वसंत आबाजी डहाके

निरुत्तर

back

त्या दगडी, भंगलेल्या तटाच्या जुनाट ऐतिहासिक शहरात

पिवळ्या तापासारखी संध्याकाळ शिरत असताना,

मी माझ्या आयुष्याच्या चादरीवर मरून पडलेले किडे

वेचत होतो; ते माझ्याच डोक्यातून पडलेले

अस्वस्थ कीटक होते;

तेव्हा बाहेर रस्त्यावर भेंडाळलेल्या पायांचा मोर्चा

स्वत:ला ढकलत पुढे चालला होता

आणि त्यातल्या माणसांच्या हातातले

मागण्यांचे फलक मुसमुसत होते;

एक दुबळी वावटळ आली क्षीण ऊर्मीसारखी

आणि सगळ्यांच्याच आवाजांचा पाचोळा

उडवून निघून गेली;

म्हातारी माणसं घराच्या दारात, पायऱ्यांवर, अंगणात पडलेली होती

टाकून दिलेल्या फाटक्या चपलांसारखी;

मी काय करतो आहे घरात पुरल्यासारखा बसून

असं स्वत:लाच विचारत बाहेर आलो;

मोर्च्यातल्या शेवटच्या माणसांचे काळवंडलेले चेहरे

अधिकच काळे झालेले होते;

बाप्तिस्मा, लग्न, किंवा कुणाचा मृत्यू झाला असल्यास

पापण्या उघडणार्‍या खंगलेल्या चर्चच्या हिरवे चट्टे उठलेल्या आवारात

एक मरतुकडं लंगडं घोडं

चरल्यासारखं करत होतं आणि तोंड वाकडं करत होतं;

मी काय करतो आहे इथंसुद्धा

असं स्वत:लाच विचारत आतल्या धाग्यांचा

गुंता सोडवू लागलो;

तो सुटता सुटत नव्हता, अधिकच गुंता होत होता

म्हणून घोड्याच्या चरण्याकडे बघत होतो;

त्याचं चित्त नव्हतं चरण्यात, किंवा कशातही;

माझंही नव्हतं;

पुसट होत चालेल्या मोर्च्यातल्या माणसांचंही

चित्त नसावं कशातच;

धारदार विळ्यासारखी चंद्रकोर वर आली,

मी कापून घेतला माझा गळा,

हातानंच गळ्यातून बाहेर येत असलेलं रक्त थोपवत

घरी आलो तेव्हा आई म्हणाली,

काय झालं रे बाळा?

गळाच कापलेला असल्यानं बोलता आलं नाही;

एरवी तरी काय सांगू शकलो असतो?

 

***

प्रतिमा सौजन्य: एल. एस. लॉरी

 

वसंत आबाजी डहाके: मराठीत लिहिणारे महत्त्वाचे भारतीय लेखक. भाषातज्ज्ञ, कोशकार,कादंबरीकार, समीक्षक, कवी तसेच चित्रकार म्हणून डहाके प्रसिध्द आहेत. त्यांचे शुभवर्तमान, योगभ्रष्ट, चित्रलिपी हे आणि इतर काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. साहित्य अकादमी, महाराष्ट्र फाऊंडेशन अशा संस्थांनी उत्तमोत्तम पुरस्कार देऊन डहाके यांच्या साहित्याचा गौरव केला आहे.

5 comments on “निरुत्तर: वसंत आबाजी डहाके

 1. vasant abaji dahake

  ही कविता मी परवा पुण्यातल्या कार्यक्रमात वाचली. हाकाराचा उल्लेखही केला.

  वसंत आबाजी डहाके

  Reply
  • Hakara Team

   डहाके सर,

   ही ‘हाकारा’साठी अतिशय आनंदाची बाब आहे. मनापासून आभार. 🙂

   हाकारा संपादक.

   Reply
   • दयानंद कनकदंडे

    ही शेगावच्या दिंडी उत्सवात पण वाचली होती कविता तुम्ही सर..

    Reply
 2. Vinayak Maruti Bendre

  प्रत्येक सामान्य माणसाच्या मनातील जणू खदखद व्यक्त झाली आहे

  Reply
 3. कुमार बोबडे

  आता तर सर्यांचेच गळे कापले आहे, सारे अस्वस्थ वर्तमान।

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *