?

(अपूर्ण)

मंगेश नारायणराव काळे हे कवी, चित्रकार, प्रकाशक आणि दृष्य-माध्यम समीक्षक आहेत. त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. काळेंच्या चित्रांची प्रदर्शने भारतभर होत असतात.

3 comments on “करून घेता आला पाहिजे गोष्टीचा शेवट: मंगेश नारायणराव काळे

  1. दागो.काळे

    मंगेश नारायणराव काळेंची कविता समजून घेतांना,
    समकालीन जाणिवांना पौराणिक घटितांमध्ये ओढतांना आलेला ताण कवितेच्या परंपरेवरही अनाहुतपणे येतो.या सगळ्या घडामोडीत आपले नेमके अस्तित्व काय आहे? असाही एक प्रश्न पडतो म्हणजे पडतोच.त्याचे उत्तर आजच्या व्यवस्थेत अराजकतेच्या बुडाशी रुतलेले असेलच याची खात्री करतांना कवितेची वाट अधीक उलगडतांना दिसते.मला तरी असे वाटते आहे.मंगेश कवितेची अप्रतिम अवस्था आहे.

    दागो.काळे

    Reply
  2. नीरजा

    मंगेश, आजच्या काळात कवीची होणारी घुसमट, अस्वस्थता नेमकी उतरली आहे. खूपच छान. पुढच्या भागांची वाट पहाते आहे. 👍🙏

    Reply
    • संजय चौधरी

      मंगेश,
      मित्रा ! स्वत:च्या खास शैलीत व्यक्त होण्याची तुझी पद्धत हे तुझ्या कवितेचं बलस्थान आहे. आशयाच्या केंद्रस्थानी कवितेला ठेवून केलेली मांडणी मला महत्त्वाची वाटते.
      तुझी कविता तुझी आहे … शुभेच्छा
      ✍️✍️✍️
      संजय चौधरी

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *