मूळ इंग्रजी लेख: राखी दलाल

मराठी भाषांतर: आश्लेषा गोरे

चोरकप्पा उघडताना


marathienglish

back

गुपित म्हणजे काय असतं हे ठाऊक व्हायच्या आधीच मला गुपितं दडवायची सवय लागली. माझ्यापेक्षा वयानं बऱ्याच मोठ्या असलेल्या एका माणसानं मला नकोसा स्पर्श केला तेव्हा मला वाटतं, मी साधारण ५ ते ६ वर्षांची असेन. त्यावेळेस अशा स्पर्शाचं काय करायचं ते मला कळत नव्हतं. कदाचित आपल्यापुढे हळूहळू उलगडत जाणाऱ्या जगाच्या रहस्यांपैकीच ते एक वाटलं असेल. कुठूनतरी माझ्या आईवडिलांना त्याबद्दल कळल्यावर मला ताकीद देण्यात आली असावी किंवा कदाचित कडक शब्दांत काहीतरी सूचना दिल्या असाव्यात. त्यामुळे आपल्या बाबतीत काहीतरी चुकीचं, काहीतरी भयानक घडलं आहे एवढं मला समजलं होतं. त्यांनी मला काय सांगितलं हे आता अजिबात आठवत नाही. हा माणूस म्हणजे आमच्याच घरात राहणारा एक भाडेकरू होता. या घटनेनंतर त्याला घरातून हाकलून दिलं. तेव्हा मला भीती, प्रचंड भीती वाटल्याचं अस्पष्ट आठवतं. जे काही घडून गेलं होतं त्याचा अर्थ समजावा, त्याचं आकलन व्हावं एवढी माझी क्षमताच नव्हती तरीही भीती वाटली. 

ती भीतीची भावना अजूनही टिकून आहे. मला आठवतं त्याप्रमाणे कदाचित तेव्हापासूनच मी गुपितं राखायला शिकले होते. ज्या गोष्टी घरातल्या मोठ्यांना आवडणार नाहीत असं वाटे त्या मी घरी सांगतच नसे. हळूहळू ती सवयच लागली. एखाद्या गोष्टीमुळे बाकीचे दुखावले जातील किंवा आपण अडचणीत सापडू असं वाटलं तर मी त्या गोष्टी लपवून ठेवत असे किंवा त्यांच्याबद्दल अजिबात बोलत नसे.   

आपण सगळेजण या अशाच मार्गानं गुपितं बाळगायला शिकतो का? कोणत्यातरी घटनेचा किंवा न आवडणाऱ्या प्रसंगाचा परिपाक म्हणून? का अशी गुपितं दडवणं हे मानवी स्वभावात उपजतच असतं? निव्वळ सवयीपोटी आपण ते करतो का नातेसंबंधांमध्ये कटुता टाळण्याच्या अनिवार गरजेतून करतो? गुपिताच्या जन्माबरोबर सोसाव्या लागणाऱ्या गोड कळा आपल्याला भुलवतात का काहीतरी लपवताना त्याबरोबर येणाऱ्या अपराधी भावनेचा आपल्याला त्रास होतो? एखादं गुपित राखताना काहीही विशिष्ट तत्वं पाळली जातात का अंतःप्रेरणेतून जन्माला आलेला तो प्रयत्न असतो? एखादी गोष्ट गुप्त ठेवण्यामागे ती तशी ठेवणाऱ्या व्यक्तीचा काय हेतू असतो यावरून किंवा ते गुपित उघडकीला आल्यानंतर किती टोकाची प्रतिक्रिया येऊ शकते यावरून आपण गुपितांचं वर्गीकरण करू शकतो का?   

यातल्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर खरं म्हणजे मला माहीत नाही. इतक्या लहान वयापासून मला त्याची सवय लागली होती की, ‘हाकारा’मध्ये हा विषय जाहीर होईपर्यंत मी त्यावर फारसा विचारच केला नव्हता. या समजुती इतक्या खोलवर रुतून बसल्या आहेत की, आपली गुपितं पूर्णपणे उघड करण्याचा,  त्यांच्यावरची धूळ झटकून निदान स्वतःपुरती त्यांची छाननी करून बघण्याचा प्रयत्न मी क्वचितच कधी केला असेल (आणि मला वाटतं हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं). अगदी आत्तापर्यंत. 

आज मी बसून त्या गुपितांकडे बघते आहे, ती या कागदावर उतरवते आहे आणि कदाचित लिखित रूपात कायमची अजरामर करून ठेवते आहे. ही कृती निव्वळ त्यांची दखल घेण्याची आहे का पश्चात्तापाचीसुद्धा? ते केवळ ही पानंच सांगू शकतील.  

सुरुवातीला मला आठवतं, मी आईपासून काही गोष्टी गुप्त ठेवायचे. त्या गोष्टी अगदी निरागस असायच्या. पाचवीत असताना गणिताचा गृहपाठ अवघड वाटला म्हणून केला नाही तर त्यावरून झालेली शिक्षा (अर्थात ही गुप्त बातमी शिक्षकांनी पाठवलेल्या चिठ्ठीतून तिच्याकडे पोहोचली आणि मला दुप्पट शिक्षा झाली ही गोष्ट वेगळी!)  किंवा जवळच्या मित्रमैत्रिणींशी झालेली भांडणं, आसपासच्या दुकानांमध्ये जाऊन घरी येताना मध्येच थोडीशी वाट वाकडी करणं वगैरे, वगैरे. त्याशिवाय टीनएजमधली किरकोळ प्रेमप्रकरणं आणि फ्लर्टिंग, अर्थात त्या वयात ती भयंकर गांभीर्यानं घेतली जात. शिवाय त्यांच्याभोवती असलेल्या गुप्ततेच्या वलयामुळे दिवास्वप्नांमध्ये हरवून गेलेली ती वाट अजूनच खुमासदार वाटत असे.    

हाताबाहेर गेल्या असत्या तर गंभीर परिस्थिती ओढवली असती अशा आणखीही काही गोष्टी होत्या. जसं की, लहानपणी एका चुलत भावानं केलेले असभ्य लैंगिक चाळे आईला न सांगणं. सुरुवातीला त्याला एखाद्या खेळाचं स्वरूप होतं. त्यानं गंमत म्हणून ते खपवायचा प्रयत्न केला. मात्र जसजशी मी मोठी होत गेले तसतसं मला तो आसपास असला की, अस्वस्थ वाटू लागलं. हे इतकं वाढलं की, तो नुसता दिसला तरी माझा थरकाप होई. सुदैवानं एक दिवस मीच पुरेसं बळ गोळा करून त्याला, “पुन्हा मला त्रास दिलास तर परिणाम वाईट होतील”, असं धमकावलं. त्याचा बहुधा उपयोग झाला असावा. कदाचित आम्ही वेगवेगळ्या शहरात राहू लागल्यामुळे त्यानंतर आमच्या जेमतेम एकदा दोनदा झालेल्या भेटी अगदीच औपचारिक स्वरूपाच्या होत्या म्हणूनही काही घडलं नसेल. त्यानंतर एकंदरच या अनुभवावर पडदा टाकता यावा अशी मिटवणुकीची भावना मला जाणवलेली नाही. माझ्या आईवडिलांना त्याची एकंदर चालचलवणूक ठाऊक असली तरी त्यांच्यासमोर मी या गोष्टी उघडपणे बोलू शकले नाही हे त्यामागचं कारण आहे. माझ्याच विस्तृत कुटुंबातल्या इतरांना आणि विशेषतः पुरुषांना भेटताना मी अस्वस्थ असते त्यामागे याच भेटींचा हात आहे.  

मोठं होताना त्या जोडीला आणखी वेगळी रहस्यं आली. माझ्या स्वच्छंदीपणामुळे किंवा माझ्यापुढे असणाऱ्या अडचणींमुळे तसंच माझ्या जोडीदाराकडून माझे आईवडील दुखावले जाऊ नयेत म्हणून मला त्यांच्यापासून काही गोष्टी लपवून ठेवाव्या लागत. काही विशिष्ट गोष्टी त्यांना खऱ्या-खऱ्या सांगितल्या तर त्यांची काय प्रतिक्रिया होईल हे मला माहीत नव्हतं.   

माझ्या कुटुंबियांपासून मी लपवलेलं आणि एक दशकाहून अधिक काळ माझा जीव दडपून टाकणारं आणखी एक गुपित म्हणजे आस्तिकतेकडून आणि धार्मिकतेकडून अज्ञेयवादाकडे झालेला माझा प्रवास. त्यामागची कारणं बरीच होती. त्यातलं मुख्य कारण म्हणजे तिशीच्या सुरुवातीच्या काळात मला त्रास देऊ लागलेला अस्तित्वविषयक प्रश्न. काम्यूच्या शब्दांत सांगायचं तर एके दिवशी जीवनातली विसंगती माझ्यासमोर येऊन उभी ठाकली आणि मग एका अंधाऱ्या, आपल्या कल्पनेपेक्षा प्रचंड अशा विश्वात असलेल्या या लहानशा ग्रहावर आयुष्याचा मतलब काय असावा हे समजून घेण्यासाठी धार्मिक पुस्तकांचं कितीही वाचन केलं, देवावर कितीही श्रद्धा असली तरी त्याचा काहीही उपयोग झाला नाही. हे जग ज्या कुरूपतेशी लढा देत आहे, माणूस माणसाशी ज्या क्रूरपणे वागतो आहे, ज्या काही लढाया, वंशविच्छेद, कपटीपणा आणि तिरस्कार दिसून येतो आहे त्यातलं काहीही मला झेपेनासं होतं. सर्वव्यापी ईश्वर अशा गोष्टी घडूच कशा देतो?   

एरवीचा माझा काल्पनिक आधार नाहीसा झाल्यावर मी पुस्तकांकडे वळले आणि त्यांनीच मला तारलं. मात्र माझ्या कुटुंबियांसमोर हे सत्य स्वीकारण्याइतकं धैर्य मला कधीही गोळा करता आलं नाही, अगदी माझ्या नवऱ्यासमोरही नाही. त्यांच्या भावना दुखावल्या जाण्याची मला भीती वाटते हे खरंय पण त्याहीपेक्षा मी या वळणावर का आणि कशी येऊन पोहोचले हे त्यांना विशद करून सांगणं मला अधिक त्रासदायक वाटतं. शिवाय त्यांना माझे विचार समजतीलच याची मला खात्री वाटत नाही. मी असं करणं कदाचित बरोबर नसेलही पण मला कायम हे असंच वाटत आलं आहे.  

वाचकहो, तुम्हाला माझ्या सचोटीविषयी शंका घ्यावीशी वाटली तर खुशाल घ्या. तुम्ही माझ्या या अवस्थेवर टीका केलीत तरीही माझी हरकत नाही. मात्र काही गोष्टी न बोललेल्याच बऱ्या असतात असं मला वाटतं. ते कदाचित चूकही असेल पण आपल्यापैकी अनेकजण आयुष्यात कधी ना कधी असं वागतात हे नक्की. त्यामागे मुद्दाम एखादी गोष्ट गुप्त ठेवण्याचा हेतू नसून त्यामुळे इतरांना त्रास होईल या काळजीचा भाग जास्त असतो.   

सुरुवातीला विशेषतः सणावाराला घरी पूजा असल्या की, मला त्या कर्मकांडाशी जुळवून घ्यायला खूप त्रास होत असे. मग हळूहळू मी इतर कोणत्याही कामासारखंच नियमित करावं लागणारं एक काम म्हणून त्याकडे बघू लागले. लोकांना देवाला आणि आपल्या श्रद्धेला चिकटून राहावसं वाटतं याचा मी आदर करते. अर्थात त्या गोष्टी इतरांविषयी तिरस्कार वाटायला कारणीभूत ठरत नसतील तरच. जीवनाच्या नाजूक, क्षणभंगुर अवस्थेमुळे आणि आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींच्या भीतीने मुळात माणसं आपल्यापेक्षा सामर्थ्यवान वाटेल अशा एखाद्या गोष्टीवर श्रद्धा ठेवायला तयार झाली असावीत. हजारो वर्षं या ग्रहावर राहिल्यावर आणि आता विज्ञानात, शिक्षणात एवढी प्रगती केल्यानंतर मानवी मन काही वेगळं वागेल असं म्हणणारे आपण कोण? एवढं सगळं शिकूनही अजून आयुष्याबद्दल, आपल्या या अस्तित्वाबद्दल कितीतरी शोध लागणं बाकी आहे. तेव्हा काही झालं तरी हा आपली काळजी घेईल असा विश्वास ज्याच्याविषयी वाटतो, अशा एखाद्या काल्पनिक रक्षणकर्त्यावर लोकांची श्रद्धा असेल तर ते समजण्यासारखं आहे. 

यावरून आता मला आणखी एक दडवून ठेवलेली गोष्ट उघड करावीशी वाटते आहे. एक अशी गोष्ट, जी मी आजपर्यंत स्वतःपासूनही लपवून ठेवली आहे. 

दोस्तोव्हस्की एकदा म्हणाला होता:

“मानवाच्या गत आयुष्यात अशा काही विशिष्ट गोष्टी असतात ज्या तो सगळ्यांना सांगत नाही पण क्वचित फक्त आपल्या मित्रांसमोर उघड करतो. त्यातही पुन्हा अशा काही गोष्टी असतात ज्या तो आपल्या मित्रांसमोरही उघड करणार नाही, कदाचित फक्त स्वतःशी कबूल करेल तेही एखादं गुपित असल्याप्रमाणे. परंतु, अखेरीस अशाही काही गोष्टी असतात ज्या स्वतःशी उघड करायला देखील तो घाबरतो. प्रत्येक सभ्य माणसाच्या मनात अशा अनेक गोष्टी साचलेल्या असतात.”

मला हे पटतं. स्वतःशीही कबूल करायला भीती वाटावी अशा अनेक गोष्टींचा साठा प्रत्येक माणसाकडे असतो असं मला वाटतं. माझ्याकडेही अशी एक गोष्ट आहे जी याआधी मी स्वतःशी स्पष्टपणे कबूल केलेली नाही.  

ती गोष्ट म्हणजे, अज्ञेयवादाकडे वळल्यानंतर एवढी वर्षं मला छळत असलेली काहीतरी हरवल्याची भावना.  

याआधी जर काही चुकीची गोष्ट घडली तर मी देवाला दोष देत असे किंवा काही चांगलं घडलं तर त्याचे आभार मानत असे. अधूनमधून बरं वाटावं म्हणून मी त्याला शरण जात असे. मला कधीही एकटं वाटत नसे कारण आपली काळजी घेणारं कोणीतरी आहे अशी माझी समजूत होती. आता त्या भावनेवाचून मला चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं. कशावर तरी किंवा कोणावर तरी पूर्ण विश्वास टाकता येण्याची ती भावना होती. अर्थात त्यामुळे मी पुन्हा देव मानू लागले असं नव्हे. मात्र एकदा ती गोष्ट गमावली ती गमावलीच. आता या विशाल जगात लाक्षणिकदृष्ट्या आपण एकटेच आहोत असं लक्षात आल्यावर कधीकधी मला दडपण येतं. कधी विसंगत तर कधी भवतालाशी जुळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे माझे विचार माझ्या ‘स्व’ला गोंधळून टाकायचं सोडत नाहीत. दुसऱ्या एखाद्या माणसावर संपूर्ण विश्वास टाकायला मी कदाचित कधी शिकलेच नाही म्हणून असं होत असावं.  

यावर आता असा प्रश्न उपस्थित होतो की, कोणी एखाद्यावर असा संपूर्ण विश्वास टाकू शकतं का? तसं कोणी ठामपणे सांगू शकतं का? तसं असतं तर आपल्याला एकमेकांपासून गोष्टी लपवाव्याच लागल्या नसत्या; पण आपण त्या लपवतो. अगदी आपण सगळेच. कदाचित दुसऱ्या माणसावर संपूर्ण श्रद्धा ठेवल्याने माणूस अधिक हळवा होत असावा, दुखावण्यासाठी, शिव्याशाप देण्यासाठी किंवा फायदा घेण्यासाठी सहज उपलब्ध होत असावा. कदाचित ही हळवेपणाची भावना म्हणजे दौर्बल्य वाटून आपल्यापैकी बहुतेकांना अनुभवावीशी वाटत नाही. त्यामुळे आपण आपली गुपितं जपून आपापल्या हृदयांभोवती भक्कम भिंती उभारतो. या भिंती आपलं रक्षण करण्याइतक्या बळकट असतातच पण कदाचित आयुष्याला कडकडून मिठी मारता येऊ नये इतक्या जास्त सामर्थ्यवानही असतात.   

शिवाय वैयक्तिक आयुष्यात गुपितं कवटाळून बसण्याची गरज पुरेशी नाही म्हणून की काय, मी सार्वजनिक आयुष्यातही तेच करताना दिसते. अर्थात त्यामागे आपले कुटुंबीय आणि आपलं सामान्य आयुष्य सुरक्षित राहावं हे कारण असलं तरीही माझी राजकीय मतं उघडपणे व्यक्त न केल्याबद्दल मी स्वतःचाच धिक्कार करते. सरकारी नोकर असल्यामुळे मला या गोष्टी करता येत नाहीत. नाहीतर मला नोकरीतून निलंबित केलं जाण्याची किंवा त्यापेक्षा वाईट म्हणजे नोकरीवरून काढलं जाण्याची भीती आहे. एकंदर परिस्थितीतला दांभिकपणा सध्या दिवसरात्र भरून राहिलेल्या उदासीनतेत भरच घालत राहतो. थोडाफार दिलासा देईल असा एकही आशेचा किरण दिसून येत नाही. गुप्ततेचं कुंपण अजूनच उंच होत चाललं आहे. तरीही एकंदर समाजाला व्यापत चाललेल्या सामुदायिक आघाताच्या भावनेशी आपलंही नातं असल्याच्या जाणीवेतून सुटका होत नाही. ही निराशा उराशी बाळगत जाताना, एखादं गुपित बाळगायचं म्हणजे फार मोठं काम वाटतं. ते काम हाताळण्याची मनाची तयारीच झालेली नाही.    

यातून बाहेर कसं पडायचं? सध्याच्या परिस्थितीत दिसणाऱ्या धोक्यांना बगल देऊन आपली चिंता कशी व्यक्त करायची? त्रास होण्याची किंवा अटक होण्याची भीती न वाटता आपलं मन मोकळं करणं ज्यामुळे शक्य होतं ती करुणा कुठे आहे? माझ्याकडे यातल्या काही प्रश्नांची उत्तरं असती तर बरं झालं असतं. कायम असणारी एकच गोष्ट म्हणजे बदल, हाच यातून एक ना एक दिवस सुटायचा मार्ग दिसतो. तोवर आपल्या हातात केवळ वाट पाहणंच उरतं.  

आयुष्याच्या या एकाकी प्रवासात स्वतःला घट्ट धरून ठेवायला आपण स्वतःभोवती या अशा तटबंदी बहुधा उभारतच राहू. तरीही आपण सगळे एकत्र तगून राहू आणि अधिक सुसंवादी जग निर्माण करण्यात यशस्वी होऊ अशी मला आशा आहे. त्या जगात आपण शांतपणे बसून कोणालाही न जोखता, न घाबरता एकमेकांचं म्हणणं ऐकायला शिकलेलो असू.  

Image Credit: Ajay Sharma

राखी दलाल हरियाणातील एका लहान शहरात राहून आपले लेखन करतात. त्यांचे साहित्य नेदर, किताब आणि बॉर्डरलेस जर्नल अशा वेगवेगळ्या साहित्यविषयक नियतकालिकातून प्रकाशित झाले आहे. ‘बाऊंड इंडिया’ च्या निमंत्रणावरून त्यांनी केलेले फाळणीच्या आठवणींवरील लेखन बक्षीस-पात्र ठरले आहे.

आश्लेषा गोरे पुण्यात वास्तव्यास असतात. त्यांनी केलेली मराठी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत. वाचन, भाषाभ्यास आणि नाटक यामध्ये त्यांना रुची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *