मंदार पुरंदरे

पौषाच्या रातीचा ख्याल


4


back

तृतीय पुरुषी आवाज : १

एखाद्या लिखाणात, कथेत नायक असलाच पाहिजे आणि मग त्याला नावगाव, पद-पगार वगैरे असलंच पाहिजे हे खरं आहे एका अर्थाने आणि प्रस्तुत लिखाणातील नायकाला नावगाव , पद-पगार वगैरे आहे; फक्त ते फारसं महत्वाचं आहे असं तृतीय पुरुषाला वाटत नाही, त्यामुळे त्याबद्दल लिखाणात काही येईल असं नाही. अजूनतरी एक प्रकाशाचा वेग सोडला तर बाकी सर्वच बदलत असल्याने महत्वाचं काय आणि बिन महत्वाचं काय, सर्वच क्षणिक! परंतु या क्षणभर टिकणाऱ्या दुनियेत मनुष्याने आपल्या प्रतिभेने वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलीच घोडदौड केली आहे. मनुष्य आणि तंत्रज्ञान यांची चांगलीच जोडी जमलेली दिसते आता. कोण जाणे मनुष्य कधीतरी प्रकाशालाही त्याचा वेग बदलायला लावेल. प्रकाशाच्या वेगाचे नियंत्रक येऊ शकतील. मनुष्याची अनेकविध क्षेत्रातली कामगिरी पाहिली तर मनुष्य प्रकाशाचाच एखादा तुकडा असावा किंवा कल्पनातीत वेगाने जाणाऱ्या सरळसोट प्रकाश किरणांनी या अतिप्रचंड वेगाला कंटाळून किंवा त्यात काहीतरी बदल हवा म्हणून आपखुशीनं आपली गती कमी करून मनुष्य आकार धारण केला असावा असंही कधी कधी म्हणावंसं वाटतं. पण गंमत अशी आहे की या परमवेगी प्रकाशाचाच तुकडा असलेला मनुष्य प्रकाशानं व्यापून असलेल्या आसमंतात वावरतो तरीही प्रकाश, पृथ्वी, इतर अनेक तारे, ग्रह, आकाशगंगा यांच्या वेगापुढे मनुष्याचा वेग अगदीच संथ आहे. मनुष्य आणि प्रकाश यांचं काहीतरी अजब नातं आहे !

अजब नात्यांच्या गजब अनुभव आपल्या नायकाला देखील आहे. आपला  नायक म्हणजे कोण तर एका कॉलेजातील तेही ज्युनियर कॉलेजातील एक साधा  भाषा शिक्षक ! भाषा-साहित्य वगैरे शिकवण्याचं हे त्याचं बारावं किंवा तेरावं वर्ष ! हे कॉलेज मुख्य शहरापासून बऱ्यापैकी दूर असलेल्या एका प्रदेशात आहे. या प्रदेशाला स्वतःचा असा खास चेहरा नाही, किंवा तो पूर्वी असावा कदाचित. कधी काळी असलेल्या पाच-दहा छोट्या गावांच्या पुंजक्याचं आता बऱ्यापैकी वर्दळ असलेल्या, लोकवस्ती असलेल्या प्रदेशात रूपांतर झालं आहे. तुरळक आणि बैठी घरं असल्याने पूर्वी इथली गावं  सूर्यप्रकाशात न्हाऊन निघत असत; दिवसभरातल्या त्यांच्या सावल्यांचं एक वेळापत्रक असे आणि त्यांची खास अशी नक्षी पण असे ! आता अनियमित वाढलेल्या वस्तींमुळे, बैठी घरे आणि तीनचार मजली इमारती, विजेचे खांब, टेलिफोनच्या तारांची भेंडोळी, कच्च्या-पक्क्या रस्त्यांची सरमिसळ अशा सगळ्या चित्रामुळे प्रकाश आणि सावल्यांची खास अशी नक्षी अशी तयार होत नाही. आजूबाजूला थोडी शेती आहे, काही छोट्या मोठ्या फॅक्टऱ्या देखील आहेत. लोकवस्ती वाढल्याने गरजा वाढू लागतात, मग सर्व प्रकारची दुकानं येतात आधी आणि नंतर कधीतरी अधिक शाळा कॉलेजांची देखील गरज वाटू लागते. त्यामुळे इथे एक ठीकठाक असं ज्युनियर कॉलेज आहे. या प्रदेशाची मूळची लय संथ परंतु आता मात्र तिच्यावर बाहेरच्या कृत्रिम द्रुत लयीचं आक्रमण होऊ लागलंय. नक्की कोणत्या लयीत चालावं, वागावं याचा थोडा गडबडगुंडाच झाला आहे खरंतर. पूर्वीची संथ लय कुठेतरी खोलवर रुतलेली आहे किंवा तिचं विस्मरण झालेलं नाही आणि तरीही बाहेरची द्रुत लय खेचते आहे. दिवसभर द्रुतगतीशी जुळवून घ्यायचं आणि संध्याकाळी समेवर आल्यासारखं आपल्या मूळ लयीच्या कुशीत येऊन निवांत होऊन जायचं. तरी मुख्य शहराच्या बेताल जीवनापेक्षा पुष्कळ बरंच आहे. या लयीच्या सवयीचा परिणाम म्हणून की काय आपल्या नायकाची एक मजेदार सवय अशी आहे, की तो कॉलेजला कधी सायकलवर, कधी चक्क चालत तर कधी बसने जातो. आजूबाजूचा परिसर न्याहाळत जायला त्याला आवडतं आणि न्याहाळण्यासाठी बघणाऱ्याचा वेग कमी असेल तर जास्त चांगलं. तसंही आपल्या नायकाला वेगाचं थोडं वावडंच आहे. आपल्या नायकाच्या जीवनाच्या ताल कोष्टकात ना, धिं, ता, त्रक असे नेहमीचे बोल आहेतच  पण एकूण स्थायी लय ही मध्य विलंबित डक्याव डक्याव! 

दिवाळीची सुट्टी संपलेली आहे आणि शाळा कॉलेजं पुन्हा सुरु झालेली आहेत. आता नायकाला कॉलेजला जाणं आणि पुन्हा भाषा-साहित्य शिकवणं क्रमप्राप्त आहे. हां, आता आपल्याच आजूबाजूला वावरणारे , आपल्यातलेच वाटणारे असे काही लोक भाषा आणि साहित्य वगैरे का शिकू आणि शिकवू लागतात हा एक प्रश्न बहुतेकांना पडेल, किंवा आधी कदाचित पडलेलाही असेल. कुणाला या प्रश्नाची काही उत्तरं मिळाली असतील, कुणी उत्तर शोधून थकूनही गेलं असेल कदाचित. बदलत्या काळात भाषा बोलण्या-लिहिण्याचं , भाषा- साहित्य शिकण्या शिकवण्याचं चित्र बदलत चाललं आहे, त्यामुळे तर या प्रश्नाचं उत्तर सापडणं आणखीच कठीण! एकमेकांना एकांतात आपण हा प्रश्नच न विचारलेला बरा ! तर भाषा-साहित्य शिकवणारा आपला हा नायक आज बसमधून कॉलेजला जाणार! दिवाळीतल्या चकल्या कडबोळ्यांची चव त्याच्या जिभेवर अजून आहे. दरवर्षी दिवाळीनंतर घरी फराळाचे जिन्नस आणि इकडून तिकडून आलेले दोनचार मिठाई बॉक्स अजून शिल्लक राहतात तसे ते यावर्षीही शिल्लक आहेत! बसचा वीस पंचवीस मिनिटांचा प्रवास हा खूप फायद्याचा; म्हणजे आर्थिक आणि इतरही अनेक दृष्टीने. बसचा प्रवास स्वस्त आणि मस्त तर असतोच पण सोबत आजूबाजूची माणसं, थोडा निसर्ग वगैरे बघता येतो आणि महत्वाचं म्हणजे आज काय शिकवायचं याची त्याला मनातल्या मनात शांतपणे उजळणी करता येते,  कधी त्याच्या टिपणवहीत छोटीमोठी  टिपणं करता येतात. असो, इतकी माहिती सध्या पुरे!  

प्रथम पुरुषी आवाज : १ 

नोव्हेंबरचा महिना आला; हा महिना खास थंडीचा – नेमेचि येतो मग हा हिवाळा ! आता बसचे ड्रायव्हर लोक, कंडक्टर मंडळी, पॅसेंजर वर्ग सगळ्यांच्या गळ्याभोवती वेगवेगळ्या रंगाच्या मफलर दिसू लागतील, त्या मफलरांचे लोकरी धुळकट वास येऊ लागतील. पुरुष मंडळींत बिड्या ओढण्याला बहर येईल. बायामाणसांच्या  अंगावर शाली आणि लहान पोरांच्या डोक्यावर  माकड-टोप्या येतील, पहाटे पहाटेची कामं करणारे दूधवाले, पेपरवाले मफलर-कानटोपी-स्वेटर अशा अवतारात दिसू लागतील आणि त्यांच्या चेहऱ्याकडे नुसतं पाहिल्यावरच हे पहिल्या धारेच्या थंडीचा अनुभव घेऊन आलेत हे समजू लागेल, तरुण पोरं फॅशनेबल स्वेटर घालून तरुण पोरींना आकर्षित करण्याचं स्वाभाविक काम करू लागतील. मोठमोठ्या शहरांमध्ये ऐन थंडीच्या काळात गोरगरिबांना, बेघर लोकांना स्वेटर, कांबळी वगैरे मोफत वाटण्याचे उपक्रम सुरु होतील.  सामान्यपणे आपल्या अंगावर कपडे असतात त्यामुळे दुसऱ्याची काळजी तशी कोणी करीत नाही. मोसमाप्रमाणे कपडे उपलब्ध आहेत आणि ते लोकांना खरेदी करता येताहेत अशा गृहितकात चाललेलं असतं आपलं सगळं! पण कधी ऐन थंडीच्या बहरात अंगावर धडुतं नसलेला कोणी जातो आपल्या बाजूनं; थोडा वेळ कणवकाळजी वाटते आपल्याला, आणि पुन्हा जैसे थे! फिरून फिरून येणारे मौसम आणि ऋतू बरंच काही दाखवत असतात आपल्याला, शिकवण्याच्या प्रयत्न करत असतात बहुधा, आपण शिकत नाही नेहमीसारखेच.  

नुकत्याच सरलेल्या पावसाने कधीकधी शिरशिरीचे, हुडहुडी भरण्याचे अनुभव दिलेले आहेत परंतु  थंडीच्या काळात मात्र  शिरशिरीच्या, हुडहुडी भरण्याच्या अनुभवांच्या खास हिवाळी छटा अनुभवायला मिळू लागतील. हवेतली आर्द्रता कमी होऊन ओठ कोरडे पडू लागतील, टीव्हीवरच्या जाहिराती बदलतील, जागोजागी उभे राहून कपातून गरमागरम चहा पिणाऱ्या लोकांच्या कपातून वर जाणाऱ्या वाफेच्या हलक्या झोतांचं अस्तित्व एरवीपेक्षा जास्त जाणवू लागेल. एकूण काय तर थंडी नावाच्या एकीकडे थोड्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या आणि एकीकडे नावडत्या ऋतूचा सामना करायला बहुतेक सगळे सज्ज होऊन जातील. बाहेर थंडी असल्या कारणाने  बरेच लोक बसच्या खिडक्या बंद करणार! थंडीपासून रक्षण करायला एवढं साधं तंत्रज्ञान पुरतं आपल्याला आणि उन्हाळा येईपर्यंत हे असंच चालणार आता ! आपल्या देशात ऋतूंचा हिरो म्हणजे पाऊस; पावसाचे बरेच वेगवेगळे टप्पे असले तरी अखेर पाऊस बरसला तरी रडवणार, नाही बरसला तरी तेच. पावसाची चाल म्हणजे घरातल्या लाडक्या मोठ्या पोरासारखी, कधी बेताल वागून बापाच्या डोळ्यातून पाणी काढणार, तर कधी काहीतरी चांगला पराक्रम करणार आणि बापाच्या डोळ्यात आनंदाश्रूंचं कारंजं येणार ! त्यामुळे पावसाच्या अवतीभवतीनं गाणी, कविता, रागदारी असं बरंच काय काय करून ठेवलंय माणसानं. पावसानंतर बहुतेक उन्हाळ्याचा नंबर यावा. पण उन्हाळा म्हणजे एखादा अँटीनायकच जणू ! त्याच्या शेवटच्या टप्प्यात असं वाटतं की आता हा सगळं जग जाळूनच टाकणार ! थंडी तशी रडवत नाही; कदाचित अंतर्मुख वगैरे करू शकते. थंडी हा तसा चमत्कारिक ऋतू आहे; एकीकडे हवासा वाटतो , एकीकडे नकोसा वाटतो. उन्हाळा हा कसा लक्ख प्रकाशाचा ऋतू आहे तर थंडीत कधी कधी प्रकाश गोठवून टाकण्याचं सामर्थ्य असावं असाही अनुभव येतो. थंडीबद्दल असं आणखीही काही बाही सांगता येईल, पण थंडीची दुसरी एक खास बात म्हणजे हा आकुंचन पावण्याचा ऋतू आहे.    

दरवर्षी प्रमाणे यावेळचा ही सिलॅबस ठीक ठाक चाललेला आहेच. अभ्यासक्रमात लावलेल्या कविता , ठरलेले पाठ शिकवून झाले आहेत, अगदी अभ्यासक्रमाच्या मागणीप्रमाणे; साहित्याच्या उद्देशांप्रमाणे नव्हेत. आता साहित्याचा उद्देश नक्की काय आहे हे ठरवत बसलो तर परिसंवादच घ्यावा लागेल. आमच्या कॉलेजात दर दोन वर्षांनी असा एक परिसंवाद होतो. या परिसंवादाची पण आता एक परंपरा तयार होऊ लागली आहे, पण त्यातल्या चर्चा ऐकल्या तर फारसं काही हाती लागत नाही. तसंही साहित्य वाचून नक्की कुणाला काय मिळतं याचा  हिशेब ठेवत गेलो तर त्यातून एक चमत्कारिक जंत्रीच तयार होऊ शकेल पण पुन्हा आमच्या परिसंवादासारखंच त्यातून नक्की काय हाती येईल हे ठरवता येणं कठीण आहे. तरीही मी साहित्य वगैरे शिकवतो ! का असं विचारलं तर माझ्याकडेही फार ठोस उत्तर नाही. एक आहे मात्र, साहित्य वाचून एखाद्या विद्यार्थ्याचं मन प्रसरण पावताना दिसलं की मला क्षणापुरतं का होईना बरं वाटलेलं आहे हे नक्की, किंवा काहीतरी अर्थपूर्ण केल्यासारखं वाटलेलं आहे अधूनमधून ! आमच्या कॉलेजातली पोरं पोरी साहित्याच्या बाबतीत फारशी उत्साही नाहीत आणि त्यांच्या वाचनाला काही खास आकार उकार नाही तरीही एखाद्याच्या नजरेत वाचत असताना काहीतरी चमकून जातं, तेवढं काम करण्यासाठी पुरतं. 

आता येणाऱ्या थंडीच्या बरोबरच प्रेमचंद बाबांचा पौषाच्या रात्रीचा विलंबित ख्याल शिकवावा लागणार ! ही कथा नेमकी थंडीतच शिकवायला येते या टायमिंग बद्दल अभ्यासक्रम समितीचे खास आभार मानले पाहिजेत ! म्हणजे खुद्द पौष लागायला अजून साधारण दीडएक महिन्याचा अवकाश असला तरी थंडी आजूबाजूला पुरेशी मुरलेली असते. कथेसाठीची वातावरण निर्मिती त्या निमित्ताने आपोआपच झालेली असते. प्रेमचंद नावाच्या आपल्यासारख्याच हाडामांसाच्या  मनुष्याने लिहिलेली ही कथा गेली बारा तेरा वर्षं आपण शिकवतो आहोत; त्यातली हल्कू-मुन्नी सारखी अस्सल हाडामांसाची पात्रं आपल्यासमोर गेली अनेक वर्षे बोलण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या निमित्तानं खूप काही सांगावंसं वाटतं; ते अभ्यासक्रमाच्या बाहेरचं असल्याने सांगावं की नाही याबद्दल संभ्रम आहे. ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला ते कितपत महत्वाचं वाटणार आहे हे कळायला मार्ग नाही, अभ्यासक्रमातल्या गोष्टी ऐकण्याची, वाचण्याची सवय झालेली असल्याने त्या महत्वाच्या वाटत असतातच. सामान्यपणे अभ्यासक्रमाच्या बाहेरचं काही करीत नाही आपण, त्याच त्याच प्रश्नांना तीच तीच उत्तरे देत राहतो वर्षानुवर्षे. परंतु इतक्या वर्षांच्या सलगीनं इतरांना कदाचित अनोळखी असलेली आणि आपल्या अगदी ओळखीची झालेली हल्कू-मुन्नीच्या पौषाच्या रातीच्या ख्यालाची आवर्तनं परिघाबाहेर सांडून जातील असं वाटतं. ती परिघाबाहेर जाण्याआधी त्यांना पकडून ठेवलं पाहिजे थोडा वेळ तरी. आपल्या ओळखीचं दुसऱ्याच्या ओळखीशी ताडून पहायला हवं ! याबद्दल काही लिहिलं तर मार्क वगैरे काहीही मिळणार नाहीत. ते कुणी ऐकलं किंवा वाचलं तर कुणाला समजेल याचीही खात्री नाही. तरीही गेली काही वर्षे नियमितपणे दिवाळी नावाचा प्रकाशाचा उत्सव संपल्यानंतर पौषाच्या रात्रीच्या या संथ ख्यालाची ज्ञात-अज्ञात आवर्तनं आपल्याला वेधून टाकताहेत, या आवर्तनांमध्ये आपण अडकतो आहोत. हे अडकणं थांबवता येत नाही, त्याच्या लाटा येतच राहतात एकामागोमाग एक. या लाटा इतरवेळीही असतातच कुठेतरी अदृश्यपणे; उन्हाळ्यात आटून जात नाहीत की पावसाळ्यात त्यांना भरती येत नाही. थंडीच्या सुरुवातीला जाग्या होतात अलगदपणे ! छोटे सर्पिल आकाराचे आरोह अवरोह वर येऊ लागावेत त्याप्रमाणे या लाटा वर येऊ लागतात. कुठेतरी खोलवर असलेल्या एखाद्या लाटेला बाहेर पाहिलेल्या कुठल्याशा दृश्याने, ऐकलेल्या गाण्याने धक्का बसतो आणि हळू हळू भरून राहतात त्या आपल्यात.   

एखादी कथा नक्की कशी शिकवायची असते याचं काही गणित नाही. काही वर्षांपूर्वी थोडं अडखळत सुरुवात केली होती आणि सामान्य म्हणता येईल अशा पद्धतीने हा ख्याल शिकवत आलोच आहोत आपण; सुरुवात नेहमीसारखीच म्हणजे कथेच्या शीर्षकापासून ! पूस म्हणजे पौष हे समजणं फार कठीण नाही तरी हिंदीतली रात म्हणली की तरुण पोरांना आधी आठवणार ती म्हणजे सुहाग रात, मग येणार रात असलेल्या हिंदी सिनेमांची यादी ! हिंदी सिनेमांची कथानकं आणि त्यांची चित्रं भरून राहिली आहेत सगळीकडे. त्यानंतर मग अजून कोणी दुसऱ्या एखाद्या रातीबद्दल बोलणार, मग थोडावेळ रात्रीवर आणि अंधारावर चर्चा ! दऱ्याखोऱ्यांत भटकंती करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना निबिड काळ्याकभिन्न रात्रीचा अनुभव असतो, ते या अंधाराची आणि आभाळातल्या शुभ्र चांदण्यांची चित्रं रंगवतात कधी कधी वर्गात. ते छान वाटतं ऐकायला. तशा अंधाराची ओळख करून घ्यावीशी वाटते कधी कधी. तर नावाच्या बाबतीत मग आणखी माहिती म्हणजे पुन्हा आपण सांगणार की बाबांनो पौष म्हणजे पोषणाशी संबंधित; पारंपारिक रित्या शुभ आणि पोषक असा हा महिना मानला गेला आहे,आपल्या सांस्कृतिक अभ्यासक्रमात पौषाच्या रात्रीला थोडं तरी स्थान आहे, तरी कार्तिकात येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या आणि फाल्गुनातल्या महाशिवरात्रीच्या मानाने ते काहीच नाही.  तर मग पुढच्या कथेचा एखादा हिस्सा आपण तर थोडा  एखाद्या उत्साही विद्यार्थ्याने वाचून दाखवायचा आणि मग त्याची खास शब्दावली समजावून देत, उत्तर भारतातल्या आपल्याला अनोळखी असलेल्या परंतु पेपरातल्या मथळ्यांवरून माहित असलेल्या शीतलहरबद्दल सांगत, तिकडले डोंगर, पर्वत तिकडली शेती याची थोडी माहिती देत, शेतकऱ्याचं जीवन, लेखकाचं जीवन याच्या आगेमागे थोडं सांगत नंतर मुख्यतः परीक्षेच्या दृष्टीने काय येईल त्याची तयारी करून घ्यायची; परीक्षेतली प्रश्नोत्तरे ! मुलांनी मिळून चर्चा  करावी, रसग्रहण करावं असंही होतं एखाद्या वर्षी, पण अशी वर्षे कमीच आहेत अगदी. मुख्य कथेत काय चाललंय याकडे मुलं कधी लक्ष देतात, कधी नाही. त्यांना परीक्षेचे पॅटर्न माहित असतात, प्रश्नोत्तरांचे ठरीव साचे माहित असतात. सीनियर मुलांनी त्यांना काही मार्गदर्शन करून ठेवलेलं असतं त्यामुळे बहुतेक सर्व गोष्टींशी त्यांची ओळख असतेच आणि त्यामुळे या कथेची आपण स्वतः होऊन ओळख करून घ्यावी असं त्यांना वाटत नाही बहुधा. तरी आपण मात्र हा ख्याल रंगवण्याचा प्रयत्न करतो आहोतच, त्याला कारण या ख्यालातले पक्के सूर. हल्कू-मुन्नी, मूक जनावर, जबरा थंडी, रात्र, प्रकाश आणि शेती आणि मुख्य म्हणजे गरिबी असे हे सर्व ओळखीचे सूर आहेत. गरिबीचं चित्र खूप पालटलं आहे आता. गरिबीची जवळून ओळख असलेली पिढी बहुधा म्हातारीच आहे, पण तरी तिचे अवशेष आतबाहेर सगळीकडे आहेतच. हल्कू-मुन्नी सुद्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या ओळखीचे आहेत, त्यांच्याकडे डोळेझाक करण्याची सवय झाली असेल आपल्याला ही गोष्ट वेगळी. कदाचित येत्या शतकभरात आपण सर्वच झकास उच्च मध्यमवर्गीय झालो, आजूबाजूला गरीब आणि आपल्या आजूबाजूला सर्वच अगदी सुखी शेतकरी झाले आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रत्येकालाच सर्व प्रकारच्या सुखसोयी, कपडे, अन्न मिळू लागलं तर हल्कू-मुन्नी नामशेष होतील.  पण तसं होईपर्यंत आपल्या आजूबाजूलाच असतील ते आणि महत्वाचं म्हणजे त्यांचे चेहरे हेच खरे प्रतिनिधी चेहरे असतील. तर अशा ह्या ओळखीच्या सुरांची हळूहळू सवय होऊन ते पक्के होऊ लागतात आणि नंतर कधीतरी आपला ठाव घेतात. हा ख्याल आळवण्याशिवाय पर्यायच राहत नाही आपल्यापुढे. समोर ऐकणारे कसे आहेत याची बिलकुल काळजी न करता आपण आळवत राहतो याचे सूर. तर हा ख्याल ऐकून नंतर परीक्षा देऊन पास होऊन पुढे गेलेली मुलं कधी गावात, शहरात भेटली तर ओळखीचं हसतात, कधी थोडं बोलतातही पण ते अगदी अभ्यासक्रमातलं असावं तसं ! पौषाचा हा ख्याल आपण सोबत ऐकल्याच्या आठवणी फारशा कुणाकडे असत नाहीत, किंवा त्या असतीलही पण त्याबद्दल कुणी आवर्जून बोलत नाही. सगळं जग जणू एखाद्या आखून दिलेल्या सिलॅबसप्रमाणे चाललेलं आहे की काय अशी शंका येते मला कधी कधी !  

तृतीय पुरुषी आवाज : २ 

बसमध्ये फारसं काही घडत नसल्याने आपल्या नायकाने आधी खिडकीबाहेर पाहण्याचा प्रयत्न केला आणि नंतर एखादी प्रतिक्षिप्त क्रिया घडावी तशी बॅगेतून आपली टिपणाची वही काढून तीत काही खरडू लागला. या टिपणाच्या वहीत काहीबाही लिहून ठेवणे, मधूनच एखादं छोटं चित्र काढणे ही त्याची जुनी सवय. चित्रकलेची हौशी आवड! शाळा सुटल्यापासून चित्रकलेशी फारसा जवळून संबंध राहिला नव्हता, परंतु लिहिता लिहिता असा क्षण येई की शब्द अपुरे वाटत त्याला. शब्दांच्या समुद्रात पोहत किंवा गटांगळ्या खात असताना अचानक मध्येच चित्रशिडांचं जहाज कुठूनसं प्रकट होऊन हाकारतंय असा त्याला भास होई आणि मग तो आपोआप कागदावर रेघोट्या मारू लागे. शब्दांच्या समुद्राचं आणि चित्रशिडाच्या जहाजाचं काही एक अजब नातं आहे. हे जहाज मधेच कधीतरी अवतीर्ण होतं, कधी ते या शब्दसमुद्राचाच भाग असतं तर कधी शब्दसमुद्रातली लाट जे पकडू शकत नाही ते पकडून दाखवतं. एकीकडे शब्दांच्या सहायाने चित्र उभं करण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे समोर दिसणाऱ्या किंवा मनात रुंजी घालणाऱ्या चित्राला शब्दबद्ध करण्याची धडपड मनुष्य अनेक युगे करतो आहे असं त्याला लहानपणापासून अंधुकसं जाणवत होतं. आता या घटनेचे अनेक पैलू त्याला अनुभवायला मिळत होते. गेल्या पौर्णिमेच्या रात्री एका मित्राच्या शेतघरावर रहायला गेलेला असताना ते दोघेही मध्यरात्री एका तळ्यावर गेले असताना त्या पौर्णिमेच्या रात्रीत दिसणारं, जाणवणारं ते वन, रात्रीतल्या प्रकाश-सावल्यांचे  अनोळखी आकृतिबंध आणि तळ्यावरला झिरझिरधवल प्रकाश पाहून दोघेही अनेक क्षण स्तब्ध होते. दुसऱ्या दिवशी या अनुभवाचं, या प्रत्यक्ष पाहिलेल्या दृश्याचं आणि त्या चित्राने मनात उमटलेल्या छबीचं शब्दचित्र रेखाटण्याचा त्याने बराच प्रयत्न केला होता, पण काही केल्या शब्दांतून ते चित्र, तो अनुभव उभा राहीना. अर्थात सिद्धहस्त लेखकांना ही कला अवगत असते असं आपण सर्वसाधारणपणे म्हणतो. पण ते कितपत खरं आहे याबद्दल त्याला शंका होती. प्रत्यक्ष घेतलेला अनुभव जर जाणीवपूर्वक पाहता आला तर तो शब्दांतून यायला हवा, शब्द मर्यादित असले तरी कोणा एकाच्या मालकीचे नाहीत या त्याच्या धारणा होत्या. शब्दांना आपल्यातून नेमकेपणानं व्यक्त होण्यासाठी आपल्यातून वाट करून देता यायला हवी असं पण अगदी नेहमीच ऐकत वाचत असतो आपण ! त्याला एका क्षणी वाटून गेलं की अनुभवातली चित्रं शब्दरूपांत येऊन वाचणाऱ्याच्या मनात पुन्हा एक चित्र उभं  करतात हे कोडंच राहू देण्यातही एक मजा आहे. याउलट रंगरेषांचं जग शब्दाच्या दुनियेपेक्षा अमर्याद असं आहे, रंगांच्या अगणित छटा आणि रेषांच्या अगणित संभावना, त्याला काही सीमाच नाही जणू ! आकार, निराकार सगळंच कवेत घेता येऊ शकतं रंगरेषांच्या संथपणे विहरणाऱ्या दुनियेत. पण मग पुढचा प्रश्न असा येतो, की या अमर्यादतेमुळेच सामान्य मनुष्याचं  त्या जगाशी फारसं जमत नाही का ? सामान्यपणे शब्दचित्रंच जास्त प्रचलित असतात. पिठूळ चांदणं आणि चंद्राची पाण्यात पडणारी प्रतिबिंबं भावगीतात आणि प्रेमगीतात आलेली आहेतच याआधी कितीदा, पण तो अगदी वेगळा मुद्दा झाला. त्या गीतांमध्येही वेगळेपणा सापडण्याचे दिवस गेले होते त्याच्यासाठी. गीतांची आणि त्याला लागून असलेली संगीताची दुनियासुद्धा वर्षानुवर्षे त्याच त्याच प्रतिमांच्या फेऱ्यात अडकलेली आहे हे अनुभवावरून लक्षात येत होतंच त्याच्या. चित्रं काढता आली असती तर या अनुभवातलं काहीतरी नक्कीच अभिव्यक्त करता आलं असतं. आयुष्याची इतकी वर्षे शाळा कॉलेजात नुसतंच वह्यांमध्ये इकडं तिकडं काहीतरी तात्पुरतं खरडस्केच करून आणि चित्रकलेकडे शाळेतल्या सिलॅबस पुरतंच लक्ष देऊन वेळ वाया घालवल्याची खोल खंत वाटली त्याला.  भाषेच्याही  खूप आधी चित्रे आहेत. गुहेच्या भिंतीवर, कातळावर चित्रंच आहेत, शिलालेख वगैरे पुष्कळ नंतर आले. असं असूनही चित्रांची भाषा आपल्या समाजात खोलवर का  गेली नाही; आजूबाजूला इतके बडबड करणारे, भरमसाठ लिहिणारे, शब्दांनी आसमंत भरून टाकणारे लोक का आहेत हा त्याला नेहमी पडणारा प्रश्न आता पुन्हा वर आला. सिनेमा, सीरियली, वर्तमानपत्रं , कथा कादंबऱ्या, पुस्तकं यातून माणसं सारखी बोलताहेत; पण का आणि कशासाठी ? इतकं बोलून, सांगून,लिहूनही मनाच्या तळाशी खोलवर जाऊन रुंजी घालू शकेल अशी किती अस्सल शब्दचित्रं बनवली आहेत माणसाने ? थोडक्या शब्दांत अस्सल चित्र उभं करण्याची कला कुठल्या लेखकाकडे आहे आणि त्याहूनही महत्वाचं अशा लेखकाकडे लक्ष देणारे किती वाचक आहेत? थोडक्यात आता ओळखीच्याच प्रश्नांच्या लाटांचे थवे येऊ लागले !    

बस थांबली; तो उतरून कॉलेजकडे जाऊ लागला. कॉलेजच्या आवारात पोरापोरींच्या छोट्या मोठया घोळक्यांची वर्दळ होती, त्यांच्या तरुण आवाजांनी आसमंत भरून गेला होता. नेहमीच्या ओळखीच्या लोकांना राम राम करून झाले आणि तो थेट शिक्षक रूम मध्ये गेला. आपल्या कप्प्यातून दोन तीन पुस्तकं आणि आणखी काही सामान काढलं आणि वर्गाकडे कूच करता झाला. तास सुरु व्हायला अजून पंधराएक मिनिटे असावीत. आजच्या तासाला त्याचे दोन तीन आवडते विद्यार्थी असणार होते. प्रत्येक वर्षी तो आवडत्या विद्यार्थ्यांची वाट पाहत असे. ते वर्गात दिसले की त्याला आनंद होई, हुरूप येई आणि हे दोघे तिघे तरी अभ्यासक्रमाच्या बाहेर जातील अशी काही आशा वाटत असे. 

रिकाम्या वर्गात तो आला आणि खिडकीपाशी येऊन उभा राहिला. तास सुरु होण्याआधीच्या ओळखीच्या शांततेचा एकल सूर इथे भरून राहिला होता आणि त्याला बाहेरच्या तरुण आवाजांची दुरून गुणगुणसाथ होती. या खिडकीतून आधी कॉलेजला लागून असलेल्या छोट्या हिरव्या मैदानाचा तुकडा दिसत असे आणि त्यानंतर थोडी शेती. मग पुढे एक छोटा रस्ता आणि त्यानंतर काही छोट्या मोठ्या इमारती आणि तुकड्यातुकड्यात क्षितिज. खिडकीतून त्यानं हे दृश्य पाहून घेतलं आणि अलगद त्या दृश्यात शिरून गेला. कथेच्या पहिल्याच पानावर येणारा हल्कू त्याला आता अगदी समोर दिसू लागला, काहीच अंतरावर. हल्कू शेतात निवांत चालत होता. हल्कू हाडाचा आणि खरंतर दिलाचा शेतकरी. शेती हेच त्याचं प्रेम, शेतीमध्ये काही मिळत नाही तरीही हा जमिनीचा तुकडा विकणाऱ्यातला नाही. हा मजुरी करून पैसे कमावेल आणि जमेल तितकी बापजाद्यांची शेती करेल. टिकवून ठेवेल. इतकी वर्षे जवळून माहित असलेल्या कथेतल्या ओळी त्याच्या मनात आता गुंजन करू लागल्या. एकदा तरी ही कथा शेतात बसून शिकवायची होती त्याला; त्यातही रात्रीच्या वेळी आभाळात चांदण्या लुकलुकत असताना ! हल्कूला वाजणारी थंडी अनुभवून पहायची होती, अंगावर एक कांबळ घ्यायची मारामार असलेल्या, कायम देणी चुकवण्याच्या विवंचनेत असलेल्या हल्कूचा आणि त्याच्या प्रेमळ कुत्र्याचा – जबराचा मौनसंवाद ऐकायचा होता; हल्कू आपल्या घरापासून शेताकडे नक्की कुठल्या वाटेनं आला असावा, त्या वाटेवरल्या कुठल्या टप्प्यावर त्याच्या मनात नक्की काय काय आलं असावं याचं खरंखुरं जाणवणारं वर्णन करायचं होतं. समोर दिसणाऱ्या त्याच्याच छोट्या शहरात असलेल्या शेतांच्या तुकड्यात या वाटेचे नकाशे दिसताहेत का याचा शोध त्याची नजर कायम घेत असे. साहित्य वर्गाच्या चार भिंतीत शिकवण्यात काही मजा नाही. त्यासाठी निसर्गाची शाळा पाहिजे किंवा त्या त्या कवितेला, कथेला अनुसरून असलेला आसमंत पाहिजे हे त्याला पुन्हा एकदा कितव्यांदा तरी प्राणपणाने जाणवलं, परंतु त्या दिशेने आपण काही करत नाही करू शकत नाही याची किंचित हताशा देखील मागून आलीच. ही कथा कधी शेतात जाऊन, कधी पौषाच्या थंड रात्रीत आभाळाखाली बसून अशी कायम नवीन नवीन प्रकारे शिकवत राहिलो, सांगत राहिलो तर आपल्याला आणि विद्यार्थ्यांना कुणालाच कंटाळा येणार नाही. पौषाच्या रातीचा या ख्यालाची ओळखी, अनोळखी आवर्तनं  उत्तरोत्तर रंगतच जातील, नवनवी होत जातील असं त्याचं मन त्याला पुन्हा पुन्हा सांगू लागलं. 

प्रथम पुरुषी कथन : २

गरीब हल्कू कडे ऐन थंडीत कांबळ घ्यायला दोन रुपये पण नाहीत. मुन्नीनं ठिगळं लावून दिलेली एक जुनाट गोधडी पांघरून शेतात रात्रीची राखण करायला हा आलेला आहे. त्याच्यासोबत त्याचं प्रेमळ कुत्रं आहे जबरा. माझ्यासोबत येऊ नकोरे थंडीत असं हल्कू त्याला बजावतो पण जबरा ऐकत नाही. प्रेमाच्या धाग्याने बांधून ठेवल्यासारखा तो मागे मागे येत राहतोच. ऐन थंडीत कशीबशी रात्र काढत असताना सहन न होऊन शेकोटी करण्यासाठी काहीतरी उपाय शोधू लागतो. गरीब शेतकऱ्याच्या शेतात कुठलंही तंत्रज्ञान नाही. शोधता शोधता तो जवळच्या एका आमराईत जातो आणि तिथला पालापाचोळा जमा करून एक शेकोटी पेटवतो.     

… थोड़ी देर में अलाव जल उठा. उसकी लौ ऊपर वाले वृक्ष की पत्तियों को छू-छूकर भागने लगी. उस अस्थिर प्रकाश में बगीचे के विशाल वृक्ष ऐसे मालूम होते थे, मानो उस अथाह अंधकार को अपने सिरों पर संभाले हुए हों अंधकार के उस अनंत सागर मे यह प्रकाश एक नौका के समान हिलता, मचलता हुआ जान पड़ता था…. 

आता या ओळी संख्येनं चारपाच भरतील, परंतु या ओळींच्या आधारानं पुढं पुढं जात रहायचं, ओळखीची टेकडी उतरतो तसं. या ओळीतले बहुतेक सर्व शब्द ओळखीचेच आहेत आणि या ओळी ज्या ओळींच्या आगेमागे गुंफल्या आहेत त्या ओळींचेही शब्द फार अवघड वगैरे नाहीत! परिस्थिती देखील बहुतेक ओळखीचीच! पण बऱ्याचदा ओळखीची टेकडी उतरून पलीकडे गेल्यावर समोर दिसणारा पॅनोरमा अनोळखी भासतो, अनोळखी आणि अनोखा ! सुरवातीला आपली नजर एकदम खिळून राहते, हळूहळू स्थिरावते, तयार होऊ लागते आणि त्यातले बारकावे झिरपू लागतात आपल्यात ! या प्रदेशाकडे आपण निराळ्याच नजरेनं पाहू लागतो.  

नाईलाजीच्या मजूरीचे व्रण त्वचेवर वागवणारा हल्कू, त्याच्या त्वचेवर धडकणारी थंडी, आंब्याच्या जाडसर पानांचा अंधारात विरघळलेला गंध, शेकोटीची नश्वर ऊब, शेकोटीच्या आजूबाजूने आसमंतात अनियमित बदलणारा प्रकाश, त्याच्या आजूबाजूला पडणाऱ्या-उडणाऱ्या सावल्या, जमिनीलगतचा गवतात खोल घुसलेला थंडीचा थर, त्याला लाखो योजने दूर असणाऱ्या चांदण-ठिपक्यांची मिळणारी साथ, थंड-उष्ण तापमानाच्या हलके बदलत राहणाऱ्या सीमारेषा आणि हल्कूच्या मनातले ऊबदार प्रदेशाकडे कूच करत राहण्याच्या स्वाभाविक इच्छांचे झोत, मालकावर मूक प्रेम करणारा दिलदार जबरा, त्याची अधूनमधून ऐकू येणारी कुंकूं… असं बरंच काही दिसू शकतं या चित्रात आणि ज्याला काही ऐकायचं असेल त्याला अनेक ध्वनी ऐकू देखील येतील! 

न दिसणारं असं आणखीही पुष्कळ काही आहे इथे. तुम्ही प्रेमाने पाहण्याचा प्रयत्न करा. खाली पडलेली पानं एकत्र करून कशाबशा पेटवलेल्या शेकोटीच्या आगीतून उडणाऱ्या, वर जाणाऱ्या ठिणग्या त्यांची ऊब हरवून बसतात हळूहळू. तरीही आसमंतात कसलीशी ऊब जाणवतेय. तुम्हाला वाटू शकेल, की शेकोटीच या ऊबेचा स्रोत आहे.  आणखी थोडं जवळ जाऊन पाहिलं तर कदाचित जाणवेल, की या थंडीचा मुकाबला करू पाहणारी  हल्कूच्या हृदयातली अदृश्य ऊब पसरतेय, झिरपतेय पौषाच्या या थंड निशेवर! थंडीच्या जोरापुढे तिचं काही चालणार नाही, पण थंडी, गरिबी , दुनियादारी या सगळ्याच्या जोरापुढे हल्कू सारख्या माणसाचं काहीही चालत नाही, तरीही हल्कू गाणं गुणगुणत राहतो. तर त्याच्या हृदयातून पसरणारी ही ऊब हल्कूच्या गुलाबी रंगाच्या शुद्ध हृदयातून पाझरतेय हे लगेच दिसणं, जाणवणं मुश्किलच! कारण तसाही बऱ्यापैकी तुंदिलतनु असलेला, कायम पैशाच्या तंगीत असलेला, जगरहाटी न समजलेला, हट्टाने शेतकरीच राहणारा हल्कू रस्त्यावर चालत असताना समजा आपल्या जवळून जरी गेला तरी तरी कुठं ध्यानात येतो आपल्या ! असे अनेक हल्कू आपल्या आजूबाजूला असतात, पण त्यांची दखल घेण्याची जगरहाटी नाही. तरी हल्कूचं पुष्कळ बरं आहे म्हणता येईल. मुन्नीचं काय! मुन्नीला कथेतही फारसा वाव नाही, ती खाष्ट आणि व्यावहारिक वाटत राहते नुसती, तिच्या हृदयात नक्की काय चाललंय याचा छडा लावायला मुन्नीच व्हावं लागेल कदाचित ! प्रत्यक्ष जीवनात  आपल्या अवतीभवती अगणित मुन्नी जन्माला येतात, कशाबशा जगतात आणि विरून जातात! त्या आपल्या खिजगणतीतही नसतात.  त्यांची दुःखं, त्यांनी केलेले त्याग, त्यांची हुशारी, त्यांची चिकाटी हे सर्व अदृश्य राहून जाण्यासाठीच असतं जणू ! आता तुम्हाला म्हणून सांगतो, की कधी कधी ही कथा वाचत असताना त्याच आंब्याच्या बागेत एका झाडाखाली डोळ्यांवर चष्मा चढवून प्रेमचंद बाबांची छबी बसलेली दिसते ! त्यांना सांगावंसं वाटतं, की आता पूर्वीपेक्षा परिस्थिती बरीच सुधारली आहे, मुली शिकत आहेत. इथंच बघा आपल्या वर्गात, कॉलेजात मुलींची संख्या जवळजवळ मुलांइतकीच भरते आणि मुली मुलांपेक्षाही हुशार आहेत ! तुम्ही विचाराल, की रात्रीच्या अंधारातही प्रेमचंद बाबा दिसतो कसा, तर त्याला कारण हल्कूनं त्या शेतात पेरलेला प्रकाश असं मला वाटतं आणि हल्कूचं असं दर्शन होऊ शकतं त्याला कारण प्रेमचंद बाबा ! हल्कू आणि प्रेमचंद जणू वेगळे नाहीतच, हा प्रेमचंद नावाचा माणूस स्वतःला मजूर म्हणवून घ्यायचा आणि दररोज लिहायचा, पण या माणसाचं लिखाण म्हणजे  प्रकाशाचा शोध आहे. दैनंदिन जीवनातील प्रकाशाचा शोध ! मजुरी तसे आपण सर्वच करतो, पण आपल्याला प्रकाशाचा किरण सापडतो का हा प्रश्न विचारला पाहिजे ! प्रेमचंद बाबाला अतिवेगानं जाणारा प्रकाश सापडला आहे असं जाणवून देणारे अनेक क्षण येतात. रात्रीच्या शेतात एकट्यानंच तिथल्या थंडीत ऊबेची पखरण करणारं हल्कूचं  निर्मळ हृदय हे प्रेमचंद बाबाचंच हृदय असावं खरं तर ! म्हणून तर या आमराईतल्या अशा अथांग अंधार  सागरात एखाद्या असहाय नावेप्रमाणे दोलायमान होणारा अस्थिर प्रकाश लेखकाला इतका स्पष्ट दिसला असावा आणि तो त्याच्या या चार पाच ओळीत अगदी सहज उतरून गेला आणि नीट पहा मग पुन्हा त्या ओळींमधून आपल्या मनात एक प्रकाशचित्र तयार होतंय.       

पानोपानी इतकी सुरेख चित्रं देणाऱ्या या मनुष्याची आजच्या क्षणोक्षणी स्वतःची छवी बनवणाऱ्या आपल्या माणसांच्या दुनियेत दोनचारच चित्रं कशीबशी आहेत आणि तीच सगळीकडे फिरतात- साहित्य सभांच्या पोस्टरांवर, पत्राच्या लिफाफ्यांवर, स्टॅम्पवर ! या माणसाच्या इतक्या मोठ्या लिखाणावर अजून कुणी चित्रं का काढली नाहीत? कुणास ठाऊक, काढली देखील असतील, आपल्याला माहित नसेल.  शेतांची आणि शेतकऱ्यांची चित्रं तशीही फारशी कुणी काढत नाही, म्हणजे जी असतात ती मनोरंजनासाठीच असतात, त्या चित्रांचे देखील ठरलेले आडाखे आहेत, साचे आहेत. शाळेपासून हे सुरु होतं, अभ्यासक्रमात सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या देखाव्याला तोंडी लावायला म्हणून खाली एखादा हिरवागार तुकडा काढावा लागतो. पागोटं नेसलेल्या गावकऱ्यांची, शेतकऱ्यांची पोर्ट्रेटं पहायला मिळतात सगळीकडेच, पण त्याच्या सुखदुःखाचे नकाशे चितारणारा चित्रकार विरळा. त्यातून हल्कू सारख्या गरीब शेतकऱ्याचं चित्र कोण काढणार, त्याच्याकडे कोण लक्ष देणार? त्याच्यासारख्या माणसाकडे लक्ष देण्यासाठी तसं हृदय पण हवं ! त्याला थंडी वाजली तर गोधडी वाटप करणारं कोणी नाही. खरं सांगायचं तर पेपर वगैरे वाचून आणि पुस्तकातली माहिती रटून शेतीबद्दलचं आणि शेतकऱ्याबद्दलचं काहीतरी चित्र तयार होतं आपल्या मनात. ते कितपत खरं असतं, माहीत नाही ! आपल्याला खायला, ल्यायला मिळतंय यापलीकडे फारसं बघत नाही आपण, कधी अडीनडीला एखाद्याला थोडी मदत करतो तेवढंच, तीसुद्धा आपला खिसा सांभाळून ! हल्कू सारख्याला जर आपण मदत करू लागलो तर त्याचं शेत जळणार नाही. कथेच्या अखेरीस शेत जळत असतानाही हा दमला जीव झोपून गेलेला आहे, कारण रात्रभर त्याला गारठ्याने झोपू दिलेलं नाही. मुन्नी येऊन त्याला उठवते आणि हा जळतं शेत पाहूनही दुःखी होत नाही, थकूनभागून झोपून जातो. पुस्तकातली कहाणी इथेच संपते पण खरोखर कहाणी इथेच संपेल  का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगा किंवा लिहा.   

तृतीय पुरुषी कथन : ३

कथा पुन्हा शिकवत असताना त्याला आतलं मन सांगत होतं- आपण चित्रकार असतो तर भटकत फिरलो असतो देशभर, सुदैवाने देशात अजून भरपूर शेतं आहेत आणि मग उत्तरं मिळाली असती कदाचित एखाद्या हल्कूच्या  शेतावर मुक्काम करून तिथे रंगवलेल्या चित्रांत, किंवा हल्कूच्या सोबत घालवलेल्या पौषातल्या एखाद्या जबरदस्त थंडीच्या रात्रीत! हे सांगत असताना अगदी आत्ताच हातात पेन्सिल ब्रश घेऊन काहीतरी रंगवावं अशी एक खोल उर्मी त्याच्या मनात आली. कदाचित त्यानं शेताची चित्रं रंगवली असती.  शेताचा थोडा अनुभव त्याला होता, पण तो लहानपणचा ! त्याचं आणि शेतीचं काही जमलं नाही. म्हणजे घरात आजोबांची शेती होती, पण त्याचं चित्र काही भलतंच होतं. बाहेर वावरात मस्त खळाळतं पाणी, बांधाला असलेली भलीमोठी चिंच, शेतातली कणसं, तिथले प्राणी पक्षी असं एकीकडे अगदी स्वप्नवत चित्र आणि घरात मात्र भाऊबंदकीची उच्च स्वरातली भाषा, झगडे , रुसवे फुगवे, एकमेकांना पार मारून टाकण्याची भाषा! शेताच्या हिरव्या रंगीत चित्रापेक्षा अगदी विपरीत काहीतरी ! लहानपणी त्याला वाटत असे, की आपणही शेती करावी. पण आईला फारशी आवड नव्हती, तिनेच परावृत्त केलं, म्हणाली शाळा कॉलेजात मास्तर हो.  शेतीतले कष्ट जमले नसते, शेती समजली नसती मुळात! अर्थात आज तरी कुठे काय समजतं शेतीबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल! या सर्व विचारयात्रेत कुठूनतरी दिवाळीच्या मिठाई बॉक्स मधले उरलेले दोन बॉक्स कामवाल्या  छायाताईंना द्यायला हवेत असाही एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. 

तास संपला. आजची कथा शिकवून झाली. आज पहिल्यांदाच थोडी सिलॅबसच्या बाहेर जाऊन त्याने शिकवली होती. हलकं वाटत होतं. आतून धडकणाऱ्या काही लाटांना आज वाट करून दिली होती. कॉलेजची वेळ संपली तसा तो बसथांब्यावर आला. संध्याकाळचा प्रकाश फिक्कट जांभळ्या छटा घेऊन आला होता, आकाशात त्या रंगाचे काही पट्टे उमटले होते, त्यांच्या आजूबाजूला फिकट पिवळसर आणि आकाशाचा किंचित गर्द निळा एकमेकांत बेमालूम मिसळून गेले होते. हे सर्व रंग बसच्या टपावर हलकेच धडकून काही निराळीच छटा निर्माण करीत होते. या विविध रंगछटांना आपल्या भाषेत नावं शोधायला हवीत आणि ती आपल्या वहीत उतरवून काढायला हवीत अशा विचारात तो बसमध्ये चढला. बसमध्ये काही शेतकरी महिला चाफ्यांची फुलं केसात माळून बसल्या होत्या. गर्दी अजून फार नव्हती. बस सुरु असल्यामुळे धुरानं या प्रकाशाच्या जांभळ्या छटेत शिरून त्याला एक किंचित करडेपणा, काळपटपणा बहाल केला आणि ती छटा जांभळ्या रंगात मिसळून गेली. आजूबाजूच्या दुकानांच्या पाट्या या धुरामुळे धूसर दिसू लागल्या, चहाच्या ठेल्यांवरून चहाच्या वाफेच्या पांढऱ्या-राखाडी रंगाचे झोत वर जाऊन आसमंतातल्या रंगात मिसळत होते. बसच्या खिडकीतून बाहेर पाहत, आजूबाजूचे लोक पाहत आपला नायक घरी चालला होता.  

दैनंदिन जीवनात  प्रकाशाचा शोध घेत रहायला हवा मनुष्यानं ! 

चित्र सौजन्य: मंदार पुरंदरे

मंदार पुरंदरे पुण्यात जन्मलेला असून तो अनेक वर्षांपासून मराठी, हिंदी तसेच जर्मन भाषेतील नाटके करत आहे. गेल्या काही वर्षांपासून आदाम मित्सकीएविच विद्यापीठात हिंदी भाषा शिकविणारा मंदार अभिनय, अनुवाद त्याचबरोबर संगीत करतो. निसर्ग, फुले आणि माणसांवर त्याचे प्रेम आहे.

One comment on “पौषाच्या रातीचा  ख्याल: मंदार पुरंदरे

  1. Anagha bhate

    Khupch chaaaan lihile aahes raju

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *