अतुल पेठे

नवसर्जनातील अस्वस्थताmarathienglish

back

नमस्कार. सर्वप्रथम मला ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार’ दिल्याबद्दल निवड समितीतील साऱ्यांचा मी मनापासून आभारी आहे. हा सन्मान स्वीकारताना माझ्या मनात अनेक भावना उचंबळून आल्या आहेत. डॉ. श्रीराम लागू आणि दीपाताई यांचं माझ्या जगण्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. डॉक्टरांनी माझ्या दोन नाटकात अभिनय केला आहे. त्यातूनच माझं नाट्यविषयक शिक्षण झालं आहे. डॉक्टरांमुळेच मला नाटकातील ‘सबटेक्स्ट’, म्हणजे ‘आंतरसंहिता’ कशी वाचायची असते हे उमजलं आहे. प्रयोगशील नाटकात काम करण्याचं तसंच पाठिंबा देण्याचं त्यांचं ही आदर्शवत आहे. रंगमंचावर उपस्थित असलेले डॉ. मोहन आगाशे, ज्योती सुभाष आणि ओंकार गोवर्धन यांच्यामुळे मला विशेष आनंद होत आहे.

मला मिळालेल्या या पुरस्कारात माझ्या सर्व लेखकांचा, दिग्दर्शकांचा, अभिनेत्यांचा, तंत्रज्ञांचा, गावोगावच्या माझे प्रयोग आस्थेनं आमंत्रित करणाऱ्या मित्रमैत्रिणींचा, मला मार्गदर्शन करणाऱ्या विचारवंतांचा, चळवळीतल्या तसंच मला नाटकाकरता आर्थिक मदत करणाऱ्या लोकांचा आणि प्रेक्षकांचाही वाटा आहे हे मी नम्रपणे नमूद करतो. त्याचप्रमाणे रोहिणी आणि पर्ण यांच्या पाठिंब्याचाही आदर करतो. या पुरस्कारानं मला अधिक ताकद आणि आत्मबळ मिळालं आहे, ज्याची आजच्या काळात फारच गरज आहे.

इवत्तीन दिन बहु मौलिक अंता भाविसुत्तेने. जयश्री अक्का अवर जोते नन्ना सन्मान नडितिदे, अदक्के ननगे अत्यंत संतोषवागीदे. कन्नड – मराठी संस्कृतीगळ संगमदिंदा बहळष्टू उत्तम विचारगळू घतीसिवे नावेल्लरू समृद्ध गोंडिद्देवे. इदे परंपरेयन्नु नावु जोरागि मुन्नडेसबेकु. निमगे हार्दिक अभीनंदनेगळु.

(आजचा दिवस मी खूप मोलाचा मानतो. जयश्री आक्कांबरोबर माझं सन्मान होतोय यामुळे मला आनंद होतोय. कानडी मराठी संस्कृतीच्या संगमाने खूप सुंदर गोष्टी घडल्या आहेत. आपण सारे समृद्ध झालो आहोत. हीच परंपरा जोरकसपणे आपण सारे पुढे नेऊ. तुमचे मनापासून अभिनंदन.)

लोकहो, इथं आज जमलेले आपण सारे नाटक या कलेशी घट्ट जोडलेले आहोत. प्रायोगिक नाटक करणं हे कायमच आव्हानात्मक होतं आणि आहे. मात्र आज ते विविध कारणांनी करणं कमालीचा अवघड बनलेला आहे. अनघड वाटेवर चालताना घात किती दुस्तर होतात याचं प्रत्यंतर क्षणोक्षणी येत आहे. आज मी इथं नेहमीच्या अडचणींचा पाढा वाचणार नाही. पण नवनिर्मितीतील आजचे गंभीर पेच कोणते आहेत आणि ते सोडवायचे काही मार्ग आहेत का याचा शोध घ्यायचा प्रयत्न या निमित्तानं करणार आहे.

सुरुवात बाजारापासून करतो. बाजारांना निर्माण झालेला टोकाचा बाजारूपणा सध्या आपल्या साऱ्या वातावरणामध्ये भरून राहिला आहे. प्रसिद्धीचा हव्यास हा मानसिक आजार झाला आहे. त्यामुळे लक्ष विचलित न होऊ देता एकाग्रतेनं नवे प्रयोग करणं कठीण झालं आहे. प्रायोगिक नाटकाचं गेल्या काही काळात स्वअस्तित्व पुसट झालं आहे. आपण नवनिर्मिती आणि नवसर्जन करणार आहोत ही भावना नष्ट होऊन काही ‘प्रोडक्ट’ तयार करत आहोत असा ‘ट्रेंड’ सेट झालाय. कलेद्वारे नव्या शक्यता शोधून जीवनातील अपरिचित आसमंत पाहायचे आहेत याचाच आपल्याला विसर पडत चालला आहे. तसंच नव्या रंगमुल्यांकरता स्वतःला पणाला लावायचं आहे ही वृत्ती लोप पावलेली आहे. नवे शोध लावताना अपयश पदरात पडत असते हा विचार आम्ही हद्दपार करत आहोत. ‘जे करू ते यशस्वी’ हा मंत्र बनला आहे. आजघडीला यासाठी चक्क ‘चॅनल्स’ दंड थोपटून उभी आहेत! ‘चॅनल’ लोकांना काय रुचतं, पचतं आवडतं याचं अंदाज घेऊन ‘मॉल मधला माल’ खपवायला काढणार आणि आम्ही कलाकार जणू ‘सेल्समन’ सारखा घरोघरी जाऊन तो विकणार! ‘लोकानुनयी सांस्कृतिक विश्व’ असं उभं राहत आहे. एखादी एकांकिका स्पर्धा जिंकून विजेत्यांना टिव्ही सीरिअल कशी मिळते याची अफाट प्रसिद्धी वृत्तपत्रातून केली जाते. नव्या रंगकर्मीचा ‘मास्तर क्लास’ हा कधी काळी नाटकात काम करणारा सिनेमातील यशस्वी अभिनेता घेतो. बाजारातील हे माध्यम आयोजक ‘नाटकाच्या जाणीवा’ रुजवत नाहीत तर ‘प्रसिद्धीचं बाळकडू’ नव्या रंगकर्मींना भरवतात. त्याला अधिष्ठानच देतात. या बाजारू उपद्व्यापांनी गावागावात नाटक तात्पुरतं होतं आणि ही नवी ऊर्जा सिनेमाकडे नाहीतर सिरिअलकडे वळते. नाटकात ठामपणे कोणी उभे राहताना दिसत नाही. ही सारी कलाकार मंडळी स्वतः नाटक करताना तर दिसत नाहीतच, पण दुसऱ्यांची नाटकं पाहतानाही कधीही आढळत नाहीत. तेव्हा व्यासपीठ वगैरे देण्याच्या अहंभावात या नव्या कलाकारांना खुडलं जातं. कलाक्षेत्रातली ही ‘कोवळी पानगळ’च! येत काहीच नाही, वाचलेलं काही नाही, विद्वत्ता नाही, व्यासंग नाही, कौशल्य नाहीत, अनुभव काही नाही आणि बोलणं मात्र सर्व गोष्टीवर अशी अवस्था आहे. अचंबित व्हायला होतं. ‘अर्ध्या हळकुंडानं पिवळंहोणं’ या म्हणीचा प्रत्यय इथं येतोय. नाटकाचा सखोल विचार करणारे कोपऱ्यात ढकलले जाऊन ‘सेलिब्रेटी’ लोकांनी सांस्कृतिक अवकाश व्यापलेला आहे आणि वैचारिक अवकाश ग्रासलेला आहे. हे चिंताजनक आहे.

त्यात भरीस भर म्हणजे आम्हा रंगकर्मींमध्ये संवादाचा अभाव असणे! नाटक करणारे आम्ही आपापल्या बेटांवर ‘अस्वस्थपणे’ रममाण आहोत. आज या घडीला महाराष्ट्रात तर सातत्यानं नाटक खेळणारे चारपाच जण उरलेत. देश्पातालीवरही हीच परिस्थिती आहे. वस्तुतः नव्वद नंतरीच्या आम्ही आजपावेतो कित्येक प्रयोग आपापल्या जागी केलेले आहेत. पण तरीही या आम्हा नाटकवाल्यांच्यात काहीही संवाद नाही . संपर्क असतो संवाद नसतो. संवाद असला तरी एकमेकांचं काहीही आवडत नाही. किंबहुना तुच्छता, नकोसेपणा आणि दुर्लक्ष करण्याची वृत्ती जास्त आहे. सहअस्तित्व आणि सहअनुभूतीला आम्ही सोडचिट्ठी दिलेली आहे. वेगळा विचार करणारे रंगकर्मीही बेभान होऊन सत्व आणि स्वत्त्व गमावत आहेत. एकमेकांना बेदखल करण्याच्या वृत्तीनं एकटेपणा बळावला आहे. बाजारमुक्त नवनिर्मिती कशी व्हावी आणि तिचं योग्य ते मूल्यमापन सहधर्मिंकडून कसं व्हावं हे कळेनासे झाले आहे.

आज प्रत्येकाला दुसऱ्याच्या निर्मितीतील आखूडपणा जाणवत आहे. अशी परिस्थिती यायला अनेक घटक कारणीभूत आहेत. खोलातले राजकारण कळत नाही, तत्त्वज्ञानात्मक पेच उमगत नाहीत, आजच्या अस्तित्वाच्या गाभ्यातील प्रश्न समजत नाहीत, आंतरशाखीय अज्ञान असल्याने व्यापक संदर्भ नाहीत आणि याचा परिणाम असा की कलेतून जगण्याचे रसरशीत मूल्य काही हाती लागत नाही. अजूनही आपण सारे अंतःस्फुर्तीवर अवलंबून आहोत. बौद्धिक स्तरावर आपण कष्ट घ्यायला अपुरे पडत आहोत. त्यामुळे अनेक नाट्यप्रयोग करूनही सैद्धांतिक बैठक कोणाच्याच रंगकार्माला मिळत नाही. आपल्या कमी उंचीची कारणं शोधताना लक्षात येतं की विविध चौकटीत आपण कळत-नकळत बंदिस्त आहोत. धर्म, जात, वर्ग, देश, शहर, गाव, लिंग आणि भाषा अशा अनेक विशिष्ट अहंकार निर्माण करणाऱ्या चौकटी व्यापक आकलनाकरता मर्यादा तयार करतात. या चौकटी उल्लंघता न आल्यानं सर्जनशीलतेच्या उड्या लांबवर पडत नाहीत आणि वैचारिक उंचीही गाठली जात नाही. आपला ‘वर्ल्ड व्ह्यू’ तर सोडाच ‘लोकल व्ह्यू’ सुद्धा संकुचित परिप्रेक्षाचा होतो. शोध घेताना साऱ्या जगाकडे डोळे उघडे ठेवून पाहिलं की आपल्या वैचारिक उंचीचा आणि बौद्धिक ताकदीचा अंदाज येतो. ती उंची आपल्या एकूण समाजातच कमी आहे. नवनिर्मितीचं बोन्साय होण्याची ही कारणं आहेत. ‘आड आटलेला आणि पोहरा तुटलेला’ अशी ही अवस्था!

दुःख हे आहे की समाजाचा आणि राजकारणाचा व्यापक पट पाहणाऱ्या काही विचारशील व्यक्ती आणि संस्था-संघटनाही अशाच खुज्या आहेत. व्यापक दृष्टिकोनाचा सर्व पातळ्यांवर अभाव आहे. विशिष्ट प्रश्नावर उत्तम समाज असणारी ही माणसं इतर गोष्टीत मात्र अनभिज्ञच असतात. अर्थात आपल्या समाजातली सर्व क्षेत्रं अशीच आहेत. एकमेकांशी संवाद नसलेली, अबोल आणि अज्ञानी! कला करू पाहणाऱ्या लोकांना समाजकारण–राजकारण याची जाणीव नाही आणि राजकारण समाजकारण करणाऱ्यांना कलेविषयक जाण नाही. सौंदर्याचं दर्शन घडवणारी नाटकं आणि वैचारिक नाटकं असं अज्ञानमूलक विभाजन त्यातूनच तयार झालेलं आहे. वस्तुतः, या दोन्हीचा तोल साधलेली नाटकं कोणाला नको असतात? पण गेल्या काही काळात ‘विचार करणं’ यालाच आपला जणू प्रतिबंध आहे. समाजातच अॅँटी इन्टेलेक्चुअल’ वातावरणात भिनवलं गेलं आहे. त्यातूनच ‘पुरोगामी’ ‘वैचारिक’, ‘बुद्धिवादी’, ‘प्रायोगिक’ वगैरे जणू नव्या शिव्या झाल्या आहेत. कुठलीही भूमिका न घेता जगता येत नाही. किंबहुना भूमिका न घेणं हीच एक भूमिका असते, सोयीची आणि सुरक्षिततेची!

१९९० नंतर अतिशय तुटत चाललेल्या आणि धज्जा उडत जाणाऱ्या कालखंडाचं मरणप्राय दर्शन आपल्या सर्वांना होत आहे. आत्ताचा काळ तर ‘अधःपतनाचा काळ’ ‘एज ऑफ डिकेडन्स’ असाच आहे. परवा एका मॉलमध्ये गेलो होतो. ‘एन्टरटेनमेन्ट’ करणारा अजस्त्र’ एक्सायटेड मॉल होता. तिथं हजारो माणसं इतस्ततः विखुरलेली होती. चित्रविचित्र अनाकलनीय आवाज येत होते. सरकते जिने सतत फिरत होते. नाकाला ओळखता येणार नाही अशा चटकदार चवीचे गंध येत होते. अफाट वस्तूंची दुकानं होती. एका दुकानात फक्त बॉम्ब पडत होते, गोळ्या सुटत होत्या, लहानलहान मुलं प्लास्टिकच्या हातोड्यानं स्क्रीनवरचे प्राणी आणि फळं चेचत होते. आई-वडील कृतकृत्य होऊन ते पहात होते. दुसऱ्या दुकानात कोणी डोळ्याला गॉगल लावून हातवारे करत होते. ते व्हर्चुअल जगात गुंगले होते. ते काय बघत आहेत हे दुसऱ्यांना कळायला मार्ग नव्हता. शेजारील दुकानात एका फिरत्या चाकावर चॉकलेट्स फेकली जात होती. अचानक अनौंसमेन्ट झाली आणि शेकडो लोकं त्या फ्लोअरवर पळू लागली. मी हे दृश्य पहात होतो. अचानक माझं लक्ष तिथल्या सेल्समनवर गेलं. तिथे एक बाई उभी होती. साधी आणि गरीब दिसणारी. पण होती सुटाबुटात. मी तिच्याकडं गेलो. हसलो. नमस्कार केला. तिला विचारलं की ही लोकं का पळताहेत? या चौकशीनं तिच्या चेहऱ्यावर संशय आला. एकमेकांचा सतत संशय येत रहाणं हा या काळाचा एक अवगुण ! मग थोडा माझा अंदाज घेऊन बोलली, ‘त्यांना स्वस्त गंमत हवी आहे. आमचा मॉल ती गंमत देतो.’ मी काही क्षण थांबून विचारलं ‘त्यांना ती गंमत मिळते?’ त्यावर ती म्हणाली, ‘तात्पुरती मिळते. शिवाय ती संपली की इतर शॉप्स आहेत नं.’ असं म्हणून ती बाई गर्दीत अदृश्य झाली. मॉलमधली तात्पुरती गंमत विकत घेणारी गिऱ्हाईकं मी नीट पाहू लागलो. तीही विविध धर्मातली पैसा राखू न शकणारी पण थोडा पैसा हाती आलेल्या अशाच कुटुंबातील होती. या साऱ्यांना गुंगवून ठेवणारा हा करमणूकप्रधान मॉल मला ‘रूपक’, ‘मेटॅफर’ वाटला. स्वस्त गंमतीच्या नशेची सवय सर्वांना पद्धतीशीर लावली जात आहे. त्याकरता गंमतीचा नीचांक गाठला जात आहे.

आता शेवटची गुंतागुंतीची समस्या मांडतो आणि थांबतो. सध्या समाजातील सर्व स्तरात बेमुर्वतखोरी, बेदरकारी आणि बकाली आलेली आपण अनुभवत आहोत. पहिल्या स्तरातील लोकं रेल्वे अंगावरून जाईल ही कल्पना असतानाही ट्रॅकवर बसून रहातात आणि मरतातही. विकासाच्या पथावर हा स्तर अथर्वशीर्ष, जयंत्या-मयंत्या, प्रवचनं, वाढदिवस, हल्गीवरची अश्लील गाणी, तीर्थयात्रा करण्यात आणि अशा मॉल्समधून आहे ते पैसे उधळण्यात मश्गुल आहेत किंवा त्यांना तसं बनवलं जात आहे. दुसरा स्तर आपल्यापर्यंत न पोहोचणाऱ्या अचाट बाजारू श्रीमंत मॉलधारकांचा! वयं लपवून चेहऱ्यावरची त्वचा तरुण राखण्यातच हा स्तर मश्गुल आहे. वाढती ‘ओबेसिटी’ हा त्यांचा प्रश्न आहे. उरलेला तिसरा स्तर मध्यमवर्गाचा! आता तो जवळपास नष्ट झालाय. तो आता नवश्रीमंत झालाय. परदेशगमन, पर्यटन आणि प्रकृतीविषयक काळजी या तीन गोष्टीनी त्यांचं जग व्यापलं आहे. या तीनही स्तरांनी शहाणपणाला तिलांजली दिली असून वेडसरपणाचा डोस घेतलेला आहे. या तीनही स्तरातील कोणासाठी नाटक करायचे हा प्रश्न आहे.

त्रासदायक आणि गंमतीदार हे आहे की सध्या हे तीनही स्तर वृत्तीनं एकमेकांमध्ये बेमालूमपणे मिसळले जात आहेत. कोण कोणाच्या खांद्यावर उभे आहे हे कळत नाहीसे झाले आहे. किंबहुना हेच राजकारण आहे. अशा राजकारणाची जाणीव करून देणाऱ्यांचे आवाज बंद केले जात आहेत. हे तीनही स्तर सनातन धर्माच्या, रूढी परंपरांच्या आणि आपल्या उदात्त धार्मिकतेबद्दल उच्चरवात बोलत असतात. ही माणसं बहुश: अतिसामान्य कुवतीची असतात. ते कळप करतात. त्याला ते ‘हिंदुत्व’, ‘भारतीय’ अथवा ‘देशप्रेमी’ असं नाव देतात. सोशल मीडियावर ते बिनदिक्कत मतं मांडत असतात. मत मांडणं आणि विचार मांडणं यात त्यांची गफलत असते. ते संविधानाच्या चौकटीत बोलल्यासारखं वागतात आणि हुकुमशाहीला उत्तेजन देतात. या अतिउत्तेजित लोकांमुळे विविध दुफळ्या पडत आहेत. समाजाचे सांस्कृतिक अंत:स्तरच रोज हलत आहेत. मॉब लिंचींग होत आहे. गावांची नावं बदलली जात आहेत. जुन्या वस्तूंवर हक्क सांगितले जात आहेत. लेखनावर, प्रयोगावर आणि आता शास्त्रीय गाण्यावरही बंदी पुकारली जात आहे. ‘कल्चरल जेनोसाईड’ मध्ये आपणच आपल्याला ‘सेन्सॉर’ करू लागलो आहोत.

कलाकार म्हणून मुक्तपणा हरवत चाललेल्या अशा अवकाशात नवनिर्मिती कशी करावी हा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत आम्हा नाटकवाल्यांची जबाबदारी जास्त आहे. असे कालखंड इतिहासात सतत येत असतात हेही मला माहीत आहे. पण त्यावर उपायही त्याच काळातील जिवंत असलेल्या कलावंतांना करावे लागतात. वाढत चाललेल्या या उथळ जाणिवांच्या तीनही जगात सुसंवाद सुरू करायला हवा. माणसं खुजी आणि पुतळे उंच होत असलेल्या या काळात नवसर्जन करायचं आव्हान पेलायला हवं. कुठल्याही सर्जनशील व्यक्तींची निर्मिती त्याच्या स्वत:च्या अवकाशाशी आणि कलेशी जोडलेली असते. जगण्यातील प्रश्नांना भिडलं, भूमिका घेऊन एकत्र उभं राहिलं आणि वास्तवाला सामोरं गेलं तर आणि तरच नाटक जिवंत राहू शकतं.

आदिवासींमध्ये गोष्ट सांगणाऱ्यांना ‘कहंकारक’ म्हणतात तर ऐकणाऱ्यांना ‘अहंकारक’ म्हणतात. कहंकारक आणि अहंकारक दोघे एकमेकांशी जैवपणे जोडलेले असतात. कारण साद देणारा नसेल, तर बोलेल कोण? या दोघांच्या नात्यात एकमेकांचा स्वीकार आवश्यक असतो. कहंकारक कथेचा निर्माता असल्याबद्दल ऐकणारा अहंकारक ग्वाही देतो. ‘माझ्यामुळे तू आणि तुझ्यामुळे मी.’ ही साहचर्याची आणि सह-आनंदाची संकल्पना मानवीय संबंधाना आणि सामंजस्याला बळकटी देते. त्यातून जीवनाला अर्थ प्राप्त होतो. तर असं अर्थपूर्ण जीवन घडायला माझ्यासारख्या नाटकातून गोष्ट सांगणाऱ्या कहंकारकच्या हातून मदत होवो ही इच्छा व्यक्त करतो. त्याकरता आजचा ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार’ मला बळ देईल याची खात्री आहे.

नाटक चिरायू होवो! Long live Theatre!

धन्यवाद.

अतुल पेठे हे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता आणि माहितीपटकार म्हणून गेली ३८ वर्षे कार्यरत आहेत. त्यांची नाटके अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात सहभाग झाली आहेत. ‘रिंगणनाट्य’ आणि ‘मानसरंग’ या संकल्पनांचे जनक म्हणून अतुल पेठे सुपरिचित आहेत.

अतुल पेठे यांना डिसेंबर २०१८ मध्ये ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना त्यांनी केलेले हे भाषण.

One comment on “नवसर्जनातील अस्वस्थता: अतुल पेठे

  1. Arti Kadam

    Thanks for sharing this.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *