सागर देशमुख

झोप

back

झोप

आज झोपताना लक्षात आलं की आपली उंची वाढलीये.
पलंग पुरत नव्हता.
वैतागून भंगारात टाकून दिला.
बदल्यात मोठी चटई घेतली.
रात्री त्या चटईवर झोपायला गेलो तर तीही पुरेना.
पावलांपासून पुढे लिबलिबीत रबरी कातडं वाढत राहिलं.
पायावर उभही राहता येईना.
च्यायला हे काय भलतच म्हणून देवीचा धावा केला.
पण तोवर आख्ख्या अंगाचा विळखा झालेला आणि तोंडाचा फणा!
ठीक आहे.. आता हे असं जगायचंय तर!!
खिडकीतून एक उंदीर आत येताना दिसला आणि माझी तर जीभ लपलपत होती.
उंद्राला डंख मारून बघितला तर तो विषबाधेनी काळा-निळा मरून पडला.
घरात सडका वास नको म्हणून त्याला गिळून टाकला.
आता मला निवांत झोप लागते.

*****

उकिरडा

दिवसभर ऑफिसमधे झक मारून
रात्री १० वाजता लोकलमधल्या माणसांचे दर्प
घेऊन घरात येतो.
कुलूप उघडायला किल्ली वेळेवर कधीच सापडत नाही.
भूक लागली असते.
दारू पिऊन आजूबाजू खोडायची इच्छा असते.
कसंबसं कुलूप उघडून मी आत येतो.
घरातला पिवळा भकास २०० चा बल्ब लावतो
तेव्हा कळकट ओल आलेल्या हिरव्या-निळ्या भिंती दिसतात.
पायातले बूट तसेच घालून मी स्वयपाकघरात जातो.
सडका वास येणारा फ्रीज उघडतो.
सकाळी त्या काळ्या, चुकार बाईने निरेच्छेने केलेले पदार्थ काढतो.
घासायला टाकलेली कढई न घासता तशीच सिंकमधून उचलून गॅसवर ठेवतो आणि ते पदार्थ त्या कढईत गरम करतो.
ते टीव्हीसमोर मोठ्या आवाजात, बूट न काढता मॅच बघत खातो.
 सगळी भांडी आवाज करत त्याच सिंकमधे फेकतो.
मग खिशात दबलेलं सिगरेटचं पाकीट काढून घरभर धूर करतो.
सिगरेटचं थोटूक खिडकी उघडून फेकतो आणि बंद करताना थुंकतो.
मग दाराची कडी लावतो.
टीव्ही रात्रभर तसाच ऑन ठेवतो.
अंगावर भोकं पडलेलं पांघरूण घेऊन अंग खाजवत झोप येण्याची वाट बघतो.
झोप येत नाही.
सकाळ होते.
अंगावरचे कपडे आणि पायातले बूट तसेच असतात.
टूथपेस्ट संपलेली असते.
तोंडावर पाणी मारून घराला कुलूप लाऊन मी बाहेर पडतो.
मागे वळून बघतो तेव्हा डुकराची पिल्लं माझ्या घराजवळ रेंगाळतायत.
गोरेगाव स्टेशनवर तिकीट काढताना एक भिकारी मुलगी माझ्याकडे बघून हसते.
तीही आज दिसत नाही.
प्लॅटफॉर्मवर उभं असताना मला अतिशय कंटाळा येतो.
मी खाली उतरून रेल्वे लाईनवर लोकलची वाट पहात उभा आहे.
पण आज ८:२० ची लोकल लेट आहे अशी अनाउंसमेंट होतीये.

*****

प्रतिभावान

एकदा सिगारेट ओढताना मला अचानक देवाची आठवण आली म्हणून मी माझ्या घरातल्या देव्हाऱ्यासमोर प्लास्टिकची मळकी पांढरी खुर्ची टाकली आणि त्यावर विराजमान झालो.
रांगत असलेल्या चांदीच्या बालकृष्णाला माझ्या दिशेने वळवून त्याकडे एकटक पहात बसलो.
हातात पेटलेल्या सिगरेटचा शेवटचा दीर्घ झुरका घेऊन ऊद्बत्तीच्या सांडलेल्या अंगाऱ्यावर सिगरेट विझवली.
मग बालकृष्णाला खिशात कोंबून गाडी काढली आणि सोनाराकडे गेलो.
बालकृष्णाला माझ्यासमोर वितळवलं आणि रोकड घेऊन एकाला भेटायला गेलो.
एका पाकीटात कोकेन घेऊन आलो.
देव्हाऱ्यासमोर पुन्हा बसलो आणि देवाला ताज्या कोकेनचा नैवेद्य दाखवला.
मग त्या नैवेद्याच्या देव्हाऱ्यात तीन समांतर रांगा केल्या ATM कार्डने.
डाव्या नाकपुडीने जोरात खेचून देवाचा प्रसाद ग्रहण केला.
आता मी देवापेक्षाही प्रतिभावान आहे.

*****

सूज आणि चिंता

मनाने आजारी असलेल्या माणसाचा चेहरा कसा सुजलेला दिसतो.
त्याच्या दाढीच्या केसांमधून चिंता वाहत असते.
चिंता केसाच्या मुळाशी जाऊन शरीरात प्रवेश करते आणि ती तुमच्या ऋदयाचा पत्ता शोधून काढते.
एकदा तिथे चिंता पोचली की ती एक पांढरा द्रव थुंकायला लागते.
हळूहळू मनाने आजारी माणसांच्या अंगावरचे केस पांढरे आणि निर्जीव होऊ लागतात.
माझ्या घरात घुसलेल्या मनाने आजारी माणसाला मी एक खोली दिली आहे. कीव म्हणून.
त्याला चिंता आहे स्वत:ची. स्वत:च्या जगण्याची.
असा हा माझ्या घरात घुसलेला – चिंतातुर, विद्रूप, सुजलेला आरशासमोर उभा राहतो तेव्हा स्वत:ला बघून त्याच्या डोळ्यातून उष्ण रक्ताची धार लागते.
हे असं व्हायला लागलं की हा वेडावाकडा ओरडायला लागतो.
मग मी हल्ली त्याला कोंडून ठेवतो.
मी साधी माझ्या कुत्र्याची शी काढत नाही तर ह्या महारोग्यासाठी झाट काही करतोय.
मधे-आधे वेळ होईल तसा दाराच्या फटीतून त्याला बघतो.
पण काय झालंय की हा महारोगी खूप जास्त सुजलाय.
इतका की खोलीभर तोच आहे.
आता तो कधीही फुटणार आणि मी त्या स्फोटात मरणार ह्याची मला चिंता वाटू लागलीये.

*****

सैतान

परीक्षा जवळ आली की गोंडस मुलाला सैतान आठवतो.
सैतानाला कुठलीच परीक्षा द्यावी लागत नाही.
सैतानाला अभ्यास करावा लागत नाही.
सैतानाला सारखा ओरडा खावा लागत नाही.
आपण सैतान झालो पाहिजे.
पेपर लिहिताना गोंडस मुलाची अचानक बोटं गळून पडली.
त्यानं निळा शाई पेन व बोटं गोळा करून खाकी चड्डीच्या खिशात भरली.
डाव्या पायाकडे नजर वळताच तो गुढग्यापासून निखळून पडला.
मग उजवा हात, डावा डोळा, नाक असं करत गोंडस मुलगा तुकड्यात बाकाच्या आसपास पडला.
रक्ताचा लवलेश नाही.
पेपर संपला.
बाईंनी उत्तरपत्रिका गोळा केली.
वर्ग रिकामा झाला.
गोंडस मुलाने थोडा जोर लावला आणि आपले अवयव जुळवले.
पण हा बदललेला मुलगा गोंडस नसून तोंडाला वास येणारा सैतान होता.

चित्र सौजन्य: मोहित टाकळकर

सागर देशमुख हे चित्रपट व नाट्यक्षेत्रात अभिनेते म्हणून कार्यरत आहेत. ते लेखक व भाषांतरकार असून ‘आसक्त’ या नाट्यसंस्थेचे संस्थापक सदस्य आहेत.

One comment on “झोप आणि इतर कविता: सागर देशमुख

  1. अरुण गायकवाड

    अदभुत कविता.
    विलक्षण कल्पना.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *