मूळ लेखक: हारुकी मुराकामी

इंग्रजी अनुवाद: फिलीप ग्रॅब्रीएल

मराठी अनुवाद: आरती रानडे

किनो

back

तो मनुष्य नेहमी त्याच एका ठरावीक खुर्चीत बसायचा. काऊंटरपासून सगळ्यात लांब असलेल्या खुर्चीत. अर्थात, जेव्हा ती खुर्ची रिकामी असेल तेव्हाच. पण बहुतेक वेळा ती खुर्ची रिकामीच असायची. या बारमधे तशी क्वचितच कधीतरी गर्दी असायची. त्यातही ती ठरावीक खुर्ची सगळ्यात कमी आरामदायी आणि  सगळ्यात जास्त दुर्लक्षित होती. ती जागा जिन्याखालच्या भागात असल्यामुळे तिथे छत उतरतं होतं आणि छताला डोकं न धडकता त्या जागी उभं राहणं अशक्य होतं. तो मनुष्य खरंतर उंच होता, पण तरीही का कोण जाणे, ती अरुंद दाटीवाटीची जागा त्याच्या पसंतीची होती.

हा माणूस पहिल्यांदा त्याच्या बारमधे आला होता त्या प्रसंगाची किनोला आठवण झाली. त्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वानं क्षणार्धातच किनोचं लक्ष वेधून घेतलं होतं – चकाकणारं निळसर तुळतुळीत डोकं, किरकोळ शरीरयष्टी असली तरी रुंद खांदे, डोळ्यातली तीक्ष्ण चमक, गालाच्या हाडांची उठावदार ठेवण आणि भव्य कपाळ. दिसण्यावरून त्याचं वय तिशीच्या आसपास असावं. पाऊस पडत नव्हता तरीही त्यानं करड्या रंगाचा लांब रेनकोट घातला होता. पहिल्यांदा पाहिल्यावर किनोला तो गुन्हेगारी जगताशी संबंधित असावा असं वाटलं आणि किनोनं त्याच्यावर सावधपणे नजरही ठेवली. एप्रिल महिन्यातल्या, एका गारठलेल्या संध्याकाळचे साडेसात वाजले होते आणि बार रिकामाच होता. त्या माणसानं काऊंटरवरची सगळ्यात टोकाची, शेवटची खुर्ची निवडली. त्याचा रेनकोट काढला. हळू आवाजात बियर मागवली आणि शांतपणे एक जाडजूड पुस्तक वाचायला सुरुवात केली.  त्यानंतर अर्ध्या तासानं, बियर संपवून झाल्यावर, त्यानं इंच दोन इंचभर हात उंचावून किनोला बोलावून घेतलं आणि व्हिस्की मागवली. 

“कोणता ब्रँड?” असं किनोनं विचारल्यावर ‘कोणताही एखादा ठरावीक ब्रँडच हवा असं नाही’ असं त्या माणसानं उत्तर दिलं.

“’नेहमीची कोणतीही साधी स्कॉच चालेल. डबल.  जितकी स्कॉच तितक्याच प्रमाणात पाणी घातलेली… आणि शक्य असेल तर थोडासा बर्फ घालून.”

किनोनं थोडी ‘व्हाईट लेबल’ स्कॉच एका ग्लास मधे ओतली, त्यात थोडं पाणी घातलं आणि त्यात बर्फाचे दोन लहानसे खडे टाकले. त्या माणसानं एक घोट घेतला, ग्लासाचं निरीक्षण केलं आणि डोळे बारीक करत ‘हे …व्यवस्थित जमलंय” असं म्हणाला.

त्यानंतर अजून अर्धा तास त्यानं वाचन केलं. मग तो उभा राहिला आणि रोख रक्कम देऊन त्यानं बिल चुकतं केलं. कोणतीही नाणी परत मिळायला नकोत म्हणून त्यानं बरोब्बर मोजून सुट्टे पैसे दिले. तो माणूस दाराबाहेर पडल्यावर किनोनं सुटकेचा एक हलकासा निश्वास टाकला.  तो माणूस निघून गेला खरा, पण त्याचं अस्तित्व मात्र मागे राहिलं.  काऊंटरच्या मागे उभं राहून किनो मधून मधून तो माणूस जिथे बसला होता त्या खुर्चीकडे नजर टाकत होता. तो अजूनही तिथे बसला असेल आणि काहीतरी मागवण्यासाठी कोणत्याही क्षणी हात थोडासा उंचावून आपल्याला बोलावेल असा किनोला भास होत होता. 

किनोच्या बारमधे तो माणूस नियमितपणे यायला लागला. आठवड्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त दोनदा. दरवेळी न चुकता पहिल्यांदा तो एक बियर आणि नंतर व्हिस्की घ्यायचा. कधीकधी काळ्या फलकावर लिहिलेला त्या त्या दिवसाचा मेन्यू पाहून तो खाण्याचे पदार्थही मागवायचा.

तो माणूस क्वचितच एखादा शब्द बोलला असेल. तो नेहमी संध्याकाळ होत आली की यायचा. त्याच्या काखेत नेहमी एक पुस्तक धरलेलं असायचं. तो ते काऊंटर वर ठेवायचा. जेव्हा त्याला वाचनाचा शीण यायचा (निदान, किनोचा तसा अंदाज होता की त्याला वाचनाचा कंटाळा आला असावा) तो पुस्तकातून नजर वर उचलायचा आणि कोणत्यातरी दूरच्या प्रदेशातल्या दुर्मिळ जातीच्या प्राण्यांचं निरीक्षण करावं तसं तो समोरच्या कपाटात मांडून ठेवलेल्या दारूच्या बाटल्यांचं निरीक्षण करायचा. 

या माणसाचं बारमधे येणं सवयीचं झाल्यानंतर, त्याच्या उपस्थितीचा, अगदी केवळ ते दोघंच  असताना देखील, किनोला कधी त्रास वाटला नाही. किनो स्वतःही फारसा बोलत नसे, आणि आजूबाजूला लोक असतानाही शांत राहणे त्याच्यासाठी कठीण नव्हते. 

जेव्हा तो माणूस वाचन करायचा, तेव्हा किनो – भांडी विसळणे, सॉस तयार करणे, वाजवण्यासाठी  रेकॉर्ड निवडून ठेवणे किंवा वर्तमानपत्र चाळणे अशी बारमधे एकटा असताना करायची काम उरकून घ्यायचा.  

किनोला त्या माणसाचं नाव माहित नव्हतं. त्याच्यासाठी तो बारमधे येणारा केवळ एक नेहमीचा गिऱ्हाईक होता. बियर आणि व्हिस्कीचा आनंद घेणारा. शांतपणे वाचन करणारा.  रोख पैसे देऊन निघून जाणारा. त्यानं कधीही कुणाच्या अध्यातमध्यात केलं नाही. यापेक्षा त्याच्याबद्दल अधिक माहिती असण्याची किनोला तरी कुठे आवश्यकता होती?

*****

कॉलेजमधे असताना किनो मध्यम पल्ल्याचा एक लक्षवेधी धावपटू होता. पण कॉलेजच्या ज्युनियर वर्षात असताना त्याच्या टाचेच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे त्याला व्यावसायिक धावपटूंच्या संघात सामील होण्याचं स्वप्न मनातून काढून टाकावं लागलं. शिक्षण संपल्यानंतर त्याच्या प्रशिक्षकाच्या शिफारसीमुळे त्याला खेळाचे साहित्य बनवणाऱ्या कंपनीमधे नोकरी मिळाली आणि सतरा वर्षे त्यानं तिथं काम केलं. खेळाचे साहित्य विकणाऱ्या दुकानांना त्याच्या कंपनीच्या ब्रँडचे धावण्याचे शूज दुकानात विक्रीसाठी ठेवण्यासाठी आणि आघाडीच्या खेळाडूंना ते शूज वापरून त्यांची चाचणी घेण्यासाठी पटवण्याच्या कामाची जबाबदारी त्याच्याकडे नोकरीदरम्यान होती. एका मध्यम -दर्जाच्या, अजिबातच फारश्या प्रसिद्ध नसलेल्या त्या कंपनीचं मुख्य ऑफीस ओकायामा या ठिकाणी होतं. शिवाय जगातल्या सर्वोत्तम धावपटूंबरोबर खाजगी करार करण्यासाठी आवश्यक असलेलं, नायके किंवा आदिदाससारख्या कंपन्यांकडे असणारं आर्थिक सामर्थ्यही त्याच्या कंपनीकडे नव्हतं. तरीही ती कंपनी पट्टीच्या धावपटूंसाठी काळजीपूर्वकरित्या, हाताने बनवलेले शूज तयार करत होती आणि अनेक लोक त्यांची प्रशंसाही करत होते. 

“प्रामाणिकपणे काम करत रहा, त्याचा यथायोग्य मोबदला मिळेल’ हे कंपनी स्थापन करणाऱ्यांचं ब्रीदवाक्य होतं. हा साधासुधा, थोडासा जुन्या वळणाचा दृष्टीकोण किनोच्या व्यक्तीमत्त्वाला साजेसा होता. एक मितभाषी, लोकांत जास्त न मिसळणाऱ्या स्वभावाचा माणूस असूनही त्याच्याकडून कंपनीच्या उत्पादनाची चांगली विक्री होत असे. खरं तर त्याच्या अशा व्यक्तिमत्त्वामुळेच प्रशिक्षकाचा त्याच्यावर विश्वास  होता आणि धावपटूंना देखील तो आवडायचा. तो प्रत्येक धावपटूच्या गरजा नीट लक्ष देऊन ऐकायचा आणि उत्पादन करणाऱ्या विभागाच्या प्रमुखापर्यंत हे सर्व बारकावे योग्य रितीने पोहचत आहेत याची खात्री करून घ्यायचा.  त्याला म्हणावा तितका जास्त पगार मिळत नव्हता, पण ती नोकरी त्याला आकर्षक आणि समाधानकारक वाटत होती. तो स्वतः जरी आता धावू शकत नव्हता,  तरी इतर धावकांना अचूक शारीरिक हालचाली करत ट्रॅकवर पळताना पाहणे त्याला आवडायचं.

किनोनं नोकरीचा राजीनामा दिला तो त्याच्या कामामधे असमाधानी होता म्हणून नाही, तर त्याच्या बायकोचं त्याच्या कंपनीमधल्या सगळ्यात जवळच्या मित्राबरोबर असलेलं प्रेमप्रकरण त्याला समजलं म्हणून. 

फिरतीवर असल्यामुळे, टोकियो मधल्या आपल्या घरी वेळ घालवण्यापेक्षा जास्त वेळ किनो प्रवासात घालवायचा.. व्यायामशाळेत जाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्ठ्या बॅग मधे शूजचे नमुने, सँपल्स भरून तो जपानमधल्या खेळाचे साहित्य विकणाऱ्या विविध दुकांनांमधे जायचा. शिवाय तो स्थानिक महाविद्यालये आणि धावपटूंना प्रायोजित करणाऱ्या कंपन्यांना भेटी द्यायचा.

तो परगावी असताना त्याच्या बायकोनं आणि मित्रानं एकमेकांबरोबर शरीरसंबंध ठेवायला सुरुवात केली. 

किनोचा, कोणत्याही गोष्टीविषयी चटकन मागमूस लागावा किंवा पटकन अंदाज यावा इतका चाणाक्ष स्वभाव नव्हता. त्याचे वैवाहिक आयुष्य अतिशय सुरळीतपणे चालू आहे असंच त्याला वाटत होतं. त्याच्या बायकोनं त्याला काही सांगितलंही नाही, ना कोणत्या गोष्टीचा सुगावा लागू दिला. एकदा कामानिमित्त बाहेरगावी गेला असताना प्रवास संपवून तो लवकर घरी परत आला नसता, तर त्याच्या बायकोचे काय चालले आहे हे त्याला कधीही समजलं नसतं. 

त्या दिवशी जेव्हा तो टोकियोला आल्यावर लगोलग कसाईमधल्या त्याच्या घरी पोचला, तेव्हा त्याला त्याच्या बेडरूममधे, तो आणि त्याची बायको झोपत असत त्याच पलंगावर, त्याची बायको आणि मित्र नग्नावस्थेत एकमेकांत गुरफटलेले आढळले. त्याचा मित्र खाली आणि बायको त्याच्यावर होती. किनोनं दरवाजा उघडला तेव्हा त्याच्या बरोब्बर समोर त्याला ती दिसली. तिचे सुंदर पुष्ट स्तन वर-खाली हेलकावत होते. त्यावेळी किनो एकोणचाळीस वर्षाचा होता, तर त्याच्या बायको पस्तीशीची. त्यांना मूलबाळ वगैरे काही नव्हते. किनोने मान खाली घातली, बेडरूमचा दरवाजा बंद केला. तो घरातून बाहेर पडला आणि कधीही परत माघारी फिरकला नाही. दुसऱ्या दिवशी त्यानं नोकरीचा राजीनामा दिला. 

****

किनोची एक अविवाहित मावशी होती. त्याच्या आईची मोठी बहिण. तो लहान असल्यापासून त्याची मावशी नेहमी त्याच्याशी प्रेमानं वागायची. अनेक वर्षं तिचा एक वयस्कर मित्र (‘प्रेमी’ हा जास्त योग्य शब्द होईल) होता, आणि त्यानं तिला आओयामा भागात एक टुमदार घर घेऊन दिलं होतं. घराच्या दुसऱ्या मजल्यावर ती स्वतः राहायची आणि पहिल्या मजल्यावर एक कॉफी शॉप चालवायची. समोरच्या भागात एक लहानशी बाग होती आणि त्यात खालपर्यंत फांद्या असलेलं, पानांनी लगडलेलं एक आकर्षक विलोचं झाड होतं. हे घर नेझू संग्रहालयाच्या मागे असलेल्या चिंचोळ्या गल्लीत होतं. ही जागा खरं तर गिऱ्हाईक येण्यासाठी सर्वोत्तम जागा नव्हती. पण त्याच्या मावशीकडे लोकांना आकर्षित करून घेण्याची देणगी असल्यामुळे तिच्या कॉफी शॉपचा चांगला धंदा होत असे. 

मात्र जेव्हा ती साठ वर्षाची झाली, तिच्या पाठीला दुखापत झाली आणि एकटीनं कॉफी शॉप चालवणं तिच्यासाठी अधिकाधिक अवघड व्हायला लागलं. तिनं इझू कोगेन भागात एका संपन्न, सुव्यवस्थित घरात मुक्काम हलवायचं ठरवलं.

” मी विचार करत होते की भविष्यात कधी तुला हे दुकान चालवायला आवडेल का?” तिनं किनोला विचारलं.

“तू जे देऊ करतीयेस त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण सध्या तरी मी जिथे आहे तिथे खुश आहे”. त्यानं तिला सांगितलं . 

ही घटना त्याच्या बायकोचं प्रेमप्रकरण उघडकीला येण्याआधी तीन महिन्यापूर्वीची होती.  

नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यानं मावशीला फोन केला आणि तिनं दुकान विकलं आहे का याची चौकशी केली. जागेची खरेदी-विक्री करणाऱ्या मध्यस्थाकडे तिनं नोंदणी केली आहे, पण अजून कोणताही योग्य व्यवहार झालेला नाही असं तिनं त्याला सांगितलं. ‘ जर शक्य असेल तर मला तिथं बार उघडायला आवडेल,’ किनो म्हणाला. 

” मी तुला दर महिन्याला भाडं दिलं तर चालेल का?”

“पण तुझ्या नोकरीचं काय?” तिनं विचारलं.

“काही दिवसांपूर्वी मी नोकरी सोडली”

“तुझ्या बायकोला त्याबद्दल काही अडचण नाही ना?” 

“आम्ही बहुधा लवकरच घटस्फोट घेणार आहोत.”

किनं कारण सांगितलं नाही आणि त्याच्या मावशीने ते विचारलंही नाही. फोनवर दुसऱ्या बाजूला काही काळासाठी शांतता पसरली. त्यानंतर त्याच्या मावशीनं दर महिना किती भाडं अपेक्षित आहे ते सांगितलं. ही रक्कम किनोच्या अपेक्षेपेक्षा फारच कमी होती. 

“मला वाटतं मला हे जमू शकेल” त्यानं उत्तर दिलं.

तो आणि त्याची मावशी एकमेकांशी फारसे कधीच बोलले नव्हते (त्याच्या आईने त्याला मावशीजवळ जाण्यापासून कायम परावृत्त केलं होतं) पण त्यांच्यामधे परस्परांविषयी एक प्रकारचं समजुतीचं नातं होतं. किनो हा वचन मोडणारा माणूस नाही हे तिला माहित होतं. 

आल्या बचतीचा अर्धा हिस्सा खर्च करुन किनोनं कॉफी शॉपमधे बदल करुन त्या जागेचं एका बारमधे रुपांतर केलं. त्यानं साधं फर्निचर आणलं, आणि एक लांबलचक पण मजबूत बार तयार करून घेतला. डोळ्यांना आल्हाददायक वाटेल अशा रंगाचा एक नवीन वॉल पेपर लावला. घरून त्याच्या रेकॉर्डसचा संग्रह आणला आणि बारमधल्या एका कपाटात त्या रेकॉर्ड्स मांडून ठेवल्या. तो अविवाहित असताना, त्या काळी बऱ्यापैकी महागातला समजला जाणारा – टॉरेन्ट्झ कंपनीचा तबकडी प्लेयर, लक्समनचा अॅम्प्लीफायर आणि जेबीएल कंपनीचे छोटे टू-वे स्पीकर्स – असा एक चांगल्या प्रतीचा स्टीरीओ त्याच्याकडे होता. जुन्या जॅझ रेकॉर्डस ऐकणं त्याला अधिक पसंत होतं.  तो त्याचा एकमेव छंद होता. त्याच्या आजूबा़जूच्या माहितीतल्या कोणालाही हा छंद नव्हता. शिवाय कॉलेजमधे असताना त्यानं रोपोंगी भागातल्या एका बार मधे अर्ध वेळ बारटेंडर म्हणून काम केलं असल्यानं पेय बनवण्याची कला त्याला चांगली अवगत होती.

त्यानं त्याच्या बारला ‘किनो’ असं नाव दिलं. ह्यापेक्षा चांगलं नाव त्याला सुचलं नाही. बार उघडल्यानंतर पहिल्या आठवड्यात एकही गिऱ्हाईक आलं नाही. पण तो वैतागला नाही. एक तर त्यानं बारविषयी कोणत्याही प्रकारची जाहिरात केली नव्हती किंवा लक्ष वेधून घेणारी कोणती पाटी लावली नव्हती. आडबाजूला असलेल्या चिंचोळ्या गल्लीतल्या या बारमधे कोणीतरी उत्सुक माणूस डोकावेल या आशेने तो शांतपणे संयमानं वाट पहात राहिला. त्याच्याकडे निवृत्तीवेतन म्हणून मिळालेले थोडे पैसे शिल्लक होते आणि त्याच्या बायकोनं कोणत्याही आर्थिक सहकार्याची मागणी केली नव्हती. ती आधीच त्याच्या मित्राच्या घरी रहायला गेली होती. शिवाय तिनं आणि किनोनं, कासाई भागातलं त्यांचं घर विकायचा निर्णयही घेतला होता. त्याच्या मावशीच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर किनो रहात होता आणि किमान सद्य परीस्थीतीत तरी तो निभावून नेऊ शकेल असं वाटत होतं. 

किनो जेव्हा पहिल्या गिऱ्हाईकाची वाट पहात थांबला होता तेव्हा त्यानं त्याच्या आवडत्या संगीताचा आस्वाद घेतला. जी पुस्तकं त्याला वाचायची होती ती पुस्तकं वाचली.  पावसाची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या कोरड्या जमिनीसारखा, त्यानं तो एकांतवास, शांतता आणि एकटेपणा स्वतःच्या अंगात मुरवून घेतला. त्यानं ‘आर्ट टेटम’ या पियानो वादकानं वाजवलेले पियानो संगीताचे अनेक तुकडे ऐकले. कुठेतरी ते त्याच्या मानसिक अवस्थेशी जुळणारे होते.

का कोण जाणे, पण त्याला त्याच्या बायकोविषयी किंवा तिची शय्यासोबत करणाऱ्या त्याच्या मित्राविषयी राग किंवा कडवटपणा वाटला नाही. झालेल्या फसवणुकीचा त्याला नक्कीच धक्का बसला होता. पण जसजसा काळ गेला, तसतसं त्याला वाटत गेलं की यावर कोणताही उपाय करण्यासारखा नव्हता. कारण जणू काही पहिल्यापासून हेच त्याच्या नशिबात लिहिलेलं होतं. तसं पाहिलं तर, त्याच्या आयुष्यात त्यानं आजवर काहीही विशेष कमावलेलं नव्हतं. तो पूर्णपणे बिनकामाचा होता. त्यानं कोणालाही आनंद दिला नव्हता,  आणि अर्थातच तो स्वतःलाही आनंदी ठेवू शकत नव्हता. आनंद? म्हणजे नक्की काय हे ही कदाचित त्याला माहित नव्हतं. त्याला दु:ख किंवा राग, नैराश्य किंवा निमूटपणे सहन करणे या भावना म्हणजे नक्की काय आणि त्याबद्दल काय वाटायला हवं याबद्दल नेमकी स्पष्टताच नव्हती. 

सद्यस्थितीत कोणतीही सखोलता किंवा वजन नसलेलं त्याचं हृदय उगाच इकडे तिकडे निरर्थकपणे न भटकता, एका जागी विसावू शकेल अशी एखादी जागा फक्त तो निर्माण करू शकत होता. ती जागा होती, मागच्या रस्त्यावरच्या जागेत कोंबलेला हा छोटासा बार, किनो. केवळ त्या जागेच्या रचनेमुळे नाही, तर अजूनही कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे ती एक चमत्कारिक आरामदायी जागा बनत गेली.

‘किनो’ ही एक आरामशीर जागा आहे हा शोध सर्वप्रथम कोणा मनुष्याला लागला नाही, तर ते समजलं एका भटक्या मांजरीला. करड्या रंगाच्या, लांब झुबकेदार शेपटी असलेल्या एका तरुण मांजरीला. बारच्या कोपऱ्यात असलेली एक शो-केस मांजरीला आवडली आणि तिथे शरीराचं मुटकुळं करून गुरफटून झोपणं तिला आवडू लागलं. त्या मांजरीला एकटीला राहायला आवडत असावं असा अंदाज बांधून किनोनंही तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. दिवसातून एकदा तो तिला खायला प्यायला द्यायचा, इतकंच. त्याच्यापेक्षा काहीही जास्त नाही. मात्र त्या मांजरीला तिच्या मर्जीप्रमाणे कधीही ये-जा करता यावी यासाठी त्यानं एक लहानसा दरवाजा तयार करून घेतला. 

****

त्यामांजरीचा पायगुण चांगला असावा कारण बार मधे ती मांजर यायला लागल्यापासून थोडेफार गिऱ्हाईक देखील यायला लागले. 

त्यातल्या ज्या लोकांना हा – एक छानसं विलोचं झाड असलेला, मध्यमवयीन मालक असलेला, तबकडीवर जुन्या रेकॉर्डस वाजत असलेला आणि मुटकुळं करून कोपऱ्यात झोपलेलं करडं मांजर असलेला छोट्याश्या गल्लीतला बार आवडायला लागला ते काही लोक नियमित हजेरी लावायला लागले. हे लोक येताना आपल्याबरोबर कधीकधी नवीन गिऱ्हाईक घेऊन यायला लागले. अगदी खूप यशस्वी नसला, तरी भाडं भरण्याइतकी आता त्या बारची कमाई होऊ लागली. किनोसाठी तितकं पुरेसं होतं. 

बार चालू झाल्यापासून दोन महिन्यांनी तो टक्कल असलेला तरुण माणूस बार मधे यायला लागला आणि त्यानंतर दोन महिन्यांनी किनोला त्याचं नाव ‘कामिता’ असं आहे हे समजलं.  

त्या दिवशी पिरपिर पाऊस पडत होता. असा पाऊस की बरोबर छत्री घ्यावी का नाही असा संभ्रम पडावा. बार मधे केवळ तीन गिऱ्हाईक होते, कामिता आणि सूट घातलेले दोन पुरुष. साडेसातची वेळ होती. नेहमीप्रमाणे, कामिता काऊंटरपासून सगळ्यात दूर असलेल्या खुर्चीवर बसून ‘पाणी घातलेली व्हाईट लेबल’ पीत वाचत बसला होता. ते दोन पुरुष एका टेबलपाशी बसून, पीनो न्वार (Pinot Noir) पित होते. बार मधे येतानाच त्यांच्याबरोबर ते ती बाटली घेऊन आले होते. त्यांनी पाच हजार येन रक्कम भरून त्या बाटलीतील वाइन पिण्याची किनोकडून परवानगी घेतली होती. किनोसाठी हा असा पहिलाच प्रसंग होता, पण हरकत घेण्याचं काही कारण त्याला दिसत नव्ह्तं. त्यानं ती बाटली उघडली. बरोबरीनं वाईन पिण्यासाठी दोन ग्लासेस आणि विविध प्रकारच्या दाण्यांनी भरलेली वाटी ठेवली. त्यात त्याला फारसे काहीच कष्ट पडले नाहीत. पण ते दोन पुरूष खूप धुम्रपान करत होते आणि सिगरेटचा धूर अजिबात न आवडणाऱ्या किनोला, म्हणूनच ते दोघं तितकेसे पसंत पडले नाहीत.  फारसं काही काम नसल्यानं किनो एका स्टूलावर बसला आणि कोलमन हॉकिन्सच्या रेकॉर्डमधलं ‘जोशुवा फिट द बॅटल ऑफ जेरीको’ हे गाणं ऐकू लागला. मेजर हॉलीनं सादर केलेला सोलो बास त्याला फार जबरदस्त वाटला. 

पहिल्यांदा त्या दोन माणसांच्या एकमेकांशी मस्त गप्पा चालल्या होत्या. ते आनंदानं वाईन पीत होते. पण नंतर कोणत्यातरी विषयावरून, तो विषय कोणता होता ते किनोला समजलं नाही, त्यांच्यातले मतभेद वाढले आणि त्या दोघांमधली वादावादी वाढतच गेली. एका टप्प्यावर त्यांच्यातला एकजण उठून उभा राहिला आणि त्यानं टेबल उलथवून टाकलं. टेबलावरचा सिगरेटच्या राखेनं भरलेला अॅशट्रे आणि वाईनचा एक ग्लास जमिनीवर पडून फुटले. किनो पटकन झाडू घेऊन पुढे सरसावला, त्यानं सगळा कचरा स्वच्छ केला आणि टेबलावर नवीन ग्लास आणि अॅशट्रे ठेवला. 

कामिता ह्या दोन माणसांच्या वागण्यानं अतिशय वैतागलेला दिसत होता. अर्थात, या घटकेपर्यंत किनोला त्याचं नाव कामिता आहे हे माहित नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नव्हते, पण एखाद्या पियानोवादन करणाऱ्या कलाकारनं पियानोच्या पट्ट्या वाजवाव्यात त्या प्रमाणे तो डाव्या हाताची बोटं काऊंटरवर वाजवत राहिला. ‘ही परिस्थिती मला काबूत आणायलाच हवी,’  किनोने विचार केला. तो त्या माणसांच्या जवळ गेला. ‘मला माफ करा’ तो नम्रपणे म्हणाला ‘पण कृपया तुम्ही खालच्या आवाजात बोलू शकाल का?”

त्यांच्यापै एकाने थंड नजरेनं किनोकडे पाहिलं आणि तो टेबल वरून उठला. किनोच्या हे आत्तापर्यंत लक्षात आलं नव्हतं की तो माणूस  धिप्पाड होता. पण सुमो रेसलरच्या देहयष्टी सारखा तो रुंद छातीचा, भल्यामोठ्या फुगीर हातांचा नव्हता. 

त्यातला दुसरा माणूस खूपच लहानखुरा होता. बारीक, अशक्त, धूर्त आणि सहजपणे लोकांना वाममार्गाला लागण्यास प्रवृत्त करणारा असावा असा. तो पण हळूहळू त्याच्या जागेवरून उठला, आणि आता ते दोघं किनोच्या समोर उभे ठाकले होते. 

त्या दोघांनी आपापसातलं भांडण थांबवलं होतं आणि एकत्र येऊन ते किनोशी बोलत होते. त्यांच्यामधे इतका कमालीचा ताळमेळ होता,  की जणूकाही ते दोघं गुप्त राहून नेमकी हीच परिस्थिती निर्माण होण्याची वाटच बघत होते. 

“म्हणजे तुला असं वाटतंय की तू असा अचानक येऊन आमच्या मधे हस्तक्षेप करु शकतोस?” त्या दोघातला धिप्पाड माणूस त्याच्या कठोर आणि घोगऱ्या आवाजात म्हणला. 

त्या दोघांनी घातलेले सूट महागातले असावेत असं वाटत होते, पण जवळून पाहिल्यावर मात्र ते हलक्या दर्जाचे आहेत हे कळून येत होतं. ते अव्वल दर्जाचे गुंड जरी नसले, तरी जे काही काम ते करत होते ते काही फारसं सन्माननीय, अधिकृत नसावं. त्या धिप्पाड माणसाच्या केसांचा क्रू कट होता, तर त्याच्या जोडीदाराचे केस तांबूस रंगाने रंगवलेले होते आणि मागे ओढून पोनीटेल मधे बांधलेले होते. काहीतरी वाईट घडणार आहे यासाठी किनोनं मनाची पूर्वतयारी केली. त्याला काखेत घाम फुटू लागला. 

“माफ करा पण..” दुसरा एक आवाज ऐकू आला. 

किनोनं मागे वळून पाहिलं तर त्याला कामिता उभा असलेला दिसला.

“तुम्ही इथे काम करणाऱ्या माणसांना जबाबदार ठरवू नका,” किनोकडे बोट दाखवून कामिता म्हणाला. 

“तुम्ही हळू आवाजात बोलावं ही विनंती करण्यासाठी मी त्याला सांगितलं होतं. आवाजामुळे चित्त एकाग्र करणं अवघड होतं आणि मी माझं पुस्तक वाचू शकत नाही”

कामिताचा आवाज शांत, नेहमीपेक्षा अधिक कोरडा होता. पण काहीतरी, न दिसणारं, ढवळून निघायला सुरुवात झाली होती. 

“मी माझं पुस्तक वाचू शकत नाही” तो लहानखुरा दिसणारा माणूस उत्तरला. जणू काही वाक्य उच्चारताना कोणतीही चूक झाली नाही ना, हे तो आजमावून पहात होता. 

“तुला घर बिर काही नाहीये का?” त्या धिप्पाड माणसानं कमिताला विचारलं. 

“मला घर आह,”’ कामिताने उत्तर दिलं. “मी इथून जवळच राहतो.”

“मग तू घरी जाऊन तिथंच का वाचत नाहीस?”

“मला इथं बसून वाचायला आवडतं” कामिता म्हणाला. 

त्या दोन माणसांनी एकमेकांकडे पाहिलं. 

“ते पुस्तक मला दे,” तो बारकुडा माणूस म्हणला ” मी तुला वाचून दाखवतो.”

“मला शांतपणे एकटं बसून माझं माझंच वाचायला आवडतं,” कामिता म्हणाला, “आणि कोणत्याही शब्दाचा चुकीचा उच्चार केलास तर मला तुझा राग येईल.”

” तू स्वतःच एक नमुना आहेस असं नाही का वाटत?” तो धिप्पाड माणूस म्हणला, “काय मजेशीर माणूस आहे!”

“तुझं नाव काय म्हणालास?” पोनीटेल बांधलेल्यानं विचारलं. 

“माझं नाव कामिता’ तो म्हणला. ते लिहिताना ‘देव’ – कामि ह्या अर्थाचा एक शब्द आणि ‘क्षेत्र’ या अर्थाचा दुसरा शब्द एकत्रित लिहितात. देवाचे क्षेत्र असा अर्थ होतो त्याचा. पण त्याचा उच्चार तुम्हाला वाटतोय तसा ‘काण्डा’ असा होत नाही. त्याचा उच्चार आहे कामिता.”

“मी हे लक्षात ठेवीन,” धिप्पाड माणूस म्हणाला.

“चांगली कल्पना आहे. आठवणी उपयुक्त असतात,” कामिता म्हणाला. 

“असो. पण आपण जरा बाहेर जाऊयात का?” तो लहानखुरा माणूस म्हणाला “म्हणजे आपल्याला नेमकं जे म्हणायचं आहे ते म्हणता येईल.”

“मला चालेल,” कामिता म्हणाला ” तुम्ही म्हणाल तिथे जाऊ. पण त्याआधी तुम्ही तुमचं बिल देता का? तुमच्यामुळे या बारचं काही नुकसान व्हायला नको”.

****

कामितानं किनोला त्या दोघांचे बिल आणण्यास सांगितलं आणि स्वतःच्या पेयाचे बरोब्बर पैसे मोजून काऊंटरवर ठेवले. पोनीटेलवाल्या माणसानं खिशातून दहा हजार येनची नोट काढली आणि टेबलावर भिरकावली. 

“मला सुट्टे पैसे परत नको आहेत,” पोनीटेलवाला किनोला म्हणला “त्यापेक्षा तू तुझ्यासाठी चांगल्या प्रतीचे वाईन ग्लासेस का घेत नाहीस? ही उंची वाईन आहे, आणि अश्या कमी प्रतीच्या ग्लासमधून प्यावी लागली की ती बेचव लागते.”

“कसला भिक्कार दर्जाचा बार आहे हा!”  तो धिप्पाड माणूस तिरस्कारपूर्वक उत्तरला. 

“बरोब्बर. भिक्कार बार आणि भिक्कार गिऱ्हाईक,”  कामिता म्हणाला. “ही जागा तुमच्यासारख्यांसाठी योग्य नाही. दुसरी कोणतीतरी असावी. अर्थात ती दुसरी जागा कोणती हे काही मला माहित नाही.”

“तू शहाणा माणूस असशील असं वाटलं होतं” तो धिप्पाड माणूस म्हणाला. पण, तू हास्यास्पद बोलतो आहेस.”

” मी बोलतोय त्यावर नंतर शांतपणे विचार कर आणि मनसोक्त हसून घे,” कामिता म्हणाला. 

“मी कुठे जावं हे कोणत्याही परीस्थीतीत तू मला सांगू शकत नाहीस,” पोनीटेलवाला म्हणला. भक्ष्यावर नजर पडल्यावर एखाद्या सापाची जीभ लवलवावी, तसं शांतपणे त्याने आपल्या ओठांवरुन जीभ फिरवली. 

त्या धिप्पाड माणसानं दार उघडलं आणि तो बाहेर पडला. पोनीटेलवाला देखील त्याच्या पाठोपाठ बाहेर गेला. कदाचित वातावरणातला तणाव जाणवून, पावसाळी हवा असूनही मांजर देखील त्यांच्यापाठोपाठ बाहेर निसटलं. . 

“तुम्ही नक्की ठीक आहात ना?” किनोने कामिताला विचारलं. 

“काळजीचं काही कारण नाही,” स्मितहास्य करत कामिता म्हणला “तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, मि. किनो. काहीही हालचाल न करता इथेच थांबा. हे सगळं लवकरच संपेल.”

कामिता बाहेर पडला आणि त्यानं दार बंद केलं. आधीपेक्षा आता पावसाला जास्त जोर चढला होता. किनो एका स्टूलावर बसून वाट पाहू लागला. बाहेर विचित्र शांतता होती. त्याला कसलाच आवाज ऐकू येत नव्हता. जणू काही एखादा प्रशिक्षित कुत्रा आपल्या धन्याची वाट पहात असावा त्याप्रमाणे काऊंटरवर कामिताचं उघडलेलं पुस्तक तसंच पडलेलं होतं. साधारण दहा मिनीटांनी दरवाजा उघडला आणि कामिता एकटाच धडपडत आत शिरला. 

“शक्य असेल तर तू मला एक टॉवेल देशील का?” त्यानं विचारलं.

किनोनं त्याला स्वच्छ टॉवेल दिला आणि कामितानं त्याचं डोकं पुसलं. नंतर मान, चेहरा आणि शेवटी दोन्ही हात पुसले. ” धन्यवाद. आता सगळं व्यवस्थित आहे,” तो म्हणाला “यापुढं ते दोघं इथं परत कधीही चेहरा दाखवायला फिरकणार नाहीत.”

“असं नेमकं काय घडलं?”

कामितानं नुसती मान डोलावली. जणू काही “तुला ते माहित नसेल तरच उत्तम आहे,” असं त्याला सुचवायचं असावं. तो त्याच्या जागेवर गेला, त्याची उरलेली व्हिस्की पिऊन संपवली आणि पुस्तक जिथं अर्थवट सोडलं होतं तिथून त्यानं ते वाचायला सुरुवात केली.

त्या दिवशी संध्याकाळी, कामिता गेल्यानंतर, किनोनं बाहेर जाऊन बारच्या परिसरात चक्कर मारली. गल्ली एकदम सुनसान आणि शांत होती. मारामारीची कोणतीही चिन्ह किंवा रक्ताचे डाग नव्हते. नक्की काय घडलं असावं याचा त्याला अंदाज येत नव्हता. तो परत बार मधे गेला आणि गिऱ्हाईकांची वाट पहात बसला. पण त्या रात्री बारमधे कोणतंच गिऱ्हाईक आलं नाही. ती मांजर देखील परत आली नाही. त्यानं स्वतःसाठी थोडी व्हाईट लेबल ओतली, त्यात तितकंच पाणी घातलं, बर्फाचे दोन तुकडे घातले आणि पेयाची चव घेतली. तुम्हाला वाटतंय त्याप्रमाणे यात तसं काहीच खास नव्हतं. पण तरीही त्या रात्री किनोला दारू पिण्याची नितांत गरज भासली होती. 

****

या घटनेनंतर साधारण एका आठवड्यानं, किनोनं एका स्त्री गिऱ्हाईकासोबत शय्यासोबत केली. बायकोपासून वेगळं झाल्यापासून ती पहिली स्त्री होती जिच्याबरोबर किनोनं सेक्स अनुभवला. ती साधारण तिशीची असावी, किंवा कदाचित त्याहून थोडी मोठी. तिची सुंदर स्त्रियांत गणना होईल की नाही याबाबत त्याला खात्री नव्हती, पण तिच्यामधे ठळकपणे जाणवणारी काहीतरी खास गोष्ट होती.

ती स्त्री पूर्वी अनेकवेळा त्याच्या बार मधे आली होती. तिच्याबरोबर नेहमी एक साधारण तिच्याच वयाचा, कासवाच्या पाठीवर असतं तश्या डिझाईनचा चष्मा घातलेला आणि बिटनीक सारखी हनुवटीवर गोटी दाढी ठेवलेला माणूस असायचा. त्याचे केस नेहमी विस्कटलेले असायचे आणि त्याच्या मानेभोवती कधीही टाय बांधलेला नसायचा. त्यामुळे तो सर्वसाधारण कंपनी कामगार नसावा असा किनोनं अंदाज बांधला होता. ती स्त्री नेहमी घट्ट ड्रेस घालायची. त्यामधून तिचा सडपातळ, नेटका बांधा दिसून यायचा. ते बार काऊंटरपाशी बसायचे आणि कॉकटेल किंवा शेरी पिता पिता कधी कधी मधूनच एक दोन शब्द कुजबुजत बोलायचे. ते कधीच जास्त वेळ तिथे थांबले नाहीत. किनोचा अंदाज होता की सेक्स करण्याआधी ते दारू पीत असावेत. किंवा कदाचित सेक्स करुन झाल्यावर. नेमकी पद्धत त्याला सांगता आली नसती, पण ज्या पद्धतीनं ते दारू प्यायचे ते पाहून त्याला नेहमी सेक्सची आठवण व्हायची. खूप वेळ चाललेला, उत्कट सेक्स, संभोग. ते दोघं लक्षणीयरित्या भावनाशून्य होते. खास करुन ती स्त्री. किनोनं तिला कधीही हसताना पाहिलं नव्हतं. ती जेव्हा कधी त्याच्याशी बोलायची तेव्हा तिच्या बोलण्यात नेहमी बारमधे चालू असलेल्या संगीताचा विषय असायचा. तिला जॅझची आवड होती आणि ती स्वतः एल.पी. रेकॉर्ड्सचा संग्रह करणारी होती. “माझे वडील आमच्या घरी हे संगीत ऐकायचे,” तिनं त्याला सांगितलं, “हे संगीत ऐकल्यावर माझ्या त्या जुन्या आठवणी ताज्या होतात.”  

तिच्या बोलण्यावरून त्या आठवणी संगीताबद्दल होत्या की तिच्या वडिलांबद्दल हे किनोला सांगता येत नसे. पण त्यानं कधी ते विचारायची हिंमत केली नाही. 

वास्तविक पाहता या स्त्रीशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवण्याचं किनोनं प्रयत्नपूर्वक टाळलं होतं. त्याचं तिच्याशी मैत्रीपूर्वक वागणं तिच्या बरोबरच्या त्या माणसाला नापसंत होतं. टोकियो मधल्या दुकानात जुन्या रेकॉर्डची अदलाबदली करण्याबद्दल आणि रेकॉर्डची योग्य ती निगराणी घेण्याबद्दल एकदा किनोचं त्या स्त्री बरोबर बराच वेळ बोलणं झालं होतं. त्यानंतर तो माणूस त्याच्याकडे थंड, संशयास्पद नजरेनं पहात राहिला होता. किनो शक्यतो कोणत्याही प्रकारच्या गुंत्यापासून दूर राहण्याची काळजी घेणारा होता. दुस्वास आणि दुराभिमानाइतकी कोणतीही गोष्ट वाईट नाही आणि या गोष्टींमुळे किनोला एकापेक्षा अधिक वेळा वाईट अनुभव आले होते. काही वेळा किनोला जाणवत असे की लोकांच्या प्रवृत्तीची गडद बाजू ढवळून निघेल असं काहीतरी त्याच्यामधे होतं.

परंतु त्या रात्री ती स्त्री एकटीच बार मधे आली. त्यावेळी इतर कोणतंही गिऱ्हाईक नव्हतं. ती दरवाजा उघडून आत आली तेव्हा तिच्या सोबत थंडगार हवेचा झोत आत शिरला. ती काऊंटरपाशी बसली आणि तिनं ब्रँडी मागवली. “शक्य असेल तर काहीतरी खूप जुनं ऐकव,” असं म्हणत तिनं किनोला बिली हॉलीडेचं संगीत लावण्यास सांगितलं. किनोनं रेकॉर्डरवर ‘जॉर्जिया ऑन माय माइंड’ हे गाणं असलेली कोलंबिया कंपनीची रेकॉर्ड ठेवली. ते दोघं शांतपणे गाणं ऐकत बसले. जेव्हा ते संपलं तेव्हा, “तू दुसरी बाजू देखील लावू शकशील का? ” असं तिनं विचारलं. किनोनं तिच्या विनंतीला मान दिला. 

तिनं एरोल गारनरची ‘मूनग्लो’, बडी डीफ्रान्को ची ‘आय कान्ट गेट स्टार्टेड’ अशा काही रेकॉर्ड्स ऐकत हळूहळू तीन ब्रँडी रिचवल्या. आधी किनोला वाटलं की ती त्या माणसाची वाट पाहात थांबली आहे. पण तिनं एकदाही मनगटावरच्या घड्याळावर नजर टाकली नाही. ती संगीत ऐकत, विचारात मग्न, ब्रँडी पित नुसतीच तिथे बसून राहिली. 

“तुझा मित्र आज येणार नाही का?” बार बंद होण्याची वेळ जवळ येत चालली तसं किनोनं विचारायचं ठरवलं. 

“तो येणार नाहीये. तो खूप लांब आहे,” ती स्त्री म्हणाली. ती स्टुलावरून उठली आणि जिथे मांजर झोपली होती तिथे चालत गेली. तिनं मांजराच्या पाठीवरून हळूवारपणे आपली बोटं फिरवली. कोणतीही दखल न घेता, मांजरी झोपून राहिली. 

“आम्ही एकमेकांना यापुढे परत कधीही न भेटण्याचा विचार करत आहोत,” ती स्त्री म्हणाली. 

तिला काय प्रतिसाद द्यावा हे किनोला सुचलं नाही, त्यामुळे तो काहीच बोलला नाही आणि काऊंटरच्या मागील भागातील गोष्टींची आवराआवरी करत राहिला. 

“कसं सांगावं ते मला कळत नाहीये” ती स्त्री म्हणाली. तिनं मांजराला थोपटणं थांबवलं आणि उंच टाचांच्या चपलांचा आवाज करत ती बारपाशी परतली. “आमचं नातं तसं फारसं नेहमीसारखं नव्हतं.”

“नेहमीसारखं नव्हतं” शब्दांचा नक्की अर्थ काय हे समजून न घेता किनोने तिचेच शब्द परत उच्चारले. 

तिनं ग्लासमधे उरलेली थोडीशी ब्रँडी संपवली. “माझ्याजवळचं काहीतरी मला तुला दाखवायचं आहे, मि. किनो” ती म्हणाली. 

ते जे काही होतं ते ते बघण्याची त्याला इच्छा नव्हती याविषयी किनोला खात्री होती. पण तरीही ‘नाही’ हा शब्द उच्चारणं त्याला शक्य झालं नाही. 

त्या स्त्रीनं तिच्या अंगावरचं लोकरीचं जॅकेट काढलं आणि स्टुलावर ठेवलं. तिनं तिचे दोन्ही हात मागे घेऊन तिच्या ड्रेसची चेन उघडली. तिनं किनोकडे तिची पाठ केली. तिच्या ब्रेसियरच्या पांढर्या पट्ट्याच्या थोडसं खाली त्याला जळलेल्या कोळशाच्या रंगाचे डाग उमटलेले दिसले. ते पाहून त्याला हिवाळी आकाशातील नक्षत्रांची आठवण झाली. जणू काही विझलेल्या ताऱ्यांचा एक काळसर पट्टा!

ती स्त्री काहीही बोलली नाही. तिनं फक्त तिची उघडी पाठ किनोला दाखवली. एखाद्याला विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ देखील समजू नये, त्याप्रमाणे किनो त्या डागांकडे फक्त बघत राहिला. अखेरीस तिनं चेन बंद केली आणि वळून त्याच्याकडे चेहरा करुन उभी राहिली. तिनं तिचं लोकरीचं जाकीट अंगावर घातलं आणि केस नीटनेटके केले. 

“हे सिगरेटचे चटके आहेत,” ती स्पष्टपणे म्हणाली. 

किनोला शब्द सुचत नव्हते. पण त्याला काहीतरी बोलणं भाग होतं. ” हे असं तुला कोणी केलं” कापऱ्या आवाजात त्यानं विचारलं.

त्या स्त्रीनं उत्तर दिलं नाही. किनोला जाणवलं की तो उत्तराची अपेक्षाही करत नव्हता. 

“माझ्या अंगावर हे चटक्यांचे डाग इतर जागी देखील आहेत,” भावनाशून्य आवाजात अखेरीस ती बोलली “अश्या जागा…. ज्या दाखवायला थोड्या कठीण आहेत.”  

****

अगदी पहिल्यापासूनच ह्या स्त्रीबद्दल वेगळं, विलक्षण असं काहीतरी किनोला जाणवलं होतं. कशामुळे तरी एक आंतरिक जाणीव निर्माण झाली होती जी सतत त्याला या स्त्री मधे न गुंतण्याविषयी सावधानता बाळगण्यास सांगत होती. स्वभावतः तो एक सावध मनुष्य होता. जर कधी त्याला अगदीच स्त्रीसुखाची इच्छा निर्माण झाली असती तर त्यानं शरीर व्यवसाय करणाऱ्या स्त्री बरोबर सुख घेतलं असतं. शिवाय इथे तर असंही नव्हतं की तो त्या स्त्री कडे आकर्षला गेला होता. 

पण त्या रात्री  सेक्स करण्यासाठी तिला एका पुरूषाची नितांत गरज भासत होती आणि असं वाटत होतं की तो माणूस किनो असावा. तिचे डोळे उथळ होते. तिची बुबुळं विवक्षितरीत्या विस्फारलेली होती पण त्यामधे एक करारी चमक होती ज्यापुढे माघार घेणं शक्य नव्हतं. विरोध करायची शक्ती किनोमधे नव्हती. 

त्यानं बारला कुलुप लावलं आणि दोघं वरच्या मजल्यावर गेले. बेडरूम मधे गेल्यावर त्या स्त्रीनं झटकन तिचे कपडे उतरवले, तिची अंतर्वस्त्र काढली आणि दाखवण्यासाठी अवघड जागा होत्या त्या किनोला दाखवल्या. किनोनं पहिल्यांदा नजर फिरवली, पण नंतर पाहण्यासाठी पुन्हा वळवली. कोणी पुरुष इतकं क्रुर काही करू शकतो किंवा कोणी स्त्री तिच्या मर्जीनं असं काही सहन करू शकते हेच किनोला समजत नव्हतं किंवा समजून घ्यायचंही नव्हतं. किनो राहत होता त्या जगापेक्षा हजारो वर्ष दूर असलेल्या, कोण्या ओसाड ग्रहावरचं ते एक खुनशी, भयावह दृष्य होतं.

त्या स्त्रीनं किनोचा हात हातात घेतला. आणि एकानंतर एक प्रत्येक डागाला त्याच्या हाताचा स्पर्श होईल अशा पद्धतीनं त्या डागांवरुन फिरवला. तिच्या छातीवर जखमा होत्या आणि तिच्या गुप्तांगाच्या जवळील भागावरही. जणू काही पेन्सिलीनं बिंदू जोडावेत त्याप्रमाणे त्यानं त्या काळ्या, कठीण डागांवरुन हात फिरवला. त्या जखमांमुळे तयार होणाऱ्या आकारामुळे त्याला कसली तरी आठवण येत होती, पण ते नक्की काय होतं हे काही त्याला समजत नव्हतं. 

जमिनीवर पसरलेल्या चटईवर त्यांनी सेक्स केला. त्यांच्यात काही बोलणं झालं नाही. प्रणय घडला नाही. इतकंच नाही तर दिवे बंद करायला किंवा पलंगावर आडवं व्हायलाही वेळ मिळाला नाही. त्या स्त्रीची जीभ त्याच्या मानेवरुन खाली सरकत राहिली आणि तिची नखं त्याच्या पाठीत रुतली. पेटलेल्या दिव्याखाली जणू दोन भुकेल्या जनावरांनी त्यांच्या भक्ष्याला खाऊन टाकलं. बाहेर जेव्हा पहाटेचं उजाडायला लागलं, ते पलंगावर सरकले आणि अंधारात खेचल्याप्रमाणे झोपून गेले. 

मध्यान्ह होण्यापूर्वी किनोला जाग आली. ती स्त्री निघून गेली होती. जणू काही एखाद्या सत्याच्या जवळ जाणारं स्वप्न पाहिल्यासारखं त्याला वाटलं. पण अर्थातच ते स्वप्न नव्हतं. त्याच्या पाठीवर ओरखडे होते, त्याच्या हातांवर चावल्याच्या खुणा होत्या आणि त्याचं लिंग हलक्याश्या वेदनेनं पिळवटल्यासारखं वाटत होतं. त्याच्या उशीच्या पांढऱ्या अभ्र्यावर लांब काळ्या केसांचे अनेक धागे होते आणि चादरींना पूर्वी कधीही आला नव्हता असा दाट वास येत होता. 

त्यानंतर ती स्त्री अनेक वेळा बारमधे आली. ती नेहमीच त्या दाढीवाल्या माणसाबरोबर असायची. ते काऊंटरला बसायचे, एखाद दुसरं पेय पिताना हलक्या आवाजात काहीतरी बोलायचे आणि निघून जायचे. ती स्त्री किनोबरोबर मुख्यतः संगीताविषयी थोडंफार बोलायची. जणू काही त्या रात्री त्यांच्यामधे जे काही घडलं त्याची आठवणही नसल्यासारखा तिचा आवाज पूर्वीसारखाच असायचा. तरीही किनोला एखाद्या खोलवर खाणीत असलेल्या क्षीण दिव्याप्रमाणे भासणारी तिच्या नजरेतली उत्सुकतेची झलक जाणवायची. त्याच्या मनात घडलेल्या गोष्टींच्या – त्याच्या पाठीवर उमटलेल्या तिच्या नखांच्या ओरखाड्यांच्या, त्याच्या दुखऱ्या लिंगाच्या, तिच्या लांब निमुळत्या जिभेच्या, त्याच्या चादरीवरील गंधाच्या – आठवणी अस्फुटपणे तरळून जायच्या. 

जेव्हा तो त्या स्त्रीशी बोलायचा, तिच्याबरोबरचा माणूस किनोचे हावभाव आणि वागणूक लक्षपूर्वक न्याहाळायचा. जणू काही त्या दोघांनाच माहित असणारं एखादं गूढ गुपित त्यांच्यात असावं तसं त्या दोघांभोवती घट्ट विळखा घातलेलं काहीतरी आहे असं किनोला जाणवत असे. 

****

उन्हाळा संपण्याच्या सुमारास किनोला घटस्फोट मिळाला. एका दुपारी, बार उघडण्याच्या आधी, तो आणि त्याची बायको अखेरच्या काही गोष्टी निकालात काढण्यासाठी भेटले. 

न्यायालयीन मुद्दे पटकन निकालात निघाले आणि त्या दोघांनी आवश्यक त्या कागदपत्रांवर सह्या केल्या. ते भेटले तेव्हा किनोच्या बायकोनं केस लहान कापले होते आणि तिनं निळ्या रंगाचा नवीन ड्रेस घातला होता. पूर्वीपेक्षा ती अधिक निरोगी आणि आनंदी दिसत होती. तिनं एक नवीन आणि नक्कीच अधिक परिपूर्ण आयुष्य जगायला सुरुवात केली होती. तिनं बारवर एक नजर टाकली. “काय सुरेख जागा आहे,” ती म्हणाली, “शांत, स्वच्छ आणि निवांत – एकदम तुझ्यायोग्य”. त्यानंतर काही क्षण शांततेत गेले. “पण तुझ्या मनात भावना निर्माण होतील असं इथे काहीच नाहीये,”  हे असं काहीसं तिला पुढे बोलायचं होतं असा किनोला भास झाला. 

“तुला काही प्यायला हवं आहे का?” त्यानं विचारलं. 

“तुझ्याकडे असेल, तर थोडी लाल वाईन चालेल.”   

किनोनं दोन वाईन ग्लासेस काढले आणि थोडी नापा झिनफिंन्डेल वाईन ओतली. त्या दोघांनी शांततेत वाईन प्यायली. त्यांच्या घटस्फोटाकरता ते ग्लासेस उंचावून शुभेच्छा व्यक्त करणार नव्हते. हळूहळू पावलं टाकत मांजर त्यांच्याजवळ आलं, आणि आश्चर्य म्हणजे त्यानं किनोच्या मांडीत उडी मारली. किनोनं त्याला कानामागे थोपटलं. 

“मला तुझी माफी मागायची आहे,” अखेरीस त्याची बायको म्हणाली.

“कशासाठी?” किनोनं विचारलं.

“तुला दुखावल्याबद्द्ल,” ती उत्तरली. “तू थोडासा का होईना दुखावला गेलास. होय ना?”

“असं वाटतंय,” थोडा विचार करून किनो म्हणाला. “शेवटी मी देखील माणूसच आहे. मी दुखावला गेलो होतो. पण खूप दुखावलो होतो की थोडासाच ते मात्र सांगता येणार नाही.” 

“मला तुला भेटायचं होतं आणि तुझी माफी मागायची होती.” 

किनोनं मान डोलावली. ” मी तुला माफ केलं आहे आणि तुझी माफी स्वीकारली आहे. त्याबद्दल यापुढे काळजी करण्याचं कारण नाही.” 

“काय चाललं होतं ते मला तुला सांगायचं होतं, पण ते सांगण्यासाठी माझ्याजवळ शब्द नव्हते.” 

“पण तरीही आपण याच ठिकाणी पोचलो असतो असं नाही का वाटतं?” 

“कदाचित.” त्याची बायको म्हणाली. 

किनोनं वाईनचा एक घोट घेतला. 

“यात कोणाचाच दोष नाही.” तो म्हणला ” त्या दिवशी मी लवकर घरी यायला नको होतं. किंवा मी येणार आहे हे तुला सांगायला हवं होतं. म्हणजे आपल्याला त्या प्रसंगातून जावं लागलं नसतं.” 

त्याची बायको काहीच बोलली नाही. 

“तू त्या माणसाला कधीपासून भेटायला लागली होतीस?” किनोनं विचारलं. 

“मला नाही वाटत आपण त्याबद्दल काही बोलावं.” 

“मला माहित नाहीये तेच योग्य आहे असं म्हणायचं आहे का तुला? कदाचित तुझं बरोबर आहे,” किनोनं कबूल केलं. तो मांजराला थोपटत राहिला आणि मांजर आतल्याआत समाधानानं गुरगुरत राहिलं.  ही अजून एक गोष्ट देखील आयुष्यात प्रथमच घडणारी होती. 

“कदाचित मला हे बोलायचा अधिकार नाहीये,” त्याची बायको म्हणाली. “पण मला असं वाटतं की जे झालं आहे ते विसरून तू नवीन कोणीतरी शोधणं तुझ्यासाठी चांगलं ठरेल.” 

“कदाचित” किनो म्हणाला.

“मला माहित आहे बाहेरच्या जगात तुझ्यासाठी योग्य अशी स्त्री नक्की असेल. तिला शोधणं इतकंही कठीण असणार नाही. तुझ्यासाठी ती व्यक्ती मी नव्हते आणि मी भयानक वागले. मला त्याबद्दल फार वाईट वाटतं. पण पहिल्यापासूनच आपल्या दोघांमधे काहीतरी योग्य, काहीतरी बरोबर नव्हतं – जणू काही शर्टाची बटणं खाली-वर लावलेली असावीत तसं. मला वाटतं आता तू एक जास्त अर्थपूर्ण आणि आनंदी आयुष्य जगू शकशील.”

खाली-वर लावली गेलेली शर्टाची बटणं… किनो विचारात बुडला. 

तिनं घातलेल्या नवीन ड्रेसकडे त्यानं पाहिलं. ते दोघं एकमेकांसमोर बसले होते, त्यामुळे त्या ड्रेसला मागच्या बाजूला चेन आहे की बटनं आहेत याचा त्याला अंदाज बांधता येत नव्हता. पण तरीही तिच्या ड्रेसची चेन उघडली किंवा बटनं काढली तर नजरेला काय दिसेल याबद्दल विचार केल्याशिवाय त्याला राहवत नव्हतं. तिच्या शरीरावर आता त्याचा हक्क नव्हता, त्यामुळे तो फक्त कल्पना करु शकत होता. जेव्हा त्यानं डोळे बंद केले तेव्हा त्याला तिच्या नितळ पांढऱ्या पाठीवर असंख्य काळपट जळके डाग जंतासारखे वळवळताना दिसले. ते दृश्य नजरेसमोरून झटकून टाकण्यासाठी त्यानं मान हलवली. कदाचित त्याच्या बायकोनं या कृतीचा भलताच अर्थ घेतला असं त्याला वाटलं.

तिनं हलकेच त्याच्या हातावर तिचा हात ठेवला “मी माफी मागते. मी खरंच मनापासून तुझी माफी मागते.”  ती म्हणाली.

****

शिशिर ऋतूची चाहूल लागली आणि मांजरी गायब झाली. 

ती निघून गेली आहे हे समजायला किनोला काही दिवस लागले. ही निनावी मांजर तिला हवं तेव्हा बार मधे येत असे आणि अनेकदा काही दिवस फिरकतही नसे. त्यामुळे आठवडाभर किंवा कधी कधी दहा दिवस मांजर दिसली नाही, तरी किनो फारशी काळजी करत नसे. त्याला ती मांजर आवडायची आणि मांजरीचा देखील त्याच्यावर विश्वास असावा असं वाटायचं. ती मांजर त्याच्या बारसाठी शुभशकूनी होती. बारमधे जोवर कोपऱ्यात मांजर झोपलेली आहे तोपर्यंत काहीही अघटित घडणार नाही असा किनोचा ठाम विश्वास होता. पण जेव्हा दोन आठवड्याचा कालावधी उलटून गेला तेव्हा त्याला काळजी वाटायला लागली. तीन आठवडे उलटून गेल्यानंतर ‘आता काही मांजर परत येणार नाही’ असं त्याची अंतःप्रेरणा त्याला सांगू लागली.

मांजर गायब झाल्याच्या कालावधीतच, किनोला इमारतीच्या जवळ, बाहेरच्या बाजूला साप दिसायला लागले. 

त्यानं पाहिलेला पहिला साप हलक्या करड्या रंगाचा आणि लांबलचक होता. अंगणात असलेल्या विलोच्या झाडाच्या सावलीत तो वेटोळं घालून निवांतपणे पहुडला होता. हातात बाजारातून आणलेलं सामान घेऊन दरवाज्याचं कुलुप काढत असताना किनोला तो दिसला. टोकियोमधे भर वस्तीत साप दिसणं तसं दुर्मिळ होतं. त्याला थोडं आश्चर्य वाटलं, पण त्यानं त्याबद्दल काळजी केली नाही. त्याच्या इमारतीमागेच मोठ्ठी बाग असलेलं नेझू संग्रहालय होतं. तिथे सापाची वस्ती असणं अजिबातच अकल्पनीय नव्हतं. 

पण दोन दिवसांनी मध्यान्हीपूर्वी त्यानं वर्तमानपत्र घेण्यासाठी दार उघडलं तेव्हा त्याला नेमक्या त्याच जागी एक दुसरा साप दिसला. हा निळसर रंगाचा साप आधीच्या सापापेक्षा लहान आणि विळविळीत होता. जेव्हा त्या सापानं किनोला पाहिलं, तो थांबला, त्यानं डोकं वर काढलं, आणि जणू काही त्याला ओळखत असल्यासारखं किनोकडे निरखून पाहिलं. नक्की काय करावं हे न सुचून किनो घुटमळला. त्या सापानं हळूहळू डोकं खाली घेतलं आणि सावलीत अदृश्य झाला. ह्या सगळ्या प्रकारानं किनोच्या अंगावर काटा आला. 

तीन दिवसांनंतर त्यानं तिसरा साप पाहिला. तो देखील समोरच्या अंगणातल्या विलोच्या झाडाखाली होता. हा साप आधीच्या सापांपेक्षा खूपच लहान आणि रंगानं काळसर होता. किनोला सापांबद्दल काहीही माहिती नव्हती, पण हा साप त्याला सगळ्यात धोकादायक वाटला. का कोण जाणे पण तो विषारी असावा असं दिसत होतं. ज्या क्षणी त्याला किनोची चाहूल लागली, तो सरपटत झाडीत निघून गेला. एका आठवड्याच्या कालावधीमधे तीन साप दिसणं हे तुम्ही कसंही समजा पण नक्कीच खूप अति प्रमाणात होतं. काहीतरी विचित्र घडत होतं. 

किनोनं त्याच्या इझु मधे राहणाऱ्या मावशीला फोन केला. आजूबा़जूला घडणाऱ्या घटनांबद्दल तिला खबरबात देऊन, आओयामा मधे घराभोवती तिनं पूर्वी साप पाहिले होते का? याबद्दल त्यानं विचारणा केली. 

“साप?” त्याची मावशी आश्चर्यचकित होऊन मोठ्यानं चित्कारली. “मी तिथे खूप काळ राहिले, पण कधीही साप पाहिल्याचे स्मरणात नाही. मला वाटतंय ही भूकंप होण्याची किंवा काहीतरी घडण्याची चाहूल असावी. प्राण्यांना येणाऱ्या आपत्तीची चाहूल लागते आणि ते विचित्र वागायला लागतात.” 

“हे जर खरं असेल तर मला संकटकाळासाठी रेशनची, साहित्याची तरतूद करून ठेवायला हवी” किनो म्हणाला. 

“ही कल्पना चांगली आहे. टोकियाला एक दिवस नक्कीच मोठ्या भूकंपाचा धक्का बसणार आहे.”

“पण साप भूकंपाला संवेदनाशील असतात का?”

“ते कशाबाबतीत संवेदनाशील असतात ते मला माहित नाही” त्याची मावशी म्हणली ” पण साप खूप हुशार प्राणी असतात. पुराणकालीन आख्यायिकांमधे ते अनेकदा माणसांना मार्गदर्शन करताना आढळतात. पण जेव्हा एक साप तुम्हाला मार्गदर्शन करतो तेव्हा तुम्हाला हे माहित नसतं की तो साप तुम्हाला चांगल्या दिशेकडे घेऊन जात आहे की वाईट दिशेकडे.  बहुतांशी प्रकरणांमधे हा चांगल्या आणि वाईटाचा संगम असतो.”

“हे संदिग्ध आहे,” किनो म्हणाला. 

“बरोबर आहे. साप हेच मुळात संदिग्ध प्राणी आहेत. ह्या कथांमधे सगळ्यात बलशाली, बुद्धीमान साप त्याचं हृदय त्याच्या शरीराच्या बाहेर कुठेतरी लपवून ठेवतो, ज्यामुळे त्याला सहजी मारता येणार नाही. तुम्हाला अशा सापाला मारायचं असेल, तर त्याच्या अनुपस्थित तुम्हाला त्याच्या लपण्याच्या जागी जायला हवं, त्याचं धडधडणारं हृदय शोधून काढून त्याचे दोन तुकडे करायला हवे. हे काम नक्कीच सोपं नाही.” 

त्याच्या मावशीला हे सगळं कसं काय माहित होतं? 

“काही दिवसांपूर्वी मी एन.एच.के. चॅनेल वर जगभरातल्या विविध आख्यायिकांची तुलना करणारा एक कार्यक्रम पहात होते.” तिनं स्पष्ट करून सांगितलं. “आणि कुठल्याश्या विद्यापीठातला एक प्राध्यापक याबद्दल बोलत होता. टीव्ही पाहणं खूप उपयोगी असतं. तुला जेव्हा वेळ होईल तू जास्तीत जास्त टीव्ही पहायला हवा.” 

आपल्या घराला सापांनी घेरलं आहे असं आता किनोला वाटायला लागलं. त्यानं बार बंद केल्यावर आजूबाजूचा परिसर मधूनच येणारा भोंग्यांचा आवाज सोडला तर किर्र शांत असायचा. अशा रात्रीच्या वेळी त्याला सापांचा निश्चल वावर देखील जाणवत होता. कोणताही साप घरात शिरू नये म्हणून त्यानं एक लाकडी फळकूट घेतलं, आणि मांजराला येण्याजाण्यासाठी तयार केलेलं लहानसं दार खिळे ठोकून बंद करुन टाकलं.

****

एका रात्री, दहा वाजण्याच्या थोडंस आधी, कामिता अचानक प्रकटला. त्यानं आधी बियर आणि मग त्याच्या नेहमीच्या सवयीनुसार दोन व्हाईट लेबल प्यायल्या आणि भरल्याकोबीची भजी खाल्ली. त्याचं इतक्या रात्री उशीरा येणं आणि इतका वेळ थांबणं नेहमीपेक्षा नक्कीच वेगळं होतं. मधूनमधून तो त्याच्या वाचनातून डोकं वर काढून जणू काही चिंतन करत असल्याप्रमाणे समोरच्या भिंतीकडे नजर टाकत होता. जेव्हा बार बंद होण्याची वेळ आली तेव्हा शेवटचा गिऱ्हाईक जाईपर्यंत तो थांबून राहिला. 

“मि.किनो,” बिलाचे पैसे चुकते केल्यानंतर शिष्टाचार पाळत कामिता म्हणाला, “हे सगळं इथपर्यंत येऊन पोचलंय याचा मला खेद वाटतो.”

“इथपर्यंत येऊन पोचलंय म्हणजे?” किनो परत म्हणाला. 

“म्हणजे तुम्हाला हा बार बंद करावा लागेल. निदान काही काळाकरता तरी.” 

किनो कामिताकडे टक लावून पहात राहिला. बार बंद करायचा?

कामितानं त्या निर्मनुष्य बारवर एक नजर फिरवली आणि किनोकडे वळला “मी काय म्हणतोय त्याचं तु्म्हाला अजून आकलन झालेलं दिसत नाहीये. तुम्हाला समजलंय का?”

“मला नाही वाटत मला समजलंय.”

” मला हा बार खूप आवडतो,” जणू काही त्याची समजूत घालत असल्याप्रमाणे कमिता म्हणाला. “इथं असलेल्या शांततेमुळे मी वाचन करू शकतो आणि मला इथलं संगीत देखील आवडतं. तुम्ही जेव्हा इथे बार उघडलात तेव्हा मला खूप आनंद झाला. पण दुर्दैवानं इथे काही गोष्टींची कमतरता आहे.”

“कमतरता?” किनो म्हणला. म्हणजे नक्की काय याचा त्याला काहीही अंदाज येत नव्हता. ‘एक हलकासा टवका उडालेला चहाचा कप’ फक्त त्याच्या नजरेसमोर तरळून गेला. 

“ती करडी मांजर परत येणार नाही,” कामिता म्हणाला. “निदान काही काळासाठी तरी नाही.”

“ह्या जागेत काहीतरी कमतरता आहे म्हणून?”

कामितानं उत्तर दिलं नाही. 

कामिता जिकडे टक लावून पहात होता तिकडे किनोनं पाहिलं आणि काळजीपूर्वक सगळ्या बारवर नजर टाकली. पण त्याला नेहमीपेक्षा वेगळं, विचित्र असं काहीच दिसलं नाही. मात्र नेहमीपेक्षा त्याला ती जागा रिकामी, चेतनाहीन आणि रंगहीन असल्याचा भास झाला.  नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं होतं. केवळ त्या रात्रीपुरतंच अस्तित्व असलेलं असं काहीतरी.

कामितानं बोलायला सुरुवात केली. “मि. किनो, मुद्दाम जाणीवपूर्वक काहीतरी चुकीचं वागणारी व्यक्ती तुम्ही नाही हे मला पक्कं ठाऊक आहे. पण या जगात असेही प्रसंग येतात जेव्हा केवळ ‘वाईट न वागणं’ इतकंच पुरेसं नसतं. काही लोकं या संदिग्धतेचा उपयोग पळवाट काढण्यासाठी खिंडार म्हणून करतात. मी काय म्हणतो आहे ते तुम्हाला समजतंय का?

किनोला काहीही समजत नव्हतं. 

“या गोष्टीवर काळजीपूर्वक विचार करा” कामिता किनोच्या नजरेला नजर भिडवत म्हणाला. “हा नक्कीच विचार करण्याजोगा महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थात तितक्या सहज उत्तर मिळेलच असं नाही.”

“तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी काहीतरी चुकीचं वागलो म्हणून नाही, तर मी योग्य गोष्ट केली नाही म्हणून काहीतरी गंभीर अडचण उद्भवली आहे. या बारच्या संदर्भातली किंवा माझ्या बाबतीतली अडचण?”

कामितानं मान डोलावली. “तुम्ही तसं म्हणू शकता. पण मी केवळ तुम्हालाच दोषी मानत नाहीये, मि. किनो. दोष माझाही आहे. घडणाऱ्या गोष्टीकडं आधीच लक्ष न देण्याचा दोष. मी अधिक लक्ष द्यायला हवं होतं. ही जागा केवळ माझ्यासाठीच नाही तर प्रत्येकासाठीच एक आरामदायी जागा होती.”

“मग आता मी काय करायला हवं?” किनोनं विचारलं 

“काही काळासाठी बार बंद करा आणि दूर निघून जा. या क्षणी तुम्ही यापेक्षा अधिक काहीही करू शकत नाही. मला वाटतं अजून एकदा दीर्घ काळासाठी जोरदार पाऊस लागून राहण्यापूर्वी तुम्ही इथून निघणं योग्य होईल. एक प्रश्न विचारतोय त्याबद्द्ल क्षमस्व, पण तुमच्याकडं दूरच्या प्रवासासाठी पुरेसे पैसे आहेत का?

“थोड्या काळासाठी तरतूद होईल इतके आहेत असं वाटतंय.”

“उत्तम. मग त्यानंतर काय करायचं याची काळजी आता तुम्ही प्रत्यक्षात ती वेळ येईल तेव्हाच करावी.” 

“पण तुम्ही आहात तरी कोण?”

“मी कामिता नावाचा एक माणूस आहे” कामिता म्हणाला ” ते लिहिताना ‘देव’ – कामि या अर्थाचा एक शब्द आणि ता – ‘क्षेत्र’ या अर्थाचा दुसरा शब्द एकत्रित करून तो लिहितात. पण त्याचा उच्चार ‘कान्डा’ असा होत नाही. मी ह्या भागात बऱ्याच काळापासून राहतो आहे.”

किनोनं पुढे होऊन विचारलं, “मि. कामिता , मला एक प्रश्न आहे. तुम्ही या भागात पूर्वी साप पाहिले आहेत का?”

कामितानं उत्तर दिलं नाही “तुम्ही असं करा. इथून दूर निघून जा आणि एका जागी जास्त काळ मुक्काम करु नका. आणि दर सोमवारी आणि गुरुवारी एक पोस्टकार्ड पाठवायला विसरू नका. त्यामुळे तुम्ही ठीक आहात हे मला समजत राहिल.”

“पोस्टकार्ड?”

“जिथे तुम्ही असाल त्या जागेचं एखादं चित्र असलेलं पोस्टकार्ड.”

“पण मी ते कोणाला पाठवू?”

“इझु मधे असलेल्या तुमच्या मावशीला पाठवू शकता. पण काही झालं तरी तुमचं स्वतःचं नाव किंवा कोणताही मजकूर लिहू नका. नुसतंच ज्या पत्त्यावर पाठवाल तो पत्ता लिहा. हे विसरू नका कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे.” 

किनोनं त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं. “तुम्ही माझ्या मावशीला ओळखता?”

“हो. मी तिला चांगल्या रीतीनं ओळखतो. खरंतर तिनं मला तुमच्यावर लक्ष ठेवायला आणि काही वाईट तर घडत नाही ना हे पहायला सांगितलं होतं. पण असं वाटतंय की मी माझ्या कामात अपयशी ठरलो.”

“कोण आहे तरी कोण हा माणूस?” किनोनं स्वतःलाच प्रश्न विचारला. 

“मि. किनो, जेव्हा मला असं वाटेल की आता तुम्ही परत यायला हरकत नाही मी तुमच्याशी संपर्क साधेन. तोपर्यंत या जागेपासून दूर रहा. समजलं?”

****

त्या रात्री किनोनं प्रवासाची तयारी केली. “दीर्घ काळासाठी जोरदार पाऊस लागून राहण्यापूर्वी तू इथून निघणं योग्य होईल ही सूचना खूप अचानक होती आणि त्यामागचा तर्कही न समजणारा होता. पण कामिताच्या शब्दांमधे तर्काच्या पलिकडचं काही स्वीकारायला लावणारी, एक वेगळीच मन वळवू शकणारी ताकद होती. किनोनं त्यावर शंका घेतली नाही. त्यानं खांद्याला अडकवायच्या एका मध्यम आकाराच्या पिशवीमधे काही कपडे आणि प्रसाधनसाहित्य घेतलं. हीच पिशवी तो कामासाठी प्रवास करताना वापरत असे. पहाट झाल्यावर त्यानं समोरच्या दरवाज्यावर ” काही काळासाठी बार बंद राहिल. त्याबद्दल क्षमस्व.” असं एक सूचनापत्रक लावलं.

खूप दूर निघून जा, असं कामितानं त्याला सांगितलं होतं. पण नक्की कुठे जायचं याची त्याला काहीच कल्पना नव्हती. उत्तर दिशेला जावं? की दक्षिणेला? धावण्याचे शूज विकत असताना तो नेहमी ज्या मार्गावर प्रवास करायचा त्याच मार्गानं परत एकदा प्रवास करायचं त्यानं ठरवलं. तो हमरस्त्यावरील बस मधे चढला आणि ताकामात्सुला गेला. शिकोकुची एक फेरी पूर्ण करून नंतर तो क्युशूला जाणार होता. 

ताकामात्सु स्थानकाजवळच्या एका लॉज मधे त्यानं खोली घेतली आणि तिथे तो तीन दिवस राहिला. त्यानं गावात फेरफटका मारला आणि काही सिनेमे पाहिले. दिवसा सिनेमाला गर्दी नसायची. हे सिनेमे कायमच मती सुन्न करणारे असायचे. अंधार पडल्यावर तो खोलीत परत यायचा आणि टीव्ही लावायचा. आपल्या मावशीचा सल्ला ऐकून त्यानं शैक्षणिक कार्यक्रम पाहिले पण त्यातून त्याला फारशी काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. ताकामात्सु मधल्या वास्तव्याच्या दुसर्या दिवशी गुरुवार होता. त्यामुळे त्यानं एका दुकानातून एक पोस्टकार्ड विकत घेतलं, त्यावर स्टँप चिकटवला आणि मावशीच्या पत्त्यावर पाठवून दिलं. कामितानं सूचना दिल्याप्रमाणे त्यानं केवळ तिचं नाव आणि पत्ता लिहिला होता. 

“या गोष्टीवर काळजीपूर्वक विचार कर. हा नक्कीच विचार करण्याजोगा महत्त्वाचा प्रश्न आहे,” कामितानं त्याला सांगितलं होतं. 

पण कितीही गांभीर्यानं विचार केला तरीही किनोला मुळात नेमका प्रश्न,समस्या काय आहे हे समजलं नाही. 

****

नंतर काही दिवसांनी किनो क्युशूमधल्या कुमामोतो स्थानकाजवळच्या एका स्वस्त लॉजमधे रहात होता. अपरं छत, छोटा अडचणीचा पलंग, छोटासा टीव्ही, लहानशी बाथरूम, लहानश्या जागेत कोंबून बसवलेला फ्रीज अशा त्या जागेत त्याला तो एक अवघडलेला, अवाढव्य राक्षस असल्यासारखं वाटत होतं. तरीदेखील जवळच्या किराणा मालाच्या दुकानात एक चक्कर टाकण्याव्यतिरिक्त पूर्ण दिवसभर त्यानं स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. दुकानातनं त्यानं एक व्हिस्कीची लहान बाटली, थोडं पाणी आणि खायला काही बिस्कीटं घेतली. तो अंथरूणात पडून वाचत राहिला. जेव्हा त्याला वाचायचा कंटाळा आला, त्यानं टीव्ही पाहिला. जेव्हा त्याला टीव्ही पहायचा कंटाळा आला, त्यानं वाचन केलं. 

कुमामोतो मधला आता हा त्याचा तिसरा दिवस होता. त्याच्या बचत खात्यात अजूनही पैसे होते आणि त्याच्या मनात आलं असतं तर तो अधिक चांगल्या हॉटेलात राहू शकला असता. पण सध्याच्या परिस्थितीत त्याच्यासाठी हीच योग्य जागा आहे असं त्याला वाटत होतं. तो अशा लहान जागेत राहात असल्यामुळे, ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आवाक्यात होत्या आणि इतर नको त्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नव्हती. त्याला अचानक या गोष्टीबद्दल समाधान वाटलं. फक्त संगीताची तेवढी कमी होती. ते हवं होतं असं त्याला वाटून गेलं. 

टेडी विल्सन, विक डीकीन्सन, बक क्लेटन! कधीकधी त्यांच्या जुन्या जमानातल्या जॅझची, त्या स्थिर आणि शिस्तबद्द रचनेत नीट बांधलेल्या सुरांना ऐकण्याची प्रबळ इच्छा त्याला व्हायची. त्यांच्या सादरीकरणातला निखळ आनंद आणि आशावाद त्याला अनुभवायचा होता.

पण त्याच्या रेकॉर्डसचा संग्रहापासून तो खूप दूर होता. त्यानं बंद केल्यापासून शांत असलेल्या त्याच्या बारचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर आलं. ती गल्ली, ते भलमोठं विलोचं झाडं, दारावर त्यानं लावलेली पाटी वाचून माघारी फिरणारे लोक. आणि मांजराचं काय झालं असेल? ते जर परत आलं असेल तर त्याला दाराला फळकुट मारून बंद केलेलं दार दिसलं असेल. आणि त्या घराभोवती अजूनही साप घुटमळत असतील का?

आठव्या मजल्यावरच्या त्याच्या खिडकीच्या बरोब्बर पलिकडच्या बाजूला एका ऑफीसच्या इमारतीची खिडकी होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो तिथे लोकांना काम करताना पहायचा. ते कोणत्या प्रकारच्या व्यवसायाचं ऑफीस होतं याची त्याला काहीही कल्पना नव्हती. तिथे टाय लावलेले पुरुष ये-जा करायचे  तर स्त्रिया कंप्युटरच्या कीबोर्डवर बोटं आपटायच्या, फोन घ्यायच्या आणि कागदपत्रं भरायच्या. एखाद्याचं लक्ष वेधून घेईल असं ते दृश्य नक्कीच नव्हतं. तिथे काम करणारे लोक दिसायला आणि कपड्यांच्या बाबतीतही सर्वसाधारण होते. अगदीच सर्वसामान्य. किनोला करण्यासारखं दुसरं काहीच नव्हतं या एकमेव कारणास्तव तो त्यांच्याकडे तासन् तास बघत बसायचा. हे लोक कधीकधी इतके आनंदी कसे काय दिसतात, हे किनोला खूप अनपेक्षित आणि आश्चर्यकारक वाटायचं.  त्यांच्यातले काही अनेकदा खळखळून हसत असत. कसं काय? इतक्या साध्या, गबाळ्या ऑफीसमधे, कोणत्याही प्रकारचं स्फूर्तीदायक काम (किमान किनोच्या नजरेत तरी) नसताना, लोक ते काम कसं करू शकतात आणि तरीही इतके आनंदी कसे असू शकतात? त्याच्या समजापलिकडचं असं काही रहस्य तिथे दडलेलं होतं का?

आता परत एकदा त्याची जागा बदलण्याची वेळ आली होती. एका जागी जास्त काळ मुक्काम करू नकोस असं कामितानं त्याला सांगितलं होतं. पण तरीदेखील या लहानश्या अडचणीच्या हॉटेलमधून निघावं असं काही किनोला वाटत नव्हतं. दुसरीकडे कुठे जावसं वाटावं अशी जागा त्याला सुचत नव्हती. जग म्हणजे कोणतीही महत्त्वाची दिशादर्शक ठिकाणं नसलेला एक विशाल समुद्र होता तर किनो म्हणजे नकाशा आणि नांगर हरवलेली लहानशी होडी. 

जेव्हा त्यानं पुढील प्रवासाची जागा शोधण्यासाठी क्युशुचा नकाशा उघडून समोर पसरला तेव्हा त्याला जणू काही समुद्राच्या लाटांवर हेलकावणाऱ्या बोटीत बसल्यासारखं मळमळलं. तो पलंगावर आडवा होऊन पुस्तक वाचत राहिला आणि अधूनमधून नजर वर काढून पलिकडच्या बाजूला असलेल्या ऑफीसमधील लोकांना पहात राहिला. 

त्या दिवशी सोमवार असल्यामुळे त्यानं हॉटेलमधे असलेल्या भेटवस्तू मिळण्याच्या दुकानातून कुमामोतो किल्ल्याचं चित्र असलेलं एक पोस्टकार्ड खरेदी केलं. त्यावर मावशीचं नाव, पत्ता लिहिला आणि स्टँप चिकटवला. काही काळ ते पोस्टकार्ड हातात धरून तो रिक्तपणे त्या किल्ल्याकडे बघत राहिला. साधारणपणे पोस्टकार्डवर बघायला मिळतो तसा तो किल्ल्याचा एक नेहमीचा, सामान्य फोटो होता. गुबगुबीत पांढऱ्या ढगांनी भरलेल्या निळ्या आकाशासमोर तो भव्य किल्ला दिमाखात उभा होता. बराच वेळ त्या फोटोकडे किनो निरखून पहात राहिला तरीही त्याला त्या किल्ल्याशी जोडणारा एकही समान बिंदू सापडला नाही. मग त्यानं उत्स्फूर्तपणे पोस्टकार्ड उलटलं आणि त्याच्या मागच्या बाजूला मावशीसाठी निरोप लिहिला :

तू कशी आहेस? आता तुझी पाठदुखी कशी आहे? तुला माहितच आहे की सध्या मी एकटाच प्रवास करत आहे. कधीकधी मला वाटतं मी अर्धपारदर्शक झालो आहे. नुकत्याच पकडलेल्या स्क्वीड या समुद्रप्राण्यासारखे जणू काही तू माझ्या मधून आरपार माझे आतले अवयव पाहू शकतेस. हे  एक सोडलं, तर बाकी मी ठीक आहे. कधीतरी तुला भेटण्याची आशा करतो. 

किनो

 

हे लिहिण्यासाठी आपण नक्की कशामुळे प्रवृत्त झालो ह्याचा किनोला अंदाज नव्हता. कामितानं असं करण्यावर सक्तीनं बंदी घातली होती. पण किनो स्वतःला आवरू शकला नाही. मला काहीही करून परत एकदा सत्य परिस्थितीशी जोडलं गेलं पाहिजे, नाहीतर यापुढे मी ‘मी’ राहणार नाही असं त्याला वाटलं. मी एक अस्तित्वात नसलेला मनुष्य होऊन जाईन. स्वतःचा विचार बदलण्यापूर्वी तो लगबगीनं हॉटेल जवळच्या पोस्टाच्या पेटीपाशी गेला आणि त्यानं पोस्टकार्ड पत्रपेटीत टाकलं. 

****

जेव्हा त्याला जाग आली तेव्हा पलंगाशेजारच्या घडाळ्यात सव्वादोन वाजले होते. दारावर कोणीतरी टकटक करत होतं. खूप धाडधाड आवाज करणारी ती जोराची थाप नव्हती, पण तो एक भक्कम, अर्थपूर्ण आवाज होता. जणू एखाद्या कुशल सुतारानं खिळा ठोकावा तसा आवाज. त्या आवाजानं किनोला गाढ झोपेतून बाहेर खेचून आणलं आणि त्याच्या जाणीवा नको इतक्या स्पष्ट होण्याइतकं टक्क जागं केलं. 

त्या टकटकीचा अर्थ किनोला माहित होता आणि त्यानं पलंगावरून उठून दार उघडणं अपेक्षित होतं हे ही त्याला ठावूक होतं. जे कोणी ती टकटक करत होतं त्यामधे बाहेरुन ते दार उघडण्याचं सामर्थ्य नव्हतं. किनोला ते दार स्वतःच्या हातांनी उघडणं आवश्यक होतं.  

त्याला हे प्रकर्षानं जाणवलं की नेमक्या याच भेटीची तो अपेक्षा करत होता आणि त्याचबरोबर नेमकी ह्याच क्षणाची त्याला सगळ्यात जास्त भीतीही वाटत होती. ही संदिग्धता होती : दोन टोकांमधल्या पोकळ अवकाशाला घट्ट धरून ठेवणारी.

 ” तू थोडा दुखावला होतास. होय ना? ” त्याच्या बायकोनं विचारलं होत. तेव्हा त्यानं “शेवटी मी देखील माणूस आहे. मी दुखावलो होतो,” असं उत्तर दिलं होतं. पण ते पूर्ण सत्य नव्हतं. निदान त्यातलं अर्ध तरी खोटं होतं. मला जितक्या प्रमाणात जास्त दु:ख व्हायला हवं होतं, तितकं दु:ख मला त्यावेळी झालं नव्हतं. किनोनं स्वत:जवळ कबूली दिली. जेव्हा मला खरं दुखः व्हायला हवं होतं, तेव्हा मी त्याला गुदमरवून टाकलं. मला ते स्वीकारायचं नव्हतं, त्यामुळे त्याला सामोरं जाणं मी टाळलं. म्हणूनच आज माझं हृदय भकास, रिकामं,पोकळ आहे. त्या सापांनी ती रिकामी जागा बळकावली आहे आणि त्यांची थंडपणे स्पंदन करणारी हृदयं तिथे दडवून ठेवायचा ते प्रयत्न करत आहेत. 

‘ही केवळ माझ्यासाठीच नाही तर प्रत्येकासाठीच एक आरामदायी जागा होती,’ कामिता म्हणाला होता. त्याला नक्की काय म्हणायचं होतं ते किनोला अखेरीस समजलं. 

किनोनं डोक्यावर पांघरूण ओढून घेतलं, डोळे बंद केले आणि त्याचे कान हातांनी गच्च झाकून घेतले. मी पाहणार नाहीये, मी ऐकणार नाहीये असं त्यानं स्वतःला सांगितलं . पण तरीही तो त्या आवाजाला दडपून टाकू शकला नाही. तो पृथ्वीच्या अखेरच्या टोकापर्यंत धावत जरी गेला असता आणि कानात माती भरून कान बुजवून जरी टाकले असते, तरी तो जिवंत असेपर्यंत ही टकटक त्याचा अखंडपणे पाठलाग करणार होती. ती हॉटेलमधल्या दारावर होणारी टकटक नव्हती. ती त्याच्या हृदयाच्या दरवाजावर होणारी टकटक होती आणि या आवाजापासून सुटका मिळणं कोणालाही शक्य नाही.

नक्की किती वेळ गेला याचा त्याला अंदाज येत नव्हता, पण त्याला जाणवलं की टकटक थांबली आहे. चंद्राच्या अंधाऱ्या भागात असावी तशी त्या खोलीत शांतता पसरली होती. तरीही किनो पांघरूणाखाली झोपून राहिला. त्याला सतत सावध राहणं आवश्यक होतं. त्याच्या दाराबाहेर उभी ठाकलेली ‘ती’ गोष्ट अशी सहजासहजी हार मानणारी नव्हती. ‘त्या’ गोष्टीला कसलीही घाई नव्हती. चंद्र अजून उगवला नव्हता. काळ्या आकाशात नुसतीच काही नक्षत्र विखुरलेली होती. काही काळासाठी हे जग ‘त्या’ वेगळ्या गूढ गोष्टींच्या मालकीचं असावं असं त्याला भासलं. ‘त्यांच्या’ खूप वेगवेगळ्या पद्धती होत्या. त्यांना जे हवंय ते त्यांना कोणत्याही मार्गानं मिळालं असतं. अंधाराची मुळं पृथ्वीच्या पोटात सगळीकडे पसरू शकतात. संयमानं, हवा तितका वेळ घेत, कमकुवत जागा शोधत ती कठीणातला कठीण दगड देखील फोडू शकतात. 

अखेरीस किनोच्या अपेक्षेप्रमाणे टकटक परत एकदा चालू झाली. पण यावेळी ते दुसऱ्या बाजूनं आले होते. आधीपेक्षा जास्त जवळ. जे कोणी ठोठावत होतं ते त्याच्या पलंगाशेजारच्या खिडकीबाहेर होतं. आठव्या मजल्याइतक्या उंचीवर, बिल्डींगच्या भिंतीला चिकटून, पावसानं चिंब भिजलेल्या काचेवर टप्-टप् आवाज करत होतं. 

त्या टकटकीची लय एकसारखी होती. दोनदा. मग परत दोनदा. अखंडपणे, न थांबता. मनात भावना दाटून आल्यावर हृदयाच्या ठोक्यांचा आवाज असावा तशी काहीशी लय. 

खिडकीचा पडदा उघडा होता. झोप लागण्यापूर्वी तो पावसाच्या थेंबांनी काचेवर तयार होणारी नक्षी बघत होता. जर त्यानं पांघरूणाच्या बाहेर डोकं काढलं तर काय दिसेल याची किनोला कल्पना होती. नाही… तो कल्पना करू शकत नव्हता. त्याला त्याची कल्पनाशक्तीच विझवून टाकायला लागणार होती. 

‘मी त्याकडे पाहायला नको आहे,’ त्यानं स्वतःला बजावलं. कितीही भकास, रिक्त असलं तरी शेवटी ते माझं हृदय आहे. त्यामधे अजूनही थोडी माणूसकीची उब शिल्लक आहे. आठवणी ह्या किनाऱ्यावर लपेटून पडलेल्या समुद्रलव्हाळ्याप्रमाणे असतात, शांतपणे भरतीची वाट पहात बसलेल्या! भावना जर कधी कापून टाकल्या तर भळाळून वाहात राहतील..  मी माझ्या आकलनशक्तीच्या बाहेरच्या प्रदेशात त्यांना असंच निरर्थक भटकू देऊ शकत नाही. 

“आठवणी उपयुक्त असू शकतात,” कामिता म्हणाला होता. अचानक एक विचार किनोच्या मनात चमकून गेला की कसं कोण जाणे पण कामिता त्याच्या घराबाहेरच्या त्या जुन्या विलोच्या झाडाशी जोडलेला होता. ह्याचा नक्की अर्थ काय याचं त्याला नेमकं आकलन होत नव्हतं, पण एकदा या विचारानं मनाचा कब्जा घेतल्यावर घटनांचा क्रम जुळून यायला लागला.  त्या झाडाच्या लगडलेल्या, जड होऊन जमिनीवर झुकणाऱ्या हिरव्यागार फांद्याचं दृश्य किनोच्या डोळ्यासमोर आलं. उन्हाळ्यात त्या फांद्यांमुळे अंगणात थंडगार सावली पसरायची. पावसाळ्याच्या दिवसात त्याच्या मऊशार फांद्यांवर सोनेरी थेंब चमचम करायचे. जोरदार वारं वहात असताना त्या चंचल हृदयाप्रमाणे आंदोलनं घ्यायच्या. त्यांच्यावरून उडणारे छोटे छोटे पक्षी एकमेकांवर चिवचिवत त्या बारीक, नाजूक फाद्यांवर परत एकदा उडण्यासाठी काही क्षणांसाठी ओळीनं बसायचे.  

पांघरूणाखाली डोळे घट्ट बंद करून, विलोच्या झाडाचा विचार करत किनो एखाद्या आळीप्रमाणे  वेटोळं करून झोपला होता. एकामागून एक त्या झाडाचे गुण त्याच्या डोळ्यासमोर यायला लागले – त्याचा रंग, आकार आणि हालचाल. आता तो उजाडण्याची प्रार्थना करत राहिला. बाहेर उजाडेपर्यंत, पक्षी उठून त्यांचा दिवस सुरू करेपर्यंत,  हे असं संयमानं वाट पहात थांबून राहणं इतकंच तो करू शकत होता. पक्षांवर, पंख आणि चोच असलेल्या सर्व प्रकारच्या पक्षांवर विश्वास ठेवणं इतकंच त्याच्या हातात होतं. उजाडेपर्यंत त्याला त्याचं हृदय रिक्त, भावनाशून्य होऊ द्यायचं नव्हतं. नाहीतर या पोकळीनं आणि तिनं निर्माण केलेल्या निर्वातानं ‘त्यांना’ खेचून घेतलं असतं. 

जेव्हा विलोच्या झाडाच्या स्मृती अपुऱ्या पडायला लागल्या, किनोला बारीक करड्या मांजरीची आणि भाजलेल्या समुद्रलव्हाळीबद्दल असलेल्या तिच्या आवडीची आठवण झाली. त्याला काऊंटरपाशी बसून पुस्तक वाचण्यात रममाण झालेल्या कामिताची, धावपट्टीवर कष्टदायी सरावाला वारंवार सामोरं जाणाऱ्या तरुण धावपटूंची, ‘माय रोमान्स’ वरच्या बेन वेबस्टरच्या अप्रतिम आल्हाददायक संगीताची आठवण झाली. निळ्या रंगाचा नवीन ड्रेस घातलेली आणि बारीक केस कापलेली त्याची बायको त्याला आठवली. ती तिच्या नव्या घरात एक निरोगी, आनंदी आयुष्य जगत असेल अशी त्याला आशा वाटली. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसतील असं त्याला वाटलं. त्याला जाणवलं की तिनं माझी समोरासमोर येऊन माफी मागितली आणि मी ती स्वीकारली. मला नुसतं विसरायला नाही तर माफ करायला शिकणंही आवश्यक आहे. 

पण तरीही काळाचा ‘तो’ नेमका क्षण नीटपणे दुरुस्त झाल्यासारखा वाटत नव्हता. इच्छांचं रक्तबंबाळ ओझं आणि पश्चात्तापाचा गंजलेला नांगर काळाचा नेहमीचा प्रवाह खंडीत करत होते. सतत पडणारा पाऊस, घडयाळाचे  गोंधळून गेलेले काटे, अजूनही गाढ झोपलेले पक्षी, गप्प बसून पोस्टकार्डांची क्रमवारी लावणारा चेहराहीन पोस्टमास्तर, त्याच्या बायकोचे हवेत वेगानं थुईथुईणारे सुंदर स्तन, गबाळपणे खिडकीवर आपटणारं काहीतरी आणि एका सूचक जाळ्यात खोलवर आकर्षित करणारा हा नियमित ठेका. टप् टप्, टप् टप् आणि परत एकदा टप् टप्.

 “त्याच्यापासून नजर फिरवू नकोस, बघ त्याच्याकडे. बघ. तुझं हृदय हे असं दिसतं” कोणीतरी त्याच्या कानात कुजबुजलं. ” 

उन्हाळी वाऱ्याच्या झोतावर विलोच्या झाडाच्या फांद्या लहरत होत्या. किनोच्या आतमधे कुठेतरी, एका लहानश्या अंधाऱ्या  खोलीत एक उबदार हात त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करत होता.  डोळे बंद असताना, त्या मऊशार आणि भरदार हाताचा त्याच्या हाताला झालेला स्पर्श त्याला जाणवला. हे तो पूर्णतः विसरून गेला होता. ह्यापासून तो दीर्घकाळ लांब राहिला होता. “हो, मी दुखावला गेलो आहे. खूप खूप खोलवर दुखावला गेलो आहे,” स्वतःशीच कबूली देत तो पुटपुटला आणि रडू लागला. 

हा संपूर्ण वेळ पाऊस न थांबता अखंडपणे कोसळत होता आणि त्यानं अवघ्या जगाला एका थंडगार गारठ्यामधे चिंब भिजवून टाकलं होतं.

चित्र सौजन्य: पॉल क्ली

आरती रानडे यांनी बायोमेडीकल क्षेत्रात डॉक्टरेट आणि पोस्ट-डॉक्टरेट केले असून त्या सध्या अमेरिकेत स्टेम सेल्स आणि लिव्हर मॉडेल्स या विषयात संशोधन करत आहेत. फोटोग्राफी आणि डूडलींग बरोबरच त्यांना हायकिंग, रनिंग आणि सायकलींगची आवड आहे.

4 comments on “किनो: हारुकी मुराकामी/आरती रानडे

 1. Nitin Jarandikar

  उत्तम अनुवाद। मुराकामीच्या साहित्यातील बहुतांश वैशिष्ट्ये प्रस्तुत कथेत आढळून येतात। उदा। मुराकमीचे संगीत, मांजरप्रेम आणि अर्थातच काफ्काएस्क कथनतंत्र। मुराकामी मराठीत आणण्याच्या धाडसाबद्दल अनुवादकर्तीचे विशेष अभिनंदन।

  Reply
 2. Abhishek Pawar

  nice article.

  Reply
 3. Devidas Agase

  Nice article

  Reply
 4. Nitin Salunkhe

  अतिशय सुंदर,
  किनोच्या शेजारी उभं राहून किनोच्या भावना अनुभवतो आहे, असंच वाटत होतं हे वाचताना !
  धन्यवाद !

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *