नूपुर देसाई

असंगत भविष्याचे संदर्भ बिंदू

back

मुंबईतील ‘२०२०’ या प्रदर्शनाचे परीक्षण

समकालीन कला निर्मिती ही त्या त्या भवतालातील संदर्भ घेऊन त्यांचं अर्थघटन करत असते. शहरांतल्या किंवा महानगरीय अवकाशातील कलाव्यवहाराकडे बघताना केवळ कलाकृती किंवा कलाकार असं व्यक्तिगत स्वरूपाच्या दृष्टीकोनातूून न पाहाता प्रदर्शनांकडे किंवा कलाप्रकल्पांकडे निर्मिती व्यवहार म्हणून पाहाणं गरजेचं ठरतं. कोणत्या प्रकारची प्रदर्शनं भरवली जातात, कुठे भरवली जातात, त्या मागचे उद्देश काय असतात आणि समकालीन कलेत ती नेमकी काय भूमिका बजावत असतात, या सारखे अनेक पदर या व्यवहारामागे दडलेले असतात. हे करताना बऱ्याचदा हे अवकाश उभं केलं जातं आणि कला निर्मिती इतकीच ही अवकाश निर्मितीची प्रक्रिया महत्त्वाची असते. यातून महत्त्वाच्या संकल्पना व मुद्द्यांची उकल होत जाते. आपल्याकडे अजून कलानिर्मिती ही मुख्यतः कलादालनात बंदिस्त असलेली दिसते. त्या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक अवकाशात मांडणी करणं, तात्पुरत्या का होईना तशा ‘जागा’ तयार करणं, त्यातून कलेला संवादी रूप देणं हे घडताना दिसतं. या जागा उभ्या करताना त्यांचे एेतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ या प्रक्रियेत कळीचे ठरतात. ही प्रक्रिया कला, समकालीन कलेचे प्रेक्षक, कलाकार, शहरातलं सार्वजनिक अवकाश या सगळ्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी नक्कीच देते. ‘जनकले’च्या निरनिराळ्या रूपांचा कलाकार वेध घेताना दिसतात. स्ट्रीट आर्ट पासून सामुदायिक कलानिर्मितीपर्यंत विविध पद्धतीने हा संवाद साकारला जातोय. २०१८ च्या फेब्रुवारी महिन्यात भरवल्या गेलेल्या काळा घोडा फेस्टिवलचा भाग असलेल्या हॉर्निमन सर्कल गार्डन मध्ये मुंबईतल्या निरनिराळ्या कला क्षेत्रातल्या व्यक्तींनी सामूहिकपणे केलेली ही कृती होती.

हॉर्निमन सर्कल गार्डनला बेंजामिन हॉर्निमन यावरून नाव दिलं गेलं. बेंजामिन हॉर्निमन हा ब्रिटीश पत्रकार फिरोजशाह मेहतांनी सुरू केलेल्या ‘बॉम्बे क्रॉनिकल’चा संपादक म्हणून काम करायचा आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिलेल्या पाठिंब्यामुळे व वसाहतवादविरोधी भूमिकेमुळे तो ओळखला जातो. या बागेत एक पाटी आहे. त्यावर महात्मा गांधींचं एक वाक्य उद्धृत केलं आहे: हॉर्निमन हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यसाठी झगडला आणि त्याने आपल्याला ‘लिबर्टी’ हा शब्द दिला, अशा काहीशा अर्थाचं हे वाक्य या कलाकारांसाठी संदर्भ बिंदू बनलं. २०१९ च्या येऊ घातलेल्या निवडणुकांचं आणि त्यानंतरच्या अनिश्चिततेचं सावट सगळीकडे असताना कलाकारांना एकत्र येऊन सार्वजनिक अवकाशात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता जाणवली. असहिष्णुता, हिंसा, जातीय तेढ, अस्मितांचं राजकारण, मूलभूत अधिकारांची होणारी पायामल्ली असं अराजकतेकडे नेणाऱ्या वातावरणात कलेची आणि कलाकारांची भूमिका काय असते, कलेची समकालीनता जर भवतालातून निर्माण होत असेल तर या भवतालातील घडामोडींना हे कलाविष्कार कसे भिडतात, त्यातून काही नवे मार्ग तयार होतात का, अशा विविध मुद्द्यांचा विचार करत हे प्रदर्शन उभं राहिलं. पण २०२० या शब्दाला इंग्रजी भाषेत अनेक कंगोरे आहेत. दृष्टी निदानाच्या बाबतीत ‘नॉर्मल’ दृष्टी असणं, डोळे तपासताना वाचायची अक्षरे योग्य त्या अंतरावरून नीट वाचता येणं असाही याचा अर्थ आहे. आणि समकालीन बोलीभाषेत सत्य परिस्थीतीचं आकलन होणं किंवा जे आपल्याला हवंस वाटतं तेच समोर दिसणं, या अनुभवासाठी देखील ही संज्ञा वापरली जाते. या प्रदर्शनाला हे शीर्षक म्हणून समर्पक आहे ते याच पैलूंमुळे. आपल्या भवतालाचं आकलन करत आणि भविष्यवेधी रचना करत कलाकारांनी काही सामाईक मुद्द्यांना हाताळत हे प्रदर्शन उभं केलं होतं.

जागतिक पातळीवर समकालीन कलेचं अभिसरण चालू असलं तरी त्यात एका ठराविक वर्ग आणि जाणकारांच्या आवाक्यातली अशी कलाभाषा विकसित झालेली असते. मग एकत्र येऊन काम करणं खरंच शक्य असतं का आणि अशा प्रकारचे कलेक्टीव किंवा सामूहिक प्रयत्न करताना यातून कालविष्काराचे आणि कलाभाषेचे काही पर्याय आपल्यासमोर उभे राहू शकतात का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे कलादालनात जाऊन कलेचा आस्वाद घेणाऱ्यांव्यतिरिक्त इतर अनेक लोकांपर्यंत हे कसं पोचवायचं, हा एक प्रयत्न असू शकतो. त्याचबरोबर, आत्ताचे निकडीचे विषय घेऊन त्याबद्दल काही संवादविश्व यातून उभारता येतं का, असा दुसरा पैलु याला असू शकतो. मुंबईतलं २०२० हे प्रदर्शन या दोन्ही पैलुंचा पुरेपूर विचार करताना दिसलं. अर्थात, हे पारंपारिक अर्थी कलाप्रदर्शन न ठरता खरंतर सार्वजनिक अवकाशातला एकप्रकारचा हस्तक्षेप होता. मुंबईतल्या काळाघोडा फेस्टिवलमध्ये यावेळी हे वेगळ्या स्वरूपात घडलेलं दिसून आलं. काळाघोडा फेस्टिवलचं रूपडं गेल्या काही वर्षात गजबजाट, स्टॉल्स, आणि व्यावसायिकतेकडे झुकणारं अशा स्वरूपाचं झालेलं दिसतं. पण या वर्षीच्या २०२० या प्रदर्शनामुळे मात्र त्याला वेगळं परिमाण लाभलं. यात मुंबईतल्या अनेक आघाडीच्या कलाकारांनी एकत्रितपणे हे प्रदर्शन उभं केलं. यातली सामूहिकता ही अत्यंत जाणिवपूर्वकरित्या अंगिकारली होती. आधुनिक आणि समकालीन कलेत कलाकारांकडे व्यक्ती म्हणून पाहात असताना त्याच दृष्टीकोनातूून त्यांच्या कलेकडे पाहात असताना हा प्रयत्न अनोखा आणि आशादायी नक्कीच होता.

प्रदर्शनाची सुरूवात शहर या विषयापासून होते. शहराशी जुळलेले आपले धागे, कितीही झालं तरी आपलं असलेलं नागरी अवकाशाबद्दलचं मर्यादित भान या पलीकडे जाऊन स्थूलमानतेतून त्याकडे पाहायला लावते. हे करताना नागरी अवकाश उभारणीची, शहरांच्या गतिमानतेची काही प्रतीकं इथे वापरलेली दिसतात. बांबूपासून बांधलेल्या या रचना फक्त शहर उभारणीचं नव्हे तर एकूणच आपल्या भविष्याच्या उभारणीचं रूपक म्हणून आपल्या समोर येतं. शहराचे नगर विकास आराखडे, नकाशे इथ वापरले होते. ‘चेस’ या बुद्धीबळाच्या धर्तीवर तयार केलेला खेळात आलेले लोक सहभागी होऊ शकत होते. त्यात षटकोनी आकारच्या तुकड्यांपासून बनवलेल्या या खेळात शहर विकास आराखड्यात वापरतात तसे रंग सोंगट्यासाठी वापरले होते.  शेती, पाण्याचे स्रोत, बागा यासाठी शीतरंग तर घरं, कारखाने, लोकसंख्या याकरिता उष्ण रंगांच्या सोंगट्या ठेवल्या होत्या. सहभागी होणाऱ्यांचं शहराच्या भागांशी असलेलं नातं, त्याबद्दलचे समज-गैरसमज, या संरचनेमध्ये लोकांचा शक्य असलेला सहभाग अशा अनेक गोष्टींचा विचार इथे केलेला दिसतो.

कलाकृतींचं असं परस्परसंवादी स्वरूप ठेवण्याचा प्रयत्न बऱ्याच मांडणीशिल्पात केलेला दिसत होता. इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषात काही अर्धवट वाक्यं लिहून ती पूर्ण करण्यासाठी जागा रिकाम्या सोडल्या होत्या. घटनेने दिलेले अधिकार, लोकशाही मूल्य, स्वातंत्र्य यासारख्या मूल्यांबद्दलची ही वाक्ये बाजूच्या डब्यात ठेवलेली अक्षरे फलकावर जोडून तिथे आलेले लोक आपल्या स्वतःचे विचार मांडू शकत होते किंवा हव्या असलेल्या भविष्याची कल्पना करू शकत होते.  लिखित मजकूराचा वापर केलेली ही कृती पुरेशी सरळसोट होती आणि प्रेक्षकांना तिथल्या कलाकृतींशी, त्यांच्या व्यापक संदर्भांशी जोडून घेण्यासाठी मदतकारकही होती. पण दुसऱ्या बाजूला असा मजकूराचा वापर करून बनवलेल्या पाट्या मात्र सहजपणे नजरेत भरत नव्हत्या. बागेत आल्यावर काय करावं आणि काय करू नये अशा सूचनाफलकांचा कलाकारांनी रोचकपणे उपयोग केला होता. ‘संशयास्पद वस्तूंपासून सावधान: जंगली श्वापदे, विद्यार्थी आणि कलाकार’ किंवा ‘गोलगोलकर उद्यान’ या बोर्डावर बागेत कसे वागावे याचे नियम दिलेले होते. त्यात ‘बागेत प्रवेशाकरिता आधारकार्ड बाळगावे’ इथपासून ‘हे उद्यान स्मार्ट झोनमध्ये येते, येथे वाय-फाय उपलब्ध असून त्या अंतर्गत तुमच्या वैयक्तिक इमेल व अन्य माध्यमांतील देवाणघेवाणीवर नजर ठेवली जाईल’ सारख्या अनेक सूचनांची यादी दिलेली होती.  सर्व त्या पाट्या जागोजागी उभ्या होत्या पण बागेच्या वातावरणात मिसळूनही गेल्या होत्या. अशा पाट्यांची आपल्याला इतकी सवय असते की त्या बऱ्याचदा पाहून न पाहिल्यासारख्या केल्या जातात. किंवा सहजपणे नजर फिरवली जाते पण त्यातल्या मजकूराचा अर्थ मनात उतरायला काही काळ जावा लागतो. या पाट्यांवरच्या सूचना परत एकदा आपल्याला अस्थिर भविष्याची जाणीव करून देणाऱ्या होत्या. हे करत असताना हॉर्निमन गार्डनच्या परिसराचा वापर करताना कलाकारांनी त्यातल्या निरनिराळे भाग काळजीपूर्वक या प्रदर्शनात गुंफले होते. गार्डनच्या मध्यभागी असलेल्या कारंज्याच्या पाण्यात हजार एक कृत्रिम कमळं सोडलेली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दर्शविणारं बी. विठ्ठल यांचं तीस वर्षापूर्वी बसवलेलं मुक्त पक्ष्यांचं शिल्प आणि ही कमळं यांच्यातल्या अवकाशात न कळत एक संवाद तयार झाला होता. ही काळी कमळं एकीकडे त्यांच्या काळेशारपणामुळे त्या भागाला सौंदर्य आणत होती, तर दुसरीकडे हलकेच ‘कमळा’कडे व त्याभोवती असणाऱ्या राजकारणाकडे निर्देश करत होती. पण मुख्यतः ‘लेट थाऊजंड फ्लावर्स ब्लूम’ या माओच्या घोषणेचा संदर्भ इथे महत्त्वाचा होता. चिनी क्रांतीनंतरच्या काळात तिथल्या सरकार विषयी मोकळेपणाने लोकांना आपली मत (मतभेद) मांडता यावेत, या संदर्भात हा काळ ओळखला जातो. निरनिराळे मतप्रवाह, विचार आणि स्वप्नं यांच्या मिलाफातून काम करण्याची प्रेरणा यामागे होती. या घोषणेचा पुनर्वेध घेत ही कलाकृती आज आपल्या आजूबाजूला अशी परिस्थिती आहे का, तसं मोकळं अवकाश असण्यासाठी काय करावं लागेल, आणि तसं मोकळं अवकाश असणं म्हणजे नेमकं काय असेल, लोकांबरोबरच्या संवादी प्रक्रियेतून ते कसं साकारता येईल, असे प्रश्न या निमित्ताने विचारते.

आज आपल्या आजूबाजूला जे घडतंय ते आपल्या आकलनाच्या पलीकडचं आहे. ते अॅब्सर्ड आहे असं वाटावं अशी परिस्थिती आहे. पण ते आजच अॅब्सर्ड हे उद्याचं वास्तव म्हणून आपल्या समोर उभं ठाकणार का अशी अस्वस्थता ही आहे. या उद्याच्या असंगताची मांडणी अर्काइव्ह किंवा ज्ञानाचा संग्रह असलेल्या पण काळाचं भान देणाऱ्या ‘कल निर्णय’ या पहिल्या बांबूच्या रचनेत केली होती.  ‘काल निर्णय’ असं इंग्रजी मध्ये वाचता येतं असल्यामुळे ते कॅलेंडर आणि काळविषयी भाष्य तर करतच पण ते देवनागरी मध्ये ‘कल निर्णय’ असं दिसतं असल्यामुळे ‘उद्याविषयीचा किंवा भविष्याविषयीचा काहीतरी निर्णय’ असाही अर्थ त्यात अभिप्रेत दिसतो. यात मुख्यतः मुंबईतचा नकाशा काढलेला असून त्यात काही ठळक ठिकाणं अधोरेखित केलेली दिसतात. तर आतल्या बाजूला मध्य दिल्ली किंवा ‘ल्युटियन दिल्ली’चा नकाशा सविस्तरपणे मांडलेला दिसतो. ‘धिस इज नॉट अ थोरोफेअर’ हे वाक्य हा भाग, इथं घेतले जाणारे निर्णय, ठरवली जाणारी धोरणं ही जनविरोधी असल्याचं सुचवितात. याच नकाशाच्या बाजूला लावलेल्या जुन्या टेलिविजन सेटवर २०२० नंतरची भाकितं बातम्यांसारखी खालून वर सरकताना दिसतात. ‘प्रसारण मंत्रालयाच्या निर्णयानुसार यापुढे सर्व चित्रपट संस्कृतमध्ये डब केले जातील’, ‘मुंबई महानगरपालिकेने जुन्या झाडांवर यंत्रणा बसवली आहे. झाड कोसळायच्या आधी महामृत्युंजयाच्या मंत्राचे उच्चारण होऊन खाली चालत असलेल्यांना सूचित करण्यात येईल’, तसंच ‘बंदी घातलेली ५०० रूपयाची नोट प्रदर्शनात मांडल्यामुळे संग्रहालयाच्या क्युरेटरना अटक करण्यात आली आहे,’ अशा प्रकारची विधानं असलेल्या पट्ट्या एकामागे एक अशा सरकत जातात. इतिहासाचे दाखले देत उभं असलेलं एखादं अर्काइव्ह असावं अशी कल्पना करून त्यात कलाकारांनी त्यातल्या निवडक गोष्टी बाहेर काढून त्यातून इतिहास, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबद्दलचं कथन मांडलेलं दिसतं. हे करताना त्यात विनोद आहे, असंगती आहे, कल्पना करणं आहे, स्वप्न पाहाणं आहे आणि भविष्याबद्दलची चिंता देखील आहे. गेल्या साठ वर्षातल्या निवडक बातम्यांचं छापलेलं बातमीपत्र आहे तसंच १९८० च्या दशकातल्या ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘जाने भी दो यारो’, ‘आघात’ यासारख्या मुंबई शहरात कथानक गुंफलेल्या आणि त्या काळच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या चित्रपटातल्या संवाद आणि गाण्यांचा संग्रह ठेवलेला होता.

याच्याच पुढे असलेल्या ‘जंतरमंतर’ या रचनेला वर वर निमुळता होत जाणाऱ्या मनोऱ्याचा आकार दिला होता. इथे ‘जंतरमंतर’ ला दुहेरी अर्थ आहे. आज ते दिल्लीमधलं सरकारच्या किंवा कुठल्याही अन्यायाविरूद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी, मोर्चे आणि धरणे धरण्यासाठीचं ठिकाण आहे. पण, मुळात ती एक वेधशाळा आहे. इथली विविध यंत्रं ही आपल्याला भवतालाचं, आपल्या जगाचं अस्तित्व व त्याचे नियम समजून घेण्यासाठी कामी येतात. या दोन्हीची सांगड घालत हॉर्निमन सर्कलमधलं हे इन्स्टॉलेशन तुम्हाला भविष्याकडे पाहायचं मोठं भिंग देतं. बाजूच्याच भिंतीवर भारताच्या घटनेतील सरनामा लावला आहे. पण तो एकसारख्या अक्षरात न लावता डोळ्यांच्या तपासणीच्या पट्टीवर अक्षरे मोठ्यापासून लहान होत जातात त्या पद्धतीने डकवलेला दिसतो. तसंच, या मनोऱ्यात टांगलेल्या भिंगातून तुम्हाला दूरवर असलेला पण वेगाने तुमच्याकडे झेपावणारा तुमचा भविष्यकाळ पाहाता येतो, त्याची कल्पना करता येते. धुसर असलेल्या लांबवरच्या गोष्टी लख्खपणे तुमच्यासमोर येतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भिंग तुम्हाला दृष्टी देतात. तुमची स्वतःची दृष्टी ज्यातून तुम्ही तुम्हाला हव्या तशा भविष्याची कल्पना करू शकता. त्यात ना काही बळजबरी आहे ना इतर कुणाचा हस्तक्षेप. या नंतरची रचना ही कललेल्या घरासारखी होती. स्वतःच्याच घरात भयग्रस्ततेत राहणं आणि त्याचे परिणाम भोगणं, या अर्थी ते वापरलं असावं असं दिसतं. ‘अखलाक द्वार’ नाव दिलेल्या या रचनेत काही छायाचित्रे होती. यात एकापाठोपाठ छायाचित्रातील माणसाचा हात हळूहळू वर वर जाताना दिसतो. त्याच्या या हातवाऱ्यातून त्याची राजकीय नि़ष्ठा स्पष्ट होत जातात. हे साधे वाटणारे हातवारे आपलं अवकाश संकुचित करणाऱ्या उजव्या विचारसरणीच्याकडे रोख असल्याचं लक्षपूर्वक पाहिल्यास ध्यानात येतं.   

 

‘भोतमांगे चौक’ नाव दिलेल्या बांबूच्या मांडवासारख्या रचनेत एकीकडे सफाई कामगारांची काही छायाचित्रे होती आणि दुसऱ्या बाजूला ‘मन्नत’ पूर्ण होण्यासाठी दर्ग्याच्या बाहेर कुलुपं आणि धागे बांधले जातात त्याची प्रतिकृती होती. काळ्या कापडाच्या फिती लावून एक आख्खी भिंत यातून उभी केली होती. त्या दोन्हीच्या मध्ये आयताकृती काचेवर पेलेट्स पसरले होते व त्यावर बारीक धाग्यांना बांधलेले दगडगोटे लोंबकळत होते.  काश्मिरचं तरंगत पण हिंसक वास्तव, त्यांच्या रोजच्या जगण्यातली अस्थिरता, आणि भविष्य कसं असू शकतं याच्या शक्यता याचा विचार यात मांडला होता. तर ‘संतोषी कुमारी वॉल’’ नाव दिलेली रचना ही क्रेनच्या आकाराची होती. यात शहराची उभारणी करण्याची प्रक्रिया होती पण त्याचबरोबर पूर्वीच्या शहररचनांना उध्वस्त करणारीही प्रक्रिया यातून अधोरेखित होते. अंगठ्यावरच्या बारीक रेषांचा ठशाचा आकार मोठ्या होर्डिंग वर लावला होता. नागरिक असणं सिद्ध करावं लागणं, त्यासाठी सरकार पाळत ठेवू शकेल अशा यंत्रणांचा भाग बनण्यावाचून पर्याय नसणं, आणि या सक्तीतून तयार होणारी परिस्थिती एकूण आजूबाजूच्या गोंधळाच्या सद्यस्थितीत भर घालणारी ठरतेय, यासारख्या अनेक मुद्द्यांचा विचार केला होता.

बागेच्या उजव्या भागातल्या मध्यभागी रोमन नगररचनेच्या ‘फोरम’ ची आठवण करून देणारी बांबूची गोलाकार रचना केली होती. ‘झिरो पॉईंट’ असं नाव दिलेल्या या रचनेत आठवडाभर विविध सादरीकरणे करण्यात आली. मुंबई शहराचं केंद्र स्थान किंवा सुरूवातीचा बिंदू मानण्यात आलेल्या या जागेपासून या सादरीकरणाच्या आणि कलाकृतींच्या माध्यमातून नजीकच्या भविष्यातल्या शक्यता आणि त्याबद्दलची उत्कटता आणि अस्वस्थता परफॉर्मन्सेसच्या माध्यमातून परावर्तित होत राहील, अशी भावना त्यामागे असावी. कवितांचे तुकडे, अनेक कलाकारांनी प्रेक्षकात मिसळून पार पाडलेले परफॉर्मन्सेस, प्रेक्षकांच्या सहभागातून उभे राहिलेले मांडणी-शारीर-शिल्प, असे अनेक कंगोरे त्यात होते. ‘वर्ड्स हॅव बीन अटर्ड’ या दीड तासाचे सादरीकरण विद्रोही आवाज उठवणाऱ्या कविता, अभंग, उतारे, कथा, नाटकातले तुकडे या भोवती गुंफलेले होते. अभिवाचनाचा फॉर्म वापरून कलाकारांनी शेकडो वर्षापासून राजकीय-सामाजिक-धार्मिक मुस्कटदाबीला तोंड देत उभ्या राहिलेल्या कलाकार, शास्त्रज्ञ, साहित्यिक यांच्या बद्दलचे हे उतारे प्रभावीपणे लोकांसमोर आणले. या फॉर्ममध्ये नाविन्य नव्हते आणि त्यातले उतारेही परिचयाचे असले तरी सार्वजनिक अवकाशात त्यांची सलगपणे मांडणी करणे आणि या पुनर्वाचनातून प्रेक्षकांसमोर हे मुद्दे पुन्हा एकदा विचारार्थी ठेवणे या दृष्टीने हे सादरीकरण महत्त्वाचे ठरले. या सादरीकरणातील सर्वात रोचक ठरलेला अनुभव होता ‘सनसेट रिपेलंट’. सूर्यास्तानंतर, सर्व कार्यक्रम संपताना डासांना मारायच्या धुराचा फवारा मारायला सुरूवात झाली. हा फवारा मारायच्या आधी तिथे उपस्थित प्रेक्षकांना सर्जिकल मास्क आणि काही टॉर्च पुरवण्यात आले. धुराच्या लोटांनी सर्व कलाकृती झाकल्या गेल्यावर टॉर्चच्या प्रकाशात गार्डनमध्ये फिरत पुन्हा एकदा त्या कलाकृती हलक्या अंधारात, धुरानी लपटलेला पडदा टॉर्चच्या प्रकाशाने दूर सारत शोधणं हा या परफॉर्मन्सचा भाग होता. आपल्या भोवताली गोंधळामुळे आपलं जगणं, मूल्य, व्यवस्था सगळ्याच बाबतीतली धूसरता पसरली आहे. ती धूसरता अनुभवणं, तिच्या मागची कारणं जाणून घेणं तसंच, तिच्यातून मार्ग काढणं आणि त्यासाठी ध्रुवताऱ्यासारख्या  विचारांना दिशा देणाऱ्या घटनेचा/वृत्तीचा/मूल्यांचा आधार घेणं, याचं रूपक म्हणून हा परफॉर्मन्स अतिशय परिणामकारक ठरला.

आज आपल्या अवतीभोवती चालू असलेली उलथापालथ आणि गोंधळाचं वातावरण याकडे लक्ष वेधणाऱ्या या कलाकृती पाहायला, अनुभवायला काळाघोडा फेस्टीवलच्या झगमगाटात रमणाऱ्यांपैकी किती जणांची पावलं हॉर्निमन सर्कलकडे वळत होती, हे एक कोडंच आहे. इतिहासाच्या पुनर्लेखनापासून जात, धर्म, भाषा या उफाळून येणाऱ्या ‘अस्मितां’पर्यंत आणि हिंसेच्या व शोषणाच्या निरनिराळ्या प्रकारांच्या रोजच्या अनुभवापर्यंत अनेक पातळ्यांवर ही परिस्थिती अधिक बिकट होताना दिसतेय. या सार्वत्रिक मुद्द्यांबरोबरच मुंबईसारख्या मोठ्या शहरांच्या विकासाचे, झपाट्याने बदलणाऱ्या भू-अवकाशाचे, तिथल्या माणसांच्या जगण्याचे देखील प्रश्न तितकेच महत्त्वाचे ठरत आहेत.

ढासळत जाणारी लोकशाही व्यवस्था पूर्ववत करण्याकडे भर असावा असं वाटून जातं. पण त्या पलीकडे जाऊन नवी दिशा काय  असू शकते अशी मांडणी कलाकार आणि कलाकृतीतून पूर्णपणे येऊ शकते का, हा प्रश्न आज मोलाचा ठरतो.  बांबूच्या रचनांची नावे फार रोखठोक आणि सरळसोटपणे आपल्यासमोर येतात. अर्थात, तिथे आलेल्या प्रेक्षकवर्गापैकी बहुतेकांना त्यातले एकही नाव परिचित नव्हते, हेही तितकेच खरं! पण एकीकडे कलाकृतीतला टोकदारपणा तिच्या कलाभाषेतून यावा असं म्हणत असताना अशा सरळसोटपणातून त्याला मर्यादा येऊ शकतात का याचाही विचार व्हायला हवा. आजच्या परिस्थितीला भिडताना या कलाकृतींचे नेमके कोणते रूपबंध हे कलात्मकदृष्ट्या कलाकारांना व प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतील आणि त्यापुढे जाऊन नवे रूपबंध यातून कसे आकाराला येतील, यासारखे मुद्दे कलेच्या आणि कलाकारांच्या समकालीनत्वाला अधिक सजगपणे व सखोलपणे घडवू शकतील, असंही हे पाहाताना वाटलं.  याला जोडून येणारा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सार्वजनिक अवकाशात कला आणताना आणि तिला राजकीय दृष्ट्या सौंदर्यविचार मांडताना ती ‘संदेशवाही’ असायला हवी असा उद्देश असावा का, असाही एक प्रश्न मला इथे विचारात घ्यावा असे वाटते. ही संदेशवाही विचार मांडण्याची पद्धत ही कलाभाषेच्या सुलभीकरणाकडे कलणारी किंवा कलात्मकतेपेक्षा आशयावर भर देणारी असू शकते. अशा मांडणीच्या पद्धती या कलेचा आस्वादव्यापार आणि राजकियीकरण या दोन्हीचे सपाटीकरण करणाऱ्या ठरू शकण्याचा धोका त्यात नक्कीच असतो. पण कलाकारांना आपापल्या काळाला आणि भवतालाला सामोरं जाण्याची निकड जाणवते आणि एक सामाईक कृती करण्यासाठी ते एकत्र येतात ही यातली सर्वात जमेची बाजू आहे, हे मात्र प्रकर्षानं जाणवलं. असेच प्रयोग आणि प्रदर्शनं यातून कलाभाषेचेही नवेनवे प्रयोग घडत राहतील असा आशावाद यातून व्यक्त झाला, यातून या प्रदर्शनाचा भविष्यवेधी विचारच समोर येतो, हेही तितकंच खरं.

नूपुर देसाई समकालीन कलेच्या संशोधक असून त्या मराठी व इंग्रजीत लिहितात. सध्या त्या टाटा समाज विज्ञान संस्था, मुंबई येथे पीचडी करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *