जाई आपटे

आफ्रिकन सुंदरीची १९व्या शतकातील फ्रान्समधील यात्रा



back

बर्फात लोळणारे गरगरीत पोटाचे पांडा, अचंबित करणारे भव्य दिव्य देव मासे, हिमरंगी केसांची दुलई ओढलेले अंटार्क्टिकामधली अस्वले असे अनेक प्राणी आपल्या आभासी भवतालचे आणि पर्यायाने आपल्या अंतरंगाचे भाग झाले आहेत. आपण त्यांना आपल्या वास्तविक आयुष्यात न पाहता देखील त्यांच्या प्रतिमा आणि त्यांचे संदर्भ आपल्या रोजच्या आयुष्यात वापरतो. या पुढे जाऊन हेही म्हणता येईल की आपल्या आजूबाजूला असलेले पक्षी, वनस्पती आणि किडे आपल्याला ओळखता आले नाहीत तरी आफ्रिका व अमेरिका खंडातील कुठल्याश्या देशात आढळण्याऱ्या पक्ष्या-प्राण्यांचे जीवनचक्र आपल्याला ठाऊक असते. त्यांची जगण्याची धडपड, त्यांची आव्हाने, त्यांच्या खाण्या पिण्याच्या सवयी आपल्या परिचयाची असतात. इंटरनेट आणि टीव्ही या माध्यमांमुळे आपल्याला हे प्राणी ओळखीचे आणि आपले वाटतात. या प्राण्यांचे  विडिओ अख्खे जग सतत आणि आवर्जून पाहते. त्यामुळे ‘इंटरनेट ऍनिमल्स’ ही अशी संज्ञा आता त्याकरिता वापरली जाते. सामाजिक माध्यमांवर यांचे विडिओ, फोटो व मीम इतके प्रसिद्ध होतात की त्यांना सेलिब्रिटी स्टेटस मिळते. असे सेलिब्रिटी स्टेटस अपघाताने मिळत नसते तर एखाद्या विशिष्ट प्राण्याच्या  लोकप्रिय होण्यामागे त्या त्या समाजात दडलेली राजकीय, सामाजिक आणि तात्त्विक कारणे  असतात. मानव आणि प्राणी यांच्या परस्पर संबंधांचे प्रतिबिंब मानवी आयुष्यावर कसे पडते याचा अभ्यास केल्यावर काही प्राण्यांना एका ठरावीक कालखंडामध्ये विशेष महत्त्व का आणि कसे प्राप्त होते हे लक्षात येते. 

मानवी समाजव्यवस्था अस्तितवात येण्या आधीपासूनच माणूस जनावरांवर अन्न आणि वस्त्र या मूलभूत गरजांसाठी अवलंबून आहे. तसेच माणसाने ज्या लेखी भाषा प्रथम निर्माण केल्या त्या चित्रलिपीमध्ये प्राण्यांना विशेष महत्त्व होते. प्राणी हा माणूस आणि त्याच्या भवतालातील महत्त्वाचा दुवा आहेत. आदिम मानवासाठी प्राणी हे शक्तिमान देव होते. आजही अनेक संस्कृतींमध्ये त्यांची पूजा केली जाते. परंतु माणसाच्या आयुष्यातले प्राण्यांचे महत्त्व याही पलीकडे जाते. माणसाचे त्याच्या आसपास असणाऱ्या प्राण्यांबरोबरचे नाते प्रत्येक कालखंडात वेगवेगळे होते; कधी त्याने प्राण्यांमध्ये समभाव पहिला तर कधी ते (प्राणी) आणि आपण (मानव) यांच्यातला विरोधाभास शोधून त्याच्या आधारावर मनुष्यत्वाची व्याख्या तयार केली. माणूस आणि प्राणी यांच्या संबंधातील कंगोऱ्यांचा मोठा प्रभाव माणसाच्या एकूण दृष्टिकोनावर होतो. माणूस आपल्याच प्रजातीच्या काही सदस्यांवर जेव्हा भेदभाव करतो तेव्हा तो त्यांना पशुलायक समजतो. त्यांचे स्थान इतर माणसापेक्षा कमी मानले जाते. माणसांना पशुसमान वागणूक देणे म्हणजे माणसांवर शारीरिक व मानसिक अत्याचार करणे हे समीकरण घट्ट बनले आहे. त्यामुळे मानवी समाजातील जात, वर्ण आणि लिंग व्यवस्थेचा अभ्यास करताना त्या त्या काळात मानवाचे प्राणी आणि पशुत्वाशी कोणते समीकरण आहे याचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, कॅरोल जे ऍडम्स ‘The sexual politics of meat’ या पुस्तकात स्त्रिया व प्राणी यांच्या शोषणातला दुवा शोधतात. कॅरी वेल या १९ शतकातील फ्रान्समधील घोड्यांचा अभ्यास करून मानवी समाजातील घोड्यांचे महत्त्व समजावून सांगतात. बेनेदीक्त बुआसरॉं ६० व्या दशकातील अमेरिकेत झालेल्या कृष्णवर्णी लोकांच्या नागरी हक्क चळवळीला चिरडून टाकण्यासाठी पोलिसांनी उपयोगात आणलेल्या कुत्र्यांबाबतीत लिहितात. या सर्व उदाहरणांवरून आपल्यला दिसून येते की प्राणी आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक अंगाचा भाग आहेत.

तर काही प्राण्यांना सेलिब्रिटी स्टेटस मिळणे आणि त्यामागची कारणे अभ्यासली जाऊ शकतात. पण असे सेलिब्रिटी फक्त इंटरनेटच्या युगातच तयार होतात या समजुतीला एक जिराफ तडा देते. तर ही गोष्ट आहे एका जिराफाची जिने १९ व्या शतकात फ्रान्समध्ये धुमाकूळ घातला होता आणि सगळ्या देशाला वेडे केले होते. पण या आफ्रिकन सुंदरीची कहाणी जाणून घेण्याआधी तिच्यासाठी वेड्या झालेल्या फ्रान्सची त्या वेळची स्थिती समजून घ्यावी लागेल. 

ऐतिहासिक पार्श्वभूमी 

१५९० ते १७९२ पासून फ्रान्स मध्ये बुरबॉं घराण्याचे राज्य होते. या काळात या घराण्याने फ्रान्सला सहा राजे दिले. १७८९ मध्ये फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली. यावेळी फ्रान्सचा राजा लुई १६ वा याची हत्या करण्यात आली आणि फ्रान्स मधील राजेशाही संपुष्टात आली. १८०४ मध्ये नेपोलिअनला (पहिला) संवैधानिक राजेशाहीचा सम्राट म्हणून घोषित केले गेले. परंतु नेपोलिअनचे हे साम्राटपद अनुवांशिक नसून संविधानाने बहाल केले होते, त्यामुळे त्याचा आधीच्या राजेशाहीशी काही संबंध नाही. १८१४ मध्ये नेपोलिनच्या मृत्यूनंतर फ्रान्समधील राजेशाहीवर निष्ठा ठेवून असलेल्या लोकांनी लुई १६ चा वंशज लुई १८ याला गादीवर आणले. फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधी असलेल्या राजेशाहीला आँसीयां रेजीम असे संबोधले जायचे. फ्रेंच राज्यक्रांती नंतर आँसीयां शासनाची कारकीर्द संपुष्टात आली. नेपोलियन पहिला याने फ्रान्सवर १८०४ ते साधारण १८१५ पर्यन्त राज्य केले. नेपोलियनने आपल्या साम्राज्यविस्ताराच्या वेडापायी युद्धांवर युद्ध लादून फ्रेंच लोकांना जेरीस आणले. शेवटी त्याला फ्रान्स बाहेर हाकलले आणि त्याचा एकाकी अवस्थेत मृत्यू झाला. नेपोलियनच्या मृत्यूनंतर राजनिष्ठ लोकांनी लुई १६ चा वंशज लुई १८ याला गादीवर आणले. युद्धवेड्या नेपोलियनला कंटाळलेल्या जनतेने ‘फ्रेंच राज्यक्रांतीने असा माथेफिरू नेपोलियन दिला, आता नवीन क्रांती पेक्षा जुनी राजेशाही परवडली’ अशी स्वतःची समजूत घालून घेतली. नेपोलिनच्या मृत्यूनंतर जरी बुरबॉं घराण्यातला लुई १८ गादीवर आला असला तरी तो राज्यक्रांतीच्या आधीची पूर्ण राजेशाही त्याला लाभली नाही. आत्ताची राजेशाही संवैधानिक राजेशाही होती. याचा अर्थ सद्य राजाला आपली मनमानी करणे शक्य नव्हते. परंतु लुई १८ व त्याच्या नंतर गादीवर आलेल्या राजांनी फ्रेंच राज्यक्रांतीआधी असलेल्या राज्यव्यवस्था व त्यात राजांना मिळालेले स्वातंत्र्य परत मिळवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान आणि त्यानंतरच्या काळात वृत्तपत्रे व लहान पुस्तिका, पत्रके यांचे वितरण मोठ्या प्रमाणात वाढले. ही प्रसारमाध्यमे अस्तित्वात असलेल्या राज्यव्यवस्थेतवर टीका टिप्पणी करण्याचे काम करत. वाढत्या प्रसारमाध्यमांचे जनतेवरील वर्चस्व राज्यक्रांतीनंतर फ्रान्सवर राज्य करणाऱ्या राजांची डोकेदुखी बनली. नेपोलियन पहिला तडफदार आणि उमदा नेता होता. सम्राट पदी येताच त्याने आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने तसेच वेगवेगळ्या लढाया जिंकून फ्रेंच जनतेला खुश केले. त्याच्या मृत्यूनंतर आलेल्या लुई अठरावा याच्याकडे हे कौशल्य नव्हते. नेपोलियनने सतत युद्ध खेळून जेरीस आणलेल्या जनतेला शांतता ही एकाच गोष्ट लुई अठरावा देऊ शकत होता. परंतु गादीवर येताच फ्रेंच राज्यक्रांतीची भुते त्याला छळू लागली. जनतेला राज्यक्रांती नंतर मिळालेला आवाज त्याला घाबरवू लागला. या कारणास्तव त्याने सेन्सॉरशिप वरील आपली मूठ घट्ट आवळायला सुरुवात केली. लुई अठरावा याच्यानंतर १८२४ मध्ये राजेपदावर आलेल्या शार्ल दहावा याने हाच कित्ता गिरवला. शार्ल दहावा गादीवर येताच राज्यक्रांतीची उरलेली छाप  पुसून टाकण्यासाठी नेटाने कामाला लागला. शार्ल दहाव्याचा राज्यक्रांतीच्या आधीची राजेशाही परत आणण्याचा मानस लुई अठराव्या पेक्षाही जास्त प्रबळ होता. त्यामुळे फ्रान्समध्ये राजकीय तणाव वाढला. परंतु फ्रेंच राज्यक्रांतीचा लोकांवरील प्रभाव, वाढती प्रसारमाध्यमे, आणि उदार मतवादी लोकांचा विरोध असा सहजासहजी कमी होणार नव्हता.

तर या अश्या तणावामध्ये इजिप्तचा पाशा मुहम्मद अली याने शार्ल दहाव्याला दोन देशांमधील मैत्रीचे प्रतीक म्हणून एका जिराफाला फ्रान्समध्ये पाठवले. खरे तर या काळात फ्रान्स आणि इजिप्त मधील संबंध बरेच ताणले गेले होते. या वेळी मोहम्मद अली पाशा हा तुर्कस्तानातील ओट्टोमान साम्राज्यातर्फे नेमलेला व्हाइसरॉय इजिप्तवर राज्य करत होता. परंतु पहिल्या नेपोलियन प्रमाणेच हा पाशा अतिशय महत्त्वाकांक्षी होता. ओट्टोमान साम्राज्याच्या सुलतानाच्या देखरेखीखाली इजिप्तमध्ये राज्य करणे त्याला मान्य नव्हते. त्याला सुलतानापासून स्वतंत्र व्हायचे होते. याच काळात ग्रीस देशात ऑट्टोमन साम्राज्याचे राज्य होते आणि ग्रीक बंडखोरांतर्फे ते उलथवून टाकण्याचे जोरात प्रयत्न चालले होते. इंग्लंड फ्रान्स यांसारखे देश ग्रीक बंडखोरांना मदत करत होते कारण ऑट्टोमन साम्राज्य ग्रीस मधून नाहीसे होणे त्यांच्या हिताचे होते. ग्रीक लोकांच्या बंडखोरीने जेरीस आलेल्या सुलतानाने इजिप्तच्या पाशाकडे ग्रीसमधील क्रीटी हे बेट देण्याच्या हमीवर मदत मागितली. पाशा बेटाच्या हव्यासापोटी मदत देण्यास कबूल झाला परंतु, सुलतानाला मदत करून आपण युरोपियन देशांचा रोष ओढवून घेत आहोत हे त्याला माहीत होते. भविष्यकाळात ऑट्टोमन सुलतानाच्या विरुद्ध जाऊन आपले स्वतंत्र राज्य चालवण्याचे  त्याचे मनसुबे होते आणि त्यासाठी पाशाला युरोपियन राष्ट्रांशी वैरत्व पत्करून चालणार नव्हते. त्यांची मनधरणी करण्यासाठी पाशाने युरोपियन राष्ट्रांना काही अद्भुत भेटी देऊ केल्या फ्रान्सला मिळालेली ‘झाराफा’ ही यातलीच एक भेट. 

‘झाराफा’चे आगमन आणि बदलती जीवन शैली 

या मादी जिराफाच्या प्रवासाची कहाणी अद्भुत आणि रंगीबेरंगी आहे. दोन वर्षे  जहाजात बसून ४००० मैल अंतर कापल्यावर २० जून १८२७ रोजी तिचे दक्षिण फ्रान्स मधील मार्सेय या बंदरावर आगमन झाले. या काळात जिराफ हा प्राणी कुणाच्याच परिचयाचा नव्हता त्यामुळे या जिराफाचे आगमन ही सामान्य लोकांसाठी खूपच विस्मयकारक गोष्ट होती. तत्कालीन फ्रेंच वर्तमानपत्रांनी तिचे नाव “ला बेल दाफ्रिक”- “आफ्रिकेची सुंदरी” असे नाव दिले. आजकाल ती ‘झाराफा’ या नावाने ओळखली जाते. मार्सेय शहरातून बाहेर पडून तिला उत्तरेतील पॅरिस पर्यन्त ५५० मैलाचे अंतर चालत जायचे होते. तिला चालत राहण्याची प्रेरणा मिळावी म्हणून तिच्या पुढे दोन स्थानिक गायी चालत्या ठेवल्या होत्या. तिची काळजी घेण्यासाठी तिच्या आजूबाजूस इजिप्त व सुदान मधून आलेले हसन आणि अतिर हे दोन रक्षकही होते.

झाराफाची ही यात्रा फ्रान्समध्ये खूपच गाजली. ती इतकी लोकप्रिय ठरली की तिच्याविषयी आजही लिहिले जाते. १९व्या  शतकात आपल्या गळ्याभोवती सेन्सॉरशिपची पकड घट्ट झालेल्या वृत्तपत्रांना कुठल्याही विषयावर लिहिताना काळजीपूर्वक लिहावे लागे ते सतत त्यामुळे सेफ टॉपिकच्या शोधात असत. अश्यावेळी झाराफाचे आगमन आणि तिचे फ्रेंच मातीवर चालणे हा विषय लोकांची उत्कंठा वाढवणारा तर होताच पण सरकारच्या सेन्सॉरशिपच्या पकडीतून सुरक्षित बाहेर पडता येत असल्याने पत्रकारांनी तो उचलून धरला. पत्रकार तिच्या मागे फिरत, तिची इथंभूत माहिती काढत आणि ती लोकांना पुरवीत. ती कशी चालते, काय खाते याचे वर्णन लोकांना पुरवले जायचे.  लोकांच्या मागणीनुसार बातम्या पुरवण्याची आणि त्यानुसार पत्रकारिता करण्याची सुरुवात फ्रान्समध्ये या शतकात सुरु झाली असे म्हणता येईल. 

हे सगळं समजून घेताना त्या काळातील सांस्कृतिक सामाजिक बदलांचा अंदाज घेणे आवश्यक आहे. अनेक इतिहासकार व या शतकाचे अभ्यासक असे मानतात की फ्रान्समध्ये consumer culture ची सुरुवात झाली होती. या काळात फ्रान्सच्या वसाहती जगभर विखुरल्या होत्या. या वसाहतींमधील नगदी पिकांमुळे अनेक फ्रेंच व्यापाऱ्यांच्या हातात पैसे खुळखुळत होता. अमीर उमराव सोडून इतर लोकांकडे क्रयशक्ती वाढण्याचा हा काळ होता. व्यापार वाढल्याने इतर वर्गातल्या लोकांकडेही अन्न-वस्त्र या पलीकडे जाऊन काही वस्तूंवर पैसे खर्च करण्याची ताकद आली होती.  वह्या, पुस्तके, कप, बशी यांवर सेलिब्रिटींचे चेहरे छापून ते विकणे ही मार्केटिंगची क्लृप्ती २० व्या शतकाचे फळ नसून ती १९ व्या शतकाची देन आहे. या शतकामध्ये आफ्रिका आणि कॅरिबियन मधील वसाहतींमधील नगदी पिकांच्या लागवडीमुळे फ्रान्समध्ये पैशाचा ओघ वाढला होता. इथल्या सरंजामशाही सामाजिक रचनेमुळे  राजेशाही घराणे आणि अमीर-उमराव यांच्या व्यतिरिक्त कुणाकडेही अन्न-निवारा या गरजांव्यतिरिक्त खर्च करण्यासाठी पैसे नसायचे. १९ व्या शतकात हातात पैसे खुळखुळणाऱ्या व्यापारी वर्गाचा उदय झाला त्यामुळे उत्पादन व उपभोग यांचे गणित बदलले. नावीन्याच्या वाढत्या मागणीमुळे वस्तूंमधल्या शैलीमध्ये सतत बदल घडवले गेले. फॅशनच्या मासिकांमध्ये वेगवेगळ्या पोशाख, दागिने व सौन्दर्यसाधनांची चर्चा घडू लागली.  नागरिकांचे उपभोक्ता किंवा consumer मध्ये रूपांतर होऊ लागले. अश्या परिस्थितीत  प्रचंड लोकप्रिय झालेल्या झाराफाची चित्रे छापलेल्या वस्तू विकले जाणे साहजिकच होते. पिशव्या, हातातले पंखे, ताटल्या, वाडगे, वॉलपेपर अश्या अनेक गोष्टींवर इजिप्तवरून आलेली झाराफा विराजमान झाली. परंतु consumer culture चा  स्थायीभाव म्हणजे चटकन बदलणारे वापराचे चक्र. याप्रमाणे जितक्या वेगाने झाराफा सर्वत्र दिसू लागली तितक्याच वेगाने ती लोकांच्या कल्पनेतून बाहेर फेकली गेली. आपण ज्याला फॅड म्हणतो त्याचा प्रत्यय झाराफाच्या बाबतीत आला. जिला पाहायला लोक वेड्यासारखी गर्दी करीत, जिला जवळून पाहणे केवळ अतिशय महाग तिकीट खरेदी करणाऱ्या श्रीमंत लोकांना शक्य होते अश्या झाराफाला तीन वर्षांनंतर  पाहायला येण्याऱ्यांची गर्दी अतिशय तुरळक झाली. प्रसिद्धी किती निसटती आणि घसरडी असते या आशयाची झाराफाची कहाणी फ्रेंच लेखक बाल्झाकने लिहिली. “तिथे येणाऱ्या तुरळक गर्दीतही खेडूत, मोलकरणी आणि टवाळी करणारेच लोक होते,” असे तो लिहितो. परंतु, झाराफाच्या गोष्टीला या निसरड्या प्रसिद्धीबरोबरच भक्कम असा इतिहासही आहे. 

पॅरिस मधील जारदॅं दे प्लॉंत या उद्यानामध्ये तिचा कायमचा मुक्काम असणार होता. आजही टिकून असलेल्या या उद्यानाची  लुई तेरावा याने १६३५ मध्ये स्थापना केली होती. परंतु झाराफाच्या आगमनाच्या काळात या उद्यानाचे वैशिष्ट्य अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी अधोरेखित झाले होते आणि एखाद्या जिराफाचे या उद्यानात राहणे या वैशिष्ट्यांचा भाग होता. १९ व्या शतकात या उद्यानात जगभरातील वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती आणले गेले होते. त्यांचे रक्षण आणि संवर्धन या कामांसाठी प्राणिशास्त्रातले तज्ज्ञ कामाला लावले होते. नेपोलिअन पहिला याने इजिप्तमध्ये मोहीम काढली तेव्हा आपल्या सैन्याबरोबरच त्याने १६७ शास्त्रज्ञांचा समूह इजिप्त मध्ये नेला. त्यामध्ये भौतिकशास्त्रज्ञांपासून प्रकृतीशास्त्र व वनस्पतिशास्त्रज्ञांपर्यंत सर्व प्रकारचे अभ्यासक होते. अभ्यासकांना इजिप्तमध्ये नेण्यामागे नेपोलिअनचा इजिप्त वर कब्जा करण्याचा मूळ हेतू लपविणे होते असे मानले जाते तर काहीजण नेपोलियनने फ्रेंच प्रबोधनाची मूल्ये सर्वदूर पोचवण्यासाठी आपल्या स्वारीत या अभ्यासकांचा समावेश केला असे मानतात. प्रोफेसर जोफ्री सॅं इलेर हे १९ व्या शतकातील महत्त्वाचे अभ्यासकही या गटामध्ये होते. विज्ञानाचे अभ्यासक व संशोधक हे सामाजिक आणि राजकीय पूर्वग्रह तथा त्यांचे प्रभाव यांच्यापासून मुक्त असतात असा समज असतो परंतु विज्ञानाच्या इतिहासकारांनी अनेकदा हा समज खोटा ठरवला आहे. सॅं इलेर व त्यांच्या सहकाराच्या बाबतीतही तेच घडते. १९ व्य शतकात फ्रेंच संस्कृती आणि त्या संस्कृतीमधून जन्माला आलेली व्यक्तिनिष्ठता जगात सर्वात श्रेष्ठ आहे हे स्वतःला आणि जगाला पटवून देण्याच्या ध्यासाने फ्रान्स मधील अनेक लेखक, अभ्यासक, कलाकार तसेच राजकारणातले नेते आणि मुत्सुद्दी इरेस पेटले होते. सॅं इलेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी इजिप्त मधून वेगवेगळ्या वनस्पती व प्राण्यांचे नमुने गोळा करून फ्रान्स मध्ये आणले. इलेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इजिप्तच्या मोहिमेत विविध सजीव व निर्जीव नमुन्यांची लूट फ्रान्समध्ये आणून म्युसे दीस्तुआर नात्युरेल या संग्रहालयाची तिजोरी भरली. हे संकलन राष्ट्राभिमानाचे द्योतक मानले गेले. त्या संकलनाच्या अभ्यासातून मानवाला निसर्गाची रचना आणि त्याचे गूढ जाणता येत असल्याने अश्या संकलनाचा फायदा फक्त फ्रान्सलाच नाही तर सर्व मानवतेला आहे असे मानले गेले. अतिशय महत्त्वाच्या अश्या संकलनाचा ताबा आणि त्याचा शास्त्रीय अभ्यास करण्याचे कसब फ्रान्सकडे असल्याने जागतिक संस्कृतीचे नेतेपद फ्रान्सकडे असले पाहिजे असा त्यांचा विश्वास होता. अश्या वातावरणात झाराफाचे आगमन हा केवळ दूर देशातल्या प्राण्यांविषयीच्या उत्सुकतेचा भाग नसून तो सद्य सांस्कृतिक व वसाहतवादी विचारधारेचाही भाग होता. 

वसाहतवाद आणि ‘सुसंस्कृत’ झाराफा 

फ्रान्स मध्ये आधुनिकतेचे वारे शिरले असले तरी हे बदल संघर्षात्मक होते. या आधी फ्रेंच समाजाची एक घट्ट वीण होती. यात राजा, अमीर उमराव, शेतकरी आणि कष्टकरी यांच्या समाजातील जागा ठरलेल्या होत्या. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रेंच समाज ढवळून निघाला. वसाहतवादामुळे फ्रान्सचा युरोपच्या बाहेरील देशांशी संबंध आला. त्यामुळे आधीच ढवळून निघालेल्या समाजाला “आपण कोण आणि आपली ओळख काय” या प्रश्नांनी ग्रासले.  यांची उत्तरे मिळवण्यासाठी फ्रान्सला इतर देशांकडे बघायची गरज वाटली.  फ्रान्स हा महान आणि आधुनिक देश असून  ज्या देशांवर फ्रान्सने आक्रमण केले त्या देशांचा कायापालट तो करेल आणि साऱ्या जगाचे नेतृत्व फ्रान्स करू शकेल अश्या गौरवात्मक आशावादाची फ्रान्सला गरज वाटू लागली. पहिल्या नेपोलियनने अश्याच भूमिकेतून ईजिप्तवर आक्रमण केले. परंतु त्याला काही वर्षांनी तिथून पाय काढावा लागला. नेपोलियनच्या आक्रमणापासून फ्रान्ससाठी इजिप्त promised land बनला.  नेपोलिअनच्या इजिप्त मोहिमेनंतर या देशाविषयी व इजिप्तच्या शेजाऱ्यांविषयी फ्रेंच लोकांमध्ये विशेष कुतूहल निर्माण झाले होते. मोठमोठे लेखक, कलाकार, वैज्ञानिक आपल्या कामाच्या प्रेरणेसाठी इजिप्तला भेट देत. प्राचीन संस्कृतीच्या खुणांनी नटलेला, अनोखा आणि रहस्यमय देश अशी इजिप्तची ख्याती पसरली होती. आधुनिकतेने नटलेला फ्रान्स इजिप्तच्या गौरवशाली भूतकाळाचे जतन करेल आणि तोच इजिप्तचा तारणहार ठरेल या भूमिकेतून फ्रेंच समाज इजिप्त कडे पाहू लागला. या भूमिकेला Orientalism अशी संज्ञा वापरतात. आधुनिक युगामध्ये स्वतःची, आपल्याला ठाऊक असलेल्या समाजाची आणि राज्यक्रांतीनंतरच्या राष्ट्राची ओळख धूसर झाल्याने इजिप्त सारखा गौरवशाली भूतकाळ लाभलेला  परंतु आधुनिकतेचा वारा न लागलेला आणि अपरिवर्तनीय मानला गेलेला इजिप्त फ्रान्सचा आदर्श ‘exotic other’ बनला.

औद्योगिक युगात ढवळून निघालेल्या फ्रेंच समाजापासून लांब जाऊन आधुनिकतेचा मागमूस नसलेल्या इजिप्तच्या रमणीय भूप्रदेशात स्वतःचा शोध घेण्यासाठी फ्लोबेर, शातोब्रीयां, लामार्तिन, नेरवाल यासारख्या अनेक लेखकांनी आपल्या तारुण्यात इजिप्तची यात्रा केली. अश्या इजिप्तची झाराफा प्रतिनिधी होती आणि सारा फ्रान्स तिच्या प्रेमात  पडला होता. ज्याप्रमाणे फ्रेंच लोकांच्या दृष्टीत अनाकलनीय आणि अपरिवर्तनीय इजिप्त आपले दोन्ही बाहू पसरून त्यांचे स्वागत करण्यासाठी उभा होता त्याचप्रमाणे झाराफा इजिप्त सारखीच विलक्षण, गूढ, लोभनीय आणि तरीही नम्र होती. ती जन्माने जंगली असली तरी तिच्यावरील फ्रेंच संस्कारांमुळे ती त्यांच्या दृष्टीने ‘सुसंस्कृत’ होती. अशी exotic पण तरीही फ्रान्सच्या मातीवर पाळीव झालेली ही जिराफ लोकांची स्वप्नसुंदरी बनली. 

झाराफाचे सुसंस्कृतपण, तिचे संस्कार आणखी एका कारणासाठी महत्त्वाचे ठरले. ती मार्सेय वरून पॅरिसकडे निघाली तेव्हा प्रोफेसर सॅं इलेर यांनी कोम्प्त द व्हिलनव यांना लिहिलेल्या पत्रात झाराफाची यात्रा किती उत्तम चालू आहे या विषयी लिहिले. ते म्हणतात, ‘जिराफ आणि तिच्याबरोबरच्या गायी असोत व तिच्याबरोबरची माणसे, प्रत्येकाला आपापल्या जागेचे भान आहे. कोणीही आपली जागा सोडली नाही. जिराफाला कुठलीही आज्ञा देण्याचीही गरज भासली नाही. तिच्यासमोरच्या गायींनी चालायला सुरुवात केल्यावर तीही चालू लागली. तिच्यावर नियंत्रण ठेवणारा खासन देखील मोरावर आरूढ झाल्यासारखा थाटात चालतो.’ रिचर्ड बर्खार्ड यांनी सॅं इलेर यांच्या या लिखाणावर प्रकाश टाकला. सॅं इलेर यांना यात्रेमधील प्रत्येक माणसाच्या आणि प्राणाच्या जागेची इतकी काळजी का होती याचा विश्लेषण त्यांनी केले. सॅं इलेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी नेपोलिअनच्या मोहिमेपासून सुरुवात झाल्यानंतर त्यांचे अख्खे आयुष्य मुसेअम दीस्तुआर नात्युरेल इथे जीवांच्या नमुन्यांचे संकलन करण्यात आणि त्यांचा अभ्यास करण्यात घालवले. माणसाच्या समाजरचनेच्या सुरुवातीपासूनच मानवाला आपल्या अवती भोवती असलेल्या मुंगी किंवा मधमाशी यांच्यासारख्या प्राण्यांच्या समाजरचनेचे कुतूहल वाटत आले आहे. त्यांच्या जीवनपद्धतीचा अभ्यास करून अनेक अभ्यासक व तत्त्वज्ञ  यांनी मानवी समाजातील रचनेचे आकलन करण्याचा प्रयत्न केला. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये आणि क्रांतीनंतर प्रकृतिविज्ञानच्या अभ्यासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. निसर्गनिर्मितीचे देखावे मानवाला नैतिक शिकवण देतात हा विश्वास या काळात दृढ होत गेला. राजेशाहीच्या पुनरूज्जीवनाच्या काळात असे मानले गेले की निसर्गाच्या रचनेकडे पाहून फ्रेंच लोकांना आपल्या समाजव्यवस्थेतचे आणि समाजातील आपले स्थान अबाधित ठेवण्याचे भान येईल. रिचर्ड बर्खार्ड हे दाखवून देतात की सॅं इलेर व त्यांच्या सहकाऱ्यांचे जीवांच्या संकलनाचे काम तत्कालीन राजकीय व नैतिक विचारसरणेशी निगडित होते. नमुन्यांचे संकलन करणे म्हणजे एका परीने दुसऱ्या देशातील जंगली जीवांना फ्रेंच समाजव्यवस्थेतल्या रांगेत बसवण्यासारखे होते. या प्रक्रियेत या जीवांची वाहतूक, त्यांची ओळख, त्यांचे नामकरण, त्यांचे वर्णन, त्यांचे वर्गीकरण, त्यांचे जतन करणे, मृत जीवांचे विच्छेदन करणे, त्यांची पुनर्रचना करणे शिवाय जिवंत जीवांची राखण करणे, त्यांना पॅरिस मधील नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायला मदत करणे अश्या अनेक प्रक्रियांचा यात समावेश होत असे. अश्या तऱ्हेने  मृत व जिवंत जीवांवर बारीक नियंत्रण ठेवावे लागे. निसर्गातील विविध जीवांवरील नियंत्रणाचे आणि त्यांच्या संस्कृतीकरणाचे महत्त्व १८ व्या शतकातील तत्त्वज्ञानांही वाटले होते असे रिचर्ड बर्खार्ड सांगतात. १८ व्या शतकात प्रकृतिविज्ञानाचा अभ्यास करणारे जॉर्ज लुई लक्लेर्क व कोम्प्त द बुफों यांचा असा दावा होता की एखाद्या राष्ट्राची संस्कृतीची ताकद निसर्गातील जीवजंतूंचा व साधनसंपत्तीचा आपल्या गरजांसाठी वापर करून घेण्याच्या क्षमतेशी निगडित असते. जेवढे प्राणी आणि वनस्पती माणूस स्वतःच्या गरजेसाठी उपयोगात आणेल तेवढा त्याचा रानटी अवस्थेत परत जाण्याचा धोका टळेल असे त्यांचे म्हणणे होते. परंतु जिवंत असो व मृत, या जीवांना “वठणीवर” आणणे सोपे काम नव्हते. लागवडीसाठी लावलेल्या  वनस्पती परत आपल्या रानटी अवस्थेकडे वळत, जिवंत प्राणी चावत, मारामारी करत, किंवा म्युझिअम अथवा झूमधून पळून जाण्यात यशस्वी होत. मृत जीव अनेक प्रयत्न करूनही विघटित होत किंवा कुजून जात त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांच्यामधील अतिशय महत्त्वाची माहिती कायमची नष्ट होत असे. जीवांचे संकलन तयार करून त्यांचा  सांभाळ करणे म्हणजे एखाद्या राष्ट्राची उभारणी करून त्यातल्या जनतेला नियंत्रित ठेवीत शासन चालवण्यासारखेच होते. या दृष्टीने झाराफा ही एक आदर्श नागरिकाचा नमुना होती. तिला जेव्हा चालायला सांगितले जाईल तेव्हा ती चालायची, तिच्या आजूबाजूस कितीही गर्दी झाली तरी ती क्वचितच बिथरायची. त्यामुळे झाराफासारखी सभ्य आणि शालीन प्राणी आणि तिचे राष्ट्रीय पातळीवर केलेले प्रदर्शन यांना अनन्यसाधारण महत्त्व होते.

पॅरिस च्या जारदॅं दे प्लॉंत इथे झाराफा साडे सतरा वर्षे जगली. आज झाराफाची प्रजात (Giraffa camelopardalis) नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. झाराफाची काही काळाने प्रसिद्धी कमी झाली असली तरी ती आजही ला रोशेल या म्युझिअममध्ये दिमाखात उभी आहे. इजिप्तमधल्या या जंगली अवस्थेत जन्माला येण्यापासून १९ व्या  शतकातील फ्रेंच लोकांना आदर्श नागरिकाचे धडे शिकवण्यापर्यंतचा हा प्रवास अद्वितीय आहे. तिच्या कहाणीचे असंख्य पदर आहेत. ते उलगडून दाखवण्यासाठी अनेक पुस्तके खर्ची पडतील. अश्या अनेक प्राण्यांचा वापर राष्ट्रधोरणासाठी, राजकीय आणि नैतिक शिकवणीसाठी आजही केला जातो. चीनची पांडा डिप्लोमसी हे याचेच एक उदाहरण. जगभरातील पांडांची वाढती लोकप्रियता आणि त्यांना प्राणिसंग्रहालयात असलेली त्यांची मागणी लक्षात घेऊन चीनने हे प्राणी भेट म्हणून न देता लोन म्हणून देऊन त्याबदल्यात त्या देशांकडून मोठी फी आकारायला सुरुवात केली. दोन राष्ट्रांमधील पांडांच्या देवाणघेवाणीचा प्रभाव त्यांच्या परराष्ट्र धोरणावर व आपसातील संबंधावर होतो.  १९ व्या शतकातील झाराफाचा प्रवास फ्रान्स आणि जगात घडणाऱ्या उलाढालींशी, जवळ येत गेलेल्या जगाशी, प्रसारमाध्यमांच्या ताकदीशी आणि आधुनिक फ्रान्सच्या उभारणीही जोडला गेला आहे. झाराफाचे वंशज आज आफ्रिकेतील जंगलांमध्ये तग धरून ठेवण्यासाठी धडपडत आहेत. Sixth Mass Extinction मध्ये अनेक प्रजाती नष्ट झाल्या. अजून बऱ्याच प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हजारो वर्षे ज्यांच्याबरोबर मानव जगला त्या जीवांच्या नाशानंतर पृथ्वीवर एकट्या पडलेल्या मानवाला झाराफाची कहाणी लक्षात ठेवण्याची गरज पडेल. आपल्या भोवतीचे प्राणी मानवी इतिहासातील प्रत्येक स्थित्यंतरांमध्ये समाविष्ट आहेत, त्यांना विसरणे म्हणजे मानवाच्या महत्त्वाच्या अंगाला विसरणे होय.

संदर्भ:

१. आलॅन लेकार्ट, द इजिप्शिअन जिराफ ओसेज इंडियन्स: ऍन एक्झॉटिक प्ली अगेन्स्ट सेन्सरशिप ऑफ १८२७, अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी, २०१३.

२. डॅनिएल हरकेट, द जिराफ किपर अँड द डिस्प्ले ऑफ डिफरन्स, अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी, २०१३.

३. दनीझ डेविडसन, द जिराफ क्रेझ अँड कंझ्युमर कल्चर, अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी, २०१३.

४. रिचर्ड बरकार्ड ज्युनिअर, किनोट अड्रेस: सिव्हिलायझिंग स्पेसिमन्स अँड सिटिझन्स ऍट द म्यूझेअम दिस्तुआर नात्युरेल, १७९३-१८३८ अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी, २०१३.

५. लिजा लो, द ओरिएंट ऍज वूमन इन फ्लॉबेर्स सालाम्बो अँड वोयाज ऑन ओरेयॉन, कंपॅरिटिव्ह लिटरेचर स्टडीज, स्प्रिंग, व्हॉल्युम २३, स्प्रिंग १९८६.

जाई आपटे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, डेव्हिस इथे फ्रेंच साहित्यावर पी एच डी चा  प्रबंध लिहीत आहेत. याच युनिव्हर्सिटीत त्या अध्यापनही करतात. या व्यतिरिक्त त्या वर्तमानपत्र व मासिकांमध्ये साहित्य, कला यावर लिखाण करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *