दा.गो.काळे

उखळाचे घर



back

                      l१l

ज्या आजोळात जन्म झाला ते घर उखळाचे होते तेव्हापासून घुसळण सुरू आहे जीवाची

रवी गाडगी हयात होती आणि हात हातात नव्हते तेव्हाची गोष्ट

खोलीत अंधार असायचा गर्भाशयच होते ते गडद जन्माआधी कोणाच्याही असण्याचे सहजसे संकेत

लेकी यायच्या व्यायच्या आणि प्रयोजन संपायचे खोलीचे अंधारभयाचे आर्जवही मुक्त व्हायचे सातजन्मात अडकलेल्या जीवाचे अखंडित

                      l२l

सुना यायच्या माप लवंडून चढायच्या उबंरठा सार व्हायच्या लेकीही आवारातून रडूनभाकून दोघी दोन्हीकडे रुळायच्या संसारात कांडायच्या आपले मरण 

रचत होत्या सरण दिवसेंदिवस 

रांधत होत्या पंगती उठवत होत्या घरादारात मांडवाचे प्रसंग येत जात होते मरणाचे उत्सवही नवे नव्हते या बिरादरीत दुःखाचीही नव्हती वाण सगळे सोहळे पिढीजात

                      l३l

ह्या घराला चौक होता आणि चार पिढ्या चार संसार नांदत होते भांडतही होते जीव लावून करीत होते कीव एकमेकांची

अवघ्या गोतावळ्याच्या मधोमध माडी होती मावद होते उबदार हातात हात गुंतले होते पसाऱ्यात पसारे सगळ्यांचे उघड्यावर 

चौकात सदासर्वकाळ सर्व ऋतू सजायचे पाऊस बरसायचा कोवळी कोवळी उन्हं रमायची अंगाखांद्यावर घराला एक चौकोनी आभाळ होते भाळ होते आपआपल्या नशिबाचे दारही होते

घरातल्या बायामाणसंलेकरांनी फुलायचा चौक

सगळे व्यवहार चोख होते कोणतीही नव्हती खोच मनात

गाऱ्हाणे चौकाला माहीत व्हायचे मनाच्या चौकटीत दडवणे त्यांना ठाऊक नव्हते याच गजबजलेल्या चौकोनात हारीने

बक्तारशाॕ फुलारी फुलं घेऊन येत राहिला न चुकता घालत राहिला बेलफुलं शेरअघेलीपसा देत राहिल्या बाया आणि ऐकत राहिल्या एकादशी प्रदोषाचे वारउपास आठवणीत राहावे म्हणून जन्मभर चौक फुलत राहिला 

फकीर बेफीकीर म्हणत राहिला देवनारळाचे काळे भिक्षापात्र साखळीसहित खनाटत लावायचा लय l दुनियामे कोई ऐसा मर्द है l जिसे ईश्वरका बहूत प्यार है l असले काहीसे भजन चौकाच्या ओसरीत गात यायचा जायचा दिवसांना दिवस शिवत संसार त्यांचे ताणतूनतच असत  बासरीचे सूर निनादत होते बाळगोपाळांच्या साक्षीने सगळे आलबेल

                     l४l

चौकाच्या घरात तुळशीला म्हणून एक आपला हक्काचा तसमा होता स्वतःचा स्वतंत्र तिचे असतेपण सगळ्या घरादारातही व्यापून होते भोवती तिच्या सुखदुःखाचे फेर होते माणसांचे तिलाही तिचे आभाळ होते आझाद आपल्या बियादार मंजुळ्यांसाठी तावदान आकाशभरले

ती म्हणे या घराची सती होती सदगती मिळालेली म्हणे तिने तिने घेतले बिंद्राबनाचे रूप स्वरुपही तेच तिचा पारंपरिक धाक राबत होता सगळी कुटुंबवत्सलताच नांदत होती कुशीत तिच्या 

तुळशीच्या मनोमन आज्ञेशिवाय नव्हता पडत पाय बाहेर लेकी नव्हत्या मार्गस्थ होत लेकरांचे माथे टेकत तिच्या भव्य रूपासमोर सुनाही माहेरी धकायच्या नाहीत कुंकू अंगारा आणि तिची माती कपाळाला लावत मनात भाकत करुणा कोवळ्या मायेची

                      l५l

या घराचे शानपण राखणारी एक आंधळी आजी होती तिला सगळे लहानी बुढी म्हणत ती या घराची लहान सून होती म्हणतात  तिला आलेलं रंडकेपण आणि आंधळेपण दोन्हीपण भोगत आली होती

तिला मानपान होता तिचाही एक कोपरा तहयात या चौकात शाबूत होता 

ती असो आंधळी पण तिची चौकसचाहूल घराची निगराणी गा-हाणीसाठी अपुरी पडे चौकात आल्यागेल्यांची लेकराबाळांची रुसव्याफुगव्याची चाहूलही आपल्या बोलण्यातून बोलत राही दिवसभर कोणतेही काम तिला नव्हते फारसे प्रेमाने तिच्याबद्दल कोणी बोलल्याचे आठवत नाही कटाक्षाने तिला टाळत आले कुणीही घरचेदारचे तिचा कोपरा बहाल होता तिचा तिला अबाधित वेगळा

माझ्या आजीने सारे तिचे केले ती कधी जाग्यावरुन स्वतः उठल्याचे आठवत नाही सारे सारे केले आजीने आंधळ्याची काठी तिच्याशिवाय फिरली नाही तरली नाही नाव ना फिरली आजीच्या शिडाशिवाय तिच्या जीवन प्रवाहात आजीने काही कसर ठेवली नाही नाही मिरवली कोणतीही अहंता ती असेपर्यंत आणि गेल्यावरही आजीने आपले घरपण चौकाबाहेर नेले नाही

आणि शहाणपण शाबूत राखले आंधळ्या म्हातारीचे 

                       l६l

आमची आजी होती मोठीच करारी बाई भडभड्या वाणीची नदेखल्या करणीची आबाची पहिली बायको वारल्यावर गंधर्व विवाहाने आली या घरात चौकात रुजली मुलाबाळांनी फुलली फळली चौकाची चौकट तिने कधी विस्कटवली नाही 

आबा गेल्यानंतर तिचा वनवास सुटला नाही झरा कधी आटला नाही आपुलकीचा चौकातल्या सुना लेकी जावा दिराण्या दीर नणदा नातू आल्यागेल्याचे करीत राहिली बिनभोबाट जीवनाची तिला ओढ होती कुठल्याही ओढाताणीशिवाय तिच्या जीवाचेच पुढे मातेरे झाले अवघ्या गोतावळ्याला निरस्त झाली निरंक आजी सोशीक होती

                       l७l

आंधळी आजी मेली बरीच वर्ष तगून  आपोआपच तिने शंभरीला फोडला शेंडा आपला गोंडा मिरवत जगली आपल्या इस्टेटीच्या मनातला जागता कोंभ होता तिच्यात शेवटच्या श्वासातून त्याचा वृक्ष झाला आणि पक्षांनी कहर केला केला कावाकांगावा  हिस्सेवाटण्यांचे वारे वाहू लागले पक्षांचे थवे रमू लागले झाडावर चौकीखांबाचे जोड थोडे झाले किलकिले आणि शेताचे बांध फुटून धाय मोकलून रडू लागले आज माडी मावद शेताचौकाची अर्धी सोबतीण अनंताच्या वाटेने निघून गेली फार रडले भेकले नाही कुणी तिचे गणगोत काही ना उरले न जमा झाले मात्र शेजा-यांचे डोळे  पाणावले थोडे थोडे शेजारले एवढे पुण्य पदरी बांधले तिने तिच्यात आणि आपल्यात  अर्धा जीव सोडून निघून गेली कायमची एक आठवण माझ्या मनात घर करुन गेली तुकारामाची काठी पोरकी झाली सरणावर चढली

                      l८l

शब्दांवर शब्द चढले बायांच्या आतआतल्या धुसफुसी चौकात आल्या माणसं डुरकून जाग्यावर विरली त्या चौकाच्या एका भारंसूद जावाईबाप्पुनी वाटण्यांचा कागद चारचौघात फिरवला आणि अवघा धुरळा बसला जमिनीवर चौकाच्या चार शिळा वेगवेगळ्या झाल्या माड्या मावदाचे खांब वाटले गेले चौघात चौकाची गोष्ट चौसर होऊन पुढे खेळत राहिली पट माणसांच्या सोंगट्या फिरु लागल्या कलाकलाने आपआपल्या अंतरावर  खेळ रंगू लागला हातातल्या गोट्या करकरु लागल्या मुठीत आभाळ आल्यासारख्या गरजू लागल्या पटावरचं जगणं वेग घेऊन चालू लागल्या आपल्या चाली कुणी कुणाचा वाली उरला नाही चौक म्हातारा होत चालला आपलं जगणं हळुवार टेकवत काठीचा आधार घेत घेत पिंपळाच्या मुळ्या नकळत शोधत गेल्या चौपदरी चौकोट भिंतीच्या भेगा आणि चौकाच्या पायव्यात भेदले आपले मूळ सगळे कूळ उलथवून पाडण्यासाठी त्याने सगळी माडी बिरादरी पोखरली  आतली रया वर आणली चौघात चौकाची चाराची गोष्ट वा-यासारखी पसरली वेशीत पंचक्रोशीत लेकी विचारमग्न झाल्या सुना सरसावल्या पुढे पुढे चौक उदास  सासवांना सुनांचा जाच सुरू झाला आणि चाव्याकुलपांचा सुळसुळाट जिकडे तिकडे चोहीकडे नजरांना भ्रम फुटले पिकले माजले संशयाचे पीक घनदाट 

                        l९l

बाईची कुठलीच गोष्ट सरळ साधी नसते

तिच्या अवस्थातंराची एकेक पाकळी गळतच जाते मग ती फूल फूल राहत नाही तेथे उरते केवळ आपल्या असतेपणाची काटेरी फांज गोळीबंद देठ तश्या आमच्या आजीच्या जन्मापासून अनेक पाकळ्या गळत राहिल्या  कळत होत्या पुढ्यात आलेल्या ठेचा तरीही तिला शोधता आले नाही शिंपल्यात घडणारे मोती स्वभावाच्या गाठी आतल्या आणि बाहेरच्या  गाठी टणक त्या फुटता फुटल्या नाहीत नाही वाहला पश्चातापाचा ऊनओल्या आसवांचा पूर

ती नवथर मुलगीही होतीच लेक झाली सून झाली माय झाली प्रेमभरली साय झाली दुधावरची सासू झाली आजी झाली तिने दही दुधदुभते केले कसोसीने सुना राबवल्या वाकवल्या नणंदा जावा वागवल्या पाठवणी केली रडभेक

धुसफूस केली नातीनातवांना हिडीसफीडीस केले लाडही केले अपार लेकींच्या लेकांचा दुस्वास केला गमतीसंमतीनं जावयाचं पोर  हरामखोर म्हणून हिणविले शरमिंदे केले त्यांचे मुक्काम डांगोरा पिटला आणि सगळा चौक नात्याच्या हक्काने गाजवता आला तिने स्वतः  राबराबराबून आपल्या हक्काची पायमल्ली होऊ दिली नाही चाव्याच्या जुडग्यातून सगळ्या माणसांचा एकच भारा तिने बांधला करकचून आयुष्यभर सगळ्या साभिनयातून बाईपणाच्या अवघ्या अवस्था पुढच्या पिढीला प्रदान केल्या तिच्या करारीपणाची टोकं म्हातारपणात रुतली तशी रुतलीच आणि तिचे असणे मवाळ झाले सगळ्यांच्या मनातले शेवाळे झाले पाणी पाणी झाले जीवाचे कोणी भावाचे राहले नाही पाणीदार हिरवी मने रुजता रुजता रुजली चौकात आजीची औकात पुरली नाही सून सून राहिली नाही नुसतीच भुनभून पाठी लागली भांडणांना तोंड फुटले अफवांना तोंड जवळजे नाते दूर गेले लेकी भेटीगाठी येत गेल्या माहेर हळूहळू तोडत गेल्या जोडत गेल्या मायेने सोपवून दिलेल्या संसाराचे ओझे दूध तोडलेल्या मुलांसारख्या झाल्या अलगविलग आयुष्यात एकदाच तिने दवाखाना पाहिला आणि वार्डातल्या पांढ-या पेहरावात लगबगीने धावणा-या नर्सेस नाकातोंडात नळ्या कोंबलेली रात्र तिची सगळी गात्र मलूल करीत गेली मरणाला शरण तशीही ती अंशाअंशाने मरतच आली होती आणि सरणावर सरण रचत चालत राहिली पुढेपुढे चौकाचे चौकपणही चौकसपणाच्या हवाली झाले रया गेली कोणतीही दयामाया फिरकली नाही अवतीभवती सगळ्या सवती उभ्या झाल्या जगण्याच्या भोवती

                      l१०l

चौकाची गोष्ट आमच्या आबाशिवाय कळसाला जात नाही चारचौघांची होत नाही खरे तर आबा आमच्या सौभाग्याचा मेरु होता सगळ्या मण्यांची गाठ वैभवाचा थाट होता कुळजात  त्याला मिळाले होते नायकत्व सत्व या घराचे पिढीजात रक्तातूनच वाहत आला होता गरिबीचा वारसा नव्हता उतण्यामातण्याचा सोस सगळे शौक ओस केले जगण्याला चिटकलेले अर्थ त्याला कळले होते सगळे अनर्थही आयुष्याचे राखले होते अवतीभवती  साखळलेले होते रक्तात चौकच हवा होता माणसांबाया लेकरासह शेजा-यापाजारांच्या आपलेपणात न्हालेला

गावशिवारातही त्याचा मान त्याने सौहार्दाच्या उठवल्या पंगती कोणतीही गिनती केली नाही आयुष्याची फक्त माती

त्याने चौकात उत्सव मांडले भांडणे मोडली चौकातल्या लेकीबाळींची लग्न जमवली लावली पाट लावले आणि जगण्याला नव्या दिशा दिल्या लेकीबाळींच्या आपल्या लेकींच्या गरीब सोय-यांच्या पदरांना बांधल्या जन्मगाठी आठी कपाळावर दिसली नाही

वाढविला घराण्याचा सन्मान चौकाच्या खांबांना अस्मितेचे बळ दिले अंगावर वळ उमटू दिले नाही नाही कोणाचा छळ रचला विनाकारण

जगत्याला वाट दिली आपली वहिवाट सोडली नाही नेकीने चौकातल्या भावांचे संसार आपले मानले जगणे खुंटू दिले नाही कोणाचे कोणतीही भेग पडू दिली नाही भिंतीना खांबाची खांबाला कळली नाही वित्तंबातमी हवेलीचा खांब ढळला नाही कोणताही शब्द पडला नाही परिसरात ना लौकिकाला तडे गेले ना कोणालाही खडे चारलेत बेमानीने

                        l११l

रक्त हे पाण्यापेक्षा घट्ट असतं 

पाणी फाकतं काठीनं

नाती तशी घट्ट असतात नाही फुटत त्यांची बुंथी सूर्यप्रकाशाइतकीच ती खरी असतात कोणत्याही कुंतीशी जोडली असते त्याची नाड एखाद्या कर्णाइतकीच गाढ असतात ती

तशी चौकाची आर्द्रता होती टिकून आतून आतून आणि पाण्याचे दांड अगदी नेटून नेटून वाहत होते रक्तात मिसळण्याची त्यांची  भीती ओली होती लोणा लागण्याची 

भावांची घरे वेगवेगळी झालीत जावा वाटल्या गेल्यात नणंदाच्या मनात निर्माण झाले संभ्रम नाती वाटल्या गेली आणि पाण्याच्याही वाटण्या झाल्या चौक वाटल्या गेला इंचाइंचाने उघड्या चौकाचे आकाश पांगले आपआपल्या हक्काची झाली जाणीव नेणिवेत नात्यांची मांडामांड झाली नव्याने माणसाची गोष्ट मूळपदावर आली त्यांना माडीच्या पाय-यांनी उंची गाठण्याचा मान दरवाजाच्या कमानीचे भान राहिले नाही मावदाच्या अंधाराला डोळे फुटले नाही

उजेडाचे काहीकेल्या अवघे विणत राहिलेत गोणपाट जाडेभरडे मनातले भांड्यांना भांडी लागत राहिली चालत राहिली दुनियादारी सगळ्यांची माणसांसमोर बायांची चलती सुरु झाली क्रमाक्रमाने 

काळ जात राहिला नव्याने कळत राहिला चौकाला अवकळा येत राहिली माणसाबायांलेकरांना विसर पडला गळून पडल्या आवाराच्या भिंती मनाच्या लोणाभरल्या ठिसूळ कधीच्याच झाल्या होत्या खोलातून वर चढत आले होते मिठाचे खारे खारे थर वर घर सादळ सादळ खिन्न झाले होते शिवाराच्या बांधावरील दगडांनाही पाझर फुटला आटला होता पान्हा सगळ्या जीवांना घोर 

काळासारखे औषध नाही काळाला ब्रह्मांडाच्या गाठी सुटतात तुटलेली नाती जवळ येतात येतात कळवळे दाटून आणि रक्ताची नाती अधिक घट्ट बनतात काठीने पाणी वेगळे झाले तरी प्रवाह थांबत नाही कुळाचा जगण्याची वारंवारीताही खंडत

नाही भंगत नाही जीवनातील अक्षय लालसा

                       l१२l

गाळाचे स्तरीत खडक बनतात तसा काळ कठीण होत गेला झिरपत गेलेली खोल ओल मातीदगडातून वर आली भिंतीना फुगारे आले खाबांनी माया सोडली भिंत खचली उजेडाने अंधाराला घेरले एकट्यात आणि मावदाचा कोपरा हळहळला तसमा तसमा विकल होवून पाहत राहीला अंधाराला जोडलेले प्रकाशाचे चरित्र परिशिष्ट होवून आलेत जून आपल्या कारकीर्दीचे 

कोणालाही सुचले नाही रुसले धरांचे दरवाजे पावलांना आठवांचे काठ लागले चौकाचे घाट पाय-यांना मुकले घरादारांची मूठ सैल झाली कायमची माडीने जिर्णोध्दार पाहिला नाही साहिला सगळा अंधार जन्मभर 

                      l१३l

अंधारातून सृजनाला मार्ग सुचतो तसे गवाक्ष होते मावदाला ज्यातून कवडसा फाकत होता वाकत होता प्रकाश सर्वत्र आणि देवापुढे लवलवायची एक मिणमिणती ज्योत ज्यात वाचला हरिपाठ नित्यनेमाने जशी आयुष्याची वाट शोधावी क्रमाक्रमाने तसा

माझाही एक कोपरा तयार झाला अंधारातच मी माझी सावली पाहिली पहिलीवहिली ओळ तयार झाली कवितेची कवडश्यातूनच पुस्तकातील अक्षरे डोळाभर झाली मला अंधाराचे वेध लागले तगले जगणे जीवाभावात वेगळे काही सुचले नाही उजेड देहभर पसरला ओसरला नाही आजवर माझ्या पुस्तकंवह्यांची फडफडली पाने पाठांतर ऐकवले भिंतीना माझ्या संदुकातून आतली कवाडे उघडी झाली आणि प्रकाशला देह आतून आतून मनाच्या खिडक्यांना समज आली तळघरात हालचालींना वेग आला मनातल्या जमिनीला जागा मिळाली कोंभ कोंभ जोमाने वाढत गेला हृदयातून पालवीचा जन्म झाला 

याच अवकाशात हळुवार उलगडली  सुकल्या डाळिंबाची रसाळ गोष्ट जी अवघडली नाही कधीही आयुष्याच्या प्रतळावर वस्ती केली

                        l१४l

जगण्यासाठी मनमोकळे आकाश चढण्याउतरण्यासाठी पायऱ्या असतात ही जाणीव या चौकाच्या माडीने रुजवली मनात तेव्हापासून बेभान वा-यातही शिडात वारे भरुन नांगर रोवला मनाच्या काठावर आणि कवेत आदळणा-या नागफण्या सागरलाटा पाणीपाणी देहातून वल्हवल्या हिकमतीने दिमतीला कोणी घेतले नाही आगंतुक म्हणून आलो या घरात गुंतलो नाही कोठेही पाहत साहत स्वतःला स्वतःत शिकवत गेलो कोणाच्या अध्यात ना मध्यात हृदयात केली वस्ती पोटात शिरुन भुकेची आग विझवली कष्टाचे पाणी प्यालो व्यालो सगळ्यांना लेकरासारखा होवून राहलो वनवासात आपला स्वास कोंडू दिला नाही जाणवला नाही परदेश

                      l१५l

चार तसम्याची बैठक होती समोर ओस पडलेली माझ्या सोसलेल्या मुक्कामात

किती लोकांचे पाय लागले झाडली असेल धूळ पहुडले असतील व्याहीजावई आरामात चहापाण्याची वर्दळ बारोमास 

चाललेली आता बैठक राहिली नाही नाही पाहुण्यारावण्यांची वरदळ भिंतीची पडझड झालेली अतोनात

उदास झाल्या खांबावरल्या नक्षी दळदार उतरले पक्षी वस्तीला कोपरा न कोपरा व्यापला चिवचिवाट झाला जीवापाळ मुलांचिमण्यांनी थयथयाट केला पार आरपार खेळण्यासाठी 

मुलींनी भातुकलीचे खेळ मांडले त्या वास्तूत मुलांनी  बाजार आणले वसवले खोटेखोटे खोट्याखोट्याच नात्यांची गुंफण केली अंगणात केली शिंपण सडासारवणांचे धडे गिरवले खरे खरे सनभात केले मुलींनी जेवणावळी उठवल्या मांडले उत्सवाचे थाटबाठ भांडल्या सांडल्या मुली आपल्या स्वभावातून परंपरा पुढे ठेवल्या नेल्या वळणावर सासरचे रस्ते तोरणामांडवातून

सजून धजून कमान केले आपल्या संसारात दिवे लावले खापराचे कापरासारखे आयुष्य लयीत जाळले पोळल्या चुलाण्यात आण्याची उजागिरी राहिली नाही झरली नाही माया पुरुषाची बाया त्या बाया झाल्या  मिळाल्या अवघ्या सरणाला त्यांनी आपले मरण कांडले सासरवासात चौकाच्या आठवणींतून मुक्त केले स्वतःला स्वतःतून स्वतःला वजा करीत गेल्या जगवला तारला माणसांचा वंश दंश सोसून आपल्याला माहेर केले बाहेर उभे ठेवले नाही उंबरठ्याच्या कोणालाही

                          l१६l

मला वेध लागले शोध पहिल्यावहिल्या कवितेचे पाहिले जोखले साहिले वाहते झाले शब्दांतून जगण्यावागण्यातील अंतर तदनंतर फक्त कविताच माझ्या सोबत होती आणि मी तिच्या शब्दात होतो सदासर्वकाळ गुंतलेला

चौकाच्या माडीवरुन पाहिलेलं जग जोखली माणसं किती जवळ किती दूरची नाती जगण्यातला सूर गवसत गेला 

शाळा होतीच दिमतीला तेच खरे या असण्याचे प्रयोजन त्यासाठीच एवढा अट्टाहास केला लळा लावला शेतमळा बैलजोडीचा ध्यासही अभ्यासाला जोडत आला तरीही या व्यापातून वाट काढली तापातून झालो एकटा अलिप्त फुलांझाडांवर कविता लिहिल्या अती भावूकपणात झाड माझे बाड झाले कवितांचे ओझे सांभाळून घेतले ढोलीत पक्षांच्या बाळंतपणासारखी माझ्या कवितांचे बाळसेही केले झाडांनी मी मला माझे झाड झालो आड झालो मळ्यासाठी उगवण्यासाठी भूमी झालो मनातल्या मनात कोणासाठी बियां रुजल्या झाडं झालो

प्रेमासाठी कोणाचा तरी प्राण झालो कळले नाही काही कळता कळता काहीतरी जोडत गेलो चौकाशी इमान राखले आयुष्यात कधी बेइमान झालो नाही नाही आतड्यातून नाती गहाळ झाली दुःखाचे पहाड पेलले तरी माझे घर माझ्यासाठी हालले नाही द्रवले कधीही मावदाच्या अंधारातला सोनपंखी उजेड चौकाच्या खोलीची ओल उखळाच्या घरातल्या मातीची आठवण घेत जगत आलो या एकविसाव्या शतकातही

                        l१७l

माडीवरुन चांदण्याच्या रात्री पाहिल्या भरभरुन सगळ्या ऋतूंचे कुतूहल मनात साठवले पायऱ्यावरुन पायऱ्या चढत उतरत स्वास भरले हृदयात यातायात सोपी करुन घेतली वाकलो ते क्षमेसाठी याचनेसाठी रुकलो नाही स्वाभिमानाच्या छातीतून चढ चढलो कधी हवा भरली नाही भात्यात नात्यात फुशारकी मारली नाही साबीत केले आबीत राहणे समोर काळ मोठा कठीण होता 

अंधारशी अंधार सांधणा-या जुन्या हेमाडपंथी देवळाशी सोबत केली अलगद ठेवलेल्या दगडांना आधार मानले साधार थंड्या अंधारातून देव पाहिले घ्रात मनाचे काठ अनाघ्रात राहिले नाही सगळा कोलमडून पडला विश्वास स्श्वासांना सहवास मिळाला नाही वनवासाच्या घरात आल्यासारखे वाटले पडले मनाचे देऊळ कुठेतरी पडझडले आतात खचलेले ब्रम्हा विष्णू महेश काळाच्या ओघात

मावदाच्या अंधाराच्या कवडश्यातून

देवळातील अंधाराचा पांग फेडला त्याच्या थंडगार अस्तित्वात शोधल्या आयुष्याच्या पोथ्या अभ्यासलो काही काळ ध्यासलो स्वतः स्वतःसाठी गाठी मारली कमाई

                     l१८l

माणसं आली गेलीत राहिली काही जीवाभावाची काही झालीत इतिहासात विलीन ज्यांनी लळा लावला होता त्यातील पंतही गेले आणि भडभडून आले होते खंत आली होती दाटून आतून काहीतरी गलबलले होते 

म्हणतात त्यांची पत्नी लहान लहान चार चिल्यापाल्यांना सोडून गेली तेव्हा आबांनी हात दिला मदतीचा मुलांना परके ठेवले नाही दिली मायेची उब चौकात हुबेहूब प्रतिपाळ केला मायेची पाखर घातली पंखाखाली घेतले

पंताना विसर पडला नाही त्यांनी चौकातल्या लेकी सुना आपल्या मानल्या घराचे ऋण मानले मला प्रेम दिले भरभरुन त्यांच्या मुलात बागडलो परके मानले नाही वाहत आलो आजवर

चित्र: सावनी चौधरी 

दा.गो.काळे हे मराठी कवी, संपादक, समीक्षक असून ते भारतीय डाक विभागातून निवृत्त झाले आहेत.  त्यांची आकळ, अरण्याहत  अशी पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना  लेखनासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

7 comments on “उखळाचे घर: दा.गो.काळे

  1. Ravindra Damodar Lakhe

    सुंदर

    Reply
  2. Dinkar Manwar

    दागो

    सुंदर कविता.

    Reply
  3. सुचिता खल्लाळ.

    सुंदरच !!

    Reply
  4. Devidas Kalaskar

    अजून लिहा सर पुढे. बेस्ट.

    Reply
  5. व्यंकटेश चौधरी

    सुंदर…

    Reply
  6. अनिल कोष्टी

    अप्रतिम!

    Reply
  7. Arun Thoke

    व्वा…
    कविता आवडली.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *