आशुतोष पोतदार

प्रतिबिंबाचा प्रवास



marathienglish

back

प्रतिबिंब म्हटले की लहानपणी वाचलेली किंवा ऐकलेली रामाची गोष्ट आठवते. लहानपणीचा राम पौर्णिमेच्या मोठ्या चंद्राकडे बघून ‘मला चंद्र पाहिजे’ म्हणून हट्ट करतो. रामाचा हट्ट कसा पुरवायचा हे कौसल्येला समजत नाही. राम चंद्र पाह्यजेच म्हणून रडू लागतो. तो रडायचा थांबत नाही. मग, काही वेळानंतर कौसल्या यातून मार्ग काढते. रामाला मोकळ्या जागी घेऊन येते. आकाशाखाली आरसा धरते आणि रामाला आरशात पाहायला सांगते. रामाला चंद्राचे प्रतिबिंब आरशात दिसू लागते तसा तो रडायचा थांबतो. हुबेहूब चंद्र त्याच्या हातात खेळायला मिळाला. हुबेहूबपणाचा छंद असणाऱ्यांना प्रतिबिंब हवेसे वाटते. किंबहुना, हुबेहूबपणाचे आकर्षण मानवी मनाला कायमच वाटत राहिले आहे. स्वतःच्या हुबेहूबपणा, सारखेपणाचा भास प्रतिबिंब देते. प्रतिबिंब म्हणजे वस्तूची वा एखाद्या कृतीची जशीच्या तशी दिसणारी प्रतिकृती असते. प्रतिबिंब हुबेहूब प्रतिकृती असते.

आपल्या बाजूला आरसा नसेल तर एखाद्याला अस्वस्थतेने घेरुन टाकले जाऊ शकते. शिवाय, आरशात आपण कुणासारखे दिसावे हे आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिप्रेक्ष्याने ठरवलेले असते. सत्ता, आर्थिक श्रीमंती, रुढ अर्थाच्या शारीरिक सौंदर्याच्या कल्पना आपल्या आरशातल्या प्रतिमेला एक परिमाण देत असतात. तेच परिमाण आपण काय आहोत हे ठरवत असते. एखादी व्यक्ती आपण कोण आहोत यापेक्षा आपण कुणासारखे आहोत याची चाचपणीच आरशातून करत असते. चाचपणी करत-करत आपण कुणासारखेतरी बनण्यातच धन्यता मानत राहातो.

अर्थात, प्रतिबिंबाचा हव्यास एखाद्याला गोत्यात आणू शकतो हे तर ग्रीक दंतकथेतील नार्सिससने दाखवून दिले आहे. नार्सिसस सारखा दिसायला देखणा आणि सुंदर युवक स्वतःच्याच सौंदर्याच्या प्रेमात पडतो. इतका प्रेमात पडतो की तळ्याच्या पाण्यात दिसणाऱ्या स्वतःच्याच प्रतिमेच्या ते कुणीतरी दुसरच असेल म्हणून प्रेमात पडतो. यातूनच स्वतःची प्रतिमा आरशात बघण्याचा अपशकुन मानण्याची अंधश्रध्दा ग्रीक समाजात आली असेल.

आरशात दिसणारे आपले प्रतिबिंब हुबेहूब असते असे असले तरी आपल्या दिसण्याच्या पलीकडेही प्रतिबिंब आपल्याला अजून कितीतरी दाखवू शकते, जाणवून देऊ शकते. जे दिसणाऱ्या प्रतिमेत नसते तरीही असते असे प्रतिबिंब असते. कदाचित ते प्रतिमेत दिसणार नाही. पण, ते असू शकते. जे. के. रोलिंग्जच्या ‘द फिलॉसॉफर्स स्टोन’ या हॅरी पॉटर मालिकेतील कादंबरीमध्ये आरशाचे नाव Erised असते. आरशासमोर उभे राहाणाऱ्याला Erised च्या बरोबर उलटे, त्याच्या मनातील ‘desire’ दिसत असते. याचाच अर्थ, प्रतिबिंब हुबेहूब असले तरी ते तेवढेच नसते हे आपल्याला हॅरी पॉटरची गोष्ट दाखवून देते.

प्रतिबिंब एखाद्या वस्तूची, वो गोष्टीची पुनरावृत्ती नसते. ती जशीच्या तशी नक्कलही नसते. ते मूळ रूपाचा वा दिसण्याचा केलेला विलंब असू शकतो. ती स्वमग्नता असू शकते. प्रतिबिंबासाठी उभे राहिलेल्या एखाद्याच्या मनात काय असेल त्याचे प्रतिबिंब कसे पडणार वा दिसणार? अनुभवातून आलेले कल्पनातीत असे काहीसे त्या प्रतिबिंबात असू शकते. याचा अर्थ असा की, पाहाण्याच्या पारंपरिक कक्षा लांघण्याची शक्यता प्रतिबिंब आपल्याला देते. रस्त्यावर चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे पाहातो आणि आपण ठरवतो की ती व्यक्ती अमुक-अमुक आहे. आपण, फक्त पाहात नसतो तर ठरवतही असतो. जे दिसतं त्यापलीकडे जाऊन ठरवत असतो. म्हणजे, ती व्यक्ती शर्ट घातलेली असेल वा दुसरा एखादा ड्रेस घालून चालली असेल. पण आपण तेवढ्यावर थांबत नसतो. तर आपले पाहाणे ती व्यक्ती कोण आहे, कशी आहे हेही ठरवत असते. आपला अनुभव आणि कंडिशनिंगच्या आधारे आपण अनुमान करतो असतो की ती व्यक्ती ही आहे. आपण जज करुन ठरवत असतो असतो. याचा अर्थ पाहाणे फक्त पाहाणे नसते तर ते काही ठरवून, त्या वेळेपुरते अनुमान काढणेही असते. ब-याच वेळा पुढच्या माणसाकडे आपण ‘डोळे झाकून’ पाहात असतो. पाहाण्याची कृती फक्त शारिर नसते ती मनाचीही असते.

जसे आहे तसे पाहाण्यापेक्षा आपल्याला जे हवे ते आपण पाहात असतो. प्रतिबिंबाद्वारे आपण हवे तसे जग आपल्यासाठी निर्माण करत असतो आणि त्यातच आपले प्रतिबिंब पाहातो. त्या आरशात मी आहे तोच स्वतःला दिसत असतो. एखादा आपल्याला हवा असणारा आदर्श. तो आदर्श आपण ठरवलेला असतो किंवा आणि कुणी ठरवलेला असतो. आपण आणि दुसरे जग अशा मांडणीत बिंब आणि त्याचे प्रतिबिंब आपण पाहात असतो. आपण निर्मिती करत असतो आणि केलेली निर्मिती नाकारत असतो.

आरशात पाहून आपल्याला आपल्याकडे पाहाता येणार नाही. आपल्यात आणि आपल्या आत अंतर असायला हवे. अंतरावरुनच आपण स्वतःकडे पाहू शकतो. तटस्थता असेल तरच आपण स्वतःकडे पाहू शकतो.
**
‘प्रतिबिंब’ या संकल्पनेवर विविध विचार मांडणारी ‘हाकारा’ची नववी आवृत्ती प्रतिबिंबांचे प्रतिबिंब सादर करण्याचा प्रयत्न करते. ‘हाकारा’मध्ये प्रकाशित होणा-या लेखनातून आणि दृश्य रूपातून प्रतिबिंबांचा प्रवास मांडला गेला आहे. प्रतिबिंबाचा प्रवास वेगवेगळ्या दिशेने जाणारा आणि विविधांगी आहे. उदाहरणार्थ, सत्या गुम्मुलरी आपल्या काव्यगत ‘सूचनां’मधून प्रतिबिंबाचे वेगळे रूप मांडतात. त्यांचा सुचना पुढीलप्रमाणे येतात:
Instructions:
[I] To do the following exercises you will need:
Yourself
A mirror (animate or inanimate)
A still afternoon
A cosy spot to sit in

[II] To do the following exercises, you will:
Face the mirror
Read the exercises out aloud
Sing them if you wish
‘हाकारा’च्या या आवृत्तीत प्रकाशित साहित्य प्रतिबिंबाचे निव्वळ वरपांगी चित्रण करुन थांबत नाही. तर, प्रतिबिंबाद्वारे व्यक्तीच्या आतल्या विश्वाच्या दर्शनाचा प्रवास आहे. सोनाली लाहा आपल्या निवेदनात लिहितात: “In my work, I try to freeze some moments in life, which are very static and silent in expression. It’s about the phase, where you have chaos in mind but actions are numb. I try to capture such moments through my work.”
आपल्या असण्या आणि नसण्याचा प्रवास सोनाली लाहासारखे कलाकार आणि लेखक हाकारातुन मांडताना आपल्याला दिसतील. असा प्रवास म्हणजे प्रतिमा वा विचार आणि त्यांचे प्रतिबिंब एवढ्यापुरताच नसतो. किंबहुना, वस्तू वा विचार आणि त्यांचे प्रतिबिंब असे एकास एक असे ध्रुवीय नाते मांडण्याचा आमचा प्रयत्न नसून सखोल चिंतनाचे प्रतिबिंब आपण प्रतिबिंबात कसे पाहू शकतो याचा प्रवास ‘हाकारा’ची प्रतिबिंब ही आवृत्ती मांडते.

छायाचित्र सौजन्य: अभय कानविंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *