नूपुर देसाई

इन थिन एअर: एक अनुभव



back

गॅलरीला भेट देणं हा कायमच वेगळा अनुभव असतो. पांढऱ्या शुभ्र भिंती, उंच छत आणि पिवळसर पांढऱ्या प्रकाशात मांडून ठेवलेल्या कलाकृती बघताना एका स्थळ-काळातून आपण दुसरीकडे पोहोचत असतो. बऱ्याचदा असं कुठलेही संदर्भ नसताना आपल्या भवतालाशी या कलाकृती कसं जोडून घेतात असा प्रश्न पडू शकतो. कधी कधी या कलाकृतीच तो संदर्भ उभा करतायत असं वाटू शकतं. अर्थातच तो अनुभव तुमच्या भावनिक मानसिक अवस्थेनुसार बदलत असतो. दरवेळी नवे अर्थ लागत जातात आणि एकत्र एक सलग काही चित्राकृती मनात रेंगाळत राहतात. यावेळी दिल्लीच्या तलवार गॅलरीमधला अनुभव असाच होता. लॉकडाउन मुळे बंद ठेवलेली कला दालनं हळूहळू लोकांसाठी पुन्हा खुली होत होती. बऱ्याच दिवसापासून सुरू असलेलं कार्तिक सूद या चित्रकाराचं प्रदर्शन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे काही आठवड्यांकरिता लांबवण्यात आलं आणि त्यामुळेच ते बघायची संधीही मिळाली. कार्तिकने दिल्ली आणि बडोद्याच्या कला महाविद्यालयातून चित्रकलेचं शिक्षण घेतलं आहे. 

गेल्या दोन वर्षात आपण सगळ्यांनी अनुभवलेली अनिश्चितता, जगण्यातला बेभरवसा, हतबलता या भोवती ही चित्र मालिका गुंफलेली आहे. गॅलरीत गेल्या गेल्या पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे चित्रांचं अस्तित्व. समकालीन कलेची प्रदर्शनं बघताना संकल्पनात्मक कला, मांडणी शिल्प, विडिओ यांचा प्रभाव सतत जाणवत असताना चित्रांची सलग मालिका बघणं हे आनंददायी होतंच पण समकालीनतेत चित्रांचा विचार कसा होऊ शकतो याकरीता उद्युक्त करणारं देखील होतं. चार वर्षाच्या कालावधीत दिल्ली आणि सिमला अशा दोन्ही ठिकाणी कार्तिक सूद यांनी ही चित्रं आणि विडिओ तयार केले. त्यात काही तैलचित्र आहेत, काही अॅक्रेलिक तर काही ग्वाश आणि ग्राफाइट पेन्सिलने केलेली चित्रं आहेत. जाडसर कागद, पुठ्ठा, लाकडी बोर्ड, कॅनवास यावर काढलेली चित्रमालिका इथं प्रदर्शनात मांडली होती. कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या जाडसर बोर्डावरती यातली बरीचशी चित्रं काढली आहेत. ताणलेल्या कॅनवासमध्ये एक प्रकारचा लवचिकपणा असतो, त्याच्या पातळ पदराची कंपनं जाणवतात. या उलट, या जाड बोर्डाला एक प्रकारचा भरीवपणा आणि स्थिरपणा जाणवत होता. 

Treasure, Face in the clouds, Traveling beneath
Touching the earth and passing the name

सूद यांचं हिमालयाशी जवळचं नातं आहे. तिथले पर्वत, बर्फाच्छादित शिखरं, उंच हिरव्या सूचिपर्णी वृक्षांची दाटी हे खोलवर त्यांच्या मनात उमटलेलं आहे आणि तेच या चित्रांतून उमटत राहतं. कधी एखाद्या चित्राची ती पार्श्वभूमी बनते तर कधी ते एखाद्या चित्राच्या केंद्रस्थानी येतात. हिमालयाचे अथांग प्रदेश दिसत राहतात. त्यावर एक धूसर पडदा आहे असं वाटतं राहतं आणि त्या धूसर पडद्याखालून स्वप्न आणि भ्रम यांच्या अधला मधला प्रदेश साकारला जातो. धुक्याच्या पडद्यामुळं ही उंच सखल भू-स्थळं गोठल्यासारखी दिसतात. पण तरीही त्यातलं गहिरेपण पाहाणाऱ्याला चित्रात खेचून घेतं. त्यातल्या पर्वतांचं रौद्र रूप एकीकडे आपल्याला खुणावतं, तर दुसरीकडे लंबकाला लावलेले फोटो किंवा गोलाकार आणि त्रिकोणी पुठ्ठयाच्या छोट्या तुकड्यावरचे चेहरे अशा अवती भवती डकवलेल्या गोष्टी आपल्याला त्याकडे त्रयस्थपणे पाहायला भाग पाडतात – दस्तावेजीकरण आणि वर्गीकरण पद्धती यांचा संदर्भ आठवत राहतो. पण ही चित्रं त्यातल्या वस्तुनिष्ठतेला बाजूला सारतात. याउलट, त्या चित्रातून मानवी अस्तित्वाचे गहिरे पदर आपल्यासमोर उलगडतात.   

Roots and Branches

Territory problems, Tilted sky, Lonely Creator

कार्तिक सूद यांनी हिमाचल प्रदेशात घालवलेले दिवस, आठवणी, तिथल्या भव्यतेचं आकर्षण एवढ्या पुरतं ही चित्रं मर्यादित राहत नाहीत. त्यात अति-वास्तवाच्या खुणा सतत आढळतात. हिरवट निळ्या हिमालयाच्या रंगांमधून पत्र्याची जुनाट ट्रंक बाहेर डोकावते. अँटेनाच्या तारातून फोटोंच्या तुकड्याची ‘फ्रॅगमेंटेड फॅमिली’ कॅनवासच्या प्रतलावर पसरलेली दिसते. एका चित्रात सरळसोट वाढलेली तर दुसऱ्या चित्रात झाडाला फांद्या फुटल्यासारखी. गोल-त्रिकोणी तुकड्यातले हे फोटो कॅनवासच्या सपाट पृष्ठभागावरून पुढे आलेले दिसतात. ते त्या कॅनवासचा भाग आहेतही आणि त्यापासून अलगही झाले आहेत. धूसर हिमालयाच्या पार्श्वभूमीवर या सरळसोट वाढलेल्या कुटुंब वृक्षाला लोखंडी चौकटीत बंदिस्त केलं आहे तर पसरलेल्या फांद्या मात्र वरच्या बाजूला खुल्या असलेल्या कॅनवास भोवतीच्या चौकटीत मांडलेल्या आहेत. मागचा कॅनवास मात्र या चौकटींच्या वर वाढत जात असल्याचा आभास तयार होतो. यातल्या वस्तू आणि माणसं हे त्या धूसर पार्श्वभूमीतून कधी उगवत आहेत असं वाटतं तर कधी त्यात नाहीशी होत आहेत असं. पण त्यातला एक समान धागा म्हणजे त्यात एक प्रकारचं तरंगलेपण जाणवत राहतं. त्यात प्रतिमांमध्ये ठहराव नाहीये तर अधांतरी लोंबकळत राहिल्याची एक सतत जाणीव आहे. त्या अधांतरीपणातून त्यांच्या भवतालासोबत असलेला तणाव सूद यांनी अधोरेखित केला आहे.   

हे करताना ते जुन्या बाजारात मिळालेल्या किंवा घरातल्या जुन्या सामानात सापडलेल्या जुन्या-पुराण्या फोटोंचे तुकडे या चित्रांत अवतरणासारखे वापरतात. चित्राच्या मध्यवर्ती कधी एखादी मानवी आकृती येते तर कधी खुद्द सूद यांची प्रतिमा. विस्तीर्ण पसरलेल्या भूप्रदेशात ही एकाकी आकृती दिसते किंवा अनेक आकृती असतील तरी त्या सुट्या सुट्या विखुरलेल्या आहेत. यात तुटलेपण आहे, असंदिग्धता आहे, आपलं वास्तव आणि मनोराज्य यातली विसंगती पकडण्याचा प्रयत्न आहे. कधी त्या प्रतिमा एका बिंदूवर एकत्र येतात, कधी विलग होतात. या चित्रांमध्ये रेषेपेक्षा रंगांचे फटकरे अन् पोत, त्यांचं कागदावर पसरत जाणं याला जास्त महत्त्व आहे. ग्वाशमधल्या पांढुरक्या आकृत्या सावल्यांसारख्या भासतात आणि त्यावर कट आऊट सारखी वरून लावलेली डोकी किंवा माणसांच्या धडाच्या आकृत्यांच्या तयार होणारे प्राण्यांचे आकार अशा अनेक प्रतिमा समोर येत राहतात. या आकृती विचारमग्न आहेत, भग्न आहेत, कुठल्यातरी स्थित्यंतरात असल्यासारख्या आहेत. त्या इतक्या तरल आहेत की कधीही हवेत विरून जातील की काय असं सतत वाटत राहतं. 

In wait

या विरून जाण्याला देखील संदर्भ आहे. तो संदर्भ बिंदू आहे चित्रातला ‘वॅनिशिंग पॉइंट’. या मालिकेतल्या बऱ्याच चित्रात तो रूपक म्हणून येत राहतो. ‘वॅनिशिंग पॉइंट’ म्हणजे द्विमितीय प्रतलावर त्रिमितीय आभास निर्माण करण्यासाठी योजलेला एक मध्यबिंदू. यामुळेच त्या द्विमितीय कागदावर किंवा कॅनवासला खोली प्राप्त होते.  या बिंदूवर सर्व रेषा जाऊन थांबतात आणि तिथेच पाहणाऱ्याची दृष्टीदेखील स्थिरावते. अशा या स्थिर बिंदूला, त्या दृष्टीला सूद यांनी आपल्या चित्रांत संदर्भ मानलं आहे. उदाहरणार्थ, दुसऱ्या मजल्यावर एका भिंतीच्या कोनाड्यात लावलेली ‘इन वेट’ ही चित्र मालिका. एक वेळी एकच व्यक्ती कशीबशी तिथं मावू शकेल अशा जागेत ही मालिका टांगलेली आहे त्यातून चित्र पुन्हा एकदा त्यातल्या खोलीचा अनुभव देत होती. रोजच्या जगण्याच्या गुंतगुंतीतून विणलं गेलेलं जाळं आहे आणि माणसाचं निरनिराळ्या प्रकारात विभागलं जाणं याचे उल्लेख यात येतात. 

Daily theater to feed a family

‘डेली थिएटर टु फीड अ फॅमिली’ मधल्या मानवी आकृती रोजच्या व्यवहारात अडकलेल्या आहेत पण त्या एकमेकांशी गुंतलेल्या आहेत आणि त्यांना जोडणारा घटक आहे प्रकाशरेषा. वैज्ञानिक आकृतींतील प्रकाशरेषा, प्रतलं, डोळ्याच्या पटलावरून अपवर्तित होणाऱ्या किंवा भिंगातून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या रचनेची आठवण करून देणारे संदर्भ या मालिकेत येतात. त्यातच कोलाज सारख्या तंत्राचा वापर करत ते या चित्रांतले पदर सुटे करतात. वरून चिकटवलेले त्रिकोण, गोल, चौकोन यांच्या मागच्या कागदावर पडणाऱ्या सावल्यांमुळे त्या आकृत्यांना खोली प्राप्त होते. ही मालिका जणू काही एखाद्या विडिओसाठी स्टोरी बोर्ड असावी त्याला लागून असलेली विडिओ कलाकृती ‘लाईफ इज फ्लूइड’ पाहिल्यावर वाटून जातं. चित्र मालिकेमधलं कोलाज, प्रतलं, भिंग ही या विडिओमधल्या रचनातून समोर येतात. मधोमध काही नाद रचनांवर नाचणाऱ्या, हालचाल करणाऱ्या आकृत्या आणि त्या हिमालयाच्या पार्श्वभूमीवर निरनिराळ्या हालचाली करत राहतात. या हलचाली तालबद्ध आहेत, त्यांना एका लयीनं धरून ठेवलं आहे. शांत, थंड, गूढ वातावरण आणि त्याला छेद देणारी तुकड्या तुकड्यातील या वस्तू आणि आकृती आपल्याला पुन्हा एकदा भिंगासारख्या रचनेतून दिसतात राहतात. विडिओच्या पडद्याच्या मध्यावर लयबद्ध रितीने फिरणाऱ्या या आकृती रनेसाँ काळातल्या चित्राकृतींची आठवण करून देतात. 

Life is Fluid

इन थिन एअर हे प्रदर्शन एक नेटका पण विचार करायला लावणारा अनुभव देते. आपला भवताल, त्याचं वास्तव आणि आपली स्वप्नं, कल्पना यांच्यातली दरी, व्यामिश्रता जाणवून देणारे न -थांबणारे विचारचक्र, मनातली उलथापालथ याबद्दल ही चित्रं सांगू पाहतात. पण हे सांगताना या सगळ्या चित्र आणि विडिओमध्ये पाहाणाऱ्याच्या दृष्टिकोनाला एक विशिष्ट स्थान आहे असं जाणवत राहतं. जगण्यातल्या अकल्पित गोष्टी आणि गुंतगुंतीचे व्यवहार व नाती याकडे सुटेपणाने, पण टोकदारपणे पाहता येण्याच्या शक्यता यातून दाखवायच्या आहेत अशीही एक शक्यता. ज्याचा थांग लागू शकत नाही, अंदाज बांधता येणं शक्य नाही अशा भवतालकडे पाहण्याची ही दृष्टी असावी – चित्रकार आणि चित्र पाहणारे यांच्यामध्ये असणाऱ्या वातावरणातून प्रवास करणाऱ्या प्रकाशरेषातून तयार होणारी ही दृष्टी.   

चित्र सौजन्य: कार्तिक सूद आणि तलवार गॅलरी, दिल्ली.

नूपुर देसाई एशिया आर्ट अर्काइव इन इंडिया, नवी दिल्ली येथे संशोधक म्हणून कार्यरत आहेत. टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई मधील स्कूल ऑफ मीडिया आणि कल्चरल स्टडीज येथून पीएच. डी. प्राप्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *