हिमांशू भूषण स्मार्त

माळ्यावरच्या धुळीत



back

“धुळीबद्दल काहीच कसं रे नाई लिहिलं कुणी? बाकी सगळ्याबद्दल लिहीत बसलेत लोक. झाडं, फुलं, पक्षी, दगडं, दऱ्या, डोंगर.. ते जाऊ दे सगळं. कवींचं लाडकं आहे ते सगळं. आजारी पडल्याबद्दल पण लिहिल्यात की कविता. मग धुळीबद्दल का नाई. तू पण नाही लिहिलंस. म्हंजे नीट बघतच नाहीस तू. किंवा पाहिजे तेवढंच बघतोस. रंकाळ्याच्या पाण्यावर गळून पडलेल्या गुलमोहराच्या आणि पीतमोहराच्या पाकळ्या आणि कायकाय.”

मला बजावण्यापुरतं प्रौढपण शिरतं तुझ्या अंगात. एरवी तू तुझ्यातुझ्या वयाची असतेस नेहमी. आणि असं बजावायला लागलीस ना काहीतरी ठासून की तुझ्यावर घट्ट-सघन प्रेम असूनही तुझा राग येतो. पण रागसुद्धा मायेच्या किनखापानं वेढलेला. त्यानं मग तुझ्या प्रौढत्वाची मात्रा वाढत जाते. एरवी कशी तू उगमापासल्या नदीसारखी ओसंडणारी. खळाळ नुस्ता तुझा. तुझ्या कांतीवर सर्जनोत्सुक परागकणांची अलवार कोवळीक. आवाजात वेळूतनं वारा वाहावा तसं गुंजन. तू निरतिशय अप्रौढ, अपक्व. आणि हे उणं म्हणून नाई सांगताय. पण मला बजावायला लागलीस की, डोहात शिरलेल्या प्रवाहासारखी सखोल. तुझ्या कांतीवर पक्वतेची दीप्ती, डोळे दिपवणारी. स्पर्श केला त्या दीप्तीला तर डोळ्यांसारखंच वर्तमानही दिपून जाईल. या पक्वतेच्या दीप्तीत हसलीस तरी तेज ओसंडत नुस्तं. एरवी हसलीस की कसं लाघवाचं दळ उमलल्यासारखं वाटतं. आणि आज हे धुळीचं काय काढलंयस कुणास ठाऊक अचानक? एरवी ती दिसली की तू झाडायला तत्पर असतेस. घर सारखं लख्ख ठेवतेस. मंगलोरी खापरातनं उन्हाची तिरीप पडते बघ तुमच्या सोप्यात त्यात धूळ तरंगताना दिसली तर ती तिरीपही पुसून काढशील तू. मग आज काय धुळीचं?  “बघ की , मी स्वैपाक करते तो खाऊन संपतो. भांडी पुन्हा रिकामी. मी जमीन पुसते ती पुन्हा केरानं भरून बसते, सकाळ-संध्याकाळ. कितीही नीट लावल्या तरी घरातल्या वस्तू जागा सोडतात. अंथरूण-पांघरूणयांच्या घड्या मोडतात. पाण्यानं भरलेली पिपं, घागरी रिकाम्या होतात. रांगोळ्या वाऱ्याने उडून जातात. आणि काल माळ्यावरचे कांदे काढायला वर गेले तर तिथल्या धुळीत उठलेली माझी पावलं आत्ताही जशीच्यातशी आहेत. आत्ता उमटल्यासारखी. आज खूपवेळ बघत बसले मी ठशांकडं. अगदी खाली वाकून. लांब अंतरावरनं. डाव्या उजव्या बाजूनं. पुढनं मागनं. धूळ होती म्हणून टिकलं न रे हे. मग आपण धूळ झाडून आपण कुणाला नाहीसं करतो? धुळीला की स्वतःला?”

तुझ्या या प्रश्नानं मी पार सटपटलो. हे नुस्तं बजावणारं प्रौढपण नाही. वेगळंच काहीतरीये. कंठशोष पाडणाऱ्या तहानेपोटी पाण्याकडं प्राणांतिक धाव घ्यावी, पण उन्हानं चकाकणाऱ्या काचेसारख्या पाण्याचं तेज सहन न होऊन पावलं खिळून राहावीत, तसं काहीतरी. तुझ्या आत, खूप आत.. पक्वतेनं तुडुंबलेला एक पोपटी-निळा डोह आहे. त्याचा तुला पत्ता नाही. तुला खरपूस भाकऱ्या करता येतात. गुऱ्हाळावर गेलं की गुळावरची साय काढता येते. वयाहून मोठ्ठं होता येतं. तुझ्या भावडांचं वेळापत्रक आखता येतं. मला बजावता येतं. ते वेगळं आणि हा डोह वेगळा. पण तो आहे तुझ्यात हे कळल्यावर मला तुझ्यावर नुस्तं प्रेम नाही करता येत. तुझी नुस्ती झपाटल्यासारखी अभिलाषा नाही धरता येत. तुझ्याही नकळत तुझ्या पक्वतेच्या डोहाला एक पाझर फुटतो. तुझ्याही नकळत तो वाहात येतो. माझं घट्ट-सघन प्रेम त्यात विरघळतं आणि जे घडतं त्या विरघळण्यातनं, त्याला काय म्हणावं? पण ते जे काही घडलं नं त्यातनं मुली.. सखे..आत्मजे.. त्यामुळं मी तुझ्या अभिलाषेतनं मुक्त होतो. तुझ्या अभिलाषेचे हट्टी रेणूबंध सैलावून तिची सूक्ष्म धूळ होते आणि त्या धुळीत तुझी नित्य पावलं उमटतात. तुझ्या प्रश्नानं मी इतका पालटलोय याचा तुला पत्ता नाही.

“आता शंभरदा मीच नाचले त्या माळ्यावरच्या धुळीत की कुठले ठसे आणि कुठलं काय. आणि ठसे पुसू नयेत म्हणून जपत बसले तर माळ्यावरनं कांदे काय तू आणून देणारायस मला.”

“मी कांदे नाही आणून देणार. पण ठसे फुंकून येणार सगळे. धूळ साफ करणार सगळी.”

“का?”

“सारखं सारखं चालून पहिले ठसे पुसू नयेत म्हणून.”

“कळेल असं बोल रे काहीतरी. बारा तास कविता नको करत जाऊस. साध्या माणसांशी साधं बोल.”

“आणि खूप काही लिहिलंय कुणीकुणी धुळीबद्दल. मराठीत, हिंदीत, उर्दूत.”

“उद्या सांग. आता पाणी भरून घेते मी. काल सगळी अंथरूण-पांघरूणं काढलेली धुवायला. पिप तळाला गेलंय.”

कधी घडलावता हा संवाद? नीट आठवेना. आणि आता स्मृतीतनं रचतोय म्हणून परिच्छेदच परिच्छेद लिहिलेत आपण. प्रत्यक्ष बोलणं एवढं कुठनं एकसंध. माणूस आठवतंय. ठिकाण आठवतंय. प्रहर आठवतोय. उन्हं कललेला, वाऱ्यातनं उष्मा वाहणारा संध्याकाळचा प्रहर. आज वळवाआधीचे धसमुसळे वारे सुटून छपरांवरची, रस्त्यांवरची धूळ उडतीये. छोट्या-छोट्या, खेळण्यातल्या भोवऱ्यामधनं उठाव्यात तशा वावटळी उठतायत धुळीच्या.. तर आठवलं हे बोलणं. धूळ म्हणजे बंध सैलावलेली माती. धूळ म्हणजे भवाच्या प्रत्येक नमुन्याचं-अंशांचं सर्वात्म सूक्ष्मपण. धूळ म्हणजे मागे पडत जाणाऱ्या काळाची पूड. धूळ म्हणजे ग्रीष्मातल्या अष्टौप्रहर उष्णतेनं अत्तरासारखं उडून जाणारं आपल्या बाह्यरूपाचं कणपण.

आठवणीत जरा प्रयासानं शिरून शोधलं पाहिजे की, आपण धुळीविषयी कुठली उद्धृतं ऐकवून कवींची बाजू लावून धरली होती. ‘धुळीविषयी कधीच कसं रे नाई लिहिलं कुणीच?’ हा प्रश्न कसा खोडून काढला आपण? वळवाच्या वाऱ्यानं घडवलेल्या धुळीच्या वावटळीनं एक छोटं काळयंत्र केलेलं असतं, त्यात शिरायचं. धुळीच घुमाऱ्यानं निःशरीर होऊन भूतकाळात जायचं. अणूरेणूंनी जुळाचं आणि कवींचा पक्षकार होऊन उद्धृतं सांगणाऱ्या स्वतःला ऐकायचं.  “आपण अरुण दातेंचं गाणं ऐकतो बघ नेहमी, शंकर वैद्यांनी लिहिलेलं. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला.. त्यात म्हटलंय बघ धुळीबद्दल.. अफाट जगति जीव रःजकण.. दुवे निखळता कोठून मीलन.. जीव भुकेला हा तुजवाचून.. जन्मामधुनी पिसाट फिरता, भेट घडे आजला.. रजःकण म्हणजे धुळीचा कण.”

खरंचाय की, आपण काळाचा लांब, परतीची दिशा नसलेला, अफाट रस्ता चालून मागं गेलो पंधरा-वीसवर्षं. धुळीच्या काळयंत्रात बसून, धूळ बनून मागं आलो आणि स्वतःच सांगितलेली धुळीची उद्धृतं ऐकत बसलोय. ‘..जन्मामधुनी पिसाट फिरता, भेट घडे आजला..’ हे एक गाणं सोडता शंकर वैद्य धुंडाळून बघितले नाहीत आपण. जेवढे हाताला लागले ते भावले नाहीत. “मी नाई तू ऐकत, तू ऐकतोस ते. घड्यावर स्पीकर ठेवल्यानं केवढ्यानं घुमतो रे आवाज. रस्त्यावरनं जाणाऱ्याला पण ऐकायला येतो स्वच्छ. वत्तुरकरांच्या मुलीला ऐकू यावं म्हणून लावतोस नं? गाणं लावतोस आणि हरवल्याचा अभिनय करत खिडकीत उभारतोस. खरं सांग, तुला तिचा प्रियकर व्हायचंय का तत्त्वज्ञ? कारण एक झालास की दुसरं नाई होता होणार.”

तूच मला धुळीबद्दल बोलायला भाग पाडलस हे तू अगदी विसरून गेलीस. मी उद्धृतांची यादीच्यायादी घेऊन आलो. आज बहुधा तुला धुळीविषयी प्रश्न पडणार नाहीयेत. मी गुन्हा पकडल्यासारखा दुखरा होवून म्हणतो..

“आता मी पण नाही ऐकत ते गाणं. अरुण दाते ऐकण्याचा एक काळ असतो. तो संपतो. नंतर ते कर्कश्श वाटायला लागतात. मुद्दाम ऐकावं असं काही राहत नाही त्यांच्यात. आवाज घुमवणारे घडे फुटतात. त्यांच्यातल्या मातीचे बंध  सैलावतात. तिची धूळ होते.”

यातलं दात्यांविषयी बोललेलं तेवढं प्रकट. घड्याविषयीचं मनात. तुझ्या चेहऱ्यावर दुष्ट पण हृद्य हसू आलंय. घड्यांची धूळ वरवर जाऊन माळ्यावर बसते आणि कांदे आणायला गेलं की तिच्यात आपल्या पावलांचे ठसे उठतात..

आणि खळखळत हसत सुटतेस. मग काहीच न घडल्यासारखी. घरच्या कामात हरवून जातेस. मग मी तुमच्या घराच्या, उंबराकडं उघडणाऱ्या खिडकीशी बसून पुटपुटायला लागतो..

कवितांवरची धूळ उडाली फडफडली अन् पाने
शब्दांचे गज  तोडून आली मुक्त अनावर गाने

आता असंच बसून राहायचं उद्धृतांवर उद्धृतं म्हणत. मग धुळीनं अवगंठून वारूळ व्हायचं. आतल्या आत, धुळीच्या काळयंत्रात बसून कुठं-कुठं फिरत राहायचं. आपल्या पोटात घुमवून आवाज विस्तीर्ण करणारा घडा धुळीचा. जीव धुळीचा. पावलांच्या ठशांभोवतीची वळणं धुळीची, त्यात तळव्यावरच्या रेषांची चित्रं रेखलेली. मग सगळी उद्धृतं तशीच टाकून मी घाईनं माळ्यावर जातो. एका कोपऱ्यात कांद्यांचा पसारा. त्यांचा हलकासा वास. आणि त्यापसाऱ्याकडं चालत गेलेली तुझी पावलं धुळीत. क्रमबद्ध. दोन्ही अंगठ्याजवळच्या बोटांपाशी; तू हट्टानं घालतेस त्या जोडव्यांनी जोर दिल्यामुळं उठलेला अधिक खोल ठसा. तुझ्या तळव्यांवरची रेखाचित्रं किती गहिरी टिपलेत धुळीनं. अंगठ्यापासला एक उठाव आणि करंगळी जवळचा दुसरा.. या दोन उठावांच्या पोकळीत एक रेष टाचेकडून वाहात आल्यासारखी आणि उठावांच्या बरोबरमध्ये तिचे दोन स्वतंत्र प्रवाह झालेले. उलट बघितलं तर करंगळी आणि अंगठ्याकडून दोन नद्या वाहात आलेल्या, उठावांच्या मध्ये त्या मिळून पुढं एकच नदी वाहात गेलेली. काल कधीतरी उठलेले हे ठसे कसे काळात उमटल्यासारखे अविचल झालेत. माळ्यावर वारा वाहात नाई. तुझ्याशिवाय सहसा कोणी येत नाही. व्यायला झालेल्या मांजऱ्या येतात कधीकधी. तुला मी म्हटलंय, हे ठसे फुंकून टाकीन म्हणून.. ..पण त्यांच्याकडं नीट निरखून बघितल्यावर वाटतं की नकोत फुंकायला. तू स्वतःला शोधलंस या ठशांमध्ये, तुला वाटेल तेव्हा तूच इथली धूळ वारून टाक. ठसे फुंकून टाक. किंवा मग हे ठसे टाळून चालत धुळीमध्ये ठशांचं एक गाव वसव माळ्यावर. कुणाला तरी हा वाडा पाडून, मोठी सुसज्ज इमारत बांधावी वाटेपर्यंत अक्षय टिकूदेत हे ठसे. मी माळ्यावरनं खाली येतो. तुझं घर टाळून तसाच जायला निघतो. तर मागनं तुझा आवाज..

“बघून आलास नं ठसे. वाटलंच होतं मला. आहेत की नाईते ठसे, माझे- माझे. त्यांच्याएवढं माझं काईच नाई.”

तांदूळ निवडायला ताट पुढं घेऊन बसलीयेस तू. पण तांदळातनं बोटं अशी फिरतायत की सतार वाजवणाऱ्यानं अत्यंत हलका-हलका झाला वाजवावा.

“तुला माहितीये, आज वेळ मिळेल तशी मी घरातल्या धुळीच्या सगळ्या जागा शोधल्या. छपराला भिंती भेटतात तिथं तिथं चाचपून बघितलं. बोटाला लागलेल्या धुळीचा वास घेऊन बघितला. बोटांवरची धूळ फुंकून माझ्यापास्नं लांब जाताना बघितली. मला खूळ लागणार बहुतेक.”

मान खाली घालून तांदळांचं  कायकाय करत राहतेस. निवडणं नाहीचाय ते.

“आणि चाल्लास कुठं? धुळीवरच्या कविता ऐकवणार होतास नं मला. आता ऐकणाराय मी. ऐकव तू. मगाशी उंबराकडं बघून काय पुटपुटत होतास.”

मी दारातनंच म्हणतो

कवितांवरची धूळ उडाली फडफडली अन् पाने
शब्दांचे गज  तोडून आली मुक्त अनावर गाने

तांदळाला छेडून तंद्री लागलेली तुझी, त्याच तंद्रीत म्हणतेस,

“पुन्हा म्हण.”

मी पुन्हा म्हणतो. असं तीनदा होतं. एवढी घोकून म्हणण्यासारखी नाहीये ही कविता खरंतर. तिच्यात आवेगाय पण रचल्यासारखा. संभावित. तू चौथ्यांदा म्हणायला नाहीस सांगत. नुस्ता कोरा विराम. आणि स्टीलच्या ताटात बारीक घुंगरांसारखे हलणारे तांदूळ. तुझ्या कोकणातल्या गावाकडचे. जाड. शिजले की टपोरे होणारे. तांबूस. हातसडीचे. अनघड. महाचविष्ट.

“म्हणजे धूळ बसायला नको त कवीला. वारा सुटून, पानं फडफडून धूळ उडायला हवीये त्याला. ही नाहीच्चाय धुळीवरची कविता. पुढची सांग.”

हमने माना की तगाफुल न करोगे लेकिन
खाक हो जायेंगे हम तुमको खबर होने तक

“छान शब्दाय, तगाफुल. काये अर्थ?”

“उपेक्षा करणं.”

“हा तुझा लाडका का? उर्दूत लिहिणारा. जुना.”

“गालिब.”

“गालिब. पण खाक म्हणजे राख नं? जळून खाक झालं वगैर. तू याचंच ऐकवलंतस बघ मला खाकवालं काईतरी.”

‘जला जिस्म जहॉं दिल भी जल गया होगा, कुरेदते हो जब अब राख जुस्तजूं क्या है|’ “इथं राखच आहे खाक नाई. आणि खाक म्हणजे राख सुधा  आणि धूळ सुधा.”

“किती एक सारखं ऐकू येतं नं, खाक आणि राख. म्हणून लक्षात राहिलं. नाईतर तुझा तो गालिब कशाला लक्षात राहतो माझ्या. त्या तगाफुल वाल्या ओळींचा अर्थ सांग.”

“मी शब्दांचे अर्थ सांगतो. कवितेचा अर्थ नाही सांगता येत.”

 “वर्गात सांगतात तसा वरवरचा सांग. चालतंय मला.”

“तू माझी उपेक्षा करणार नाहीस हे मला मान्य आहे, पण तुला कळेपर्यंत मी पार धुळीला मिळालेले (मिळालेलो?) असेन.”

“हं..”

“मला वाटलं, ’काय कळेपर्यंत?’ असं विचारशील.”

“समज विचारल असं.”

“त्याच्यातचाय कविता.”

या वाक्यावर कशी हसतेस. अनिर्वचनीय. वर्णनातीत. हे, तुझ्या त्या डोहातनं आलेलं. कस्तुरीमृगाला येणाऱ्या; स्वतःच्याच कस्तुरीच्या गंधासारखं. आणि मी लेखक म्हणून अजून खूप लहान आहे. हे वर्णायला शब्द नाहीत माझ्याकड. किंवा जुन्या शब्दांना नवी चमक द्यायची सिद्धी नाहीये. तुला धुळीविषयी जे वाटतंय ते सांगणारी एकही कविता माझ्याकडं नाहीये. धुळीच्या काळयंत्रात बसून मी; पंधरा-वीसवर्षांपूर्वीच माझा कबुलीजबाब ऐकतोय.

“आणि भात आमटी खाल्ल्या‌शिवाय जाऊ नकोस. आज एकटीचाय मी घरात. तेवढंच करणाराय. जेवताना सोबत होईल तुझी. आणि ते विसरून जा धुळीच्या कवितांचं मला काय अधिकार, तुम्ही हे लिहिलंय हे लिहिलेलं नाही म्हणायचा. मला वाटलं तर मी लिहायला पाहिजे. आणि मी कुठली लिहितीये.”

असं म्हणून आत निघून जातेस. मग मध्ये-मध्ये नुस्ते भांड्यांचे आवाज येत राहतात. कुकरच्या शिट्‌ट्या. आमटीचा दरवळ. मग भाताचा. तू सगळा सरंजाम घेऊन बाहेर येतेस. भातावरचं झाकण काढल्यावर तांबूस वाफ मोकळी होते. भाताच्या वासानं भूक उसळते. मग आमटीचा वास. मग बाळकैरीच्या लोणच्याचा.

“मला कुठं-कुठं सापडली माहितीये धूळ. छप्पर भिंतीला टेकतं तिथं. मी अभ्यासाची वह्यापुस्तकं ठेवते त्या कप्प्याच्या सांदरीत. जिन्यावर, प्रत्येक पायरीच्या आतल्या कोपऱ्यात. पाणी भरत होते तर त्या नळांवर. उंबराच्या पानांवर. आराध्यांच्या कधीही न उघडलेल्या खिडकीच्या जाळीवर, तावदानांवर. पत्र्यावर चढून बघितलं तर आपल्या गल्लीतल्या सगळ्या छपरांवर. पार पन्हाळा-जोतिबापर्यंत सगळीकडं. वारा आला की उडायची, पुन्हा नवीन ठिकाणी जाऊन बसायची. धूळ जागा बदलायची, पण धूळ राहायचीच. मस्त वाटलं मला माहितीयी बघून.”

तुझं हे चाल्लंय धुळीचं,  तेवढ्यात तुझा मावसभाऊ उगवतो. गुलाबी गोरा. सतत हसणारा. त्याचा गुलाबीगोरेपणा मला आवडत नाई. त्याचं सततचं हसू त्या गुलाबीगोरेपणानं मलूल झाल्यासारखं वाटतं. तो त्याच्या हसण्याला विसंगत आवाजात म्हणतो,

“तायडे, आईनं कांदे आणायला सांगितलेत. धा-बारा. पिशवी दे.”

“हात धूऊन देते थांब.”

तू आज जातेस हात धुवायला. धुळीच्या शोधाची आणि आमटी-भाताची मोहिनी पसरून माझी तंद्री लागलीये. तू आतून परततेस. खांबाला टांगलेली पिशवी काढून विचारतेस,

“अरे कुठं गेला हा, पिशवी  दे म्हणाला होता नं.”

माझी तंद्री मोडते. तू पिशवी घेऊन संभ्रमीत चेहऱ्यानं उभारलीयेस.

“माळ्यावर गेला का काय हा.”

जिन्यावर त्याची पावलं वाजतात धाडधाड. त्यांनं चड्डीच्या दोन्ही खिशात कांदे भरलेत. शर्टाची झोळी करून त्यात भरलेत. आणि नुस्ता बनियनवर उभाय. गुलाबी गोऱ्या चेहऱ्यावर तेच मलूल हसू आणि कांदे मिळवल्यामुळं झालेली किंचित विजयी मुद्रा.

“तू माळ्यावर जाऊन कांदे आणलेस? जरा दम धरायचा की. मी आणत होते नं पिशवी. हात धुऊन येईपर्यंत दम नाई तुला.”

“आई म्हणाली लवकर आण. म्हणून गेलो.”

“आणि नाचला असशील माळाभर.”

तो ओशाळं हसतो. तेवढ्यापुरता त्याचं मलूल हसू बदलतं. आणि मग तो पिशवी न घेताच शर्टाच्या झोळीतनं कांदे घेऊन निघून जातो. तू बराच वेळ तो गेला त्या दिशेनं बघत राहतेस मग घाईघाईनं पिशवी टाकून माळ्याच्या जिन्याकडं धावत जातेस. मला वाटतं तुझ्या मागंन जावं किंवा तू खाली येईपर्यंत थांबावं. पण मी नाही थांबत. जेवणाची भांडी उचलून स्वयंपाकघरातल्या कट्‌ट्यावर नेऊन ठेवतो. स्वयंपाकघरात, माळ्यावर पडलेली तुझी पावलं ऐकू येतात. मी तुमचं समोरचं दार झाकून घेतो आणि आमच्या घराकडं वेगानं चालत सुटतो.

धुळीचा अध्याय संपल्यासारखं दुसऱ्यादिवशीपासून तू त्याच्याविषयी काही बोलत नाहीस. माझ्याकडची बाकीची उद्धृतं तशीच राहून जातात. त्यानंतर माझं कधीच तुमच्या माळ्यावर जाणं होत नाही. आमच्या घराच्या गच्चीवर उभारलं की तुमचा लाकडी पट्‌ट्यांच्या गजातनं दिसणारा माळा खुणावत राहतो. कधीतरी त्या गजांच्या रुंद फटींमधनं धूळ उडताना दिसते. मला कल्पनेत, तुझ्या भावानं हुंदडून नाश केलेले तुझ्या पावलांचे ठसे दिसतात. मला हे ही माहीत असतं की आता माळ्यावर कितीही जाड धुळीचा थर बसला आणि त्याच्यावर तुझ्या पावलांचे कितीही ठसे उमटले तरी त्या ठशांमध्ये ते गारुड कधीच असणार नसतं, जे पहिल्यांदा तू बघितलेल्या ठशांमध्ये होतं. तो साक्षात्काराचा क्षण होता तुझ्यासाठी. धुळीच्या स्वागतशील आवारात उमटलेला आणि तुला धुळीचं मंत्रचळ लावणारा. आणि मला तुझ्या गाभ्यातला पोपटी-निळा, पक्व डोह दाखवणारा. मला दिसलेला, पण तुला न दिसलेला डोह.

आपण खूप काळ लांब राहिलो आणि अलीकडं पुन्हा भेटायला लागलो. तू आजही मला बजावण्यासाठी तुझ्या वयाहून पोक्त होतेस. ही सवय नाही बदलली तुझी. तू घर तेव्हाही सांभाळायचीस. पण आता घर वाढवतीयेस. घरातली माणसं वाढवतीयेस. तुझं घरच आता सुसज्जाय. तिथं धुळीला जागा नाही. किंबहुना धुळीला स्थिरावता येईल अशी जमीनच नाही. धुळीला शिरता येईल अशी उघडी कपाटं नाहीत. छपरं टेकणाऱ्या भिंती नाहीत. तुझ्या घराची  फरशी इतकी नितळ आणि तलम,  की तुझ्या पावलांचे ठसे तिथं निमिषार्धही उमटत नसणार. आणि बहुदा तुला हे मनापासून मान्य आहे. आपल्यात आता धुळीविषयी बोलणं घडणं असंभवाय.

त्यावेळी तू धुळीचा विषय संपवलास, पण माझ्याकडं एक उद्धृत अजूनही शिल्लकाय. जे मी माझ्या वर्गांमध्ये खूपदा ऐकवतो. नवीननवीन  तरुण झालेली पोरं दुखरी होतात ते ऐकताना. आता मला असं वाटतंय की मी तुला उगीच ‘स्वरगंगेच्या काठावरती’ ऐकवलं. असली गाणी तुला कधीच आवडली नाहीत. मलाही ते आवडायचं बंद होऊन खूप काळ झाला. ‘अरुण दाते’ नावाचा अपघात झालावता, त्यातनं मी मागेच सावरलो. घड्याच्या तोंडावर स्पिकर ठेवून कसली गाणी लावायचो आपण. आणि तुला आठवत असेल मी ‘स्वरगंगेच्या’ फार नाही लावायचो, ‘अखेरचे येतिल माझ्या’ जास्त लावायचो. नव्हाळीतलं दुखरेपण त्यानं जास्त पिळला जायचा. असो. असे अपघात झाल्याशिवाय परीक्षा कशा होणार आपल्या. तर ते उद्धृत असं होतं.. कवीचं नाव शोधलं.. पण सापडलं नाई. उद्धृत ऐकवायचं ठरवलं आणि बघ धुळीचं काळयंत्र पुन्हा भिरभिरतंय.

पडे है राहतें नक्शे कदम  न छेडो हमे
हम खाकमे  मिल जायेंगे उठाने से|

त्यावेळी  कळत नव्हतं, पण नुक्ता लाऊन म्हटलं.. खाक.. की  छान ऐकू येतं. इतकं  छान की नुस्ता शब्द उच्चारला तरी धुळीचा थर अंथरला जातो आपल्या गल्लीभर, रस्त्यांवर, जिन्यांवर, वाड्याच्या चौकातल्या घडीव दगडी फरशांवर आणि त्यावर तुझी नित्य पावलं उमटायला लागतात. तू पावलांचे ठसे उमटवत नृत्यवत चालत राहतेस. आणि मी, तुझ्या अभिलाषेतून मुक्त झालेला, तुझे ठसे अक्षय राहावेत म्हणून ते आवार उचलतो काळासकट.. आणि उद्धृताच्या शब्दांमध्ये असलेल्या अधांतरात अंथरून टाकतो. मी तुला म्हणालो होतो नं, तिथं कविता असते म्हणून.. त्या अधांतरात. तिथं सहसा कुणाला पोहोचता येत नाही. आणि कुणी पोहोचलंच तर त्याच्या-त्याच्या स्वतंत्र अधांतरात पोहोचतं. तिथं तुझ्या पावलांचे ठसे नसतात. खाक, रजःकण, धूळ.. तिनं माझ्या प्रेमाला अभिलाषेतनं मुक्त केलं. तुला तुझ्या स्वयंभूपणाचे ठसे दाखवले. मला तुझ्या आतला पोपटी-निळा डोह दाखवला. हे दर्शन फार काळ टिकलं नाही. मिटलं किंवा पुसलं गेलं. पण त्याची खूण पटल्यानं काहीतरी साकारलं असणारच की आपल्या आयुष्यात.

आता शेवटच्या उद्धृताची दुसरी ओळ पुन्हा म्हणतो. बघूया वेगळ्या आवाजात ऐकू येती काय..

हम खाकमे  मिल जायेंगे उठाने से|

आज तू तांदळांचा हलका-हलका झाला वाजवत असतीस तर त्या तंद्रीत म्हणाली असतीस..

“पुन्हा म्हण.”

आणि मग मी, शब्दांच्या, कविता असणाऱ्या अधांतरातला  नेमका आवाज ऐकू येईपर्यंत काळाच्या धुळीत ही ओळ पुन्हापुन्हा कोरत राहिलो असतो..

हम खाकमे  मिल जायेंगे उठाने से..

चित्र सौजन्य: ऋचिका खोत

हिमांशू स्मार्त मराठी नाटककार असून कविता, ललित गद्य आणि संशोधनात्मक लेखन करतात. ते ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ येथे अभ्यागत अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत.

3 comments on “माळ्यावरच्या धुळीत: हिमांशू भूषण स्मार्त

  1. Mukta

    माळ्यावरच्या धुळीचा मनाला स्पर्श झाला ..
    अतिशय सुंदर लिखाण.. अस्तित्वात असूनही अस्तित्व नसलेल्या धुळीचं हेच अस्तित्व असावं

    Reply
  2. प्रा.डॉ.सागर लटके-पाटील

    Nice सर

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *