मंदार कारंजकर

राग-संगीतातील पुनरावृत्ती


2


back

निर्मिती आणि पुनरावृत्ती यांचा फार जवळचा संबंध आहे. निर्मितीची प्रक्रिया ही नेहमीच एक विशिष्ट प्रकारची पुनरावृत्ती असते. आपण घर बांधतांना विटा रचतो. विटा रचणे ही खरंतर एक पुनरावृत्ती आहे. आपण तीच प्रक्रिया थोड्याफार फरकाने करत जातो आणि त्यातून काहीतरी निर्माण होत जातं. विटा रचून वास्तू बनते. दगडातून सातत्याने नकोसा भाग काढला, हव्या त्या भागाला ठेऊन निवडत  कलाकार रेखत जातो तसे शिल्प बनते. स्वरांना रचत संगीताची निर्मितीही अशीच होत असेल. शिल्प निर्मितीच्या प्रक्रियेत हवे ते ठेवणे आणि नको ते बाजूला ठेवणे  या क्रियांच्या पुनरावृत्तीतून  होत असते तर संगीतात हवे ते स्वर जोडण्याच्या क्रियेची पुनरावृत्ती होते. अलग करणे  असो वा जोडणे, पुनरावृत्ती हा कुठल्याही कलेचा एक महत्वाचा घटक आहे.

खरंतर पुनरावृत्ती हा फारच फसवा शब्द आहे. आपण पुनरावृत्ती करतो ती मुळात पुनरावृत्ती टाळायला. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी जेव्हा पहिल्यांदा गाणं शिकतो, त्याला ‘सा’ लावायला सांगतात. हा ‘सा’ त्या विद्यार्थ्याला त्याच्या कानाच्या क्षमतेप्रमाणे ऐकू येतो आणि स्वराच्या नेमक्या केंद्रबिंदूच्या तो आसपास असतो.  त्यामुळे शिक्षक किंवा गुरु त्याला परत ‘सा’ लावायला सांगतात. इथे अपेक्षा खरंतर त्याने पुनरावृत्ती करू नये अशी असते. विद्यार्थ्याने लावलेला प्रत्येक ‘सा’ हा त्या स्वराच्या खऱ्या केंद्रबिंदूच्या अधिकाधिक जवळ यावा हि अपेक्षा असते. पुनरावृत्ती म्हणजे एक नवा प्रयत्न. तो आधीच्या प्रयत्नापेक्षा सरस आणिआणि स्वराच्या नेमक्या ‘फ्रिक्वेंसी’ च्या अधिक जवळ जाणारा असावा. 

मी जेव्हा माझे गुरु पंडित विजय सरदेशमुख यांच्याकडे शिकायला गेलो तेव्हा अनेक महिने त्यांनी फक्त ‘सा’च गायला लावला. मी ते सर्व सत्र फोन वर रेकॉर्ड केले होते. शिकताना प्रत्येक सत्रात मला माझा ‘सा’ बरोबर लागतो आहे असं वाटायचं. आज जेव्हा चार ते पाच वर्षांनंतर जेव्हा मी ते रेकॉर्डिंग्स ऐकतो तेव्हा मला जाणवतं की सुरुवातीला माझा ‘सा’ स्वराच्या मूळ केंद्रबिंदूपासून फारच लांब होता आणि कालांतराने तो अधिकाधिक जवळ येत गेला.  मुद्दा हा की संगीतात पुनरावृत्ती म्हणजे तीच क्रिया परत करणे असे अभिप्रेत नसून तीच क्रिया अधिक सरसपणे, अधिक सफाईने करणे अभिप्रेत आहे. याचेच अजून एक उदाहरण बघुयात. 

कार्यक्रमात किंवा अन्यत्र बोलताना गाणारे अनेक वेळा त्यांच्या पट्टीचा उल्लेख करतात – पांढरी दोन, काळी पाच, इत्यादी. गाणाऱ्याची पट्टी म्हणजे हार्मोनियमच्या कुठल्या बटनावर ‘सा’ आहे. काळी पाच पट्टी म्हणजे हार्मोनियमवर डावीकडून मोजायला सुरुवात केल्यास जी पाचवी काळी पट्टी येते तेथे त्या गायिकेचा/गायकाचा ‘सा’ आहे. पाश्चात्त्य संगीतात प्रत्येक गाण्याची पट्टी ठरलेली असते. गाणाऱ्याचा आवाज कसाही असो, ते गाणे त्याच पट्टीत गाणे बंधनकारक असतं. गाण्यांचं हे ‘स्टॅण्डर्डायझेशन’ आपल्या संगीताला लागू होत नाही. 

शास्त्रीय संगीतात या गाणाऱ्यांच्या ‘पट्ट्या’ हार्मोनियम चा वापर सुरु झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे एकोणविसाव्या शतकात  रूढ झाल्यात. तोपर्यंत तंबोरे गायकाला त्या दिवशी कोणता स्वर सोयीचा वाटतो त्यानुसार मिळवले जायचे. त्यामुळे, दर दिवशी, किंबहुना दरवेळी गाताना ‘सा’ हा थोडा वेगळा असायचा. अशा परिस्थितीत पुनरावृत्तीच्या हेतू हा कधीच ‘सा’ लक्षात ठेवणं नव्हता तर तंबोऱ्यांमध्ये ते ऐकताच ‘सा’ शोधून त्याच्याशी समरस होणे हा होता. 

आपण सुरुवातीला गाण्याची आणि शिल्पनिर्मितीच्या प्रक्रियेची तुलना केली आणि पुनरावृत्तीतूनच संगीत बनतं असा उल्लेख केला. आता तो मुद्दा थोडा अजून खोलवर समजून घेऊयात. एकाच लांबीची रेष वेग-वेगळ्या ठिकाणी आणि विविध कोनांत काढून तारा, फूल, चिमणी असे अनेक आकार बनू शकतात. त्याचप्रमाणे एकच स्वर विविध वेळांसाठी, विविध प्रकारे गाऊन भाव-भावनांचे वलय निर्माण करता येते. 

भूप या रागात सा, रे, ग, प, ध हेच पाच स्वर आहेत. या रागात विविध विषयांच्या बंदिशी किंवा रचना आहेत. काही भक्तीरसाच्या, काही विरहाच्या आणि काही उत्साहाचं वातावरण निर्मिणाऱ्या. तेच स्वर वापरून कलाकार निरनिराळे, कधीकधी परस्पर विरोधी देखील भाव निर्माण करतात.  

उदाहरण म्हणून आपण पंडित कुमार गंधर्वांनी गायलेल्या एकाच रागातील दोन बंदिशींचे व्हिडियोज पाहुयात. या दोन्ही बंदीशी राग भूपात आहेत. पहिल्या बंदिशींचे शब्द आहेत “माई गुसैय्या का” – या बंदिशीत रागावलेल्या व्यक्तीची मनधरणी सुरु आहे. त्याच भूप रागातील दुसरी बंदिश – “अबीर गुलाल ले आयी” तेच स्वर वापरून एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण केलं आहे.

लेहमधील अल्ची येथील मॉनेस्ट्री मध्ये बुद्धांचे शेकडो चित्र एकाच भिंतीवर काढले आहेत. या शेकडो प्रतिमांमध्ये अगदी नगण्य असा फरक आहे. परंतु, ही प्रतिमांची पुनरावृत्ती तुमच्या भावावस्थेला स्पर्श करते. कलाकार जेव्हा आलाप करतात तेव्हा तेच तीन, चार स्वर थोड्या अधिक फरकाने रचत जातात आणि त्यातून गाणं विणलं जातं. उस्ताद आमीर खान याचा वापर त्यांच्या संगीतात खूप खुबीने करायचे. तेच स्वर घेऊन त्यांच्या संगतीत अगदी थोडा थोडा बदल करत ते राग मांडायचे. सोबत जोडलेल्या राग नाट्यभैरवच्या या रेकॉर्डींमध्ये ही बाब लगेच जाणवते.   भिंतीवर एक छोटं चित्र किंवा एक विशाल चित्र जरी काढलं असतं तरीदेखील या शेकडो छोट्या चित्रांचा परिणाम आणि त्यातून निर्माण होणारी ध्यानावस्था कदाचित साधता आली नसती. ते शेकडो करुणामय डोळे आपल्या मनावर खूप मोठा परिणाम करून जातात. हीच पुनरावृत्तीची ताकद काही गवय्यांनी फार खुबीने वापरली आहे. पंडित कुमार गंधर्व त्यांच्या गाण्यात अनेक वेळा तोच स्वर थोड्या काळासाठी लावतात, मग थांबतात आणि मग परत लावतात. ही प्रक्रिया पूर्ण गाण्यात होत असते. चुंबकाभोवती ठेवलेला लोखंडाचा चुरा जसा वलयांमध्ये रचल्या जातो त्याचप्रमाणे हे अल्पजीवी स्वर एक मोठं वलय निर्माण करतात आणि श्रोत्यांना त्यातून भव्यतेची जाणीव होते.  

गाण्यात स्वर जसे महत्वाचे आहेत तसेच लय देखील महत्वाची आहे. लय म्हणजे गती किंवा वेग. संगीताच्या भाषेत, दोन स्वरांमधला किंवा स्वरवाक्यांमधला (फ्रेझेसमधला) अवकाश म्हणजे लय. स्वरांची थोड्या-अधिक फरकाने पुनरावृत्ती करून जसे विविध भाव निर्माण केले जातात तसेच या पुनरावृत्तीचा वेग अथवा लय बदलून देखील विविध परिणाम साधले जातात. गाण्यात लयीला फार महत्व आहे. लय बदलल्यामुळे भावनिर्मिती बदलते. खरंतर लय म्हणजे स्वरांच्या पुनरावृत्तीचा वेग. पुनरावृत्ती या शब्दातच एक लय समाविष्ट आहे. संगीताचं माध्यम नीट आत्मसात करण्यासाठी लय आणि पुनरावृत्तीच्या क्षमतेला आत्मसात करणं अनिवार्य आहे.   

गाण्याच्या साधनेत पुनरावृत्तीला महत्व देण्यामागे अजून एक फार मोठं कारण आहे. 

माणसाचं मन हे ज्याप्रमाणे त्याची जमेची बाजू आहे त्याचप्रमाणे आपल्या मनामुळे आपल्यावर बरेच निर्बंध देखील येतात. आपल्या सर्वच इंद्रियांच्या क्षमता आपलं मन त्यांना किती ऊर्जा देतं यावर अवलंबून आहेत. अनेकवेळा गोष्टी कानावर पडतात अथवा डोळ्यांसमोरून जातात परंतु मन त्यांची दखल घेत नाही. कलांमध्ये पुनरावृत्तीला महत्व आहे कारण की पुनरावृत्ती ही एकाच गोष्ट अशी आहे जी मनाचा अंमल तोडू शकते. मॅरेथॉन धावणे, सायकलिंग करणे, झाडांची मशागत करणे, विणकाम करणे या सगळ्या कृतींमध्ये पुनरावृत्ती होत असते आणि त्या करताना आपलं मन शांत होतं. त्याचप्रमाणे गाण्याची साधना करताना जेव्हा आपण एक पलटा अनेक वेळा म्हणतो, त्याने आपल्या मनात एक ‘क्रिएटिव्ह व्हॉइड’ , एक अशी पोकळी निर्माण होती जिच्यातून नवनिर्मिती होऊ शकते. 

कल्पना करा की तुम्ही एका नवीन गावात स्थलांतरीत  झाले आहात. तुम्ही रोज सकाळी तुमच्या घरून निघता आणि रोज त्याच रस्त्यानी चालून येता. तुम्ही जर डोळसपणे चालत असाल, तर पहिल्या दिवशी काही गोष्टी ज्या अगदी आवश्यक आहेत त्या तुमच्या लक्षात येतील. आपल्या घराचे नेमके वळण कुठे आहे, त्याची खूण काय, आपल्याला नेहमी लागणाऱ्या गोष्टींची दुकानं .. इत्यादी गोष्टी पहिल्याच दिवशी लक्षात येतील. दुसऱ्या दिवशी लक्ष आपसूकच अन्य गोष्टींवर जाईल. रस्त्यावर इतर घरं कोणाची आहेत, त्यांची नावं, त्यांच्याकडे गाड्या कुठल्या आहेत इत्यादी इत्यादी. 

आपण परत राग भूपचंच उदाहरण घेऊयात. प्रथमदर्शनी ‘सा रे ग प ध’ इतकच त्याचं अस्तित्व जाणवतं. त्यानंतर ‘सा रे प ग’, ‘ध प रे ग’, “सा ध प ग” इत्यादी स्वाभाविक नसलेल्या स्वरांच्या रचना उलगडू लागतात. जशीजशी भूप रंगाची ओळख घट्ट होऊ लागते, तश्या अधिकाधिक गुंतागुंतीच्या शेकडो नाही तर हजारो स्वर रचना अक्षरशः दिसू लागतात.  पहिल्या फेरीतच सर्व काही टिपणं आपल्याला शक्य नाही; आपल्या इंद्रियांच्या काही सीमा आहेत. परंतु हळू हळू आपण त्या इंद्रियांच्या क्षमतेच्या पार शिखरापर्यंत पोहोचू शकतो. कुठल्याही कलेत हे क्षमतेचं शिखर गाठणं हा एक खूप महत्वाचा टप्पा आहे. चित्रकारांना रंगांचे सूक्ष्म भेद जे सामान्य व्यक्तीला जाणवणार देखील नाहीत ते अगदी लीलया टिपता येतात. वाईन टेस्टिंग करणारे तज्ज्ञ त्यांच्या जिव्हेची आणि तिच्या संवेदनशीलतेची जीवापाड काळजी करतात. त्याचप्रमाणे गाणं शिकण्याच्या प्रक्रियेत नादाप्रतीची संवेदना अधिकाधिक तलम होत जाते.  आपण तंबोरा पहिल्यांदा ऐकला की त्यातले षड्ज आणि पंचम हे अगदीच स्पष्टपणे ऐकू येतात. काही महिन्यांच्या अभ्यासाने स्वयंभू गंधार, रिषभ आणि निषाद ऐकू येतात. अजून काही महिन्यांनी किंवा वर्षांनी, जर तानपुरा उत्तम जुळवला आणि नीट ऐकला तर कोमल निषाद, मध्यम, कोमल रिषभ, धैवत आदी स्वर त्यातून ऐकू येतात. तंबोरे जुळवणं आणि ते ऐकणं या दोन्ही क्रियांची जेव्हा एकत्रित पुनरावृत्ती होते तेव्हा आपले कान त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेच्या परिसीमेपर्यंत जायची शक्यता निर्माण होते. हिराबाई बडोदेकरांचा ‘सा’ इतका सुरेल आणि घट्ट होता की अनेक वेळी तंबोरे जरी गाताना स्वरांपासून हलले तरी त्यांचा ‘सा’ अजीबात हलायचा नाही. किंवा गुरुजींकडे शिकताना अनेकवेळा ते खालून जाणाऱ्या भाजीवाल्याच्या हाकेत कोणकोणते स्वर कुठल्या क्रमाने येत जातात ते क्षणाचाही विलंब न करता सांगायचे.

वाद्यसंगीत असो अथवा कंठसंगीत. ‘ओव्हरटोन्स’ ची संकल्पना त्यात फार महत्वाची आहे. भौतिकशास्त्राच्या नियमानुसार जेव्हा एखादी गोष्ट कंपित होते, त्यातून ध्वनी निर्माण होतो. कंपित होणारी वस्तू एका क्षणात किती वेळा कंप पावते यावरून निर्माण होणाऱ्या आवाजाची ‘फ्रिक्वेन्सी’ ठरते. या आवाजाला आपण ‘फंडामेंटल’ असं म्हणतो. त्याचबरोबर, इतर अनेक फ्रिक्वेन्सीज त्या मूळ आवाजासोबत निर्माण होत असतात ज्यांना ‘ओवरटोन्स’ म्हंटलं जातं. हे ओव्हरटोन्स अतिशय सूक्ष्म असतात आणि कानांनी ते ऐकण्यासाठी विशिष्ट अभ्यासाची गरज असते. गाताना तंबोऱ्याच्या ‘फंडामेंटल’ शी आपला मूळ स्वर जुळवणं सोपं असतं परंतु ओव्हरटोन्स जुळवणं फार कठीण असतं.  ज्या लोकांचं गाणं किंवा वाजवणं कानांना खूप सुरेल वाटतं त्यांचे ओव्हरटोन्स देखील खूप चांगल्या पद्धतीने जुळलेले असतात. किराणा घराण्यात रीतसर तालीम जे गुरु देतात, ते गाणं शिकवायला सुरुवात केल्यावर अनेक महिने फक्त ‘सा’च गाऊ देतात. दुसरा स्वर गाऊच देत नाही! किती ही पुनरावृत्ती! त्यामागील हेतू मात्र हे ओव्हरटोन्स जुळवणं असतो. 

संगीताच्या क्षेत्रात बरेचवेळा पुनरावृत्तीचा संबंध जाचकतेशी जोडला जातो. एकच राग अनेक महिने किंवा वर्षे का शिकायचा? त्याच त्याच बंदिशी परत परत का म्हणायच्या? अनेकदा हि पुनरावृत्ती त्रास देण्याचा एक मार्ग आहे का असं वाटू लागतं.  पालकांची अपेक्षा असते की त्यांच्या पाल्यांना पटापट गोष्टी यायला हव्यात. शिक्षकांना बरेचवेळा कसं शिकवायचं हे माहिती असतं परंतु त्यामागची कारणं माहिती नसतात. ‘आर्टिक्युलेशन’ करणं हे बऱ्याच शिक्षकांना जमत नाही. अनेकवेळा शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांकडून काय करून घ्यायचं हे माहिती असतं, ते का करून घ्यायचं आहे याची मात्र अजिबात कल्पना नसते. अनेकवेळा श्रोत्यांचे कान स्वरांचे सूक्ष्म भेद समजू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना गाण्यात किंवा वाजवण्यात खूप पुनरावृत्ती जाणवते. 

​​उदाहरणार्थ, ‘सा, रे ग प’ हि स्वर संगती अनेक रागांमध्ये वापरली जाते. आपण आधी पाहिलेल्या भूप रागाबरोबरच बिलावल, देशकार, हंसध्वनी अशा कित्येक रांगांमध्ये हे स्वर येतात. परंतु, या संगतीतला प्रत्येक स्वर कितीवेळ गायला जातो किंवा कुठल्या प्रकारे गायला जातो याचं प्रमाण रागानुसार बदलतं. मला बिलावल शिकवताना गुरुजींना हा स्वर समूह भूपात गातात त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने गाणे अपेक्षित होते. मला हे सूक्ष्म भेद काळात नसल्याने ते उगाच परत गायला लावता आहेत असे कधीकधी वाटायचे.      

उत्तम कलेच्या निर्मितीत आणि उत्तम कलाकाराच्या जडणघडणीत पुनरावृत्तीचा वाट किती मोठा आहे हे आपण पाहिलंच. उत्तम रसिकांच्या निर्मितीत देखील पुनरावृत्तीचा फार मोठा वाटा असतो. मुळात संगीत असो वा अन्य कुठलीही कला, ती कलाकारांच्या आणि श्रोत्यांच्या एकत्रित समजुतीवर (शेयर्ड अंडरस्टँडिंग) वर अवलंबून आहे. जेव्हा काही कारणाने ही आपापसातली समजूत विस्कटते, तेव्हा खूप समस्या निर्माण होतात. बी. आर. देवधर  मास्तरांनी जेव्हा देवधर स्कुल ऑफ म्युझिक ची स्थापना केली तेव्हा अनेकांनी शंका व्यक्त केली की यातून किती कलाकार निर्माण होतील. मास्तरांच्या पंच्याहत्तरी निमित्त बोलतांना पु. ल. देशपांडे याचा उल्लेख करून म्हणतात की या स्कुलचं खरं यश किंवा तिचा खरा हेतू हे कुमार गंधर्वांसारखे गवई निर्माण करणं नाही आहे. परंतु कुमार गंधर्वांसारख्या गवय्याचं थोरपण समजू शकतील असे श्रोते निर्माण करणं आहे.

गेल्या काही दशकांत पं. दिनकर कायकिणी, पं. शरत्चन्द्र आरोलकर, पं. शरद साठे असे अनेक कलाकार होऊन गेलेत ज्यांचं गाणं सामान्य किंवा थोडंफार ऐकलेल्या श्रोत्यांना रुचायचं नाही आणि कळायचं देखील नाही परंतु दिग्गज कलाकार त्यांचं गाणं ऐकायला गर्दी करायचे. यामागील कारण देखील बऱ्याच अंशी पुनरावृत्ती आहे. इतर कलाकार साधना करून अशा टप्प्यावर पोहोचले असतात जिथे ते या कलाकारांच्या गाण्याचं किंवा वाजवण्याचं सौंदर्य समजू शकतात. श्रोते मात्र त्या कलेचा आनंद उपभोगू नाही शकत. कला समजण्यासाठी रसिकांकडून देखील थोड्याफार पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. चांगली कला परत परत अनुभवणं, स्वतः देखील थोडा वैयक्तिक अभ्यास करणं या गोष्टी श्रोत्यांसाठी आणि त्यांच्या रसग्रहकतेचा विकास होण्यासाठी तितक्याच आवश्यक आहेत. 

थोर कलाकारांना या बाबीची जाणीव होती. त्यामुळेच ते स्वतःच्या अभ्यासाला जितका वेळ द्यायचे तितकंच लक्ष ते चांगलं ऐकणारा श्रोता निर्माण करण्याकडे पण द्यायचे. ते सतत पुनरावृत्ती घडू द्यायचे. त्या श्रोत्यांना वारंवार कार्यक्रमांना बोलवायचे, अनेक वेळा त्यांच्याच घरी उतरायचे. त्या निमित्ताने वारंवार ऐकणं व्हायचं, गप्पा व्हायच्या. कला सादर करणारा आणि ती ग्रहण करणारा हे जेव्हा पुनरावृत्तीच्या प्रवासावर एकत्र असतात तेव्हा त्या दोघांचीही भरभराट होते. 

छायाचित्र सौजन्य: मंदार कारंजकर

मंदार कारंजकर हा हिंदुस्थानी शास्त्रीय गायक असून पंडित विजय सरदेशमुख यांचा शिष्य आहे. खयाल गायनाबरोबरच मंदारने कबीर, रैदास, तुलसीदास, तुकाराम अशा अनेक संतांच्या रचनांना संगीतबध्द केले आहे. मंदारची चार पुस्तके प्रकाशित झाली असून त्याने अनेक वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे. मंदार बैठक फाउंडेशन या संस्थेचा संस्थापक विश्वस्त आहे. याशिवाय, स्ट्रॅटेजी आणि कम्युनिकेशन सल्लागार म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांशी मंदार संलग्न आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *