सरोवर जैदी

मराठी भाषांतर: नूपुर देसाई

घरपण आणि बेघरपण: जगण्याचे छेद-भेद



back

घर ही एक जागा नाही तर न बदलता येण्याजोगी परिस्थिती आहे.

-जेम्स बाल्डविन, जीओवान्नीज रूम

घर  म्हणजे काय? एखादी भावना किंवा सवयीची गोष्ट? वेगवेगळ्या नात्यांचं किंवा वस्तूंचं एकत्र येणं? की एखाद्या  इमारतीचा आराखडा? या लेखाची कल्पना मला तीन महिन्यापूर्वी सुचली. माझं राहतं घर मला सोडावं लागलं. त्या घरात मी चांगलीच रुळले होते. सगळ्या शहरभर लॉकडाऊन चालू होतं, त्यात नेहमीच्या परिचयाची अशी एकमेव गोष्ट होती ते म्हणजे दीड वर्षांपासून राहत असलेलं हे घर. सगळ्या सामानाची बांधाबांध करून त्यासहित स्वतःला इथून उचकटून टाकून दुसरीकडे नव्यानं मांडामांड करावी लागणार होती. असं दाखवत की जणू काही घर म्हणजे फक्त काही वस्तूंचा संच, कुठेही घेऊन गेलं की झालं घर तय्यार!

घराबद्दल लिहिणं अवघडच असतं कारण तेव्हा आपण आपलं कुटुंब, आपल्या भावना, भीती याबद्दल लिहीत असतो. पण ते लिहिणं आपलं शरीर, अंथरूण-पांघरूण, आणि आपल्या जीवलग माणसांबद्दल देखील असतं. यातल्या प्रत्येकात आपण कसे जगतो, राहतो, उरतो आणि त्यातलं काय बरोबर घेऊन जातो यांबद्दल सुद्धा हे लिहिणं असतं. घर ही व्यवस्था त्यातल्या संकेतातून समजून घ्यायची असेल तर त्यात फक्त कपाटात आपण कपड्यांची कशी रचना करतो याचबरोबर आपल्या स्वतःची, आपल्या भावभावनांची आणि आपल्या दैनंदिन जगण्याची कशी रचना करतो हेही विचारात घ्यावं लागेल. एखाद्या जागेत परकं वाटणं किंवा आपलंसं वाटणं हे ठरावीक काळ, अवकाश किंवा रूपात साचेबद्ध नसतं. तर ते कपडे, मित्र-मैत्रिणी, आजूबाजूचे अनुभव, हवापाणी, झाडं-झुडुपं यासारख्या भौतिक आणि इंद्रियगोचर गोष्टीतून ठरत जातं. आणि ते ठरतं, आपल्या कपाटातून येणाऱ्या वासातून, शेवाळं साचलेल्या बाल्कनीतून आपण पावसाळ्यात कसे सांभाळून चालतो यातून,  खिडकीतून आत येणार्‍या पावसाच्या तुषारांपासून आपण फडताळातल्या पुस्तकांचा कसा बचाव करतो यातून, किंवा थंडीच्या कपड्यांचं आपण काय करतो, रोशनदानातून येणारा प्रकाश आपण कसा हाताळतो, आणि रोज संध्याकाळी  क्षितिजाचा एखादा तुकडा आपण कसा बघतो यातून.

घराबद्दल विचार करणं, घरात राहणं आणि त्यावर लिहिणं हे त्या जागेत राहणार्‍या माणसांसाठी ते अवकाश काय असतं आणि कसं घडत जातं त्याच्याशी अगदी जवळून जोडलेलं असतं. ते प्रदेश असतात आयुष्यातल्या सर्जनशीलतेचे आणि नवनिर्मितीचे. ते व्यक्तीपुरते मर्यादित असतात किंवा व्यापकरित्या जोडलेले, संवादात्मक असतात किंवा स्वगत रूपात. नित्यनेमाने चालणारे सरावाचे असतात किंवा गोंधळाचे. एका ठिकाणी स्थिर करणारे असतात किंवा  विस्थापनाचे.

अल्जेरियाच्या ईशान्य भागात राहणार्‍या बर्बर भाषा बोलणार्‍या लोकांची पारंपरिक पद्धतीनं बांधलेली घरं म्हणजे कबाईल. बोर्द्यूचा या संदर्भातला लेख आत-बाहेर, बायका आणि पुरूषांसाठीचं अवकाश, दिवसा आणि रात्री त्या जागेचा बदलणारा उपयोग, अशा परस्परविरोधी गोष्टीतून या घरांची रचना सामाजिक संबंधांना कसा आकार देते याची मांडणी करतो. आणि हे करताना हे घर संपूर्ण कबाईल विश्वाची अतिसूक्ष्म अशी प्रतिकृती आहे हे दाखवून देतो.[i] बोर्द्यूच्या म्हणण्याप्रमाणे वेगवेगळ्या सवयी, कौशल्य शिकण्यातून सामाजिक पुनरुत्पादनाची प्रक्रिया शक्य होत असते आणि अशा घराच्या अवकाशात ती या सवयींच्या माध्यमातून व्यक्त होत असते. तर याउलट, लेवी स्त्रोस हा ‘हाउस-सोसायटीज’ किंवा ‘घर-समुदाय’ अशी संकल्पना मांडतो. यात घर हे वारसा, मालकीहक्क, नातेसंबंध, वंशपरंपरा यात मध्यस्थाचे काम करतं. माणसातले परस्परसंवाद आणि त्यांची प्रतीकात्मक रूपं, सामाजिक नात्यांची अमूर्त रूपं आणि त्यांचा भौतिक जगातील अविष्कार यांच्यातल्या अन्योन्य प्रक्रियांमधून ते आकाराला येत असतं.[ii]  मेरीलीन स्त्रादेर्न नातेसंबंधांवरची ही चर्चा पुढे नेत १९ व्या शतकातील ब्रिटनमधील उपनगरी घरांची रचना आणि आकृतिबंध यावर मांडणी करतात. या काळातल्या ‘गार्डन सिटी मुवमेंट’च्या संदर्भात त्या मुख्यतः विचार करतात[iii]. शहर आणि खेडं याच्या मधली अशी ही घर आणि परिसर रचना या चळवळीने पुढं आणली. बगिच्यांनी व्यापलेले उपनगरी भाग रहिवाशांची जागा म्हणून लोकप्रिय झाली.  यात बागेत लागवड केलेल्या नाना तर्‍हेच्या रोपट्यांना घराच्या रचनेपासून वेगळं काढणं अवघड होतं. पण इथं केवळ रोपटीच नव्हे तर घराच्या आतली रचना, मुलाबाळांसह नैतिक व्यवहार आणि नीतिमत्ताही जोपासली गेली. भारताच्या संदर्भात तसं हिंदू अविभक्त कुटुंबाच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं. जसं जसं कुटुंबाचा व्याप वाढत जातो, मुलं (मुलगे) ‘मोठी होतात’ तसं तसं घराचा पसारा वाढायला लागतो – नवे भाग बांधले जातात, जुन्या घरात एखादी ज्यादा खोली काढली जाते, किंवा त्याच कॉलनीमध्ये अजून एखादं घर विकत घेतलं जातं.

या मानववंशशास्त्रीय मांडणीपलीकडे जाऊन जर पाहिलं तर तत्त्वज्ञानाच्या इतिहासात देखील घराबद्दल चिंतन करणारे दोन तत्त्ववेत्ते आपल्याला दिसतात. हायडेगरच्या म्हणण्याप्रमाणे घनदाट अरण्यातील एखादी रम्य, टुमदार पर्णकुटी ही निवांतपणे राहण्यासाठीची आणि चिंतन करण्याची जागा आहे. विटगेनश्टाईनने त्याच्या बहिणीच्या विएन्नातल्या घर बांधणीमध्ये खरंतर बराच रस घेतला होता, पण त्याला इमारत उभारण्यात रुची कमी तर ‘सगळ्या इमारतींचा पाया नेमका कसा’ असतो याचा शोध घेण्यात रस अधिक होता. दोघेजण आपापल्या तात्त्विक बैठकीनुसार विचार करतात. हायडेगरच्या मांडणीत निसर्गाकडे परत जाण्याचा आणि एका ‘शुद्ध स्वरूपात’ जगण्याचा आदर्शवाद आहे. तर भाषेकडे सुटेसुटे पण एकमेकांना जोडलेले ठोकळे म्हणून बघणारा विटगेनश्टाईनचा भाषा सिद्धांत आणि त्याचा भविष्यवादी विचार यांच्या एकत्र येण्यातून त्याची मांडणी उभी राहते. या दोन्ही गोष्टी त्याने रचलेल्या बहिणीच्या घरात भव्य रूपात आपल्या समोर येतात. त्यातली व्याजोक्ती ही की त्याची बहीण किंवा कुटुंबीय कुणालाच ती रचना पसंत पडली नाही. तसं विटगेनश्टाईनने स्वतःच मान्य केलं की त्या घराला ‘चांगला शिष्टाचार’  लाभला होता, पण त्याला ‘आदिम अस्तित्व’ आणि ‘स्वास्थ्य’ मात्र लाभलं नव्हतं.[iv]

माझ्यादृष्टीने आपण घरात कसं वसतो, राहतो आणि घरं सतत कशी उभारली, साकारली जात असतात या दोन्हीच्या अधेमध्ये घर आणि घरपण यांचा विचार होत असतो. खोल्यांचे आराखडे, पलंगाची रचना, स्वयंपाकघरातील मांडणी, पुस्तकांच्या कपाटांचे प्रकार, आरामदायी उशा आणि टेबलं, फ्रीजमध्ये गोठवलेलं चिकन, हरवलेले सापशिडीचे खेळ, फ्रीजवरच्या चुंबकांची ठरलेली जागा, हनुक्काच्या समया, कुठेच न मावणारी चित्रकलेवरची जाडजूड पुस्तकं, ‘मदर्स आणि अदर्स’ या पुस्तकातील चित्रं, पूर्वीच्या दोन घरांच्याही आधीच्या घरात  जोडी हरवलेले पण अजूनही सोबत राहिलेले कानातले डूल, दररोजच्या जगण्याची तालबद्धता ठरवणारे पाण्याच्या पंपाचे स्वीच, एकाचवेळी स्वयंपाकघरात किती जण उभे राहून रांधू शकतात किंवा जेवणाच्या टेबलाभोवती एकावेळी किती जण बसू शकतात याचे आडाखे, भोवतालचे रंग आणि पोत यांच्याशी जुळवून घेण्याच्या पद्धती या सगळ्याचा सखोल विचार करण्याचा सराव म्हणजे घर.

मी घरात कशी राहते आणि ते घर कसं उभं करते, तर निरनिराळ्या प्रकारच्या विभागण्या करून आणि त्या गोष्टींच्या याद्या तयार करून. इथं मी त्यातल्या तीन भागांचा विचार करणार आहे – घरातली फरशी, घराचा आकार/ढाचा, आणि घराचा दर्शनी भाग.

 तुम्हीतेरेझ्झो करता का?

मुंबईत  नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (एनजीएमए) स्वागतकक्षात गेलं की मला एखाद्या कलादालनात नाही तर कुणाच्यातरी घरी आले आहे असंच वाटत राहतं. म्हणजे तशी रचना पाहिली तर एनजीएमएची बांधणी कलादालन म्हणूनच केली आहे. पण ८०च्या दशकात दिल्लीतल्या घरांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या कवडी फरशा (तेरेझ्झो) तिथं लावलेल्या बघून मला त्या इमारतीचा हेतू कायम गोंधळात टाकतो.

 कवडी फरशीचा इतिहास बघायचा असेल, तर पंधराव्या शतकात वेनिसमध्ये हे तंत्र वापरलं गेलं. पण त्याही आधी म्हणजे प्राचीन इतिप्तमध्ये मोझेक फरशीच्या रचना केलेल्या दिसतात. तसं असलं तरी आधुनिक वास्तुकलेमध्ये हे तंत्र सार्वत्रिक, अगदी सर्वव्यापी झालेलं दिसतं. मला आठवतंय मी लहान असताना या कवडी फरशांवर खेळायचे. त्यात मला निरनिराळे आकार आणि नमुने सापडायचे, तर कधी मृग नक्षत्र आणि सप्तर्षी दिसायचे. कधी टवके उडालेल्या फरश्यातून घडीव चेहेरे उठून दिसायचे, तर कधीकधी जमीन हळूवार धूसर होऊन जायची. मी ज्या ज्या घरांमध्ये राहिले त्या त्या घरात कवडी फरशीचं निःशब्द अस्तित्व जाणवत राहायचं. त्यामुळेच असेल पण ही फरशी म्हणजे घराचं आरामदायी आवरण आहे असं मला वाटतं. उन्हाळ्यात ती थंडावा देते आणि थंडीत सतरंजी पसरली की ही फरशी उबदार होते. ही फरशी घडवण्यात माणसाचे श्रम लागतात, हात लागतात आणि त्यामुळेच असेल, पण माझा मातीकाम करणारा मित्र म्हणतो तशी ही फरशी कायमच मऊ आणि उबदार वाटत राहील. तेरेझ्झो घडवण्याचं पारंपरिक तंत्र म्हणजे संगमरवराचे तुकडे काँक्रीटमध्ये मिसळले जातात आणि त्यानंतर त्यात काचेचे तुकडे जडवतात. हल्ली मात्र या रूपबंधाची फक्त नक्कल केली जाते.

अलीकडेच मी घर बदललं. दक्षिण दिल्लीतल्या एका डीडीए वसाहतीतून दुसर्‍या डीडीए इमारतीत राहायला गेले. १९८०च्या दशकात बांधलेल्या या घरांचा आराखडा तंतोतत एकसारखा होता. आणि मुख्य म्हणजे  कुटुंबनियोजनासाठी वापरलेल्या ‘हम दो हमारे दो’ या सरकारी सूत्राचं पालन करणारा होता. या नवीन घराचा आराखडा आणि रचना जरी जुन्या घरासारखी असली तरी मला विलक्षण परकेपणा जाणवत होता. माझ्या जुन्या घरातल्या कवडी फरशीची जागा या घरात मशीनवर बनवलेल्या सिरामिकच्या फरशीनं घेतली होती. मला घरं दाखवणार्‍या एजंटनी याचं स्पष्टीकरणदेखील दिलं होतं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे कवडी फरशी जुनाट, मळकट दिसते तर नव्या सिरामिक फरश्या लखलखीत स्वच्छ दिसतात. इथं शेजार्‍यांकडेसुद्धा सिरामिकची फरशी आहे. त्याचं पण म्हणणं, ‘ही फरशी नेटकी दिसते म्हणून आम्ही पण बदलून घेतली. पण आता ती स्वच्छ ठेवायला जास्तच कष्ट घ्यावे लागतात कारण यावर पडलेला धुळीचा प्रत्येक कण न् कण आणि केस न् केस स्पष्ट दिसतो.’ दक्षिण आशियामध्ये नेमकं काय ‘स्वच्छ’ दिसतं यासारख्या कल्पनांनी आपल्याला पछाडलेलं आहे. कच्च्या जमिनीपासून पक्क्या बांधकामापर्यंतचा प्रवास जर टिपायचा झाला, तर सहसा एकरेषीय असा तो उलगडत जातो. म्हणजेच तो सिमेंटमध्ये बनलेल्या, कवडी फरशांपासून ते साधारणपणे उदारीकरणानंतर उदयाला आलेल्या मध्यमवर्गीय जाणिवांच्या चकचकीत, गुळगुळीत, अधिकाधिक ‘स्वच्छ दिसणार्‍या’ फरशा किंवा संगमरवरी फरशीपर्यंत येऊन ठेपतो.  

 माझ्या या नव्या घरात या चकचकीत पांढर्‍या फरशांनी सगळीकडं करणी केलेली असल्यामुळं मला तर कधी कधी कळेनासं होतं की न्हाणीघर नेमकं कुठं संपतं आणि खोली नेमकी कुठं सुरू होते. या फरशांवर चालताना माझ्या शरीराला सतत जुळवून घ्यावं लागतं कारण या गुळगुळीत, घसरड्या जमिनीवर प्रत्येक पाऊल अगदी काळजीपूर्वक टाकावं लागतं. मी ती जमीन चटया आणि सतरंजीनी आच्छादते, तिला स्वच्छ, कोरडी ठेवायचा प्रयत्न करते पण एवढं करूनही मी त्या जमिनीला काही सरावत नाही. तेरेझ्झो किंवा कवडी फरशीचा जो उबदार आपलेपणा आहे तो या फारशीत नाही. कवडी फरशीवर सतरंजी अंथरण्यात देखील फरक जाणवतो आणि माझी चालही त्या फरशीवर ताबडतोब बदलते, तसं या जमिनीवर होत नाही. शरीराला तेरेझ्झो फरशीची ही जवळून असलेली ओळख हा माझ्या ‘घरपण’ अनुभवण्यातला आधारभूत घटक आहे. माझ्या जुन्या घरात मी झाडांना पाणी घालायला म्हणून कितीतरी वेळा न्हाणीघरातून बाल्कनीत जायचे; त्या जमिनीवर सतरंजी सटकायची नाही, त्यामुळं मला योगासनं सहजरित्या करता यायची. माझ्या पायाखालची जमीन शांत, स्थिर आणि आपलीशी वाटायची – एखाद्या जुन्या प्रियकरासारखी. नव्या घरातली फरशी चकचकीत असली तरी तिच्याशी जुळवून घेण्यासाठी मला बरेच सायास पडताहेत.

 चौरसासोबत राहताना

‘..चौरस मात्र त्यापेक्षा जास्त प्रामाणिक असतो आणि तो चारपैकी एका रेषेवर स्थिर असतो. आणि मी या निष्कर्षाप्रत देखील आलो आहे की, चौरस हा मानवी शोध आहे आणि त्यामुळेच असेल पण मला त्याबद्दल आपलेपणा वाटतो. कारण तो तुम्हाला निसर्गात दिसून येत नाही.. ..पण अर्थात मी स्वतःला दुरूस्त केलं आहे. कारण आपल्या रोजच्या जेवणातल्या मीठात – मीठाच्या स्फटिकात चौरस असतातच.. .. आणि दुसर्‍या बाजूला आपल्याला असं ठामपणे वाटतं की आपल्याला वर्तुळं दिसत राहतात. परंतु वर्तुळाचा अगदी नेमका आकार दुर्मिळपणे आढळतो. तसं पाहायला गेलं, तर निसर्ग काही गणितज्ज्ञ नाहीये. कदाचित निसर्गात सरळ रेषाही नसाव्यात. मला अजूनही असंच मानून चालायला आवडेल की चौरस हा मानवी शोध आहे. हा विचार मला खुलवतो. त्यामुळे माझी पसंती जर याबाबतीत ठरलेली आहे तर मी एवढंच म्हणू शकतो की मला क्षमा असावी.’- जोसेफ आल्बर्स, १९६८[v]

 मी एका वास्तूविशारद (आर्किटेक्चर) शिक्षण संस्थेमध्ये शिकवायची, तिथले विद्यार्थी एकदा उत्तर भारतातील एका खेड्याचा अभ्यास करून आले. तिथून आल्यापासून ते खेड्यातल्या घरांचे आराखडे तयार करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. त्यातल्या एकीनी मला सांगितलं, ‘खेड्यातल्या या घरांची सगळ्यात अवघड बाब म्हणजे ती मापानुसार तंतोतंत बांधलेली नाहीत – मोजमापं  चुकीची आहेत आणि जिने एकदम सरळ रेषेत नाहीत किंवा आयताकारही नाहीत.’ खेडेगावातली ही घरं कुठल्याही आराखड्याशिवाय बांधलेली, तसंच गरज पडेल तेव्हा हळूहळू वाढवलेली, त्यामुळं चौकोनी आणि आयताकृती नकाशात त्यांना बसवणं त्या विद्यार्थ्यांना आव्हानच होतं. आर्किटेक्चरमधल्या रेखाटनांमध्ये सरळ रेषेचं इतकं वर्चस्व असतं की घराचं प्रतिरुपण आणि बांधल्यावर व तिथं राहायला लागल्यावर प्रत्यक्षात घर कसं दिसतं यात बर्‍याचदा दुभंगलेपण असतं.

आणि तरीही युक्लीडच्या भूमितीच्या रूपात असेल किंवा प्रत्यक्ष जगात असेल चौरस आणि सरळ रेषा आपल्यासमोर येत राहतात. चौरसाकार म्हणजे एखादा खोका असू शकतो किंवा शहरातली एखादी खुली जागा, एखादी खोली किंवा मेज, एखादं कपाट, भिंत किंवा ताडपत्रीचा मोठा तुकडा किंवा अगदी एखादं संग्रहालय (अर्काइव)देखील असू शकतं. घर बांधताना, अर्काइवच्या रूपात ज्ञाननिर्मिती करताना किंवा आरेखनात सुसूत्रता आणि प्रमाणबद्धता आणताना या सारख्या सगळ्या प्रक्रियांमध्ये चौरस हा स्वतःला घडवत, पूर्णरित्या चौरस होण्याचा खटाटोप करत असतो.

आधुनिक इमारतींमध्ये राहताना आपण चौरसाला कसे भिडतो, त्यात कसे राहतो, त्याची मोडतोड कशी करतो, चौरस कसे उभे करतो आणि त्यांच्यावर कसं प्रभुत्व मिळवतो हे या भागामध्ये आपण पाहाणार आहोत.

आपण जर आपल्या घरांचा इतिहास बघितला तर लक्षात येत की हा आहे, खिडक्या, दारं, फरशी, खोल्या यांच्या चौरस आणि आयताकार रचनांमध्ये ठेवलेल्या फ्रीज, फडताळ, एसी, पलंग, टेबल इत्यादी चौरस आणि आयताकृती वस्तूंना हाताळण्याचा इतिहास! आपण या चौकोनात वास्तव्य करायला कशी सुरुवात करतो, तिथं आपण कसे राहतो, आपल्या आयुष्याला कुंपणं कशी घालून घेतो आणि नित्यनेमाचे नियम कसे पाडून घेतो? आपण आपलं आयुष्य काटकोनात आखत असतो का, की हे कोन इतके काटेकोरपणे तयार झालेले नसतातच?

मी एकदा मातीकाम केलं जाणार्‍या  गावात राहिले होते. तिथं माझी आठ बाय दहाची खोली होती. खोली अतिशय साधी होती. तिला एक आयताकार खिडकी होती. ती खिडकी उघडायची त्या बाजूला गव्हाची शेतं पसरली होती. त्या खोलीत एक पलंग होता, छोटं आयताकृती कपाट होतं आणि शिवाय एक लहानसं टेबलही होतं. ती खोली म्हणजे या आयताकारांचा ‘घट्ट विणलेला समुदाय’ होता. आणि मी आत्तापर्यंत राहिलेल्या सगळ्या चौरसातला सर्वोत्कृष्ट चौरस होता. दिवसभर मातीची मडकी चाकावर फिरवून झाल्यावर झोपायला, आराम करायला किंवा वाचायला म्हणून मी या खोलीत परतायची. हिवाळ्याच्या रात्री मी या खोलीत घालवल्या आहेत. या काळात चतुरकिडे माझ्यासोबतीला चालायचे आणि सकाळच्या वेळेला खोलीसमोरच्या झाडांच्या डहाळीवर बसलेला स्वर्गीय नर्तक मला खुणावायचा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खोलीचा हा चौकोनीपणा कधी माझ्या अंगावर नाही आला, उलट, आजूबाजूच्या ओलाव्यामुळे त्या खोलीत जंगलातल्या एखाद्या कुटीसारखा सौम्यपणा दाटला होता. ब्रुनो मुरारी त्याच्या ‘स्क्वेअर सर्कल ट्रायंगल’[vi]  या पुस्तकात मानवी जगणं, वस्ती करून राहणं याच्याशी चौरस या आकाराची सांगड घालतात तर, तर वर्तुळ हे वैश्विक आणि दैवी जगड्व्याळ रूपाशी संबंधित आहे असं मांडतात.

घराच्या शोधमोहिमेनिमित्तानं मी अनेक घरं पालथी घालत असताना हे चौकोन माझा पाठपुरावा करतात. मी एक साधा २ बीएचके फ्लॅट शोधतेय आणि माझ्या पुढ्यात काय येतंय, तर लेगोच्या खेळातली निरनिराळी घरं. सगळी घरं म्हणजे चौरस आणि आयताकारांची वेगवेगळ्या प्रकारे केलेली मांडामांड. वॉशिंग मशीनसाठीची जागा, फडताळ, बाल्कनी, कपाटं सारं काही आयताकारात रचलेलं आहे. माझा आर्किटेक्ट मित्र (मैत्रीण) याला भारतातल्या आधुनिकतावादी सदनिका/घर बांधणीची ‘असेम्ब्ली लाईन उत्पादन पद्धती’ म्हणतो/म्हणते. याच्यात घराची रचना आणि आराखडे यांचं प्रमाणीकरण केलेलं आहेच, पण त्याचबरोबर पोलादी तुळया, स्लॅब, दरवाजाचे कडी-कोयंडे, अशा इतर सगळ्या गोष्टींतही एकसारखेपणा असतो. मध्यम उत्पन्न असणारे, कमी उत्पन्न गटातले, सरकारी अधिकारी अशांकरिता राहण्याच्या ठरावीक स्वरूपाची अशी घरं उभी केली गेली. या घरांच्या प्रत्येक पैलूकरिता आर्किटेक्ट, इंजिनिअर, प्लानर यांनी नियम तयार केलेले आहेत. बांधकाम साहित्य आणि घराच्या रचनेत केलं गेलेलं हे प्रमाणीकरण भिन्नलिंगी नात्यांवर आधारलेल्या कुटुंबव्यवस्थेबद्दलच्या कल्पितात देखील उतरताना दिसते. यामध्ये एकच प्रकारची रचना सर्वांसाठी लागू होईल असं गृहीतक आहे. जगण्याच्या या प्रमाणीकरणात कोनाच्या बाहेर जाणारी एखादी तरी रेषा आपण आखतो का? प्रमाण मानल्या गेलेल्या चौकटींच्या बाहेर आपण आयुष्य जगू शकतो का? या चौरसाला एखादी घडी पडू शकते का? आपल्या भावभावना आणि आयुष्यातल्या निवडी यामुळे या चौरसाला धक्का लागतो का? माझा प्रोपर्टी एजंट आणि नवे शेजारी यांच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का होता पण हा २ बीएचके फ्लॅट मला फक्त माझ्यासाठी हवा होता, एकटीला राहण्यासाठी.

चौरासांना खोलून, त्यांचे भाग सुटे करायला, त्यांची मांडणी करायला, सजावट करायला आपण कसे शिकणार? बाहेरून एकसारख्या दिसणार्‍या या सगळ्या चौरसांच्या स्मृती आपण कशा रचणार? हिवाळ्यात सूर्य कुठल्या खिडकीत असेल, कुठल्या भिंतीवर कुठलं फडताळ नीट बसेल, कुठल्या फरशीला साफ करायला ब्लीचची गरज पडेल, बाल्कनीतल्या कुठल्या भागात पावसाचं पाणी साचेल, हे समजून घेता घेता कदाचित आपण चौरसांसोबत राहायला शिकतो.

मी ज्या घरात लहानाची मोठी झाले तिथे माझ्या खिडकीबाहेर कबुतरं झटापट करत असायची. नंतर माझ्या लक्षात आलं की, ती कदाचित प्रेम करत असावीत. दिल्लीच्या कडक उन्हाच्या झळांमध्ये व हिवाळ्यातल्या थंडगार वार्‍यात, कधीकधी पडदे सारलेले असताना किंवा नसताना कबुतरांची झटापट चालायची, आणि अचानक एके दिवशी ती निघून गेली. कदाचित, त्यांना एखाद्या खिडकीवर किंवा एअर कंडीशनरच्या खोक्यावर किंवा असंच कुठेतरी दुसरा एखादा चौकोन सापडला असावा किंवा असंही असेल की, झटापट करायला त्यांना दुसरी कबुतरं सापडली असतील.

आपण सुद्धा या चौरस आणि आयतात मावण्यासाठी झटापट करत असतो. आपल्या शरीरात, आपल्या प्रेमात, जागेपणी आणि निद्रिस्तपणातल्या आयुष्यात, आणि मध्यमवर्गीय घरातल्या प्लायवूडच्या टेबलावरचे कम्प्युटरचे पडदे आणि बेडरूममधले रुंद पलंग या सगळ्यांबरोबर ही झटापट चालू असते.  घर हे नेहमी एखाद्या चौरसात वसलेलं असतं – एखादी गोधडी, एखादं टेबल, एखादा आराखडा. पण ते स्वतःला घरपण देत असतं, झोपेसारखं, एखाद्या घडीत, चुरगळून, लपेटून, एकमेकांभोवती वेटोळे घेत ते कपडे, त्वचा, पडदे, गालिचे, रंग, आणि सहज जमवलेले दगडगोटे आणि शिल्पं यांच्यासह हळूवार होत जातं. 

आभाळाचा तुकडा

आपल्याला जर दिल्लीतल्या जुन्या वस्त्या आणि शेजार समजून घ्यायचे असतील, तर या घरांच्या छतांवर काय काय घडत असतं, सामाजिक जगणं दिसतं, त्यावरून अंदाज बांधता येतो. शहरातली ही छतं वेगळंच जग खुलं करतात. नातलग, आणि एकत्र काम करणं, एकांत ते पतंग उडवणं आणि कबुतरं पाळण्यापर्यंत अनेक गोष्टी इथं घडत असतात. मी विद्यार्थ्यांबरोबर काम करत होते. त्यात जमियाच्या दक्षिणेकडचा भाग समजून घेण्याचा प्रयत्न होता. मी त्यांना सुचवलं की त्यांनी कानेकोपरे आणि छत यांचा अभ्यास करावा. त्यातून बहुतेक जण एक नवी मर्मदृष्टी घेऊन परत आले, ती म्हणजे या घरातल्या स्त्रियांचं छताशी असेलेलं नातं. या दाटीवाटीच्या, एकावर एक बांधलेल्या घरांमध्ये छत ही स्त्रियांसाठी जवळीकीची जागा होती. खुलं असलेलं पण खासगी अवकाश! ही छतं म्हणजे घरातला चौक किंवा अंगण याला पर्यायही होती. तिथं त्या कपडे वाळत घालतात, उन्हात लोणच्याच्या बरण्या ठेवतात, किंवा हिवाळी दुपारी तिथं बसून भरतकाम, विणकाम करतात. यातून छत, बाल्कनी, घरातला चौक या स्त्रियांसाठीच्या जागा / अवकाश बनतात.

माझ्या मागच्या डीडीए फ्लटमध्ये मी साधारण वर्षभर राहिले. तिथे माझ्या बाल्कनीतून रस्त्यासमोरच्या घरात मला एक म्हातारी बाई दिसायची. तिच्यासोबत माझं काहीतरी विचित्र नातं तयार झालं होतं. ती कायम बाल्कनीत असायची. भल्या पहाटे, उन्हाळ्यातल्या तापलेल्या दुपारी, आणि संध्याकाळीही. ती जवळजवळ तिचा अख्खा दिवस तिथं घालवायची. तिथं बसून असायची, आजूबाजूला पाहत असायची आणि कधीकधी रोपट्यांची काळजी घेतल्याचा आव आणायची. सुरुवातीला तिचं तिथं असणं मला आगंतुकपणाचं वाटायचं, मला त्यामुळे निवांतपणे माझ्या बाल्कनीत बसून कपभर चहादेखील पिता यायचा नाही. ती एक आजीबाई होती आणि तिला सारख्या गप्पा मारायला आवडायच्या. कधीकधी ती आजूबाजूच्या घरात काय चाललंय किंवा खाली रस्त्यावर कोण काय करतंय ते पाहत असायची, कधीकधी खालून जाणार्‍या भाजीवाल्यांकडून भाजी विकत घ्यायची, कधीकधी जगात काय घडतंय त्यावर टिप्पणी करायची. तिच्या घरातल्या लोकांमध्ये लुडबुड नको म्हणून कदाचित ती सगळा दिवस बाहेर बाल्कनीत घालवायची. शेजारपाजारी काय चालू आहे याची तिला खबरबात असायची. कोण कुठं राहायला गेलं, कोणता शिंपी चांगला आहे पासून कोरोना केसेसचे ताजे आकडे, असं सगळं तिला माहिती असायचं. तरीही, ते घर सोडल्यावर मला तिची उणीव भासत राहिली. ती मला रोज पहायची आणि कुठेतरी या सगळ्याला काहीतरी अर्थ आहे असं मला वाटायला लागलं होतं. मी जर कधी कुठं गायब झाले तर कुणीतरी त्याची दखल घेईल असं वाटायचं.

 आधुनिक घरात बाल्कनी फार महत्त्वाची ठरते, कारण आताच्या घराच्या रचनेतून गायब झालेल्या बगीचा, सोपा, अंगण, किंवा छत यांची उणीव ती भरून काढते. आणि तरीही, वेगवेगळ्या लोकांसाठी ही बाल्कनी वेगवेगळी भूमिका बजावते.

माझ्या एका मैत्रिणीला  कुंड्यांनी आणि रोपट्यांनी वेड लावलं आहे. सध्या तिनं ११० पेक्षा जास्त कुंड्या जमवल्या आहेत. त्यातल्या काही तिच्या घराच्या छोट्याशा बाल्कनीमध्ये मावतात पण बर्‍याचशा दिवाणखाना आणि जिन्याच्या मोकळ्या भागात पसरल्या आहेत. तिच्यादृष्टीनं आकाशाचा तुकडा म्हणजे जिथं तिची रोपं बागडू शकतात, वाढू आणि राहू शकतात. काटछाट करा, तण काढा, छोटी वाढलेली रोपटी मोठ्या कुंड्यात लावा, कुंड्या नीट मांडून ठेवा, अशी त्यांची काळजी घेण्यात ती दिवसातले तास न् तास घालवते. तिच्या घराच्या आत आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्हीकडे, अगदी जिन्यापर्यंत कुंड्या आणि रोपटी पसरलेली आहेत आणि हे होत असताना तिच्या घरातल्या बाल्कनीच्या नेहमीच्या सीमा विस्तारत गेलेल्या दिसतात.

मुंबईमध्ये तुम्हाला खिडकीतून समुद्राचा छोटासा तुकडा जरी दिसत असेल, तरी घरभाडं लगेच वाढतं. अशा आकाशाच्या तुकड्याचा शोध घेणं – मग तो झाडांना सूर्यप्रकाश मिळावा म्हणून असेल, समुद्र दृष्टीस पडावा म्हणून असेल, हिवाळी सकाळी निवांत झाडाकडं बघता येईल असा एखादा कोपरा असेल – शोधाच्या या जादुई प्रक्रीयेतूनच हळूहळू घरं आपल्याला आवडू लागतात आणि घरांना आपण. आणि तरीही पहिला बदल लोकं आपल्या घरात करतात तो म्हणजे एकतर बाल्कनीचं रूपांतर खोलीत करतात किंवा छतावर एखादी खोली बांधतात. आपल्या वाढत्या सामाजिक, कौटुंबिक गरजा आणि आकांक्षांना सामावून घेणारी पहिली गोष्ट म्हणजे हे विस्तारणारं आभाळ आणि बाल्कनीचं अवकाश. एखादी वृध्द आजी, शहरात शिकायला आलेला आत्ते किंवा मामेभाऊ, नुकताच लग्न झालेला मुलगा आणि त्याची बायको, वयात आलेली आणि स्वतःची वेगळी खोली हवी असलेली मुलगी किंवा थोडं जादा उत्पन्न मिळावं यासाठी ठेवलेला पेईंग गेस्ट यांच्यासाठी ती खोली उपयोगी येते.

 आयुष्य आपल्यासमोर घेऊन येणारी जगण्याची बदलती, सतत विस्तारत जाणारी ही रूपं पाहता आपल्याला हव्या हव्याश्या वाटणार्‍या बाल्कनी आणि छतावर पाणी सोडावं लागतं. तरीही, काही लोक आपल्या खिडक्यांच्या चौकटी, कुंड्या ठेवायसाठी वाढवलेल्या लोखंडी जाळ्या यांसारख्या जागांचा बाल्कनी किंवा छतासारखा उपयोग करतात किंवा कधीकधी एखादी खोली उडवून तिथं बाल्कनी बांधतात आणि आपल्या स्वतःला आणि घराला आकाशासमोर खुलं करतात.

घरपण साकारणं

घरपण म्हणजे साचलेल्या कामांची यादी? घरपण म्हणजे गॅस कनेक्शन असतं का? किंवा विजेचं मीटर? मसाल्याच्या बरण्यांची मांडणी? बसायची आणि लिखाण करण्याची एखादी जागा, नाश्ता करण्याची किंवा दिवसा डुलक्या काढायची जागा? की घरपण म्हणजे लग्न? नातेवाईकांचं जाळं, मित्राचं वर्तुळ? काही लोकं तुम्हाला सांगतील की जिथं चूल मांडलेली असेल – स्वयंपाक करायची जागा असेल, एखादा स्टोव्ह किंवा गॅस शेगडी असेल – ते घर परिपूर्ण होतं. काहीजणांना कपाटात कपडे नीट घडी करून लावले, त्यात पार्‍याच्या गोळ्या टाकल्या की घराला घरपण आल्यासारखं वाटतं आणि काहीजणांना त्यांच्याकडच्या कुंड्यांसाठी बाल्कनीत पुरेशी जागा मिळाली की, घर आपलसं वाटायला लागतं.

 कुलाबा कॉजवेच्या मागच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर एक माणूस होता. तिथं असलेलं त्याचं घर म्हणजे फुटपाथवर पसरलेली पथारी, एक वाकळ आणि तत्त्वज्ञानावरचं एक पालथ ठेवलेलं पुस्तक.

कितीप्रकारे आपण घर उभं करत असतो? आपण प्रेम करतो आणि इतरांच्या शरीरात घर तयार करतो, आपण भिंतींवर चित्रं डकवतो, आपण अर्ल ग्रेचा मस्तपैकी कपभर चहा बनवतो, आणि आपल्याला जाणवतं की हेच आपलं घर आहे.

आपण आपलं नशीब ठरवणारे कौन्सिल ऑफ एलरोंडमधले गेंडाल्फ असतो, आपण बुखाराचे मुख्य कारागीर असतो आणि आपल्या स्वप्नात चालत राहणारे ‘सोलारीस’ मधले क्रिस केल्विन असतो – कुठल्याही कारणाशिवाय आपण रचत असतो, रक्षण करत असतो, भाकीतं करत असतो, मनासमोर चित्रं उभी करत असतो, आणि चालत राहत असतो, केवळ आणि केवळ त्या प्रवासासाठी. कारण बुखारा कुठंतरी अस्तित्वात असायलाच हवं. सुंदर आणि निळंभोर.


[i] पियेर बोर्द्यू, १९७९. ‘द काबाईल हाउस ऑर द वर्ल्ड रीवर्स्ड’, अल्जेरिया १९६०. केंब्रिज: केंब्रिज युनिवर्सिटी प्रेस.
[ii] क्लॉद लेवी-स्त्रोस, १९८३. द वे ऑफ द मास्क्स. लंडन: जोनाथन केप लि.
[iii] मेरीलीन स्त्रादेर्न, १९९२. आफ्टर नेचर: इंग्लिश किनशिप इन द लेट ट्वेंटीएथ सेंच्युरी. केंब्रिज: केंब्रिज युनिवर्सिटी प्रेस. 
[iv] ल्युईस हाईड यातून उद्धृत. २००८. ‘मेकिंग इट’, द न्यू यॉर्क टाइम्स, ६ एप्रिल २००८.
[v]  जोसेफ आल्बर्स. १९६८. ‘जोसेफ आल्बर्स ऑन स्क्वेअर्स अँड द नेचर ऑफ एक्स्प्रेशन’, सेविम फेची यांची घेतलेली जोसेफ आल्बर्स यांची मुलाखत, २२ जून – ५ जुलै १९६८. https://americansuburbx.com/2015/12/josef-albers-on-squares-and-the-nature-of-expression.html या संकेतस्थळावर उपलब्ध. ६ ऑगस्ट २०२० रोजी संकेतस्थळाला भेट.[vi] ब्रुनो मुरारी. २०१५. स्क्वेअर सर्कल ट्रँगल. न्यू यॉर्क: प्रिन्स्टन आर्कीटेक्चरल प्रेस.

छायाचित्र सौजन्य: सरोवर जैदी

Originally published as ‘Homing and unhoming: taxonomies of living’ on Chiragh Dilli, a blog that explores, discovers and suggests ways of seeing the city, steering clear of grand narratives and singular representations, while experimenting with forms of writing the city.



सरोवर जैदी यांनी तत्वज्ञान आणि सामाजिक मानववंशशास्त्रात शिक्षण पूर्ण केले आहे. त्या चिरागदिल्ली (https://chiraghdilli.wordpress.com) या ब्लॉगच्या सहसंपादक आहेत.
 
नूपूर देसाई या दिल्लीस्थित कलासमीक्षक आणि संशोधक आहेत. त्या सध्या एशिया आर्ट अर्काइव ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.

2 comments on “घरपण आणि बेघरपण: जगण्याचे छेद-भेद: सरोवर जैदी

  1. Meenal Jagtap

    खूप छान लेख!! घर आणि घरपण या दोन्हींना साधताना मनाची एक तात्विक,सामाजिक आणि आधुनिक अवस्था अगदी व्यवस्थित मांडली आहे.घरपण साकारताना माझा मनाचा एक कोपरा तयार करताना खरच आपण इतके गुंतून जातो..पण हे अत्यंत मानवीय आहे..लेख वाचताना मनाचा असा पक्का विचारबंध अनुभवत असतो.thanks सरोवर जैदी आणि नुपूर.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *