जेम्स बॉल्डविन आणि ऑड्रे लॉर्द

मराठी भाषांतर: अनुज देशपांडे

क्रांतिकारी आस



back

प्रसिद्ध कृष्णवर्णीय (ब्लॅक) लेखक, विचारवंत जेम्स बॉल्डविन आणि ऑड्रे लॉर्द यांच्यातील हा संवाद ‘म्युझियम ऑफ कंटेंपररी आफ्रिकन डायसपोरा आर्ट्स’ यांनी त्यांच्या Tumblr पेजवरून पुनः प्रकाशित केला. हॅम्प्शायर कॉलेज, ॲमहर्स्ट, मॅसेच्युसेट्स इथे हा संवाद झाला आणि १९८४ मध्ये ‘इसेन्स’ मासिकामध्ये तो पहिल्यांदा छापून आला.

कृष्णवर्णीय किंवा काळ्या (ब्लॅक) स्त्रिया आणि पुरूष यांचा वंशभेदाचा इतिहास समान असला तरी तो त्यांच्या भिन्न लिंगाधारित इतिहासांना, अनुभवांना झाकोळून टाकू शकत नाही ही महत्त्वाची बाब या संवादातून प्रामुख्याने अधोरेखित होते.

जेम्स : काळे अमेरिकन असण्याचे जे काही धोके आहेत त्यातील एक म्हणजे ‘छिन्नमनस्क’ असणं आणि मी छिन्नमनस्कता हे खूपच शब्दशः म्हणतोय. काळे अमेरिकन असणं म्हणजे एका अर्थी गोरे म्हणून जन्माला येण्याची मनीषा उरी बाळगणं आहे. इथे जन्माला येण्याची जी किंमत तुम्हाला मोजावी लागते त्याचाच हा भाग आहे आणि प्रत्येकच कृष्णवर्णीय व्यक्तीवर याचा परिणाम होतो. आपण थोडं मागे जाऊ.. म्हणजे व्हिएतनाम, किंवा कोरिया किंवा अगदी दुसऱ्या महायुद्धापर्यंत आपण मागे जाऊ शकतो. डब्ल्यू. ई. बी. द्यू बुआ ( W.E.B. Du Bois ) म्हणजे एक अतिशय आदरणीय आणि सुंदर माणूस. त्याने त्यावेळी कृष्णवर्णीयांनी महायुद्धात लढण्यासाठी सहभागी व्हावं अशी भूमिका घेऊन बराच प्रचार केला होता. त्याचं असं म्हणणं होतं की, आपल्या देशाला वाचवण्यासाठी आपण जर (गोऱ्या अमेरिकन लोकांसोबत) या महायुद्धात लढलो तर भविष्यात कधीच आपल्या नागरिकत्वावर शंका घेतली जाणार नाही. आणि खरंच आहे ते. त्यांना तरी आपण दोष कसा देणार ? त्यांना खरंच तसं वाटत होतं आणि मी जर त्यावेळी असतो, तर मी सुद्धा कदाचित असंच म्हणालो असतो. द्यू बुआ यांचा ‘अमेरिकन ड्रीम’ वर विश्वास होता. मार्टिन (ल्युथर किंग) चाही होता. माल्कम (एक्स) चा सुद्धा होता. माझा-तुझा आपल्या सगळ्यांचाच आहे. म्हणून तर आज आपण इथे आहोत.

ऑड्रे : माझा नाहीये, मित्रा. माफ कर , पण माझा नाहीय. आणि याबद्दल मला बोलावंच लागेल. आतमध्ये कुठेतरी मला माहीत आहे की ते (अमेरिकन ड्रीम) कधीच माझं नव्हतं. मी खचले, रडले, लढले, चिडले पण तरी मला माहीत होतं. एकतर माझं काळं असणं.. त्यात मी एक स्त्री असणं.. म्हणजे ज्यांच्यापाशी सत्ता आहे अशा कुठल्याच रचितांच्या आसपास नव्हते मी. त्यामुळे स्वतःला ताळ्यावर आणायचं असेल, किमान जिवंत राहायचं असेल तर ते मला एकटीलाच करावं लागणार होतं. कुणीच माझा विचार करत नव्हतं. माझ्याबद्दल स्वप्न रंगवत नव्हतं. कोणीच माझ्याबद्दल अभ्यास करत नव्हतं. आणि करत असेलच तर ते केवळ मला पुसून टाकण्यासाठीच.

जेम्स : तू असं म्हणतीयेस की ह्या ‘अमेरिकन ड्रीम’ मध्ये तुझं अस्तित्व एक दुःस्वप्न (नाईटमेअर) या पलीकडे दुसरं काही नाही..?

ऑड्रे : हो ! आणि हे मला माहीत होतं. जेव्हा-जेव्हा मी जेट उघडलं, कोटेक्स चा बॉक्स उघडला, जेव्हा जेव्हा मी शाळेत जायचे, किंवा जेव्हा मी प्रार्थनेसाठी पुस्तक वाचायचे तेव्हा तेव्हा मला हे पक्कं माहीत होतं.

जेम्स : जिथे तुमचा प्रचंड तिरस्कार केला जातो आणि त्याच वेळी तुम्हाला हेही सांगितलं जातं की तुम्ही प्रयत्न केलेत, तर अशक्य गोष्टीही तुम्ही मिळवू शकता अशा एखाद्या ठिकाणी जन्माला येणं ही म्हणजे फारच कठीण गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यातील व्यक्ती – मग ती स्त्री असो, पुरुष असो, तुमचं पोर -मुलगा असो किंवा मुलगी – तुमचा साथीदार असो – यांच्यासोबत जगण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता आणि या देशात अशा खडतर जगण्याला दररोज तोंड द्यावं लागतं.. आपण दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही. कसाही असला तरी तो दिवस सहन करणं, एकमेकांच्या सोबतीला असणं, मुलांना वाढवणं आणि कसंतरी हे सगळं सांभाळत पुढे नेणं हेच आपल्या हातात असतं. दिवसाचे चोवीस तास ही परिस्थिती असते आणि सुरक्षेचे सगळे उपाय तुमच्या अवतीभवती असतात. जिथे शक्य आहे तिथे तडजोड करा. तुमच्या खाकांना वास तर येत नाही ना याची खात्री करा. केसांना नीट वळण द्या. निर्दोष आणि परिपूर्ण राहा. जे जे तुम्ही करायला हवं असं अमेरिकन लोक तुम्हाला सांगतात ते सर्व करा. एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला काहीच होत नाही. आणि त्याहीपेक्षा वाईट गोष्ट ही की तुमच्या पोराला पण काही होत नाही.

ऑड्रे : दुःस्वप्नापेक्षा भयानक काय असेल तर रितेपण! काळ्या बायका म्हणजे हे रितेपण आहे. या सगळ्याची मला चिकित्सा नाहीये करायची, आणि शेवटी येऊन पोहोचायचं स्त्री-पुरूष या मुलभूत विभागणीपर्यंत. हा भेद जेव्हा आपण स्वीकारतो आणि त्याला सामोरे जातो, जेव्हा आपण एकमेकातील आत्यंतिक कडवेपणाशी सामना करतो, जेव्हा आपण आपली वेगवेगळी असली तरीही भयावह दुःस्वप्नं अनुभवतो, आपण जेव्हा त्यांच्याकडे जरा अंतरावरून पाहतो.. तेव्हा तुम्ही मृत्यूकडे पाहण्यासारखं आहे ते. कठीण आहे पण तरीही शक्य आहे. जेव्हा तुम्ही या सगळ्याकडे, त्याला अजिबात न कवटाळता, अगदी थेटपणे पाहिलंत, तर तुम्हाला कसली भीती वाटण्याची किंवा कोणी तुम्हाला भीती घालण्याची फारशी शक्यता उरत नाही.

जेम्स : हो, मला मान्य आहे. .

ऑड्रे : हां. तसंच जेव्हा आपण आपल्यातले फरक/भिन्नता पाहतो आणि तरीही आपल्यात फूट पडू देत नाही, जेव्हा आपण ह्या भेदांचा स्वीकार करू आणि त्यामुळे विभागले जाणार नाही तेव्हाच आपण यावर मात करून पुढे जाऊ शकू. पण आपण त्या ठिकाणी अजूनतरी पोहोचलेलो नाही.

जेम्स : ते काही मला पूर्णपणे मान्य नाही.. मला वाटतं, स्त्री किंवा पुरूष असण्याचा आणि काळे-पणाचा अर्थ हा एकंदरीत पाश्चिमात्य संकल्पनेपेक्षा खूपच सभ्य आणि बरा आहे. लिंगभाव, लैंगिकता किंवा तत्सम प्रश्नांवर कृष्णवर्णीय स्त्री-पुरूष सहसा गडबडून जात नाहीत. म्हणजे माझा तरी तसा अनुभव आहे.

ऑड्रे : हो, पण फक्त प्रतिक्रियात्मक भूमिकेतून आपण जरा स्वतःला बाहेर काढू. म्हणजे काळे स्त्री-पुरूष बाहेर जे काही आहे, त्याला प्रतिक्रिया देतायत वगैरे. जेव्हा आपण बाहेरच्या जगाला प्रतिसाद देत असतो तेव्हा आपण आपल्या-आपल्यात पण काही गोष्टींशी सामना करत असतो. आणि शेवटी आपल्यातसुद्धा सत्ता-संबंधांचे फरक आहेत..

जेम्स : ओह.. हो..

ऑड्रे : खऱ्या अर्थाने आपण कसे जगतो याला सामोरं जाणं, एकमेकांमध्ये नेमके काय फरक आहेत हे ओळखणं अशा काही गोष्टी आपल्यात अजून घडलेल्या नाहीत.

जेम्स : फरक आणि साम्य पण..

ऑड्रे : फरक आणि साम्य. पण मोक्याच्या प्रसंगी, जेव्हा आपल्या सगळ्यांचीच अवस्था बिकट असते तेव्हा आपल्यातील समान गोष्टींचा सामना करणं सोपं आहे. जेव्हा आपण फक्त आपल्यातील साम्य पाहत असतो तेव्हा होतं असं की आपण अशी हत्यारं तयार करत जातो, जी आपल्यातील फरक ठळक झाल्यावर आपण एकमेकांच्याच विरोधात वापरतो. आणि एकमेकांना सरळ संपवून टाकतो. बाहेरच्या लोकांपेक्षा काळ्या स्त्रिया आणि काळे पुरूष फार परिणामकारकरीत्या एकमेकांना संपवून टाकू शकतात.

जेम्स : खरंय.

ऑड्रे : आणि आपलं रक्त सळसळत असतं. आपला पारा चढलेला असतो. म्हणजे काळ्या स्त्रिया आपसात हेच करत असतात. काळे पुरूष किंवा एकंदरीतच कृष्णवर्णीय लोकं आपसात हेच करत असतात. कुठल्या न कुठल्या मार्गाने एकमेकांना संपवण्याचा उद्योग चालवलाय आपण. आपण आपल्या शत्रूचंच काम करतोय.

जेम्स : हो, खरंय अगदी.

ऑड्रे : आणि आपल्यातील हे सत्ता-संबंधांचे फरक आता आपल्याला मान्य करण्याची गरज आहे. ते आपल्याला कुठे घेऊन जातात हेही आपण पाहायला हवं. काळ्या स्त्री-पुरुषांमधले हे फरक एकतर पूर्णपणे अमान्य करण्यासाठी किंवा त्यावरून एकमेकांशी भांडण्यासाठी किंवा त्यांना सरळ डावलून एकमेकांना संपवून टाकण्यासाठी सध्या बरीच ऊर्जा पणाला लावली जातेय. मी बोलतेय ते काळ्या स्त्रियांचं रक्त इथल्या रस्त्यांवर वाहत असतं त्याबद्दल. एखाद्या १४ वर्षांच्या मुलाला आपण हे कसं पटवून देणार आहोत, की त्याच्यातला राग, असंतोष याचं योग्य लक्ष्य मी (किंवा एखादी काळी स्त्री/मुलगी) नसू शकते ? आपल्या दोघांच्याही मानेवर टांगती तलवार आहे. ती आपण बाजूला हटवूया. . ते कसं करायचं त्याबद्दल बोलूया आपण. कारण माझं रक्त सांडून तुझी भीती संपणार नाहीच. आणि हेच मला या तरूण कृष्णवर्णीय मुलांपर्यंत पोचवायचं आहे.

लहान लहान काळ्या मुली बाळांना जन्म देतायत. आणि.. ही काही कुठली दैवी प्रक्रिया नाहीये.. म्हणजे लहान काळी मुलंही याचं कारण आहेत. म्हणजे ही लहान काळी मुलं ही आणखी लहान लहान काळी मुलं पैदा करतायत. आणि ह्याचं काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आपली मुल तरी अशा गोष्टीत स्वतःला वाया घालवणार नाहीत.

जेम्स : मला खरंच समजतंय तुझं म्हणणं.. पण मला थोडं मागे जाऊदे. म्हणजे हे बघ, ह्याचं कारण काहीही असेल, ते बरोबर असेल किंवा चुकीचं असेल, पण गेल्या कितीतरी पिढ्या जन्माला येणाऱ्या मुलांना-पुरूषांना हे वाटत असतं, किंवा त्यांना तसं शिकवलं जातं किंवा त्यांना कधीतरी हे जाणवतं की बायकांची, लहान मुलांची आणि त्यामुळे संपूर्ण जगाचीच जबाबदारी त्यांच्यावर आहे, कारण ते पुरूष आहेत.

ऑड्रे : अं.. हां..

जेम्स : आणि मला नाही वाटत ह्यावर काही उत्तर आहे.

ऑड्रे : आजही काही उत्तर नाही त्यावर ?

जेम्स : ही सत्य परिस्थिती आहे आणि त्यावर आपल्याकडे काही उत्तर नाहीये.

ऑड्रे : आपण जर माणसांना चंद्रावर पाठवू शकतो, अख्खी पृथ्वी उध्वस्त करू शकतो किंवा बिकिनी आटोलमधला जमिनीतील १८ इंचापर्यतचा किरणोत्सर्गी कचरा काढून त्याची विल्हेवाट कशी लावायची यावर विचार करू शकतो तर काळ्या संस्कृतीचे कार्यकर्ते म्हणून आपण ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची सुरुवात तर करूच शकतो. कारण आता ‘आदिम राजकारणा’वर कुणाचा विश्वास नाहीये – मॅमॉथ सारख्या अजस्त्र प्राण्यांना मारून टाकलं नाही तर मानवजमातच नष्ट होईल की काय या भीतीतून त्याकाळी माणसाने त्यांचा नायनाट केला. पण आता आपण अशा आदिम पद्धतींच्या पलीकडे गेलो आहोत. ती सहावी सातवीतली पोरं – मला त्या काळ्या पोरांना सांगायचंय की केवळ लैंगिक फरक आहे हे स्त्रियांशी अमानुषतेनं वागण्याचं कारण असू शकत नाही. त्याकडे वेगळ्या तऱ्हेने पाहण्याची परिमाणे मला समोर ठेवायची आहेत.

जेम्स : हो, पण एखादा पुरूष जगाकडे कशा पद्धतीने पाहतो आणि एखादी स्त्री जगाकडे कशा पद्धतीने पाहते यामध्ये..

ऑड्रे : हो, हो..

जेम्स : .. काही मूलभूत फरक आहेत. स्त्रीला पुरुषापेक्षा नक्कीच कितीतरी जास्त गोष्टी माहीत असतात..

ऑड्रे : आणि त्याचं कारण काय आहे ? याच कारणामुळे काळ्या लोकांना ठाऊक असतं गोरे लोक काय विचार करत असतील. त्याचं कारण हे आहे की, तिथे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न असतो.

जेम्स : ठीकंय.. ठीकंय..

ऑड्रे : आम्हाला आता ‘मधला दुवा’ बनून राहायचं नाहीये, हे स्पष्ट होत नाहीये का ? काळ्या स्त्रिया काळ्या पुरूषांना भर रस्त्यावर मारत नाहीयेत, निदान अजून तरी! हत्यारांनी तुमची डोकी फोडणाऱ्या आम्ही नाही आहोत. तुमच्यावर गोळ्या झाडणाऱ्या आम्ही नाही आहोत. उलट आम्ही म्हणतोय, “आपल्यात जे काही चाललंय ते आणि इतरांच्यात जे चाललंय ते एकमेकांशी निगडीतच आहे”. पण आपल्याला आपले प्रश्न सोडवता सोडवता एकूणच काळ्या लोकांचं संरक्षण करावं लागतं, कारण आपण जर ते केलं नाही तर आपल्याला एकत्र तगून राहण्यासाठी जी ऊर्जा गरजेची आहे तीच आपण वाया घालवू.

जेम्स : अर्थात, याबाबत मी असहमत असूच शकत नाही, पण तू जर अशा पद्धतीने मांडणी केलीस तर मग.. म्हणजे पुरुषाची पण गोष्ट वेगळी असते. त्यालाही काही म्हणायचं असतं, तो फक्त पुरूष आहे म्हणून..

ऑड्रे : हो हो ! पण त्याला जे म्हणायचं आहे ते ऐकण्यासाठी मी जिवंत असणं पण महत्त्वाचं आहे ना !

जेम्स : हो. कारण आपणच एकमेकांसाठी आशेचा किरण आहोत. कौटुंबिक वाद ही एक गोष्ट झाली. सार्वजनिक वाद वेगळा असतो. त्यात पुन्हा आपल्याला, तुला आणि मला घरात – स्वयंपाकघरात मुलांसोबत, एकमेकांसोबत, बेडरूम मध्ये- एकंदरीतच एकमेकांसोबत अनेक गोष्टींना सामोरं जावं लागत असतं आणि त्यावेळी आपल्याला माहीत असायला हवं आपला सामना कशाशी आहे ते. आणि त्याला काहीच पर्याय नाही. अजिबातच नाही. मी एक पुरूष आहे. मी काही बाई नाही.

ऑड्रे : बरोबर. अगदी बरोबर.

जेम्स : आणि मला कुणी बाई बनवू शकत नाही. तसच तू एक बाई आहेस, पुरूष नाहीस. तुलाही कोणी पुरूष बनवू शकत नाही. आपलं अस्तित्व एकमेकांशिवाय असूच शकत नाही. आणि आपली मुलं आपल्या दोघांवरही अवलंबून आहेत.

ऑड्रे : म्हणजे माझ्यासाठी तुझं म्हणणं ऐकणं, तुझ्या असण्याचा अर्थ काय आहे ते ऐकणं आणि तुझ्यासाठी माझं म्हणणं ऐकणं, माझ्या असण्याचा अर्थ काय आहे हे ऐकणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण त्याच त्या जुन्या पद्धतीने आपण जर हे पुढे नेणार असू, तर त्याचा काहीच उपयोग नाही. आपल्याला तर त्याचा काहीच उपयोग झालेला नाही, हे उघड आहे.

जेम्स : मला कल्पना आहे त्याची. मला खरंतर असं वाटतं की उत्तर अमेरिका नावाच्या या उजाड, रानटी प्रदेशात आपण नसलो असतो तर आपल्याला असं काही सिद्ध करायची वेळच आली नसती. निदान अशा प्रकारे तर नक्कीच नाही.

आणि काही अटळ मतभेद – जे भाऊ- बहीण, स्त्री-पुरुषांमध्ये होऊ शकतात – म्हणजे प्रेमावर आधारित अशी सगळी नातीसुद्धा या सगळ्या वादाचा भाग आहेत, हेही आपण मान्य करायला हवं. कारण शेवटी आपली खरी जबाबदारी आहे ती एकमेकांना सतत नव्याने समजून घ्यायची, एकमेकांचे सातत्याने नव्याने अर्थ लावण्याची. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि तू माझ्याशिवाय जगू शकत नाहीस आणि मुलं आपल्या दोघांशिवाय जगू शकत नाहीत.

ऑड्रे : आपण एकमेकांसाठी स्वतःचे अर्थ लावले पाहिजेत, स्वतःला समजून घेतलं पाहिजे. कारण ही जी विकृती आहे तिच मूळ किंवा पाया कुठेही आणि काहीही असो, आपण ती आत्मसात करून घेतलीय हे सत्य तर बदलत नाही. आपण ज्याप्रमाणे वर्णभेद आपल्या जगण्यात शोषून घेतला त्याचप्रमाणे हा आजार, हे विचारसुद्धा आपल्या जगण्यात पुरते शोषलेले आहेत. वंशवादाशी (Racism) किंवा कृष्णवर्णीयांमधील गोऱ्या वंशवादाशी आपण सामना करतोय हे महत्वाचंच आहे, पण त्याबरोबर आपण ह्या गोष्टीकडेही तितक्याच चौकसपणे पाहायला हवं. आपण ज्या ज्या पद्धतीने लिंगभेदावर (Sexism) किंवा भिन्नलैंगिकतेवर (Heterosexism)आधारित भेदभाव आत्मसात केलेला आहे त्याची पण चिकित्सा व्हायला हवी. आपण ज्या ड्रॅगनच्या पोटी जन्माला आलोय तिथे अशाच धारणा आहेत आणि आपण ज्या मोकळेपणाने आणि निष्ठेने वंशवादाची चिकित्सा करतो तशाच पद्धतीने या धारणांची, विकृतींचीही चिकित्सा केली पाहिजे.

जेम्स : तू वंशवाद हा शब्द वापरलास..

ऑड्रे : हां.. म्हणजे काळेपणाबद्दल किंवा इतर रंगांबद्दलचा तिरस्कार..

जेम्स : वंशवाद या शब्दाखाली कुठेतरी ‘सुरक्षितता’ हा शब्द लपलेला आहे असं वाटतं. गोरं असणं किंवा काळ असणं इतकं महत्वाचं का आहे ?

ऑड्रे : स्त्री असण्यापेक्षा पुरूष असणं इतकं महत्वाचं का आहे ?

जेम्स : दोन्ही बाबतीत असं गृहित धरलं जातं की गोरं असणं हे काळ असण्यापेक्षा जास्त सुरक्षित आहे आणि पुरूष असणं हे स्त्री असण्यापेक्षा जास्त सुरक्षित आहे. ह्या अर्थातच पुरुषी धारणा आहेत. पण आपण ह्या धारणांवर मात करायचा, त्यांना मोडीत काढायचाच प्रयत्न करतोय.

ऑड्रे : हो.. या पुरुषी धारणांच्या मागे जी असुरक्षितता, दुर्बलता आहे ती तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी वेगवेगळी आहे आणि आपण त्याकडे पाहायला सुरुवात केली पाहिजे.

जेम्स : हो. हो..

ऑड्रे : आणि ही दुर्बलता अमान्य करण्यातून जो राग, असंतोष वाढत जातो – तो भेदून आपल्याला आरपार जायला हवं, कारण इथे जी मुल मोठी होतायत त्यांना स्त्रियांवर हिंसा करण्यात काहीच चुकीचं आहे अस वाटत नाही. त्याला छेद देणं यासाठीही गरजेचं आहे की, या मुलांना खरंच असं वाटत असतं की, एखाद्या सहावीतल्या मुलीला गर्भवती करणं हेच त्यांच्या मर्दानगीचं लक्षण आहे. आणि त्या मुलीला असं वाटतं की तिच्या आयुष्यात तिच्या दोन मांड्यांमध्ये जे काही आहे तेवढी एकमेव गोष्ट उरली आहे. आणि यासाठी या गोष्टीला छेद द्यायला हवा.

जेम्स : हो, पण आत्ता आपण सर्वसाधारण स्त्रिया आणि पुरूष यांच्याबद्दल बोलत नाही आहोत. आपण एका विशिष्ट समाजाबद्दल बोलतोय. एका विशिष्ट काळाबद्दल, ठिकाणाबद्दल बोलतोय आपण. काळ्या लोकांवर होणाऱ्या हिंसेबद्दल तू बोलत होतीस. मला कळलंच नाही तू..

ऑड्रे : ओके. पोलीस काळ्या पुरुषांचे खून करतायत आणि पुरूष स्त्रियांचे खून करतायत. बलात्कार, खून याबद्दल बोलतेय मी.

जेम्स : मी तुझ्याशी असहमत असूच शकत नाही पण मला वाटतं तू चुकीच्या ठिकाणी भर देते आहेस.. .. म्हणजे काळ्या पुरुषांना अजिबात पाठीशी घालत नाहीय मी, किंवा काळ्या स्त्रियांना सुद्धा नाही, पण मला वाटतं इथे प्रश्न आहे तो आपण कशा पद्धतीच्या राज्यामध्ये जगतोय हा.

ऑड्रे : हो, मला पूर्णपणे पटतंय, जिथे अशा प्रकारच्या विकृती असतात ते राज्यच मुळात बदलायला हवं.

जेम्स : बाईवर हात उगारणाऱ्या माणसाला काहीतरी होत असतं. आपल्या आईवर, आजी वर हात उगारणाऱ्या माणसाबरोबर काहीतरी घडत असतं. एखाद्या व्यसनाधीन, माणसाला सुद्धा काहीतरी वाटत असतच. मला ते फार चांगलं माहितीय. मी हार्लेमच्या रस्त्यांवर मोठा झालोय. आता तुला हे माहितीय की एखादं काळ मांजर जर माझ्या अंगावर यायचा प्रयत्न करत असेल, तर मी असं नाही म्हणणार की ती त्याची चूक आहे. हे मला माहीत असायलाच हवं. ती त्याची जबाबदारी नक्कीच आहे पण ती त्याची चूक नाही. हा एक छोटा फरक आहे. तो त्याच्या म्हातारीवर हात उगारत असेल, पण तरी तो काही आपला शत्रू नाही हे तुला आणि मला माहीत असायला हवं. त्या म्हतारीलाही हे माहीत असायला हवं. मी एवढंच म्हणायचा प्रयत्न करतोय की तो किंवा मी, आम्ही दोघंही असे रस्त्यावर कशामुळे आलो हे आपण पाहायला पाहिजे. मला काय म्हणायचंय कळतंय का तुला ? म्हणजे मी स्वतः अनेकदा अशा मनस्थितीत घरी आलेलो आहे, जेव्हा समोर दिसेल ते उचलून फेकावं, दिसेल त्याला मारावं असं वाटायचं मला, पण ऑड्रे..

ऑड्रे : हो, मी आहे इथेच-

जेम्स : मी अगदीच सहमत आहे तुझ्याशी. तुला जे म्हणायचं आहे ते मला पूर्णपणे समजतंय आणि या गोष्टीचा तुला जितका त्रास होतो तितकाच मलाही होतो. पण या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं? कारण तिला किंवा त्याला गमावून सुद्धा चालणार नाही. ह्यांची आयुष्यं दुसऱ्याच कोणाच्या तरी कब्जात आहेत, त्यावर वेगळ्याच कोणाचं तरी नियंत्रण आहे. आज आपल्या देशात ही खरी परिस्थिती आहे काळ्यांची. वस्त्यांच्या बाजूने आता फक्त कुंपण यायचं राहिलेलं आहे, तुम्ही ज्या वेळी लोकांना अशा पद्धतीने प्राण्यांसारख डांबून, कोंडून ठेवता तेव्हा त्याचा उद्देश त्यांचं खच्चीकरण करण्याचाच असतो हे उघड आहे. आणि या लोकांचं खच्चीकरण झालेलं आहे.

ऑड्रे : जिमी, यावर आपला वाद नाहीये.

जेम्स : हो मला माहितीय.

ऑड्रे : आपल्यात वाद आहे, असहमती आहे ती तुझ्या जबाबदारी बद्दल. फक्त माझी नाही, तर माझ्या मुलाची, आपल्या मुलांची जबाबदारी. मी त्याच्यापर्यंत जे कधीच पोचवू शकत नाही ते त्याच्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी आहे तुझ्यावर. कारण तो काही माझ्या पोटातून आलेला नाही, त्यामुळे त्याचं आणि माझं नातं वेगळं आहे. त्याचा बाप म्हणून तू हे त्याला सांगणं गरजेचं आहे की त्याच्यात धुमसत असलेल्या संतापाचं लक्ष्य मी असू शकत नाही.

जेम्स : बरं, बरं..

ऑड्रे : त्याचा काळेपणा जितका त्याच्यात रुतलेला आहे, तितकीच ही गोष्टही त्याच्यात रुतलेली आहे.

जेम्स : ठीकंय..

ऑड्रे : आणि हे मी करू शकत नाही. तुलाच करावं लागेल.

जेम्स : ठीकंय, मला मान्य आहे की काहीही झालं तरी आपल्यासमोर आव्हान हे आहेच. फक्त मला आधी असं कधी वाटलं नव्हतं. खरंय अगदी. धोका नेमका कुठे आहे, एवढंच मी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय.

ऑड्रे : हं.. युद्धच आहे हे..

जेम्स : हे राज्य आपल्याला संपवण्याच्या मागे आहे आणि त्याच्या दरवाज्यापाशी आपण उभे आहोत.

ऑड्रे : हो , बरोबर. आणि आपल्याला एकमेकांना संपवायला मदत करतील अशा काही अटी या संघर्षात आपण स्वीकारत नाही ना, हे पाहण्यात मला जास्त रस आहे. म्हणजे मला वाटतं, एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला एकमेकांना संपवायला पुरेशी ठरते ती म्हणजे आपल्यातील भिन्नता. या भिन्नते मुळे आपण क्षणभरही विचार न करता एकदम एकमेकांसमोर उभे ठाकतो. लिंगामधील भिन्नता, लैंगिकतेतील भिन्नता..

जेम्स : मला माहीत नाही याबद्दल काय करायला हवं पण मला पटतंय तुझं म्हणणं आणि पूर्णपणे समजतंय सुद्धा. बरोबर आहे तुझं. लिंगभावाबाबत आपला गोंधळ आहे, म्हणजे- ‘स्त्री’ ची जी काही पाश्चिमात्य कल्पना आहे तशीच प्रत्येक स्त्री असूच शकत नाही. म्हणजे ‘स्त्री’ ची आफ्रिकन कल्पना तर नक्कीच तशी नाही. किंवा युरोपियन कल्पना पण नाही. आणि तसंही या देशात ‘पुरूष’ असण्याचे काही असे बरे आदर्श नाहीत ज्याचा सगळे आदर करतील. काळ्या अमेरिकन असण्यातील अजून एक त्रासदायक गोष्ट ही आहे की तुम्ही अनुकरणाचं देखील अनुकरण करण्यात कायमस्वरूपी अडकून राहता.

ऑड्रे : तू काय करावस अशी माझी इच्छा आहे हे मी तुला सांगू शकत नाही. ‘पुरूष’ असणं याचा नवीन अर्थ मी लावू शकत नाही, काळा पुरूष असण्याचा अर्थ तर नक्कीच लावू शकत नाही, पण ‘काळी स्त्री’ असणं म्हणजे काय याचा नव्याने अर्थ लावणं हे माझं काम आहे. काळा पुरूष असणं म्हणजे काय याचा अर्थ लावणं हे तुझं काम आहे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की ‘कृपया ते तू करावंस !’ कारण मला खरंच माहीत नाही अजून किती काळ मी हे सहन करू शकेन ! किंवा काळ्या स्त्रिया अजून किती सहन करू शकतील. कारण मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने स्त्रिया हे सगळं सहन करताहेत, मनात धरून ठेवताहेत, त्यामुळे हा संवाद यापुढे अजूनच अशक्य होत जाणार आहे.

जेम्स : खरंच ? असं का म्हणतीयेस तू ? मला अजिबात नाही असं वाटत. तुझ्या बोलण्यावरून असं वाटतंय की सगळ्या गोष्टींसाठी तू काळ्या पुरुषालाच जबाबदार धरतीयेस.

ऑड्रे : नाही. मी दोष देत नाहीय. मी म्हणतीय, माझ्यावर हत्यार उगारू नका. मी कोणालाही दोष देत नाहीय, मी एवढच म्हणतीये की जर माझ्यावर हिंसा होत असेल, माझा जीव धोक्यात असेल, तर एका टप्प्यावर हातात सुरा घेण्यासाठी आणि वेळ पडली तर समोरच्यावर तो चालवण्यासाठी माझ्याकडे रीतसर कारण असणार आहे आणि ते न करण्याचाच माझा मनापासून प्रयत्न आहे.

जेम्स : तुम्ही जर एखाद्या माणसाच्या मागे लागून त्याला भंडावून सोडलंत, तर तो जनावर झाल्याशिवाय राहत नाही. मग तो कोणत्याही रंगाचा, वंशाचा असूदे. त्याचा काही संबंध नाही.

ऑड्रे : तसंच तुम्ही बाईलाही त्रास देऊन देऊन वेड्यासारखं वागायला भाग पाडलंत, तर ती सुद्धा भयंकर उत्तर देऊ शकते. हे बघ, इथे एका अधिक मोठ्या व्यवस्थेच्या, समाजाच्या विरोधात आपली लढाई आहे. आपण एका ड्रॅगनच्या तोंडी जगत असतो आणि एकमेकांच्या बळाच्या, शक्तीच्या आधारानेच आपल्याला त्याच्याशी लढता येईल. आपल्याला एकमेकांची गरज आहे. पण आपण एकत्र येऊन करण्याच्या या संघर्षात आपण काही अशी हत्यारं तयार केलेली आहेत, जी आपण एकमेकांविरोधात उगारली तर परिस्थिती अजूनच हिंसक होऊ शकेल! याचं कारण आपण एकमेकांना चांगले ओळखतो. आणि जेव्हा ही हत्यारं आपण एकमेकांविरोधात उगारतो, तेव्हाची हिंसा ही अजूनच भयानक असते. दुर्दैव हे आहे की, अशा व्यवस्थेत हे सगळं चालू आहे जिथे आपण आधीच एका संघर्षाचा भाग आहोत. आणि मी काही ते अमान्य करत नाहीये. ही चार भिंतीच्या आतली चर्चा आहे आपली. घरातला वाद आहे हा. मी कोणालाच दोष देत नाहीये. आज काळे पुरूष जिथे आणि जसे आहेत त्यासाठी मी त्यांना अजिबात दोष देत नाहीये. माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी यापुढे जावं. मी काळ्या पुरुषांना जबाबदार धरत नाहीये, मी म्हणतीय की आपण ज्या ज्या मार्गाने, पद्धतीने आपल्यावरील अन्याय-अत्याचाराच्या विरोधात लढत आहोत त्याकडे आपण पुन्हा नव्याने पाहण्याची गरज आहे, नाहीतर आपण एकमेकांना कायमचं संपवून टाकू. पुरूष म्हणजे काय, स्त्री म्हणजे काय, ते दोघे एकमेकांशी कसे निगडीत आहेत, याचे नवे अर्थ लावायला आता आपण सुरुवात केली पाहिजे.

जेम्स : पण त्यासाठी पाश्चिमात्य जगाचेही नवे अर्थ लावावे लागणार..

ऑड्रे : आणि आपल्याला दोघांनाही ते करावं लागणार आहे..

जेम्स : पण तुला हे लक्षात येत नाहीये का की हे जे काही प्रजातंत्र (रिपब्लिक) आहे, त्यात केवळ एकच गोष्ट खरोखरी गुन्हा आहे – ती म्हणजे काळा पुरूष असणं..

ऑड्रे : नाही, मला नाही लक्षात येत हे. मला हे लक्षात आलेलं आहे की काळं असणं, फक्त काळं असणं, हाच इथला एकमेव गुन्हा आहे, आणि त्यात मी पण येते.

जेम्स : काळ्या पुरुषाच्या बाबतीत जरा जरी काही आढळलं तर ते त्याच्या वर तुटून पडतात. जेव्हा एखादा काळा पुरूष आपल्या मुलांसाठी आदर्श बनायचा, आपल्या बायकोची काळजी घ्यायचा प्रयत्न करत असतो त्यावेळी त्याला ***** समजतात. तो या देशातला एकमेव गुन्हा आहे. आणि हे प्रत्येक काळ्या माणसाला माहीत असतं. आणि प्रत्येक काळी बाई याची किंमत चुकवते. प्रत्येक काळं मूलसुद्धा. पण ज्या परिस्थितीशी त्याचा काहीच संबंध नाही त्यासाठी काळ्या पुरुषाला दोष देण्याइतकी भावनिक का होतीयेस तू ?

ऑड्रे : दोषारोपांच्या पलीकडे तू जाऊ शकत नाहीयेस. दोष देण्यात मला काहीच रस नाहीये. गोष्टी बदलण्यात आहे..

जेम्स : मी एक सांगू तुला ? चुकीचं असेल, बरोबर असेल मला माहीत नाही.. पण सांगू ?

ऑड्रे : मलाही नाही माहीत. सांग.

जेम्स : तुला माहितीय, एखाद्या पुरुषाला काय होत असत?

ऑड्रे : मला कसं माहीत असेल पुरुषाला काय होत असतं ते ?

जेम्स : तुला माहितीय, एखाद्या पुरुषाला काय होत असतं, जेव्हा त्याला काम-नोकरी मिळत नाही आणि स्वतःची लाज वाटत असते ? जेव्हा त्याच्या सॉक्सला वास येत असतो ? जेव्हा तो कोणालाच सांभाळू शकत नाही ? जेव्हा तो काही म्हणजे काहीच करू शकत नाही ? जेव्हा त्याला स्वतःची लाज वाटत असते आणि तो आपल्या पोरांना तोंड दाखवू शकत नाही, त्यावेळी त्याला काय वाटत असतं हे तुला माहितीये? बाईसारखं नसतं ते..

ऑड्रे : नाही, बरोबरच आहे. तुला हे माहितीये का एखाद्या बाईला काय होत असतं जेव्हा ती बाळाला जन्म देते, त्या बाळाला या जगात आणते आणि त्याच्या पोटात दोन घास जावे म्हणून घराबाहेर पडून स्वतःला कुठेतरी जुंपून घेते? तुला माहितीये बाईला काय होत असतं जेव्हा ती प्रचंड निराश असते, तिची चिडचिड होत असते आणि ती घरभर आपल्या मुलांना मारत फिरते ? तुला माहितीये काय असतं ते ? तुला माहितीये एखाद्या समलिंगी मुलीला काय होत असतं जेव्हा तिच्या पार्टनरला आणि तिच्या बाळाला रस्त्यावर लोकं मारत असतात आणि उरलेल्या सहा लोकांनी तिला घट्ट पकडून ठेवलेलं असतं? माहितीये तुला, तेव्हा नेमकं कसं वाटत असतं?

जेम्स : .. ..

ऑड्रे : हां.. म्हणजे एखाद्या बाईला काय वाटत असतं, हे तुला जितकं माहितीये तितकंच मलाही माहितीये एखाद्या पुरुषाला काय वाटत असतं, कारण शेवटी मुद्दा आहे माणूस म्हणून पाहण्याचा. माणूस निराश असतो, पिडीत किंवा चिडलेला असतो, कारण तो आपल्या माणसांची, ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांची काळजी घेऊ शकत नाही. त्यांना सुरक्षित ठेवू शकत नाही. त्यामुळे आता आपण इथून सुरू करू या..

जेम्स : हं.. ठीकंय..

ऑड्रे : त्यामुळे आता आपण इथून सुरू करू आणि या सगळ्याला सामोरे जाऊ.. ..

अनुज देशपांडे हे लेखक, भाषांतरकार असून ते नाट्यक्षेत्रात सक्रिय आहेत.

One comment on “क्रांतिकारी आस: जेम्स बॉल्डविन/ ऑड्रे लॉर्द/ अनुज देशपांडे

  1. sadhana dadhich

    मला हे समजायला अवघड वाटले .काही वाक्य मात्र अगदी लिहून ठेवावीत अशीच वाटली
    जिथे तुमचा प्रचंड तिरस्कार केला जातो आणि त्याच वेळी तुम्हाला हेही सांगितलं जातं की तुम्ही प्रयत्न केलेत, तर अशक्य गोष्टीही तुम्ही मिळवू शकता अशा एखाद्या ठिकाणी जन्माला येणं ही म्हणजे फारच कठीण गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यातील व्यक्ती – मग ती स्त्री असो, पुरुष असो, तुमचं पोर -मुलगा असो किंवा मुलगी – तुमचा साथीदार असो – यांच्यासोबत जगण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता
    सध्या अशी तरुण मुल स्पर्धा परीक्षा किंवा अन्य बाबी साठी धडपडताना पहिली कि जी यशस्वी होतात त्यांचे कौतुक करणार्यांचा रागच येतो

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *