अरविंद जाधव

जरा विसावू या वळणावर..



back

सकाळचे अकरा वाजले होते. सकाळपासून काहीच सुचत नव्हतं. नाम्याच्या गाडयावर तीन-चार वेळा चहा पिलो होतो. मित्र सोबत होते, पण मन मात्र कशातच लागत नव्हतं. शेवटी एकदाचा मनाचा हिय्या करून उठलो आणि होस्टेलवर आलो. त्यावेळी अर्ज हाताने लिहून द्यायची पद्धत होती, त्याप्रमाणे तो लिहून मी सोबत घेतला. कॉम्प्युटर येऊन काही वर्ष रूळला होता, पण कॉलेजमध्ये ऑफिस वगळता तो कुठे फारसा दिसायचा नाही. आताही हा अर्ज टाईप करून घ्यायचा तर सायबर कॅफेत  जाऊन किमान तासभर तरी लागला असता. पाच-सहा दुकानं आहेत तिथं. विद्यापीठातले सगळे तिथेचं  जातात, त्यामुळे  लवकर नंबर लागत नाही. वर, पैसे जातात ते वेगळंच. पण शिक्षणामध्ये पैशाची आम्ही कधी तडजोड केली नव्हती. म्हणजे घालायला एक ड्रेस कमी, पण पैसे नाहीत म्हणून फी भरली नाही, चांगलं साहित्य घेतलं नाही, असं कधी झालं नाही. 

तर झालं असं की, एम.ए. चा निकाल लागून साधारण एक आठवडा झाला असेल. बी. प्लस. नावाच्या भुतावर कसाबसा विजय मिळवला होता आणि मला पोटापाण्याची काहीतरी व्यवस्था करावी लागणार होती. महिन्याभरात विद्यापीठाचं होस्टेल सोडावं लागणार होतं. यापुढे घरून  पैसे मिळण्याची अजिबात शक्यता नव्हती. विद्यार्थीदशा संपून खरी दशा आता सुरू झाली होती. 

विचार करतच  मी राजाराम कॉलेजच्या गेटमधून आत पोहोचलो. विद्यापीठाच्या शेजारीच हे महाविद्यालय असल्याने मला ते परिचयाचं होतं, पण इथं येण्याचा फारसा प्रसंग येत नसे. उन्हाळ्याचे दिवस होते. पावणेबाराच्या सुमाराचं ऊन चांगलंच तापलं होतं. तावत होतं. रुमालाने चेहर्‍यावरचा घाम पुसला आणि मी ऑफिसातल्या चष्मेवाल्या क्लार्कला म्हणालो, 

“एक्स्क्युज मी, सर!”

सहसा क्लार्क मंडळी हसत नाहीत. हसलेच तर  कधीतरी आणि तेही माफक. कारण माहीत नाही पण बऱ्याचदा  मला असाच अनुभव आला होता. पण इथे जरा वेगळाच अनुभव आला. रजिस्टरमधे खुपसलेला चेहरा नकळत वर करून स्मितहास्य करत  क्लार्कने विचारलं,

“काय पाहिजे?”

त्याच्या  कॉलेजमध्ये माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी होते, त्यामुळे सवयीने त्यांनं विचारलं असावं. का कुणास ठाऊक पण नेहमीचा क्लार्कमंडळीचा त्रासिक चेहरा यावेळी मला दिसला नाही आणि त्यामुळे मी जरा बावचळलोच. पण स्वतःला सावरत  लगेच म्हणालो,

“मला अर्ज द्यायचा होता, सी.एच.बी. साठी”

“विषय?”

“इंग्रजी”

“नाव?”

त्याच्या हसण्यावर जाऊन चालणार नाही हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं. कधी कधी न हसणारी व्यक्ती अशी अचानक हसली तर आपल्यासारख्याची गोची होते. त्यांचा चेहरा जरा हसतमुख वाटला खरा, पण लकबी मात्र तशाच होत्या अन् त्याचे प्रश्नही नेहमीचेच, साचेबद्ध. 

“माझं नाव रमेश. आडनाव पाटील. अन् गाव सातारा.”  विचारण्याआधीच गाव पण सांगून टाकलं. 

“वडील काय करतात?” चेहऱ्यावरचे  कोणतेही भाव न बदलता त्याचा पुढचा प्रश्न.

“मी शेतकरी कुटुंबातला आणि मला माहीत असणाऱ्या सगळ्या म्हणजे पाच पिढ्यांतले पूर्वज शेतीच करायचे.” मी माहिती पुरवली.      

त्यानंतर त्याने एम. ए. कधी झालं, बी. ए. कुठून केलं वगैरेसारखे काही जुजबी प्रश्न विचारले आणि माझा अर्ज विभाग प्रमुखाकडे  घेऊन निघाला. मीही पाय ओढत ओढत त्याच्या पाठोपाठ निघालो, पण त्याने मला ‘कळवतो’ असं म्हटल्यामुळे मला काढता पाय घ्यावा लागला.

पंधरा दिवस उलटून गेले तरी काहीच समजलं नाही. मला वाटलं की आपण चौकशी तरी करून यावं. पटकन तयार झालो आणि एकटाच निघालो. कॉलेजात इंग्रजी विभागा जवळ पोहोचणार इतक्यात तिथे एक जाकीट घातलेले शिडशिडीत असे एक प्राध्यापक दिसले. त्यांना याबाबत बोलणार तेवढयात त्यांनीच विचारलं, 

“तुम्ही पाटील ना?”

अचानक मला काही सुचलं नाही, पण लगेच माझी मान होकारार्थी हलली. 

“काय मग, उद्या जॉईन करताय ना?”

“हो.” 

पण माझ्या चेहऱ्यावरचा  गोंधळ पाहून श्रीकांत जोशी म्हणाले, 

“सॉरी, मी ओळख करून द्यायची विसरलो. मी एस. एन. जोशी. इथे इंग्रजीचा विभाग प्रमुख आहे. मी तुमचा अर्ज बघितलाय. आमच्या ऑफिसमधून फोन आला असेल तुम्हाला. आपल्याला पुढच्या सोमवारी लेक्चर्स सुरू करायची आहेत. तुम्ही बी.एस्सी. फर्स्टला सुरू करा. मग ठरवू बाकीचं. पुस्तक घ्या लायब्ररीमधून. चला मी घेऊन देतो माझ्या बॉरोकार्डवर.. तुमचं मिळालं की द्या मला परत.” 

मला फोन वगैरे काही आला नव्हता. पण मी काहीचं बोललो नाही. नोकरीची गरज होती. शिवाय सरांनी एवढं सविस्तर सांगितल्यावर सगळ्या गोष्टीची खात्री झाली होती. मी सरांच्या मागे जात होतो. अचानक त्यांनी कोणाला तरी मोठयाने लांबूनच हातवारे करत हाक मारली,

“पवारला पाठवा.”     

“काय सर?” घाईघाईत आलेल्या पवारनं विचारलं. आणि त्याचं लक्ष शेजारी उभ्या असलेल्या माझ्याकडं गेलं. त्याचा चेहरा पडला. पण तो काही बोलला नाही. तो मला फोन करायचा विसरला होता. सर त्याला झापणार असं वाटलं होतं. पण जोशी सरांना कुठं माहीत की त्यानं मला फोनच केला नाही ते. पवारच्या बोलण्यावरून माझ्या हे लक्षात आलं की आज प्राचार्य नाहीत आणि सिनिअरमोस्ट असल्यानं जोशी सरांकडं चार्ज आहे. लायब्ररीकडं वळता वळता जोशी सर म्हणाले, “यांना पुस्तक देतो आणि तसाच बँकेत जाऊन येतो. पाटील सर परत येतील, तेव्हा त्यांना जॉईन करून घ्या”. 

मी पुस्तक घेऊन ऑफिसात परतलो तेव्हा पवार लगेच माझ्याजवळ आला. “सॉरी सर, मला वाटलं सर ओरडतील. अहो, त्यांनी मला फोन करून तुम्हाला कळवायला सांगितल होतं, पण मी विसरलोच”. पवारला सगळं सांगितल्यावर तो माझ्यावर खूष झाला आणि लगबगीने जॉईन करवून मला “सोमवारी भेटू, पाटील सर” असं म्हणून निघून गेला.

माझं एक वर्ष संपून दुसरं वर्ष सुरू झालं होतं. अजून विद्यार्थ्यातून प्राध्यापकात रूपांतर सुरूच होतं. पीएचडी सुरू करण्याआधी काही पूर्वतयारी करणं आवश्यक होतं. भाषेचे संवाद रेकॉर्ड करण्यासाठी मला काम संपल्यावर सारखं मिरज, कुपवाड, कागवाड, शेडबाळ, उगार, अथनी या परिसरात जायला लागायचं. खरं म्हणजे मला बी.ए.च्या तिसऱ्या वर्षाला असताना भाषाविज्ञानविषयक असणारा पेपर आवडायचा. त्यातच मला सर्वाधिक म्हणजे ऐंशी मार्क्स पडले होते. विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर मी भाषाविज्ञान हा ऐच्छिक विषय घेतला होता. त्या माध्यमातून उपयोजित भाषाविज्ञान, इंग्रजी भाषा व साहित्याचे अध्यापन, शैलीविज्ञान अशा काही विषयांबरोबर भाषाविज्ञानातील मूलभूत संकल्पना मी अवगत केल्या होत्या. त्यावेळी आम्हाला मनोभाषाविज्ञान आणि सामाजिक भाषाविज्ञातील काही गोष्टींची माहिती झाली होती. काही विद्यार्थ्यांना भाषाविज्ञान अवघड जायचा पण मला मात्र यात थोडी गती होती. स्योसूर, बुम्फिल्ड, चोम्सी वैगेरे मंडळी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे परिचित झाली होती. भाषेचा समाजशास्त्रीय अंगाने अभ्यास करणारी ‘सामाजिक-भाषाविज्ञान’ ही भाषाविज्ञानाची एक शाखा विकसित आणि समृद्ध  झाली होती. 

सामाजिक भाषाविज्ञान हा विषय ज्यामुळे उदयाला आला, त्यातील एक महत्त्वपूर्ण अभ्यास १९६८ मध्ये कुपवाडमध्ये झाला होता. गम्पर्झ आणि विल्सन यांचा तो अभ्यास पुढे दोन तीन वर्षांनी १९७१ मध्ये प्रकाशित झाला. मला फिल्डवर्कचा काहीएक अनुभव नव्हता. माझ्याकडं सुरुवातीला उसनवारीनं घेतलेला सोनीचा टेप-रेकॉर्डर आणि नवीन काही कॅसेटस् होत्या. हेडफोन आणि छोटासा एक्स्टर्नल माईक. काही तरी नवीन लक्षात आलं की मी गणपतीचा फोटो असलेल्या जाड डायरीत लिहून ठेवी. कुपवाडमध्ये जैन, लिंगायत, मुस्लिम व बहुतेक सर्व जातीतील हिंदू असे लोक रहायचे. जैन व लिंगायतांची घरे गावात पश्चिमेला वेगवेगळ्या गल्ल्यामध्ये होती. त्याच्या बाजूला पूर्वेला मुस्लिम आणि त्याच्या बाजूला साधारण इतरांची घरं होती. गम्पर्झ आणि विल्सन या दोघांच्या सत्तरीच्या नोंदीप्रमाणे कुपवाड मध्ये तीन हजार इतकी लोकवस्ती होती. या गावात जगान्याहारी पद्धत अशी होती की लिंगायत व जैन लोक घरात कन्नड बोलायचे, पण बाहेर मराठी बोलायचे. मुस्लिम समाजातील लोक घरात किंवा त्यांच्या त्यांच्यात उर्दू (वा दखनी) मिश्रित हिंदीत बोलायचे, पण इतरांबरोबर मराठीत बोलायचे. बाकी सर्व लोक मराठी बोलायचे, पण त्यावर कधी कानडीचा प्रभाव असे तर कधी उर्दूमिश्रित हिंदीचा. जैन-लिंगायताचे बरेच पाहुणे कर्नाटकात होते, त्यामुळे त्यांच्या मुली तिकडं द्यायचे किंवा तिकडच्या करायचे. जवळचं सांगली आणि मिरज बाजारपेठा असल्यानं बरेच लोक तिथे आले की कुपवाडात पाहुण्यांना भेटून जायचे. हे सगळं १९६०-७० च्या कुपवाडात चालू होतं. १९७१ च्या अभ्यासात आपणास कुपवाडात बोलली जाणारी मराठी, हिंदी, व कानडी यात बरेच साम्य असल्याचं सहज दिसून येईल.  

माझ्या हे सगळं डोक्यात घोळत होतं. मला महाराष्ट-कर्नाटक सीमेवर गेल्या चाळीस वर्षात भाषेवर काय परिणाम झालाय? नक्की झालाय का? तसं असेल तर कोणकोणत्या कारणांनी झालाय असे अनेक प्रश्न पडत होते. मला त्यावर संशोधन करायचं होतं आणि म्हणून मी सारखा या परिसरात भटकायचो. मी महाराष्ट्रातला मिरज व कर्नाटकातला अथनी या दोन तालुक्यांवर भर दिला होता. 

खरं तर मी वाचलेल्या कुपवाडात जमीन-अस्मानचा बदल झाला होता. सांगली-मिरज-कुपवाड संयुक्त महानगरपालिका झाली होती. लोकसंख्या काही पटींनी वाढली होती. औद्योगिकरण बरंच झालं होत. मूळ कुपवाडाची हद्द होती, पण ती नवीन वस्तीत मिसळली होती. जवळच पटवर्धनांच संस्थान होतं. मला कुपवाडात जैन समाजाचे पेशाने माध्यमिक शिक्षक असलेले आणि गावाबद्दलची आपुलकी असलेले एक भले गृहस्थ भेटले होते. त्यांचं नाव सन्मती. नावाप्रमाणेच ते चांगल्या विचारांचे होते. त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गम्पर्झ आणि विल्सनला पाहिलं होतं. कुपवाडात जेव्हा साधी काडीपेटीही मिळत नसे. त्या काळात हे दोन परदेशी भाषावैज्ञानिक आणि एकाची बायको असे तिघे साधारणपणे तीन महिने कुपवाडात राहिले होते, असं मला समजलं. त्यानंतर अलीकडे आणखी एक-दोन अभ्यासक तिथं येऊन गेल्याचंही त्यांना माहित होतं.

एक दिवस मी कुपवाडला निघालो. कोल्हापूर स्टँडवर मिरजेला जाणाऱ्या गाडीत बसलो. बसमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती, पण मला तीन सीटवर मध्येच जागा मिळाली. तिकीट काढून थोडा वेळ झाला असेल आणि मला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. पोटातही दुखू लागलं. उठून पुढं जावं तर विचित्र दिसलं असतं म्हणून तसाच बसून राहिलो. पण वेदना तीव्र होऊ लागल्या आणि इलाज संपला. बराच वेळ सहन केलं होतं, पण आता नाईलाजानं जागेवरून उठलो. बॅग घेऊन कसातरी कंडक्टरजवळ आलो. त्याला गाडी थांबवायला सांगितली तर तो म्हणाला ‘पाच मिनटं थांबा.’ गाडी थांबली तोपर्यंत माझी अवस्था बरीच खराब झाली होती. कसातरी खाली उतरलो. तोंडाला कोरड पडली होती. अंगाला एवढा घाम आला होता की कपडे अक्षरशः भिजले होते.  शर्टाच्या बाह्या दुमडल्या आणि डोळ्यापुढे अंधारलेलं असतानाच रस्ता ओलांडून समोरच्या हॉटेलात शिरलो. ग्लासभर थंड पाणी पिलो. माझी अवस्था बघून वेटर जवळ आला. मी त्याला जवळच्या दवाखान्यात न्यायला सांगितलं. त्यानंच माझी बॅग घेतली आणि चालत आम्ही शेजारच्या दवाखान्यात गेलो. वेटर निघून गेला आणि मी समोर ठेवलेल्या बाकावर आडवा होऊन या कुशीवरून त्या कुशीवर असा करत तडफडत होतो. दहा मिनिटांनी डॉक्टर आले आणि माझ्या दोन्ही दंडात दोन इंजेक्शनं दिली. मला स्टाफनं वरच्या मजल्यावर उचलून नेलं आणि कॉटवर टाकलं. लगेच तीन वेगवेगळ्या आकाराच्या गोळ्या दिल्या आणि पुढच्या कामाला पुन्हा खाली निघून गेले. पुढे मी दोन अडीच तास तसाच तडफडत राहिलो. पण हळूहळू वेदना कमी होत गेल्या. अजूनही वेदना होत्याच पण आता मला इतर गोष्टीची जाणीव होऊ लागली. काही वेळानं एक सिस्टर तिथं आली तिला मी कोणत्या गावात आहे? दवाखान्याचं नाव काय आहे? असं विचारलं. तर तिनं सांगितलं मगदूम हॉस्पिटल, जयसिंगपूर. 

योगायोग चांगला होता. जयसिंगपूरचा – प्रशांत सिंत्रे नावाचा – एक मित्र होता. त्याला फोन करून झाला प्रकार सांगून मी ॲडमिट असल्याचं सांगितलं. तो परीक्षेच्या कामात कोल्हापूरमध्ये होता. त्यानी सांगितलं, ‘माझे बंधू येतील त्यांच्याबरोबर घरी जा मी तोपर्यंत पोहोचतो’. थोडया वेळाने डॉक्टर आले. त्यांनी सोनोग्राफी करून घेण्याचा सल्ला दिला. किडनी स्टोन असल्याचा प्राथमिक अंदाज बोलून दाखविला. मला तो पटकन पटला कारण गेली अनेक दिवस भ्रमंती करताना पाणी पिण्याकडं अर्थातच दुर्लक्ष झालं होतं. सात वाजता प्रशांतचे बंधू आले आणि बिल भागवून मला गाडीतून घरी नेले. चहापान होईपर्यंत प्रशांतही तेथे आला. माझ्या वेदना कमी झाल्या तरी त्या पूर्ण बंद झाल्या नव्हत्या त्यामुळे रात्री मी गच्चीवरच झोपायचा आग्रह धरला आणि आम्ही तसंच केलं. मला कशीतरी थोडी झोप लागली असेल. पहाटेच मी उठलो. बराच टाईमपास केल्यावर सकाळचे सहा वाजले. मी चहा घेऊन लगेच कोल्हापूरला गेलो.

पुढे सोनोग्राफीत स्टोन असल्याचं कन्फर्म झालं. दोन महिने वेगवेगळे प्रयोग केले. ऑपरेशन करावं लागलं नाही. सुरुवातीला डॉक्टरची औषधे आणि नंतर आयुर्वेदिक उग्र वासाचे काढे अशा सोपास्कारानंतर महिन्याभरानंतर माझा त्रास कमी झाला. अचानक उद्भवलेल्या प्रसंगात प्रशांतने केलेले ते उपकार माझ्या कायम लक्षात राहिले.       

मिरजेहून कर्नाटकात शिरताना अगदीच सीमेवर असलेलं गावं म्हणजे कागवाड. पहिल्यांदा मी तिथल्या कॉलेजात गेलो होतो. नंतर तिथल्या मराठी, इंग्रजी आणि कन्नड माध्यमाच्या शाळेत जाऊन तिथली विद्यार्थीसंख्या यासारखी माहिती मिळवून शिक्षकांशी सर्वसाधारण चर्चा केली होती. कागवाडातले हत्तरकी नावाचे असेच एक इतिहासाचे जाणकार मला स्वतःहून मदत करायचे, माझ्या राहण्याजेवणाची ते चौकशी करायचे, नवनवीन लोकांच्या भेटी घालून द्यायचे. शेडबाळात एक मुस्लिम डॉक्टर होते ते काही माहिती मला द्यायचे. यांच्या माध्यमातून इतर लोकांच्याही ओळखी व्हायच्या आणि माझं काम चालायचं. असाच एकदा मी कागवाडात एक पूर्ण आठवडा राहिलो होतो. मला कन्नड यायचं नाही. तरी प्रयत्न करायचो. सगळ्या गावात हिंडायचो आणि काही ठिकाणी मिळतील तसे संवाद रेकॉर्ड करायचो. काही प्रसंगाच्या नोंदी करायचो. असं दिवसभर सुरू असायचं. रात्री या विषयावर काही पुस्तक वाचायची किंवा दिवसभर मिळविलेले संवाद पुन्हा ऐकायचे. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून तयार असायचो आणि दिवस उगवला की कार्यक्रम सुरू. 

एक दिवस असाच कागवाडात कमरेला सोनीचा नवीन रिकॉर्ड प्लेअर लावून, कानात हेडफोन घालून गावातून फिरत पूर्वेच्या मंदिराजवळ मी जात होतो. कर्नाटकात कसल्या तरी निवडणुका होणार होत्या. काही लोक माझ्याकडे संशयाने पाहत होते. एकानं सांगितलं की ‘निवडणुकीपूर्वी असे सीआयडीचे लोक फिरून माहिती काढतात.’ इतर वेळीही लोकांचे असे गैरसमज मला समजायचे. त्यामुळं काही लोक सहकार्य करायचे, काही टाळायचे. त्याचं मला फारस काही वाटत नसे. पण आज चांगलाच कात्रीत सापडलो होतो. एकाच्या सी.आय.डीच्या शंकेमुळे अजूनच काही लोक जमा झाले. मला कन्नड येत नव्हतं. नाही म्हणायला काही जुजबी शब्द यायचे. बरचसं अंदाजानं कळायचं. मला अंदाजानं समजलेलं कधी कधी मी ओळखीच्या लोकांना बोलून दाखवायचो.  

लोकांनी कानडी भाषेत गोंधळ सुरू केला होता. माझा टेप रिकॉर्डर हिसकावून त्यात काय रेकॉर्ड केलयं, ते बघूया. असं एकानं बोलून दाखवलं. मला पहिल्यांदा लक्षात आलं की अशा अनोळखी ठिकाणी फिल्डवर्कला शक्यतो एकटयाने जायला नको होतं. मॉब सायकॉलॉजी बिघडली आणि त्यांनी इजा वैगेरे पोहोचवली तर? नाही आईबाप बघायला अन् कोणी मित्र! खूपच गोंधळलो होतो. इतक्यात तिथे हत्तरकी सर आपल्या हायस्कुलात शिकणाऱ्या मुलीला गाडीवर बसवून तिथून निघाले होते. त्यांनी गर्दी बघून गाडी वळवली. गर्दीतून जवळ येऊन पाहतात तर मी. आणि सगळीकडे लहान-मोठया बघ्यांची गर्दी. त्यांनी कन्नडमध्ये त्यांना काहीतरी विचारले आणि त्यांना लगेच सगळा उलगडा झाला. सी.आय.डी. सदृश्य शंका घेणाऱ्या युवकाची त्यांनी कानउघडणी केली आणि तो तात्काळ निसटला. बाकीही लोकांना सगळी वस्तुस्थिती समजली आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिलगिरीची भाषा उमटली. गर्दी पांगली आणि माझा जीव भांडयात पडला. 

आज विद्यापीठात नियोजित पी.एच.डी. मार्गदर्शकाकडे निघालो होतो. सोबत काळी कॉन्फरन्स बॅग होती. त्यात नेहमीची जाड डायरी होती. टॉवेल, दोन ड्रेस आणि दोनेक दिवसाच्या प्रवासास आवश्यक इतर बाबी होत्या. डिपार्टमेंटमध्ये पाय ठेवताच डॉ. राजमान्यांनी बघितलं. लगेच पुढे गेलो आणि आमची पुढं तासभर चर्चा झाली. शेवटी त्यांनी मला संदर्भ साहित्य मिळविण्याविषयी सांगितलं. मी खूपच उत्साही होतो. एक वाजले होते. झपाझप पावलं टाकत हयुमॅनिटीज बिल्डिंगजवळ आलो. शेअर रिक्षात बसलो आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशन गाठलं. आधी काहीच ठरलं नव्हतं, पण मागच्या सरांच्या संभाषणावरून पुसटशी कल्पना होती. त्यामुळं बॅग आणि काही साहित्य सोबत घेतलं होतं. तशी मला अशा प्रवासाची सवय होती. बऱ्याचदा मुंबईला एवढया कमी तयारीत कधीही निघून पोहचत असे. पण तेव्हाची गोष्ट निराळी असायची. बरेच नातेवाईक, गाववाले, मित्र मुंबईत असायचे, त्यामुळे तशी फार काही अडचण येत नसे. पण यावेळी मात्र अचानक ठरलं होतं. 

रिक्षावाल्याचे दहा रूपये देऊन फाटक ओलांडून मी फ्लटफॉर्मवर जवळजवळ पळतच गेलो. राणी चेन्नम्मा एक्सप्रेस उभी होती. तिकीटघराजवळ जाऊन दोनशे चौदा रूपयाचं जनरलचं तिकीट घेतलं, तेव्हा गाडीचा भोंगा वाजून गाडी सुरू झाली. मुंबईत अशी लोकल पकडण्याची सवय असल्यानं मला विशेष काही वाटलं नाही आणि सोबत सामानही फार नव्हतं. काही सेकंदात डबा गाठला. फर्स्टक्लासचा असल्याचं नंतर लक्षात आलं. पण मला माहीत होतं की ट्रेन लगेच पुढं मिरजेला थांबते तेव्हा जनरलमध्ये बसू असं ठरवून रिलॅक्स झालो. 

गाडी मिरजेला पोहचेपर्यंत नोकिया मोबाईलवरून मुन्न्याला मी निघाल्याची कल्पना दिली व जोशी सरांना याबाबत कळविण्यास सांगितलं. दोन मेसेजनी दोन रूपये घालविले. थोडे पैसे जवळ होते, पण त्यात बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. मिरजेत गाडी थांबल्यावर स्टेशनवर पाण्याची बाटली घेतली आणि जनरल डब्यात शिरलो. तोबा गर्दी होती, पण इलाज नव्हता. रॅकवरती बॅग सरकवली, बाटली काढून दोन घोट पाणी पिलो अन् गाडीबरोबर झुलत उभा राहिलो. मोबाईलवर आवाज झाला म्हणून बघितलं तर ‘वेलकम टू कर्नाटका’ असा मेसेज झळकला. रोमिंग सुरू झाल्यानं आता कुणाचा कॉल येणार नव्हता. रोमिंग मॅन्युअली सेट केलं असतं तर खूप जास्त पैसे जाणार होते. महाराष्ट्रातील आयडियाला कर्नाटकातली स्पाइस रोमिंग नेटवर्क पुरवत होती. सध्या तरी याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा उभ्या उभ्या झोकांडया खात राहिलो.

पाच-सात तास असेच गेले असतील. मागून खांद्यावर कोणीतरी सावकाश मारल्याचं लक्षात आलं. बघितलं तर सामान ठेवायच्या रॅकवरून कोणीतरी त्याचं गाव आलं म्हणून खाली उतरत होतं. त्याला अदबीन जागा दिली आणि स्वतःची जागा रॅकवर कायम केली. काय आनंद झाला सांगू? राजमान्यांनसोबत केलेली बोजड चर्चा, लगेच घाईत पकडलेली ट्रेन आणि सात तासांचा उभं राहून केलेला प्रवास, यामुळं शरीरानं, मनानं – अगदी सर्वांथानं थकलो होतो. रॅकवर जाऊन बसलो व बसल्या बसल्या पेंगू लागलो. नीटशी झोपही लागत नव्हती, कारण या सगळ्या भानगडीत काही खायला वेळच मिळाला नव्हता आणि नंतर गर्दीमुळे खाणं शक्यही नव्हतं. आता थोडी उसंत मिळाली आणि ट्रेनमध्ये फिरणाऱ्या पोराकडून भूईमुगाच्या उकडलेल्या शेंगा घेतल्या आणि एक एक करून सोलून खाऊ लागलो. फोलपाटाची मात्र कसरत करावी लागत होती. दिलेल्या कागदातच ती टाकावी लागत होती आणि त्यातून राहिलेल्या शेंगा हुडकून खाव्या लागायच्या. त्या संपल्यावर अजून थोडं पाणी पिलो आणि निर्धास्त झालो. संध्याकाळच्या दहाच्या सुमारास अजून एक शेजारी खाली उतरला आणि संपूर्ण रॅक झोपायला मिळाली. पुढे कोणतरी मध्ये मध्ये येऊन उठवायचा प्रयत्न करायचं. पण कधी झोपेत असायचो तर कधी झोपेचं सोंग घ्यायचो मात्र पहाटे गाडी बेंगलोरला पोहोचेपर्यंत मी आणि उशाखालीची बॅग यांनीच रॅक-कम-बर्थवर ताबा कायम ठेवला. सकाळी बेंगलोर स्टेशनला फ्रेश झालो, गरम गरम नाश्ता केला, चहा पिलो आणि बेंगलोरहून मंडयामार्गे म्हैसूरला जाणारी बस पकडली आणि तीनेक तासांनी म्हैसूरच्या सी.बी.एस.वर पोहोचलो. थोडी फार विचारपूस केल्यावर सीटी बस मिळाली आणि मानसगंगोत्रीला सी.आय.आय.एल.च्या प्रवेशद्वारापासून जवळच सोडलं.        

पायात सँडल घालून काळी बॅग गळ्याभोवती अडकवून प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो होतो. वर बघितलं तर  मोठया अक्षरांत CENTRAL INSTITUTE OF INDIAN LANGUAGES (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्विजेस) व त्याखाली देवनागरीत भारतीय भाषा संस्थान असं लिहिलं होतं. त्याआधी वेबसाईटवर माहिती घेतलेल्या इमारतीजवळ प्रत्यक्ष आल्यावर बरं वाटलं. तिथं जाताच सुरक्षारक्षकानं थांबवलं आणि काय काम आहे असं विचारलं.  तो बहुतेक सर्वांना असं विचारत नसावा. पण माझा अवतार बघून किंवा नेहमीच्यातला मी नसल्याचं त्यानं सवयीने ओळखून मला विचारलं असावं. काही विचारायच्या आतच त्यानं भारतातील विविध ठिकाणी झालेल्या तत्कालिन स्फोटांच्या (मुंबईतील साखळी स्फोट, मालेगावातील स्फोट) ताज्या घटना सांगून त्यामुळे सुरक्षा अधिक कडक केल्याचं सांगितलं. मी इथे येण्याचा उद्देश सांगितला, पण मी पत्र आणायला विसरलो होतो. अतिघाई चांगलीच अंगाशी आली होती. कोल्हापूर – बेंगलोर – म्हैसूर हा साताठशे किलोमीटर अंतर कापून केलेल्या प्रवासानंतर आलेला हा प्रसंग बाका होता. आता काय होणार या विचारानं सर्वांगाला घाम फुटला होता. काय करावं सुचत नव्हतं. मग मी थोडा विचार करून कोणाही कन्नड तज्ज्ञाला भेटायला आवडेल असं त्या सुरक्षारक्षकाला सांगितलं. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक? तो मला घेऊन चालू लागला. पुढे तो, मागे मी. चालत चालत दुसऱ्या मजल्यावरील एका केबीनपुढे येऊन तो थांबला. त्याने कानडीत काहीतरी सांगितलं. मी तिथल्या महोदयांना नमस्कार केला आणि इथं येण्याचं प्रयोजन थोडक्यात सांगितलं. मला मराठी – हिंदी -कानडी भाषेंवरील प्रबंध, विविध भाषावैज्ञानिक सर्वेक्षण, सामाजिक भाषाविज्ञानातील अभ्यासविषयक प्रश्नावल्या, इत्यादि संदर्भ साहित्य हवं होतं आणि मराठी व कन्नड भाषेच्या अनुषंगाने संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांशी चर्चा करायची आहे असं  सांगितलं. प्रोफेसर लिंगदेवरू हेळेमने यांना ते तात्काळ पटलं. त्यांनी समोर बसायची खूण केली आणि तत्क्षणी सुरक्षारक्षक गायब झाला. त्यानंतर साधारण तासभर चर्चा झाली आणि हेळेमने सरांनी त्यांनी कन्नड शिकण्याविषयी लिहिलेल्या पुस्तकाची मराठीत भाषांतरित झालेली प्रत त्यावर स्वतःची स्वाक्षरी करून मला भेट दिली. चांगुलपणाबाबतचा आणखी एक प्रसंग माझ्या खात्यात जमा झाला. कोणतीही ओळख नसताना परक्या माणसाला स्वीकारणं, त्याच्या सोबत आणखीही काही लोक बसले होते पण त्यांच्याशी चर्चा थांबवून माझ्या कामाचे स्वरूप समजावून घेणं, शक्य ते मार्गदर्शन करणं आणि पहिल्याच भेटीत पुस्तक भेट देणं याने माझं मन खरोखरचं आनंदून गेलं. एवढ्यावरच हे सद्गृहस्थ थांबले नाहीत, त्यांनी याच संस्थेत काम करणाऱ्या प्रोफेसर सौ. सुबय्या यांना फोन केला व मला अधिक मदतीसाठी त्यांच्याकडे पाठवलं.

आता प्रोफेसर सुबय्यांच्या केबीनपुढे पोहोचलो. दरवाजा उघडाच होता. विचारणा करून आत गेलो आणि त्यांच्याशी एकदम गावातली ओळखीची व्यक्ती भेटल्याप्रमाणे मनमोकळ्या गप्पा मारू लागलो. त्याचं झालं असं की, ‘मे आय कम इन, मॅडम?’ म्हणताच, त्या ‘ये ʃ ये ʃ’ असं चक्क मराठीत म्हणाल्या. अशा प्रसंगी मातृभाषेचा उपयोग क्षणार्धात समजतो! किती आश्वासक वाटतात आपल्या भाषेतले शब्द! मी निर्धास्त झालो. महाराष्ट्रीयन पद्धतीची साडी घातलेल्या, कपाळावर कुंकू असलेल्या सौ. सुबय्या मोठया अशा दालनात बसल्या होत्या. हेळेमनेंच्या फोननंतर मी येणार म्हणून उघडा ठेवलेला दरवाजा त्यांनी बंद करायला सांगितला. बाजूला त्यांची पी.ए. असणारी चुणचुणीत मुलगी बसली होती. तिने तो लगेच बंद केला आणि वातानुकूलीत तपमान वीस डिग्रीवर सेट केले. त्यांच्या समोर नारायण मूर्ती नावाचे संगणकशास्त्रातील तज्ज्ञ प्रोफेसर बसले होते. त्यांची ओळख जेव्हा सुबय्यांनी करून दिली तेव्हा माझ्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. स्वतः मूर्तींनी लगेच क्लिअर केलं की तुम्ही विचार करताय ते नारायण मूर्ती मी नव्हे. सगळेच हसले. त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या ‘नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग’ या पुस्तकावर ते सुबय्यांशी चर्चा करीत होते. त्याच्या काही अंतरावर सौ. सुबय्या आजीच्या मागे लागून आलेला सात-आठ वर्षाचा त्यांचा नातू टी. व्ही. ला कंटाळून त्याच्या खेळण्याबरोबर काहीतरी खेळत होता. मी आत आल्यावर काही वेळानं प्रोफेसर मूर्ती त्यांचं बोलणं थोडक्यात आटपून पुन्हा येतो म्हणून निघून गेले. एवढया कमी वेळातही त्यांच्याबद्दल अप्रूप वाटू लागलं. हे सर्व लोक किती मेहनती आहेत आणि  केवढं प्रचंड काम ते करीत असतात याबद्दल साधारण कल्पना क्षणोक्षणी येत होती. 

थोडयाचं वेळानं सुबय्यांच्या पी. ए. नी मला पेढे दिले आणि सौ. सुबय्यांनी सांगितलं की ही मुलगी गेली सहा महिने येथे फक्त अनुभव घेण्यासाठी अत्यल्प पगारावर काम करत होती. तिला नुकतच आयबीएमनं मासिक साठ हजार रूपये देऊन बोलावले होते. त्या हे सांगत असताना मुलीचा चेहरा अधिकच खुलून गेला. हे ऐकत ऐकत मी पेढे मटकावले व शेजारी ठेवलेल्या काचेच्या ग्लासमधील पाणी पिऊन टाकले. त्यानंतर त्यांनी नातवाची ओळख करून दिली. त्याच्याबरोबरही मी काही वेळ बोललो. त्याला इंग्रजी आणि मराठी बोलायला काहीही अडचण नव्हती. तो लगेच कोड स्वीच करत होता. त्यावेळी सौ. सुबय्या या संस्थेच्या डेप्युटी डायरेक्टर होत्या. त्यांनी फोन केल्याने मला शेजारच्या होस्टेलमध्ये राहण्याची संधी मिळाली. 

पाच वाजले तेव्हा मी होस्टेलमध्ये गेलो. फ्रेश होऊन काही वेळानं बाहेर पडलो. अगदी शेजारीच हजार एकरात असलेल्या म्हैसूर विद्यापीठाच्या कँपसमध्ये फिरायला गेलो. अजून विचारातच होतो. सौ. सुबाय्यांनी १९८० मध्ये म्हैसूर विदयापीठातून पी.एच.डी. केली होती. त्यांनी धारावी येथे दीर्घकाळ राहून केलेला अभ्यास व त्यादरम्यानचे त्यांचे अनुभव याबद्दल मला खूपच कुतूहल होतं. त्यांच्याकडून काही प्रसंग ऐकले. विषेशतः धारावीतील अभागी मुले चोरी करताना कोणत्या क्लृप्त्या वापरतात हेही ती मुलं त्यांच्यासोबत शेअर करीत. एखाद्या क्षेत्राभ्यासकाने कशा प्रकारे विश्वास संपादन करावा याचे ते अप्रतिम उदाहरण होतं. परिस्थितीमुळे चुकीचं वागायला भाग पडलेल्या मुलांमधला निरागसपणा आणि सौ. सुबय्यांनी याच धारावीत दीर्घकाळ राहून केलेला अभ्यास हे सर्वच मला कल्पनाविलास वाटत होता आणि म्हणूनच या विचारात फिरता फिरता विद्यापीठाच्या मुख्य कँपसपासून, अकॅडमिक स्टाफ, कॉलेजचा परिसर ओलांडून सर्वात पूर्वेला तळ्यापर्यंत मी कधी आणि कसा पोहोचलो हे समजलचं नाही. 

भानावर आलो आणि इव्हिनिंग वॉकला आलेल्या इतर लोकांत मी मिसळून गेलो. तळ्याभोवती असलेला  गोलाकार ट्रॅक मला खूपच आवडला. बराच वेळ तिथंच रमलो. 

परतत असताना लक्ष समोर गेलं आणि मला एकदम ओळखीचा चेहरा दिसला. क्षणभर डोळ्यावर विश्वास बसला नाही. गिरीश सर म्हणून हाक दिली आणि ते थांबले. ते अर्थशास्त्राचे अध्यापक होते. कोल्हापूर विद्यापीठात आखिल भारतीय अर्थशास्त्रीय परिषदेसाठी ते आले होते. परीक्षा संपून उन्हाळ्याची सुट्टी सुरू होती, तेव्हा मी मित्रांसोबत स्वयंसेवक म्हणून काम केलं होतं. मुळात इंग्रजी विषय असून आम्ही या अर्थशास्त्राच्या राष्ट्रीय परिषदेचे स्वयंसेवक म्हणून काम करण्याची अनेक कारणे होती. एकतर अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना व्याख्याने ऐकायची होती. भारतातील विविध ठिकाणाहून व भारताबाहेरूनही काही अर्थतज्ज्ञ या प्रसंगी आले होते. दुसरी बाब म्हणजे त्यांच्यासोबत इंग्रजीत संवाद साधणं इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना सोपे होते. तिसरं म्हणजे मुलींचे वसतिगृह खाली करून तिथं सर्व गेस्टची व्यवस्था करण्यात आली होती. मुलींचे वसतिगृह सुरू असताना तिथं जाणे कधीच शक्य नव्हतं. या वयातील अनेक अनाकलनीय जिज्ञासेंप्रमाणे आम्हाला येथे जाण्याची संधी मिळणार होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हा मित्रांचा कोणतेही काम करण्याचा उत्साह अवर्णनीय होता. या चार दिवसाच्या परिषदेदरम्यान आम्ही पाहुण्यांची ये-जा, जेवण, साहित्य पुरविणे याप्रकारची सर्व कामं दिवसरात्र न थकता पार पाडली होती. याच दरम्यान गिरिश सर आम्हाला भेटले होते. त्यांनी त्यांचा म्हैसूरमधला पत्ताही दिला होता. मात्र अशी अचानक त्यांची भेट होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. दहा मिनिटे सर बोलत राहिले. मग त्यांनी आता ते मंडया कँपसला असल्याचं सांगितलं. पुढे त्यांनी चहासाठी आग्रह केला, पण मी नको म्हणालो. 

दुसऱ्या दिवशी संगणकावर पुस्तकं शोधताना मॅक्सिन बर्नसन यांचं फलटणच्या मराठीवरील पुस्तकमिळालं. त्या अगोदर टाइम्स ऑफ इंडियामध्ये किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांच्याबद्दल त्रोटक माहिती वाचली होती. पण आता मी ठरवून टाकलं की गावी गेलं की पहिल्यांदा त्यांना भेटायचं. कारण त्यांचं कामही सामाजिक भाषाविज्ञानात होतं. एक पेनसिल्व्हिनियामधून इंग्रजी साहित्यात एम. ए. आणि भाषाविज्ञानात पी.एचडी. झालेली अमेरिकन बाई इतकी वर्षे फलटणमध्ये मराठीवर काय करीत आहे, अशी मला उत्सुकता लागून राहिली होती. आपल्या भाषेविषयी मला आदर होताच, पण त्यावर इतकी वर्षं कोणीतरी परदेशी व्यक्ती संशोधन करीत आहे, याचं कुतूहल वाटलं. 

दुपारी जेवणाच्या सुट्टीत चौथ्या मजल्यावर गेलो तर एक साहित्य अकादमी प्राप्त तज्ज्ञ भेटले. ते कसल्यातरी शब्दकोशावर काम करत होते. बाकी होस्टेलमध्ये, फॅकल्टी हाऊस आणि इंटरनॅशनल सेंटरमध्ये राहणारे देशातील आणि बाहेरचे अनेक तज्ज्ञ तेथे एकत्र जेवत होते. मी जेवणानंतर प्रोफेसर रंगीला आणि जेनिफर बेयर यांना भेटलो. तिथं मायक्रोसॉफ्टच्या एका मराठीविषयक प्रोजेक्टवर काम करणा-या मध्यप्रदेशातील सोलापूरकर या मराठी अभ्यासकाशी काही चर्चा केली. संपूर्ण भारताचे लहानसे रूप मला या संस्थेत अनुभवायला मिळाले. 

पूर्ण तयारीनिशी न आल्याने चारच दिवसात हा अभ्यासदौरा संपविला. होस्टेलचे पैसे दिले. येताना म्हैसूरमधूनच ट्रेन होती. पुन्हा जनरल डब्याने मिरजेत आलो व तिथून बसने कोल्हापूर. जोशी सरांना भेटून राहिलेली लेक्चर्स पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आणि राजमानेंना भेटायला निघून गेलो. जो रागावत नाही तो मार्गदर्शक कसला? या न्यायाने राजमाने चिडले. “हल्लीच्या मुलांना पेशन्स कुठे आहेत?” अशी त्यांनी सुरवात केली आणि डोळे रोखत “पुन्हा महिना दोन महिने थांबा आणि काहीतरी हाताला लागल्याशिवाय मला भेटू नका,” असं खडसावलं. ते काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे मला काही बोलण्याची संधीच मिळाली नाही. सर रागावल्याचं काही वाटलं नाही कारण मलाही ते मान्य होतं की चार दिवसात काय होणार? परत जायचं ठरवूनच मी आलो होतो. पण आताच्या घडीला आपलं ऐकतं कोण? 

सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याकडं थोडीच असतात, असं मनाला समजावलं. प्रवासाचा आलेला ताण आणि राजमानेंच्या   बोलण्याने आलेला ताण यातून रिलॅक्स होण्यासाठी १९८६ सालच्या ‘तुझ्यावाचून करमेना’ या मराठी चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गाणं

“भले बुरे जे घडून गेले,
विसरून जाऊ सारे क्षणभर,
जरा विसावू या वळणावर
या वळणावर”
गुणगुणतच बाहेर पडलो. 

१. जॉन गम्पर्झ आणि रॉबर्ट विल्सन. १९७१. कन्व्हर्जन्स अँड क्रिओलईझेशन: अ केस फ्रॉम द इंडो-आर्यन/द्रविडीयन बॉर्डर इन इंडिया. डेल हाईम्स (सं.) पीजीनायझेशन आणि क्रेऑलाईझेशन ऑफ लँग्वेजेस, १९५१-१६७. केम्ब्रिज: केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस.
२. यामध्ये जॉन गम्पर्झ, फ्रँकलिन साऊथवर्थ, हेलन उलरीख-बेलिस, महादेव आपटे, पी. बी. पंडीत, महेश नाडकर्णी, एडवर्ड बेंटीक्स, कॉलिन मसिका यांसारख्या संशोधकांचे संशोधन निबंध होते. तर विल्यम ब्राईटचे ‘ॲन आऊटलाईन ऑफ कन्नड’, पी.पी. गिरीधरचे ‘अ केस ग्रामर ऑफ दि कन्नड’, हेळमने आणि लीलावती यांचे ‘ॲन इंटेन्सिव्ह कोर्स इन कन्नड’, एम. आर. रघुनाथ यांचे ‘मॉर्फोफोनेमिक ॲनलसिस ऑफ कन्नड लँग्विज’ यासारखे मला उपलब्ध झालेले ग्रंथ असायचे.
३. कृपया अधिक माहिती https://www.ciil.org/  या संकेतस्थळावर मिळू शकेल.
४. कन्नड स्वयंबोधिनी – लेखक लिंगदेवरू हेळेमने, अनुवादक डी.एस. चौगुले.
५. ॲन एथनोलिंग्विस्टिक सर्वे ऑफ धारावी: अ स्लम इन बॉम्बे (के एस राज्यश्री), १९८६.
६. द स्पीच ऑफ फलटण: अ स्टडी इन लिंग्विस्टिक व्हेरिएशन बाय मॅक्सिन बर्नस्टन, युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वानिया, १९७३.

चित्र सौजन्य: योगेश पवार

अरविंद जाधव यांनी इंग्रजी व भाषाविज्ञान या विषयांतून पदवीत्तर पदवी, या दोन्ही विषयातून विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट परीक्षा उत्तीर्ण तसेच डेक्कन कॉलेज, पुणे येथून बोधात्मक अर्थविज्ञान या विषयातून पी.एचडी. प्राप्त केली आहे. ते यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड येथे इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक असून ते विविध विषयावर इंग्रजी व मराठी भाषेतून लेखन करतात. त्यांना मराठी व इंग्रजी भाषा, वाङमय, संस्कृती, व भाषांतराविषयी आवड आहे.

5 comments on “जरा विसावू या वळणावर..: अरविंद जाधव

  1. Suryakant Shamrao Adate

    खूप छान मांडणी…. ओघवती भाषाशैली….. आत्मचरित्रपर लेखन अगदी अचूकपणे आणि ताकतीने आपल्या सकस लेखणीतून उतरवलेले आहेस. गरिबी हे शिक्षणापासून वंचित ठेवणारे साधन नसून जर जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर शिक्षण मार्ग काढतेच हेच वरील लेखातून दाखविलेले आहे. गुरसाळेसारख्या खेडेगावापासून सुरू झालेला शैक्षणिक प्रवास आणि या प्रवासातील विद्यापीठातील तसेच त्यानंतरचे दिवस तू या लेखाद्वारे अजरामर बनविलेले आहेस. पुढच्या लेखणीय वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन……..

    Reply
  2. RAJARAM THORAT

    खुप मेहनत, चिकाटी, जिज्ञासा आणि प्रामाणिक प्रयत्न करून जे मिळवाल ते आयुष्य भर साथ देणार असतं. प्रमाणिक प्रयत्ना ना परमेश्वर साथ देतोच. अरविंद जाधव यांनी सुध्दा याचं मार्गानं प्रवास करत, गुरसाळे, दहिवडी, खटाव, शिवाजी विद्यापीठ ते यशवंतराव चव्हाण कॉलेज, कराड या दरम्यान जे अनुभवले ते मांडले आहे. जे अनेक विद्यार्थी स्मरणात आहेत त्यापैकी सर्वात चांगला असा आमचा अरविंद, लिखाणाच्या क्षेत्रात पाऊल टाकतो आहे, आम्हास अभिमान आहे. अजून मोठा हो याचं शुभेछ्या.

    Reply
  3. Laxman Sathe

    ओघवत्या भाषेत लिहिलेले अनुभवकथन असून अतिशय उत्तम मांडणी अधिक वैचारिक वाटते. काही घटना,प्रसंग समजावून सांगण्याचा प्रयत्न दिसून येतो आहे. मात्र कष्टाळू व प्रामाणिक व्यक्तिमत्व सर्वत्र ठसठशीतपणे समोर उभा राहते.नावात केलेला बदल लक्षात आला नाही. प्रारंभ आणि शेवट हा खरोखर अप्रतिम.
    पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

    Reply
  4. Abaaso Jaddhav

    Short and sweet

    Reply
  5. पंकज जगताप

    खुपच छान लेख

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *