मानसी जोग

‘चाफा’विषयी..



back

कलाकारासाठी आपली कलाकृती हे जणू अपत्यच असतं. पहिल्या अपत्याचं जसं वेगळं कौतुक पालकांना असतं, तसंच ते कलाकारालाही वाटतं. माझं पहिलं कलापत्य म्हणजे ‘रात्रंदिन आम्हा !’ हे नृत्य सादरीकरण. सप्टेंबर २०१८ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्ये नृत्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना ‘मंथन’ या उपक्रमांतर्गत ते करण्याची संधी मिळाली. ‘मंथन’ हा नृत्याच्या विद्यार्थ्यांसाठी ललित कला केंद्राने योजलेला विशेष उपक्रम असतो. यामध्ये विद्यार्थ्यांनी गटाने मिळून एक सादरीकरण करायचं असतं. भरतनाट्यम् च्या माझ्या देहभाषेतून मला माझ्या आजच्या आयुष्याशी निगडीत विषय मांडता येतील का? असा विचार खूप वर्षं मनात घोळत होता. ही संधी अखेर ‘रात्रंदिन आम्हा!’ हे सादरीकरण दिग्दर्शित करताना मिळाली.  शास्त्रीय नृत्य कलाकार म्हणून काम करताना बहुतांशी वेळा आम्ही भारतीय मिथकांतील आशय आणि विषय हाताळतो. रामायण, महाभारतातील पात्रे आणि कथानकं, कृष्ण आणि त्याच्या रासलीला, त्याची वेगवेगळी रूपं, शिवाय सरस्वती, गणपती, शिव, कार्तिकेय अश्या विविध देवता आणि त्यांची वर्णनं यांनी भारतीय शास्त्रीय नृत्याच्या रचना खुललेल्या दिसतात. या सगळ्याच देवतांच्या कथांमागे आणि रुपकांमागे मोठी विचारधारा आहे. उदाहरणार्थ, जेव्हा कंसासारख्या दैत्याचा श्रीकृष्णाने कसा संहार केला ही गोष्ट नर्तकी सादर करते तेव्हा ते फक्त कंस आणि कृष्ण या दोन पात्रांसाठी मर्यादित नसतं. कंसाच्या किंवा राक्षसाच्या रूपाने माणूस म्हणून आपल्यात असणारे सगळे वाईट गुण चित्रित होतात.  दुर्गुणांनी भरलेला, धन, सत्ता, सैन्य यांचा स्वामी असा शक्तिशाली मनुष्य हे कंसाचं व्यक्तिचित्रण दिसतं. तर आपला हा सद्गुणी देव कृष्ण मात्र एक किशोर, गोकुळात वाढलेला, गवळ्याचा मुलगा. वाईट शक्ती कितीही बलाढ्य असल्या, आणि चांगल्या शक्ती त्यांसमोर अगदी लहान भासल्या तरीसुद्धा  चांगल्यामध्ये   वाईटाला नामोहरम करण्याची ताकद असते हाच आशावाद तर या मिथकाला सांगायचा नसेल!याशिवाय, अनेक शृंगारयुक्त अभिनय रचना शास्त्रीय नृत्यात दिसतात. विशेष म्हणजे यांमध्ये देवदेवता देखील प्रियकर/ प्रेयसी म्हणून येतात. तरीसुद्धा त्यांच्या प्रेमातील सर्व भावावस्था मात्र अगदी तुमच्या आमच्यासारख्याच मानवी आहेत असं दिसतं. आपले देव या रचनांमधून उत्कट प्रेम करतात, विरहाने व्याकुळ होतात, रतीप्रेमातला अमृतसम आनंद लुटतात, कधी चक्क स्वतःच्या भार्येला सोडून लपून छपून दुसऱ्या स्त्रीकडेही जातात. जशी आपण माणसं, तसेच आपले देव या नृत्य रचनात दिसतात.  त्यामधून मानवी जीवनाचेच वेगवेगळे पैलू चित्रित होतात.

हे सगळं जरी खरं असलं, तरीसुद्धा आज आपण आपल्या मिथकांपासून फार दूर आलो आहोत. फोन आणि इतर सुविधांमुळे सातत्याने संपर्कात राहू शकण्याचा आजचा काळ आहे. तेव्हा, विरहाची भावना आज अस्तित्त्वातच नाही असं नाही; पण “तीन महिने झाले, माझ्या प्रियकराची काही बातमी, काही पत्र आलेलं नाही” यातून निर्माण होणारी काळजीयुक्त विरहाची भावना आज “तीन मिनिटापूर्वी त्याने माझा मेसेज वाचलाय पण उत्तर दिलं नाही.” या अनुभवात जगणाऱ्या आपल्यासाठी कितीतरी परकी आणि अतिरंजित वाटते. त्या काळातील समाज जीवन आणि आजचे जीवन यांची गती, माणसांच्या धारणा, दैनंदिन कामं, कुटुंब पद्धती, अशा अनेक अनेक बाबींमध्ये साहजिकच फार मोठा फरक दिसून येतो. काळाच्या पटलावर आपण या मिथकांपासून  खूप खूप पुढे आलो आहोत. तेव्हा शास्त्रीय नृत्याची व्याप्ती ही भारतीय मिथकं, इतिहास यांची समज आणि आवड असणाऱ्या काही मोजक्याच गटापुरती मर्यादित राहिली आहे की काय असं वाटतं. 

या पार्श्वभूमीवर शास्त्रीय नृत्यातून भारतीय मिथकांव्यतिरिक्त आशय हाताळून पाहावा असं वारंवार वाटत होतं. आणि म्हणूनच विद्यापीठामध्ये नृत्याचं पदव्युत्तर शिक्षण घेत असताना ‘मंथन’ या उपक्रमांतर्गत ‘रात्रंदिन आम्हा!’ हे सादरीकरण करायचं ठरवलं. तुकोबांची ‘रात्रंदिन आम्हा, युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन’ ही पंक्ती खूप काळ मनात रेंगाळत होती. आपल्यापैकी प्रत्येकालाच वेगवेगळ्या पातळ्यांवर ‘युद्ध’ लढावी लागतात. संघर्ष करावा लागतो. साध्या साध्या गोष्टींपासून मोठ्या आणि महत्त्वाच्या बाबींपर्यंत हे युद्धाचे प्रसंग आपल्यावर येतात. आपण या अडचणींकडे बहुदा नकारात्मकच बघतो. पण असं वाटतं की अडचणी आल्याच नाहीत, तर मग आपण त्याच त्याच भोवऱ्यात फिरत राहू, आयुष्य पुढे जाणारच नाही. आणि म्हणून मग त्या सर्व शक्तिमान ईश्वराकडे इतकंच मागावंसं वाटलं, की –

“क्लेशांचा सन्मान कराया दे बळ, सार्थकाचे युद्ध, युद्धे जिंकू |”

शेवटी आयुष्याचा संघर्ष जिंकायचा तर हे रोजचेच छोटे मोठे संघर्ष आपल्याला मदत करणार आहेत.

या सादरीकरणात वेगवेगळ्या पातळीवरील संघर्ष हाताळावा अशी योजना मनाशी आखली. आजूबाजूला दिसणारे संघर्षाचे अनेक प्रसंग होते. त्यातून काही मोजके जे नृत्यातून मांडता येतील असं वाटलं, ते निवडले. या प्रसंगांची एक सूत्रबद्ध मांडणी आणि त्याला साजेसं काव्य अशी साधारण ‘रात्रंदिन आम्हा’ ची रूपरेषा ठरवली. नाटकाचे वेगवेगळे प्रवेश असतात तसे साधारण प्रत्येक प्रसंगांचे प्रवेश मी लिहून काढले. प्रवेशाची सुरुवात, मध्य, शेवट यामधला आशय काय असेल? त्यात कोणती पात्रं असतील, त्यांनी कुठल्या पद्धतीच्या हालचाली करायच्या आहेत, कुठल्या प्रकारचं संगीत त्या प्रसंगाला समर्पक ठरेल असा एक सांगाडा तयार केला आणि मग माझ्या १० मैत्रिणींना सोबत घेतलं. आम्ही एक एक प्रसंग वाटून घेतला. आणि त्या प्रसंगांची नृत्य संरचना केली. अशी वाटणी केल्यामुळे ते सादरीकरण माझ्या एकटीच न राहता माझ्या सगळ्या गटाला ते आपलं वाटायला लागलं. 

सुरुवातीचा प्रसंग होता दोन देशांमधल्या युद्धाचा. त्यानंतरच्या प्रवेशात प्राण्यांमध्ये होणारा शिकार मिळवण्यासाठीचा संघर्ष रंगवला होता. इथे नर्तिकांना प्राणी होण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या हालचाली शोधायला वाव मिळाला. त्यानंतरच्या प्रसंगामध्ये प्रियकर आणि प्रेयसी याचं जोडपं होतं. या दोघांनाही नातं टिकवताना एक वेगळाच सुप्त संघर्ष करावा लागतोय, एकत्र राहताही येत नाही आणि सोडून जाताही येत नाही अशी त्यांची अवस्था मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरच्या प्रवेशामध्ये एका तृतीयपंथी व्यक्तीचा स्वतःचा स्वीकार करताना स्वतःशीच होणारा संघर्ष मांडला होता. या प्रवेशाची नृत्य संरचना आणि सादरीकरण मी केलं होतं. यानंतरचा प्रसंग हा सादरीकरणाचा शेवट होता. यात नजीकच्या भविष्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रवेशात एक नर्तिका आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यात श्रेष्ठ कलाकार होण्याची चढाओढ लागते अशी गोष्ट होती.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘संत नामदेव सभागृहात’ या सादरीकरणाचा पहिला प्रयोग झाला. त्या प्रयोगाला मुख्यतः ललित कला केंद्रामधले नाट्य, नृत्य आणि संगीताचे विद्यार्थी, आमचे शिक्षक, गुरु असा प्रेक्षकवर्ग असणार होता. हा प्रेक्षक वर्ग मुख्यतः नाटकाचा होता. त्यांना डोळ्यासमोर ठेवून असं वाटलं की ‘शब्द’ हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आणि आवडीचा भाग आहे. आणि असा नवा आशय मी पहिल्यांदाच हाताळत असल्यामुळे प्रेक्षकांना कथानक समजण्याच्या दृष्टीने सुद्धा शब्दांचा आधार घ्यावा असं वाटलं. (पण शब्द नव्हेत, तर हालचालीच या कलाकृतीचा प्रधान आणि आशय पोचवणारा भाग असणार आहेत ही स्पष्टता दिग्दर्शिका म्हणून कायम ठेवली.) या सादरीकरणाच्या प्रत्येक भागासाठी एकेक कविता शोधली. यापैकी काही प्रसंगांना समर्पक कविता सापडल्या नाहीत तेव्हा त्या स्वतः लिहिण्याचा प्रयत्न केला. यांपैकी एक, या सादरीकरणाच्या शेवटी येणारी, सगळ्या प्रसंगांचा/ संरचनांचा आढावा घेणारी, कविता पुढीलप्रमाणे – 

रात्रंदिन आम्हा, युद्धाचा प्रसंग,
अंतर्बाह्य जग आणि मन |
भरण्या उदर, घेतले गा प्राण,
पशूंचे प्राक्तन, दैवे दिले |
सजण-सजणी, गुंता हा शाश्वत,
अंतस्थ मरण, सोडवेना |
नर-नारी मेळ, जगी बहु क्लेश,
बापा पांडुरंगा, तूची माउली ना?
आम्हा व्हायचे उद्गाता, हाव आणखी,सुटेना,
अपुलाचि ‘मृत्यू’ निर्मितो म्या |
क्लेशांचा सन्मान कराया दे बळ,
सार्थकाचे युद्ध, युद्धे जिंकू |

तर ‘रात्रंदिन आम्हा!’ या सादरीकरणात ‘संघर्ष’ या शब्दाच्या वेगवेगळ्या मिती उलगडण्याचा प्रयत्न केला होता. देशांतलं युद्ध, प्राण्यांचा शिकारीसाठी परस्परांशी संघर्ष, नात्यातला संघर्ष इत्यादी प्रत्येक विषयासाठी एक स्वतंत्र नृत्य संरचना अशी या सादरीकरणाची एकूण मांडणी होती. यामध्ये मी जी संरचना सादर केली होती त्यात एका तृतीयपंथी व्यक्तीचा स्वतःला स्वीकारताना होणारा मानसिक प्रवास साकारण्याचा प्रयत्न होता. संघर्ष हा काही नेहमी दोन व्यक्तींमध्ये होतो असं नाही, तो आपला आपल्याशी सुद्धा होतो. तेव्हा अश्या कुठल्यातरी एकट्याच्या संघर्षावर संरचना करावी अशी मूळ कल्पना होती. त्या दिवसांत वृत्तपत्र, समाजमाध्यमं यांमधून समलिंगी विवाहाला कायद्याने मान्यता देण्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती. तेव्हा असं वाटलं की अश्या समाजाने ‘वेगळ्या’ ठरवलेल्या या LGBTQ गटाची व्यथा फार वेगळी आहे. आपले लैंगिक प्राधान्य आणि लिंगभाव ओळख घेऊन निर्भीडपणे समाजात वावरण्यापूर्वी अश्या व्यक्तींना स्वतःशीच एक संघर्ष करावा लागत असेल का? समाजासाठी जे विजोड आहे ते माझ्यासाठी अत्यंत नैसर्गिक आहे हा स्वीकार करताना स्वतःशी काय संवाद होत असेल? या विचारांतून मग या विषयावर संरचना करायची असं ठरवलं.     

‘तृतीयपंथी’ असणं या बाबीला अनेक कंगोरे आहेत. समाजामध्ये उघडपणे बोलला न जाणारा हा विषय आहे. त्यात मी पहिल्यांदाच कलाकार म्हणून संपूर्णपणे नवा असा आशय निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. मी जे करेन ते प्रेक्षकांना समजेल का? आजपर्यंत शास्त्रीय नृत्यात मी हा विषय कधीच पहिला नव्हता, त्यामुळे माझ्या नृत्याच्या देहभाषेत यासाठी काहीच हालचाली उपलब्ध नव्हत्या, त्याही मीच शोधणार होते. म्हणूनच हा विषय हाताळायचा म्हणजे खूपच नाजूक काम असं सुरुवातीला वाटलं. भारतीय तत्त्वज्ञानातील ‘अर्धनारीश्वर’ या संकल्पनेची लगेच आठवण झाली आणि त्या संकल्पनेचा अंतर्भाव करायचा नाही हा निर्णयही मनात लगेच झाला. भारतीय मिथकांतील संकल्पनांशी जेव्हा समकालीन विषय जोडले जातात, तेव्हा त्याची मांडणी ही काहीशी विजोड होते असं मला वाटतं. मिथकांतील संकल्पना सादर करणं हे अगदीच सहज शक्य होतं, कारण त्यासाठीचं काव्य, संगीत, हालचाली या सगळ्या परंपरेमध्ये मुबलक उपलब्ध आहेत. तरीसुद्धा ते करायचं नव्हतं कारण मुळात विषय परंपरेतला न घेता त्याचं सादरीकरण हे संपूर्णपणे परंपरेच्या चौकटीत यशस्वीपणे करता येऊ शकेल का? हे तपासून बघणं हा मुख्य उद्देश होता.    

‘स्त्री’ तत्त्व  आणि ‘पुरुष’ तत्त्व यांचा एकच शरीरात वास असणारी ‘अर्धनारीश्वराची’ संकल्पना कितीही रोचक आणि कालातीत असली तरीसुद्धा तृतीयपंथी असणं ही बाब त्यापेक्षा फार फार वेगळी आहे असं वाटतं. त्यामध्ये स्त्रीत्व आणि पुरुषत्त्व यांचा एकत्रित वास यापेक्षा ‘पुरुष’पणाच्या बाह्य रूपाकडून ‘स्त्री’पणाच्या  अंतर्मनाकडे जाणारा आणि पुन्हा ‘स्त्री’पणाच्या  बाह्य रूपाकडे होणारा प्रवास माझ्या डोळ्यासमोर अधिक येत होता. तृतीयपंथी असणं या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत. वैज्ञानिक, सांस्कृतिक, सामाजिक, मानसिक, सौंदर्य दृष्ट्या हा विषय हाताळण्याच्या शक्यता अगणित दिसत होत्या. पण त्यातील काहीतरी एकच धागा पकडला तर सोपं होईल असं वाटलं. आणि म्हणूनच ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या मनात होणारा विचारांचा संघर्ष इतकाच ‘मानसिक’ / ‘भावनिक’पातळीवरचा प्रवास उलगडायचा ठरवलं. आसपास अशी कुठली व्यक्ती नव्हती, पण थोडंसं वाचन केलं, आणि लिंग आणि लिंगभाव या दोन संकल्पना कशा वेगळ्या आहेत हे समजून घेतलं. मनाशी विचार केला की वयाची वीस बावीस वर्ष मी स्त्री म्हणून जगलीये. यामध्ये समाज मला स्त्री म्हणून कसं बघतो आणि मी स्वतःला स्त्री म्हणून कसं बघते ह्या दोन बाबी आहेत. मग विचार केला की उद्या समजा आतून असं वाटू लागलं की मी पुरुष आहे, किंवा ‘समाजाने स्त्री म्हणून मान्य केलेल्या गुणांपेक्षा पुरुष म्हणून मान्य केलेले गुण मला जर अधिक जवळचे वाटायला लागले’, तर? आणि मग नाटकाची लिहितात तशी गोष्ट लिहिली, त्याचे प्रवेश लिहिले आणि त्याला समर्पक संगीताची जोड दिली. सुश्राव्य आणि समर्पक संगीत ही कुठल्याही नृत्य संरचनेची अपरिहार्य गरज असते. माझा विषय मांडण्यासाठी मला असं संगीत हवं होतं जे पारंपरिक हिंदुस्थानी किंवा कर्नाटक संगीतातून जन्माला आलेलं. मला स्त्री आणि पुरुष अशी दोन तत्त्व मांडण्यासाठी बोल आणि स्वर किंवा स्त्री आणि पुरुष गायकांचे आवाज, किंवा दोन राग किंवा दोन वेगळी वाद्य अश्या कुठल्यातरी दोन बाबींनी बनलेलं संगीत हवं होतं. त्यामध्ये ऐकणाऱ्याला अंतर्मुख करण्याची ताकद असणं देखील आवश्यक होतं. आणि हे सगळं नव्याने बनवून घेण्यासाठी आवश्यक तितका निधी माझ्याकडे नव्हता. खूप शोधाशोध करून सुद्धा मनासारखं संगीत सापडत नव्हतं. तेव्हा एक दिवशी मला अचानक ‘अहिर भैरव’ रागात काही वर्षांपूर्वी माझ्या मैत्रिणींनी त्यांच्या संरचनेसाठी एक संगीत तयार करून घेतलं होतं त्याची आठवण झाली. ‘योग’ या विषयावर रमा कुकनूर आणि यशोदा पाटणकर या माझ्या मैत्रिणींनी संरचना केली होती ज्यामध्ये ‘मन’ आणि ‘शरीर’ यांचा द्वैताकडून अद्वैताकडे जाणारा प्रवास उलगडला होता. मनाचं निदर्शक म्हणून स्वर आणि शरीराचं निदर्शक म्हणून बोल वापरून जयदीप वैद्य या आमच्या गुणी गायक मित्राने अत्यंत रंजक अशी १२ मिनिटाची रचना तयार केली होती. माझ्या मैत्रिणींना मी माझी अडचण सांगून हे संगीत माझ्या संरचनेसाठी सर्वार्थानं समर्पक वाटतंय असं सांगितलं तेव्हा त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता अत्यंत प्रेमाने आणि खुल्या मनाने होकार दिला आणि ते दैवी संगीत मला वापरायला मिळालं. 

पुढचं सगळंच मग बऱ्यापैकी सुकर झालं. या तृतीयपंथी व्यक्तीच्या मानसिक प्रवासाची मी ठरवलेली रूपरेषा आणि माझ्याकडे असणारं संगीत यांची आता मला काळजीपूर्वक सांगड घालायची होती. संगीतातील काही भाग कापून त्याचा एक सांगाडा तयार केला.  आणि या संगीतानुसार माझ्या संरचनेसाठीची गोष्ट पुढीलप्रमाणे रचली- सगळ्यात पहिले स्त्री तत्त्व आणि पुरुष तत्त्व यांच्या संयोगातून एक जीव जन्माला येतो. तो जीव वाढत असताना त्याला लक्षात येतं की जग आपल्याकडे एका विचित्र नजरेनी बघतंय. स्वतःच्या आत डोकावून पाहिल्यावर आतमध्ये दिसते ती एक स्त्री. सुरुवातीला धक्का बसतो, राग येतो. आणि मग एका क्षणी हे मान्य करण्याची ताकद येते की ‘तू माझाच भाग आहेस’;  त्या व्यक्तीतला ‘तो’ ‘ती’ ला म्हणतो की ‘आपण दोघं एकच आहोत. ये, माझा हात धर.’ आणि मग त्या व्यक्तीला स्वतःचाच हात अगदी सहज पण घट्ट हातात घेता येतो. (तुकोबा म्हणतात तसं ‘देता आली मिठी सावकाश’ असं काहीसं) मग स्वतःच्या अंतर्मनात खोल जाऊन आपल्यातल्या स्त्रीत्वाला समजून घेऊन, आनंदाने स्वीकारून त्यातून बाहेर पडते ती एक स्त्री. समाजाला न घाबरणारी, समाजासाठी कदाचित आपलं अस्तित्व हा एक विजोड आहे, पण आपल्याकरता हाच सगळ्यात खरा आणि एकमेव जोड आहे हे माहीत असलेली आणि त्याबद्दल कुठलीही लाज न बाळगणारी स्त्री.  यासाठीही एक कविता लिहिली होती, त्यामध्ये असं रूपक सुचलं की, ‘तो चाफा आहे’ पण त्याच्यात जुईचा गंध आहे. आणि ‘तो’ बाहेर पडून ‘ती’च्यासारखा दरवळणार आहे. ही कविता पुढीलप्रमाणे- 

जुईच्या वासाचा चाफा !

नको ना गं अशी वेड्यासारखी मला बिलगून राहूस!
कसं सांगू तुला? आपण एक नाही असू शकत,
माझ्या हातांना चाफा माळायची परवानगी नाही.
चाफ्याला येणारा जुईचा वास घेतलाएस कधी?..मला येतो.
तू नको ना गं अशी जवळ येउस, नको मला मोहात पाडुस, नको,नको माझा ताबा घेउस;
माझ्यातून तुला पाहतील लोक, मला हसतील. 
तू का राहतेस इथे? मला शिक्षा.
.. ऐक ना, चाफ्याला ठरवता येतं का गं? कुठला वास यावा स्वतःला ते? 
मला चाफा होता येणार नाही. कारण माझ्यात जुईचा गंध आहे.
ऐकत्येस ना? तुझा गंध आहे. 
पण तू अशी वेळी अवेळी माझ्यातून बाहेर पडून दरवळू नकोस.
कारण चाफा तो असतो. ‘तो’ चाफा. त्याला जुईचा गंध येणं पाप आहे. 
माझ्या हातात नसलं तरी..माझंच पाप आहे.

ही संरचना करत असताना हालचाली आणि पेहेराव हे भारतीय शास्त्रीय नृत्यातूनच उगम पावलेले असतील हे ठरवलं. दागिने आणि इतर आभूषणं यांचा वापर करायचा नाही असं ठरवलं कारण ती आकृती फक्त एक माणूस दिसायला हवी होती. सगळं लक्ष हे नर्तिका किती सुंदर दिसते यापेक्षा ती काय हालचाल करते आणि ‘माणूस’ म्हणून काय सांगू पाहते याकडे असावं असं वाटलं. शास्त्रीय नृत्यात हस्तमुद्रांना विशेष महत्त्व आहे. विशिष्ट मुद्रांचे विशिष्ट अर्थ आहेत, ज्यांद्वारे मुख्यत्त्वे आशय पोचवला जातो. पण या संरचनेत मी फक्त स्त्री आणि पुरुष या अर्थी ‘मृगशीर्ष’ आणि ‘शिखर’ इतके दोनच हस्त परंपरेच्यानुसार वापरले. इतर आशय पोचवण्यासाठी बहुत करून रोजच्या जगण्यात जे हातवारे आपण करतो तेच वापरण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रेक्षकांना गोष्ट समजणं सोपं होईल असा उद्देश होता. काही हालचाली या अमूर्त होत्या. म्हणजे त्याला काहीच अर्थ नव्हता असं नाही, पण विशिष्ट अर्थ नव्हता. मला त्यातून काय सांगायचं आहे हे पक्कं होतं, पण समोरच्याला त्याचा अर्थ समजण्यापेक्षा त्यातला ‘भाव’ समजणं किंवा जाणवणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. (उदाहरणार्थ, सगळ्यात सुरुवातीला होणारी फक्त हातांची उघडझाप. त्यामधून ‘एक जीव अस्तित्त्वात आहे’ इतकंच सांगायचं होतं. प्रेक्षकांपैकी काहींना ते हृदयाचं आकुंचन प्रसारण वाटलं, काहींना योनीतून जीव बाहेर पडताना ती प्रसारण पावत्ये  असं वाटलं इत्यादी.)  गोष्ट सांगताना काही हालचाली या तंतोतंत जे रूपक गोष्ट लिहिताना दिसलं तश्याच ठेवल्या. (उदा. स्वतःचा हात हातात घेणे, आरशात बघणे, स्त्रीत्त्वाचा स्वीकार म्हणून दागिने घालणे, टिकली लावणे इत्यादी.) हालचाली हा संरचनेतला महत्त्वाचा भाग असणार होताच, पण नाट्य हा त्याहीपेक्षा महत्त्वाचा भाग होता. म्हणून याची मांडणी ही काहीशी  नाटकासारखी करायची ठरवली. अंतर्मनाचा प्रवेश म्हणून एक दाराची चौकट वापरली, त्यावर चंदेरी ओढणी टाकून आरसा वाटावी अशी काहीशी रचना केली. अंतर्मनात गुलाबी प्रकाश आणि बाहेर निळा प्रकाश वापरला. आणि हे सगळं खूपच cliché  आहे असं वाटत होतं, पण आशय आणि हालचाली या पातळीवर प्रयोग करत असताना गोष्ट समजण्याच्या दृष्टीने या काही गोष्टी cliché च असाव्यात असं वाटलं. 

रात्रंदिन आम्हा या संपूर्ण सादरीकरणाचा कालावधी हा ३०-४० मिनिटांचा आहे. त्यातील प्रत्येक संरचना ही ७ ते १० मिनिटांची आहे. मी संरचित केलेली तृतीयपंथी व्यक्तीचा संघर्ष मांडणारी संरचना नंतर वेगवगेळ्या ठिकाणी सादर करण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्या काहीतरी नाव देणं आवश्यक होतं. माझ्या कवितेमधलं ‘पुरुषरूपी चाफ्याला येणारा स्त्रीरूप जुईचा गंध’ हे रूपक मला फारच भावलं होतं. म्हणून मग नंतर मी या संरचनेला ‘चाफा’ असं नाव दिलं. ‘Under The Raintree Women’s Cultural Festival’ मध्ये बंगलोरला सुद्धा हे सादर करायला मिळालं. तिथल्या  प्रेक्षकांनाही हे समजलं आणि खूप आवडलं तेव्हा समाधान वाटलं.  कलाकार म्हणून माझ्या जगण्यातला सगळ्यात समाधानाचा क्षण या संरचनेने मला दिला.

पुण्यात एरंडवणे इथे लीना कुलकर्णी या ‘Mind gym नावाचा एक उपक्रम चालवतात. यामध्ये वेगवेगळ्या, फारश्या न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर व्याख्यानं, प्रश्न उत्तर,  मुलाखती अश्या स्वरूपाचे कार्यक्रम होतात. या उपक्रमांतर्गत मला ‘चाफा’ ही संरचना दिशा पिंकी शेख या तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या आणि त्यांच्या एक सहकारी यांच्यासमोर सादर करता आली. माझ्या सादरीकरणानंतर त्यांची मुलाखत होती. संरचना आणि कविता ऐकून त्या दोघी भारावून गेल्या आणि म्हणाल्या, ‘आजपर्यंत कुठल्याच शास्त्रीय कलेनी माझी गोष्ट सांगितली नव्हती’. समोर बसलेल्याला ही आपली गोष्ट वाटणं याहून मोठं समाधान कलाकारासाठी कुठलं असतं? 

अनेकदा असं होतं की एखादा विचार खूप काळ मनातच रेंगाळत राहतो. कलाकार म्हणून मला जे मांडावसं वाटतं ते मांडण्याचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य मला माझ्या नृत्याभाषेत मिळेल का? या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर मला माझ्या या संरचनेच्या प्रवासात मिळालं.  माझ्या गुरु सुचेताताई यांनी सुद्धा खूप भारावून जाऊन मनापासून दाद आणि शाबासकी दिली याचा मला खूप खूप आनंद झाला. ज्या प्रवाहातून आपण घडलो त्या प्रवाहाला आपण घेतलेलं नवीन वळण उचित वाटणं ही खूपच आश्वस्त करणारी बाब आहे. इथून पुढेसुद्धा आजच्या काळातला आशय शास्त्रीय नृत्याच्या भाषेतून मांडायचा प्रयत्न करत राहायला आवडेल. त्यासाठी नाटक आणि कॅमेरा या दोहोंची देखील मोठी मदत होऊ शकेल असं वाटतं आहे. या सगळ्यातून एक खुणगाठ मनाशी नक्की बांधली गेली आहे- ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.’ 

श्रेयनामावली: 
संकल्पना | दिग्दर्शन | संरचना | सादरीकरण: मानसी जोग
संगीत: 
दिग्दर्शन | संयोजन | गायन : जयदीप वैद्य  
नटूवांगम् : रमा कुकनूर
निर्मिती: कलायन, पुणे.
प्रकाशयोजना व संयोजन : शुभम साठे
रंगभूषा | वेशभूषा | नेपथ्य | कविता : मानसी जोग
कविता वाचन : वर्धन देशपांडे
स्थिरचित्रण: ऋतुराज झगाडे
प्रथम निर्मिती | छायाचित्रण श्रेय : ललित कला केंद्र (गुरुकुल), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
विशेष आभार: डॉ. प्रवीण भोळे, डॉ. परिमल फडके, डॉ. सुचेता चापेकर, क्षितीज विचारे, कलायन,पुणे.

सदर संरचनेचा प्रथम प्रयोग हा २९ सप्टेंबर २०१८ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात, ललित कला केंद्राच्या ‘मंथन’ या उपक्रमांतर्गत संपन्न झाला. प्रयोग इथे पाहाता येईल.

मानसी जोग यांनी गुरु सुचेता भिडे-चापेकर यांच्या सुविद्य मार्गदर्शनाखाली १६-१७ वर्ष भरतनाट्यम शैलीचे प्रशिक्षण घेतले असून नृत्य (सा.फु.पु.वि.) आणि भारतीय विद्या (टी.म.वि.) या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ती गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिक्स अँड इकोनोमिक्स येथे अर्थाशास्राचे पदव्युत्तर शिक्षण घेत असून नृत्यासोबत च संगीत, नाट्य, सिनेमा , चित्र हे तिच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. भारतीय कलाप्रकारांच्या संगमांतून प्रेक्षकांना अधिक अधिक भावेल असा आशय निर्मिण्याची तिची इच्छा आहे.

2 comments on “‘चाफा’विषयी..: मानसी जोग

  1. Abhay

    Very innovative, creative and a thought process that makes the ancient art, even relevant today

    Reply
  2. Sangeeta joshi

    Bravo Manasi! Great job. Wonderful composition. No need of explanation in words i e poem as it exhibits correct and superb expression.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *