संतोष वसंत गुजर

सावळे

back

स्टेशनमधून बाहेर पडल्यावर रस्ता क्रॉस करून सावळे ज्या बोळात शिरतो-घरी पोचण्यासाठी शॉर्टकट म्हणून-त्या अरुंद बोळाच्या दोन्ही बाजूला एकेक हाऊसिंग सोसायटी आहे. तिथून त्याचं घर पंधरावीस मिनिटांवर आहे चालत. बरेच लोक तिकडून ये-जा करतात.

हल्ली तिथेही काही लोक कचऱ्याच्या पिशव्या टाकू लागलेत..सोसायटीवाले कम्प्लेंट करतात. पालिकेचे सफाई कामगार येऊन ते उचलतात-बोळ साफ करतात.

मोजून सहा फुटांचा तो बोळ. त्यात एका बाजूला हा कचरा. बेकार घाण वास जातो नाकातोंडात. लोक नाक मुठीत धरून, रूमाल तोंडाला बांधून जातात-पण जातात इथूनच.

त्यांनी का म्हणून जाणं सोडावं?

कचरा अचानक कसा यायला लागला उघड्यावर याचा विचार होणं गरजेचंय.

स्वच्छतेसाठी कचऱ्याचा निचरा होण्याची गरजंय आणि निचरा होण्यासाठी कुंड्यांची.

 –सावळेला वाटतं.

***

रात्रीचं जेवण झाल्यानंतर सावळे खुर्चीवर बसला.

दहा मिनिटं गेली. विचारांत.

कचरा बायकोमध्ये घुसली.

सावळे दचकला.

नेताय ना?’ तिने ओठ वाकवले. त्याला वाटलं हसतेय.

त्याचं तोंड कडू झालं.

कडूपणात अजून दहा मिनिटं गेली.

बायको उभीच होती हातात पॉलिथीनची काळी पिशवी घेऊन. त्याने घेतली. बाहेर पडला.

जिन्यावरून खाली उतरला. बिल्डींगच्या गेटपाशी आला.

सिंग त्याच्या रो-हाऊससमोर उभा होता स्वत:च्या कारला बोचा टेकवून. त्याच्या कारवर मोठ्या अक्षरांत लिहिलंय–

SINGH  IS  KING.

नेहमी असतो तो ह्या टायमाला.

सावळेने बघणं टाळलं. सरळ हातातली पिशवी स्थिर ठेवत निघून गेला. कचराकुंडीच्या दिशेने-बस डेपोजवळ कुठेतरी. सिंगने टॅबमधून डोकं बाहेर काढून त्याच्याकडे न पाहिल्यासारखं केलं.

इथे सिंग मनातल्या मनात हसल्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिंग कोण आहे?

त्याच्या बंगल्याचं(?) नाव ‘SINGH’S PARADISE’ असं आहे .

सिंग इथल्या सोसायटीचा अध्यक्षंय. इथल्या दहा-वीस रो-हाऊसवाल्यांनी मिळून त्याला निवडलं.

(ज्यांना रो-हाऊस आणि बंगलो यातला फरक कळत नाही.)

सगळेच एकापेक्षा एक. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आर्किटेक्ट, बिजनेसमन आणि एकजण मंदिरवाला ज्याचं हॉटेलपण आहे-कोपऱ्यावरचं मंदीर त्याचं स्वत:चं. खाली मंदीर, वर तो.

सिंग घरातल्या घरात काहीतरी करतो, त्याचबरोबर एजंटगिरी करतो रिअल-इस्टेटची.

तो ‘Singh is Everything’ असल्याप्रमाणे वावरतो.

टाइट स्पोर्ट्स शॉर्टस् आणि टी-शर्ट मध्ये उभा होता तो. पायांत चप्पल. त्याचे बायसेप्स एखाद्याची मान सहज मुरगळू शकतात.

त्या चड्डीमध्ये त्याच्या बोच्यांचा आकार स्पष्ट आणि मधला भाग जास्त उठून दिसतो.

खरंतर त्यामुळे सिंगची पर्सनॅलिटीच उठून दिसते!  असं सावळेला बऱ्याचदा वाटतं.

काही वर्षांपूर्वी सावळेही साधारण अशाच वेषात बँकेत गेला होता तेव्हा बँकेच्या सुरक्षारक्षकाने हाकललं होतं त्याला—हे आठवून त्याला राग राग आला. त्यानंतर तो कधीच बँकेत हाफ चड्डीत गेला नाही. आताही त्याने फुलपॅंट घातलीय.

तेव्हा ही फॅशन नव्हती!

असलं कळायला सावळेला थोडा उशीर लागतो.

सिंग वयाने सावळेपेक्षा आठ-दहा वर्षांनी मोठाच असेल पण डोक्यावर अजूनही काळे घनदाट केसयत.

काही काही लोकांना सगळंच कसं काय मिळतं?

जाताना सावळेने आपल्या उरलेल्या केसांवरून हात फिरवला.

इथे सिंगची नजर सावळेच्या बिल्डींगीवरून फिरली.

सावळेची बिल्डींग.

‘वन-रूम-किचन’वाली.

बांधा-सडपातळ.

रंग-उतरलेला.

वय-जुनी.

उंची-तीन मजली.

खूण-खिडकीच्या ग्रीलवर लटकवलेली सावळेची चड्डी आणि बनियान.

एकेका मजल्यावर एकेक वन-रूम-किचन.

बस!–आणि कॉमन जिना.

ना बाल्कनी-ना गॅलरी-कोणतंच प्रोजेक्शन नसलेली-एखाद्या ‘फ्लॅट’ मुलीसारखी. सरळसोट.

हा ‘तीन मजली टॉवर’सोसायटीत मस्करीचा विषयंय-नकोसा.

तळ मजलेवाल्याला गावाची ओढ लागलेली असते सतत.

त्याच्या घराला सणासुदीलापण तोरणं कमी टाळा जास्त लागतो.

पहिल्या मजलेवाला भाडेकरू आहे. त्याच्या चेहऱ्यावर लिहिलेलंय-‘आम्ही काय बोलणार ना?!’

आणि शेवटी उरतो सावळे.

एकट्या माणसाची सोसायटी होत नाही.

आपण सोसायटीला फाट्यावर मारतो’, असं सावळेला वाटतं.

त्याचं सोसायटीतल्या लोकांशी जमत नाही. कारण त्याला लोकांशी बोलायलाच जमत नाही.

ह्या सगळ्यांकडेच दोन-तीन कार्स आणि प्रचंड पैसा आहे..एक कार गॅरेजमध्ये आणि दोन कार्स बाहेर कॉमन जागेत लावलेल्या असतात. गाड्या धुताना चिखल होतो. कचरा तसाच साचून राहतो.

ते सगळं चालतं.

ह्यांचे कुत्रे हगून ठेवतात-भुंकतात.

ते सगळं चालतं.

हॉर्न वाजवून एकमेकांना बोलवतात यांची जवान मुलंमुली, टेरेसवर पार्ट्या करतात मोठ्या आवाजात.

या लोकांच्या घरात वर्षंभर काहीना काही ‘ठाकठाक’ सुरू असते इंटीरिअरची दिवस रात्र.

त्याचं क्काय?

आणि एकदा काय सावळेच्या कामाचा जरा आवाज आला,त्या डॉक्टरची दुपारची झोप उडाली म्हणाला तो!–काय तनतनत बाहेर आला होता तेव्हा! सावळे चिडला–

याचं असं आहे कीतू मेरी धो मै तेरी धोता हूं!!

आमची जवळची कचराकुंडी हलवली म्युनिसीपालटीला सांगून कारण कुत्रे आणि घुशी होतात. रात्री बेरात्री ओरडता कुत्रेकिंवा मुलांना चावतीलही..‘ It’s dangerous and unhealthy, you know!’..वासही मारतो आणि हो

मंदीर के बाजूमें ऐसा कुछ शोभा नही देता! ‘

Where will our kids play? There is no space!

पण खेळण्यासाठी तरी मोकळी जागा कुठे ठेवलीय ह्या लोकांनी? गाड्यांसाठी जागा नको?..आणि हे गाडीगाडी काय्ये प्रत्येकवेळी ? ती तर चुतीयापण घेतो..आजकाल ती मोठी गोष्ट राहिली नाहीयमीही

 अचानक थंडी भरून आल्यासारखं करतो सावळे ह्या विचाराने..

एकदम भीती आणि लाज वाटते श्रीमंत होण्याची. त्याच्या गरीब विचारांचं काय?

त्याला टेन्शन येतं. कारण मग त्यालापण बदलावं लागणार.तो मुळातच ‘तसा’नाहीय. मग बदलायचं म्हणजे अचानक चार हात आणि दोन डोकी आल्यासारखंय..

..रिस्पॉन्सिबिलीटी वाढेल..प्रॉब्लेम होऊ शकतो!

सावळे डाव्या हातातला कचरा उजव्या हातात घेतो.

पिशवी चांगलीच भरलेलीय. हात दुखतोय की!

सगळे एकमेकांशी वरूनवरून बोलतात. तर आपणही त्यांच्याशी वरूनवरून बोलायचं.

deep मध्ये कशाला शिरायचं?

 (आता इथे, वाक्यांत एक तरी इंग्लिश शब्द घुसवणे-हा गुण त्याने आईकडून घेतलाय बहुतेक. त्याची आई गावच्या इंग्लिश शाळेत शिपाई आहे. तिला पोराकडून इंग्लिशविषयी फार अपेक्षा होत्या!)

वरूनवरून बोलणंच खरंतर खरं असतं आणि तेच निरोगी असतं संबंध टिकवण्यासाठी.

विचारांत पॉज घेतला सावळेने आणि एकदम भडकून-

..भेंडी, यांची लायकी तरी आहे का माझं आयुष्य आणि विचार समजून घेण्याची?

 ???..माहीत नाही असा का बोंबलला मध्येच, ‘आयुष्य आणि विचार?’

 ***

 चालता चालता आई सावळेच्या डोक्यात आली.

यम फोर म्यांगो म्यांगो मंजे आंबा..आंबा मंजे म्यांगो!’..त्याला आठवलं. हसू आलं आईचं.

ती ह्या वेळेला किचनमध्ये झोपल्याचं सोंग आणत पडली असेल. तिला टीव्ही-बीव्ही लागत नाही. टीव्हीवरच्या बायकांशी तिचं जास्त पटत नाही. देवा-धर्माशीपण संबंध मोजका..म्हणजे गरजेपुरता.

तिला येऊन दहा-बारा दिवस झालेत. ती असं मध्येमध्ये येत असते.

ती का आलीय गावावरून हे मला चांगलं माहितीय!

आपल्या लेकानेगोड बातमीका नाही दिलीय अजून लग्नाला पाच वर्षं होत आली तरी, हे शोधून काढण्यासाठी!

 पोरं काढण्यासाठी पाच वर्षं लागतात का??..मिंटांचं काम!’— तिच्या चेहऱ्यावर त्याला हे प्रश्न स्पष्ट दिसतात. रात्री लेकसून दोघे ‘लिव्हिंग रूम’मध्ये असताना ही किचनमध्ये कानांत कापसाचे बोळे घालून झोपण्याची अॅक्टिंग करते. किचनचा पडदा सारून.यं दा काहीही करून झालंच पाहिजे असा इरादा पक्का करून ती ठाण मांडून बसलीय.

आता आईसमोर सावळे बायकोबरोबर करणारंय का? तो मुळातच ‘तसा’नाहीय ना? हिचं आपलं काहीतरीच!

पण बिचारी तीपण काय करणार? तिला गावी लोकांकडून प्रेशर येतंय ना!

तिच्या डोक्यात येतं-

मी काय इतकी गावंढळ नायीय. मलापन कळतंय सगळं.मी बघतेय रोज. दोघं सकाळी लौकर उठून कामावर जातात. कधी तो उशिरा येतो. कधी ती उशिरा येते. थकलेले असतात. कधी करनार?..अन् ट्रेनची ती गर्दी..बाई बाई..एकदाच गेले होते महालक्ष्मीला..नकोच ती! सगळा जोरच संपत असेल अंगातला, कसं करनार?..दोघं करतच नायीत की काय?? ’ ती डोकं नकारार्थी हलवते.

असं कसं? शहरात बाकीच्यांना पोरं होतात ती?!

परमेश्वर ग्रेटाय! त्याने मानसाला जन्म दिला कारन गुरांपेक्षा मोठा त्याला कुनीतरी हवा होता. गुरांसार्खंच जगायचं असतं तर हा जन्मच का घ्या?? दुस्रं हे की मानसाने मानुस वाढवायला हवाचते कामच नायी का आपलं??..प्रॉबलेम कुठाय?

तरी सूनबाईला सांगून झालंय माझं. पुर्ष्यांना आक्कल नसते..लेडिजलाच मागे लागावं लागतं. माझं प्रिषर घेऊ नको..पन वय निघून गेलं की बसाल रडत..तुमचं काय ते प्लानिंगबिनिंगए का??..की मी आल्यावर लाजता तुम्ही?..काहीच होताना दिसत नायीए म्हनून येते मी..कायमची थोडीच येते!

मी काय दुस्र्यामद्रीनलॉसारखीय? मला नाय आवडत लेकाच्या संसारात ढवळाढवळ करायला! येते मी कधी कधी..दुस्रं हाय कोन?..हा एकटाच!..बाप लौकर गेला ह्याचा!..

हे बघ, देव जेव्हा देतो ना तेव्हा गरीबासारखं घ्यायचं, एकदा त्याचा मूड गेला..की मग तुम्ही कायपन करून उप्योग नायी!..त्याच्यावर प्रिषर टाक..तुला कळत कसं नायी? माझ्यावर खूप प्रिषर आलंय गं आता!!’

रस्त्यातला रोजचा कुत्रा सावळेवर गळा काढून भुंकला; आई डोक्यातून गायब झाली.

त्याची कानशीलं गरम झाली..पाठीच्या मणक्यात बर्फ विरघळला..शरीरात थरथर झाली.

हा मादरचोद नेहमी का भुंकतो माझ्यावर?

 कुत्र्याकडे न बघता कचराकुंडीच्या दिशेने तो झपझप चालू लागला हिंमत एकवटून. वातावरण निवळलंय असं वाटून त्याने उगाच मागे पाहिलं..तर कुत्रा बरोबर त्याच्या पायांशी येऊन थांबला होता.

कुत्रा त्याला हुंगला-हूल देऊन गेला, स्वतःच्या जागेवर बसला.

(बरंय फुल पँट घातलीय!)

पिशवी टाकून सावळे घरी परतला, दुसऱ्या रस्त्याने.

***

दुपारी लंच-टायमला सपाटेने विषय काढला. ऑफिस कॉम्प्लेक्सच्या बाहेर टपरीवर दोघे उभे होते. सावळेच्या हातात चहा, सपाटेच्या हातात सिगरेट आणि चहा.

सपाटे धुरात बोलला, ‘तुझ्या कचऱ्याचं काय झालं? प्रॉब्लम सॉल्व झाला कचराकुंडीचा?’

सावळे चहा थंड होण्याची वाट बघत,‘नाही.’

‘का रे ?’

‘कुणालाच त्यांच्या सोसायटीजवळ-रस्त्यावर कचराकुंडी नकोय.’

‘मग कुठे, घरात हवीय?’

‘हो. पण दुसऱ्याच्या.’

‘मग तू कुठे टाकतोस?’

‘कचराकुंडीत. एकच उरलीय-आमच्या बस डेपोजवळ. पालिकेच्या डोक्यात काय आलं अचानक माहीत नाही..कुंड्या गायब करून पाट्या लावल्या ‘येथे कचरा टाकू नये..हजार रुपये दंड!’ आणि त्या जागी ज्येष्ठ नागरिक कट्टा वगैरे बनवत बसलीय-दोन सिमेंटचे बाकडे आणि तीन झाडाच्या कुंड्या लावल्या की झालं यांचं काम!’

‘म्हंजे कचऱ्याची जागा म्हाताऱ्यांनी घेतली?’

सावळे हसत, ‘आणि देवांनी!’

‘ती घंटागाडी येत नाय काय?’

‘येते ना..लोकांना घंटा दाखवण्यासाठी!..दोनतीनदा तर सकाळीसकाळी संडासला जाता जाता तिच्या मागे धावत जावं लागलं मला..असं टायमिंगय! तेव्हापासून नाद सोडला.’ 

‘तू पालिकेला पत्र का नाही लिहित? पेपरात छापून आण-नायतर एक काम कर कचऱ्याची पिशवीच ठेव ना त्यांच्या टेबलावर! काय बोलतोस?’

‘दोन्ही नाही जमणार’

‘माहित्ये मला! मुल्ला की दौड मस्जिद तक..’

‘हे मस्जिद पाडून मंदीर बांधण्यापेक्षाही किचकटए!’

‘एकदम हे काय?,’ सपाटे त्याला चावत म्हणाला, ‘काँट्रव्हर्शीयल स्टेटमेंट करू नकोस बाबा!’

‘तसं नाही रे, मला म्हणायचं होतं की आमच्याकडे ‘Garbage Collection and Transportation System’ची लागलीय. कॉन्ट्रॅक्टर आणि पालिकेच्या झोलमुळे अाख्ख्या एरियाचं डम्पिंग ग्राउंड झालंय!..दोन वर्षं झाली ही नाटकं सुरू होऊन..’

सपाटेने आपल्याकडे लक्ष न देता अजून एक कटींग घेतलेली पाहून सावळे बोलताबोलता राहिला.

खरंतर त्याला अजून एक्सप्लेनेशन द्यायचं होतं पण त्याने पॉज घेतला.

‘पालिकेला रस्त्यावर कचरा टाकलेला चालतो!..’ आवाजात शक्य तितका शहाणपणा आणत सावळे बोलला.

‘हे रस्त्यावर घाण करणं तर आपल्या लोकांच्या रक्तातचंए,’ सपाटेने पारंपारिकता जपली.

‘मी नाही करत. मी कधीच कुठेही कचरा नाही टाकत..अगदी बस-रेल्वेचं तिकीट, चॉकलेटचं रॅपर.. डस्टबिन नाही दिसलं तर घरी घेऊन जातो..’

‘..आणि घरी कचरा करतो!’,सपाटेला वाटलं जोक मारला.

‘बायकोसारखं बोल्लास.’

‘हां, अरे तिला काय वाटतं? काय बोल्ते?’

‘आमचे खटके उडतात..म्हणजे टाकण्याचं काम माझचंय..पण रोजरोज कंटाळा येतो..मग कधी कधी राहतो पडून..ते काय जवळंय!? काय करायचं बोल?’

‘बाकीचे लोक काय करतात?’

‘आमच्याकडे सगळे रिच लोक राहतात ना! नोकर जातात घंटागाडीच्या मागे..हल्ली तर ते घंटा गाडीतले सफाईवालेच ह्या लोकांचा कचरा उचलून नेतात..एकदम टायमावर..‘टिप’मिळते ना! गॅलरीतून नोटा फेकतात!’

‘मग तू पण दे ना यार!’

‘त्यांना पगार मिळत नाही का?’

धूर सोडत सपाटे म्हणाला, ‘कचऱ्यासारख्या फालतू गोष्टीचा इतका विचार करावा लागतो.. चुतीयागिरीए ना ?’

थंड चहा पित सावळे म्हणाला, ‘फालतू गोष्ट? मला सांग, कचराकुंडी ही आपली नैसर्गिक किंवा..मूलभूत गरज नाहीय का?’

हे ऐकून सपाटेला आत्ताच घेतलेला चहाचा ग्लास एका झटक्यात खाली करावासा वाटला.

इतक्यात समीर येताना दिसला. समीरला बघून सावळे आतून उदास झाला. समीरने थांबू नये असं त्याला वाटलं पण समीरला कमी खाज नाहीय.

‘काय टकल्या कसायंस?’ समीरने टपली मारली सावळेला. हे अपेक्षित होतं.

सावळेने गुदमरत स्मित केलं.

‘काय रे, कुठे होतास इतके दिवस?’ सपाटे.

‘जरा गडबडीत होतो..’

‘लग्न केलंस असं ऐकलं, बोलावलं नाहीस!’

‘कोर्टात केलं!’

‘आलो असतो ना, त्यात काय?’

‘भोसडीच्या बोलवलं तर तू हनिमूनलापण येशील!’

सपाटेने हसत विचारलं, ‘का, कुठे जाणारेस?’

समीरला तर हे आयतं कारण मिळालं फालतूगिरी करण्याचं,

‘गेट-वे-ऑफ इंडियाला!! तिथे एखाद्या लाँचवर जायचा विचारंय.’

‘का रे, बोटीवर का?’  सपाटेने उत्साह वाढवला.

‘परिंदा पाहिला पर्वा मी!..अनिल कपूर आणि माधुरीचा तो बोटीमधला सेक्ससीन जाम आवडला मला!’

सावळेला काहीतरी आठवलं तो पट्कन म्हणाला,

‘पण त्यात तर नाना पाटेकर दोघांना शूट करतो ना ?!’

समीरने पाहिलं सावळेला..समीरला त्याची दया आली,

‘अनिल घुसवतो आणि माधुरीचा आवाज निघतो ना..तिथपर्यंत बोलतोय मी! नाना गोळ्या घुसवण्याअगोदरपर्यंतचं!..आपल्या कामाचं असतं ना तेवढंच घ्यायचं! समजलं? टकल्या!’

 सपाटेला सावळे दुखावल्याचं समजत.तो विषय बदलण्याचा प्रयत्न करतो,

‘ काय मग, बायकोने उखाणा घेतला की नाय? ऐकव ना तुझ्या स्टाईलमध्ये!’

‘अरे व्वा, लग्न मी केलंय लाडात तू आलायस!’

‘काय भाव खातो रे !’

‘बायकोने नाय घेतला, मी घेतला!’

‘मग घे ना!!’ 

समीरने उखाणा घेतला,

‘नरम नरम बोचा माझा नरम नरम गादी, मी एक नंबरचा चमडी माझी कविता साधी!’

दोघे प्रचंड हसले. सावळे शांत होता.

एवढं बोलून तो जायला निघाला, जाताना सवयीप्रमाणे त्याने सावळेला टारगेट केला.

‘..चल निकलता हूं गोटी ’, समीरला एकदम लक्षात आलं..

‘अरे, हेपण मॅच झालं!!

..नरम नरम बोचा माझा नरम नरम गादी, मी एक नंबरचा चमडी माझी कविता साधी!..चल निकलता हूं गोटी!!..’

समीर सपाटून हसला.

सपाटेने कंट्रोल केलं.

सावळे काय बोलणार?

समीर ढेंगा टाकत निघून गेला.

‘मादरचोदए साला.’  सपाटेने मत टाकलं.

सावळे भलत्याच विचारांत दिसला, सपाटेने विचारलं तेव्हा म्हणाला,

‘कोर्टात लग्न केलं? कोर्टात तर घटस्फोट घेतात ना?’

सपाटेने सावळेला समजावलं, ‘तुझा सेन्स ऑफ ह्युमर खूप खराबंए!’

 दोघे ऑफिस कॉम्प्लेक्समध्ये शिरले.

 ***

‘..संतोष शर्मा अब एक कविता हमारे सामने पढना चाहते है..

इस मौके पर..आईये शर्माजी आईये..’

माईकवर एकाने अनाऊन्समेंट केली. ऑफिस कॉम्प्लेक्सच्या गार्डनमध्ये काही लोक जमले होते. काही जण उभे, काही बसलेले.त्यांच्या हातात वडा पाव, खाली जमिनीवर झाडू, मास्क आणि बादल्या. जवळपासचा परिसर स्वच्छ करून आलेले आहेत असं दिसत होतं.

सावळेचं-सपाटेचं लक्ष गेलं. ते जास्त जवळ गेले.

शर्मा कविता गाऊ लागला-

‘आओ भाई ss..ss

करे सफाई ss..ss

नही तो किस काम की पढाई? लिखाई?

घर के अंदर घर के बाहर

दिल के अंदर दिल के बाहर

हाथ में लेलो झाडू भाई..चलो करे सफाई ss..ss ’

लोकांना वाटलं संपली कविता, त्यांनी टाळ्या वाजवायला सुरू केलं. अनाऊन्सर माईक घेऊ लागला, तेव्हा शर्माने इशाऱ्याने थांबवलं. अतिउत्साहात पुढल्या ओळी त्याच्या गळयातून फुटल्या..

‘यह बात पहले जिसके दिल में आई..

यह बात पहले जिसने है अपनाई..

हे सगळं साभिनय चालू होतं..

‘यह बात पहले जिसने है बतलाई..

यह बात पहले किसके दिल में आई..??

हमारे सर देसाई!हमारे सर देसाई!!हमारे सर देसाई!!!

चलो करे सफाई ss..ss’

‘सर देसाई’ बाजूलाच उभे होते. त्यांनी शर्माला इंस्टंट आलिंगन दिलं.

संतोष शर्मा गहिवरला. कामगारांनी टाळ्या पिटल्या-बत्तीशी काढली.

‘हे काय सुरुंय रे? कोणएत हे’ सावळेचा प्रश्न.

‘बिल्डींग मॅनजमेंटवाले दिसतायत..स्वच्छता अभिनय सप्ताह सुरूंय ना!’

‘स्वच्छता अभियान!’ सावळे चूक सुधारत म्हणाला.

‘अभियान आणि अभिनय मध्ये फरकाय?’

दोघे चालू लागले.

लिफ्टमध्ये घुसता घुसता सपाटेच्या तोंडून सहज निघालं..संतोष शर्माला आठवून स्मित करत तो बोलला-

‘गोटी होण्यासाठी लोक काहीही करतात ना..?’

सावळेने अविश्वासाने पाहिलं.

सपाटेला ‘लक्षात’ आलं. हे काय झालं?

दोघांनी एकमेकांकडे बघितलं नाही.

लिफ्टमध्ये भूतकाळ शिरला आणि शांतता पसरली.

***

सेकंड सॅटरडे आहे.

आज आई निघणारंय. तिची शाळाय.

सकाळी सकाळी सावळे खिडकीतून खाली बघत होता. त्याला दिसलं की सिंगचा नोकर कचऱ्याची पिशवी त्याच्या बिल्डिंगीच्या गेटपाशी ठेवून चोर पावलाने निघतोय. सावळे वरूनच ओरडला,

‘ए थांब! थांब, रूक! तुझ्या..’ आणि धावत जिन्यावरून खाली उतरला.

नोकर सिंगच्या घरात घुसणार इतक्यात सावळेने त्याची मानगूट धरली.

‘ह्या अगोदरपण तूच कचरा ठेवलेलास ना?’ 

नवऱ्याला धावत जाताना बघून बायकोपण धावली. सुनेला धावलेलं बघून आईही खाली आली.

सिंग डरकाळतच बाहेर आला, ‘क्या हुआ रे?? Who is shouting??’

त्याच्या आवाजाने सोसायटीतले प्रतिष्ठित लोकही आपापल्या तिजोरीतून बाहेर आले.

एका बाजूला सावळे, सावळेची बायको आणि आई.

दुसऱ्या बाजूला सिंग, सिंगची चिकणी बायको, सिंगचा नोकर आणि सोसायटी.

मधल्या मध्ये कचऱ्याची पिशवी सावळेच्या गेटजवळ.

सावळेने आतली थरथर बाहेर न दाखवता आवाज काढला,

‘क्या हुआ-क्या-क्या हुआ? अपने नोकर से पुछो!’

सिंग कडकपणा राखत म्हणाला,

‘MMMMMMMMind your tongue! वो नोकर नही है ! He is one of the members of our family!’

‘तो अपने मेंबरसे ही पुछो!!’

‘उसको क्यो पुछू? चिल्लाया कौन? तू कि वो?’

‘उसने यहां कचरा डाला..मेरे गेट के इधर, वो देखो!’

‘तो क्या हुंआ?’

‘तो क्या हुंआ? वो क्या कचराकुंडी है क्या? हम लोग रहते वहा!’

‘रहो ना, कोई निकाल रहा है तुझे?’

‘क्यू आपको निकालना है मुझे? है हिम्मत?’

‘मै कौन होता हू तुझे निकालने वाला?!’ सिंग छद्मीपणे हसला.

सावळेची बायको मध्ये पडली,

‘वो आप को इज्जत दे रे और आप तू-तू कर रे ?’

‘वो इज्जत दे के क्या फायदा-भाभीजी ?’..सिंग आणि त्याची ‘दुसरी बाजू’ हसले.

पट्कन सावरत सिंग म्हणाला, ‘What is your problem mister? कचरा या इज्जत ?’

मग लगेच नोकराकडे वळला,

‘ बोला था ना तुम्हे मैने, दूर फेंक के आना?

‘..अब घंटागाडी तीन दिन से आई नही है..तो क्या करे बोलो?’,  हे वाक्य तो सावळे सोडून बाकी सगळ्यांना बोलला. त्यांनीही होकार दिला.

नोकर पुटपुटला, ‘हाथ से थैली गिर गई साब! आई शप्पथ!’

सावळे उसळत, ‘कितनी बार?’

सिंगही उसळला, ‘Don’t talk rubbish! Are we not educated enough? हम लोग कभी ऐसा नही करते’

सावळेची बायको पुढे येत, ‘फिर क्या हम लोग झूट बोलरे है?’

सिंग छाती दाखवत म्हणाला,

‘Why is she interfering when two men are talking? Is my wife saying anything to you?’

सिंगच्या बायकोने गॅलरीतून जांभई दिली.

सावळेने आपल्या बायकोचा हात पकडत खेचली तिला मागे, तेव्हा बायकोला ‘तीच थंड थरथर’ जाणवली सावळेच्या स्पर्शात, जी सेक्स करताना असते त्याच्या शरीरात. तिला किळस येते.

नवरा थरथर लपवण्याचा प्रयत्न करतोय.

तिला राहवलं नाही, ती वर निघून आली.

आई सावळेवर खेकसली, ‘तिला का पाठवलंस? तो आपली लायकी काढतोय!!’

सावळे भडकला, ‘तू जा वर!’

आईला वाईट वाटलं. तरीही तिथेच उभी राहिली.

सिंग आईकडे बघून, ‘लायक वर्ड एक बार भी युज नही किया है मैने माॅंंजी..एक बार भी नही’

दुसऱ्या बाजूला असलेला डॉक्टर सिंगला शांत राहण्याचा सल्ला देत म्हणाला,

‘Let it go Singh saab! You know how  these people  are! Everytime they will come up  with something. You know what happened last time!’

वकील म्हणाला, ‘Don’t entertain him !’

डॉक्टर परत, ‘Really, we can’t spoil our whole day because of him!’

सिंग,‘ it has.. सुबे सुबे शुरू किया इसने! No manners at all!’

सावळे सिंगच्या अंगावर जात म्हणाला, ‘किसको नही है manners? क्या बोलता है रे तू?’

सावळेच्या ह्या आक्रमणाने सिंगला हसू फुटलं, जसं डेविडला बघून गोलीएथला.

सावळेकडे दगड नव्हता फेकायला. त्याचा राग अनावर होत होता. त्याने गेटजवळची कचऱ्याची पिशवी उचलली आणि भिरकावली सिंगच्या अंगावर. सिंग मागे सरकला आणि धावत आला ओरडत,

‘Are you threatening me??’

त्याला नोकराने आणि वकिलाने धरला. सिंगचा थयथयाट झाला. आई घाबरली. सिंगची बायको आळसावत म्हणाली,

‘Come inside honey! Don’t touch him!’

वकिल बडबडत होता, ‘जाने दो-जाने दो सिंगसाब..We will lodge a complaint against him!’

मंदिरवाला हातातलं पूजेचं ताट सांभाळत बोलला,

‘मंदिर बनाते वक्त भी ऐसे ही किया था इसने! मुझे अभी भी याद है! ध्यान मत दो!’

डॉक्टर सबुरीने, ‘ Yeah he is right, ignore him!’

सिंग खुश होत म्हणाला,

‘I have always IGNORED him doctor saab, पर वो ही हमारे ‘बीच’ मै है! ’

डॉक्टर हसला,, ‘Really, that’s a real problem! ‘

आणि सगळे त्यांच्या त्यांच्या तिजोऱ्यांमध्ये शिरतात अचानक गायब झाल्याप्रमाणे…आई वर येते.

सावळे एकटाच उभाय लँपपोस्टजवळ. आसपास गाड्या…कोणीतरी आपली चड्डी काढतंय हळूहळू असं वाटलं त्याला.

तो त्याच्या बिल्डिंगीकडे बघतो.

सावळेची बिल्डींग आणि पर्यायाने सावळे म्हणजे:दुधात माशी,

                                       चंद्रावर डाग,

                                       कबाब में हड्डी.                                    

ही सोसायटी आपल्याला कचरा समजते का?’

त्याने वाळीत टाकल्यासारखं पाहिलं स्वतःकडे.

इज्जतीचा कचरा झाला!

 ***

आई निघण्याची तयारी करतेय.

तिच्या उलटसुलट हालचालींमधून तिचे विचार डोकावतायत.

दहा पंधरा मिनिटं झाली होती. एक शब्दही बोलला गेला नव्हता.

‘मला हे आवडलं नायीय, मी आलीच का?’ आई खुर्चीवर एखाद्या सरपंचाप्रमाणे बसली.

सावळेची बायको चेहऱ्यावर काहीच न आणण्याचा प्रयत्न करत होती आणि सावळे आईने आता लौकरात लौकर जावंह्या विचारात होता. नाहीतर ती काहीही बरळू शकते.

‘तुमच्या लग्नाच्या अॅनिव्हर्सिटीला येईन आता..पुढच्या महिन्यातए ना? तो पर्यंत बघा..काही करा..समजलं? कानात कापसाचे बोळे हौस म्हनून नाय घालत मी!’

असं बोलून ती खुर्चीवरून उठली, कापसाचे बोळे सुनेच्या हातात दिले.

अॅनिव्हर्सिटीला??

दोघे काहीच बोलले नाहीत.

‘कचरा घरात ठेवल्याने..प्रगती होत नाही..लक्ष्मी येत नाही..कचऱ्यावरून भांडू नका दोघे..झाडू मारत जा..तो मानुस तुझ्याशी असं का भांडला..कारन तू इथल्या लोकांसारखा राहत नायीस..त्यांच्या स्टॅटसकडे बघ..लाईफ स्टाईल ‘तशी’ ठेवत नायीस तू!’

हे ऐकून बायकोला मनातून हायसं वाटलं! दोघींनी एकमेकींना समाधानाने बघितलं.

सावळे अस्वस्थ होत मध्ये पडला,

‘मी आधीपासून इथंय..ते लोक नंतर आलेत! चल लौकर, एसटीचा टाइम झाला!’

आई शांत झाली पण तिचा ऊर भरून आला.

आपल्या लेकाकडे एकदम पाणावल्या डोळ्यांनी बघत म्हणाली,

‘ तू इंग्लिशमध्ये भांडायला हवं होतंस!’

***

सावळे आईला पोचवून आला. बसला खुर्चीवर.

येताना त्याला ‘टेस्ट ट्युब बेबी अॅँड फर्टीलिटी सेंटर’चा बोर्ड दिसला होता जो बघून तो अजून अस्वस्थ झाला. नको ते विचार त्याला शिवले.

श्वास घेतल्यानंतर त्याचं लक्ष डस्टबिनकडे गेलं, सहज.

तेव्हा डस्टबिनमधून बाहेर आलेला बायकोच्या केसांचा गुंता रूमच्या एका कोपऱ्यात जाऊन पडला.

फॅनच्या तालावर गोल गोल फिरू लागला.

सावळे ते बघून चिडू लागला.

उठून त्याने फॅन बंद केला आणि गुंता उचलून बायकोजवळ गेला.

तीपण आतमध्ये गोल गोल फिरताना दिसली.

ही काय करतेय?

मिक्सरवरचं एक बारीकसं झुरळ तिच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करत होतं, ती झटकत फिरत होती.

तो जवळ गेला, तिला म्हणाला, ‘घरात केसच केस असतात.’

‘कुणाचे?’ झुरळ झाडत तिने विचारलं.

सावळेला उत्तर आवडलं नाही. तो म्हणाला, ‘मला चिडवलेलं चालत नाही.’

‘तुमचे गळतायत म्हणून विचारलं.’

‘बस!..!’

ती अचानक चिडली, ‘मी पण टक्कल करू का आता?’

‘काढलीस लायकी माझी? मजा येते तुला खूप?’

ती शांतपणे वळून म्हणाली, ‘टाका ना पिशवीत. मी नाही लावणार हात आता..’

ती मिक्सर पुन्हा चालू करते. सावळे वैतागतो.

कसं वागतेय, टाकून बोलतेय..ही शेफारलीय.

सगळी चूक माझीचंय का?

हिची दोन अबोर्शनं मी काय मुद्दामून केली? कसाईए मी? मला नाही वाटत बाप व्हावंसं?

लग्नानंतर लगेच गरोदर राहिली..मी सांगितलं अबोर्शन कर, आपल्याला इतक्यात हे परवडणार नाही..

खरंच नसतं परवडलं! लोनचे हप्ते आणि बाकीचा खर्च..कसं मॅनेज होणार एकट्याने? इथंवर कसा आलोय हे माझं मलाच माहीत.

तर ही रडत बसली. सांगितलं तिलामी सध्या बाप होण्याच्या कंडीशनमध्ये नाहीय. नंतर बघू.’

दुसऱ्या वर्षी पुन्हा तेच घडलं! अगदी खुशीत येऊन सांगितलं मला कानांत, रोमँटीक वाटलं तिला!..माझं डोकंच आऊट झालं.

म्हटलं, ‘कसं शक्यंय?? तू गोळ्या घेत होतीस ना?..शांत राहिली. मी समजलो.

हातच उठला माझा..ती खाली पडली. खुर्चीचा कोपरा लागला कपाळाला. रक्त यायला लागलं.

मी दुर्लक्ष केलं.

जबरदस्तीने अबोर्शन करायला लावलं हिला. वाटलं वयाने जास्त लहान असलेल्या मुलीशी लग्न करून चूक केली, मूर्ख असतात मुली!

एक तर रिसेशन सुरु होतं..लोकांच्या नोकऱ्या जात होत्या..मला टेन्शन आलं होतं, पाच लोकांना ऑफिसमधून काढलं होतं.

नुकतंच लग्न झालंय आणि हे काय सगळं सुरूंय? डोकंच चालत नव्हतं.

 मी टिकलो. बॉसची गोटी बनून राहिलो.

आजही लोक मला चिडवतात. मी चिडत नाही.

 ही त्याचा बदला घेतेय माझ्याशी आता? त्यानंतरचं तिचं वागणं, आताचं..बदललेलंय,

मी जबाबदारंय का? एकटा मीच?

 तिने जॉबला जाणं पुन्हा सुरु केलं..(हे एका अर्थी बरं झालं.)

लग्नानंतर मी जॉब करणार नाही’..लग्नाची बोलणी फायनल करण्यासाठी जेव्हा तो आईबरोबर गेला होता तेव्हा हे तिने त्याला विश्वासात घेऊन सांगितलं होतं. त्यानेचालेलम्हटलं होतं.

ते वाक्य त्याच्या कानांत पुन्हा घुमलं. त्याला कसंतरीच झालं.

त्याने तिच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघितलं.

जरा बारीक झालीय.

 आता मला हवंय मूल..वर्ष होऊन गेलं प्रयत्न करतोय..पण काय झालंय काय कळत नाही. ही तर  अशी वागते जणू मी कुठलीतरी घाणंय. जास्त काही बोलत नाही, प्रत्यक्ष चिडचिड नसते, पण..काहीतरी आहे..तिच्या डोळ्यांत असतं..दिसतं मला..

आई येण्यापूर्वीही..मी करण्याचा प्रयत्न केला..चढताच नाही आलं मला..आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं..? मला आश्चर्य वाटलं तिच्याकडे बघून..मी परत हातात धरून, हलवून ताठ करण्याचा प्रयत्न केला..परत लुळा पडला..तिची काहीच रिअॅक्शन नव्हती. मला लाज वाटत होती..ती मॅक्सी खाली करून पाय दुमडून परत कुशीवर वळली. जसं तिला मला म्हणायचं होतं, ‘तू चुतीयाएस!’

आलं मनात तिला मारावंसं..विचारावं,

तू माझंच अबोर्शन करतेयस का? सूड घेतेयस ना?’

 डॉक्टरकडे जावं लागतंय की काय या विचाराने रात्रभर झोप नाही लागत कधी कधी..ह्या अगोदरही  बऱ्याच वेळा असंच झालंय!..कदाचित हे तात्पुरतंही असेल म्हणून टाळतोय..

I hope..so..

बरं झालं आई आली.

जराशी कॉमेडीए ती.  

***

रविवारची सकाळ आणि दुपार चिडचिडीत गेले.

मी सपाटेशी आठवडाभर बोल्लो नाहीय. आपलं चुकलं.

की त्याचं?..कुणाचं?..आपल्याला किती मित्रयंत असे? किती? कुणाकुणाशी नाही बोलणार आपण?

ऑफिसच्या ‘Whatsapp’ ग्रुपमध्येपण मला ‘add’ नाही केलेलंय..माझीगरजनाहीय कुणाला?

सावळे मंदपणे हसतो. संध्याकाळ होते.

‘जेवणानंतरची रात्र’ आलीय.

तीन दिवसांचा साचलेला कचरा डस्टबिनमधून बाहेर पडत होता.

वास मारत होता. सावळेला उबग आला सगळ्या गोष्टींचा. घाण वाटली.

बायकोची आणि त्याची बाचाबाची झाली.

त्याने उचलली पिशवी, गेला डेपोजवळ तर..

रोषणाई होती सगळीकडे. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा बंद-चालू होत होत्या. भक्तिपूर्ण गाणी वाजत होती. लोकांची दर्शनासाठी लाईन लागलेली. दुसऱ्या रांगेत देवलोकांचे हलते पुतळे ठेवलेले. कसली तरी पूजा होती आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला होता!

कचराकुंडी हलवली गेली होती. बोर्ड लावला होता:

‘येथे कचरा टाकू नये. कचरा टाकणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’

आता काय करायचं? तो थोडा वेळ तिथे रेंगाळला.

महाराज आपल्या संस्कृतीच्या ऱ्हासाविषयी बोलू लागले.

ते मॅनिक्वीन्सप्रमाणे वागणारे देव बघून त्याला बरं नाही वाटलं. त्याला राहवलं नाही तिथे.

एकच गोष्ट चांगली घडली होती. ओळखीचा कुत्रा तिकडे नव्हता.

तो निघू लागला. त्याला तो बोळ आठवला स्टेशनाकडचा. पोचला तिकडे, पाहतो तर काय..इथेही अर्ध्या जागेत एक चार-पाच फुटी छोटासा कठडा बांधून त्यावर देवीदेवतांचे फोटो ठेवलेलेत. त्याला आश्चर्य वाटलं.

फ्रायडेला आलो तेव्हा नव्हतं हे काही. कधी केलं? काल?..हं..?!

त्याला हसू येत होतं पण तो हसण्याच्या मूडमध्ये नव्हता, त्याला कचरा टाकायचा होता. त्याची चिडचिड झाली. वैतागला. पिशवी घेऊन उभाच राहिला. दोनतीन पिशव्याही दिसल्या त्याला तिकडे. आधीच कुणीतरी टाकल्या असतील!

कोणते लोक खरे?  त्याला पुन्हा आश्चर्य वाटलं.

ह्या विचारांत असताना त्याला मागून कुणीतरी धरलं. मग त्याच्या पुढे दोन लोक आले. बाजूच्या सोसायटीवाले होते ते सर्वजण. सावळे काही बोलण्याच्या आत त्यांनी त्याला धुवायला सुरुवात केली.

मारताना त्यांच्या पंच लाईन्स होत्या,

‘हाच तो! लाज नसते असल्या लोकांना!’

‘घाण करायला पायजे सगळीकडे, हे शोसाठी बांधलंय आम्ही?’

त्यांनी सावळेला पुन्हा आडव्याचा उभा केला, त्याची कचऱ्याची पिशवी त्याच्यावरच ‘रिकामी’ केली आणि ठो-ठो हसले. आपला फोटोबिटो काढून पेपरांत देतायत की काय या विचाराने त्याला दरदरून घाम फुटला. दहा उठाबश्या काढायला लावून त्याला सोडला त्यांनी. 

सावळे एकटा चालतोय. त्याचे पाय अडखळतायत.

लौकर पोचायचंय पण रस्ता लांब वाटतोय.

त्याचे डोळे डबडबलेलेयत. त्याचा आवाज फुटत नाहीय. बहुतेक शेंबूड मिसळलाय. त्याने नाकातून रूमाल फिरवला. बायकोला काय सांगायचं हा विचार त्याला अजून रडवेलं करतोय. त्याला असह्य होतंय. त्याचे पाय दुखतायत.

सावळे स्वतःला ‘सिरीयस’ समजतो. ‘सिरीयस’म्हणजे समंजस. सिरीयस विचारांचा माणूस जेव्हा मार खातो तेव्हा तो हे सगळं कसं सांगतो? कसं मस्करीत घेऊन नॉर्मल होऊ शकतो?

तो कसं सांगणार की

माझी पब्लिक धुलाई झाली.

लोक मला चिडवतात. माझी गांड मारतात.

मला रडायला येतंय..मला रडायचंय..मला ओरडायचंय.

ओळखीचा कुत्रा गुरगुरत अचानक त्याच्यासमोर आला. त्याला एकटक बघू लागला. पुन्हा त्याची अवस्था तशीच झाली. त्याने त्याची थरथर आत दाबली, कुत्र्याकडे विचित्र नजरेने, अगदी डोळ्यांत डोळा घातल्याप्रमाणे, बघू लागला. काही तरी झालं..कुत्रा रडक्या आवाजात विव्हळत, गांडीत शेपूट घालून पळून गेला. 

सावळे घरी पोचला. बायकोला तो उशीरा आल्याने आश्चर्य वाटलं पण तिने विचारलं नाही.

तो गडबडीत बाथरूममध्ये गेला. आंघोळ करू लागला. शिंकरू लागला. चिकटलेली घाण घासून घासून काढू लागला.

तो स्वच्छ होऊ पाहत होता.

इतक्या वर्षांत हे पहिल्यांदा. रात्रीची आंघोळ?

तिला राहवलं नाही. तिने विचारलं.

‘पडलो,’ त्याने सांगितलं.

ती झोपायला गेली.

तोही अंथरुणात शिरला. कुस बदलली.

त्याचा डोळा लागत नव्हता. डोळ्यांसमोर तोच दिसत होता त्याला. त्याच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागलं. तो मागचे पुढचे सगळे ‘अपमान’आठवू लागला. साठवू लागला.

त्याला मुतायला आली. मुतून परत झोपण्याचा प्रयत्न करू लागला.

बायकोला हे जाणवत होतं, काही तरी बिनसलंय.

रात्र मंदपणे सरकत होती.

काय करायचं या विचारांत त्याने बायकोवर पाय टाकला. तिने दुर्लक्ष केलं. त्याला कसंतरीच वाटलं. ताठरलेलं लिंग घेऊन तो शांत पडण्याचा प्रयत्न करू लागला. जमलं नाही.

त्याने पुन्हा पाय टाकला आणि तिने लाथाडण्याच्या आत तिच्यावर जोर देत चढू लागला.

तिची मॅक्सी वर करून तिला फाकवून घुसू लागला. तिचं सगळं लक्ष वर सिलिंगकडे गेलं. आणि मग फॅनवरून त्याच्या चेहऱ्याकडे गेलं.

‘..तुझ्या पिशवीत माझा कचरा नकोय का तुला?’ तो पूर्णपणे घुसवत म्हणाला.

त्याचा आवाज शेंबडाने घोगरा झाला होता. त्याच्या डोळ्यांत पाणी होतं..

त्याला ओरडायचं होतं..त्याला रडायचं होतं..      

त्याच्या डोळ्यांत पहिल्यांदा तिला इतका राग दिसला आणि अंगात इतका जोर..तिला बरं वाटलं..तिने पहिल्यांदा काहीतरी वेगळं अनुभवलं. तिने परत पाहिलं आपल्या नवऱ्याकडे..

तो खरंच रडतोय गं..तिला वाईट वाटलं.

तिने त्याला मिठीत घेतलं. तिला तिच्याही वागण्याचं रडू आलं.

दोघे एकत्र रडू लागले.

दोघांनी आपापल्या भावनांचं गोणपाट करून एकमेकांना पिळून पुसलं.

***

सोमवारी सकाळी ऑफिसमध्ये सावळे आणि सपाटे टॉयलेटमध्ये एकत्र होते. युरीनल्समध्ये पार्टीशन नव्हतं. दोघेही मुतताना नजरानजर होऊ नये म्हणून फक्त टाइल्सकडे बघत होते.

टाइल्सवर सूचना होती: Please turn off the tap after use.

सावळेनेच संथपणे वाहायला सुरूवात केली-

‘आमच्याकडे अखंड हरिनाम सप्ताह सुरु झालाय..

अध्यात्म म्हंजे काय रे? तुला काय वाटतं?’

‘मला जेव्हा असं खूप कचरा-कचरा वाटतं तेव्हा मी जातो देवळात कधी कधी. सगळं टाकतो त्याच्यासमोर. तो पण सफाईवालाच ना?

‘याचा अर्थ मंदीर म्हणजे पण कचराकुंडी?

‘..हेसुद्धा अध्यात्म.’

‘..विठ्ठल..विठ्ठल..’

सपाटेला सावळेचा डाऊट आला.

डोक्यावर काही परिणाम झालाय की काय? हा दोन गोष्टी मिक्स का करतोय?

‘सॉरी यार’ सपाटेने फ्लश केलं.

त्यादिवशी सावळेने घरी आल्या आल्या बायकोला ‘सॉरी’ म्हटलं, कालच्या वागण्याबद्दल.

‘कशाबद्दल?’ बायको सहज म्हणाली.

तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, ‘आपण मित्रांसारखं का नाही राहत?’

‘मित्रांसारखं?’ सावळेने तिच्याकडे चमकून बघितलं.

काही दिवसांनी बायकोने सावळेला सांगितलं तिच्या गरोदरपणाविषयी.

सावळेने पॉज घेत विचारलं,

‘कचऱ्यातून कलानिर्मिती होते का?’

‘काय?’ती गोंधळते.

 

प्रतिमा सौजन्य: ज्योती बासू

संतोष वसंत गुजर व्यवसायाने आर्किटेक्ट असून मुंबईस्थित लेखक आहेत.

 

One comment on “सावळे: संतोष गुजर

  1. स्वरूप हेमंत गोडबोले

    वाचून मन अस्वस्थ झाले.
    कचरासम मुल्यांची आठवण झाली.
    गोटी बनणारी, तिजोरीत राहणरी, मंदिर बांधणारी माणसे.. आणि त्यातले डॉक्टर, वकील, सिंग … यापैकी कोणीही भेटले तरी आधी हीच कथा आठवेल..
    फारच छान कथा आहे… आणि हो आता कचरा बाहेर न टाकता घरी आणायला विसरणार नाही.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *