इंग्रजी लेख: अंबिका ऐैयादुराई आणि ममता पांड्या

मराठी भाषांतर: राघवेंद्र वंजारी

दिबांग खोऱ्यातली एक गोष्ट



back

दिबांग खोऱ्यातली एक गोष्ट: अक्रूची शिंगे वाकडी का असतात?

जिहा राहात असलेल्या एटाबे गावात सगळं शांत होतं. दिवसभराची कामे आटोपून गावातल्या कुटुंबातील सगळे जण निवांत होते. जिहाची दिवसभरातील ही आवडीची वेळ. तो आपल्या आजीबरोबर शेकोटीजवळ बसला होता. बाकीचेही काही जण आजूबाजूला बसले होते. “नाया, आज रात्री तू मला कोणती गोष्ट सांगशील?” जिहाने आपल्या आजीला विचारले. नाया सांगते त्या गोष्टी  जिहाला खूप आवडतात. तिच्या गोष्टी म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या इदू मिश्मी लोकांच्या गोष्टी. आपल्या छोट्याशा गावाच्या, बाजूच्या जंगलाच्या आणि डोंगर-दऱ्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या गोष्टी ऐकायला जिहाला आवडतं.

शेकोटीच्या प्रकाशात नायाचा चेहरा उजळला होता. “आज मी तुला अक्रूची गोष्ट सांगेन,” ती विचार करून म्हणाली.

“अक्रू म्हणजे कोण गं नाया?”

“बकरी आणि हरणासारखा दिसणारा प्राणी म्हणजे अक्रू. तो उंच डोंगरात राहतो. जाड मानेचा आणि धिप्पाड दिसणाऱ्या अक्रूचे संपूर्ण अंग केसाळ असतं आणि खांदे वाकलेले. पण त्याचे पाय आणि शेपटी मात्र लहान असते. अक्रूचे नाक तर सुजलेल्या काळ्या गोळ्याप्रमाणे विचित्र दिसतं.”

जिहाने डोळे मिटले आणि नायाने वर्णन केलेल्या अक्रूचे चित्र आपल्या मनात उभं केलं. “नाया, त्याला माको (सांबर) किंवा माय(सेरो)सारखी शिंगे असतात? 

“नाही,” नाया म्हणाली. “अक्रूची शिंगे त्यांच्यासारखी नाहीत.” समोर बांबूच्या फळ्यावर मांडलेल्या प्राण्यांच्या कवट्यां आणि त्यावरच्या वाकलेल्या शिंगांकडे नायाने बोट दाखवले. “अक्रूची शिंगे आधी अशी वाकलेली नसायची. ती लांब आणि सरळ असायची.”

जिहाचे डोळे विस्फारले. “मग शिंगे वाकडी कशी झाली, नाया?”

बाजूला बसलेला एक तरुण म्हणाला, “हा तर वेगवेगळ्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या अवयवांपासून बनलेला एक वेगळाच प्राणी वाटतो!” यावर सगळे जण हसले.

बाजूला बसलेला म्हातारा म्हणाला, “अक्रूची चेष्टा करू नकोस. नाहीतर तो नगोलो – डोंगररांगांत राहणारा आत्मा रागावेल. सगळे अक्रू त्याचे आहेत”. 

“नाही-नाही ! अक्रू आपले आहेत,” इतर बोलले.

“मग पुढे  काय झाले नाया?” जिहाने आजीच्या मांडीवर डोके टेकवत उत्सुकतेने विचारले.

“मग काय! तर मग, नगोलो आणि इदू मिश्मी या दोघांनीही अक्रूवर आपला हक्क सांगितला. बराच काळ असेच चालू राहिले. पण अक्रू कुणाचा हा निर्णय काही होईना. अखेरीस, अक्रूवर कुणाचा हक्क हे ठरविण्यासाठी नगोलो आणि इदू मिश्मी यांच्यात रस्सीखेचीची स्पर्धा जाहीर केली गेली. जे जिंकतील त्यांचा अक्रू. इदू लोकांनी दिबांग खोऱ्यातील सर्वांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. स्पर्धेचा दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळी, नगोलो आणि इदू लोक एका मोकळ्या मैदानात जमा झाले आणि अक्रू मैदानाच्या बरोबर मध्ये उभा राहिला.

इदू लोकांनी अक्रूच्या शेपटीच्या बाजूची जागा घेतली आणि त्यांच्यातल्या सगळ्यांत दणकट असणाऱ्या शिकाऱ्याने अक्रूची शेपटी घट्ट पकडली. त्यांच्याकडचे बाकीचे सगळे शिकाऱ्याच्या मागे, त्याच्या कंबरेला घट्ट पकडून एकामागोमाग उभे राहिले. 

डोंगररांगांचा आत्मा मानले जाणारे नगोलो मोठ्या धाडसाने अक्रूसमोर उभे राहिले. त्यांच्यातल्या एका बलवान माणसाने आपल्या दोन्ही हातात अक्रूची सरळ आणि लांब शिंगे पकडली. त्याच्या मागोमाग नगोलो लोक मोठ्या ताकदीने उभे राहिले. 

मग, नगोलो आणि इदू- दोघांनीही दोन्ही बाजूंनी अक्रूला आपल्याकडे खेचायला सुरुवात केली. अक्रूही एकदम दणकट आणि पिळदार होता. दोन्ही बाजुंनी त्याला खेचले जात असले तरी त्याने मात्र आपल्या पायाने जमीन घट्ट धरून ठेवली होती. नगोलो आणि इदू यांच्यातली ही स्पर्धा अटीतटीची चालली  होती. 

शिंगांना धरून पुढे ओढणाऱ्यांना दाद न देता अक्रू आपले डोके मागे खेचत होता. इदू मिश्मी लोक अक्रूला पाठीमागून पूर्ण ताकदीनिशी खेचत होते. नगोलोंनी शिंगांवर आपली पकड कायम ठेवली होती. ते अक्रूला जसजसे खेचत होते तसतशी त्याची मजबूत शिंगे हळूहळू मागे आणि वरच्या दिशेने वळू लागली होती.

इदू लोक अक्रूला शेपटीकडून ओढण्यासाठी सर्वशक्तीने झगडत होते. पण, बलशाली नगोलोशी त्यांची बरोबरी होऊ शकली नाही. अक्रूची शिंगे ओढून ओढून अर्धी वाकडी होत हातात व्यवस्थित पकडता येत होती. तर, इदू लोकांच्या हातातून शेपटी निसटत चालली होती. असे करता करता एका झटक्यात शेपटीचा बराचसा मोठा पुंजका इदूंच्या हातात निसटून आला. अक्रूच्या पाठीमागे फक्त एक खुंटीवजा शेपूट शिल्लक राहिले! इदूंना मागे खेचायला काही राहिले नाही. सरतेशेवटी, नगोलोनी ही स्पर्धा जिंकली आणि तेव्हापासून त्यांनी अक्रू आपलाच असल्याचा दावाही केला.            

गोष्ट संपत आली तसे नायाने सर्वाना विचारले, “तर कळलं अक्रूची शिंगे वाकडी, पाठ कललेली, आणि त्याची शेपूट लहान का  झाली आहे ते?”

“नाया, तू कधी अक्रूला पाहिलयस?” जिहाने विचारले.

“खरंतर, फारच कमी लोकांनी अक्रूला बघितलंय. असं म्हणतात की, जिथे जमिनीवर फक्त बर्फच दिसते तिथे- त्या उंचीवर जाऊन शिकार करणारे अक्रूबद्दल सांगू शकतात. काही जण असंही म्हणतात की अक्रू अगदी तीनशेच्या संख्येने कळपा-कळपात फिरतात! यातलं किती खरं आणि किती खोटं हे मला माहिती नाही. मी तर कधीच अक्रूना पाहिलेले नाही,” नाया म्हणाली.

सगळं ऐकल्यावर, जिहाला आता अक्रूला पाहण्याची खूप उत्सुकता लागली. मनातल्या मनात त्याने ठरवले की मोठा झाल्यावर एक दिवस तो आपल्या वडिलांबरोबर दिबांग पर्वतावर चढून जाईल आणि त्याला एखादा अक्रू दिसेल! पर्वतरांगांवरच्या अक्रूची स्वप्ने पाहत जिहा  नायाच्या मांडीवर झोपी गेला. 

इदू मिश्मी लोकांकडे अशा वेगवेगळ्या गोष्टीं असतात. त्यापैकी ही एक अक्रूची गोष्ट. इदूंच्या गोष्टी लिखित नसतात तर त्या मौखिक परंपरेद्वारे त्या पिढ्यानपिढ्या चालत येतात. अक्रूसारख्या इतर प्राणी, पक्षी, कीटक, बेडुक अशा कितीतरी प्राण्यांच्या लोककथा इदू मिश्मी परंपरेत प्रचलित आहेत. अशा गोष्टींमधून आजूबाजूचा निसर्ग आणि  भूप्रदेशाबद्दल बरेच काही आपल्याला समजते.

अरुणाचल प्रदेशातील सव्वीस प्रमुख आदिवासी समाजातील मिश्मीच्या तीन उपगटांपैकी इदू मिश्मी हा एक गट आहे. बहुतेक इदू मिश्मी अरुणाचल प्रदेशतील दिबांग खोरे आणि लोअर दिबांग खोरे जिल्ह्यात राहतात. सियांग जिल्ह्यात त्यांची लोकसंख्या कमी आहे. सुमारे १४ हजार इदू मिश्मी राहत असलेला दिबांग खोरे जिल्हा हा भारतातील सर्वांत कमी लोकसंख्या असलेला जिल्हा. समृद्ध वन्यजीव, सुंदर बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि उंचावरील पाणथळ जागांसाठी ओळखला जाणारा हा प्रदेश. इदू मिश्मी प्रामुख्याने कोरडवाहू शेती आणि वनउत्पादनांवर अवलंबून असतात. खडतर भूप्रदेश, कडक हवामान, चीन-भारत आंतरराष्ट्रीय सीमा असलेला हा उंच पर्वतारांगांवरील प्रदेश दररोजचे मानवी जीवन जगायला कठीण मानला जातो. प्राणी आणि मानव तिथल्या संस्कृतीचा आणि जीवनाचा अविभाज्य घटक आहेत.

चित्रे: श्रोबोंतिका दासगुप्ता 

सौजन्य: करंट कॉन्झर्वेशन (Current Conservation)

करंट कॉन्झर्वेशन (Current Conservation) या बंगलोर इथून ना-नफा तत्वावर चालवल्या जाणाऱ्या  प्रिंट आणि ऑनलाईन रूपात प्रकाशित होणाऱ्या त्रैमासिकाच्या सहयोगातून मूळ इंग्रजी गोष्टीचे मराठी भाषांतर करण्यात आले आहे. ‘करंट कॉन्झर्वेशन’ हे त्रैमासिक निसर्ग-संवर्धन क्षेत्रातील गोष्टी वैज्ञानिक-अभ्यास तसेच सर्वसामान्य क्षेत्रातील वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने जगभरातील शास्त्रज्ञ, लेखक तसेच कलाकारांबरोबर काम करते.

अंबिका ऐैयादुराई या वन्यजीव संरक्षण क्षेत्रात मानववंश शास्त्रज्ञ आहेत. त्यांना मानव- प्राणी संबंध तसेच अरुणाचल प्रदेशातील समुदायातील संवर्धन प्रकल्पांमध्ये विशेष रुची आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गांधीनगर येथे मानववंशशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापिका आहेत.

ममता पांड्या या तीन दशकांहून अधिक काळ पर्यावरण शिक्षक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. याचबरोबर, अहमदाबाद येथे  राहणाऱ्या ममता निर्देशनात्मक रचनेच्या सल्लागार, लेखिका, कथाकार आणि ब्लॉग-लेखिका आहेत.

राघवेंद्र वंजारी हे एक पक्षी निरीक्षक आहेत. निसर्गाच्या आवडीमुळेच यांनी प्राणिशास्त्र पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. कार्यालयीन कामकाज व्यतिरिक्त निसर्गातील विविध आशयांवर मराठी भाषेतून लेखन करतात. सायकल वरून भटकंती करणे आणि चित्रकलेमुळे त्यांना निसर्गाच्या जवळ जाणे सोपे झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *