इला माटे

सावली नसलेलं घर



back

१.

आडरानात झुळझुळणाऱ्या पाण्याशेजारी तंबू ठोकलेला. पोर्णिमेची रात्र निवडूनच ट्रेक ठरवलेला. शुभ्र, दुधाळ चांदण्यांनी भारलेला परिसर.. गर्द झाडांच्या मंद्र सावल्यांमध्ये पसरलेली एकांत शांतता. आम्ही तिघंच. अर्ह झोपतच नव्हता. सारखा म्हणत होता, ‘‘मम्मा घरी जाऊया’’. आमच्या तंबूची सावली, जमिनीत ठोकलेल्या खुंटांची सावली, सगळं अद्भुत होतं. वेगळ्याच विश्वात जायला होत होतं. विनूच्या मागे लागून हट्टानं इकडं यायचं ठरवलेलं. खूप कोलाहल थांबवण्यासाठी केलेलं का सगळं? पण असं कुठेतरी शांत जागी येऊन आतला कोलाहल कुठं संपवता येतो? असं काहीतरी मनात घुमत असतानाच अर्ह स्लिपिंग बॅगमधून उठून बसला. मी त्याच्याबरोबर उठून बसले. विनीत मात्र गाढ झोपलेला. अर्ह परत म्हणाला, ‘‘मम्मा आपण तंबूच्या बाहेर झोपू या?’’ ‘‘का रे?’’ आधी तो काहीच बोलला नाही. तंबूतून दिसणारा झाडांवरून निथळणारा चंद्रप्रकाश पहात बसला. झाडांच्या मध्येमध्ये अंधारही पाघळत होता. अंधारात कायम अज्ञात काही असल्याची जाणीव जन्मजात आपल्या जीन्समध्येच मुरलेली असेल का? पण मग हा बाहेर झोपूया का म्हणतोय? उलट तंबूच्या आत याला जास्त सुरक्षित वाटलं पाहिजे. मन आडाखे बांधत होतं. पण अर्हला उचलून घेऊन त्याच्या हट्टाखातर मी स्लिपिंग बॅग तंबूच्या अंगणात टाकली. आम्ही दोघं बाहेर आडवे झालो.

माझ्या मनात अज्ञात अस्तित्वाचा, त्याच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी निर्माण झालेल्या भीती, या गोष्टीचा उगम कुठे झाला असावा असा विचार घोळत राहिला. अर्हनं माझ्या अंगावर हात टाकला. परत पाठीवर झोपत तो म्हणाला, ‘‘मम्मा मला तुझ्या कुशीत पण झोपायचंय पण मला पाठ टेकून झोपलं की बलं वाटतंय. मी अशा उताणा अशतानाच मला कुशीत घे नंऽ. मी त्याला कुशीत घेत त्याचा पा घेतला. पण पुन्हा मनात येत राहिलं, पाठीकडून हल्ला होऊ शकतो म्हणून त्याला उताणं झोपल्यावर सुरक्षित वाटत असेल का? पण त्याला कुशीत सुद्धा झोपायचंय. मनातच हसू फुटलं, पाठीकडूनही सुरक्षित वाटावं म्हणून घर जन्मलं असावं. आर्किटेक्टच्या डोक्यात दुसरं येणार तरी काय? ‘जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी नुसतं काम,’ आजीचं वाक्य डोक्यात घुमलं. घरांच्या प्लॅन्सच्या मोठ्या भेंडोळ्या कागदावर डोकं ठेवून मी कधीतरी तशीच झोपून जायची ते आठवलं. गार वारं आणि संथ लयदार पाण्याचं झुळझुळणं, चंद्रप्रकाशाला वेगळीच जड अशी घनता होती. डोळे जडावायला लागलेच होते की अर्ह परत उठून बसला. आमच्या तंबूच्या सावलीकडे बोट दाखवत म्हणाला, ‘‘मम्मा, अशं सावली पडणारं घर नकोय मला. मम्मा, सावली नसलेलं घर बांध नाऽ.’’ ‘‘बांधेन हं मनू’’ असं म्हणून थोपटत राहिले. घरांच्या भिरभिरत्या सावल्या नजरेसमोर सरकत राहिल्या. प्रत्यक्ष घरांच्या स्थिर सावल्या. जवळपासच्या झाडांमुळे वाऱ्यावर हलणाऱ्या सावल्या घरांच्या स्थिर सावल्यांना हालवून सोडत होत्या.

२.

आदिवासी वाटावी अशी स्त्री डोंगर चढत होती. उभ्या बांध्याची. ताठ अंगकाठीची. डोंगर चढतानाही ती कुठे वाकत नव्हती. उंच डोंगरावर पोहचल्यावर मात्र डोंगर, थोडा सपाट झाला. त्याचा तोरा थोडा बोथटला. थोडासा लेकुरवाळा होत अंतरा अंतरानं चार-सहा छोटे सुळके अवतरले. उंच शिळांच्या मधल्या घळीत त्या स्त्रीनं प्रवेश केला. मोठ्या शिळेतल्या आतल्या बाजूला गुहा होती. कुणाला कळलंही नसतं असं त्या गुहेचं तोंड होतं. मोठ्या, उंच शिळा एकसंध वाटाव्या अशा. सूर्य माथ्यावर होता. मग कलायलाही लागला. पण पहाडात कोरल्यासारखी ती गुहा. तिची मुळी सावलीच पडली नाही. जाग आली. सूर्य डोंगरातून वर येत होता. लाल लाल बुंद. कोवळेपणा लालपणात. माझ्या कुशीत अर्ह गुरफटून झोपलेला. विनीतनं लाकडं, काटक्या पेटवून हंडाभर पाणी आणून उकळत ठेवलेलं. खरपूस वास येत होता. सकाळी सगळं लख्ख होतं. उजेडात दिसणारी आमच्या तंबूची सावली कोवळी पोरसवदा वाटत होती. मनात मात्र दाटत होती सावली नसलेली खोल गुहा. शिळांच्या पसाऱ्यात गडप झालेली ती आदिवासी स्त्री.

अश्मयुगात कुठेतरी गेल्यासारख्या आम्ही उघडयावरच आंघोळी केल्या. हलकं वाटलं. अर्ह उठला. तंबूच्या आत-बाहेर करण्यात त्याला मजा वाटत होती. तो आतून बाहेर यायचा. दरवाजात उभा राहून विचारायचा, ‘‘मी आत येऊ का?’’ मग स्वत:च आत जाऊन म्हणायचा, ‘‘या या. तुमचे स्वागत आहे.’’ मला आणि विनीतला हसू येत होतं. ही संकल्पना कुठून मुरली? आतले लोक, बाहेरचे लोक, आदरातिथ्य, किती छोटा असल्यापासून घराच्या भिंती त्याच्या मनाभवती उभ्या रहात होत्या. कळलंसुद्धा नव्हतं.

३.

दोन-तीन-चार-पाच वेळा सतत बेल वाजतेय. पटकन उठता येईना. अर्धवट जाग आलेली. कुठंय तेच कळेना. शेजारी मुटकुळं करून झोपलेला अर्ह. त्याच्या अंगाखाली हात सापडलाय होय? पाय का लांब करता येत नाहीत? अंग अवघडल्याची जाणीव. मग एकदमच कळलं. अर्हसाठी मागवलेल्या छोट्या तंबूची कालच डिलिव्हरी मिळालीय. वेड्यासारखी अर्हच्या हट्टाखातर अख्खी रात्र त्यातच झोपलेय. परत बेल वाजतेच आहे. उठून उभं राहताना तंबूचं दार कुठंय ते लक्षातच येईना. स्वत: उभं राहताना मग तंबूच उचलला आणि बाजूला ठेवला. पी.व्ही.सी. पाईपचा असल्यानं हलकाय की तंबू हे क्षणात जाणवलं. धावत जाऊन दार उघडलं. विनीत जरा वैतागला होता. “केव्हापासून बेल वाजवतोय. कालच मेसेज टाकलेला लॅच की विसरलोय. पहाटे लवकर पोहचेन म्हणून.” “सॉरी यार. अर्हच्या तंबूत झोपल्यामुळे नीट झोपच नाही लागली.” “सो फायनली गॉट द डिलिव्हरी यस्टरडे?” तिनं मागे वळून उत्साहात सांगितलं. “येस! इटस्‌ व्हेरी हॅण्डी टेन्ट. ही लव्हड इट”. विनीत बूट काढत होता. तिनं किचनमध्ये जाताना विचारलं, “यू वॉन्ट कॉफी?”. विनीतनं गिझरचं बटण ऑन करत सांगितलं “येस ऑफकोर्स” ती कॉफी करत असताना त्यानं डायनिंग टेबलवर एक बिल्डिंग प्लॅन ठेवला. तिनं मागे न वळताच विचारलं, “डीड यू लाईक अग्रवाल्स साईट?”. विनीत खूष होत म्हणाला, “लाईकड्‌? अरेऽ लव्हड्‌ इट”. ती गडबडीनं खूष होऊन मागे वळली. ‘‘ते काम मिळालं म्हणतोस?’’ दोन्ही कॉफी मग्ज तिनं टेबलवर ठेवले. उत्साहानं विचारायला लागली. ‘‘पूर्ण बिल्डिंगचं काम मिळाल?’’ “येस्‌ऽ व्होल फॉरेस्ट ट्रेल.. सगळ्या फ्लॅट धारकांनी एकमतानं काम आपल्याला दिलं.” तिनं जागच्या जागी उडीच मारली. ‘‘किती फ्लॅटस आहेत?’’दहा फ्लॅटस् एका बिल्डिंगमध्ये आणि प्रत्येक मजल्यावर एकच फ्लॅट.’’ त्यांनं उत्तर दिलं. तिनं खुशीनं दोन-तीन गिरक्या मारल्या. तिच्या छोट्याशा चणीकडे त्याचं लक्ष गेलं. त्यानं तिला मिठीत घेतलं. लाडीगोडी लावत म्हणाला, ‘‘मितू, डोंट ओपन द डोर व्हेनेव्हर यू आर वेअरिंग शॉर्टस्‌”. ती हळुवार म्हणाली, ‘‘कमॉन विनीत’’. विनीत लाडीगोडी लावत म्हणाला, “प्लीज, अॅटलिस्ट मी टाऊनमध्ये नसेन तेव्हा. इटस् फॉर सेफ्टी बेबी. फेमिनिझमची तलवार उपसू नको प्लीज,’’ ‘‘विनू तू लहानपणी असा नव्हतास.’’ ‘‘लहानपणी तू पण एवढी सेक्सी नव्हतीस. तुला आठवतं शेताकडच्या गावाकडच्या घराच्या मधल्या खोलीत आपण घर-घर खेळायचो?” तिला हसू आलं. ‘‘कशी विसरेन?’’

दोघंही बोलत बोलत टेरेसवर पोचली. ‘‘तू हट्ट करून आला होतास आमच्याबरोबर ‘‘कॉटच्या खाली घर आणि सगळ्यांच्या बॅग्ज वापरून केलेलं कुंपण,’’ ‘‘मला छोटीशी झोपडी हवी होती आणि तुला मोठ्ठे मॅन्शन,’’ ‘‘मग काय, दोन्ही कपाटांच्यामध्ये चादरीची स्लॅब टाकून तू घराचा हॉल बनवलेलास. मी घरातले सात-आठ मोठे बसायचे पाट एकावर एक मांडून वरच्या मजल्यावर जायचा गोल जिना बनवलेला.’’ “तो जिना इपिक होता,’’ विनीत म्हणाला. त्या दोघांच्या जोरात हसण्यानं अर्ह उठला होता. त्यानं पांघरूण पोटाशी धरून बाबाला खेचायला सुरूवात केलेली. ‘‘बाबा माझ्या टेंटमध्ये बसून कॉफी पी. तुला माहित्ये? मी आणि मम्मा काल टेंटमध्येच झोपलोऽ’’. विनीत छोट्याशा टेंटमध्ये मावेचना. टेंटच्या दरवाजात बसून कॉफी पीत असतानाच अर्ह कॉटवर उभा राहिला. काहीच न बोलता पाहत राहिला. मग बऱ्याच निरीक्षणानंतर म्हणाला, ‘‘बाबा, घरी आणलेल्या टेंटची सावली पडतेच.’’ विनीत काहीच न कळून माझ्याकडे पाहायला लागला. मी हसत म्हटलं, “अर्हनं आपल्याला चॅलेंज दिलंय.’’ विनीत प्रश्नार्थक पहात राहिला. मग मीच सस्पेन्स मोडत म्हटलं, ‘‘सावली नसलेलं घर बांधायचं.’’

४.

उंच, गर्द, प्रचंड झाडाचा प्रचंड पसारा. ती इवलीशी झाडाच्या पायथ्याशी. उंचावरून खाली हेलकावे घेणारी शिडी. सुतळीनं बांधलेली. रंगकामाला घरी येणारा प्रताप. उंच झाडावरच्या झोपडीत बसून तिला हाक मारत होता. अस्पष्टशी तिला हाक ऐकू येत होती. ‘‘बेबीऽ  घाबरू नगंस, चढ शिडीवर.’’ अश्रू गालावर सुकलेले. हिंदकळणाऱ्या शिडीवर पाय ठेवत मनाचा हिय्या करून ती चार-पाच पायऱ्या चढली. मग मात्र खाली बघितल्यावर भोवळ यायला लागली. हात निसटला. पुन्हा पकडला. सुबकशी, बांबूनी बांधलेली, ऐसपैस टुमदार झोपडी उंच झाडाच्या बेचक्यातून खिजवत हसत होती. शिडीला असलेल्या सुंभाचा दोरखंड हातातून निसटताना, दाट काळ्या सावलीत ती झोपड़ी दिसतच नव्हती. खूप अजस्र झाडाच्या सावलीत झोपडीची इवली सावली कशी वेगळी दिसणार? झाडाच्या मुळात मिसळून गेलेली सावली आणि डोक्याला खोक पडल्यानं हरपलेली तिची शुद्ध, अथांग सावळी शुद्ध. विराट झाडांच्या पसाऱ्यात सामावलेली. कुठलाच प्रवास नसलेली शुद्ध. नीरव कशातनं तरी बाहेर पडल्यासारखं. मुक्त. काही वाटण्याच्या सुद्धा पलीकडचं. शुद्ध परत आली तेव्हा  म्लानसे डोळे उघडले. डोळ्यासमोर झाडांच्या फांद्यांमध्ये उंचावर टुमदार दिसणारं झोपडीवजा घर दिसलं. शुद्ध हरपण्याआधी दिसत होतं तसंच. लांब कुठेतरी जाऊन परत आपल्या आपल्या घरी आल्यासारखं वाटत होतं. आजीच्या मांडीत डोकं होतं. हात हलवता आला. असं वाटलं, खरंच घरी आलोय. आजी तोंडानं काही स्तोत्र पुटपुटत होती. तिनं डोळे उघडून पाहताच आजीच्या डोळ्यातले दोन अश्रू तिच्या गालावर टपकन् पडलेले जाणवले. आजीच्या डोळ्यात समईची ज्योत तेवत होती. स्निग्ध, शांत, सुरक्षित. खूप दिवस मग, तिला खोक कशी पडली, प्रतापच्या ट्री हाउसमध्ये जाण्यासाठी चढताना ती शिडीवरून कशी पडली, प्रतापकडे त्या झाडावरच्या घरात जाण्यासाठी तिनं कसा हट्ट धरला, याच्या गोष्टी कुणीना कुणी सांगत राहायचं. आजीनं ती मरणापर्यंत पोहचून परत आल्याबद्दल घरी रूद्र सांगितला होता. अकरा गुरुजी येऊन एक लय आवाजात रूद्र म्हणत होते. तिनं आजीला विचारलं, ‘‘रूद्र कुठल्या देवासाठी म्हणतात गं आजी?’’ ‘‘शंकर’’ आजीनं तुटक उत्तर दिलं. आजी ‘‘शंकर भोळा असतो ना गं?’’ आजी ‘‘हो” म्हणाली, पण ती गुरूजींसाठी प्रसाद बनवण्याच्या तयारीत मग्न होती. ‘‘आजी शंकर कुठे राहतो?’’ तिनं पुढे चालूच ठेवलं, ‘‘मितू, नंतर सांगीन हं बाळा.’’ ‘‘नाही आजी मला अत्ताच सांग.’’ ‘‘कैलासावर बर्फामध्ये त्याचं घर आहे.’’ ‘‘आजी त्याचं घर बर्फाचं आहे?’’ मितू माहीत नाही गं राणीऽ खेळ जा बरं तू.. मला खूप काम आहे.’’

यथासांग रूद्र पार पडला. थोड्याशा श्रमानंही मितू. खूप थकली होती. डोक्याला खोक पडल्यापासून अशक्तपणा अंगात. पडवीमध्ये आजीच्या मांडीवर डोकं ठेवून ती आडवी झालेली. आजी तिच्या बांधलेल्या जखमेवरून हळूवार हात फिरवत होती. मितू अर्धवट झोपेत सांगत होती. ‘‘आजी मला वाटतं शंकर प्रतापच्या ट्री हाऊसमध्येच राहत असेल. खूप उंच आहे गं ते. अगदी कैलास पर्वताएवढं. बर्फाचं घर कसं असेल गं शंकराची? तू म्हणालेलीस कैलासपर्वत खूप उंच आहे. त्याच्याहून वरती काहीच नाही. फक्त सूर्य असेल नाही कैलासपर्वताच्यासुध्दा वर? आजी, पांढरा पांढरा शुभ्र असतो नाही बर्फ? शुभ्र बर्फाच्या घराची सावली..” शेवटचे शब्द झोपेमध्ये विरून गेले.

५.

फॉरेस्ट ट्रेलकडे जाणारा रस्ता संपतच नव्हता. दोन वर्ष तरी काम चालणार. मोठं काम मिळालंय. डिझाईन तयार करायची होती. साईट जरा बारकाईनं पाहायलाच हवीय. बिल्डींग चहूबाजूंनी पाहिली तरी अशी टोलेजंग दिसायला नकोय. निसर्गाचं स्केल बिल्डींगपेक्षा मोठं दिसायला हवं. मग तसं वाटण्यासाठी प्रत्यक्ष साईट बघायलाच हवी. माझ्याच डोळ्यांनी. विनीतच्या डोळ्यांनी पाहून कसं चालेल? कागदावरती नुसता प्लॅन करणं वेगळं. विनीतला का हे पटत नाहीये कुणास ठाऊक. आजच नेमक्या अर्हला सांभाळणाऱ्या मावशींनी दांडी मारावी नाऽ. निघताना सगळं स्वयंपाकघर बरोबर घ्यावं लागतं अर्हला कुठं न्यायचं म्हणजे! बॅग उचलत तिनं अर्हला सॅण्डल्स घालायला सांगितल्या. त्याला बक्कल लावताच येईना. गडबडीत आणखी गडबड. तिनं खाली बसून त्याच्या सॅण्डल्सची बक्कल लावली. त्याला हसू आलं. ‘‘मम्मा तू माझ्यापेक्षा छोटीशी झालीस.’’ तिला हसू आलेलं. डोक्यात चालणारी उलट सुलट चक्र थांबली.

सिटबेल्ट लावलेला अर्ह सिटबेल्टवरच डोकं रेलून झोपून गेलेला. याच्याकडे पाहिलं की सगळी डोक्यातली चक्र थांबतात. निरागस असा झोपलेला पाहिलं की खूप वणवण करून घरी आल्यावर कसं शांत वाटतं, तस्संच वाटतं. खूप दाट झाडी मागे पडत चालली.

अग्रवाल्स फॉरेस्ट ट्रेल असा मोठा बोर्ड एका उंच झाडाला ठोकलेला. पांढरा बुंधा असलेलं निलगिरीचं झाड होतं बहुतेक. खूप झाडी होती. मोठे मोठे वृक्षच होते. काही भाग उतरता होता आणि काही सपाट. मागे गर्द झाडांनी गजबजलेलं उंच तरीही आडवं पसरलेलं डोंगराचं टोक. कलप्पानं फिरुन साईट दाखवायला सुरूवात केली. मनात सारखं येतंय, इतके उंच वृक्ष, इतक्या वर्षांची त्यांची स्वत:ची जागा, आपण सगळं उद्ध्वस्त करणार. उद्ध्वस्त करण्याच्या पापाचे आपणही भागीदार. कितीक वर्षं या वृक्षांनी आपला पाया पक्का केला असणार. मुळांचा केवढा पसारा अनेक फूट आतवर विणला असणार. माझी तंद्री मोडत अर्ह म्हणाला, ‘‘मम्मा, आपण इकडेच कुठेतरी आलेलो ना जंगलात टेंटमध्ये रहायला?’’ नुसतं ‘हं’ म्हटलं तरी त्याचे प्रश्न संपेचनात. ‘‘कुणाचं घर बांधायचंय गं? ‘‘अर्ह, आपण घरं बांधायची मग लोक कोण येणार हे ठरणार.’’ त्यानं पुढे चालूच ठेवलं, ‘‘असं का? ज्याला रहायचंय तो ठरवेल ना त्याला कसं घर हवंय?’’ आपण लोकांना आवडेल असंच घर बनवायचं ना मग प्रश्न कुठे येतो?’’ ‘‘पण तुला कसं कळेल त्यांना काय आवडेल?’’ ‘‘कळेल रे,’’ मी जरा वैतागून म्हटलं.

माझ्या वैतागलेल्या स्वरामुळे अर्ह थोडावेळ गप्पपणे माझ्या बरोबर चालत राहिला. त्याच्या चिमुकल्या डोक्यात काय सुरू होतं कुणास ठाऊक. मला मात्र प्रचंड वृक्षांचे सनातन असे पसारे मोहवत होते. विषण्ण करणारं काहीतरी मनाला वेढत होतं. नजरेसमोर लहानपणची गोष्टच सरकत होती. ध्रुवचे डोळे अपमानानं भरून आले होते. तो आपल्या आईला सांगत होता, ‘जिथून कुणी उठवणार नाही अशी माझी जागा मी शोधेन’. अख्ख्या पृथ्वीवर त्याला अशी जागा नाहीच मिळू शकली. उत्तरेकडच्या एका अनेक प्रकाशवर्ष दूर ताऱ्यावर मिळालेली जमीन घेऊन ध्रुव त्या एकांतात जळत राहिला. माणसांच्या अनेक पिढया पाहिलेल्या या झाडांना मी त्यांच्या हक्काच्या घरातून खस्सकन् ओढून टाकून देणारे. खूप खूप अपराधीपण वेढत होतं. झाडं अबोल झाल्यासारखी वाटत होती. त्यांनी स्वत:ला आक्रसून घेतलेलं. माझं मनातलं बोलणं ती ऐकत असावीत का? की मलाच भास होतोय? अर्ह मात्र परत माझा टी शर्ट ओढत होता, मी ‘काय?’  असं खुणेनंच विचारलं तर तो म्हणाला, ‘‘मम्मा, तू लोकांना आवडेल असं घर बनवशील पण एका माणसाला आवडलेलं घर दुसऱ्याला नाही आवडलं तर?’’ विषय पुढे सरकू नये म्हणून मग मी म्हटल, ‘‘हो रेऽ खरंच की, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं.’’ अर्हला माझ्याबरोबर कंटाळल्यासारखं झालं. तो कल्लप्पाबरोबर एक काठी गरगर फिरवत चालायला लागला.

मला एका जागी थोडं थांबावं वाटलं. खूप मोठ्ठं शिरीषाचं झाड होतं आणि त्या शेजारी खूपच घमघमत्या वासाचं खूप पसरलेलं कसलं झाड होतं कुणास ठाऊक. त्या झाडाच्या अंगावरून हात फिरवत तशीच उभी राहिलेय. विदग्ध मनाच्या नेणीव वेटोळ्यांत फक्त त्या घमघमणाऱ्या झाडाचा रानस वास सामावत राहिला. मी त्याला मिठी मारली. घट्ट. शिकाऱ्यानं सावजाला तू मला माफ कर असं म्हणत मारण्यासारखं वाटलं. सर्रकन एक सरडा खालच्या फांदीवर आला. बाजूला झाले त्या झाडापासून. सरपटणारा तो जीव माझ्याकडे एकटक पाहू लागला. पाहता पाहता त्याचा रंग खोडासारखा गहिरा काळपट व्हायला लागला. खोडाच्या भव्य पसाऱ्यात तो ओळखू येईनासा झाला. तो खोडच बनला. मनात येऊन गेलं. मी बनवेन ती घरं, क्षणात जंगल, वाटली पाहिजेत. आपल्याला आपल्या घरात रूपांतरीत होता आलं पाहिजे. माझ्या घरांना स्वत:ला या जंगलात बदलता आलं पाहिजे. त्यांना त्यांची स्वत:ची सावली असता कामा नये. अर्ह म्हणतो तेच खरं.

अर्ह कलप्पाशी बोलत बराच लांब गेलेला दिसत होता. जंगलातली पायवाट अथांग वाटत होती. अर्हची दूर दिसणारी छोटीशी पाठमोरी मूर्ती. पायवाटेचं माणसाळलेपण अर्हच्या दुराव्यामुळे एकदम कमी झालं. पायवाट जंगलीच जास्त वाटायला लागली. झपाझप अंतर कापत अर्हकडे जावंसं वाटलं. त्याला घेऊन निबिड भागातून पटकन् निघून घरी जावंसं वाटायला लागलं. मध्येच वाटत राहिलं आपण घर बांधण्याइतके सिव्हिलाइज्ड का झालो? का नाही आपल्या बच्चाला घेऊन मला एखाद्या झाडाखाली राहता येत? इतक्या झाडांच्या संगतीत मात्र मला माझ्या वंशाचे दिसत होते फक्त अर्ह आणि कल्लप्पा. दूर जाणारे. मला ते अंतर कापायचं होतं. मला ते लगेच भेटायला हवे होते. मगच माझा जीव भांड्यात पडणार होता. माझ्यासारख्यांच्यात राहणं म्हणजे त्यांच्यातच माझं घर शोधणं का? जिथे जे असेल त्यात विना सावलीचं मला विरघळताच येत नाही. माझी सावली ताठरपणे माझा पाठलाग करत राहते.

६.

ताठ चालणारी आदिवासी बाई पाठमोरी दिसत होती. पाहता पाहता ती आड बाजूच्या झऱ्याजवळ थांबली. खडकांवर पाय रोवत ती उकिडवी बसली. हाताची ओंजळ करत तिनं फसाफस पाणी चेहऱ्यावर मारलं. इतक्या वेळ लक्षात आलं नव्हतं. तिनं पोटाशी बांधलेलं तान्हं तिनं मांडीवर घेतलं. एक पाय गुडघ्यात दुमडून उभा आणि एक मांडी आडवी असं खडकावर बसत तिनं पदर बाजूला सारला. स्तनाची बोथी तान्ह्याच्या पातळ ओठात तिनं सरकवली. मुकाट लुचून झाल्यावर तान्हयानं तिच्या पदराशी चाळा सुरू केला. घटकाभर ती तिथे खडकावरच विसावली. तापत्या उन्हात काळ्या खडकांच्या ओबडधोबड पृष्ठभागावर तशीच सहज बसून राहिली. पटकन् एका फडक्यात साठल्या पाण्याच्या काठाजवळ आलेला खेकडा तिनं पकडला. मजा म्हणून त्याचं पोट उघडून आत रांगणारी बाळं तिनं पाहून घेतली. खेकड्याला फडक्यात बांधून आपल्या चंचीत टाकून कमरेला बांधलं. तान्हयाला छातीजवळ एका मळक्या फडक्यानं बांधलं आणि गुडघ्यात पाय न मोडता ताठ पावलं टाकत ती चालत राहिली. गर्द झाडीजवळ जाताच तिचं चालणं पाठीमागून ताठ भासेना. सहज झाडांमध्ये ती विरून गेली.

अग्रवालच्या फोननं जागं केलं. दोन दिवसात तो प्लॅन बघायला मागत होता. अजून कशाचाच पत्ता नव्हता. कागदावर, कॉम्प्युटरवर, डोक्यात कुठेच ती घरं आकार घेत नव्हती. अग्रवाल फ्लॅटस्ची संख्या कमी करायला तयार होणार नाही. फ्लॅटसचे स्क्वेअर फीटसुध्दा कमी होऊ देणार नाही. रानस. घमघमणारं झाड नजरेसमोरून हलत नव्हतं. ट्री हाऊसचा पर्याय अग्रवाल कदापि स्वीकारणार नाही. घर या संस्थेवरचा माझा विश्वास सिद्ध करण्यासाठी त्या घमघमणाऱ्या आदिम पूर्वजाला चिलया बाळासारखं बळी द्यावं लागणार. दहा मजल्यांची उंच इमारत मागच्या डोंगराशी चुरस करत खालच्या उतारावरच्या झाडांना खिजवत नाकावर टिच्चून उभी राहणार होती. हे सगळे बदलण्यासाठी माझ्या डोक्याचा भुगा पाडणं मी चालूच ठेवलं होतं. अर्हनं मागितलेलं सावली नसणारं घरच या जंगलात विरघळायला हवं होतं. दोनच दिवसांचा अवधी टिकटिकतोय. घमघमणारा रानस वास शरीरात जंगल निर्माण करतोय. मागचा डोंगर झाकला जाणार नाही आणि माझा रानस,घमघमणारा पूर्वज वाचला पाहिजे. अजूनही काही भव्य वृक्ष वाचवण्याचा मार्ग सुचला, अग्रवाल पण खूश आणि मी पण, असं काहीतरी सुचतंय असं वाटायला लागलं. रात्रीचा एक वाजला होता. भराभर कॉम्प्युटरवर ड्रॉईंग्ज काढत होते. माझं घर आजूबाजूला शांत झोपलेलं.

७.

ऊन ऊन पाण्यानं आंघोळ करून ती खोलीत आली. बाथरूममध्ये वाफांची वलयं तरंगत होती. तिनं खोलीच्या दरवाजाची कडी सरकवली. अंग टिपून ती लाकडी कपाटाच्या आरशात स्वत:ला निरखत होती. आजी दोन तीनदा हाक मारून गेली होती. पण आज तिला सावकाश सगळं आवरायचं होतं. आपल्या वाड्यातल्या या खोलीलाच आतून न्हाणीकडे जायचा रस्ता. सगळ शिसवी, दगडी. किती सुंदर आहे हे आरशाचं कपाट! आरशाच्या कपाटावरून ती हात फिरवत राहिली. वाड्यातली कुठलीच खोली भाड्यानं दिली नाहीये ते किती बरंय. सगळ्य़ा सोप्यातून माझंच फक्त खेळणं. सगळा वाडा घरातल्या या एकाच खोलीत एकवटलाय असं तिला वाटलं. नाहीतरी मी जिथे आहे तिथंच सगळं घर असतं असं आजी म्हणतेच. आई-बाबा एका पाठोपाठ गेल्यावर आजी, मी, ताई आणि आजोबा असंच झालं आमचं घर. वाडयाच्या मधल्या सोप्यामध्ये आईचं कलेवर ठेवलेलं असं ताईला कायमच आठवत असतं. दंगा असतो तो माझाच. ताई गप्पच झाली. तिची खोली आणि ती. बाबा शेतावर गेलेले आणि परत आलेच नाहीत म्हणे. शेतावरतीच त्यांना काही चावलं म्हणतात तर कुणी म्हणतात शंकर म्हणून त्यांचा दुरचा चुलत भाऊ आहे त्यानं त्यांना मारलं. त्याला शेत हडपायचं होतं. आजीच्या बोलण्यात बऱ्याचदा येतं की त्याला आणखी सुद्धा काय काय हवं होतं. पण नाही मिळू शकलं. ते त्याला काय हवं होतं कुणास ठाऊक. आईनं म्हणे बाबा गेल्यावर त्यांच्या पंधराव्याला याच न्हाणीघर जोडून असलेल्या खोलीतच आत्महत्या केली असं म्हणतात.  आरशासमोर उभं राहिल्यावर कुणी कुणी बोललेलं आठवतच राहिलंय. मरण्या अगोदर आईनं याच आरशात बघितलं असेल का? मी आईसारखी दिसते असं सगळेच म्हणतात. ताईला आई आठवते तशी मला आठवत नाही. विनूशी जशी मी खेळते तशी ताई खेळत नाही. ‘ताई असून नसून सारखीच. घराला चैतन्य आहे ते एकटया मितूमुळे,’ आजी सारखीच म्हणते. घरातल्या भिंतीना, विशेषतः या आरशाला हात लावला की वाटतं आईनं या कपाटाला हात लावला असेल. घर स्वत:च चैतन्य असतं की किती किती लोकांचे स्पर्श घेऊन जिवंत असं. पुढे होऊन आरशातल्या माझ्यावरून हात फिरवायला कशी लागले मी? हात थांबला.  दरवाजा खाडकन् उघडला. मितूऽ इथेतरी आहेस,’ असं म्हणत विनू आत शिरला. त्याचं वाक्य अर्धवट राहिलं. तो बघतच राहिला. मितूला धरणी पोटात घेईल तर बरं असं वाटत राहिलं. ती टॉवेल गुंडाळायला शोधायला लागली. तो शोधण्यासाठीची हालचालसुद्धा तिला करवेना. तिनं उकिडवं बसत दोन्ही पाय पोटाशी घेऊन दोन्ही हातांनी गुडघे आवळले. भानावर येत विनू आल्या पावली उलटा निघून गेला.

८.

अग्रवालांना आज भेटायला जायचंय. सुचेल ते ड्रॉईंग बनवलंय पण अग्रवालची काय प्रतिक्रिया असेल? विचारांच्या तंद्रीत असल्यामुळे की काय कुणास ठाऊक पण आरशात केसांवरून ब्रश फिरवणारा हात तसाच थांबला. अर्ह दरवाजात उभा होता. मला आरशात पहात होता. माझं त्याच्याकडे लक्ष जाताच धावत आत येऊन त्यानं मला मागून मिठी मारली. ‘मम्मा, एक सांगू? फिश टँक मधल्या कासवानं काल किनई त्याचे पाय आणि मान त्याच्या पाठीच्या आत घेतले. बाबा म्हणाला कासवाचं घर त्याच्या पाठीच्या आतच असतं. कसं काय गं मम्मा? पण मला आवडलं माहित्ये? मी पण बाबाच्या मोठ्या टी शर्टमध्ये लपून पाहिलं मान आत घेऊन. मला वाटलं माझे कपडेच माझं घर आहेत. आहे किनई मजा!’’ मला खूप हसू येतंय. अर्हनं त्याच्या इवल्याशा हातानी माझे डोळे झाकले. मग म्हणाला, ‘‘आज किनई मम्मा आमच्या शाळेत टिचरनी एक गेम घेतला. एकमेकांचे डोळे झाकायचे. मग टिचर म्हणाल्या, तुमच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर खूप काय काय येईल. पण एक असं चित्र येईल जे थोड्यावेळेसाठी तसंच राहील. ते चित्र आम्ही काढायचं होतं.’’ मला नवल वाटतंय हा वेगळाच खेळ ऐकून मी विचारलं, ‘‘मग चित्र काढल्यावर काय?’’ ‘‘ते ज्यानं डोळे झाकलेत त्यानं ओळखायचं. झालंऽ’’ मलासुद्धा हा खेळ खेळून पाहावासा वाटतोय. मीसुध्दा डोळे मिटले. आजी, अप्पा, ताई, आई-बाबांचा फोटो, विनीत, अर्ह, माझी मैत्रीण बेला, अशी कोण कोण दिसत गेली. बाबांचा दुष्ट चुलत भाऊसुध्दा नजरेसमोरून सरकून गेला. मध्ये काही काळापुरता आमचा वाडा नजरेसमोर स्थिर झाला. सगळा वाडा मी आतून फिरून बघितला. आईची ती खोली, तो आरसा नजरेसमोर बराच वेळ स्थिर झाला. मग मात्र मी डोळे उघडले. अग्रवाल माझं नक्की ऐकणार आहे. वाडाच बांधायचा. प्रत्येक मजला स्वतंत्र कुटुंबासाठी. मधलं अंगण सगळ्यांना सारखं. ‘सी’ आकाराचे दोन तुकडे जोडून गोल तयार होतो. मधला गोल सोपा म्हणून सगळ्यांसाठीच. माझा रानस घमघमणारा पूर्वज त्याच्या अपरंपार शाखा घेऊन मध्ये उभा असेल. त्याच्या खोडावर कुऱ्हाड चालवून ठळक विद्रूप सावली पडणारं घर मला बनवायचं नाही. मला पूर्वजांच्या सावलीत मिसळून जाणारं, अंगातलं जंगल जपणारं घर बांधायचंय.

अंगातलं जंगल जपणारं घर या वाक्याबरोबर पुन्हा ती भिल्ल स्त्री नजरेसमोर उभी राहिली. खरोखर अंगावर पिणारं मूल ती रानोमाळ घेऊन भटकत होती. तिचं सारखं सारखं स्वप्नात दिसणं, तिचं असुंदर काळं कुळकुळीत असणं मला ओढून घेत होतं. तिचं नाक जवळपास चपटं होतं. मूल म्हणजे जणू अख्खं घर विंचवासारखं पाठीवर घेऊन ती फिरत होती. खूप आठवलं तरी मला का आठवत नाहीये? ही का दिसते मला? हिला कुठे पाहिलंय मी? काहीच आठवेना. एवढंच कळत होतं, हिचं मला आकर्षण वाटतंय. मनातल्या मनात मी मजेखातर तिचं नाव दुंडव्वा ठेवलं. अनेकदा विनूला मी म्हणायची ‘‘काय भारी असेल ना मुक्त मोकळं जंगलभर भटकत राहणं? ट्रेकिंगचं भूत माझ्या डोक्यावर कायम बसलेलं असतं ते त्यामुळेच.’’ विनू हसून म्हणालेला, “सोपं नाहीये. गरजा शून्याच्या बरोबर असाव्या लागतात असं जगायला. खरं सांगूऽ तसं जिनॅटिकलीच शरीर घडावं लागतं ऊन पाऊस सोसून मोकळ्या आभाळाखाली राहणारं. छप्पर नसणारं. अखंड जंगल अंगावर पांघरता आलं पाहिजे. अंगात मुरलं पाहिजे.” विनीत कायम गोव्याला गेला की हसायचा. टॅनिंग करून घेणाऱ्या गौरांगना पाहून म्हणायचा, “काय सुचतं नाही एकेकाला. पिकतं तिथं विकत नाही.” पण पुन्हा पुन्हा वाटतंय स्वप्नात दिसणाऱ्या तिच्याकडे पाहत रहावं. माझं शरीर तिच्यासारखं व्हावं. मातीत, जंगलात मिसळू शकणारं. अप्रूप वाटत राहतंय. आसुसून भेटावं वाटतंय तिला.

९.

बघता बघता काळीसावळी तजेलदार दुंडव्वा गर्द रानात शिरली. सुरंगीची फुलं तिनं खुडली. त्याच्याच चीकानं ते फूल तिनं नाकपुडीवर डकवलं. तिच्या अंगोपांगातून घमघमणा रानस सुगंध सगळ्या जंगलभर पसरलेला. जंगलातला अजस्त्र पसरलेला पर्वताएवढा पूर्वज आपल्या मुळ्या शोधत जमीनीच्या आतवर जात होता. जसजसा तो आत खोल जात होता तसा त्याचा अनवट सुगंध आणखीन पसरत होता. त्या दुंडव्वानं चपळपणे त्या वृक्षावर चढायला सुरुवात केली. फांद्यांच्या पसाऱ्यात ती मधून मधून दिसत होती. तिचं काळंसावळं घोटीव शरीर हळूहळू त्या वृक्षाच्या फांद्यांमध्ये विरत जायला लागतंय. तिचं अस्तित्व विरघळत चाललंय हे स्पष्टच जाणवत होतं. स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव होत जाग आली. क्षणभर जाग आल्यावरसुद्धा वाटत होतं माझंही शरीर वितळतंय. वितळणाऱ्या माझ्या शरीराचा उन्हेरी रंगाचा ओहळ वहात मिसळत जातोय माझ्या वाड्याच्या सावलीत. वाड्याच्या भिंतीवर उन्हेरी रंग चढतोय. माझ्या आईच्या सौंदर्याच्या अनेक गोष्टी शिसवी लाकडाच्या कपाटावर गंधलेपन केल्यासारख्या वाटत होत्या. माझ्या अस्तित्वाचा उन्हेरी रंग त्या आरशावरही चढत होता. आरसा असलेल्या खोलीतल्या तुळईकडे मान उंचावून पाहिलं. काहीतरी हेलकावतंय असं वाटत राहिलं. अर्धवट जाग आणि अर्धवट झोप यातून स्पष्टपणे पडलेल्या विचित्र स्वप्नाची जाणीव झाली. खडखडीत जाग आली.

जाग आल्यावर पुन्हा वाटलं. एकटीनंच परत अग्रवालची साईट पहायला जावं. काहीतरी माझ्या नजरेतून सुटतंय असंच वाटतंय. विनीतला पटायचं नाहीच पण तरीही. मी तिथे गेले तर मला नवीन काहीतरी सुचेल. मी घाईनं छोटीशी हॅण्डबॅग कधी भरायला लागले कळलंसुद्धा नाही. विनीतला फोन करून अर्हला डे केअरमधून घेऊन यायला सांगितलं. मेंदू किती पटपट कामं करतो. फक्त ती बाई जिला मी दुंडव्वा नाव दिलंय ती मला कुठे दिसली असावी हे मात्र आठवत नाहीये. कुठेतरी दिसल्याशिवाय ती इतक्या स्पष्टपणे, इतक्या बारकाव्यानिशी माझ्या स्वप्नात येणार नाही. गाडी भरधाव सोडली. साईटवर पोहोचले. कल्लप्पा बरोबरीनं छोटी काठी गोलाकार फिरवत चालत होता. मी माझे बूट निसटणार नाहीत अशी काळजी घेत काटे, काटक्या तुडवत होते. ‘‘कल्लप्पा आपली जागा कुठं संपते?’’ ‘‘दूर आहे ताई.’’ ‘‘मला तिथंपर्यंत घेऊन चला.’’ वाट सरत नव्हती. उभा कातळ दिसू लागला. कातळांच्या उभ्या मोठ्या मोठ्या भिंती, त्याचे पापुद्रे काढले तर कितीतरी वर्षं लागतील असं वाटायला लावणारे. सनातन. एकदम कातळात उंचावर काही हलल्यासारखं वाटलं. मला उन्हामुळे आधीच काही नीट दिसत नहतं. पण काहीतरी हालचाल जाणवताच मी कल्लपाला हातानं इशारा केला. दोघंही थांबलो. डोळ्यांच्यावर हाताचं छप्पर करून उन्ह अडवत मी पाहिलं तर खुद्द दुंडव्वा एका कपारीत बसली होती. अर्धवट उन्मळून पडलेल्या झाडाच्या ओंडक्यावर केशरट रंगाच्या जंगली मुंग्यांनी गर्दी केलेली. ओंडक्याच्या मधल्या रेषांमधून त्या फिरत होत्या. अख्खा वासा पोखरल्यासारखा झालेला. तिला आमची चाहूल लागताच तिनं थोड्या मुंग्या ओरबाडून मुठीत दाबल्या. उंच उंच कातळांमध्ये ती दिसेनाशी झाली. मी तिचा अभावितपणे पाठलाग करायचा प्रयत्न करू लागले तर कल्लप्पानं मला अडवले. ‘‘ते खुळं येडं हाय ताई, टाकलेली बाईल आहे. तुमी नगा कामाचा इस्कोट करूसा. असंच फिरत असतीय. मागच्या येळंला तुमी आला होतासा तवा पण हितं फिरत हुती. तुमी बगत न्हाईसा बगून तुमचं त्वांड निरखत ऱ्हायलली.’’ मला कल्लप्पाचं बोलणं ऐकून वाटलं मला ती दिसलेली हे खरंच होतं. पण कदाचित मी तिला प्रत्यक्ष पाहण्याआधी मनात तिच्या निर्भर आयुष्याचं चित्र रंगवलं होतं. तिला प्रत्यक्ष पाहिल्यावर तिचं दिसणं तिच्या प्रतिमेला जोडलं गेलं. परतीच्या वाटेवर कल्लप्पा सांगत राहिला, ‘‘नवऱ्यानं टाकलीय तिला. अजून पोर-बाळं न्हाई. म्हणजी एक होतं. तान्हंच वारलं.’’ माझा जीव चुकचुकला. माझ्या स्वप्नात ही एकदा बाळासकट आली होती. खूप नवल वाटलेलं. बाळ आणि ती एकजीव झालेलं एक संपूर्ण घर वाटत होतं. कुठेही घेऊन फिरावं इतकं सोपं इतकं विनाअट आईपण. मला मनातून असं भटकं आईपण हवं होतं म्हणून स्वप्नात मला तिचं मुलासकट स्वतंत्र एक कुटुंब म्हणून फिरणं आवडलं होतं का? कुणास ठाऊक. मनात एक वेडा चाळा सुरू झाला. काय बोलली असती ती माझ्याशी? आम्हाला ऐकमेकींची भाषा कळली असती तर एकमेकींविषयी वाटणारं आकर्षण गळून पडलं असतं का?

घर संस्कृतीला साजेसं नवऱ्यानं टाकणं वगैरे त्यांच्यात आहेच असं दिसतंय. कल्लप्पा सांगत होता ती कुणाशीच बोलत नाही. नुसती खुळ्यासारखी हसत राहते. तिच्या विचारांमध्ये घर आलेलं. घरी कसं जायचं याच्या वाटेचा विचार न करतासुद्धा माणूस घराची वाट सवयीनं चालत घरापर्यंत येऊन पोहोचतोच. कुत्र्या-मांजराच्या पिलासारखा. कितीही लांब नेऊन सोडलं तरी घरची वाट विसरत नाही. घराला एक वासच असावा रक्तामासांत भिनलेला. माणसांचा, वस्तूंचा, दरवाजांचा कानाकोपऱ्यांचा.

१०.

शेतावरच्या दोन-तीन खोल्यांच्या घरात मी एकटीच मागच्या पडवीत बसले आहे. विनू कुठे गेलाय कुणास ठाऊक. शंकर काकाचं शेत मागच्या पडवीतून दिसतंय. आजी आत चुलीजवळ बसलीय. गार वाऱ्याचा झोत आला. अंग शहारलं तशी मी आजीजवळ जाऊन बसले. आजीचे हात राकट झालेले. भाकरी थापताना तिचे तळहात लयदार गोल फिरत होते. मी तंद्रीत असल्यासारखं आजीला विचारलं, ‘‘आजी, शंकर काकाचं शेत इथून दिसतंय. खूप मोठ्ठ आहे का ग? आजीनं नुसतं ‘हूँ’ केलं. मी परत म्हटलं, ‘‘आजी, तू म्हणालेली होतीस की शंकर काकाला आणखीनसुद्धा काहीतरी हवं होतं. ते त्याला काय हवं होतं? ते त्याला देऊन टाकलं असतं तर आई-बाबा जिवंत राहिले असते नं? आजी चिडून म्हणाली, ‘‘नाही, त्या गोष्टीत लहान मुलांनी तोंड घालू नये. आणि नुसती पेटीकोटवर काय बसलीस? जा फ्राक घालून ये. आईशीचं रूप घेतलंस. पुरुषांचीच काय बायकांची नजर सुद्धा ठरून राहते. आपण जपून रहावं.’’ मी गप्प झाले. कधी कधी मी आईसारखी दिसते त्याचं मला खूप वाईट वाटायचं. जरा चांगले सणासुदीचे कपडे घातले की बायका आईच्या रूपाचा, आईनं केलेल्या आत्महत्येचा विषय काढून कुजबुजायला लागायच्या. आईसारखी दिसतेस असं म्हटलं की मला वाईटच वाटायचं. विनूच्या आईनं चेहऱ्यावरच्या बटा मागे करत एकदा म्हटलेलं आठवले, ‘‘आई सारखी सुंदर आहेस. मोहवून टाकणारं आहे आईच्यातलं तुझ्यात. एकेका घराचा आवाकाच नसतो बाई असं सौंदर्य सांभाळायचा.” विनू मात्र माझ्याशी पुष्कळ भांडतो. त्याची आई मात्र माझ्याशी खूप प्रेमानं वागते. आवडतात मला काकू. आजी ओरडल्यामुळे मी फ्रॉक घालून आले. तिला म्हटलं, ‘‘आजी, फ्राक नाही म्हणायचं, फ्रॉक म्हणायचं.’’ आजीनं कौतुकानं माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला. ‘‘आपण शहरातल्या शाळेत मितू तुला घालूया. मी पण तुझ्याबरोबर तिथंच येईन रहायला. या वाड्यात राहूसं वाटत नाही.’’ आजी तंद्री लवून रेज्यातून अंधार कापत एकटक बाहेर पहात राहिली. उभ्या रेज्यांची सावली तिरकी होऊन तिच्या चेहऱ्यावर पडून होती. शेतातल्या घराबाहेर त्याचवेळेस गोंधळ ऐकू येऊ लागला. रमेश, शिवाजी आणि दोन-चार गड्यांनी खूप मोठे जनावर मारले होते. आजीनं ते ऐकू येताच मला जवळ ओढलं. तिच्या पदराचा माझ्या चेहऱ्याभोवती तंबूच तयार झाला. आजी सापाचं नाव रात्री निघालं की म्हणायची तो मंत्र पुटपुटू लागली, ‘अस्तिक अस्तिक काळ भैरव नाव घ्यावे चौघांचे पाप जाई जन्माचे’. मला मात्र बाबांच्या मृत्यूची आठवण येऊ लागली. मृत्यूचीच आठवण. बाबांची आठवण यायला मी आई-बाबांना नीटसं पाहिल्याचंच आठवत नाही.

जुनं जुनं आठवत होतं. फॉरेस्ट ट्रेलच्या साईटवर फिरत राहिले होते. विनू कल्लपाच्या शेडमध्ये बसलेला. अग्रवालशी वाटाघाटी चालू होत्या. मी वाड्याच्या डिझाईनवर अडून होते. अग्रवालला फारसं पटलं नव्हतं. मी पुन्हा त्या झाडा-पेडांमधून फिरत होते. ती साईट मला काही नवीन सुचवते का, ते पहात होते. तिथं भविष्यात बांधलं जाणारं घर मला नजरेसमोर दिसायला हवं होतं. झाडाचा एक बुंधा जमिनीवर आडवा पसरत गेला होता. खूप मोठा होता. दोन माणसं आरामात झोपू शकतील असा. खूप वेली त्या झाडावर चढलेल्या. वेलींचा पसारा एवढा होता की – वेंलीची एक भिंत तयार झाली होती. विनूचा कोवळा आवाज कानात घुमत होता. शेताकडच्या घरामागे एक असाच आंब्याच्या कलमाचा भव्य बुंधा होता. विनू दोन्ही हात आडवे पसरून त्यावर आडवा झालेला. ‘मितड्या, शहराकडल्यासारखा डबलबेड झाडानी तयार केलाय बघ. असला दोघांनी झोपायचा पलंग मी मामाकडं पाहिलेला’. मी विनूकडे दुर्लक्ष करत निघून गेले होते. आजीला विनूचं बोलणं सांगितल्यावर ती करवादली होती. ‘‘मेल्यांनो, अजून भुईतून वर आला नाही तर कसलं नाही ते सुचतं तुम्हाला.’’ मग हळू हळू आमची शहराकडं जायची तयारी सुरू झालेली. आजोबा विनूच्या वडलांना वाडा विकत घ्या, असं सुचवायला गेले. आजीचा थयथयाट सुरू होता. तिचं म्हणणं होतं शेताचा तुकडा विका. वाड्यामध्ये मुलीच्या आई-बापांच्या आठवणी आहेत. आजोबांनी आईच्या आत्महत्येनंतर त्या खोलीतला सागवानी, भव्य राजेशाही पलंग जाळला होता, असं ताईनं एकदा भीत भीत सांगितलं होतं. आजी त्यावेळेस हमसून रडलेली. ताईला बरंच माहीत असतं पण ती कधीतरीच बोलते. वाडा विकायच्यावेळेस मात्र ताईनं आजोबांना निक्षून सांगितलेलं, ‘‘वाडा विकायचा नाही.’’ तीनच शब्द इतके धारदार उच्चारून ताई खोलीत निघून गेली. मला वाटलेलं ती तिच्या खोलीत गेली पण ती आईच्या खोलीत जमिनीवर आडवी पडून वरच्या तुळईकडे एकटक पहात होती. मी ते दृश्य अजूनही विसरू शकत नाहीये. विनूनं मागून हाक मारली. मी त्या जमिनीला समांतर आडव्या बुंध्यावर आडवी झाले होते. ‘‘छान आहे जंगलातला डबलबेड’’, विनू म्हणाला. लहान असताना तो आंब्याच्या फांदीला डबलबेड म्हणालेला ते त्याला मुळीच आठवत नाहीये हे त्याच्या चेहऱ्यावरनं दिसत होतं. मी आशेनं त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. ‘‘शेतावरल्या घराबाहेरचं आंब्याचं झाड आठवतं विनू.’’ विनूनं कोऱ्या चेहऱ्यानं माझ्याकडे एकदा बघितलं. मग म्हणाला, ‘‘मितू, निघू या का? उशीर झालाय.’’ खट्टू मनानं मी कल्लपाच्या शेडच्या दिशेनं चालू लागले. अग्रवालनं कारचं दार उघडून धरलेलं, ‘‘या मॅडम. बसा.’’ पघळलेलं हसत तो म्हणाला. मी नको असा हात करत म्हटलं, ‘‘मी विनीत साहेबांबरोबर पुढेच बसेन.’’ गाडी सुरु झाली तरी माझ्या चेहऱ्यावर आणि विनूच्या चेहऱ्यावरही नावड पसरली होती. अग्रवाल मागच्या सीटवर होता. कुणीच काही बोलत नव्हतं. मला कधी एकदा घर येईल असं झालेलं.

११.

जनावरांचं भय नसलेला, काळा-सावळा त्याच भिल्ल दुंडव्वाचा निसुटता चेहरा दिसला. मग ती पाठमोरी चालू लागली. चालण्यातला ताठ जोरकसपणा उभ्या डोंगरकडयाचा ताठरपणा निवळवत होता. घरातल्या दिवाणखान्यात चालावं इतक्या सहजतेनं ती कडा चढत होती. जंगलातल्या आडवाटेनं कडा चढून झाल्यावर ती चालू लागली. दुतर्फा असलेल्या वेलींच्या पानांवर निर्भरतेनं हात फिरवू लागली. झाडीमध्ये थोडी खसफस झाली. जीपचा आवाज जवळ येऊ लागला. त्याबरोबर प्रतिक्षिप्त क्रियेसारखा तिनं कमरेचा कोयता सर्रकन बाहेर काढला. चपळ हालचाली बघत रहाव्या अशा तेजस्वी. मोहून टाकणाऱ्या. भीतीचं किंचितसं सावटसुद्धा त्यावर नव्हतं.

विनू हाका मारत होता. त्यानं माझे दोन्ही हात धरुन ठेवलेले. जाग आल्यावर मी ते हात सोडवून घेऊ लागले. तो हसत म्हणाला, ‘‘स्वप्नातल्या तलवारबाजीचा फटका मला बसला ना.’’ मी आश्चर्यानं म्हटलं, ‘‘तलवारबाजी?’’. ‘‘हो झोपेत सपासप हात चालवत होतीस. एरवी फेमिनिझमची तलवार उपसून असतेसच. आता खरीखुरी,’’ तो पांघरूणाची घडी घालून ठेवत म्हणाला. मी थोडंसं तंद्रीत असल्यासारखं म्हटलं, ‘‘अलीकडे विनू एक आदिवासी बाई स्वप्नात दिसते. स्वयंपूर्ण, तेजस्वी. एकटी असते. तिच्याबरोबर आदिवासी माणसं, त्यांचं गाव, तिचा पुरुष असं कुणीच नसतं. एकटीच रानोमाळ फिरत असते. कधीतरी तिचं कमरेला बांधलेलं तान्हं मूल असतं. कधीतरी नसतं. मोहवणारा चेहरा.’’ एवढं बोलून मी स्वतःच्याच तंद्रीत असल्यासारखी बसले असावे. विनूनं पुन्हा हातात कॉफीचा कप ठेवत जागं केलं. ‘‘पुन्हा ट्रेकला जायचंय का तुला? उगीच आडून सांगू नको. अग्रवालचं ड्रॉईंग फायनल झालं की आपण जाऊ, स्ट्रक्चरल ड्रॉईंग्स मी करतो मग एकत्रच जाऊ.’’ मी चटकन म्हटलं, ‘‘माझी ड्रॉईंग्ज उत्तम आहेत. बरीच मोठी मोठी झाडं माझ्या ड्रॉईंग्जमध्ये वाचली आहेत. अग्रवालनी हरकत घ्यावी अशी कुठलीच तडजोड अग्रवालला करावी लागत नाहीये. ना स्क्वेअर फीटमध्ये, ना फ्लॅटसच्या संख्येमध्ये.’’ ‘‘खरंय बाई तुझं पण, अग्रवाल उगीच आढेवेढे घेतोय हे मला कळतंय. मी भेटून सॉर्ट करतो.’’ विनू वैतागून म्हणाला. ‘‘माझं ड्रॉईंग मी जास्त चांगलं समजवू शकेन,’’ मी ठाम आवाजात सांगितलं. विनू तिसरीकडेच पहात म्हणाला, ‘‘त्याला समजवण्यासारखं बाकी नाहीच काही. तुला भेटायचंय त्याला एवढाच त्याचा अर्थ. तो लक्षात येत नाही का तुझ्या?’’ विनूचा स्वर झोंबणारा होता. तरीही मी म्हटलं, ‘‘तुला काय वाटलं समजलं नसेल मला? पण अशांना वठणीवर आणलंच पाहिजे ना, किती दिवस तुझ्या आड लपून मी वावरायचं?” ‘‘ए बाई, तुला समजत कसं नाही? जिकडे तिकडे तुझी फेमिनिझमची तलवार उपसू नको,’’ “विनू, आय कॅन टॅकल माय ओन प्रॉब्लेम्स”. विनू चिडून म्हणाला. ‘‘याचसाठी माझ्या आईचा आपल्या लग्नाला विरोध होता.’’ “सो यू रिग्रेट युअर डिसिजन, इज इट?” विनू माझ्याकडे वळून हात जोडून म्हणाला, ‘‘माफ कर बये. यू नो, मला तसं म्हणायचं नव्हतं.’’ ‘‘मग कसं म्हणायचं होतं?’’ मी फुरंगटून म्हटलं. विनूनं माझ्याभोवती हात टाकला मला जवळ ओढत म्हणाला, ‘‘आई नेहमी म्हणायची. सुशीला बाईंच्या शांत सौंदर्यानंसुद्धा तुमचा वाडा होरपळला. मोठ्या बाईंमध्ये असं काहीतरी मोहवणारं होतं की लहान मुलापासून, आया-बाया स्तब्ध होऊन त्यांच्याकडे पाहात राहायच्या. तर पुरुषांच्या मनात लालसा, अभिलाषा निर्माण होईल तर नवल नाही. सुशीला बाईचं सौंदर्य वाडा सांभाळू शकला नाही. तुझ्या बाबांच्या संदिग्ध मृत्यूनंतर शंकर काकानी तुझ्या आईवर..’’. ‘‘बस्स कर. मला  काही ऐकायचं नाही.’’ ‘‘तुला ऐकवणार नाही म्हणूनच सगळं घरदार एवढी वर्षं गप्प आहे.’’ ‘‘आईच्या बाबतीत जे झालं ते सगळ्यांच्या बाबतीत होत नसतं.’’ ‘‘हो, होत नसतं पण तू तुझ्या आईचं रंगरूप जसंच्या तसं घेऊन आलीस म्हणून माझी आई म्हणत होती आपल्याला हे झेपणार नाही. एका बाईभोवती सगळं घर उभं राहतं तसं एका बाईमुळे सगळं घर कोसळतंसुद्धा.’’ ’‘कमॉन विनू, तू कधीपासून काकूंच्या भाषेत बोलायला लागलास. तो काळ वेगळा होता.’’ ‘‘तो काळ वेगळा होता पण इतिहासातून काही शिकलो नाही तर इतिहास पुन्हा जसाच्या तसा घडू शकतो.’’ ‘‘काय शिकायचं इतिहासाकडून? स्ट्रक्चरल डिझाईन्स करणारा सिव्हिल इंजिनिअर असताना तू डिझाईनचं आर्किटेक्चरल एस्थेटिकस क्लायंटला समजावून देणार कारण तुझ्या सो कॉल्ड सुंदर बायकोला क्लाएंटची भीती वाटते म्हणून.’’ ‘‘तुला फक्त अॅर्ग्युमेंटस् करायच्या असतील तर विषयच संपतो,’’ विनूनं खांदे उडवले. ‘‘ठीक आहे संपवच विषय. माझ्या आईच्या खोलीतला तो पलंग आजोबांनी जाळला. शंकर काकाला आणखीसुध्दा काही हवं होतं, आईच्या सौंदर्याच्या चर्चा या घटना, वाक्य, वदंता यांच्यामध्ये पिचलेल्या वाड्यात राहूनसुद्धा मला इतिहास काय घडला असेल हे कळलं नसेल, असं वाटतं तुला विनू?’’ विनू काहीच बोलत नव्हता. मी सुध्दा स्वतःच्याच विचारात होते. थोड्या वेळानं मी आपोआपच परत बोलू लागले. ‘‘कधीतरी इतिहासातून बाहेर पडून मला मी बनलंच पाहिजे. मला इतिहासात जतन केलेलं पात्र असल्यासारखं वाटतं. सतत आईच्या सौंदर्याच्या सावटाखाली असल्यासारखं वाटतं. मला नकोय कुठलीच सावली. मला असली कुठलीही सावली नसलेलं घर हवंय विनू! तू देशील मला असं घर? सावली नसलेलं. मोकळं निर्भर?’’ विनू गप्प होता. ‘‘तू जा मितू अग्रवालला भेटायला. मी एका फोन कॉलच्या अंतरावर राहीन.’’ असं म्हणत विनून मला थोपटलं. मी म्हटलं, ‘‘विनू जेव्हा दोर कापलेले आहेत असं सांगितलं तेव्हा मावळे लढायला मागे फिरले आणि जोशात लढले. तू सुद्धा आपल्या घराचे माझ्याभवती विणलेले दोर कापून टाक. मला लढायचंय. मला माझी आई व्हायचं नाहीय.’’ विनू तिला थोपटत राहिला.

मी स्वतःशीच बडबडल्यासारखी बोलत होते. ‘‘कदाचित आईचा मृत्यू नेहमीसारखा झाला असता तर कुणाच्याच लक्षातही राहिला नसता. पण दोन पिढया उलटल्या तरी त्या मृत्यूचं सावट घेऊन तो वाडा उभा आहे. सतत वाटतं वाड्याच्या भिंतीना माहीत असलेलं ओठाआड करता करता फुटेल इतका वाडा बेढब बनत गेलाय. निचरा कधी झालाच नाही. ताईनं वाडा विकू दिला नाही. गावाकडच्या माणसांनीसुध्दा कुणी घेतला नाही. शंकरकाकाला आजोबांनी विकला नाही. तुझे बाबासुद्धा वाडा विकत घ्यायला नाही म्हणाले. एका अर्थी बरंच झालं. लग्नानं वाड्याचं सावट पुसायची संधी मला दिली. पण तरीही काहीवेळेस वाडा मला बोलावतो असं वाटतं. कधीतरी जावंसं वाटतं. सगळं त्या वाडयाच्या भिंतींशी तुळयांशी बोलून ऐकून रिकामं व्हावं असं वाटतं. घर म्हणून त्या वाड्याला मुक्त करावं. स्वत:ला मुक्त करावं असंच वाटत.’’ विनू तिला बोलू देत होता. तिला हलकेच थोपटत होता.

१२.

घराच्या टेरेसवर टेबल मेणबत्त्यांच्या प्रकाशात उजळंलं होतं. मला विनूची प्रतिक्रिया अपेक्षित होती. त्यानं मला उचलून गोल फिरवलं होतं. मी उत्साहानं अग्रवालला कसं प्रेझेंटेशन दिलं, कसं वाड्याचं थ्रीडी मॉडेल सर्व बारकाव्यांनिशी दाखवलं ते विनूला रंगवून सांगत होते. अग्रवालची नजर स्क्रिनवरून हलत नव्हती. हे सुद्धा सांगितल्यावर विनू गालातच हसत राहिला. भिल्लासारखं रानोमाळ भटकत रहावं इतका आनंद झाला होता. उत्साहानं भरभरून बोलून झाल्यावर मी शांतपणे उंचावरून सगळी दिव्यांनी चमचमणारी स्कायलाईन निरखत राहिले. मेणबत्तीच्या हलत्या प्रकाशामुळे असं वाटत होतं टेरेसला लागून असलेल्या खोलीचे कानकोपरे माझ्याशी बोलतायेत. माझा हात हातात घेऊन माझं अभिनंदन करतायत. माझं घर बोलकं झालेलं. स्निग्ध झालेलं. मी विनूचा हात स्वत:भोवती ओढून घेत म्हटलं, ‘‘ट्रेकिंगला न जाता यावेळी मला वाडा बघायचाय. इतके वर्षांत कोणीच तिकडे गेलो नाही.” विनू बरं म्हणाला नाही पण नकोसुद्धा म्हणाला नाही. मला तर जायचंच आहे.

१३.

दुंडव्वा रस्ता कापत झाडावेलींमधून पुढे निघाली. क्षणात एका मोकळ्या जागेत ती पोहोचली. मोकळं कुरणच ते. हिरवंगार. चार-सहा कुडाच्या झोपड्यांचा पाडा दूर टेकडीच्या उतारावर दिसत होता. सरळ त्या दिशेनं ती चालली होती आणि अचानक तिचा रस्ता बदलला. काट्याकुट्यातून वाट काढत ती निघाली तो भाग, ती वाट ओळखीची वाटू लागली. ही वाट शेताकडच्या घराकडून वाड्याकडे जाणारी. खूप वाळला पालापाचोळा वाटेवर दिसत होता. तिच्या पडणाऱ्या प्रत्येक पावलागणिक तो पालापाचोळा खूप मोठा आवाज करत वाजत होता. ती वाड्याजवळ पोहोचली. तिनं वाड्याची कडी वाजवली. दार उघडायला कोणीच नसेल असं वाटत होतं. पण दार उघडलं. मोठी बायऽ अशी जोरात हाक ऐकू आली. ती हाक खरखरीत स्त्री आवाजातली होती. कुणाचा आवाज कळत नव्हता. दुंडव्वा चुपचाप उभी होती. आतून आई बाहेर पडली. आईच्या हातातलं, तान्हं बाळ तिनं वाड्याच्या पडवीमधल्या जमिनीवर ठेवून दिलं. पदर दोन्ही खांद्यांवरून डोक्यावरून लपेटून न घेता तिनं नुसताच कमरेला खोचला. तिचे गहरे पिंगळ्या रंगाचे मोठे डोळे क्षणभर तान्ह्या बाळावर लागले. मग मात्र ती वाड्याचं मुख्य दार उघडून त्या दुंडव्वाबरोबर बाहेर पडली. भल्या मोठ्या झाडांखालची हलत्या कवडशांची नक्षी पार करत निबिड रानात दोघी दिसेनाशा होत गेल्या. परत पुढच्या वळणावर निसुटत्या दिसल्या. मोकळ्या आकाशाच्या निळ्या रंगात त्यांची शरीरं विरघळल्यासारखी दिसेनाशी झाली.

‘‘थांबू नको मागे येऊ नको,’’ मी जोरात मान हलवत होते. विनीतनं गाडी बाजूला थांबवली. त्यानं मला पाणी दिलं. डोळ्यांवर लख्ख सूर्यप्रकाश होता. डोळ्यांवर आडवा हात घेत मी त्याला विचारलं ‘‘गाव आलं का जवळ?’’ ‘‘नाही अजून वेळ आहे.’’ ‘‘तुला काय झालं?’’ आज पहिल्यांदाच आई स्वप्नात आली. आजपर्यंत तिला मी फोटोतच पाहिलंय. डोक्यावरून पदर घेतलेला बाबांशेजारी उभा असलेला तिचा फोटो आमच्या घरात होता. वाड्यांच्या भिंतीवरून तो आजीनं उतरवायला लावला. नंतर तो कुठल्यातरी जुन्या पेटीत होता. ताई बऱ्याचदा तो काढून बघायची चोरून. एकदा तिला तसं करताना मी दाराआडून पाहिलं होतं. ती ज्या तऱ्हेनं त्या फोटोकडे पहात होती ते इतकं खाजगी होतं की मी तिला चोरून पाहिलं याचंच मला वाईट वाटलं. तिचं आणि आईचं जणू एक बेटच होतं. आई गेली तेव्हा मी तान्ही होते म्हणे. मला एकदम उपरं वाटलेलं ताई आणि तिच्या फोटोमध्ये चाललेल्या मूक संवादात. मी मग त्या दिवशी खूप रडलेले. आई गेली म्हणून नव्हे. मला एकदम कळपातनं दूर भिरकावल्यासारखं वाटलं म्हणून. कधी कधी वाटायचं वाड्याच्या भिंतीनी किती काय काय पाहिलं.. आजोबा आपल्याकडेच वारले तेव्हा त्याच्या तेराव्याला गावाकडून काही माणसं भेटायला आली होती. आजीनं वाघीणीचा अवतार घेऊन मला भेटू दिलं नव्हतं. शंकर काकासुद्धा आलेला म्हणे. विनू, तुला कधी भेटलाय शंकर काका? का कुणास ठाऊक त्याच्याबद्दल राग, द्वेष, बदला अशा भावनाच निर्माण होत नाहीत. काहीच भावना निर्माण होत नाहीत. तशा आई-बाबांबद्दलसुद्धा प्रेम वगैरे काहीच वाटत नाही. कुणातरी दुसऱ्याच गोष्टीतल्या माणसांबद्दल आपण ऐकतो, बोलतो तसं वाटतं. पण या गोष्टी इतक्या वर्षांनीसुध्दा माझी पाठ सोडत नाहीत. आईनं शरीराचं घर सोडलं पण वाडयाच्या वास्तूनं जणू तिला बांधून ठेवलं. वाड्याच्या भिंती अभंग आणि अवाढव्य होत गेल्या. आईला वाड्यानं कधी सोडलंच नाही. अखंड तिची वर्णनं, तिच्याविषयीच्या गोष्टी. सगळं तिचं अस्तित्व वाड्याच्या भिंतींवर लेप लावल्यासारखं चिकटून राहिलं. घरातल्या माणसांच्या जगण्यावर तिच्या नसून असण्याची सावली सारखी पडलेली होती. जीव घुसमटायचा. मला त्यामुळे सारखं वाटत राहतं, घरात राहू नये. मुक्त रानोमाळ फिरावं. तिच्यासारखं शरीर लाभल्यामुळे कधी कधी मला हे शरीरसुध्दा सोडावसं वाटतं. तिच्याशी निगडीत, कुठलंच घर नको होतं. विनूनं एकदम समोर कुणीतरी आलं म्हणून जोरात ब्रेक दाबला. हादरा बसल्यामुळे मी थोडावेळ गप्प झाले. विनू माझ्याकडे वळून म्हणाला, ‘‘गप्पच राहा. खुळ्यासारखं काहीही बडबडायला लागलीस. म्हणे शरीराचं घर सोडावसं वाटतं. तुमच्या त्या वाड्यात काहीच चांगलं घडलं नाही असं काही मी म्हणणार  नाही. तू थोडी थोडी मला आवडायला लागलेलीस ती त्या वाड्यातच. आपलं दोघांचं लहानपण त्या वाडयातच गेलं. मोठ्या बायच्या खोलीकडे जाणारा एक जिना होता जो घराच्या बाहेरून होता.  तो अनेक वर्ष बंद होता. त्या घरात येण्याच्या रस्त्याला कुलुप होतं पण तिथे एक रातराणीचं झुडूप अवाढव्य वाढलं होतं. जिन्याची वाट त्या झुडुपानं पार बंद केली होती. पण त्या खोलीच्या जवळपास गेलं की तो वास भान हरपवून टाकायचा. मला खूप आवडायचा. मग तुम्ही शेतावरच्या घरी राहायला गेलात. वाडा बंदच झाला. मी मात्र त्या रातराणीचा वास कधीच विसरू शकलो नाहीये. मितू, कोंडून घातलेल्या गोष्टींसाठी दरवाजे उघडे केलेस की त्याच घराकडे पाहण्याची दृष्टी बदलेल बघ!’’

मी स्वत:शीच विचार करत राहिले. आता कसा दिसत असेल वाडा? आजोबा गेल्यानं गावाकडच्या लोकांशी संपर्कच संपला. आजीनं त्रागा केल्यानं मी त्या व्यवहारामध्ये लक्षच घातलेलं नाही. ताईनं शेतावरचं घर आणि शेत विकून निम्मे पैसे आणून दिले. पण वाड्याचं नावही काढलं नाही. कुणी गडी वाड्याची देखभाल करायला तिनं ठेवला असेल का? आजी ज्या देवळीत संध्याकाळचा दिवा ठेवायची, तो दिवा लावत असेल तो गडी? बकुळीचं खूप मोठं झाड होतं. ते म्हणे आईनं लावलेलं. ते असेल अजून? बाबांची एकमेव आठवण असलेली कुदळ पडवीच्या कोपऱ्यात होती. मी एकदा पायावर पाडून घेतलेली. बाबा शेवटचे शेतात गेले तेव्हा ती कुदळ घेऊन गेले होते म्हणे. अजूनही कोपऱ्यात ती कुदळ तशीच असेल. झटकन आठवलं वाड्याचं कुंपण. त्या कुंपणावर बसून मी डोंगर चढण्याचा खेळ खेळत होते. स्पष्ट आठवतंय. वाड्यासमोरून जाणारे दोघे पुरुष मोठ्या बायविषयी आचकट बोलत निघून गेले. फारसं काही कळण्याचं वय नव्हतं पण काहीतरी वाईट आहे, हे कळलं होतं. बिचारी शरीराचं कुंपण भेदून गेली तरी लोक विसरत नव्हते. पटकन तोंडून निघून गेलं, ‘‘विनू, माझी आई वाईट बाई होती का रे? तुझ्या आईनं त्या काळातलं काहीतरी तुला सांगितलंच असेल की?’’ विनू चटकन म्हणाला, ‘‘काहीतरी काय बोलतेस मितू, असं काहीही नव्हतं. माझी आई मोठ्या बायबद्दल नेहमी चांगलंच बोलायची. बास तुझा खुळेपणा आणि देशमुखांकडे काहीही विषय काढू नकोस.’’ मी खिडकीबाहेर पहात राहिले. अंतर कापत होतं. गाव जवळ आलं. देशमुखांच्या घरासमोर गाडी थांबली. देशमुखीण बाईनी माझी आणि विनीतची पुढे होत भाकरीनं दृष्ट काढली. आजी या देशमुखीण बाईंकडे बसायला जायची. विनीतची आईसुद्धा यायची तिथे. गावात आमच्या तोलाचं घर देशमुखांचं होतं म्हणून आजी देशमुखीण बाईंकडे जात असावी. वाडा सोडला तो सातवीत असताना. पण नंतर देशमुखबाई शेतावरच्या घरातही भेटायला यायच्या. इतिहासात पाहिल्यासारख्यं वेगळ्याच नजरेनं त्यांनी माझ्याकडे पाहिलं. माझ्या चेहऱ्यावरच्या बटा मागे केल्या. काजळाचं बोट माझ्या कानामागे लावलं आणि त्या आत गेल्या. देशमुखांच्या दिवाणखान्यात बसून चहा घेतला. मन अधीर झालेलं. वाड्याकडे जावंसंही वाटत होतं आणि अगदी नकोसंही वाटत होतं.

काय रूप दिसेल वाड्याचं याची अपार उत्सुकता होती आणि अपार नकोशी भावना. सहावीत असताना वाडा सोडला ते मागे वळून पाहिलंच नाही. देशमुखांच्या घरी फ्रेश होऊन झटकन गाडीत जाऊन बसले. कुणाशी बोलावसंच वाटत नव्हतं. माझ्या विचित्र वागण्याचं कारण विनीत देत असावा. निसुटते शब्द कानावर आले. ‘‘असूं दे असूं दे, मोठी बायसुद्धा हसरी होती पण फारच अबोल होती. चालायचंय.’’ मी सगळे संदर्भ कानाआड केले.

देशमुखीण बाईंचा वाडा आमच्या शेताकडल्या घराजवळच होता. इथून आमचं शेत दिसत नव्हतं पण शंकरकाकाचं शेत दिसत होतं. मी कारच्या खिडकीतून पाहत होते. बरेचदा वाटायचं शंकरकाका कसा माणूस होता ते पाहावं. सतत त्याचं राक्षसी रूप नजरसमोर असायचं. आजीनं कधीच त्याला पाहू दिलं नव्हतं. सगळं घर उद्ध्वस्त करणारा कर्दनकाळ असं रूप कल्पलेलं होतं. विनीत अजून गाडीत यायचा होता. मी गाडीतून उतरून मधल्या पायवाटेनं पुढे गेले. धिप्पाड अंगाचे दोन पुरूष गड्यांना पिकाला पाणी दाखवायला सांगत होते. एका मोठ्या चिंचेच्या पिसाऱ्याखाली एक वयस्कर माणूस बसलेला.

खांदे पडलेले. खुजं अंग. लांबवर नजर लावून तो माणूस बसलेला. हा माणूस कोण, ते अंदाजानी कळत होतं. माणसासारखा माणूस होता. नजर शून्यवत होती. विनीत मागोमाग आला. माझा हात धरून घेऊन जाऊ लागला. तेव्हा त्या माणसाची नजर माझ्याकडे वळली. विनीत मला गडबडीनं गाडीकडे ओढतच घेऊन गेला.

काहीच न बोलता आमची गाडी वाड्याकडे निघाली. मी विचार करत होते. समजा शंकरकाका माझ्याशी बोलला असता तर काय बोलला असता? विनीत मध्येच सगळी शांतता भेदत बोलला, ‘‘शंकर काका आणि तुझ्या बाबांनी एकाचवेळी मोठ्या बायला मागणी घातलेली.” मी चमकून विनीतकडे पाहिलं. मला नेमकं काय वाटत होतं तेच कळत नव्हतं. त्वेष राग वगैरे का वाटत नाही याचं आश्चर्यच वाटत होतं. माझ्या कल्पनेत शंकर काकाची नजर विखारी, वासनेनं लदबदलेली असेल असं होतं. पण प्रत्यक्षात त्याची नजर शून्यात हरवलेली होती.

वाडा येईपर्यंत शंकर काका, आई, बाबा, वाडा हे सगळं कसं काय कुणास ठाऊक माझ्या डोक्यातून पार पुसलं गेलं. अग्रवालच्या साईटवर खालच्या मजल्यावरुन वर जाण्यासाठी काही पेच होते. त्याविषयी माझं विचारचक्र गरगरायला लागलेलं. भिंतीतून वर जाणारा एक अडीच फूट रुंदीचा अंधारा जिना आमच्या वाड्यात होता तो आठवायला लागला. सापाच्या स्पर्शासारखा थंडगार स्पर्श त्या जिन्याच्या भिंतींना होता. त्या जिन्यानं वर जावं वाटायचं नाही. हा जिना आईच्या खोलीत जायचा. भिंतींची रुंदी चार फूट असावी. पण अग्रवालच्या साईटवर ते शक्य नाही. पण गोल लाकडी जिना शक्यय. मनाशी आडाखे बांधताना, कड्या, कोयंडे, दरवाजे सगळंच बारकाईनं नजरेसमोर उभं राहात होतं.

१४.

आमची गाडी वाडयाजवळ पोहोचली. थोडे फार लोक जमा झालेले. वाड्याची कुंपणाची भिंत पडली होती. अनेक रानवट झाडं ठिकठीकाणी उगवली होती. वाड्यातूनही एका उंच पिंपळाच्या झाडाचा शेंडा दिसत होता. तिथं आईची खोली असावी. पडलेली दिसत होती. पिंपळाच्या झाडाला छान लालसर तांबूस पानांची पालवी फुटली होती. उन्हात ती पानं लहान बाळाचं हसू हसत होती. वाड्याच्या भिंतीच उरल्या नव्हत्या. सगळीकडे नुसतं रान पसरलेलं. वाडा पूर्ण भग्न झालेला. मोठ्या बायला वाडयानं सोडलं म्हणायचं. तिला तान्ह्या बाळाला निर्ममपणे सोडून जावं वाटावं इतकं तिला शरीराचं घर नकोसं झालेलं. तिच्या मनाच्या खोल्या तिनं कशानं बंदिस्त केल्या कुणास ठाऊक. तिला वाड्यानी मात्र सोडलं नव्हतं. कुंपणावर बसून मी लहानपणी घरासमोरून जाणाऱ्या दोन पुरुषांना आईविषयी आचकट विचकट बोलताना ऐकल होतं. तेव्हा मी सात वर्षांची असेन. आई जाऊन सहा तरी वर्ष झालेली. पण तेव्हासुद्धा लोकांकडे मोठ्या बायविषयी बोलायला काही ना काही होतंच. शेजारपाजारच्या आया-बायांनी तिला सती बनवलं होतं. नवऱ्याच्या माघारी पंधरा दिवसातच तिनं आत्महत्या केली म्हणून असावं. पडलेल्या, ढासळलेल्या कुंपणावर वाऱ्याबरोबर लवलवणारं हिरवं गवत होतं. पडझड झालेल्या वाड्यावर कोवळं उन्ह लहरत होतं. हे सगळंच वाड्याला चैतन्य देत होतं. सकाळच्या उन्हात फारशी कुठेच सावली न पडलेला वाडा चैतन्यमय दिसत होता. ती वास्तू विमुक्त हलकी, आकाशात, मागच्या डोंगरात विरघळून जात होती. हिरवीकंच. कसलंच सावट नसलेली.

चित्र सौजन्य:हेमंत गवाणकर

इला माटे दंतवैद्यक असून त्या वर्तमानपत्रातून लिखाण करतात तसेच काव्यवाचनाच्या कार्यक्रमात सहभागी होतात.

5 comments on “सावली नसलेलं घर: इला माटे

  1. Upendra Gokhale

    Nice plot and details are narrative of the things.
    Liked the story

    Reply
  2. Sharad S Sane

    Nice story and the title fits the narrative very well. Keep it up. The connection with the Adivasee woman and the protagonist (as also her life) needs to be brought out in more details but in equally subtle narrative, certainly a difficult task. Plus point of the story is delicate handling of the theme.

    Reply
    • Ela Mate

      Many thanks sir.. I will look over your suggestions about adivasi lady’s character..

      Reply
  3. Dr. Ashutosh Deshpande

    अलिकडच्या काळात वाचलेली सर्वोत्तम कथा. जी. ए. कुलकर्णी ची आठवण मधे मधे होत होती. असचं लिहित राहण्यासाठी अनंत शुभेच्छा !! पुढल्या कांदबरीची वाट पहावी असं मनात येतयं.

    Reply
    • सौ.विजया तारळेकर.

      कथा खूप च सुंदर आहे.निसर्गाचे वर्णन खूप बारकाईने केले आहे.भवना पण खूप छान व्यक्त झाल्या आहेत.सावली नसलेल्या घराचं नविन च अर्थ उमजला.खूप छान.
      मला तुमचे सगळे साहित्य वाचायला आवडेल.

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *