हिमांशू भूषण स्मार्त

रूपांच्या नागरकळाback

बोरकरांची एक कविता आहे ‘रूपकळा’ नावाची. ‘प्रति एक झाडा माडा त्याची-त्याची रूपकळा’ आणि ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, ‘तो कनकचंपकाचा कळा| की अमृताचा पुतळा.’ आपण अनेकदा म्हणतो की अमुक-अमुक कवीची शब्दकळा खूप विलक्षण आहे, जशी ग्रेसची आणि अनुभवभिन्नतेनं वेगळी झालेली पण ग्रेस इतकीच सतेज ढसाळांची. आपण म्हणतो ‘गावांना-शहरांना अवकळा आलीये’ किंवा ‘काय कळा करून घेतलीये स्वतःची’ इत्यादी. म्हणजे ‘कळा’ म्हणताना अवस्था’ म्हणायचं असतं. पण मग ‘अवस्था’च का नाई?‘कळा’च का? भाषा एरवी अत्यंत काटकसर करणारी व्यवस्था आहे. पण समानधर्मी शब्दांच्या बाबतीत तिचा हात सैल सुटतो. तिला वैविध्याचा मोह आवरत नाही. कारण हे निव्वळ शोभेचं वैविध्य नसतं. प्रत्येक शब्द अनन्याकडं बोट दाखवत असतो. त्या अर्थी भाषेत समान अर्थी किंवा विरुद्धार्थी शब्द नसतात. प्रत्येक शब्द स्वतंत्रपणे ‘असतो’ आणि त्याच्यातून आशयाचं-अनुभवांचं, संवेदनांचं एक अनन्य ‘दिसतं’. थोडक्यात ‘कळा’ म्हणजे ‘अवस्था’च पण ‘कळा’ म्हणजे ‘अवस्था’ नव्हे.

बोरकर ‘रूपकळा’ मधे पुढं-पुढं अनेक शब्द वापरतात, तोंडवळा, तेव-ठेव, रेखणी, घाट. उगवणारी प्रत्येक चांदणी ‘तिच्या परीने देखणी’ असते असंही म्हणतात बोरकर. अनन्य निर्देशित करणारा आणखी एक शब्द ‘परी’, हा की कित्येकदा वापरतो आपण किंवा वापरायचो. म्हणजे ‘अवस्था’ ‘साधारण’ असते, ‘कळा’ ‘अनन्य’ असते. बोरकरांच्या कवितेत, आपल्या वापरात ‘कळा’ स्त्रीलिंगी आहे. ज्ञानेश्वर त्याच ध्वनिसमुच्चयाचं, अक्षरमेळांचं पुल्लिंगी रूप वापरतात, ‘कनकचंपकाचा कळा.’ इथं ‘कळा’ म्हणजे फुलण्यापूर्वीची स्थिती, अवस्था. सामान्यतः आपण ज्याला कळी म्हणतो ती. पुल्लिंगी कळा आणि स्त्रीलिंगी कळी असे शब्द आले समोरा-समोर की भाषेतला लिंगभाव खुपतो लागलीच. पण तूर्तास ते बाजूला ठेवू. ज्ञानेश्वरांपुढं कुठचा कळा आहे? तर कनकचंपकाचा. सोनचाफ्याचा. ताठर, उभार असलेला, आत कोंदलेल्या अनावर गंधानं फुगीर झालेला, गंधानं आलेल्या फुगीरपणावर टोकाकडं निमुळत्या होत गेलेल्या पाकळ्या लयदार लपेटलेल्या आणि केशरी रंगाचं; गंधानं मंडित केलेलं स्निग्ध तेज. कनकचंपकात कळाची अवस्था अर्धोन्मीलित नाहीच तर अनोन्मीलित. तशीच कळा, अवस्था प्रच्छन्न तर कळा अनुन्मीलित. म्हणून रूपाची असेत ती ‘कळा’. म्हणून उत्तम कवितेत अनुभवाला येते ती शब्दरचना नाही; रचना अवस्थेसारखीच प्रच्छन्न, पण शब्दकळा अनोन्मीलित. कनकचंपकाच्या कळ्यासारखीच. शिशिर आला की पानझड होणाऱ्या झाडांची अवस्था एकसारखीच होते. एकच एक. पण प्रत्येक झाडाची पानं गळून गेल्या नंतरची कळा वेगळी. इव्हन त्यांच्या तळाशी पडलेल्या शुष्क पानांच्या पसाऱ्याची कळाही वेगळी. दुपारची वेळ पोरकं करणारी, निःसंदर्भ करणारी, अप्रस्तुत करणारी, रसहीन, अंतहीन, भगभगीत..


दुपारचे सचित्र उन्ह


            मृगजळास लांबवी


            अनंत इंद्रियातले


            स्वतंत्र शोक जागवी

प्रत्येक झाडा-माणसाच्या, डोंगरा-माळाच्या रसहीनतेची कळा मात्र स्वतंत्र. प्रत्येक रूपात एक कळा असते आणि प्रत्येक कळेचं एक अनन्य रूप असतं. आणि अनन्य म्हणजे अलौकिक, दैवी नव्हे; अनोन्मीलित. आशयाला, संवेद्यतेच्या विशिष्टाला वेढून बसलेलं. ते वेष्टन नाही, आशयाचं-संवेद्यतेच्या विशिष्ठाचं ते ‘अंग’ आहे. प्राणाच्या अभिसरणातून उगवलेलं रूपकळेचं पार्थिव, कोंभासारखं इंद्रियगोचर. पण या पार्थिवाच्या अनन्यतेनं संवेद्य होणारा आशय मात्र अपार्थिव. पण मग आधी कळा की आधी रूप? शब्दात तर रूप हे पद आरंभस्थानी आहे. तेच शब्दाचं आकलन दिग्दर्शित करतं. जोडशब्दात नेहमी आरंभाचं पद आशयावर स्वार होतं. त्याचा समजेवर प्रभाव असतो. जसा ‘अनुकृती’. सुचवायची, दाखवायची कृतीच आहे पण ती कुठल्यातरी कृतीच्या मागून आलेली, कोणत्यातरी कृतीचा परिपाक असलेली. म्हणून ती ‘अनु’. मागून आलेली. इथं कृतीला गौणत्व आहे, ‘अनु’ला प्राधान्य आहे. तसं ‘रूपकळा’ मधे रूपाला प्राधान्य आहे. कळेला गौणत्व आहे. प्राथम्य रूपाला आहे, त्यातून कळेकडे जा. आधी कळा होती त्याचं रूप झालं. खरंतर आधी अवस्था होती, तिची कळा झाली आणि कळेचं रूप झालं.

बोरकरांच्या कवितेतनंच बघूया. आधी एक झाड होतं. त्याच्या प्रजातीतल्या; झाड नावाच्या जैविक वास्तवाच्या समूहातल्या अनेक झाडांपैकी एक. बोरकर म्हणतात तसं झाड म्हणून त्याला त्याची-त्याची एक रूपकळा आहे. बोरकरांनी ‘प्रत्येक’ हा संधी झालेला शब्द टाळून त्याचं मूळ रूप असणारे ‘प्रति एक’ असे दोन शब्द योजलेत. ही सुद्धा भाषेतली एक रूपकळाच. तर एक झाड आहे. ते बी नाही, रोप नाही, झाड आहे. अवस्थेच्या भाषेत ते प्रौढ आहे. ते ज्या भुईत वाढलंय आणि ज्या अवकाशात विस्तारलंय त्यांच्याशी त्याचं एक अनन्य संतुलन-अनुसंधान आहे. त्याच्या प्रजातीची फांद्या वाढण्याची एक अनुवंशबद्ध पद्धत आहे, पण तरीही या झाडांच्या फांद्या अवकाशाची पोकळी व्यापण्याची एक स्वतंत्र पद्धत धारण करून आहेत. त्यामुळं त्या फांद्यांच्या पोकळ्यांमधून आरपार दिसणाऱ्या अवकाशाचं रूपही स्वतंत्र आहे. त्या झाडानं भूमीचं चित्र बदललंय. झाडाचा घेर स्वतंत्र आहे. त्याच्या त्वचेचा पोत, त्याच्या असंख्य रंगच्छटा, त्याचे उभार, त्याच्या सरळ-बाकदार-लयदार-तिरप्या रेषा, त्यांचे अनंत कोन, त्याचं ऋतूंना प्रतिसाद देणं, फळणं-फुलणं-पानगळणं-फांद्या वाळणं, त्याच्यावर पडणारी प्रकाश-छाया, त्याच्यातून झरणारी प्रकाश-छाया. यातलं खूपसं असंय जे अनुवंशिकतेतून आलंय, जनुकांमधून आलंय, नैसर्गिक निवडीतून आलंय. पण भुर्ई-अवकाश आणि भवतालातनं आलेलं जे विरघळून गेलंय त्यातनं अवस्थेची कळा झालीये आणि त्या कळेच्या दर्शनातनं एक रूप घडलंय. ती त्याची रूपकळा…‘प्रति एक झाडा माडा त्याची-त्याची रूपकळा’. बोरकरांना वाटलं की, अनन्य, स्वतंत्र कळा दाखवायला पाहिजे, नोंदवली पाहिजे. तसं नाई झालं तर ते वाहून जाईल, काळ ह्या कळेला पुसून टाकेल, रूप विरेल बदलेल.

मग झाडाच्या रूपकळेला प्रतिसाद देणारी एक शब्दकळा उद्भवली. तीही तितकीच अनन्य. तिच्या भाषेचा सामाजिक अनुवंश, जनुकं, निवड, रचनापद्धती, शब्दांच्या अवस्था हे सगळं आहे, पण या साऱ्यासोबत झाडाच्या रूपकळेची भूमी, अवकाश आणि भवताल आहे. शब्दांच्या-ध्वनींचा सहवास, त्यांची सांधेजोड, लघुदीर्घाची आवर्तनं, वाक्यांचे पल्ले, प्रत्येक पल्ला संपताना उमटणारी उमजेची चमक. जसं ‘झाडा-माडा’ मधली आकारांची पुनरुक्ती, मग ‘त्याची- त्याची’ मधली आकार-ईकारांची पुनरुक्ती आणि ‘रूपकळा’चं काहीशा दीर्घोच्चारित आकारापाशी संपणं. असं प्रत्येक चरणाचं ध्वनिरूप अनन्य तसंच शब्दकळा आणि तिच्यातून घडलेली रूपकळा अनन्य. जसं ज्ञानेश्वर एका झाडाच्या रूपकळेतनं बोललेत, तो ‘कनकचंपकाचा कळा’ किंवा बोरकरच म्हणालेत ‘थंडाव्याच्या कारंजीशी कुठे गर्द बांबूची बेटे’, किंवा कालिदास मेघदूतात म्हणालाय ‘यस्थापान्ते कृतकतनयः कान्तया वर्धितोमे, हस्त प्राप्य स्तबकनमितो बालमंदार वृक्षः॥’  (उत्तरमेघ १२)  यातली एक रूपकळा झाडाची आणि दुसरी भाषेची. हे एका कळेचं, एका रूपाचं आणि एका संवेद्यतेचं वहन, पुन्हा हे सगळं सदैव अनुन्मीलित. अनुन्मीलित का तर ते सगळं रूपघटाकांनी स्वतःत वेढून घेतलेलं. एकजीव. ते भौतिकात कशर उन्मीलित होत नाही. ते एका रूपकळेतून दुसऱ्या रूपकळेत संक्रमित होतं. ही रूपकळांची संक्रमणं वाचणाऱ्या-ऐकणाऱ्याच्या संवंद्यतेपर्यंत अव्याहत सुरू राहतात. या न्यायानं आपण रूपकळांच्या वैपुल्यात वसत असतो. कधी आपण रूपकळेेचे घटक असतो, कधी द्रव्य असतो. कधी स्वतंत्र-अनन्या रूपकळाही असतो. तर कधी साक्षी असतो; भवतालात चौफेर रूपकळांची बहुलसृष्टी असणारे. अनेकदा ही सृष्टी समस्वभावी असते, अनेकदा भिन्नस्वभावी, वैचित्र्याने भरलेली. पण हे वैचित्र्य घटकधर्माचं. एकमेकांशी दावा मांडणारं नाही. वैचित्र्यातून सहजीवन साधलेलं आणि वैचित्र्याच्या सहजीवनातून घडलेल्या रूपकळांनी ओथंबलेलं.

एक उंच इमारत आहे जी आता माणसाळलीये. वापराच्या अनेक तऱ्हांनी तिचं कोलाज झालंय. खिडक्यांमधे लोखंडी ग्रील्समधे लावलेल्या कुंड्या, त्यातून आलेले भिंतीवरचे लाल मातीचे ओघळ. एका खिडकीच्या बाहेर ओणवलेल्या ग्रीलवर एक लालभडक, घोट्याशी चुण्या होणारी सलवार वाळत घातलेली आहे. तिचा पोत आणि बांधणी स्त्रीसुलभ आहे. सलवारीच्या दोन पायांमधून; पायांनी केलेलं त्रिकोणी अवकाश भेदत येणारी नाडी लोंबतीये. नाडीचा रंग धुवून करडा झालाय आणि ती त्रिकोणात किंचित उजव्या बाजूला झुकलीये. सलवारी शेजारी एक पुरुषी अंतर्वस्त्र आहे. ढगळ, अस्ताव्यस्त्य. या खिडकीपासून चारपाच हात डावीकडं असणाऱ्या खिडकीतून एक केबल आलीये आणि बरोबर चिन्ह रेखत टेरेसकडं निघून गेलीये.

इमारतीच्या पार तळाशी एक चहाचा गाडा आहे. सलवारीच्या बरोबर खाली. गाडा फिक्या-विटक्या निळ्या ऑईलपेंटने रंगवलेला. टायर्स पंचर होऊन बसलेला. गाड्याला चिकटून उजव्या हाताला चार-सहा जणांनी हाताला हात धरून घेर केला तर कवेत येईल एवढं थोरलं विलायती शिरीषाचं झाड. ते इमारतीला खेटून वाढलंय किंवा इमारत त्याला खेटून उभारलीये. झाडाचा पसारा काळा, कुठं-कुठं हिरवा. खडबडीत बुंधा, पिकलेला काळसर रंग त्याचा. गच्च फांद्यांच्या पसाऱ्यात छोटी-छोटी छिद्रं. त्यांच्यातनं दिसणारं आकाश. गाड्यावर टरटरणाऱ्या चहातनं उठणारी वाफ आणि वास वरवर सरकतोय आणि सलवारीच्या खिडकीसमोर ओणवलेल्या शिरीषाच्या फांदीवर एक पिवळाधम्मक हळद्या बसलाय. त्याच्या पोताची चमक दिसतीये. माणसं, त्यांची चालणी-बोलणी, आवाज, कृती, रचनाबंध उभारण्या-बसण्याचे. गाड्यावरच्या बरण्यांमधे गोल कोकोनट बिस्किटांच्या राशी आणि गुलाबी टोकांच्या क्रीमरोल्सची चळत. ही सगळी इंद्रियगोचर सामग्री आणि तिच्यातलं वैचित्र्य.

माणसांच्या मना-बुद्धीतली आंदोलनं, त्यांचे मनसुबे, वासना, भुका, ठहराव, निष्क्रीयता-चपळता ही अगोचर सामग्री आणि तिचं वैचित्र्यही आहेच. ही रूपांची नागरकळा. म्हणावं तर ही वैचित्र्यं अनाग्रही, अनुत्सुक. इतकी भिन्नधर्मी पण त्यांच्या कडा मिसळून त्यांच्या वैचित्र्याची हट्टी धार द्रवून गेलीये. सगळं शहर असल्या. भिन्नधर्मी नागरकळांनी आणि त्यातनं उद्भवलेल्या रूपांनी भरून गेलेलं. आकार, पोत, रंग, रेषा, प्रतलं, वास. स्पर्श, चवी, पोकळ्या, रचनाबंध, योजनं, उपयुक्तशरण ढाचे, रेखीव-नरेखीव, बांधेसूद-ढिसाळ, सैलसर-घट्ट, प्रकाश-छाया, गती-स्थिरता या सगळ्याला व्यापून घेणारं अवकाश आणि अवकाशाला पोटात घेणारा काळ. अवकाशाच्या पोटात कोपरे-कंगोरे, वळणं, सताड रस्ते, चढ-उतार, खोल्या-उंच्या. सखल भागात सगळं घरंगळत जाऊन तळाशी जमा झाल्यासारखं आणि उंच भागात सगळं टरारुन उभार आल्यासारखं. अवकाशाच्या पोटातून ओथंबून आलेलं जीवन.

दुकानं, हॉस्पिटलं, देवळं, शाळा-कॉलेजं, सार्वजनिक प्रसाधनगृहं, थिएटर्स, हायपर स्टोअर्स, मॉल्स…आणि जीवनातून संचरणारे अनव्रत मानवी नमुने, प्राणी, पक्षी, अर्थातच साधनं-यंत्रं. खिडक्यांच्या आणि दरवाजांच्या अनंत फ्रेम्स. विटून गेलेल्या रंगाच्या, बाहेर उघडणाऱ्या लाकडी खिडक्या, अॅल्युमिनियमच्या स्लायडिंग विंडोज. घट्ट सागवानी दरवाजे, उठवळ-छचोर डिझाईन फायबर डोअर्स. निष्कर्ष डायग्नोस्टिक सेंटरच्या पांढऱ्या भक्क ग्लो साईनच्या खाली केदारलिंग बेकरीची भडक तांबडी ग्लो साईन. नजर खाली-खाली आणावी तसे बेकरीत टांगलेले चिप्सचे फुगीर पुडे, पावाच्या लाद्या, बिस्किटांचे-केक्सचे ढीग, पारदर्शक फ्रीज मधल्या चमकदार पेस्ट्रीज, मिठाया. आणखी खाली आलं की झेरॉक्सचा पिवळा-काळा बोर्ड, पेनं, गोळ्या-चॉकलेटं, खोडरबरं, शार्पनर्स. डावीकडं; थंडगार बियर मिळेल, चिकन ६५, नळ, फरशा, प्लायवूड, टाक्या, व्हेज बिर्याणी. शेजारी गाईला टेकून दत्त आणि मागं पसरत गेलेली देवांची गर्दी असलेलं देऊळ. त्याला टेकून शाळा-क्लासचं मिश्रण. मुलांना रमवण्यासाठी काढलेली भडक खेळसदृश्य चित्रं. सायकलींचे गच्च गठ्ठे, गाड्यांचे. मग पिंपळा-पिंपर्ण्यांनी, नेच्यांनी वेढलेली एक जीर्ण इमारत. मग आरपार रस्ता.

काळाच्या पोटात प्रहर, मिनिटं, तास, सेकंदं. अवकाशाच्या पोटातल्या प्रत्येक नमुन्यानं काळाचा स्वतःला हवा तेवढा, हव्या तेवढ्या गतीचा तुकडा तोडलाय. प्रत्येक नमुना काळ चघळतोय, रवंथ करतोय. अवकाश भरणारी सामग्री जशी भिन्नधर्मी तसा या सामग्रीवर काळानंही परिणाम केलेला. नव्या बसेस पांढऱ्या रंगाच्या. त्यांचा आयत जास्त आखीव-रेखीव. जुन्या बसेस लाल-पिवळ्या. काहीशा स्थूल. सरत्या काळानं शरीरात बेडौल आलेला. माणसांशी वर्षानुवर्षें सलगी केल्यामुळं त्यांच्या समग्र शरीरावर मानवी स्पर्शाची, मानवी अवयवांच्या ठश्यांची, दाबांची रेखनं आणि मुद्रा गढलेल्या. जुन्या बसेस एखाद्या व्यस्त रूटवर धावताना माणसांनी गच्च भरल्या की जुन्या पातळात गच्च बांधून कपडे ठेवलेल्या गाठोड्यासारख्या दिसतात. पस्तिशीत गर्भ राहिलेल्या स्त्रीसारखी त्यांची गती जडावलेली. गतीला अवरुद्ध करणारं ओझं; गर्भाचं आणि वाढलेल्या वयाचं. नव्या पांढऱ्या-चमकदार बस मात्र कितीही माणसं भरल्या तरी स्वतःचा काटेतोलपणा सोडत नाहीत. त्या आपलं शरीर आणि बांधा राखून असतात.

खरंतर असं सगळं परस्पर विसंगत एकत्र बांधलेलं असलं की ते बटबटीत, ढोबळ वाटायला पाहिजे. पोतांमधल्या, ढाच्यांमधल्या, आकारांमधल्या, रंगांमधल्या विलगता खुपायला हव्यात. त्या अनेकदा खुपतातही, बटबटीत वाटतात. असं सगळं गबाळ एकत्र बांधून आपण जगतोय. हे गबाळ वापरतोय, कधीतरी त्याचा एक खंड असतोय याचा मनस्तापही हाेतो. एकसंध, सजीव, परस्परांच्या सांध्यातनं प्राणाचे पाणी वाहून सैंद्रिय झालेल्या रूपकळांची ओढ लागते. ‘वृक्ष छायार्द दाट’ हाकारतात. कुठल्या कुठल्या कवींनी काय-काय म्हणून ठेवलेलं असतं..ते आठवतं..


            फुलतात वल्लरी रानजाईच्या जिथे


            दरवळे गंध त्यामुळे भान हरपते


            चहुबाजू टेकड्या, खालातित पाझरे


            सानुली झरी, तिथे चिवचिवती पांखरे

आता पार विस्मृतीत गेलेल्या ग. ह. पाटलांची ही कविता ‘तिथे’ नावाची. कविता शेवटी एका निर्मानवी रूपकळेत शिरलेली पहिली नागरकळा दाखवते,

मी काल पाहिला हिरवा जेथे मळा


            पाहिला आज बांधिला तिथे बंगला


            ओसाड जाहली खेडी जी पाहिली


            उत्कर्ष पावली शहरे मी पाहिली

पहिल्या कडव्यातल्या निर्मानवी रूपकळेपासून, शेवटच्या कडव्यातल्या केवलमानवी रूपकळेपर्यंत. असंच झालेलं असतं आपल्या आजवरच्या हयातीत सुद्धा. तुंबलेल्या सिग्नल्सच्या आणि बेताल यातायातीच्या कचकचीतून अंग-मेंदू-मन श्रमवतांना; ‘दरवळे गंध त्यामुळे भान हरपते’ ही काय मोलाची चीज आहे हे सारखं जोरजोरात पटायला लागतं. केवलमानवी रूपकळा आपण पोसतो तरी ती जिवावर उठते आणि निर्मानवी रूपकळा स्वयंजीवी तरी ती सामावून घेते. यातली प्रतारणा छळते. पण तरीही रूपांच्या नागरकळा असतातच. त्याचं आवाहनही असतंच. एकमेकांना रेलून असलेल्या दोन घरातल्या एका घरातला रेडिओ ‘तू नज्म नज्म सा मेरे हाठों पे ठहर जा, मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आंखोंमे जागूं रे’ वाजवत असतो, दुसऱ्या घरातला ‘नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी…जिणे गंगौघाचे पाणी’. एकीकडं बलवत्तर ठेका, गिटारवरचे जोरकस स्ट्रोक्स, दुसरीकडे लयप्रवाही ठहराव असणारा स्वरविलास. एकीकडं चित्त उसळतंय, दुसरीकडं चित्त शमतंय. पहिलं प्रबळपणे शारीर, दुसरं अशारीर.

वैचित्र्याचे, खंडिताचे, विसंगताचे; कडा विरघळून एकीकडं झालेलं सहजीवन हीच रूपांची नागरकळा. वापरलं जाण्याचा अटळ गुण असणाऱ्या. लालचुटुक चेऱ्यांनी लगडलेल्या, लालबुड्या बुलबुलांची रहदारी असलेल्या बुटक्या डेरेदार छत्रीसारख्या बर्डचेरीच्या झाडाखाली पंक्चर काढणाऱ्या माणसाचा अस्थायी प्रपंच, आपल्या कमनीय बांध्याभोवती दिव्यांच्या माळा गुंडाळून हॉटेलचं दार ठसठशीत करणारे बॉटलपाम्स. डावीकडं एटीएम आणि उजवीकडं मेडिकल असणारं हेअर कटिंग सलून. त्याच्या दारात भाज्यांचा पसारा मांडून बसलेली भाजीवाली, फूटपाथ पलीकडं रस्त्यावर फायबर मोल्डिंगचं टेबल टाकून एकोणचाळीस रुपयात, स्मार्टफोन्सना गोरिला ग्लास लावून देणारा वाळक्या शरीराचा पोरगा, त्याच्या टेबलाला गोरीलाचं पोस्टर आणि शेजारी ३९चा आकडा. पोरग्याचे केस कपाळापाशी सोनेरी रंगवलेले. दाबेलीचा, सँडविचसाठी कापलेल्या कांदा, टोमॅटो, काकडीचा, बॉम्बे वड्याचा वास. असंख्य आवाज. अनंत हालचाली. आपली या नागरकळांमधनं सुटका नाही. तूर्तास तरी नाहीच. आणि सुटका नाहीये कारण आपण त्यांचे पोशिंदे आहोत. आपण त्यांचे रूपद्रव्य आहोत. आपण त्यांचे आशयद्रव्य आहोत. आपण नागरकळाच आहोत. असं असण्याचं मूल्यंही करता येईल ठरवलं तर. हे सगळं कधी सुरू झालं? आपल्यापुरतं शोधता येईल? चौदाव्या-पंधराव्या वर्षी बँकेत पहिलं खातं काढलं तेव्हा? धाकट्या भावाच्या जन्मावेळी आजोळी गेलो आणि परत आलो तेंव्हा शेणाच्या जमिनी जाऊन घराला शहाबाद फरशी आलेली तेंव्हा? पिवळे बल्ब जाऊन पांढऱ्याफेक ट्यूबलाईटस् लावल्या तेंव्हा? गल्लीतला रस्ता पहिलेंदा रुंद होऊन घरं मागं हटली तेंव्हा? गरज ही शोधांची जननी असते’ हे वाक्य शाळेत पहिलेंदा ऐकलं तेंव्हा? गल्लीतले मित्र उपनगरांमधे रहायला जाऊन फुटले तेंव्हा? बहिणींची लग्न होऊन त्या महानगरांमधे गेल्या, नोकऱ्या करायला लागल्या तेंव्हा? केबल टिव्ही आला आणि त्याच्यावरचं चमचमीत-मादक जग बघून मनं पाघळायला लागली तेंव्हा? का दक्षिणेकडच्या तंजावर किंवा तत्सम गावाजवळच्या चिमूटभर खेड्यातनं खापरखापरखापर पणजोबा-पणजी जगण्यासाठी उत्कर्ष पावणाऱ्या शहरात आले तेंव्हा? की त्याच्याही आधी?….असेल तेंव्हा असेल. तूर्तास तरी सुटका नाही असं मान्यच केलंय आपण. तूर्तास या रूपांच्या नागरकळा निरखायच्या. त्यांच्या रेखण्या उमजतात का हे पहायचे. त्यांच्यात असायचे तेंव्हा खरेखुरे असायचे. द्रव्य म्हणून आणि स्वतःच एक कळा म्हणून. रूप म्हणून. रूपकळा म्हणून.

छायाचित्र: सनथ पवार

हिमांशू भूषण स्मार्त मराठी नाटककार असून कविता, ललित गद्य आणि संशोधनात्मक लेखन करतात. ते ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ येथे अभ्यागत अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत.

2 comments on “रूपांच्या नागरकळा: हिमांशू स्मार्त

  1. Manohar Patil

    अप्रतिम ललित लेख.

    Reply
  2. Supriya Aware

    अप्रतिम

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *