मूळ इंग्रजी लेख: जिगिशा भट्टाचार्य

मराठी भाषांतर: वेणू पारिजात

असणं/नसणं?



marathienglish

back

I

भौतिकशास्त्रज्ञ वडिलांच्या सानिध्यात मोठे होताना त्यांनी सांगितलं होतं, ‘काळं’ म्हणजे प्रकाशाचा अभाव आणि ‘पांढरं’ म्हणजे सर्व रंगांचा समावेश- सगळे रंग सूर्यप्रकाशात न्ह्यायल्याने आकाश शुभ्र दिसते. माझ्याकडं एक रशियातून आणलेलं पुस्तक देखील होते. पांढऱ्या मुखपृष्ठावर एका पांढऱ्या दाढीवाल्या माणसाचं चित्र होते. त्याच्या मागं जणू इंद्रधनुची प्रभावळ होती. मला आठवतं, चौकस बुद्धीनं मी वडिलांना विचारले होतं, आपण केस कसे विंचरतो? माझे केस तर काळे आहेत आणि ‘काळं’ म्हणजे तर अभाव किंवा नसणं . त्यांच्याकडं काहीच उत्तर नव्हतं. त्यांना हिब्रू का येत नाही या माझ्या प्रश्नावरही जसं त्यांच्याकडं उत्तर नव्हतं, तसंच. पण ती एक वेगळीच गोष्ट आहे.

माध्यमिक शाळेत मला शिकवलं की काळा रंग इतर रंगांना शोषून घेतो आणि पांढरा रंग सर्व रंगांना परावर्तित करतो. जर एखाद्याला वाटत असेल अनिमेटेड पॉप संस्कृती आणि सगळीकडं गवगवा असलेल्या छोटा भीम सारख्या गोष्टी मुलांवर परिणाम करतात तर त्यांनी विज्ञान- शिक्षण पद्धतीची अवस्था बघावी. पहिल्यांदा तुम्हाला प्रकाश किरण एका सरळ रेषेत जातो असं शिकवतात, वरच्या वर्गात गेल्यावर तुम्हाला कळतं की प्रकाश किरण कधीच एका सरळ रेषेत न जाता एका वक्र रेषेतून जातो. कालानुरूप जेव्हा तुम्ही शाळेच्या भौतिकशास्त्राच्या अभ्यासाची सर्वात उच्च पातळी गाठता तेव्हा असे शिकता की प्रकाश ‘तरंग’ आणि ‘कण’ अशा दोन्ही स्वरूपात प्रवास करतो. हे सगळं शिक्षण वैज्ञानिक असल्यामुळं इतकी वर्षं शिकलेल्या अनेक परस्परविरोधी गोष्टी तुम्ही विसरून जाता.

काळं म्हणजे प्रकाशाला शोषून घेण्याची शक्ती, तर पांढरं म्हणजे प्रकाशाला परावर्तित करण्याची शक्ती, म्हणूनच सिनेमाचा पडदा पांढरा असतो. आणि माझ्या काळोखाला विंचरण्याच्या प्रश्नांची पूर्तता अशा त्यातल्या त्यात बऱ्या स्पष्टीकरणाने करावी लागते. माझे एक चित्रपट निर्माते काका होते, ते नेहमी काळे / गडद रंगाचे कपडे घालायचे. मला नेहमी प्रश्न पडायचा की यांना कपाटाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात काळे कपडे कसे सापडतात? हे पिवळ्या आणि लाल रंगाच्या कपड्यांमध्ये काळा शर्ट ठेवता का? कपाटात त्यांनी दिवा बसवला आहे का? सगळे कपडे ते बाहेर काढून बघतात का? ही सगळ्या धडपडीची वास्तविक उत्तरं मला माझ्या कॉलेजच्या दिवसात गॉथिक फेज दरम्यान माझ्याकडे असणाऱ्या फक्त काळ्या कपड्यांमुळे समजली. खरंच, तुम्ही काळोख विंचरू शकत नाही किंवा रचू शकत नाही.

तो त्याच्या नसण्यातूनच आपल्याला दिसतो का?

II

अशा या गोंधळलेल्या स्थितीत, लहानपणी जुन्या गोष्टी मी जपून ठेवायचे. या गोष्टी मला मोहवून टाकायच्या. त्यात आत्मीयतेने ठेवले होते हरवलेल्या घरांचे, प्रदेशांचे, नद्यांचे कृष्णधवल फोटो. या चित्रातले लोक माझ्या ओळखीचे नव्हते आणि मी माझ्या आईसारखी सगळी नाती शोधण्यात कुशल पण नव्हते. माझी आई सांगायची, “ही छोट्या चेहेऱ्याची आणि मोठा चष्मा लावलेली आहे ना ती माझ्या मामेबहिणीच्या भाचीच्या आजीची शाळेतली मैत्रीण आहे . त्या दिवसात त्यांचा घरोबा होता. आता कुठे असते कोण जाणे?” लहानपणी काय किंवा मोठं झाल्यावर काय, मला याने काही फारसा फरक पडला नाही. तरीही मोठं होत असताना, मी आता महागड्या झालेल्या इल्फोर्ड आणि फ्युजीची ब्लॅक ॲंड व्हाईट रिळं वापरायला लागले. मला मात्र डीएसएलआर कॅमेऱ्यापेक्षा त्यात काहीतरी अर्थ वाटतो. याचं कारण असं असेल का की त्या काळ्या झेनिथ कॅमेऱ्यात आताच्या निकॉन कॅमेऱ्यासारखे फोटो आधीच स्क्रीन बघता येत नसत? आता निकॉन वगैरे कॅमेऱ्यात एक बटण दाबल्यावर फोटोला राखाडी किंवा फ्लोरोसेंट हिरवा करता येतो. का जुन्या कॅमेरातून गडद काळ्या रिळांमधून तयार होणाऱ्या छायाचित्राच्या प्रक्रियेत मला भावणारी होती? खोक्यामध्ये छिद्र पडून मी कॅमेरा तयार करायला देखील शिकले होते. यात सूर्य प्रकाश कैद करता यायचा, तोही उलटा! त्याच्या आतलं आच्छादन काळं आणि पांढरं ठेवायला लागायचं.

नताशा ईटन रंगांच्या इतिहासावर काम करतात, त्यांचं काम खूप वेधक आहे. अनेक ज्ञान प्रवाह आपल्या आठवणी आणि रंग यातील आंतरिक संबंध स्पष्ट करतात. कृष्णधवल छायाचित्रातील आजीच्या भांगातलं कुंकू विशेष उठून दिसे ते त्या लाल रंगामुळे की ते कृष्णधवल असल्यामुळे? कलकत्यामध्ये स्वस्त रंगीत रिळांचा वापर सुरु झालेला असताना माझ्या आईनं लग्नासाठी दाखवायला तिचा कृष्णधवल फोटो दिला होता हे जरा विचित्र होतं का? माझ्या बालपणीचे बरेचसे फोटो हे ब्लॅक ॲंड व्हाईट आहेत हे विचित्र आहे का? माझ्या चेहरा उठून दिसतो तो त्या शेजारी असलेल्या गडद रंगाच्या फुलांमुळे का? माझ्या मित्र-मैत्रिणींच्या आठवणी रंगीत आहेत, काळ्या-पांढऱ्या नाहीत, हे वेगळे आहे का? जसे चित्रपट जुन्या गोष्टीत वेगळ्या रंगात दाखवल्या जातात. माझी स्वप्नंदेखील रंगीत असायची. जेव्हा फक्त मी प्रिण्टमेकींग तंत्रासारखी स्वप्नं बघितली (आणि ती ॲनिमेटेड ही झाली होती) ती मात्र कृष्णधवल होती.

चित्तप्रसादच्या कामाने मी भारावून गेले होते, तसंच हिरेन दास यांच्या मुद्राचित्रांनीही. त्यातली गंमतच ही होती की यात प्रकाश आणि अंधार बरोबर उलट होत असतो. प्रकाशित कुरणं, पक्ष्यांच्या घराकडे जाणारे कोरलेले जिने हे सगळे उलटे असायचे. चित्र काढायचं आणि उलट्या बाजूनं गिरवायचं. जर एखादा लिनोकट किंवा वुडकट पाहिला तर तुम्हाला त्यातल्या चिरा दिसतील. तिथे लिनो किंवा लाकूड ‘नसणं’ म्हणजे या तेवढा भाग प्रकाशित दाखवण्यासाठी मोकळ्या सोडलेल्या जागा असतात. या उलट, त्यातले उंचवटे हे मात्र गडद काळे ठसे उमटवतात. हे रबरी शिक्क्यांसारखंच आहे. त्यावर नाव उलटं लिहिलेलं असतं, आरश्यातल्या प्रतिबिंबासारखं. त्यातलं गमक तर या प्रतिबिंबात आहे. मुख्य द्विरंगी ठश्यामध्ये ते प्रतिबिंब गायब होतं. गिरवलेली अक्षरे आणि खरडून काढलेला पृष्ठभाग प्रकाशाला जागा करून देतो. शिखरं ही प्रकाशचा अभाव ठरतात, ती जशीच्या तशीच राहातात. त्यांच्यामध्ये तो अभाव कोरलेला असतो. त्यांचे ठसे म्हणजे रेषा, छटा, आकृतीबंध असतात. यातूनच छायाप्रकाशाची निर्मिती होत असते. हा छायाप्रकाश अशा कितीतरी ‘अभावां’ना आपल्यात सामावून घेत असतो. कदाचित, अभाव असाच कोरला जात असावा?

तेव्हाच आपण अभावाला, ‘नसण्या’ला स्पर्श करतो का?

III

काही दिवसांपूर्वी गुडगावमध्ये अनोळखी व्यक्तीची भेट झाली. त्यांच्याकडून मला कळलं की आयफोनमध्ये सगळं काही कृष्णधवल करता येतं. ती व्यक्ती कशी दिसते, तिचा आवाज किती गहिरा आहे हे जरी मी विसरले असले तरी मला कृष्णधवल स्क्रीन मात्र आठवतो. फक्त फोनचा वॉलपेपर किंवा स्क्रीनसेवर नाही तर सगळीच्या सगळी ॲप्ससुद्धा काळी-पांढरी झाली होतो. ही सगळ्यात भारी गोष्ट होती. ते कदाचित भगवा रंग सुद्धा तसा करडा करू शकतील.

रंग हरवला तर त्या गोष्टीतला अर्थ देखील हरवतो का? पूर्वीच्या माणसांना काळ्या-पांढऱ्या फोटोत तांबडा समुद्र खरंच दिसू शकायचा का? काळे आणि पांढरे हंस रंगीत फोटोत वेगळे दिसतील का? सुष्ट गॉडमदर आणि दुष्ट सावत्र आया वेगळ्या रंगांमध्ये दाखवल्या जातील का? एवढ्या मंथनांनंतर आणि क्रूर इतिहासानंतर सगळ्या वाईट गोष्टी कायम काळ्या रंगातच दाखवल्या जातील का? एका वेगळ्याच एकरंगी जगात या सगळ्या गोष्टी मला तिटकारा असणाऱ्या जांभळ्या रंगाच्या असतील का?

आणि तरीही, ‘सुवर्णरेखा- सोन्याची नदी’ मात्र तिचे अस्तित्व एकरंगात सुद्धा कायम ठेवून आहे . मी त्या वाहत्या पाण्यात सोनेरी पिवळ्या लाटा देखील बघू शकते. ती नदी पिवळी असणं अपेक्षित होतं आणि एका श्रेष्ठ कलाकाराच्या हातून घडलेल्या एकरंगी (ब्लॅक ॲंड व्हाईट) चित्रपटाच्या फ्रेममध्येही तिचं पिवळेपण दिसून येत होतं. हे जग जादूमय आहे का जिथं खऱ्या जगात पिवळा पिवळाच असेल. नदीने हरवलेला पिवळसर गेरू सारखा रंग. आपण नदीत शिरतो तेव्हा आपल्याला दिसते कितीतरी रंगांनी खुललेली ही नदी. चित्रपटात आपल्याला एकरंगात दाखवलेल्या त्या नदीपेक्षा ही खरी अस्तित्वात असलेली नदी काही वेगळी असेल का? त्यात काही उणीव भासेल का? चित्रपटात दिसणाऱ्या रंगहीन काळ्या-पांढऱ्या पाण्यापेक्षा नदीचं निळसर करडं पाणी जास्त ‘खरं’ असेल का? आपल्यासमोर वाहणाऱ्या खऱ्याखुऱ्या नदीपेक्षा ही स्वप्नातली, पडद्यावरची नदी जास्त सोनेरी नव्हती का?

म्हणजे मग, ‘नसण्या’तून आपला विचार घडतो का?

छायाचित्र: जिगिशा भट्टाचार्य

जिगिशा भट्टाचार्य कलाकार, लेखक आणि कार्यकर्ता म्हणून कोलकता आणि नवी दिल्ली येथे कार्य करतात. कोलकता येथील सेंटर फॉर स्टडिज इन सोशल सायन्सेस मधून त्यांनी एम फिल पदवी प्राप्त केली आहे.
वेणू पारिजात: अमेरिकेत राहातात. त्यांनी भारतातून परफॉर्मिंग आर्ट्समधून मास्टर्स केले असून त्या नृत्यांगना, कोरिओग्राफर, लेखक, आयोजक, शिक्षिका अशा विविध भूमिका पार पाडत असतात.

2 comments on “असणं/नसणं?: जिगिशा भट्टाचार्य / मराठी भाषांतर: वेणू पारिजात

  1. Nandini Awade

    What a beautiful picturization of Jigisha’s thoughts…!! Loved it Venu…keep it up…

    Reply
    • Venu Parijat

      Indeed Very well penned by Jigisha…

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *