मंगेश नारायणराव काळे

नाहीच येतंय ना सुटता तुझ्या या रमलातून..

back

 

१.

विसर

विसर विसर

विसर विसरून जा विसर सतत

विसर कम्पलसरीये ते विसरणं अर्धमूर्धं विसर फार्तर

विसर सम्पूर्ण ज्याने घेतला होता आकार ते विसर विसर

विसर आख्खं विसर काठोकाठ भरलेलं ते सगळं विसर दिलं घेतलेलं

विसर तो नाद विसर विसर निनाद तो विसर अनहद विसर विसर आखरी बंदिश

२.

विसर तुझ गळ्यातला गांधार विसर सूर विसर विराणी

विसर लव विसर निमेश विसर याम विसर अहोरात्र विसर

विसर अर्धमास विसर मास विसर ऋतू सगळे भोगून झालेले

विसर संवत्सर विसर युग विसर मन्वंतर विसर कल्प विसर विसर

विसर प्रलय विसर महाप्रल विसर विसर सगळी सगळी घालमेल अनंत काळाची

विसर मलाच विसर विसर मलाच फक्त विसर न विसरता विसर

३.

विसर विरघळणं वितळणं विसर विसर कोसळणं अपरंपार

विसर आतोनात कडकडून विसर विसर आरपार प्राणांतिक

विसर ते श्‍वास विसर ती लय विसर तो सळाळ विसर

विसर ते स्पर्श विसर ते डोळे विसर विसर ती हाक विसर

विसर ते उन्मळून बरसणं विसर देठापासून तुटणं विसर ताटातूट

विसर ते गाव ती वेस ते रस्ते विसर विसर स्वतःला नि मलाही

 

नि पाहा आरशातल्या आरशात रोखून स्वतःला कैकदा

नि पाहा काळोखी एकांत निग्रहानं पुनःपुन्हा आरशात

नि पाहा तुझं तरंगत जाणं उडणं धुवाँ धुवाँ पाऱ्याआड

नि पाहा आरशात मला संपूर्ण सुफळ उरलेला तुझ्या जागी

४.

विसर दाँस्ता विसर विसर नज़र विसर जुनूँ

विसर अफसाना विसर विसर दस्तुर-ए-फिरदौस

विसर सरखुशी विसर विसर रहिबाना विसर

विसर मुस्तकाबील विसर विसर कुफ्र विसर ईमान

विसर पैरहन विसर विसर बरहनगी विसर नंग-ए-वजूद

विसर असीरी विसर विसर जराहत विसर मु’आमल

विसर अशुफ्तगी विसर विसर जौक-ए-वस्ल विसर चरागाँ

विसर बज्म विसर विसर बु-ए-गुल विसर व’अद

विसर फरेब विसर विसर दश्‍न-ए-पिन्हा विसर बला

विसर रूस्वाई विसर विसर नाल-ए-दिल विसर एतिबार

५.

काळ तर निघून जातच असतो कुणालाही न सांगता घडून गेलेला

नि प्रत्येक क्षण न् क्षण दोघांमध्ये रेंगाळलेला सांडलेला अस्ताव्यस्त

दोघा दरम्यान स्पर्शाच्या चढाओढीतला अनंगराग सप्तकातला येत येत

समेवर स्थिरावलेला कधी मंद कधी द्रुत राहिलेला दौडत लयीत नि घेतल्या

कितीदा दीर्घ ताना बेभान झाल्या सगळ्या हाका देहभाराच्या कधी नि माल्या कधी

पेटल्या नि चेतल्या नि चेतवल्या नि घेतल्या तुझ्या रागदारीत हिंडताना तोलून धरली सम

वरचेवर असे झाले कितीदा कितीदा नि नुस्ता नुस्ता उरूस देहाचा की पानगळ ऋतूभाराची ?

म्हणजे उत्सव नुस्ता नुस्ता दोघांमधला उधाणलेला अनंगरंगी

 

विसर हे सगळं विसर

विसर विसर सगळच्या सगळं दोघामधलं झिरपणारं आरस्पानी

विसर माये विसर सखे विसर तू विसर राधे विसर रूक्मिणी विसर

सावित्री विसर विसर तू तुझ्या अनंत रूपांनी विसर विसर तू हा

चौसष्ठीचा मय तरच होवू शकेन ना मी मुक्त तुझ्या या तिलिस्मातून

नि राहता येईल दूर जावून उभं नि निरखता येईल अंतर

दोघातलं नि येता येईल परतून पुन्हा पुन्हा तुझ्याच रमलात अवेळी

६.

तहानेय ही तहान

कधीच न भागणारी निरभ्र

तीव्र उन्मळून आलेली तृष्णाय तृष्णा

ओठांपासून देठार्पंत सरसरत चढत गेलेली तीव्र

असोशी जी संपता संपत नाहीे कधीचीच झालीय फ्रिज्ड

कधीपासून म्हणजे शतकं सरली सरलं युग नि त्याही अल्याड

पल्याड काही ओसंडून वाहणारी झिरपणारी दूरपर्यंत शुद्ध पारदर्शी नीराय ही

 

नि हे किती नैसर्गिक होतं की शमन करूनही कितीदा ती उगवतच

राहिली नव्यानं नि हरेक वळणावर रचून ठेवलेले माठ तृष्णेचे रिते झाले

तरीही उसवली नाही तिची एकही ओळ आपल्यानं नि ही सर्वव्यापी मिठी

पाण्याची दोहोंना विरघळून टाकणारी विस्कटणारी रचणारी पुन्हा नव्याने एक एक

आयत पाक हवेतली परवरदिगार ही रहमय तुझी की वजूदच हरवलाय नि उरलेला

आकारेय नुस्ता प्रदक्षिणा घालणारा तुझ्या गाभाऱ्यात नि हे सगळं कसं सोडून येऊ? कसं

नाकारू हे तुझ्या सोबत रचलेलं संचित? नि कसा होवू निरंक नग्न कफल्लक नि निराकार या

वळणावर? नि प्रत्ययच तर आहे हा भोवंडून टाकणारा नि प्रत्ययय हा साक्षात नि गारूड तर होतंच होतं उसवून टाकणारं

 

विसर

विसर बे

विसर हा सगळा पिसारा.

निरस्त कर ही अट कायमची. विसर

७.

काय करत होतो आपण या खेळात?

मनसुबेच तर होते आहे ते उधळून द्यायचे

नि व्हायचे कफल्लक नि अाकंठ श्रीमंती दिल

घेतल्यातली मिरवायची होती शरीरावर वेचायचं नव्हतं

काहीच ठरवून फार्तर शोषून घ्यायचं होतं शक्य होईल तेवढं

म्हणजे हे सगळं आपण आपल्यात आटवणार होतो नि साठवणारही

नि स्वामित्वय आपलं या रूहवर नि कह्यातेय आपल्या हे वादळ म्हणजे

इनबील्टच असेल का नैसर्गिकतः असुरक्षित वाटणं नि पझेसिव्ह होणं टोकाचं

की ओढ असेल शरीराची त्वचेवर तरारून येणारी नि वाजणारी अपूर्व बासरी छातीत

दर्वळणारी सदोदित की हाकय जिच्या प्रतिक्षेत रेंगाळत होतो किती शतकांपासून म्हणजे

हे किती विलक्षणंय की तटतटून तर येता येतं शरीराला नि मनाची काहीलीही थांबता थांबत नाही

चिंब होतो भिजतो अपरंपार नि चालायला लागतो चूक नि बरोबरच पल्याड अनोळखी प्रदेशात जो सापडला नाहीे

अजून नि सांडणीतून डोळ्यांच्या नुस्त्या रचली जाते ओळ अपरिचित भाषेतली म्हणजे हा यज्ञय का जगण्यातल्या

सुटून गेलेल्या क्षणांना उजळण्याचा? की विकल्पय एका नव्या शक्यतेचा? की सृजनाचा प्रदेश भरभरून

दिला घेतलेला? नि वर्तुळ तर पूर्ण होतेच असोशी असली तळाशी घट्ट रूतून बसलेली की

नि हे लयकारी रिंगण तर प्रकाशमान करून टाकतेच दोघांपुरते जग नि ही तर साक्षात

लिपीय शरीर-मनाची अनवट प्राचीन हजारो वर्षांपासूनची लिहिली गेलेली सतत

सतत पुन्हा नव्याने

म कसं काय शक्याय हे सगळं विसरून जाणं?

नि विसरायला सांगणं नि भाग पाडणं विसरून जायला?

म्हणजे प्रतारणाच नाहीये का होणारी एकतर्फी?

 

विसर

विसर विसर विसर

असं त्रिवार किती कितीदाही हजार लाख खर्व निखर्व वेळा

सांगूनही विसरता का येत नाहीये हे तुझं दुधारी शरीर नि तुझं

सतत कोसळत राहणं धुव्वाधार बरसणं नेस्तनाबूत करून टाकणं

८.

नि हे कुठे ठरलं होतं की लागेलच लागेल हा अनोळखी प्रदेश एका

मोठ्या वैराणीनंतर नि ढकलल्या जाऊ सर्वस्व पणाला लावून

नि हे जे काय वाहणं सांडणं पसरणं पाझरणंय ही नुस्ती

उत्स्फुर्त घटना कशी का असू शकणारे सावित्री

म्हणजे शरीर नि मनाला वेलांटी मारून जाणारी

एक हलकीशी झुळुकही जिथे विस्कटून

टाकते देहाचे अवतरण तिथे ही तर

हाकंय साक्षात अनोळखी

प्रदेशातून आलेली

जीचा अदमासही आला

नव्हता कधी आपल्याला नि जी

ओढून घेतेय तिच्याकडे सहस्त्रावधी पाशातून

म्हणजे हे जे काय सरपटणंय माझं हजारो वर्षापासूनचं

तो उखाणाचंय म्हटलं तर तू नव्यानं घातलेला नि हे सांडत राहण्याचं

रूपक तर बाळसं धरू लागलंय या आपाधापीत नकळत नि नसलो मी सत्यवान

तरी तू तर सावित्रीयेस कळीकाळाशी झुंज देणारी सावरणारी म्हणजे सावित्री हे तू ऐकतेयस ना

कान देवून की लक्षातच घेत नाहीयेस तू हा बंध कैक सालांचा नि हे कसं काय विसरतेयस की तूच

वितळून टाकलयंस हाडापेरासकट नि वाफ होईल थोड्या वेळात नि ही अशी आरपार मिसळून जाण्याची

नि विरघळून जाण्याची अट कशी काय स्वीकारू शकणारेय मी सावित्री नि हे पण समजून घे ना की

अशा अवेळी काळाचं बोट हातातून सुटून गेल्यावर खूप खूप मागे राहून

गेलेल्या माझ्यासारख्या कुण्याही अनोळखी प्रवाशाला कुठवर

सांभाळता येईल त्याचं संचित म्हणजे कुणी तरी

दत्त म्हणून येऊन उभं ठाकेल वाट अडवून नि

आपणही जाऊ शरण विनाअट

शकलं होताना नि पाहतानाही

मिळावा स्खलनाचा परमोच्च बिंदू

नि मुक्तीच्या टकमक टोकाकडे धाव घ्यावी पावलांनी

सयेबाई तू ऐकतेयस ना जीवाचा कान करून की अप्राप्याचा

पाठलाग कधीच नस्तो होत पूर्ण म्हणजे सगळं काही गवसूनही परतावं लागतं रिकाम्या हातांनी

म्हणजे व्हर्च्युअली जरी भरत असली ओंजळ तरी ते मृगजळ अस्तं ना फसवं म्हणून विसर नि परतून जा

परत तुझ्या शरीरात

सावित्री

९.

म्हणजे फुलंय

फुल गुलाबकावलीचं

पुन्हा पुन्हा उगवून येणारं

अप्राप्य नि तरीही हवं हवंसं नि कितीही योन्या

बदलून झाल्या नि कितीदा जन्मलो असेल आपण पुनःपुन्हा तरी

हे तिलिस्म सुटता सुटत नाहीये नि पक्की झालीय गाठ नकळत पडलेली

म्हणजे विसरता येणारंच नाहीये का हे सगळं? किमान काही काळापुरतं तरी?

की हेचंय भागदेय?

१०.

मंगेश नारायणराव काळे

उमर वय पन्नास एक्कावन्न

दारावर टकटक करून बजावताहेत

की विसरून जा गुमान काय मिळणारेय

कोसळून कडेपठारावरून पेक्षा विसरून जा

तोच एक पर्यायेय तुझ्याजवळ म्हणजे विसरणं ही

एक कलाचेय आदिम नि तेवढ्यानं जर नसेल ढवळून

निघणार तुमचा हजारो वर्षापासूनचा सभ्यतेचा सुसंस्कृत तलाव

नि होणार नसेल गढूळ तुमचं स्फटीकगार पाणी परंपरागत राखलेलं प्रतिष्ठेनं

तर काय हरकतेय विसरून जायला म्हणजे ही सुद्धा एक अटीतटीची घटनाच म्हणता येईल

म्हणजे निरंक झाल्या मेंदूच्या आवरणाखाली काहीच नसेल ना निर्वात पोकळीशिवाय म्हणजे स्मृती तर

असतातच असतात भूतकाळाच्या ओझ्याखाली वाकलेल्या नि कधी कधी सुखावणाऱ्या दुखावणाऱ्याही

नि जिथे जुन्या स्मृतींनाच नाही घेता आलं कवेत नि नाही झालं जगून  त्यांच्यासोबत तर पुन्हा

कशा उभ्या राहू द्यायच्यायेत स्मृती? कसं आखायचंय पुन्हा एक वर्तुळ नव्यानं?

कशी रचायची पुन्हा विटेवर वीट नि बांधायचंय घर?

सजवायचाय उंबरा नव्यानं?

मंगेश नारायणराव उमर वय पन्नास एक्कावन्न

खरंच जागा नाहीये का हो जागा उरलेली स्मृतींना ?

इरेझ करून टाकणं हाच पर्यायेय का अंतिम निर्वाणीचा?

११.

म्हणजे स्मृती असतात ना स्मृती

या असतातच असतात लळा लावणाऱ्या

प्रलयंकारी अस्ते त्यांची रंगसंहिता नि ठिबकत राहतो 

उजेड त्याच्यातून आपल्या असण्यावर नि असल्या जरी रंगहीन

सावळ्या काही नसला आकार उकार तरी करून राहतातच ना घर नि

चरत जातातच ना मेंदूचं कुरण यथेच्छ नि आता तर साक्षात उजेडाचा तुकडाच

येऊन पडलाय पुढ्यात नि साकारतं नवं रमल नवी वेस वस्ती तर काय घेता येणारेय

शकलं झालेल्या काफिराला शकलं झालेल्या सहस्त्र बाहू विस्तारून म्हणजे वैराणवेळी नि

समझौत्याच्या वैरणावर पोसलेल्या स्मृती तर उजवतातच अनेक स्मृती नि वाढवतात पीळ नात्यातले

नि स्वीकार नकाराच्या मंद तेवणाऱ्या उजेडात रंगवता येतं चित्रं जेवढं दिसलं तेवढंच फार्तर

नि हेच तर नकोय ना सगळं गुदमरून टाकणारं नकोय नकोय हा गुंता असण्यालाच

पणाला लावणारा नकोय तुझी मांदियाळी तवंगासारखी शरीरभर तरारून

येणारी नि पझेसिव्ह तरी किती व्हायचंय होऊन होऊन

सामन्यावाल्याचं असणंच पिवून टाकणं तरी कसं

स्वीकारार्ह्य असणारेय त्यापेक्षा सुटू दे ही

एकदाची पडू पाहणारी गाठ

घट्ट व्हायच्या

आधीच

सोडव हे रमल

ही यातुविद्या सोडव हे

कबीरी फाटकेपण नि तसेच डुंबत

राहू दे पहिल्यासारखंच इथल्या परंपरागत

मचूळ पाण्यात सोडव काहीली सोडव ह्या आरपार

चेंगरून टाकणाऱ्या वरवंट्याच्या अजस्त्र कोसळातून सोडव तडफड सोडव नि कर निरस्त कायमचं

 

तुम्ही ऐकताय ना

उमर वय पन्नास एक्कावन्न

नाहीच येतंय ना सुटता या रमलातून

१२.

हे एकटेपणाचं अमूर्त विष किती असतं जहाल

नि किती असतो त्याचा दंश साक्षात्कारी

या वाळवंटातला नि तू तर गपगार

घडाहेस तृष्णेचा तृप्तीची वाट

मोकळी करून देणारा नि

मला तर प्राशायचा

आहे तुझा

थेंब न् थेंब

संपवून टाकायचीय्

तृष्णा कायमची नि उडून

जायचं कापरासारखं नि वाफ

होऊ द्यायचीये विरघळून जायचंय

कायमचं म्हणजे नाहीये येत सोडवता

तुझा कोसळ तुझं धुव्वाधार बरसणं चिंब

भिजवून टाकणं नि कसा येऊ सांग परतून तुझ्याकडे

म्हणजे मीच तर कापून टाकलेत ना दोर परतीचे नि विसरायचे

विसरायचे म्हटले तरी नाहीच येता येणार ना विसरता तुझे हे आविष्कारी अवतरण

म्हणजे एक तर विझवून टाक माझे तेवत राहणे तुझ्यातून की राहू असाच तरंगत तुझ्या पंखांवर

कयामतच्या दिवसाची वाट पाहत?

१३.

आख्यानाला झालीचेय सुरूवात

तर मी करीन पठण तुझं

वाचीन ओळ न् ओळ

कर माझी शकलं

सुटा सुटा करून टाक

हा देह

नि वाहू दे

निर्झर

नि विसर.

चित्र सौजन्य: मंगेश नारायणराव काळे

मंगेश नारायण काळे कवी, चित्रकार, प्रकाशक आणि दृष्य-माध्यम समीक्षक आहेत. त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. काळेंच्या चित्रांची प्रदर्शने भारतभर होत असतात.

 

 

3 comments on “नाहीच येतंय ना सुटता तुझ्या या रमलातून..- मंगेश नारायणराव काळे

 1. Ganesh Kanate

  After a long, long time, there a poem that makes you feel that it’s not long enough! It’s makes you flow with the flow and yet, keeps you capable of knowing that you are flowing – you are not lost…
  Poets keeps reminding you of the process… Not the destination… Neti…Neti…
  Take a bow!

  Reply
 2. लखनसिंह कटरे

  बापरे बाप… प्रबंधाचाही बाप…! कवीला सलाम!!
  @लखनसिंह कटरे.

  Reply
 3. लखनसिंह कटरे

  बापरे बाप… प्रबंधाचाही बाप…! कवीला सलाम!!

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *