आशुतोष पोतदार

अंधारा काळ



marathienglish

back

आपल्यापर्यंत कोरोना येणारच नाही असे वाटता वाटता तो आपल्या गल्लीत पोहोचला आणि आता शेजारच्या घरात पोहोचला. इतरांकडून या रोगाबद्दल ऐकत होतो पण आता मित्र, नातेवाईकांपर्यंत तो पोहचला. कदाचित, एखाद्याच्या घराच्या उंब-यावर तो वाट पाहात असेल असे वाटेपर्यंत त्याने बघता बघता भवतालाला वेढून टाकलेय. ‘हाकारा’च्या ‘उलथापालथ’च्या अंकात प्रकाशित झालेल्या माया निर्मला यांच्या वेगळ्या आशय आणि रूपातील कवितेतील एक कडवे इथे माझ्या मनात येते:  

नाटक पानफुटीसारखं फुटतं
वावटळीसारखं वेढून टाकतं
लिहू पाहू करू पाहणाऱ्यांचं
अंधारं अतरंगी सतरंगी बेट

महामारीच्या ‘नाटका’च्या या पानफुटीत वावटळीसारखे आपण वेढून जाऊ लागलो तसे आपल्या हालचालींवर मर्यादा आल्या. माणसांच्या भेटीगाठी थांबल्या. एकमेकांचा सहवास आवडणा-या माणसांची तर एकदम गोची झाली. ज्यांचे आप्तस्वकीय दूरवर, दुस-या गांवी राहातात त्यांची भेट कधीतरी मागच्या दिवाळीत, ख्रिसमसला झाली होती. गणपतीला भेटायचे ठरवले होते. पण, महामारीने ते काही घडू दिले नाही. आता दिवाळीला तरी भेट होईल की नाही हे सांगता येत नाही. यापुढे, माणसे कधी मनमोकळेपणाने, खुल्या दिलाने भेटतील हे काही सांगता येत नाही. पृथ्वीतलावर एके ठिकाणी कोरोना शमलाय तोवर दुसरीकडे तो डोके वर काढतो. एखाद्याला इथे तो कधी येणार नाही असे वाटता वाटता तिथेच तो आपला फणा वर काढतो. मग, आणखी दुसरीकडे कुठेतरी. असा, सर्वव्यापी तो. बरं, तो नुसताच आला नाही तर एकाहून एक प्रश्नांना जन्माला घालत आला. मग ते, प्रश्न समाजातल्या वैद्यकीय बाबींबद्दलचे असतील, उपलब्ध संसाधनांबद्दलचे असतील, वैज्ञानिक दृष्टीकोनाबद्दल असतील, अगोदरच पिचलेल्या सामाजिक घटकांना बळ देण्याबाबतचे असतील किंवा संकटाला सामोरे जाण्याच्या आपल्या असल्या-नसल्या तयारीबद्दलचे असतील. एक प्रश्न झाला की दुसरा प्रश्न अशी प्रश्नांची मालिका आपल्यासमोर ‘आ’ वासून उभी राहाताना दिसते. प्रश्नांना भिडत महामारीला सामोरे जाण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या परीने करतो आहे. तरीही, प्रश्नांच्या गुंतपाळ्यात आपण अडकून राहिलोय खरं. मी आज आहे पण उद्या असेन की नाही असे अस्तित्वाचे प्रश्न उभे असतानाच येणा-या काळात हे जग कसे असेल अशा मोठ्या कूट प्रश्नाने आपल्याला घेरुन टाकले आहे.

प्रश्नांच्या वावटळीत जगण्यातली सहजता संपुष्टात आल्यासारखी वाटते. एखाद्याला बिनदिक्कत भेटायला जाऊन त्याला मिठी मारण्यातली नैसर्गिकता गेली आहे. किंबहुना, अशी सहजता, असा निष्पापपणा नसेल अशाच ठिकाणी आपण सहज आणि मुक्तपणे राहू ही भावना बळावतेय. एखाद्याला स्पर्श करणे, एखाद्याच्या सहवासात राहाणे किंवा बंद जागेत श्वासोछ्वास करणे धोकादायक आहे हा विचार सतत कुठेतरी आपल्या मनात येत राहतो. कुणाबरोबर संपर्कात आल्याने आपल्याला काहीतरी होईल ही जाणीव किती भयावह आहे! अशी जाणीव कु्णाबरोबर किती काळ राहील हे त्या व्यक्तीवर अवलंबून असेल. काहीजण ‘काय होतंय त्याला’ असे म्हणून महामारीची भीती झिडकारून कामालाही लागले असतील. काहीजण नियमांचे पालन करत शारिरिक अंतर पाळत असतील. कारण, धाडसाने आपण काही होणार नाही म्हणून संपर्क ठेवला तरी अशी कृती आपल्या अंगलट येऊ शकते याची काही जणांना भीती वाटत असते. थोडक्यात, एखाद्याच्या आजुबाजूला असण्याने आपल्याला आनंद होण्यापेक्षा त्याच्या नसण्याने तो आराम मिळू शकतो अशी अवस्था आहे. सोबत नसण्यासाठीचे विविध फॉर्म्स आपण धुंडाळतोय. त्यातूनच आपण व्हर्चुअल रिॲलिटीला आपलेसे करु लागलो आहे. आभासी जगात आपल्या भावभावनांना वाट करुन देऊ लागलो आहे. ऑनलाईन संवादाने माणसा-माणसांतल्या संबंधात दुरावा येतो असे आपण म्हणत होतो त्याच ऑनलाईन संवादाद्वारे आपण एकेमेकांशी निदान बोलू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  

मोठ्या स्तरावर, कोरोनाने होती नव्हती ती सामाजिक रचना ढवळून टाकली आहे.  गरीब-श्रीमंत, काळे-गोरे, स्री-पुरूष कोणतेही भेद न मानता सर्व सामाजिक घटकांना तो पकडतो आहे. मुळात चलनवलनाच्या प्रक्रियेतून आकाराला आलेल्या या रोगाने वेगवेगळ्या सीमा नाकारत प्रदेश ढवळून काढले. यातून, राष्ट्रवादाची नवी परिभाषा मिळताना दिसते. राष्ट्राची ओळख तिथल्या महापुरुष, देव-देवता किंवा माणसांवरुन ठरण्याबरोबर तिथल्या कोरोना संसर्गित आणि मृत्यूमुखी पडलेल्या लोकांवरुन ठरविली जाऊ लागताना दिसत आहे. राष्ट्रवादाच्या चौकटीत समाजमानसाला चुचकारताना कोरोनाच्या नावाखाली फुले उधळणे, टाळ-मृदंग वाजवणे अशा सेलिब्रेशनमधे सरकारे मशगुल राहिली. पण, परीघांवरल्या व्यक्ती, समुदायाबद्दलची अढी पुसून टाकून समाजाचे आरोग्य सुधारण्याभोवती राष्ट्रवादी विचार गुंफला गेला असता तर या सेलिब्रेशनला अधिक मूलभूत अर्थ प्राप्त झाला असता.

महामारी आपला तडाखा जात, धर्म, पंथ, लिंग पाहून देत नाही असे म्हणताना सर्वजण एक आहेत असा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला. पण, आपसातले भेदही उघडे पडत गेले. पण तरीही, स्वप्ने पाहाणा-यांना वाढते ध्रुवीकरण थांबवले जाऊन माणूस होण्याची एक वेगळी शक्यता आपल्याला दिसत राहाते. स्वप्ने पाहाण्यात बदलाची चाहुल असते. स्वप्ने पाहाण्यातून समाजाला धक्का बसून स्थिरस्थावर झालेला पॅटर्न बदलू शकतो. बदलाचे परिणाम काही असू शकतील. पण, बदल होतोय हे महत्त्वाचे. महामारीने अशी संधी आपल्याला दिली आहे. बदलाच्या प्रक्रियेत मानवी नातेसंबधाकडे, राजकीय-सामाजिक रचनांकडे, देवदेवतांविषयक कल्पना आणि विधी-परंपरा-कलांकडे चिकित्सक नजरेतून पाहाण्याची गरज निर्माण झाली आहे. निदान महामारीने आलेल्या असुरक्षिततेतून आणि मृत्युच्या भयातून मानवी समाज चिकित्सक भानासाठी डोळे उघडे ठेऊ शकतो.

‘उलथापालथ’ या विषयाला वाहिलेला ‘हाकारा’चा नवा अंक चिकित्सक भान मिळविण्याच्या प्रक्रियेतील छोटा प्रयत्न आहे. आपली प्रतिक्रिया जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.

चित्रसौजन्य:ध्रुवी आचार्य

6 comments on “अंधारा काळ: आशुतोष पोतदार

  1. नीरजा

    छान झालंय संपादकीय.

    Reply
    • आशुतोष पोतदार

      धन्यवाद.

      Reply
      • गणेश कनाटे

        उत्तम संपादकीय. आता उरलेला अंक वाचतो.

        Reply
  2. Vinod Mahajan

    Great article, very well explained the impact on our lives by corona. Enjoyed reading… Keep writing Ashutosh sir…Thanks for the nice article. All the best.

    Reply
    • Ashutosh Potdar

      Many thanks! Please keep reading Hakara Journal.

      Reply
  3. sanjay meshram

    editorial is zabardast.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *