हिमांशू भूषण स्मार्त

माया पवन बहें हैं दाट….

०७

back

आंब्याच्या फांद्यांचा केवढा तरी ढीग पडलाय. जोश्यांच्या घराची मागची भिंत उघडी पडलीये. आजवर तिला आंब्याच्या सावलीनं झाकून टाकलवतं. न्हाणीमागच्या करदळी, अळू पहिलेंदाच एवढं उन्ह घेतायत अंगावर. आता आंबा नाही तर बाकीची खूप उंच दिसतायत. एका दिवसात खूप मोठी झाल्यासारखी. आंब्याचा पुरूषभर उंचीचा बुंधा उरलाय फक्त. कुणीकुणी भावंडं जमलीत. फांद्याच्या ढिगातनं वाट काढत फिरतायत. फांद्यांचा ढीग त्यांच्या गळ्यापर्यंत उंच. ओल्या लाकडाचा आणि चुरमडल्यानं गंधाळणाऱ्या आंब्याच्या गडद हिरव्या पानांचा वास; तोडलेल्या फांद्यांच्या गर्दीतून संचरतोय. आकाशात विस्तारलेला तेंव्हा जाणवायचं नार्ई पण फांद्या तोडून जमिनीवर पसरल्या तेंव्हा जाणवलं, किती विस्तीर्ण पसरलावता आंबा. तो चौफेर विस्तार संपला आता. हे असं अचानक संपून जाणं, नाही नाव होणं पहिलेंदाच घडतंय आयुष्यात. झाडं संपतात बरं अशी, अचानक एका सकाळी. दुपारपर्यंत; फांद्यानी भरलेलं परसू, पानांचा खच, पुरूषभर उंचीचा बुंधा. थोरल्या आत्तेभावंडांच्या माना तरी दिसतायत फांद्यांच्या पसाऱ्यातून वर. मी पार बुडूनच गेलोय फांद्यात. एक वेगळंच जगाय फांद्याच्या तळात. बाहेरच्या जगात कुठंच दिसत नाहीत अशी वळणं असणारे रस्ते. कुठून-कुठून प्रकाशाच्या तिरिपी येताहेत. फांद्यांचा ढीग खरोखर उंच आहे की आपण छोटे झालोय? सूक्ष्म? एक थोरला आत्तेभाऊ सांगतोय काहीतरी. नुस्ता आवाज येतोय. शब्द नाहीत. मग मी फांद्यांच्या तळात स्थिरावतो आणि ऐकायचा प्रयत्न करतो. तो सांगतोय; आंब्याच्या फांद्यांवर बसून परसू कसं दिसायचं ते, दोन वर्षांपूर्वी झाडाला लागलेला एकच आंबा त्यानं झाडावरच कसा खाऊन टाकला ते, मागच्या वर्षी मोहराचा एक तुरा दिसला होता ते. त्याच्या सांगण्यात एक हलकासा रोमांच आहे. पण आंब्याविषयी काहीच नाही. त्याच्या स्पर्शाविषयी काहीच नाही. आंब्याच्या झाडावर चढून बसलं की फांद्या त्याला कवटाळून घ्यायचा, त्याच्याविषयी काहीच नाही. आणि आपण तर अजून; आजी म्हणती तसं ‘भुईतनं वर पण नाई आलो’, आणि तेवढ्यात झाड संपलं. दोन-तीन दिवसात बुंधा पण जमिनीलगत तोडला जाईल. मग जमिनीखालची मुळं फक्त. त्यांना कदाचित झाड तोडल्याचं लगेच कळणार नाई. ती रोजच्यासारखं; कुठूनकुठून अन्न-पाणी शोषून आणत राहतील. जमिनीलगत तोडलेल्या; उघड्या बुंध्यातून ते अन्न-पाणी ओसंडून येईल. त्यानं जमीन ओली होईल. अन्न-पाणी जमिनीत मुरेल. म्हणजे मुळांनी आणलेलं मुळांनाच परत. जसंच्या तसं. मग हळूहळू मुळं संपतील. जमीन, बुंध्याच्या अवशेषांचे कण बनवून त्यांना स्वतःत सामावून घेईल. काही महिने, काही वर्षं झाडाच्या आठवणी राहतील. घट्ट बुंध्यासारख्या. हात लावला की ठाशीवपणे जाणवणाऱ्या किंवा तोडलेल्या फांद्याच्या पसाऱ्यासारख्या. ज्यात आपण पार बुडून जाऊ अशा. मग त्यांचेही विखंडन. रेणूबंधांचे सैलावणे. मग अणूरूप. मग गुणरहीत अज्ञात मूलकणासारख्या. त्या आहेत, पण…कुठं आहेत, कशा आहेत माहीत नाहीत. जिवाला कितीही त्रास करून घेतला तरी इंद्रियांना जाणवेल असे काहीच नाही त्या आठवणींचे. आपण ते वाढलो अंगापिंडानं त्यात खत होतं त्या आठवणींचं, असं म्हटलं दिलाशासाठी तरी पोकळी भरून काढणारं काही लागत नाहीच हाताला त्यातनं. फांद्याच्या पसाऱ्यात बसल्यावर सारख्या, आजी पहाटे गाती त्या भजनाचे शब्द घुमतायत चहूकडं. खरंतर त्या भजनातली एकच ओळ…

माया पवन बहें हैं दाट….

माया पवन बहें हैं दाट….

ओल्या लाकडाचा, चुरल्या पानांचा गंध आहे आणि हे शब्द आहेत. सगळ्याची गर्दी झालीये अंगाभोवती. इथं बसून राहिलो तर अख्खा दिवस जाईल. जेवण-बिवण काही नकोच. आंघोळीसाठी हाक आली तरी ‘ओ’ द्यायची नाही. मग काही सेकंदांनी वाटायला लागलं की असंही नकोच. कुणीतरी आजुबाजूच्या फांद्या काढून घेईल. मग पाना-डहाळ्यांची गर्दी, लाकडा-पानाचे वास आणि आजीचे शब्द…सगळं नष्ट होऊन आपण उघडे पडू. असं उघडं पडून आंघोळीला जाणं, जेवणं भयाणच असेल. त्यापेक्षा जाऊ आपणच बाहेर.

इतकं सगळं चित्र उभा राहतंय आंबा तोडल्यानंतरचं, पण या चित्रात बाबा नाहीत, आई नाई, आती नाई, आत्त्या नाई. हे सगळेही असणार की हजर झाड तोडताना. त्यांची कशी काहीच खूण नाई? आजी काही तिच्या कॉटवरनं उतरून यायची नाई. तिच्यासाठी दोन खोल्या ओलांडायच्या म्हणजे केवढं अपरंपार अंतर. आत्या तिच्या समोर बसलेली असणार. अधनंमधनं परसात येऊन आत्त्यानं झाडाच्या तुटण्याचा अंदाज घेतला असणार. आई सगळ्या टिंबांना जोडत फिरत असणार. झाड तोडायला आलेल्या नंदवाळकराला चहा द्यायचा. मग आजीचा चौपट साखरेचा चहा, आमचे दडपे पोहे. आंब्याचा एकेक ऐवज उतरत जाताना तिनं सारखं बघितलं असणार. स्वैपाकघरातनं नुस्ती मान वळवली तरी आंब्याचा बुंधा दिसतोच. पण आता दरवाजा आणि बुंध्याच्या मधे फांद्यांचा समुद्रच झाल्यासारखा. आणि समुद्रात तरंगणाऱ्या बेटांसारखी माणसं. बाबा मात्र तरीही दिसतच नाहीत या चित्रात. आणि सगळं चित्र काळ्या-पांढऱ्या रंगातलं. सोपा आणि स्वैपाकघर विभागणाऱ्या खांबांना मात्र चकाकणारा काळा रंग. आणि मधल्या चौकातल्या घडीव दगडांचा काळा रंग, चार पायऱ्या खोलात असलेला, चालून-चालून गुळगुळीत झालेला. कधी काळी इथं कुंड होतं म्हणे. गंगा कुंड. कुंडाभोवती जंगल. त्याच्या पार कपिलेश्‍वराचं तळं. कधीतरी तळं बुजलं, कुंड बुजलं. म्हणजे जसा आज आंबा संपला तसं कितीतरी संपलं. त्याच्या अवशेषांवर उभाय आपलं घर, आपण. आंबा सुधा त्याच अवशेषांवर उभा. आज तो संपला. आता कांचन, पेरू, चाफा. सिताफळ उभेयत आणि आजी, आत्त्या, बाबा, आई, भावंडं, मी…सगळं विरघळून-मिसळून गेलंय एकमेकांत.

काकांनी कुठनतरी शोधलं होतं की; शंकरानं त्याच्या जटा कापून सोडल्या होत्या गंगाकुंडात, म्हणून आपल्या महादेवाचं नाव ‘जटाजुटेश्‍वर’. तेंव्हा पासून सतत काहीतरी विसर्जित होतंय, काहीतरी मूळ धरतंय. काहीतरी तुटतंय, काहीतरी अचानक मोठं दिसायला लागतंय एका दिवसात. दोनेक हजार वर्षांमागं कर्णदेवानं जंगल साफ केलं आणि अंबाबाई दिसायला लागली स्पष्ट. आधी ती अदृश्य असल्यासारखी जंगलात. तिथनं हाकेच्या अंतरावर कपिलेश्वराचं तळं. तळ्याकाठी कुणीकुणी साधना केली, लिंगं स्थापली. कपिलमुनींचं कपिलेश्वर. आणि कुणाकुणाची, कुणीकुणी स्थापलेली. सगळी अंधारी, चार-सहा पायऱ्या उतरून जायला लागणारी. काही पाणी साठवणारी. सगळी काळ्या पाषाणातली. काळ गोठून, त्यात पूजेच्या फुलांचा, धुपाचा वास मिसळून एक वेगळाच गंध येणारी. आसपासच्या सगळ्या गल्ल्या; महादेवाच्या छोट्या-छोट्या देवळांनी भरलेल्या. सगळ्यांकडे जाण्याच्या वाटा अरुंद, चिंचोळ्या. वळणदार बोळांच्या. सगळे महादेव, निरुंद गाभाऱ्यातनं बघतायत….वहिवाटी बदलताना. उबदार अंधाराची, चिंचोळ्या बोळांची, अरुंद वाटांची साम्राज्यं नष्ट होताना. सगळी रहस्यं क्षणार्धात अप्रस्तुत होताना. जणू काही सगळं माहीत होण्याचा लख्ख, भगभगीत उजेड पडलाय सगळीकडं आणि माणसं त्या उजेडानं सैरभैर झालेत. उघडी पडलीत. तो उजेड त्यांना मोहात पाडतोय, त्यांची पावलं ओढून घेतोय…तरी सैरभैर होणं टळत नाही, उघडं पडून होणारं लज्जाहरण टळत नाही.

मी, तोडलेल्या आंब्याच्या फांद्यांच्या गाभार्‍यात; महादेवाच्या पिंडीसारखा पसरून बसलोय. डोक्यात कशाकशाची गर्दी झालीये. काहीही एका रेषेत नाही.  महादेव आपली एकेक जटा काढून गंगाकुंडात सोडून देतोय. एकेक झाड तुटून अंबाबाई दिसतीये, कणाकणानं. मग कसलेतरी घोष चाल्लेत नुस्ते. एकेक पिंड स्थिरावतीये. प्रत्येकीचा एकेक अंधारलेला गाभारा. तळ्यावर पाण्याला आलेल्या सासुरवाशिणीचा मूक विलाप, तिनं आणलेल्या तांब्या-पितळेच्या घागरींची चमक…कमरेवरच्या घागरीतनं हिंदकळणाऱ्या पाण्याचे ठिपके जमिनीवर. मग बुजणारं तळं, बुजणारं कुंड, आमचं घर उभारतंय, एकेक झाड रुजतंय परसात, वाढतंय, आंब्यानं आवार झाकून टाकलं परसाचं आणि आंबा तुटून ते आवार फटफटलं….फांद्यांच्या गाभ्यात मी बसलोय.

मी फांद्याच्या गाभाऱ्यातनं बाहेर येतो. काळा पाषाण बनलेल्या शरीरात हालचाल संचारते. दिवस माथ्यावर आलाय. आंबा तुटण्याच्या शांततेनं सगळं घर काबीज केलंय. आत्त्या तिच्या घरी गेलीये, तिच्या मागून तिची मुलं. दोन दिवस रहायला आलेली आत्ते भावंडं आंघोळ-बिंघोळ करून तयार झालीयेत. मीच पारोशासारखा बसलोय इतका वेळ. मी परसातनं स्वैपाकघरात पाऊल टाकतो आणि मागचं सगळं अंतर्धान पावल्यासारखं नाहीसं होऊन, दिवस घड्याळाच्या पायानं चालायला लागतो. आंबा तोडण्याच्या झटापटींनी उगवलेला दिवस हळूहळू कलायला लागलाय.

आता ते सगळं चित्र मागे टाकलंय तर जाणवतंय की, हे सगळं चित्र काळ्या-पांढऱ्या रंगाशिवाय दुसऱ्या रंगात असूच नाई शकत. ते दोन रंग मिसळतील तिथं फक्त करडा रंग. तो मात्र आहे. पण बाकीचे रंग नाहीत. आठवणीत आंब्याची पानं गडद हिरवी आहेत. तिथं उतरलं की उमजतोय तो रंग पण त्यांचं चित्र मात्र काळं-पांढरं. चित्रात उतरलं की पानांचा गंधही येतो. हलकाश्या वाऱ्यात मिसळल्यानं टोकं नष्ट होऊन; वलयांनी वावरणारे शब्द आहेत,

माया पवन बहें हैं दाट…

एखाद्या वळणावर गंध आणि शब्दांची वलयं एकमेकांना सामोरी येतात. गंध आहे, तोडलेली पानं चुरडल्याचा. शब्द सांगतायत, “सगळी माया आहे. तिचंच वारं वाहतंय. पानांच्या गंधात असोशी आहे. आता नसतील ती देठांनी डहाळ्यांना जोडलेली, मुळांपासून  सबंध सजीव असणाऱ्या झाडाचा अवयव असणारी. पण गंध सांगतोय, आर्जवी पण ठाम आवाजात, मी नष्ट होतोय. पानातली प्राणाची लवलव संपेल तसा विरून जातोय. पण मी खराय.” आणि असं दोन टोकावरचं काहीतरी सांगत असूनही; शब्दा-गंधात काही भांडणं नाही चाललेली. अवचित एकमेकांना सामोरे येऊनही त्यांनी चाल करण्याचा पवित्रा नाही घेतलेला. त्या दोघांनाही माहितीये की; इंद्रियं उघडी ठेऊन बसलेल्या माणसाच्या अंतस्थात आपण आपापल्या वाटेने पोहचू. त्याच्या अंतस्थात; माती-पाणी कालवून घडल्यासारखं काहीतरी साकारतंय सतत, तिन्हीत्रिकाळ. त्यात आपण सामावून जाऊ. मग चांगले मुरून, मिसळून; त्या माणसाच्या व्यक्त होण्यातनं-वाढण्यातनं बाहेर पडू. असंच व्हायचंय शेवटी तर कशाला पाहिजेत भांडणं! अनपेक्षित वळणांवरची अटीतटी! इतके जवळ आल्यानं गंधा-शब्दांचे कणही लागतात एकमेकांना. वलयं एकमेकांचे कण चिकटून आपापल्या वाटा धरतात.

आंबा तोडलेल्या दिवसातला प्रत्येक मिनीट किमान चौपट मोठा असणार. काळ म्हणाला असणार, ‘आज तुम्ही आंबा तोडलाय, मग मी आज मी तुमच्या घरापुरता चौपट मोठा.’ कारण दिवस घड्याळाच्या पायांनी चालतोय तरी त्याचे प्रहर किती जड संथ. कितीतरी वेळा दरवाजात खिडकीत जाऊन पाहिलं तरी बाहेर कितीतरी वेगात चाल्लंय सगळं. मगाशी देसायांच्या दारात केळी भरायला आलेला आता  निघून गेलाय. आता दुसरा आलाय, कच्ची केळी घेऊन. देसायांचं गोडाऊन पुन्हा भरतंय. कच्च्या केळ्यांमधे एकच फणी पिकलेली आहे. खालच्या मजल्यावर भराभर कच्ची केळी गोडाऊनमधे रचली जातायत आणि देसायांची सुनिता शंभर वेळा तरी वरच्या मजल्यावरच्या खिडकीत उभारून गेलीये. केळी भरणाऱ्या कामगारांचं येणंजाणं आणि खिडकीत सुनिताचं येणंजाणं यांचा ठेका इतका जलद आहे की त्यांनी मिळून एक नाचच बसवलाय येण्याजाण्याचा. इकडं आमच्याकडं मात्र एक पाऊल टाकावं तर तास लागतोय.

शेवटी एकदा संध्याकाळ होते, मग रात्र. जेवणं-बिवणं होतात. आत्या रोज येती तशी संध्याकाळीच आलीये. तिच्यासोबत भावंडं. आज सगळ्यांनी मिळून जेवायचं ठरलंय. बहिणींच्या लग्नानंतर; वर्‍हाड निघून गेल्यावर असतो तसा माहोल आहे घरात. मग आजी एका आत्तेबहिणीच्या जन्मानंतर न्हाणीपूजनादिवशी चाफ्याची कांडी लावल्याची आठवण सांगतं. कुणी न खाजणाऱ्या अळवाचे गड्डे आणून रुजवल्याचं सांगतं. कुणी एकमेकीत गुंतून वाढलेल्या सिताफळांची गोष्ट सांगतं. कुणी तगरीची, मग कातर जास्वंदीची, पेरूची, बाहेरच्या माडीतल्या मोहिटीवरच्या वेलगुलाबांची, कांचनाची. कुणी म्हणतं “आता कांचन वाढणार भराभर.” कुणीही आंब्यापाशी येत नाही. पण सारखं जाणवत मात्र राहतं की गोष्टी कधीतरी आंब्यापाशी येणार. सगळेजण दुसऱ्यानं विषय काढण्याची वाट बघतायत. प्रत्येकजण अशा कसबानं आपलं सांगणं रचतोय की त्याच्या आवाहनानं कुणीतरी हलून जाईल आणि न राहवून म्हणेल… “आपल्या आंब्याचं नाई का….” खरंतर या वाक्यात काईच नाई. निरोपयोगी वाक्याय ते. अर्धवट. एरवी वाहूनच गेलं असतं. पण आत्ता ते सर्वात मोलाचं, सर्वाधिक शक्ती असणारं. पण ते ही नाही फुटत. मला सारखं वाटतंय; इतके सगळे घुटमळतायत प्रत्येक झाडापाशी, ठरवून बसल्यासारखे परसाच पसारा समोर मांडून बसलेत. पहाटेपर्यंत अखंड उभा असलेला आंबा इतका धडका देतोय आतून; समुद्राच्या लाटांसारखा. पुन्हापुन्हा येऊन किनाऱ्यावरची वाळू भिजवतोय. सगळ्यांना त्याच्याविषयी बोलायचंय. पण बोललो तर काय-काय निघेल याला घाबरतायत का सगळे. कुठले-कुठले झाकले कोनाडे उघडतील, फडताळं धुडाळली जातील, बांध फुटतील, दारं उघडती.

रात्र चढेल तशी मात्रा वाढत जाईल या सगळ्याची. इतकं होणार होतं तर तोडलाच कशाला आंबा? का त्याच्या फांद्याचा ढीग लाऊन सकाळ झाकोळून टाकली? सगळ्या झाडांविषयी बोलून होतं, मग शांतता. अनंत. एक आवाज येतो. कुठून? कुणाचा? कळत नाई. स्त्रीचा की पुरषाचा? हे ही नाई उमगत.

“प्रत्येक वर्षी वाटायचं की मोहरानं झाड भरेल. फळ धरतील. पण एवढ्या थोरल्या झाडाला मोहर नाई, फळं नाईत.”

“ पण पालवी कसली यायची! हजार डहाळ्या तरी येत असतील दरवर्षी नव्या.”

” पण कलम होतं का कोईतनं आलेलं झाड? कोईतनं आलेल्या झाडाला फळं धरत नाईत लवकर.”

“आणि एकेका झाडाला नस्तात फळं…”

….झाली सुरवात. एकेक वाक्याचा उगम कळायला लागला. बोलणारे ओठ हलताना दिसायला लागले.

आजी म्हणते, “पहिला मोहर आला तेवा महादेवाला घातलेला. एकच तुरा आलेला. झाडाच्या टोकाला. ह्यानंच काढलावता चढून.”

ह्यानंच म्हणजे बाबांनी. मग आजी काय-काय सांगत राहिली बराच वेळ. कसा जमिनीपासून लांब, खूप उंच, एक तुरा लागलेला मोहराचा. सगळे झाडाच्या तळाशी जमलेत. एरवी फटकून असणारे भाडेकरू, दोन आत्यांची कुटुंबं, शेजारपाजारचे, असेच कुणीतरी नैमित्तिक आलेले आणि अभावितपणे मोहराचा तुरा दिसण्याच्या अप्रुपात ओढले गेलेले. सगळ्यांच्या माना वर. गर्द हिरव्या पानांचा, काळ्या-सावळ्या फांद्यांच्या, पिवळ्या हिरवट डहाळ्यांच्या गच्च गर्दीत एक तुरा मोहराचा. फिका पिवळट-पांढरा देठ. मुख्य देठाला फुटलेले आणखी छोटे देठ आणि त्या देठांवर, उलून आलेली टिंबं. बहुधा फुलं आंब्याची. त्याला वासही असतो म्हणे. पण आता तो वरच्यावर आकाशात विरून जात असणार. मग सरळसोट झाडावर बाबा मोठ्या कष्टानं चढले असतील. फांद्या सुरू होतात त्या बेचक्यात थोडं विसावून, आणखी वर, आणखी वर. मग सगळ्यात कमी फुलं असणारा, सगळयात छोटा देठ हलकेच मोडला असेल. मग एकेक पडाव पार करत झाडाच्या तळाशी. सगळयांचे डोळे; बाबांच्या तळहातावरच्या छोट्याश्या देठावर खिळलेत. एवढ्याशा फुलातनं केवढा आंबा वाढतो. अचंबाच सगळा. अचंबा ओसरल्यावर माणसं पांगली. मोहराचा देठ स्वैपाकघरातल्या रिकार्डात, स्टीलच्या वाटीत ठेऊन दिला. मग आंघोळ-बिंघोळ करून बाबांनी तो महादेवाच्या पिंडीला घातला. थोडा मोठ्या पिंडीवर, थोडा छोट्या पिंडीवर, थोडा सीतेला मांडीवर घेऊन बसलेल्या रामाच्या मूर्तीवर, थोडा दत्ताच्या पितळी पादुकांवर. आंब्याचं झाड पहिलेंदाच फुलंलं, आता ते फळेल. पोरा-नातवंडांच्या, सुना-लेकींच्या तोंडात आंब्याचा रसाळ गोडवा उतरेल. नातवंडं आंबे चोखून कोई परसूभर विखरून टाकतील. पाऊस पडला की कोईतनं काळसर तांबडे कोेंब सरसरून येतील. आंब्याच्या सावलीत त्याची बाळं वाढतील. मग ती कुणा-कुणाला वाढवायला द्यायची. कुणाच्या बांधावर, कुणाच्या बागेत, शेतात. पण पहिल्या वर्षी एक तुरा येतो पण फळ धरत नाही. दोनचार वर्षं मोहरच येत नाही. एकावर्षी मोहर येतो, एकच फळ धरतं. पण एक थोरला आत्तेभाऊ झाडावर चढतो, एकुलतं एक फळ खाऊन टाकतो. पुन्हा नुस्तं वाट बघणं. मोहर नाई, फळ नाई.

“पहिला मोहर तोडला म्हणून रागावलं झाड..” बाबा म्हणतात, स्वर जरा तिरकस आहे. आजूबाजूला सहमती-असहमतीच्या हलक्या लाटा उठतात. असहमतीच्या जास्त. “मला अजिबात मान्य नव्हतं, मोहर तोडून देवाला घालणं. झाडावर असला तरी देवाचाच की तो. आणि आपण तोडलेल्या देठातच आंब्याचं पहिलं फळ असलं म्हंजे!” सकाळपासून दिसणाऱ्या काळ्या-पांढऱ्या चित्रात आत्ता बाबा आले. पहिलेंदाच. चर्चा अनपेक्षित ताणानं थोडी ताठर होते आणि अंशाअंशानं निवळूनही जातो. मग खूप गप्पांना गप्पा फुटत जातात. कुठली-कुठली झाडं येतात चर्चेत. नवी झाडं लावायचे बेत ठरतात. आंब्यांची नावं निघतात निरनिराळ्या. साखरगुठळी, रायवळ, हापूस, पायरी, तोतापुरी, खोबरी, शेपू. आजी तिच्या भावांच्या शेतातल्या आब्यांच्या आठवणी सांगते. मग अचानक गलबलतं. मग कळतं की तिला आंब्याच्या आठवणी नाईचायत सांगायच्या. वेगळंच काहीतरी सांगायचंय. ते निसटून गेलंय कायमचं. आता नुस्ती अंतरं आहेत. आई तिच्या मामाच्या, बेनाडीच्या शेतातल्या साखरगुठळी आंब्याची आठवण सांगते. हजारो आंब्यांनी लगडलेल्या मधुर आंब्याची. तिच्याही आठवणीत तेच ते आजीच्या होतं. तीच गलबल. तेच आंब्याची वाट चालायला सुरवात करणं आणि बाळ वयातल्या वाटांवर जाऊन रेंगाळणं. घुटमळणं. स्मृतीतले स्पर्श आठवून आलेला उल्हास आणि त्या वाटा हरवल्या म्हणून आलेली  उदासीची डूब. गहिरी. खोल. त्या आंब्याचं काय झालं असेल कुणास ठाऊक आता! मामाच्या शेतातली हादग्याची झाडं आणि आमच्या परसातलं आंब्याचं झाड जसं नाहीसं झालं तसं त्याचंही झालं असणार. किंवा त्यांच्याभोवती वावरणारी माणसं तरी बदलली असणार. असं माणसं बदलणं म्हणजे सुधा आपलं झाड संपणंच की.

त्यानंतर आंब्याशिवायचे कित्येक दिवस उगवत राहीले. महिने, वर्षं गेली. कांचन खरोखरंच जोमानं वाढला तो काही अंगापिंडानं भरला नाई फारसा. पण त्यानं स्वतःचं भवताल तयार केलं. चाफ्याला स्वतंत्र कोपरा पहिल्यापासूनच मिळालेला पण आता त्याच्याकडं थोरलेपणा आला. सिताफळ, कांचन. पेरूची खोडं अजून प्रौढ नव्हती झालेली. पण चाफ्याच्या खोडावर प्रौढत्त्वानं वळणं रेखलेली. वयाचे कितीतरी वळसे खोडावर आणि दोन वळशांमधे एक छोटीशी दरी. वळशांनी घडवलेले डोंगर माथे चमकताहेत आणि दऱ्यांमधे अंधार आहे. पावसाळ्यात या दऱ्यांमधून पाणी वहायचं. झाडावर चढताना कधीतरी खोडाचा ढपला हातात यायचा. वळशांनी केलेला एक पर्वत, त्याच्या अंगावर रुळणारी दरी; तेवढ्यापुरतं नष्ट व्हायचं. चाफ्याच्या खोडावर, ढपला निघालेल्या ठिकाणी फिक्का गुलाबी पट्टा दिसायचा. वाटायचं की चाफ्याचा प्राण उघडा पडला. त्या गुलाबी पट्‌ट्यावर चिकाची सूक्ष्म टिंबं असायची. दुधासारखी. हळुहळू त्या पट्‌ट्याला राखाडी काळसर झाक चढायला लागायची. आठदहा दिवसात; चिकाच्या टिंबांनी ओलसर दिसणारा पट्टा प्रौढत्त्वाच्या दाट रंगानं खोडात मिसळून जायचा. म्हणजे आत कुठंतरी गुलाबी आभा असणारा प्राण असतो झाडात. तो प्रसंगानं कधीतरी उघडा पडतो आणि झाड त्याच्यावर त्या-त्या वयाचा एक थर चढवतं.

आंब्याचा पुरूषभर उंचीचा बुंधा तोडून तो माझ्या कमरेएवढा छोटा झाला. आता त्याच्या भोवती; तीनचाकी सायकलनं फेऱ्या घालता यायच्या, त्याच्यावर बसून फोटो काढता यायचे. जमिनीवर उतरणाऱ्या चिमण्या, आधी त्या खुजा बुंध्यावर उतरायच्या. आता तो वाळून टणक व्हायला लागलेला. सगळं परसू व्यापलेली पानं, फांद्या, डहाळ्या अदृश्य झाल्या. पुढं कित्येक दिवस परसाच्या कोपऱ्यात एखादं वाळलेलं आंब्याचं पान सापडायचं. खरखरीत झालेलं. विटकरी रंगाचं. जाडसर. दाबलं की त्याचे तुकडे पडायचे. अशी कित्येक पानं; परसाच्या, आम्हाला अप्राप्य असणाऱ्या कोपऱ्यांमधे पडून राहिली असतील. त्यांनी आपलं नष्ट होणं सबंधच्या सबंध अनुभवलं असेल. कोपऱ्याच्या आसपास माणसांची पावलं ऐकू आली की त्यांच्या काळजात कळ उठत असेल सारखी. आता कणाकणानं नष्ट होताना स्वतःला अनुभवणंसुधा हातातून निसटून जाणार की काय?….

कोई मेरे दिल से पूछे, तेरे तीर-ए-नीमकश को,

ये खलिश कहॉंसे होती, जो जिगर के पार होता|

ही पानांची हताशा नव्हे, हा आमच्या सत्तेचा दर्प. हा आमच्या कुऱ्हाडींच्या पोलादाचा खाट. सगळ्या घरभर, फटी-वळचणींमधे, पन्हाळी खारपऱ्यांच्या पोकळ्यांमधे, माळ्यावरच्या आदिम अंधारामधे भरून राहिलेले, गतीचे अब्जावधी विभ्रम करत फिरणारे शब्द….

माया पवन बहें हैं दाट….

माया पवन बहें हैं दाट….

आंबा नष्ट व्हायच्या आधी कितीतरी वेगळे वाटायचे हे शब्द. त्यांचा धाक वाटायचा नाही. नुक्तीच किलकिलायला लागलेली सकाळ आहे आणि आम्ही झोपतो त्या आतल्या माडीच्या दारात येऊन हे शब्द फक्त सांगतायत सकाळ झाल्याचं. या आधीही, आम्ही उठलोय की नाही ते; हे बघून गेले असणार. त्यांना, आम्हाला अंथरुणातून हाकून काढण्याची घाई नाई. फांद्याच्या ढिगा, पानांच्या वास घेत बसलेलो तेंव्हा वेगळेच वाटले आणि तर पारच पालटला त्यांचा नूर. त्यांच्यात कितीतरी शक्ती आलीये. पहिल्यापेक्षा खूप जास्त. पहाटे अंथरुणात पडल्या-पडल्या, आजीच्या गळ्यातनं बाहेर पडलेले ऐकू यायचे तेंव्हा त्यांना हलकासा कंप असायचा. मायाळू. इतकं जगून झालंय आजीचं. गात्रं थकलीयेत सगळी. हातातोंडावर आलेल्या सुरकुत्यांनी त्वचेला कसं मार्दव आलंय. ताक घुसळून निघालेल्या लोण्यासारखं. घुसळून लोणी झाल्याचा घट्टपणा आलाय शब्दांना. आवाजाच्या कंपानं शब्दांना जास्तच गहिरं बनवलंय.

माया पवन बहें हैं दाट….

पण आता ते शक्तीशाली झालेत. उग्र नाही पण दणकट. त्यांच्यात रग नाही पण दाब आहे प्रचंड. त्या दाबातनं कळतंय की दाट वारं अंगाखांद्यावरनं वाहिलं, गल्ली-बोळांमधे घुसलं, त्याच्या वावटळी बनल्या जागोजागी की नूर बदलणार सगळा. गावात कुठंकुठं दिसायला लागलेली सळ्या-सिमेंटची बांधकामं गल्लीत नकळत, दबक्या पावलांनी येणार आणि कागदावर आखलेल्या चौकोनी शिस्तीतल्या बांधकामांनी गल्ली आखीवरेखीव होऊन जाणार. चकवणाऱ्या वळणांची, गुळगुळीत  झालेल्या दगडी पायऱ्यांची, वीज जमिनीत सोडायला; छपरांवर उभारलेल्या लोखंडी मोरांची, वत्तुरकरांच्या तिसऱ्या मजल्यावरच्या गूढ गॅलरीची, रेंदाळकर वाड्यातल्या आडाच्या खोलातल्या पाण्याची, कपिलेश्वराच्या शिखरामागच्या सावलीतल्या एकांताची, भास्करराव जाधव वाचनालयातल्या थंडगार, विस्तीर्ण फरशीची, पुस्तकं उघडून त्यात डोकं घालून बसलेल्या पोरांची….सगळ्यांची ठाणी उठणार. वारं असं भरणार गल्लीत की कुणी कुणाला ओळखणार नाही. सगळे, वावटळीची त्रिज्या वाढेल तसे घुमत-घुमत लांब निघून जाणार. गावाला चिक्कार उपनगरं होणार. खूप रस्ते. प्रशस्त. सारख्या बसेस धावणार.

रंगपंचमीला दोस्ताना रंग माखत फिरायचं तर पायांचे तुकडे पडणार चालून. डांबरी रस्त्यांवर गोट्यांनी खेळता येणार नाही.

आंबा तुटला तेंव्हा जे ठसठसत होतं खसखशीच्या दाण्यासारखं त्याचं असं व्हायचं होतं तर पुढं.

आंब्याच्या नंतरच्या काही वर्षांनी पेरुचं झाड गेलं. पेरू काढायला झाडावर चढलेल्या आत्तेभावाला घेऊनच ते खाली आलं. पण मोडताना इतकं सावध मोडलं, की भाऊ तरंगत येऊन अलगद जमिनीवर टेकला. आता आणखी एका फळासाठी बाजारात जावं लागणार. पेरूचं कात टाकून गोरं होणं दिसणार नाई. आता परसात, झाडं म्हणून फक्त कांचन, सिताफळ आणि चाफा. बाकी फुलांची झुडपं आणि नव्यानं आणून लावलेलं कागदी लिंबाचं कलम.

परसाचा भूगोलही बदलायला लागलाय हळूहळू. चाफ्याशेजारी, दोन दगडी दरड्यांमुळं झालेली खिंड होती ती खूप रुंदावली आता. कुठल्या बांधकामाच्या विटा येऊन पडल्यानं, परसात किल्ल्यासारखी एक तटबंदीच तयार झाली. विटा तशाच पडून राहिल्या आणि पावसाळ्यानंतर त्यांच्यावर शेवाळं उगवलं. नेच्याची पानं तरंगायला लागली. तटबंदीच्या माथ्यावर गवतं उगवली. मांजरांना तटबंदीवरनं थेट परसाच्या रुंद भिंतीवर उडी मारून वरच्यावर वावरायला यायला लागलं. आत्त्यानं; कुणीतरी छाटून रस्त्यात टाकलेल्या स्वस्तिकाची फांदी आणून, पेरू शेजारी रुजवली. ती जोमानं वाढली. पेरूचा कोपरा पुन्हा हिरवा झाला. कांचन भरभरून फुलायला लागला. त्याची, हलकी पोपटी झाक असणारी पिवळी फुलं, झाड भरून फुलायची. कोमेजतील तशी गुलाबी पडत जायची. पाकळ्या गळून पराग उरायचे. पातळ शेंग धरायची. ती पिकायची. आणि फुटायची. कांचनाच्या फुलाच्या मऊ ओजस गाभ्यात; मधल्या बोटांनी कपाळावर गंध लावावं तसा एक तपकिरी ठिपका असायचा.

एरवी जाडसर हिरव्या पानांनी भरलेला चाफा चैत्रात निष्पर्ण व्हायचा. त्याच्या तळाशी पानांचा खच साचलेला. निष्पर्ण झाडावर अगणित फुलांचे तुरे. एकमेकींना कवटाळून बसलेल्या पाकळ्यांच्या कळ्या. प्रत्येक दांड्यावर कळ्यांच्या सगळ्या अवस्था. अगदी टिंबापासून, टपारलेल्या, अर्धवट उलगडलेल्या. एक दिवशी लक्षात आलं की चाफ्यावर असं काहीतरी लटकतंय, जे फुलांचा तुरा नाई. पान नाही. डहाळी नाई. सगळ्यांनी झाडाच्या तळाशी उभा राहून टक लाऊन पाहिलं. कुठंकुठं बघितलेले चाफे आठवले. कुठल्याच चाफ्यावर कुणालाच असली चीज बघितल्याचं आठवेना. लांबोळकी, नळीसारखी, टोकदार. कांचनातल्या ठिपक्याच्या रंगाची पण थोडीशी तकाकी असणारी. वारं आलं तरी न हलणारी किंवा अत्यंत अनिच्छेनं हलणारी. मग सावध निष्कर्ष निघाला की ती शेंगाय चाफ्याची. वयाच्या विशीत आलेलं, कदाचित पहिलंवहिलं फळ. फुलांच्या अंगठ्या करण्यासाठी कित्येकदा त्याच्या पाकळ्या दुमडल्या, फुलं गाभ्यापाशी उलून आली पण चाफ्याचे पराग हदसले नाहीत. अशी जवळजवळ खात्रीच झालेली की चाफ्याला आपला वंश वाढवायला बिया लागत नाहीत. चिकाचं झाडाय ते, त्याच्या फांद्याच रुजवायच्या. आणि अचानक शेंग धरली झाडाला. मग खूप चर्चा. शेंग फुटेल आणि बिया; सावरीच्या कापसासारख्या उडून जातील म्हणून व्याकूळ वाटायचं. कित्येक दिवस सकाळी उठल्या-उठल्या धावत जाऊन शेंग बघायची. आतल्या माडीत वाचत असलं की परसाकडची खिडकी उघडून शेंगेवर  नजर ठेवायची. झाडावर चढायचं बेचक्यात विसावून शेंग न्याहाळायची. डोळे बारीक करून तिच्या हालचाली टिपायच्या. पिकलं सिताफळ तीन भागात उकलतं, त्या आधी त्याच्या शिरा विस्फारतात, रुंद होतात आणि कळतं की उद्या सिताफळ उकलणार. तसं काही दिसतंय का शेंगेवर? की कांचनाच्या शेंगा बियांपाशी टपोरतात, करदळीची फळं बियांनी फुगतात…असं काही होतंय का? शेंग काहीच दाखवत नाही बाहेर. आतल्या आत तिचं वाढणं चाल्लंय बहुतेक. बिया वाढतायत. तरंगण्यासाठी बियांना पंख येतायत. त्याचं कवच टणक होतंय. कोंब फुटण्याची जागा बनतीये. पण बाहेर काहीच खुणा नाईत. मग एकदिवशी दुपारी शेंग देठापायी नाही दिसत अचानक. नुस्ताच देठ. ताठ. प्रचंड कालवाकालव होते. झाडाचा सगळा तळ धुंडाळला जातो. एकेक पान उचलून अंदाज घेत. सारखं वर बघत, शेंग पडू शकेल अशा जागेचा अंदाज घेत. आणि एका पिवळसर पानाखाली शेंग सापडते. काहीतरी अद्भुत लागलंय हाताला. असं तीव्रपणे वाटतंय की हे पहिलं आणि शेवटचं. पुन्हा हा स्पर्श नाही लाभणार. नुस्ता अलगद हात फिरतोय शेंगेवरून. शेंगेच्या तुकतुकीत गोलाईवर सुरकुत्यांचे वळे पडलेत. शेंग वरून सुरकुततीये. म्हणजे ती वाळून जाणार. यथावकाश ती वाळते. उघडून बघितल्यावर कळतं की तिच्यात बिया नाहीत. बिया वाटाव्यात असं काहीच नाही. ती वाढली पण फळली नाही. कितीतरी दिवस अलवार जपलेली उत्सुकता भंगते क्षणात. पण निराश वाटत नाही. वाटतं की चाफा काहीतरी म्हणतोय, सांगतोय या सगळ्यातनं. हे फळ त्यानं वंशविस्तारासाठी धरलं नाही. झाड, फूल, फळ, बिया, रोपं यात असेल जैविक संकेतांचा चक्रक्रम. काही फळांच्या रसानं तृष्णा शमत असेल. काही फळांच्या गरानं क्षुधा शमत असेल. पण प्रजोत्पत्तीचा चक्रक्रम आणि क्षमणारी तृष्णा-क्षुधा याच्या पल्याड; फळाच्या जन्माचा साक्षात्कार अनुभवणं, फळाच्या आत घडणाऱ्या चलनवलनाला, घडणीला कल्पून स्वतः कणाकणानं वाढत जाणं. उमजेच्या पुष्टतेचा सुवास आतून दरवळताना अनुभवणं….बाहेर मात्र, शेंगेच्या सगळ्यात वरच्या सालीसारखं अविचल असणं. हळूहळू,नकळत पिकत जाणं. हे सगळं असतं की उपस्थित मग फळ एक लागो किंवा साखर गुठळी आंब्यासारखं हजारो फळांनी झाड लगडून जावो. चक्रक्रमाचे, तृष्णेचे, क्षुधेचे सगळे उभे धागे आहेत आणि उमजेच्या पुष्टतेचे सगळे आडवे धागे आहेत. निरंतर या वस्त्राची वीण सुरूये. विणून बाहेर पडलेलं वस्त्र सगळं भवताल व्यापून टाकतंय. त्याला पोत येतात, रंग येतात. पोत; मातीचे, कांचनाच्या पाकळ्यांचे, चाफ्याच्या ओबड-धोबड खोडाचे, सिताफळ पिकून उकलणाऱ्या शिरांचे, चाफ्याच्या एकमेकींना कवळून बसलेल्या कळ्यांचे. रंग; आंब्याच्या तरूण-वृद्ध पानांचे, कातर जास्वंदीच्या परागांवरच्या रवाळ हळदीचे. नेच्याच्या काळ्या-जांभळ्या देठांचे, आकाशाचे.

आंबा तुटून कित्येक वर्षं झालीयेत. गल्लीत आता दोन पन्हाळी खापऱ्यांची घरायत. ती सुद्धा माणसांनी त्यागलेली, अव्हेरलेली. इमारती उंच झाल्यायत आणि रस्ता रुंद झालाय. गल्लीत जन्मून-वाढून पिकलेल्या माणसांनी गल्ली सोडलीये. उपनगरात प्रशस्त घरं केलीयेत. महादेवाचा प्रत्येक गाभारा दिवे लाऊन लख्ख केलाय. गाभाऱ्यात उतरण्याच्या सगळ्या गैरसोई नष्ट झाल्यात आणि अंधार विरघळून येणारा गंध निपटून काढलाय.

हातहात भर जाडीच्या दगडी भिंतीत वाढलेली सगळी पोरं खूप मोठ्ठी झालीयेत. माझ्यासकट. त्यांनी विद्या शिकलेत. तंत्रात ती तरबेज झालीयेत. आत कुठंलही झाडं तोडून फांद्यांचा ढीग लावला तरी आमच्या माना त्या ढिगातून वरच येतील. आता आम्हाला सगळं ऐकू येईल. कशाचीही चव घेता येईल. कशालाही स्पर्श करता येईल. बाटल्यांमधे दाबून भरलेले आकर्षक वास बटन दाबलं की उसळून येतील. औदुंबराच्या तळाशी पिकून पडलेल्या फळांच्या सड्यातनं येणारा, जास्त पिकल्यानं आंबट-गोडाचे ढग परसरून असलेला वास नाईच येणार. सगळं चोखाय. जागच्या जागी….आपलं काम काय या सगळ्यात? आपण आपल्या इंद्रियांचं काय करायचं? मग अवचित आलेल्या चाफ्याच्या शेंगेसारखं काहीतरी चमकतं. एक दिवा दिसायला लागतो. कृतीच्या शक्यतेचा. ज्यानं आपलं असणं फार फुटकळ वाटणार नाई….आपण फक्त इतकंच करायचं…गल्लीतल्या; माणसांनी अव्हरलेल्या दोन पैकी एका घराच्या जीर्ण पायरीवर बसायचं; दरवाजाला टेकायचं नाही, तो कमकुवत झालाय. पायरीवर बसायचं. किंचित पुढं आलेल्या छपराची वितभर सावली असते, त्यात सगळं अंग गोळा होई असं पहायचं…आपल्यामधे आणि सुबक गल्लीमधे एक माणसाळलेली नदी वहात असते, रुंद पात्राची…तिच्या पाण्यात पाय भिजले तरी आपली चित्त ढळू द्यायचं नाही….आणि बारीक आवाजात पण सलग म्हणत रहायचं…..

माय पवन बहें हैं दाट…

माय पवन बहें हैं दाट…

 

हिमांशू स्मार्त मराठी नाटककार असून कविता, ललित गद्य आणि संशोधनात्मक लेखन करतात. ते ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ येथे अभ्यागत अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत.

2 comments on “माया पवन बहें हैं दाट

  1. Dr Kanishq

    तरल, अस्वस्थ करणारं मनन.

    Reply
  2. Girish Patke

    क्या बात है हिमांशू ! धन्यवाद आशुतोष.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *