मकरंद भारंबे

रॉक ऑफ जिब्राल्टर


1


back
एखाद्यावर कविता करणं
म्हणजे जर असेल 
थेंबभर न्यायाऐवजी
वाहणं फक्त पश्चातापाची
फुलं ओंजळभर,
गोठवून टाकणं त्याला एका
रत्नजडीत अश्रूत, 
नादुरुस्त आणि स्वरहीन, तसाच.
संगमरवरी टाचेखाली कायमचं
ठेचणं त्याचं नांगीदार सौंदर्यशास्त्र
तर कवितेची शपथ! 
ते माझं ध्येय नाहीय.

एखाद्यावर कविता केली
म्हणजे घडवला
रंगीत मेणाचा पुतळा
मादाम तुसांच्या म्युझियमसाठी, 
न दाखवताच 
आत्म्याचं ब्राँझ त्या
- डरकाळी रक्तपिपासू 
त्यातल्या स्वप्नाची विक्राळ,
त्याच्या तळपायातून मस्तकात
पोचलेलं जहरी चांदणं, 
बेंबीत सांडलेला अवधूताचा
आदिवसंत, यातलं
काहीही..
शिवाय आतडं व तारतम्य वगैरे
लिहिणाऱ्यानं,  नक्षीत गुंडाळून
चढवायचं असतं त्याला सोन्याच्या सुळावर
अधिकतम भरपाईदाखल. 

..मला खरेच नकोय  यातलं काही सुध्दा..

तुम्हाला
मी फक्त दुरून
एक माणूस दाखवू इच्छितो
: भर बाजारात क्रोधकंगाल, 
ज्याच्यापाशीची मोरपीसं, पी. जे., जुनी नाणी, जादूची खेळणी लोकांनी दिलीयत फेकून 
सडकी अंडी नि टमाटे हाणत.
एक माणूस,सतत
जो पहातोय बोकॅशिओच्या झाडावरून
नीतिकथांना नग्न व मग्न,
एक माणूस 
कोवळ्या सामंजस्याच्या-आडवे आलेल्या
नरडीभोवतीची
सोडवतांना नाळ,
चुकीने पोचला जो 
कधीच गंजलेल्या सुरीपर्यंत, औचित्याच्या: आकलनाचे क्रौर्य व 
अनौरसतेपर्यंत आकलनातील
तेही
सापेक्षतेच्या गृहीतकास 
आगंतुकपणे केलेल्या नवमिलींद प्रश्नातून*

त्याला स्वतःबद्दल बोलणं आवडत  नाही
पण मला आवडेल 
लिहिणं त्याजबद्दल

अरविंद त्याचं नांव, 
माझा सख्खा भाऊच तो.
अनासक्त,
अयुक्तिक
विभक्तीचा नववा प्रत्यय


भय वाटतं क्वचित 
त्याला सामोरं जाण्याचंही.
सामना करण्याचं
वेगवेगळ्या तरंगलांबीवरून एकाच प्रमेयाच्या.

स्किझोफ्रेनियावर "Rhodes स्कॉलर"
असणाऱ्याशीच
वागावं चपापून तसं !

अनामिक भय
एका दोलायमान शक्यतेवर, 
: चुंबकीय धृव बदलणाऱ्या
राहण्याचं, एकत्र काही काळदेखील…
घट्ट मुठीतलं कच्चं रेशीम
जोपासत
मूर्च्छेविरुद्ध, आकस्मिक पण हमखास 
येऊ घातलेल्या.

तो म्हणजे अवघडच आहे
त्याचं खरं म्हणजे कांही कळतच नाही. 
तो जरा विक्षिप्त वागतो. 
स्वप्न-वंतांचे कान टोचणाऱ्या
किंवा धूमकेतूंत खजिना शोधणाऱ्याप्रमाणे

तो बोलतो
साध्या निमित्तांमधून झेपावत 
आसपासची वाळवंटे ओलावत. 
विचारतो, आजकाल आकाशगंगेत कोण्या
रहाता तुम्ही नि कांय आहेत 
भौमितीक निर्देशांक 
प्रत्याभासी अस्तित्वाचे,तुमच्या?

जाणवते
त्याची अवांछनीय दया-
घनकाठिण्य एका करुणेचे,
: त्रिमितीत अडकून पडलेल्या आपल्याला पहाणाऱ्या 
सापळ्यातील पशुप्रमाणे
भाग्यहीन


क्वचित, नाही असं नाही, 
करतो अगत्यही
तथाकथित सद्भावनेपोटी
वा मर्मबंधांची सोयरिक मांडणाऱ्या(!)
चुकून
भेटीस येणाऱ्यांचं,
करावं रेड-क्रॉसचं
युद्धग्रस्त सिएरा लिओन वा 
मोगादिशू वा
उजाड बॅबिलॉनमध्ये,
तसं.

प्रसंगी, निकामी करतांना सदाशयाने
वाटेत त्यानेच पेरलेले भू-सुरुंग
(कोण्या एका काळी)
झालाय तो जायबंदी. कैकवेळा.

तंद्रीत बोलणं त्याचं,
उधळून लावत क्रम,
स्मृतिचे सातत्य व भद्रता शैलीची,
मुद्यांबद्दलची असोशी, अभिव्यक्तिमागची तीव्रता
अर्धविराम, घायाळ स्मित अचानक
'काही खरं नाही' म्हणत
मिटणं पापण्या
व परत चाळा करणं शून्याच्या रिव्हॉल्व्हरशी

हे सगळं आहे व्यक्तिपेक्षा
'अभिनयाची अभिजात संस्था'
ठरण्याजोगं.

'परवडत नसेल तर गोळी घाला'
म्हणतांना, थरथरणाऱ्या बरगड्यांत मी
बघितलंय त्या
वावटळीतलं सूर्यफुलांचं शेत,
किंवा एक स्फिंक्स
लाथाडणारा स्वतःच्या प्राक्तनास शुष्क.

त्याचा आत्मक्षोभ नि प्रतिहिंसा जरी
वाळीत टाकणारी
ईश्वरास,
तरी निरंजन पाझर
त्याच्यातला ऋजूतेचा शुभ्र,
खोल अश्वत्थाखालील
गुप्त गंगेगत
कधी त्यालाही न उमजेलसा.

पृथ्वीचा मातृकोषक्षय निवारण्यासाठी
अमृताची प्रार्थना करणारा 
तो ओसाड पांढरा मेघ.

अंतरात मौल्यवान जांभळ्या मधाचं 
मोठ्ठं पोळं असूनही ,एक विकार आढळतो
निद्रेत ओकण्याचा
तप्त राख नि फक्त लाव्हा,
ज्या इतिहासाच्या सावत्र संततीत,
त्या दुर्मिळ जीवांपैकी
तो एक

तो करतो वर्णन
: कुण्या रिकाम्या विश्वाचे जणू
गणिती भाषेत,
नेमका हिरीरीने
असतो जेव्हा मांडत अव्यवस्था,
DNA मधील आस्थेच्या, 
साधेपणाच्या स्फटिकांची विरचना, 
-विशिष्ट तापमानावर
अदृश्य पीळ, समीकरणांतले
वा शक्तिपाताचे होष्यमाण वगैरे
ओघळायला लागतात मग त्याचे शब्द, अर्धमागधीतले
क्रांतिक वस्तुमानाअभावी#

दिसते क्ष किरणांचे कारंजे तेव्हाच
संकोच पावणाऱ्या
त्याच्या स्व 'परिघात.

पुसताही येत नाही कांही
त्याच्या व्याकरणास जर्जर करणाऱ्या
गुप्त प्रारणांविषयी,
कुणा देवरुषास पंचक्रोशीतील 

मला वाटते जणू
गाठोड्याप्रमाणे
सारे कृष्णद्रव्यच, बनल्याचे त्याचे कुबड.

जरी परतवून लावत असतो तो भुरटे गनीम आततायी प्रतिहल्ल्याने व
टोळधाडी गोफणीने, 
जपून ठेवलेत काही
इंद्रक्षार त्याने प्राणपणाने, काही स्निग्ध स्पर्श,
उदात्तताही, आत खोलवर जरतारी.

कधीकधी पाह्यलाय मी
व्हॅन गॉफची न खपणारी सूर्यबंबाळ चित्रे
स्वतःच्या चंद्रगॅलरीत
लावणारा तेओ, त्याच्यात

कधी दिसलाय
निरागस अलिबाबा
कासमलाही यक्षगुंफेचा सांगणारा मंत्र..
जेव्हाही तुकडे झाले माझ्या संज्ञेचे बेमालूम शिवून काढले त्याने
डोळे बांधून आणलेल्या
कुण्या म्हाताऱ्या समीक्षकाकडून.
कुणी सांगावं, शिंपीही बनून येत असेल तोच.

चौकशी करेल तंबाखू थुंकत
जन्मतः च सांडलेल्या सुसंमितीविषयी**
नि
संसाराच्या हरवलेल्या बीजवस्तूची@

एखाद्या मेसापोटेमियन किंवा एझटेक
माणसाप्रमाणे 
वाळवीची चटणी बनवतांना
जर तुम्ही गेलात
त्याच्या आडवाटेस,
पहा कधी आढळेल तो
वैश्विक तंतूंची निरगांठ सोडवतांना
कबीराच्या देखण्या हातांनी  नि दोहे गुणगुणत

विचारलं होतं त्याने म्हणे
व्हिक्टर ह्यूगोला विशेष औदार्याने
संभाजी बिडीच्या चार झुरक्यांबद्दल
नि भाषांतरानंतर
मूळ नगम़गीचं कौमार्य
राहतं कां अक्षुण्ण?असं.
नि स्टीफन हॉकिंगला
काळाच्या बाणावर बसून शोधता येईल कां
आतली दिशा? 
थॉमस फ्रीडमन शोधतोय उत्तर
त्याच्याच चिंतेचं
: एकविसाव्या शतकातील भांडवल
करणार
मानवी प्रतिभेस उन्मुक्त
वा नॉन फंगीबल टोकनगत 
ट्रेडिंगसाठी उपलब्ध?
आताच
युआल नोआ हरारीने लिहायला घेतलंय
खास त्याच्या ग्रोटेस्क जीवाश्माबद्दल..

नेम नाही त्याच्या वैचारीक व्यामिश्रतेचा
नि म्हणूनच होते शॉर्टसर्किट
ऐकणाऱ्याच्या कानांदरम्यान

परततांना अतिशय वाईट 
नि वाटतं 
अतिशय अशक्तही. 
सुचत नाही मार्ग, काही केल्या
उर्ध्वपातनशील चंचलतेतून£
अर्धपारदर्शी,
मागे त्याला ओढण्याचा, 
अवकाश द्रवातून जणू गतिमान 
भूवास्तवात पुन्हा.
खंवट झालेय माझ्या झोपेचे खोबरे, त्यामुळे

त्याला e-auction ने विकायचे होते
सभ्यतांचे दगडी व 
कायद्यांचे लाकडी कोळसे,
मात्र अजिबात हात काळे न करता

चिकित्सा होती करायची अंतिम,
विघटनशील अस्तित्वाची
प्रतिऐश्वर्ये व प्रतिनिर्मितीत गुरफटलेल्या,
मांडवाखाली एका स्वच्छ नकाराच्या 

"नात्यांचा आदिबंध व समस्या" यावर
लिहायचे प्रबंधात्मक
होते जणू ठरलेले
परंतु नाते न जगताच,
त्यातल्या अफरातफरीसह.

शक्य आहे कां हे?
सर्वोत्तम राजनीतीज्ञ
असतं आलेत महत्तम पाताळयंत्रांचे भागीदार
इतिहासाला कलाटणी देणाऱ्या
परिस्थिती  व प्रमेयांचे विचित्र व्यूह भेदतांना
इच्छेविरुद्ध घ्यावी लागते बाजू
सत्तेच्या सारिपाटात
चारित्र्यावर कलंकासोबत. 

जगण्यामरण्याचे निर्णय
घेता येत नाहीत निरूत्तराच्या शून्य अंशावर

स्वैर नाहीए काहीच, ना निरपेक्ष, ना
अपरिवर्तनीय
या अनंतकोटी ब्रह्मांडात

एका विशेष सौजन्याने 
मूळ अपराधात, कैवल्याविरुध्दच्या 
तो मला म्हणाला होता
'माफीचा साक्षीदार' होण्याबद्दल 
तरी मी पत्करलं
क्षरण,
क्रमांधळा र्हास  नि त्याचा रोष तीव्र

हळूहळू
माझ्यासमक्ष
मृतसमुद्र एक सायकेडेलिक खेकड्यांचा
निवडुंग एक मांसाहारी, 
अतिवास्तविकतेचा भीमसरट
गिळत गेला त्याला
नि मी साफ अपेशी ठरलो
वाचवण्यात
एक सुंदरतम संभावना, बाष्पीभवनापासून.

मी सुगावाहीन राहिलो
कसा थांबवता येईल लौकिकाचा बलात्कार
वंचनाबोधाच्या अलौकिकतेवर 
जगायचं जर असेल
इथे नि आत्ता ?

कसा असू शकेल निषेध स्वयंपूर्ण
जर तो असेल किंचीतही अशुद्ध ?

दिसतो
कोथळा सांभाळत
तो लढतांना क्रूर तर्काशी
त्याला खिंडीत पकडणाऱ्या,
युक्तिवादांशी, मागणाऱ्या बीभत्सपणे 
पुरुषार्थाचे प्रात्यक्षिक, पुरावा जिवंतपणाचा.
(झिडकारून अकाल सैद्धांतिक मोक्ष 
त्याने मांडलेला)

चालवतांना, जुनी शस्त्रास्त्रं
: नव्या कुटिलतम तंत्राविरुद्ध अमोघ श्रद्धेने
आदिवासीच्या कुण्या 
ज्याला माहित झालंय
मागेच उभारले गेल्याचं 'ज्युरासिक पार्क'
एकुलत्या गोड्या पाणवठ्याशेजारी 
त्याच्या जंगलातल्या,
नि कळस म्हणजे
सत्तेने  खणल्याचं बोगदा
'प्रोटॉन कोलायडर ' चा 
लिंगोबाच्या डोंगराखाली, 
त्याच्या पूर्वजांची दफनभूमी उध्वस्त करून
अलिकडेच..

सौहार्द इतके
की तो उचलून देतो तुमचे मुखवटे वितळलेले
प्रेम इतकं की
दर वेळेला प्रेषितांची
कमी होते उंची 
अपराधभावनेनं खचत जाऊन 
गळून पडतात संवादांचे प्लास्टिकचे स्क्रू
रंगांची टरफलं, 
व्यंजना,शब्दांमागचं रोमन सिमेंट 
त्याने विद्ध नजर वर करताच,
निदान मानसोपचार तज्ञाच्या रुपात मारेकऱ्याने 
            नये येऊ
या उघड अपेक्षेने.

नाठाळ नि बडबड्या आप्तांबद्दल
एखादी शिवी निसटली की 
प्रायश्चित्ताच्या थंडीत 
अळणी एकांताचं रवंथ करणारा 
त्याचा फेसाळ संताप पाह्यला की
आत खेचली जाते
माझी सणसणीत जीभ.

लगेच
सायुज्य प्राप्त होते त्याला
जरी माझ्या एव्हढंच समजतं त्याला कशातलंही
कुठलंही फूल, सहस्त्र सोंडेचं-
(तोलणारं अस्तित्ववैभव 
आत्मप्रभूतेनं) 
पाहिलं की तो सुखाने बेशुद्ध होतो
मी विज्ञानानंदघन 
मात्र शोधून काढतो ब्रेन-मॅप्स, पॉलिग्राफ्स
देठात दिलेली हार्मोन्सची इंजेक्शनं।

जी आहेत त्याच्या डायरीची कोरी पानं,
त्यातला मजकूर
सापडू शकला असता त्या दिवशी ओढलेल्या
माझ्या सिग्रेटीच्या पाकिटावर,
किंवा समुद्रकाठच्या वाळूत कोरलेला
विचित्रवीर्य लिपीत

सत्याचा स्वभाव
व स्वाभाविकतेचं सत्य पडताळत 
त्याला रहायचंय निवांत,
निरुद्देशाच्या सोनेरी उन्हात
नाकतोड्याप्रमाणे
कोण्या झेन-गार्डनमधल्या,
कर्महीन,

किंवा प्रवाळ कीटकाप्रमाणे कुण्या
साक्षात्कार होणाऱ्या
ब्रह्मसूत्राचा शीतनिद्रेतच.

सततची सौरवादळं नि हिमवर्षांनी बाहेरील
थरारणार नाहीत
ज्याच्या कुंडलीतले प्रमेय पराग,
व्हायचं होतं असा नियोगी त्याला.

म्हटलं तर
किती साधी होती मागणी
(व कदाचित अनाठायी ?)
याची काळाकडून, 
गाजवायचं नव्हतं प्रस्थ कसलंच
त्याला अर्यमा-मित्र-वरुणांपुढे,
आधीच अतिसांकेतिक असलेल्या 
तज्ज्ञांच्या राजधानीत
पटकावून समुद्राकाठी चार हेक्टरचा प्लॉट, 
नव्हता बळकावायचा 7G स्पेक्ट्रम,
किंवा प्रीमिअर लीग, एखादी
नको होता इन्शुरंस, पॉवर ब्रोकर,
नि प्रॉव्हिडंड फंडही, 
गरजेला पुरून उरेल एवढा
मुळात अवैध होती
ही 'पुरून उरण्या' ची संकल्पनाच
त्याच्या लेखी.

विपश्यनेसाठी त्याच्या परंतु निर्विकल्प
भाड्याने कोण होतं घेणार
वाल्डेन सरोवर
हेन्री थोरोचं ?
कै. स्पिनोज्ञांनी तारण रहाणं
नव्हते शक्य व गहाळ झालेलं म्हणे मृत्यूपत्र
कृष्णमूर्तींचं
त्याच्या नांवाचा ठळक उल्लेख असणारं

'देकार्त' ची चिंतने टक्केवारीवर, 
ताजा चोमस्की उधारीवर नि 'ज्ञानयोग' बार्टरवर
..करावी लागणार
जी काही व्यवस्था
त्यासाठी कुणीच नव्हते
उपलब्ध कधीच

'सार्वभौम' पणे रहाता यावे
'निश्चित गरीब' व तरीही 'चिरोत्तेजित'
ईश्वराच्या समीपतेने महात्म्यांना,
एकशृंगीना, 
म्हणून सिंडिकेटचे 
मिळवावं लागलंय प्रायोजन,
आहे हाही इतिहासच, त्याने दुर्लक्षीलेला.

पोचू शकत नाही
परंतु वर्तमानाचे श्वापद जिथे
त्या निर्वात पोकळीत
तुमच्या विधानांना राजकीय
लाभण्यापूर्वीच वजन
कुठल्याच काळ्या गुरुत्वाने किंवा थोडेही शेवाळ, 
मौन सहमतीचे
: योजनांना आकर्षक रिफायनांस वा
रिस्ट्रक्चरिंगच्या
तो काफ्काचा हंगर आर्टिस्ट
नाकारतो सरळ
महासंशयाने.

आपले पुष्पगुच्छही
रहातात क्षितिजाच्या उंबरठ्यावरच..
तो राहतो अनार्द्र,
SHAKEN BUT NOT STIRRED
कॉस्मिक एजण्ट 099 प्रमाणे एखाद्या
(पण नसलेल्या हक्काची 
एक सायबोर्ग सेक्स डॉलही) 

रहातो निष्ठूर
'कॅटलिस्ट' अथवा ' को-लॅटरल' म्हणून
सोबत नेलेल्या
दिवाळखोर सीझरच्या पुतण्यांबद्दल
एरव्ही अतोनात लळा असणाऱ्या
माझ्या चिमण पाखरांबद्दल

वाटतं की,
जाणवते त्यांच्या 'सिक्स्थ सेन्स' ला
संदिग्धता अपवित्रशी
अर्धवट गिळलेले आवंढे व 
व विशिष्टपणे गुंडाळलेल्या शब्दांतील,
'सहानुभूती'ची वाढलेली एंट्रॉपी,
वरवर स्वच्छ दिसणा-या
रेड कार्पेटची सूज
(त्याखाली ढकललेल्या प्रेतांमुळे) आणिक 
ज्ञेयाचा विटाळही
:पुढे येऊ घातलेल्या,
संदर्भाच्या चौकटीबाहेर प्रति ऊर्जेने 
ज्ञातव्य
ताणले जाण्या पूर्वीच..

त्याच्या माझ्यात पसरलेय दुर्लंघ्य
एकंदर अनार्किटेक्चर नि अधोविश्व
हेतूंचे
आपल्या प्रत्येकातील,
जैव-यांत्रिक प्रेरणांवर चालणारे,

मागे वडीलांनी
त्याला 'रॉक ऑफ जिब्राल्टर' म्हटले
तेव्हा अंशत: परिवर्तनीय झालेला
त्याचा चांदीचा रुपया
कडोसरीवरून घरंगळून खणखण हसला
व तो आईने त्याच्या हातावर
घातलेलं दही
निम्मं मला देऊन, गेला सात वाऱ्यांवर

आठवतं त्याच्या भावनेच्या डबघाईला
आलेल्या ट्रस्टचे बाँड-होल्डरही
मग उजळले होते
क्षणभर..
असंतुलनाची स्प्रिंग बसवलेली
त्याच्या बुटातच जणू,
सगळी अभिव्यक्तीच
हिंदकळणारी त्यावर.
सगळा कारखानाच तसा चाललेला,
काय येतंय-जातंय,
कुठं वितळतंय,
कापलं-जोडलं जातंय, 
बनतंय नि गळतंय कुठं
कुठे बिनसतंय

कसलाच पत्ता नाही

फक्त प्रचंड यंत्रांचा आकांत
येणारा ऐकू
रडवेल्या मला..

***

चित्र: सरबन चौधरी
तळटीपा: * मिनांडर राजाचा पालीतील ग्रंथ - मिलींद पन्ह # Critical Mass for Sustenance **Broken Symmetry @ Missing mass is 90 % of original £ Volatility
मकरंद भारंबे यांचा मोनालिसा या १९९३ मधे प्रकाशित (विशाखा-II पुरस्कार) संग्रहानंतर जून २०२२ मध्ये स्वयंभू हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. मूळ देशज भाषांतील अभिजातकापासून मधला प्रमेयांतराचा काळ उसवणाऱ्या व नवे सत्योत्तर दाहक पार्थिव भान रचणाऱ्या जागतिक रसविमर्षाचा अनवाणी वारकरी ही कवितेमागील भूमिका. सर्व प्रकारची भंकस, ठोकळेबाज वा दहशतखोर सिद्धांत-प्रणाली, कलेतले क्वाॅण्टॅमेंटल किंवा चालू चायनीज वा शालीन चर्पटपंजरीपासून दूर राहायचा यत्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *