आशुतोष पोतदार

बिकट संचार


back

मानवी समाजाची निर्मिती ज्या एका टप्प्यावर ‘सुरु’ झाली तेंव्हापासून ‘संचार’ सुरु झाला असेल. कधी ठरवून तर कधी वाट मिळेल त्या दिशेने भटकंतीचे रूप लेवून ‘संचारा’ची ‘वाटचाल’ सुरु आहे. अन्न-वस्त्र-निवाऱ्याच्या शोधाबरोबर, सुख-शांती आणि आनंदाच्या शोधात तर कधी डोळ्यांना न दिसणाऱ्या विश्वाच्या शोधाचा प्रवास संचाराचा भाग बनून गेले आहेत. आपण मानवी समाजाचे घटक म्हणून ‘आपल्या’ संचाराबद्दल बोलतो. पण प्राणी, वनस्पती आणि कीटकही आपापल्या तऱ्हेने संचार करत असतात. त्यांचे संचारणे कधी आपल्याला दिसते तर कधी दिसत नाही. 

एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंतची सततची हालचाल संचारात असते. संचार हा जिवंतपणाचा गाभा असतो. आपल्या श्वासांचा, शरीरातल्या पेशींचा संचार असतो. म्हणून आपण हे समजून घेऊ शकतो आणि मांडू शकतो. संचार कधी स्वतःला घडवण्याच्या, सिद्ध करण्याच्या प्रेरणेतून सुरु असतो तर कधी पुढे जाण्याच्या धक्क्याचे बळ मिळत तो होत राहतो. काळ आणि अवकाशाच्या चौकटीत राहून होणारा संचार आदिम गरजा पूर्ण करण्याच्या इच्छा-आकांक्षातून आकार घेत असतो. अर्थात, काहींसाठी एका ठिकाणी असणे यातही जगण्यासाठीचे बळ आणि नवी दृष्टी सापडत असेल. काही काळासाठी जाऊन परतून विसावणे एवढ्यापुरतेच ‘संचारणे’ असू शकते. पण माणूस म्हटले की वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवासाचा अनुभव – मग तो एकच अनुभव असेल किंवा वेगवेगळा – तोच तो असणारा किंवा नाविन्याची झाक असणारा संचार हाकारा । hākārā च्या २० व्या अंकाचे मांडणी-ध्येय आहे. या अंकात आम्ही समाविष्ट केलेले लिखित तसेच दृश्य-साहित्य मानवी जीवनातील ‘संचार’ अनुभवाला वेगवेगळ्या अंगाने मांडण्याचा प्रयत्न करते. ‘संचारी’ अनुभवामागच्या प्रेरणा, संचारामागचे ध्येय आणि ध्येयपूर्तीतील यशापयश, संचाराचे स्वरूप त्याचे विवेचन करण्यासाठीची वेगवेगळी साधने आणि पद्धती यांचा लेखाजोगा आपल्याला २० व्या अंकात पाहायला आणि वाचायला मिळेल. 

हाकारा । hākārā च्या या २० व्या आवृत्तीतील चार विभागात मांडलेल्या लिखित तसेच दृश्य साहित्यातून आपल्याला दिसून येईल की एखादी व्यक्ती ‘मला वाटलं’ म्हणून संचारत असते. त्यात तिला आनंद असतो किंवा कशाचा तरी शोध असू शकतो. पण प्रत्येकालाच वाटलं म्हणून संचार करणं शक्य होतं असं नाही. काहींच्या बाबतीत वर्ग, लिंग आणि जातीधर्माच्या कारणांवरून संचारावर मर्यादा येत असतात. मग, विशिष्ट सामाजिक वा आर्थिक पार्श्वभूमीमुळे कोण कुठे जाऊ शकतो किंवा कुठून येऊ शकतो हे ठरत जाते. माणसांमाणसांतले भेदाभेद एखाद्याला जबरदस्तीने एका ठिकाणी बंदिस्त ठेऊ शकतात किंवा सतत जागा बदलायला भाग पाडू  शकतात. सामाजिक व्यवस्थेबरोबर आर्थिक रचनाही या साऱ्याला जबाबदार असू शकते. याचा अर्थ ज्यांना ‘संचारा’चे विशेषाधिकार असतात त्यांना त्या संचारण्याच्या नेटवर्क मध्ये सहज प्रवेश असतो. कोव्हिड साथीच्या दरम्यान लाखो मजुरांना घराबाहेर पडताना ‘संचाराचे’ अत्यंत क्लेशदायी आणि विषण्ण करणारे रूप मानवी समाजाने पाहिले. यापूर्वी, फाळणीच्या वेळेस अशी दृश्ये संचाराचे भीषण रूप जिवंत करतात. 

संचार तर आजच्या काळाच्या धमन्यात असल्याप्रमाणे बघू तिथे आणि बघू तेंव्हा लोक फिरताना दिसतात. बैलगाडी, बस, रेल्वे, दुचाकी, चारचाकी ने हालचाल करताना दिसतात. काही जण अपरिहार्यता म्हणून तर काही जण मन रिझवण्यासाठी. पुणे मुंबई हमरस्त्यावर किंवा हिमालयाच्या कुशीत रस्त्यावरच्या गर्दीमुळे ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या वाहनांच्या दूरवर पसरलेल्या रांगा पाहतो तेंव्हा ‘नको ते संचारणे’ वाटून बिकट संचार सुरु होतो. आर्थिक बदल आणि वेगाने होणारे शहरीकरण यात बिकट संचाराची बीजे आपण पाहू शकतो. नेहमीच्या जीवनातील अस्थिरता आणि असुरक्षितता याबरोबर तथाकथित प्रगतीच्या शिड्या चढण्याच्या प्रयत्नातून अशा बिकटपणाला सामोरे जावे लागते. विशिष्ट सामाजिक गटात एकवटणाऱ्या आर्थिक सत्तेत आणि बाजारीकरण, हिंस्त्र घटना तसेच दुर्घटनांत अशा संचाराचे उग्र रुप आपल्याला दिसून येते. जात-धर्म-वर्ग व्यवस्था, आर्थिक विषमता, असमतोल विकास, शैक्षणिक दूर्गती, शेतीव्यवस्थेत होणारे अविचारी बदल, स्थलांतरे आणि संचार यांचा संबंध तपासणे क्रमप्राप्त ठरते. विशिष्ट व्यक्ती आणि समुदायच संचार का करतात यामागची कारणे शोधणे महत्वाचे ठरते. एरवी आनंददायी वाटणारा संचार नवनवीन चिंता, विवंचना देणारा आणि एखाद्याला आपल्या प्रवासात सामील करून न घेण्याच्या वृत्तीमुळे निराश करणारा ठरू शकतो. 

‘संचार’ या विषयाला समोर ठेऊन केलेली हाकारा । hākārā च्या अंकाची मांडणी आपल्याला कशी वाटली ते जरूर कळवा. 

हाकारा । hākārā  नियतकालिकाचा प्रवास सुरु होऊन सहा वर्षे होऊन गेली. दर वर्षी तीन अंक असे एकोणीस अंक आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. हाकारा । hākārā चा हा प्रवास आम्हाला जगभरात नेणारा, वेगवेगळ्या व्यक्ती, समाज समूह, भाषा आणि कला रूपांना जवळ करत कधी सरळ रस्त्यावरचा तर कुठे कुठे खाचखळग्यांचा आणि वळणावळणाचा. आतापर्यंत आपले जे सहकार्य आणि बळ हाकारा । hākārā च्या परिवाराला मिळाले तसेच ते पुढेही मिळत राहो. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *