आशुतोष पोतदार

हद्दीच्या अलीकडे आणि पलीकडे



marathienglish

back

विशिष्ट जगाची निर्मिती ‘हद्द’ आखण्यातून होत असते. हद्दीच्या अलीकडचे आणि पलीकडचे जग. दोन्हीकडे राहाणाऱ्यांना एकमेकांबरोबर सामूहिक कृतीत सहभागी होत असल्याची भावना येते. विखुरलेला, भटका समाज एकत्र येण्याच्या प्रक्रियेचा आणि शिस्तीचा भाग म्हणून हद्दी आखल्या गेल्या असतील. यातून हद्दीच्या आतल्या आणि बाहेरच्या अशा चौकटी उभ्या राहिल्या असतील. शेती, कुलाचार, कुटुंबांचे व्यवहार, लग्न, इत्यादी कृती-संस्था चौकटी घडवत असतात. चौकटी घडतात तशा अपरिहार्यतेनं ‘मर्यादा’ पडत जातात. मर्यादांचे दृश्य, भासमान रूप ‘हद्द’ वा सीमा रेषा आखण्यातून आपल्याला दिसून येते. मर्यादेत राहाणं आणि ठेवणं हा मानवी संस्कृतीचा भाग राहिलेला आहे. घराच्या उंबऱ्यापासून ते शेतातल्या बांधापर्यंत, गावकुसापासून ते देशाच्या हद्दीपर्यंतची विविध रूपे दृश्य-अदृश्य रूपात ‘हद्द’ मान्य करुन आपआपल्या ‘मर्यादा’ राखून असतात. दुसऱ्याच्या राखायचा आटोकाट प्रयत्न करत असतात. शेताच्या सातबाऱ्यात किंवा घराच्या नकाशाने आखून दिलेल्या हद्दींमध्ये पिढ्यान् पिढ्यांना सतर्क आणि वेळोवेळी एकमेकांविरुध्द तापवत ठेवण्याची क्षमता असते.

एक दृश्य: मुलाबाळांना खेळवत घराबाहेर बाकड्यावर बसणाऱ्या शेजारच्या घरातल्या आजी. संध्याकाळी कामावरुन येणाऱ्या कुटुंबाची “आज लौकर आला” अशी सहज विचारपूस करणाऱ्या आजी पहिल्या दिवशी प्रेमळ वाटतात. त्या क्षणाला, आपल्या भारतीय समाजात किती आपलेपण आहे असा ओतप्रोत अभिमान आपल्या मनात जागा होतो. त्याचवेळेस, पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाणाऱ्या या संस्कृतीला अशा आजीची किती गरज आहे असा दिव्य विचार आपल्या मनात चमकून जातो. पुढे त्या आजी दररोज तोच प्रश्न विचारत राहिल्या तर ती तुमच्या कुटुंबाच्या येण्या-जाण्याच्या वेळांवर लक्ष ठेवून असल्याची जाणीव देते. पुढे, परत-परत तसाच प्रश्न आजी विचारु लागल्या तर तर कशाला नाक खुपसती अशी चिडचिड आपल्याला होऊ शकते.

याचा अर्थ, आपल्या हद्दीच्या बाहेर जाऊन ‘मर्यादे’त राहून दुसऱ्याच्या हद्दीत डोकावले तर एकमेकांप्रती (मर्यादित काळासाठी) आपलेपणाची भावना आकाराला येऊ शकते.

हद्द संस्कृती/समाज सापेक्ष असते. उदाहरणार्थ, शेतीप्रधान पारंपरिक समाजात घर आणि घराबाहेरचे यामधल्या आंतरसंबधातल्या ‘हद्दी’ लवचिक असतात. सार्वजनिक आणि खाजगी अवकाशाची सरमिसळ होणाऱ्या इथल्या अवकाशात ‘हद्द ओलांडणे’ ही अतिक्रमणाची कृती नसते. इथे, एखाद्याच्या ‘खाजगी’ अवकाशात प्रवेश करणे किंवा माणसे आणि जनावरे यांच्यातले व्यवहार इतके सहज असतात की एकमेकांच्या स्थलावकाशात सहज आदानप्रदान होत असते. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे, त्या विशिष्ट समाजात ‘स्व’बद्दलची असलेली विशिष्ट धारणा. ‘स्व’ आणि ‘पर’ असे दोन, स्वतंत्र आणि वेगवेगळे स्तर अस्तित्वात नसतात. ते आपपर भावाने विभागलेले नसतात. त्यामुळे, ‘मी’ आणि ‘तो/ते/ती’ यांनी एकमेकांमध्ये पाहाणे म्हणजे मर्यादा सोडून दुसऱ्याच्या प्रदेशात ‘नाक खुपसणे’ नसते.

अर्थात, हे इतके सोपे आणि रोमॅंटिक नसते. कारण, पारंपरिक समाजातही जात-धर्म-लिंग व्यवस्था आणि त्यावर उभारलेल्या टणक भिंती उभ्या राहिल्या आहेत.

हद्द मालकीहक्क ठरवते. मालकी हक्क देते.

मग, हद्द कोण ठरवते?

मी लिहिलेल्या पुलाखालचा बोंबल्या मारुती या नाटकातले एक पुरुष पात्र आपल्या गर्ल फ्रेंड बरोबर दुचाकी वरुन रेल्वेरुळाला समांतर जाणाऱ्या रस्त्यावरुन जात असते. रस्त्यावरच्या वाहनांबरोबरच रस्त्याच्या बाजूने दोन म्हशींना घेऊन शेतकरी जात असतो. अचानक कानठळ्या बसवणाऱ्या रेल्वेच्या शिटीच्या आवाजाने जनावरे गांगरतात, ती धावत –धावत रस्त्याच्या मधोमध येऊन गोंधळतात. पुरुषाचा दुचाकीवरचा ताबा सुटतो. गाडी डिवायडर वर जाऊन थडकते. अपघातात पुरुषाच्या डोक्याला मार लागतो आणि तो दवाखान्यात अडमिट. त्याची मैत्रीण सांगते:

मित्र आलेत. घरचे आलेत. तुला बघायला. सारे ओरडतात. साल्यांना म्हशी आवरायला येत नाहीत? बापाचा रस्ता समजतात? पोलिसात द्यायला पाह्यजे एकेकाला. सारे सांगत राहातात. तू अस्वस्थ. मला बोलावलंस खुणेनंच. कानाशी पुटपुटलास. आपल्या बापाचा रस्ताय? म्हशीनं कुठं जायचं? मी पोचवले तुझे प्रश्न सगळ्यांपर्यंत. ते गप्पगार. काही वेळानंतर तूही शांत. कायमचा. (पुलाखालचा बोंबल्या मारुती, वॉटरमार्क प्रकाशन)

डोंगर, जमीन, पाणी, वारा कुणाच्या मालकीचे? माणसाशिवाय इतर प्राणीमात्राने कुठे जायचे, त्यांची हद्द कोणती हे कोणी ठरवले? असे मुद्दे पुलाखालचा बोंबल्या मारुती या नाटकात मी नाटकाच्या माध्यमातून मांडले आहेत. यामागचा विचार करण्याचा मुद्दा हा आहे की आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत मानव आणि निसर्गातल्या सेंद्रिय नातेसंबंधाला हद्दीच्या मालकी हक्कात गुंडाळून टाकले आहे. आपल्या सोयीसाठी मानवी समाजानेच ठरवून टाकल्या आहेत आपल्या हद्दी. त्यांनी आखलेल्या हद्दीच्या आत फक्त माणूस येतो आणि बाकीचे जे काही त्याच्या आवाक्यात नसेल, त्यांच्या सोयीचे नसेल किंवा व्यापक संस्कृती – सत्ताकारणात बसत नसेल ते हद्दीच्या दुस-या बाजूला राहाते.

सरमिसळीच्या जीवनव्यापी धारणेत राहाणाऱ्या आशियाई समाजाला पाश्चात्य रनेसॉं विचारधारेने ‘हद्दी’ची ओळख करुन दिली. पृथ्वी आणि पृथ्वीबाहेरचे, देव आणि माणूस, निसर्ग आणि मानव अशा विभागणीतून कालावकाश आणि ज्ञानव्यवस्थेला तुकड्या-तुकड्यात मांडण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यातून, जग समजून घेण्याच्या ज्ञानशाखाही आकाराला आल्या. एका बाजूला संस्कृती आणि ज्ञान धारणांच्या अभ्यासासाठी वेगवेगळ्या ज्ञानशाखा तयार झाल्या. पण दुस-या बाजूला, त्या ज्ञानशाखांचे आंतरसंबध समजून घेणारे संस्कृती-सापेक्ष पैलू दुर्लक्षले गेले. ज्याच्या हाती सत्ता त्यांनी आपापल्या हद्दी आखून घेतल्या, दुसऱ्यासाठीही आखल्या. मग, मौखिक/लिखित, चमत्कारिक/वास्तविक, धार्मिक/लौकिक, देव/दानव, स्त्री/पुरुष, काळा/गोरा, खालचा/वरचा, भौतिक/अभौतिक असे तुकडे पाडणाऱ्या हद्दी समाज-संस्कृतीचे नियंत्रण करु लागल्या.

‘हद्द’ सहज आखलेली नसते. हद्दीने आखलेल्या मर्यादा नैसर्गिक नसतात. मानवी आस आणि कृतीतून हद्दी आखल्या जातात आणि पुसल्याही जातात.

**

हद्द आखणे आणि पुसणे या प्रक्रियांना समजून घेऊन त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न ‘हाकारा’च्या सातव्या आवृत्तीत आम्ही केला आहे. लिखित आणि दृश्य कलाकृतीतून एकमेकांना छेदत जात वेळोवेळी एकमेकांत मिसळत जाणाऱ्या आशय आणि रुपांची मांडणी करण्याचा प्रयोग ‘हाकारा’मधले कलाकार आणि विचारवंत करताना आपल्याला दिसतील.

घटीत आणि कल्पित मांडणारे, तसंच त्याला छेद देणारे निर्मितीविश्व या आवृत्तीत आपल्याला ठळकपणे दिसेल. यामध्ये, रंगनाथ पठारे यांची प्रकाशनाच्या वाटेवर असलेली कांदबरी व अनुजा घोसाळकर आणि काई तुचमन या अनुक्रमे भारत आणि चीनमधे राहून डॉक्युमेंटरी थिएटर करणाऱ्या कलाकारांचे कार्य आणि प्रकट चिंतन अशा दोन योगदानांचा उल्लेख करता येईल. काळ अवकाशाचे भान ठेवत इतिहासाशी संवाद साधत आपले कथन मांडणाऱ्या सातपाटील कुलवृत्तांत या कांदबरीच्या सुरुवातीला निवेदक म्हणतो: “आधी काळ सांगतो. कारण गोष्टी काळात घडत असतात. माणसांचं आयुष्य सामान्यतः ज्या वेगात वाहतं, त्या वेगाच्या नजरेत काळ हा स्थळापासून सुटा, स्वतंत्र आणि सार्वभौम म्हणता येईल असा असतो. त्याच्यावर भूमीचा अधिकार चालत नाही, या अर्थाने तो सार्वभौम. तो त्याच्या मर्जीनेच फक्त वाहतो.” तर द परस्युट ऑफ इम्पॉसिबल ट्रुथ या आपल्या मुक्त संवादात घोसाळकर आणि तुचमन घटीत आणि कल्पित यामधल्या पुसट होणाऱ्या हद्दींबद्दल बोलतात. कारण, कल्पित मांडण्यासाठी वापरलेल्या पुराव्यांचे आता ‘उत्पादन’ करता येते. आपल्याला असे दिसते की इतिहासाशी ‘प्रामाणिक’ राहाणे असेल किंवा आपणच पुराव्यांची निर्मिती करायची आणि आपणच कल्पितांची निर्मिती करायची अशा गुंतागुंतीच्या काळात निर्मिती-प्रक्रिया अधिक जटील होताना दिसते अशी जाणीव ‘हाकारा’ची आवृत्ती करुन देईल असा विश्वास आम्हाला वाटतो.

‘हाकारा’त कथन आणि दृश्य रूपातील प्रयोग वेगवेगळ्या संदर्भातले जीवनव्यवहार एकत्र मांडताना दिसतात. पारंपरिक आणि आधुनिकतेच्या सीमा लांघत आपले नृत्य-नाट्य प्रयोग मांडणारा लक्ष्मणरेखा हा शिल्पा भिडे या कथक-नर्तिकेचा लेख किंवा शोषित शेतकऱ्यांच्या हत्यारांना सामोरे जात आपल्या दृश्य प्रतिमा मांडणारी अनकम्फर्टेबल टूल्स ही चित्रमालिका असो. असे वेगवेगळ्या पध्दतीने हद्दीच्या या बाजूचे आणि त्याबाजूचे निरखत आपल्या निर्मिती-विश्वाची मांडणी करणारे लेखक आणि कलाकार ‘हद्द’ या आवृत्तीत आहेत.

हद्दीचे अस्तित्व मान्य करतानाच त्यातील लवचिकतेचे भान ठेवत बहुआयामी अवकाशांची कलात्म निर्मिती इथे होताना दिसेल. उदाहरणार्थ, अमितेश ग्रोवर या दिल्लीस्थित दिग्दर्शकाने श्रीलाल शुक्लांच्या राग दरबारी या कादंबरीवर आधारित नाट्यप्रयोग उभा करताना ‘अफवा-निर्मिती’ची पध्दत रिहर्सलमध्ये स्वातंत्र्योत्तर भारतातील समाजाच्या वर्मावर बोट ठेवण्यासाठी प्रवृत्त करतो. अमितेशच्या प्रकट चिंतनातून आपल्याला जाणवते की एका बाजूला “टोकाच्या अफवात जगणारे समाज”, “निकटतेत विणलेले आहेत” तर दुसऱ्या बाजूला हेच समाज उत्क्रांत होताना वेगवेगळ्या उतरंडीने विभागलेले आहेत.

‘हद्द’ असते. आपण इकडेही असतो आणि तिकडेही. हद्दीला छेदत आपण सर्वव्यापी असू शकतो. यातून नव्या दृश्यांची आणि कथनांची निर्मिती होण्याच्या शक्यता बळावतात. यातून, भवतालाचा शोध घेताना स्वतःलाही तपासून पाहाण्याची संधी आपल्याला मिळते. अशी संधी ‘हाकारा’ने पुन्हा एकदा ‘हद्दी’ ला भिडण्याच्या निमित्ताने घेतली आहे.

5 comments on “हद्दीच्या अलीकडे आणि पलीकडे: आशुतोष पोतदार

  1. Prashant Pitaliya

    संपादकीय लेख वाचला.वाचून अंकाचे अंतरंग उलगडले .. लेख सुंदर .. शेजारच्या आजी आणि हद् लक्षात राहीले. धन्यवाद

    Reply
    • सुचिता खल्लाळ

      इतिहासाशी प्रामाणिक राहणे, आपणच पुराव्याची आणि आपणच कल्पिताची निर्मिती करणे, या सा-यांत जटिल होत जाणारी निर्मिती प्रक्रिया हे भान देणारं संपादकीय नेहमीप्रमाणेच चिंतनशील !
      In real mean HAKARA is always a call, an intellectual & spiritual !!

      Reply
      • Kailashchandra waghmare

        छान..!!

        Reply
  2. Prachi

    ‘हद्द’ सहज आखलेली नसते. हद्दीने आखलेल्या मर्यादा नैसर्गिक नसतात. मानवी आस आणि कृतीतून हद्दी आखल्या जातात आणि पुसल्याही जातात.
    > तंतोतंत पटलय.
    ज्या नेसर्गीक गोष्टींना हद्द लागू नसायला हवी, जसे की नद्यांचा प्रवाह, तिथेही मनुष्य ढवळा ढवळ करु पाहतोय.
    Social media/ virtual world ने जग जसं जवळ येत चाल्लय तशी privacy ची हद्द पुसली जात आहे. असं असलं तरी Internet नावाच्या हद्द विरहीत मायाजालात, उतरंड-वर्गवारी राखायसाठी नव्या हद्दी जन्म घेतच आहेत. आपल्या समजे पलीकडे आपली माहिती संकलीत होतेय. प्रत्येकाची खानपान कपड्या लत्याची आवड, sexual inclination, क्रयशक्ती, येण्या जाण्याचे मार्ग, राजकीय मतं आवडी नावडी सगळं काही जोखलं जातय. वर्गीकरण होतय.

    Reply
    • Ashutosh

      Thank you, Prachi for the response. Ashutosh

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *