हिमांशू भूषण स्मार्त

प्रयोग-प्रक्रिया



back

प्रयोग-प्रक्रिया: बी ला कोंब फुटावेत म्हणून

‘आम्ही नाटक करतो’ या विधानामागे अनेक पवित्रे-भूमिका-हेतू असू शकतात. ठाम, गोंधळाचे, भाबडे, कडवे, हौशी, व्यावहारिक, स्वप्निल, महत्त्वाकांक्षी, निरलस, आनंदी, कुढणारे, अज्ञ, सुज्ञ, व्यावसायिक. या विशेषणांना अंत नाही. ’कले साठी जीवन अर्पणे’, ’नाटक हा श्वास असणे’ असलेही काही यात असू शकते. व्यक्त होण्याची धडपड आणि त्यासाठी समानधर्मींचा समूह शोधणे असू  शकते. किंवा निव्वळ रमणे, नकोशा वास्तवापासून-जीवनसंघर्षापासून पळणे देखील असू शकते. समाजाला  वास्तवाचे, राजकीयतेचे, सामाजिकतेचे भान देणे तर खूपदा असते. हे नाटक करण्यामागच्या हेतू-पवित्रे झाले. नाटक बघण्या मागेही इतकं किंवा याहून अधिक काही असू शकतं. त्यात आपण जाणार नाही आहोत. लेखनाच्या सुरुवातीला केलेल्या विधानामध्ये आम्ही या समूहवाचक संबोधनाऐवजी मी हे आत्मवाचक संबोधन वापरले तरी परिस्थिती साधारणतः तीच राहील. प्रस्तुत लेखनातही संस्थात्मक स्तरावर आम्ही आणि व्यक्तिगत स्तरावर मी (लेखक) असे दोन संदर्भ आलटून-पालटून प्रभाव टाकत राहतील. हे लेखन; नाट्यप्रशिक्षण चालवणे, नाट्यनिर्मिती करणे आणि नाटकात सर्जनशील व्यक्ती म्हणून सहभागी असणे अशा तिहेरी गुंतवणुकीविषयी बोलेल. त्यातल्या झटापटींविषयी आणि प्रसंगी होणारी कोंडी फोडण्यासाठी केलेल्या धडपडींविषयीही बोलेल. कोणत्याही नाट्यप्रशिक्षणाचे हेतू म्हणून सांगताना; व्यक्ती आणि समूहात उत्तम कलावंत म्हणून घडवण्यासाठीचे सर्जनशील वातावरण निर्माण करून देणे आणि मोठ्या परिप्रेक्षात उत्तम माणूस घडवणे असे दोन प्रमुख हेतू सांगितले जातात. हे घडविण्यासाठी कौशल्य आणि भान यांचेही उन्नयन अभिप्रेत असतेच. वस्तूतः हे दोन्हीही हेतू उदात्त असले तरी अव्यवहारी आहेत. या उदात्ततेमागे एक रोकडा-निर्मम हेतू ही अर्थातच असतो. तो असतो;  शिकायला आलेली मुले-मुली व्यवसायात कशी स्थिरावतील हे पाहण्याचा. विद्यार्थ्यांची कौशल्य कशी व्यवसायपूरक होतील, त्यांची व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहण्याची शक्ती कशी वाढत राहील असे पाहण्याचा. काही प्रशिक्षण संस्था या दुसऱ्या गटाची बिलकुल फिकीर करीत नाहीत. काही संस्थांची स्थापनाच या हेतूंच्या पूर्ततेसाठी होते. दुसऱ्या गटाची फिकीर न करणाऱ्या संस्थांच्या प्रशिक्षणपद्धतीत या दुसऱ्या गटाची दखलच घेतलेली नसते असे नाही. दुसऱ्या गटातल्या हेतूंच्या पूर्ततेसाठीचे प्रशिक्षणही या संस्थांच्या योजनेत असतेच. पण त्या प्रामुख्याने ज्ञानसंस्था म्हणून काम करू पहात असतात. हेतूंच्या दुसऱ्या गटाला आधार मानून स्थापलेल्या संस्था मात्र स्वच्छपणे व्यावसायिक संस्था (त्या तसे भासवत नाहीत तरी) असतात. अर्थातच ज्ञानसंस्थांनाही त्यांच्याकडे शुल्क भरून प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना वाऱ्यावर सोडता येत नाही. त्यांच्या भविष्याच्या, उदरनिर्वाहाच्या दबाव-शक्यता ध्यानात घेऊन आपल्या कार्यप्रणालीत बदल घडवावे लागतातच. कलावंत व्यक्तिगत स्तरावर जसा निवडींचा झगडा करत असतो, तसा संस्थाही त्यांच्या स्तरावर हा झगडा करत असतातच. असे झगडे ताणाचे खरे पण सत्व पणाला लागण्याचेही असतात. थकवणारे तरी चोख व्हायला मदत करणारे असतात इतक्या सगळ्या लेखनप्रपंचानंतर नाट्यप्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे दोन गट करता येतील. १.ज्ञानसंस्था, २.व्यावसायिकसंस्था. इथे कोणतेही मूल्यमापन अथवा श्रेणी अभिप्रेत नाही हे ध्यानात घ्यावे. ज्ञानसंस्थांमध्ये व्यावसायिक प्रेरणेचे काही काम चालू शकते आणि व्यावसायिक संस्थांमध्येही ज्ञानात्मक काम (अभावाने कदाचित) चालू शकते. वरील संस्थांचे गट करण्याची भूमिका ही केवळ हेतूलक्ष्यी भूमिका आहे. बरं-वाईट ठरवण्याची भूमिका नाही.

आम्ही कोल्हापुरात भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रामधली नाट्यप्रशिक्षण संस्था चालवताना स्वतःला पहिल्या, म्हणजेच ज्ञानसंस्थांच्या गटात पाहतो त्यामुळे केंद्रात होणारी नाट्यनिर्मिती, प्रशिक्षण ज्ञानप्रक्रियांशी बांधील ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो. अर्थात आम्ही दुसऱ्या गटातल्या हेतूंचेही समावेशन करण्याचा प्रयत्न करत असतोच. कला ही व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतरही त्यात आत्मशोध आणि जीवनशोधाच्या प्रेरणा शाबूत ठेवायच्या असतात हे आमच्या विद्यार्थ्यांना समजावे अशी आमची ठाम धारणा आहे. हे जिकिरचे असेल पण असाध्य नक्कीच नाही. छोट्या शहरांमध्ये नाट्यप्रशिक्षण घेतलेली मुलं-मुली प्रशिक्षण संपल्यानंतर पोरकेपणाच्या भावनेने ग्रासली जाऊ शकतात. त्यांच्यावर, त्यांचे शिक्षण ’वापरून’ पैसे मिळवण्याचा पराकोटीचा दबाव येऊ शकतो त्यांना ’ऑडिशन्स’ नावाच्या व्यवहारामध्ये थपडा खायला लागू शकतात. आम्हाला संस्था म्हणून आणि व्यक्तिशः मला आणि माझ्या सहकाऱ्यांना त्यांचा शिक्षक म्हणून अशा कठीण काळात त्यांच्या सोबत असावे लागते. त्यांनी शिकलेले आजमावून पाहता यावे म्हणून त्यांना मुक्त-दबावहीन अवकाश उपलब्ध करून द्यावे लागते. त्यांची ज्ञानात्मक-सर्जनात्मक भूक खुंटणार नाही असे पहावे लागते. आणि असे सातत्याने, प्रत्येक विद्यार्थ्यासोबत करावे लागते. असे करणे काही थोर कार्य असते असे नाही, अत्यावश्यक मात्र असतेच. भालजी पेंढारकर  सांस्कृतिक केंद्राचा ’सर्जनशाळा’ नावाचा विभाग यासाठी प्रयत्नात असतो. प्रशिक्षणानंतरही जी मुले स्वतःला आजमावून पाहू इच्छितात त्यांना सर्जनशाळा सामावून घेते. काही वर्षं स्थिरावून सर्जनशाळेत काम करणारी अनुभवी मुले-मुली आणि नवागतांचा सर्जनशाळेमध्ये मेळ असतो. सर्जनशाळा या नावावरूनच ध्यानात येईल की या रचनेत सर्जन आहे पण शाळाही आहे. शिकणे संपलेले नाही परंतु ते स्वतःला स्वतःच्या बळावर आजमावण्यात विस्तारीत झालेले आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षक सर्जनशाळेत त्यांचे सहकारी झालेले आहेत. आम्ही प्रवेश घेतल्या-घेतल्याच मुलांना सांगतो, की आता तुम्ही संस्थेचे आजीवन सदस्य झालेले आहात. तुम्ही शुल्क भरलेला अभ्यासक्रम संपला तरी तुम्ही सर्जनशाळेचे आजीवन भाग असालच. मुलांना कारकिर्दीच्या कुठल्याही टप्प्यावर, काही नवे करून बघायचे असेल तर (ते करण्याची व्यावसायिक कारकीर्द संधी देत नसेल तर) संस्थेची जागा-सामग्री आणि सर्जनशाळा त्यांच्यासाठी सदैव खुली असते. हे करत असताना संस्थेला, अर्थकारणाच्या-सामग्रीच्या-मर्यादा भेडसावत असतातच. कारण आमची संस्था नफा कमवणारी संस्था नाही. तरीही एक सांस्कृतिक न्यास म्हणून ही आम्ही आमची जबाबदारी मानतो. 

सर्जनशाळेत आम्ही अनेक उपक्रम चालवतो. ज्यांमध्ये नाटक, साहित्य, भाषा, चित्रपट, संगीत या क्षेत्रांचा समावेश असतो. चित्रपट आणि संगीत यांचे उपक्रम आस्वादात्मक स्वरूपाचे असतात. नाट्यनिर्मितीसोबत आम्ही अभिवाचन हा आमचा प्रमुख अभिव्यक्तीप्रकार म्हणून स्वीकारलेला आहे. आम्ही अभिवाचनाचेही प्रशिक्षण चालवतो. सर्जनशीललेखनाचे अभ्यासक्रम चालवतो. लवकरच ’साहित्य समीक्षा आणि आस्वाद’ यांचाही अभ्यासक्रम आरंभ करण्याचा आमचा मानस आहे. आम्ही सातत्याने (प्रशिक्षणाचा भाग सोडून) विविध अभ्यासविषयांवरची व्याख्याने आयोजित करतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये ’मराठीतील सौंदर्यवादी कवितेचा रसास्वाद’ ही बेचाळीस तासांची व्याख्यानमाला आम्ही घेतली होती. त्याआधी; महानगर, महाभारत आणि महायुद्ध या विषयांवर व्याख्यानमाला घेतली होती. येत्या काळात ’वाङ्मयीन संप्रदाय आणि सौंदर्यशास्त्र’ या विषयावरची व्याख्यानमाला घेण्याची आमची योजना आहे. या सगळ्या बौद्धिकातून पुढे प्रत्यक्ष नाट्यनिर्मिती व्हावी अथवा नाट्येतर साहित्याचे लेखन व्हावे असा आमचा प्रयत्न असतो. या सोबत आम्ही ’विभाव : त-हा पुस्तकांच्या’ नावाचा अभिवाचनाचा मासिक उपक्रमही चालवतो. नाटक नाटक करणाऱ्या मुलांना साहित्य आणि भाषा यांची गोडी लागावी, साहित्यकृतीचे मंथन करण्याची सवय लागावी, भाषेची गोडी लागावी, चांगली-सकस पुस्तके शोधून काढण्याची सवय लागावी, वेगवेगळ्या वाङ्मयप्रकारांचे भान यावे हा विभावचा प्रधान हेतू आहे. याचसोबत; अनवट, वेगळ्या वाटांवरून जाणारी, अलक्षित पुस्तके अभिवाचनाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवावीत हा ही विभावचा हेतू आहे. आम्ही पंचवीस महिने विभाव चालवतो आहोत. यात आम्ही पंचवीसहून अधिक पुस्तके-लेखक हाताळले. आमच्या मुलांमधून वीसहून अधिक अभिवाचक या निमित्ताने कार्यरत झाले. या साऱ्या उपक्रमांशिवाय; अनौपचारिक चर्चांमधून होणारे आदान-प्रदान असतेच. मला स्वतःला; मानवी जगासोबत मानवेतर सृष्टी उमजणेही रंगकर्मींसाठी महत्त्वाचे वाटते. माणूस आणि सृष्टी यांमधले अनुसंधान कळल्याने सहजीवनाची जाणीव आणखी दृढ होते. नाटकासाठी ही जाणीव पृथगात्म काम करते. आम्ही आमचे अनेक तास-सत्रे तलावांकाठी, जंगलांमध्ये, किल्ल्यांवर घेतो. सृष्टी समजून घेत खूप भटकतो. मुले-मुली थकेपर्यंत भटकतात-खेळतात यातून आपण समाजातून-कुटुंबातून घेऊन येतो ती विषमतेची-भेदाची जाणीव संपायलाही मदत होते. लिंगभावातून उत्पन्न होणारी भेद-जाणीवही नष्ट होते. इतका सारा लेखनाचा पसारा मांडून झाल्यावर आपण या लेखनाच्या शीर्षकविषयाकडे वळूया.

कोणतीही चांगली नाट्यकृती निर्माण व्हायची असेल तर सजग लेखक, सजग दिग्दर्शक, सजग अभिनेते आणि सजग रंगतंत्रज्ञ यांची गरज असते. आणि या साऱ्यांमधून एक सजग संघ बांधला जाण्याचीही गरज असते. या साऱ्यांना एकत्र ठेवणारा एक सजग संघव्यवस्थापकही आवश्यक असतो. आमच्या एक वर्षाच्या वीकेंड अभ्यासक्रमातून हे सारे साधणे शक्य नसते. याचबरोबर मुला-मुलींना सतत कार्यरत ठेवणेही आवश्यक असते. मुलांना संहिता लेखन, दिग्दर्शन आणि संघबांधणीच्या प्रक्रियेचा नीट परिचय व्हावा म्हणून सर्जनशाळेने ’प्रयोग-प्रक्रिया’ आरंभली. मी अनेक वर्षे सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात अध्यापन करीत असल्याने आणि आमची बरीच मुले, ललित कलामध्ये उच्चशिक्षणासाठी जात असल्याने आमच्यापुढे ललित कलाच्या ’संहिता ते प्रयोग’ या अभ्यासक्रमाचा ढाचा होता. ललित कला केंद्राची यंत्रणा, पायाभूत सुविधा, व्याप, विद्यार्थी संख्या यांचे स्केल खूप मोठे असल्याने, आमच्या क्षमतेत ढाळले जाईल असे प्रारूप बनवणे आवश्यक होते. आम्ही बनवलेल्या प्रारूपाविषयी सुरुवातीला थोडक्यात बोलूया. हे प्रारूप आमच्या अभ्यासक्रमात राबवले जात नाही तर अभ्यासक्रम संपवलेली आणि आधी पासून कार्यरत असणारी मुले या प्रारूपात सहभागी असतात. प्रयोग-प्रक्रियेसाठी आरंभी तीन मुलांची अथवा मुलींची निवड होते. यात स्वेच्छा आणि सक्ती असे दोन्ही मार्ग अवलंबावे लागतात. अनेकदा मुलांना एखाद्या प्रक्रीयेत सक्तीने ढकलल्याशिवाय भागत नाही. निवडलेल्या मुलांना चार महिन्यांचा अवधी असतो. पहिले पंधरा दिवस संहितेच्या संकल्पनेपासून कच्च्या खर्ड्यापर्यंतचा प्रवास होतो. पुढील दीड महिन्यात संहितेचे दोन खर्डे होतात. ते तपासून त्यांच्यावर दीर्घ चर्चा होते. उलट तपासणी होते. सुधारणा सुचवल्या जातात. तिसऱ्या महिन्यात संहितेचे अंतिम रूप तयार होते. संहितेला शीर्षक देणे, संघ निवड करणे, संघ व्यवस्थापक नेमणे, तालमींचे वेळापत्रक आखणे या बाबी होतात. चौथ्या महिन्या प्रत्यक्ष तालमींना आरंभ होतो. या दरम्यान पहिली कच्ची तालीम, पहिली रन-थ्रू आणि रंगीत तालीम होते. मार्गदर्शकांकडून प्रत्येक टप्प्यावर सूचना सुधारणा सुचवल्या जातात. संघासोबत प्रदीर्घ चर्चा होतात. या चर्चांचे स्वरूप अत्यंत गंभीर, मूलभूत आणि शैक्षणिक शिस्तबद्धतेचे असते. चौथ्या महिन्या अखेरीस प्रत्यक्ष प्रयोग होतो. प्रयोगाच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण संघाची (प्राधान्याने लेखक, दिग्दर्शकाची) मौखिक परीक्षा होते. या साऱ्या प्रक्रियेसाठी एक प्रक्रिया समन्वयक असतो. आपल्या अडचणी-मागण्या संघ सदस्यांनी दिग्दर्शकाला, दिग्दर्शकाने संघव्यवस्थापकाला आणि संघव्यवस्थापकाने प्रक्रिया समन्वयकाला सांगून त्यांचे निराकरण होणे अभिप्रेत असते. . तालमींचे वेळापत्रक आणि प्रगती सर्वांना दिसेल अशा पद्धतीने फलकावर लिहिली जाणे आणि प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाने कामाची टिपणे- नोंदी ठेवणेही बंधनकारक असते. परीक्षेमध्ये यश, गुण, शिक्षकांचे भय यांसारख्या कोणत्याही दबावाशिवायही प्रयोगप्रक्रिया सुविहित पार पडते. या प्रक्रियेत ताण, रुसवे-फुगवे, तक्रारी होतच असतात, परंतु त्यांचेही प्रक्रियेतच समाधान शोधले जाते. आजवर आम्ही अशा चार प्रयोग-प्रक्रिया पार पाडल्या. यातून नऊ लेखक-दिग्दर्शक कार्यरत झाले. नऊ संघव्यवस्थापक आणि चार प्रक्रियाव्यवस्थापकही कार्यरत झाले. आमच्या ग्रंथालयात नऊ नव्या ताज्या संहिता जमा झाल्या आमच्या नऊ सहकाऱ्यांना नाटक सुचण्यापासून ते पहिला प्रयोग संपण्याच्या क्षणापर्यंतची प्रक्रिया समरसून अनुभवता आली. आमच्या अनेक मुला—मुलींना वेगवेगळ्या प्रकृतीच्या संहितांमध्ये अभिनय करता आला. अनेकांना रंगतंत्र आजमावता आले. आमच्या मुलांनी यासाठी नेपथ्यवस्तू बनवल्या, मंचवस्तू बनवल्या, वेशभूषेचे नियोजन केले, प्रकाशयोजनेची संपूर्ण यंत्रणा बनवली, स्पॉटलाईट्स बनवले. अर्थातच यातल्या बऱ्याच गोष्टी चाचपडण्याच्या पातळीवर आहेत प्रयोगांना तांत्रिक मर्यादा आहेत. पण प्रयोग-प्रक्रियेने आम्हाला जबाबदार बनवले. नाट्यानुभवाचा आणि निर्मितीप्रक्रियेचा आनंद दिला. साधारणपणे 17 ते 30 या वयोगटातले आमचे सहकारी प्रयोग-प्रक्रियेत, लेखक-दिग्दर्शक म्हणून सहभागी झाले. मानवी संस्कृतीचे पतन, तारुण्यात प्रवेश करणाऱ्या मुलाचे आणि आईचे नाते, मूल्यहीन सत्तासंघर्ष, अभावितपणे जुळून येणारी मानवी नाती, माणसाचा आतला आवाज, मुक्ततेची ओढ असणाऱ्या मुलीची विवाहनंतरची भावस्थिती, स्वतःचे अवकाश शोधणारी नवतरुणी, माणसाचे क्रयवस्तूत रूपांतर होणे आणि सत्वलोप, भविष्याची स्वप्ने आणि वास्तव यांमधला झगडा असे नाना विषय संहितांमधून हाताळले गेले. ब्लॅककॉमेडी, रोमँटिक कॉमेडी, तत्वप्रधान, प्रतीकात्मक, वास्तववादी, बिनवास्तववादी, असंगत अशा अनेक शैलींमधून लेखक आणि दिग्दर्शन प्रयोग-प्रक्रियेत घडले. मुलांनी संहिता लेखन प्रक्रियेतल्या आणि तालमींमधल्या सर्जक उलथापालथी अनुभवल्या. प्रयोग-प्रक्रियेतून पाच मुले आणि चार मुली लेखक-दिग्दर्शकाच्या भूमिकेत आल्या. मुलामुलींच्या संख्येमधला हा समतोल स्वाभाविकपणे घडून आला. ‘मुलींना संधी’ देण्यासाठी कोणताही अस्वाभाविक खटाटोप करावा लागला नाही. जून २०२० मध्ये पार पडलेली प्रयोग-प्रक्रिया आम्ही प्रथमच प्रेक्षकांसमोर सादर केली. तोवर केवळ निमंत्रितांपुढे आणि सर्जनशाळेच्या सहका-यांपुढे हे प्रयोग सादर होत असत. प्रेक्षकांच्या उपस्थितीचा दबाव काही सकारात्मक गोष्टी घडवू शकेल आणि नाममात्र प्रवेशशुल्क लावल्याने प्रयोग-प्रक्रिया आर्थिकदृष्ट्या काहीशी स्वावलंबी होईल अशा दोन धारणा यामागे होत्या. प्रयोग-प्रक्रियेचे प्रयोग जवळपास श्यून्य खर्चात केले जातात. तरीही लेखक-दिग्दर्शक करतात ती अत्यल्प पदरमोडही सुसह्य व्हावी यासाठी काही निधी लागतोच. ही नाटके श्रीमंत दिसत नसली तरी शिस्तबद्ध आणि नीटनेटकी दिसणे महत्त्वाचे आहेच. कोणतेही लौकिक लाभ समोर दिसत नसताना, केवळ नाटकाविषयीची आस्था आणि नाटकातून (नाटकातूनच) काही म्हणू बघण्याची धडपड या दोन प्रेरणांनी आजवरच्या प्रयोग-प्रक्रियेमध्ये आमचे सहकारी कार्यरत राहीले. सर्जनशाळेच्या आरंभापासूनच आम्ही असे ठरवले होते की आपले नाट्यविषयक काम सातत्याने सुरू राहिले पाहीजे. वर्षातले सगळे दिवस कामाने व्यापलेले असले पाहिजेत. मुलांनी काही ना काही निमित्याने, आपण ज्या जागेत नाटक करतो त्याजागेत असले पाहिजे. सर्जनशाळेची नाट्यनिर्मिती स्पर्धाकेंद्री असता कामा नये. एखादी स्पर्धा आली की एकत्र जमायचे कोणीतरी धडपड करून एखादी (शक्यतो स्पर्धेत चालणारी) संहिता मिळवायची, ती एका किंवा अनेक स्पर्धांमध्ये सादर करायची, यशाने उत्साहीत व्हायचे किंवा अपयशाने खट्टू आणि पुढच्या स्पर्धेपर्यंत पांगायचे. ही व्यवस्था आम्हाला नको होती प्रशिक्षणाच्या हेतूने न येता केवळ नाटक करण्याच्या हौसेपोटी येणाऱ्या मुलांनाही, जागतिक, भारतीय, मराठी, लोकरंगभूमीच्या परंपरा माहीत असल्या पाहिजेत. त्यांनी वेगवेगळ्या शैलीची नाटके-वाचली केली पाहिजेत. त्यांनी-तिने विपुल साहित्य वाचले पाहिजे. चित्रपट पाहिले पाहिजेत. मेंदू आणि मन थकवणाऱ्या चर्चा केल्या पाहिजेत. खयाल गायकीपासून ते लोकगीतांपर्यंत गाणं ऐकलं-आस्वादलं पाहिजे. चर्चांमध्ये विचाराने मुद्दे मांडायला, वैचारिक टिपणे लिहायला शिकले पाहिजे. आजवर आम्ही यथाशक्ती हे सारे करत आलेलो आहोत. माझा स्वतःचा मुलांना असाही आग्रह असतो की ’नाटक करतोय; या संमोहनात बारा महिने चोवीस तास न राहता, काळ-जगणे-सृष्टी समरसून अनुभवली पाहिजे. त्यानंतर जे अस्वस्थ करते, त्रास देते, आनंदी करते, अंतर्मुख करते ते नाटकातून म्हटले पाहिजे. आणि आणि ते नाटकातूनच म्हटले जाणारे आहे का? याचाही शोध घेतला पाहिजे. प्रयोग-प्रक्रिया हा याच धडपडीतून स्फुरलेला एक प्रकल्प आहे. यासोबत आमच्या वीकेंड अभ्यासक्रमाला येणाऱ्या मुलांना आठवड्यातल्या कुठल्याही दिवशी नाटकाची निर्मितीप्रक्रिया अनुभवावी वाटली तर त्यांना ती अनुभवता आली पाहिजे अशीही आमची भूमिका आहे या साऱ्या धडपडीचे यशापयश-मूल-योग्यता काळच ठरवेल.  परंतु आम्ही मात्र ती सातत्याने करत राहणार आहोत. बरेचदा अव्यावसायिक आणि आवडीपोटी स्थापन झालेल्या नाट्यसंस्था एकचालकानुवर्ती होण्याचा,  एकाच लेखकाभोवती-दिग्दर्शकाभोवती गोळा झालेल्या होण्याची शक्यता असते. आम्हाला तसे होऊ द्यायचे नव्हते . नव-नवे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ कार्यरत व्हावेत त्यांच्या कल्पना सर्जनशाळेच्या कामात सहभागी व्हाव्यात,  काम विकेंद्रीत व्हावे, कुठल्याही सहका-याला काही कमी अधिक क्षमतेचे काहीही करून बघावेसे वाटले तर त्याला ते बघता यावे. प्रयोग-प्रक्रियेने आम्हाला हे सारे करण्याची अधिक विस्तृत संधी दिली. आशयाच्या बाबतीतही कोणत्याही मतवादाचा, विचारसरणीचा, वास्तवदर्शनाचा दुराग्रह आमच्या सहकाऱ्यांवर असणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. इव्हन, एखाद्याने प्रतिगामी वाटणारा आशय-विषय हाताळला असेल तरी त्याला तो हाताळू द्यावा त्यावर दीर्घ-निकोप चर्चा कराव्यात आणि सकारात्मक सहमतीवर येण्याचा प्रयत्न करावा.. सर्जनशाळेने कालिदास, पु. ल. देशपांडेंपासून ते रविशकुमारांपर्यंत असंख्य लेखकांवर काम केले. या मुक्ततेचा प्रयोग-प्रक्रियेलाही लाभ झाला. प्रयोग-प्रक्रियादरम्यान आम्ही लेखन, दिग्दर्शन, अभिनय, रंगतंत्र, प्रयोगव्यवस्थापन यांच्या कार्यशाळा आयोजित करतो. प्रत्येक कार्यशाळेला,  प्रत्येक संघसदस्याने उपस्थित राहून सक्रिय व्हावे हा आमचा आग्रह असतो. अभिनयाच्या कार्यशाळेला केवळ अभिनेत्यांनी यावे असे चालत नाही. कार्यशाळेचे मार्गदर्शक हेच प्रयोग-प्रक्रियेचे प्ररिक्षक असतात. एक प्रशिक्षक प्रेक्षकांचा प्रतिनिधी असतो. प्रयोगानंतर होणारी मौखिक परीक्षाही अत्यंत निर्मम-कठोर असते. परीक्षकांसोबत प्रयोग बघितलेल्या सगळ्यांनाच प्रश्न विचारण्याची मुभा असते. ही परीक्षा प्रामुख्याने लेखक-दिग्दर्शकांची असली तरी अभिनेते, तंत्र, संघव्यवस्थापक यांनाही प्रश्न विचारले जातात. परीक्षानंतर गुणदान होते. गुणांमध्ये जे पुढे असतील त्यांना प्रोत्साहनपर ग्रंथभेट मिळते. प्रयोग-प्रक्रियेकडे आमचा कुठलाही सहकारी स्पर्धा म्हणून पहात नाही. प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या लेखकाला काही अटी पाळाव्या लागतात. त्याचे हे पहिले लेखन असावे, संहिता स्वानुभवातून स्फुरलेली असावी, कथा-कविता-कादंबरी यांचे नाट्यरूपांतर नको, अनुवादित-भाषांतरित-आधारित संहिता नको. इथे विवरण केलेली रचना असणाऱ्या चार प्रयोग-प्रक्रिया आजवर आम्ही पार पाडल्या प्रत्येकवेळी राहिलेल्या, रचनेच्या काही त्रुटी ध्यानात घेऊन त्या आम्ही सुधारत आलो. प्रयोग-प्रक्रिया रचनेच्या स्तरावर आणखी पक्की होण्यासाठी आम्ही काम करत राहणार आहोतच. हे सारे करत असताना येणाऱ्या मर्यादाही आम्ही जाणून आहोत. या मर्यादा संख्यात्मक आहेत, साधनांच्या संदर्भात आहेत, गुणवत्तावाढीच्या आहेत, पायाभूत सुविधांच्या आहेत, आर्थिक आहेत. आम्ही सातत्याने समरसून काम करत राहिलो तर या मर्यादा उल्लंघण्याच्या वाटा आम्हाला दिसतील याचीही आम्हाला खात्री आहे. 

अखेरीस कोणताही कलाव्यवहार हा जीवनजिज्ञासेच्या प्रवासातला आनंदव्यवहार असतो. जिज्ञासापूर्तीचा एकएक टप्पा हा सार्थतेचा आणि कृतज्ञतेचा टप्पा असतो. हा प्रवास करत राहिल्याने आपण जीवना पुढे नम्र होऊ शकतो, आकंठ प्रेम करू शकतो, निर्विष होऊ शकतो, रसरसून संवादू शकतो, प्रांजळ होऊ शकतो. तुकाराम म्हणतात तसं हा, ’कवतुके दृष्टी निववावी’ यासाठी चाललेला प्रयास आहे. इथलं कौतुक म्हणजे प्रशंसा नव्हे, तर सर्जनाचा उल्हास आणि उमजेचं समाधान. प्रयोग-प्रक्रिया या जाणिवेपर्यंत गेलेल्यांची मांदियाळी वाढवणारी ठरली तर सर्जनशाळेची आणि भालजी पेंढारकर केंद्राची धडपड सार्थ झाली असे म्हणता येईल.

चित्र सौजन्य:हिमांशू भूषण स्मार्त

संपादकीय नोंद: ‘प्रयोग-प्रक्रिया’ या उपक्रमात मल्हार दंडगे या विद्यार्थ्याने लिहिलेली ‘मनात’ ही एकांकिका आणि मल्हारचे लेखन प्रक्रियेविषयीचे टिपण आम्ही १६ व्या आवृत्तीत प्रसिद्ध केले आहे. ते इथे वाचता येईल.

हिमांशू भूषण स्मार्त हे मराठी नाटककार असून कविता, ललित गद्य आणि संशोधनात्मक लेखनही करतात. ते भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, कोल्हापूर तसेच ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ येथे नाटक या विषयाचे अध्यापन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *