आशुतोष पोतदार

सामान्य काहीतरी

marathienglish

back

तेच ते तेच ते

दिवस येतो आणि जातो. ती येते आणि ती जाते. तो झोपतो आणि तो उठतो. ती अंथरुण घालते आणि पांघरुण काढते. तो गाडी सुरु करतो आणि गाडी परत आणून लावतो. ते कुलूप काढतात आणि ते कुलूप लावतात.

घडयाळाच्या काट्यावर लटकलेले क्षण.

दिवसामागून दिवस उगवणारा सूर्य उबेची शाल पांघरत राहातो.

अंगवळणी पडलेली सकाळ-दुपार-संध्याकाळ उस्फूर्ततेकडे डोळे वटारुन पाहात राहाते.

आपण घासत राहातो आपले अंग.

बडवत राहातो कपडे.

कापतो-चिरतो-शिजवतो जेवण

-तेच ते तेच ते-

आठवत राहातो विंदांच्या कवितेला.

दिवसा दिसणारी पहाट

आंधळेपणाने पाहिलेली स्वप्नं

उठल्या-उठल्या पाहिलेले तिचे पैंजणी पाय दिसेनासे होतात

कंटाळवाण्या चिकटून राहिलेल्या सवयीमध्ये. 

आणि, एकसुरी तालात.

तरीही,

चमकून टाकतो एखादा क्षण हळूहळू भाजत जाणा-या रव्यात

गरम तेलात रंग बदलत चाललेल्या कांद्यात

हमसून आत-बाहेरून रिकामं होण्याबरोबरच्या फ्लशच्या आवाजात

सापडत राहाते भविष्याची खळखळ.

सरकत जाणारं तरल काही, नेहमीचं

आपल्या घड्याळ्यातले सेल संपले असले तरी काळ-वेळ टिकटिकत राहाते. वाळत टाकलेल्या लांब चादरीसारखं घड्याळ पहुडलेलं असतं. पण, सरकत असतं. डोकं खाजवताना केसातला कोंडा पडत राहातो अंगभर तसे काळाचे तुकडे पडलेले असतात. इथं, मोबाईलवर मेसेजेस व्हायब्रेट होत राहातात. अवघड जागी खाज सुटत राहाते. कुणीतरी मरत असतं. कुणीतरी कुणासाठी डोहाळजेवणं करत असतं. कुणी कुणाच्या मिठीत राहून मोग-याच्या फुलांचे अडकलेले श्वास सोडवत असतं. कुणी टीव्हीवरल्या त्या उग्र दाढीवाल्याच्या किळसवाण्या मिठया तुडवत असतं. कुणाचे शाप. कुणाचे आशीर्वाद. कुणाचा तळतळाट. कुणाचा विश्वास. कुणाचा अभिमान. प्रत्येक दिवस नवा किंवा नवेपणाची झूल पांघरलेला किंवा शिळ्या कढीचा उत. तरीही दिवस वाहात राहातो काळाच्या फटीत, सामान्यतेच्या ओबडधोबड लयीत.

प्रत्येकाची फट वेगळी. प्रत्येकाचं तरल वेगळं. कुणाला फक्त चॅटींग चालतं. कुणाला मिठी. कुणाला किस तर कुणाला बेड. ज्याचं त्याचं जगणं, पाहाणं आणि समजून घेणं. एखाद्याचं तरल दुस-यासाठी साचलेलं असतं. एखाद्यासाठीचं ‘घडणं’ दुस-यासाठी ‘काय एवढं त्यात’ असू शकतं. नेहमीच प्रश्न विचारला जातो: “काय नवीन चाललंय.” खरंतर, संवाद सुरु करण्यासाठीचा प्रश्न असतो. पण, दर दिवशी वा दर महिन्याला वा दर वर्षी वा काही वर्षानंतर भेटणाऱ्यांसाठीही हा प्रश्न किरकिरा ठरतो. कधी कधी, त्रासदायक ठरतो. “यवढं काय घडणाराय एखाद्या लेखकाच्या आयुष्यात किंवा बॅंक ऑफसरीण किंवा पेन्शनीतल्या आजीबाईसाठी दररोज नवं!”  पण, ‘नवे’पणाची आस असणारे असा प्रश्न हमखास विचारतात आणि पुढच्याला मान खाली घालायला लावतात.

पण, जो-तो आपापल्या वकुबानं एकतर, सामान्यतेला नाहीतर, असामान्यतेला सामोरा जात असतो. नेहमीच्या जगण्यातल्या वाहतेपणाचा तो भाग असतो. सामोरे जाण्यातून प्रत्येक दिवशी क्रांती होत नसेल पण कमी-अधिक संघर्ष होत असतो, हालचाली होतात हे मात्र नक्कीच.

नेहमीच्या जगण्यात येणारा क्षण येतो-जातो, कधी तो जास्तीचा रेंगाळतो कधी तरी भर्रदिशी कधी आला आणि गेला हेही कळत नाही. म्हणून, नेहमीचं जगण व्हेग असू शकतं. पण, ते अब्स्ट्रॅक्ट नसतं. त्यात आकार, रूप, रचना नाही असं वाटू शकते. त्यातून, अब्स्ट्रॅशन्सच्या शक्यता निर्माण करत असतं. पण, ते अब्स्ट्रॅक्ट नसतं. खरंतर, ते तसं नसावं अशी प्रत्येकाची धडपडही असते. नेहमीच्या जगण्यात, प्रत्येकजण रूप, रंग, गंध, आकार, भाषा शोधत राहाते. सकाळी उठल्या पासून रात्रीपर्यंत संगती लावण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु असतो. कपडे धुऊन वाळत टाकल्यानंतर ते वाळून घडी घालेपर्यंतच्या काळ-अवकाशात संगती लावण्याचा झगडा सुरुच असतो. तो कधी स्वतःबरोबर असतो तर कधी आजुबाजूला असल्या-नसल्यांबरोबरही असतो. त्या-त्या क्षणाला भिडण्याबरोबर तो अनेक क्षणांच्या मालिकेत स्वतःला बसवून त्यातल्या गुंत्याला सामोरे जाण्याचा आपला आटोकाट प्रयत्न असतो. इथं एका क्षणाचा अमर्याद विस्तार असू शकतो किंवा अनेक क्षणांचा आटोकाट संकोच.

साला, काय आहे यात भिडायसारखं

सगळा मोठा पसारा असतो आणि हे सगळं अव्याहत सुरु असतं. मग, एका त-हेचं सामान्य जगणं दुस-या त-हेच्या सामान्य जगण्यापेक्षा वेगळं काढण्याचा प्रयत्न होतो. किंवा, ‘हे जगणं’ आणि ‘ते जगणं’ यामध्ये कमी जास्त दर्जा ठरवला जातो. दोन नेहमीची उदाहरणं: बाहेरच्या कामाला जाणारा पुरुष आणि घरातले धुणे भांडे करणारी बाई. आर्थिक लाभ नसलेलं काम कमी महत्त्वाचं आणि पैसे मिळवून देणारं ‘पुरुषी’ काम अशी सुलभ मांडणी सहज केली जाते. सामान्य जगण्यातल्या या पसा-यात बाई, मुलं, म्हातारी माणसं नेहमीच सामान्यातल्या अतिसामान्य स्तरावर झगडत राहातात. तशीच बाब रस्त्यावर फळं विकणारा, स्मशानात काम करणारा, भाजी विकणारी, गावकुसाबाहेर फेकले गेलेले, सायकल घेऊन जाणारा, जनावरांना हाकत जाणारी, चार चाकी घेऊन जाणारा, भगवे कपडे घालून जाणारा, खुरटी दाढी वाढवून टोपी घालून जाणारा, कोट्यावधी रूपयांच्या जमिनीला देशाच्या ‘प्रगती’साठी आपल्या उद्योगासाठी बळकावणारा यासारख्यांची असते. हे सारे त्या-त्या ’सामान्य’ जगण्याचा भाग असतात. पण, वर म्हणालो तसं, ‘सामान्य’जगण्याची प्रतवारी ठरवली जाते, त्यात उतरंड येते. कारण, सामान्य जगणे अब्स्ट्रॅक्ट नसते. त्यात, व्यक्ती आणि समष्टीतील नातेसंबधातून, कार्यकारण भावातून, समाज-राजकारणातून विशिष्ट व्यवहार आणि रचना आकारात येतात आणि त्या एकमेकाला भिडत राहातात.  

रिव्होल्युशनरी रोड

सॅम मॅंडेसचा रिव्होल्युशनरी रोड नावाचा केट विन्स्लेट आणि लिओनार्दो दीकॅप्रिओच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट आहे. रिचर्ड येट्स च्या १९६१ मधे लिहिलेल्या कादंबरीवर बेतलेल्या या सिनेमात लग्न, कुटुंब आणि नेहमीच्या जगण्यातून बोअरडम आलेल्या, उत्साह गमावलेल्या नवरा-बायकोची कहाणी दाखविली आहे. आपल्या होपलेस आयुष्यातही दमदार जगण्यासाठी दुर्दम्य आत्मविश्वास बाळगणारी बायको नव-यापुढे पॅरिसला बस्तान हलवण्याची जोरदार योजना मांडते. नव-यालाही ती पटते. बायको नव-याला सुचवते की यावेळी पॅरिसमधे ती नोकरी करून मिळवेल आणि आयुष्याच्या धबडग्यात राहून गेलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तो मोकळा राहून आयुष्य एक्स्प्लोर करेल. पण, त्यांच्या आजुबाजूचे लोक त्यांना वेड्यात काढतात. विशेष करुन, बायको मिळवणार आणि हा आयुष्य एक्स्प्लोर करण्याबद्दल नवऱ्याचे मित्र त्याची खिल्ली उडवतात. पण, ज्यांनी त्यांना घर मिळवून दिलेले असते त्या बाईचा ‘मनोरुग्ण’ मुलगा जॉन याचा मात्र त्यांच्या या  धाडशी योजनेला पूर्ण पाठिंबा असतो. तो म्हणतो, “Plenty of people are onto the emptiness but it takes real guts to see the hopelessness.” दररोजच्या जगण्यातला फोलपणा, त्यातून येणा-या निराशेला भिडत त्यातल्या होपलेसपणाबद्दल ज्यांना भान येते ते नवे मार्ग चोखाळतात आणि त्यांना ‘रिव्होल्युशनरी मार्ग’ सापडतो. अर्थात, रिव्होल्युशनरी रोड या चित्रपटात ते पॅरिसला जात नाहीत हा भाग वेगळा.

एक मात्र आहे की नेहमीच्या जगण्याला भिडत असताना सरप्राईजेस वाटयाला येतात. अर्थात, जे हे सरप्रायजेस टिपू शकतात त्यांच्याच वाट्याला आनंद आणि उत्साह येतो. हळू-हळू, नवे मार्ग, कधी-कधी ‘रिव्होल्युशनरी’ मार्ग दिसतात. अर्थात, ‘रिव्होल्युशनरी’ मार्ग कशालातरी नाकारण्यातून येत असले तरी भिडण्यात फक्त ‘नकार’ नसतो. नवे पर्यायही असतात. किंबहुना, भिडण्यात वा सामोरे जाताना आधी असण्याचा स्वीकार आणि नकाराबरोबर त्यात नवनिर्मितीच्या शक्यताही दडलेल्या असतात. 

भिडण्याशी सलगी

प्रख्यात विचारवंत रेमंड विल्यम्स संस्कृती-विश्लेषणात ‘सामान्य’तेला केंद्रस्थानी ठेवतात. ‘सामान्य़’तेवर भर देताना ते लिहितात: “There are, essentially, no “ordinary” activities, if by “ordinary” we mean the absence of creative interpretation and effort.” सामान्यत्वाचा आदर ठेवत कला अभिव्यक्तीतीतून येणारे भान, चिकित्सक आकलन आणि संस्कृतीला मिळणारी समज महत्त्वाची असते.

नेमका हा विचार हाकाराच्या ‘/भिडणे’ या आवृत्तीची निर्मिती आणि मांडणी करण्यामागे आहे.

‘हाकारा’च्या पाचव्या आवृतीमागची एक प्रेरणा जगण्यातल्या सामान्यत्वाशी सलगी करत त्याच्याशी वेळो-वेळी भिडत नवनिर्मितीच्या शक्यता आजमावून पाहाणारा समाज आणि कला निर्मिती आहे. यादृष्टीने, चेतन मेवाडांची Urban Farm ही चित्रमालिका निर्मिती-प्रक्रिया रोचक वाटते. त्यांना नेहमीच्या जगण्यात दिसणारे आणि जाणवणारे भूमितीय आकार आणि रूपे त्यांच्या चित्रनिर्मितीमागील प्रेरणा आहेत. एकमेकांना छेदत जाणाऱ्या चित्र-रेषा या एका बाजूला, नैसर्गिक आणि मानवनिर्मित रचना-सूत्रे व त्यांच्यातील पुनरावृत्ती तर दुस-या बाजूला, मानस-विश्वाला सामो-या जात उभ्या राहातात.

स्मशानभूमीतील दररोजचं आयुष्य तिथे न राहाणाऱ्या आणि मृत्युच्या भयकारी रूपाबद्दल संवेदनशील असणाऱ्या सामान्य जनांसाठी भीतीदायक ठरू शकते. त्यातूनच, प्रसंता घोष आपल्या Unsaid च्या छायचित्रणाच्या प्रक्रियेतून ‘अव्यक्त’ मुद्दे उपस्थित करतात. मृत्यु आणि मृत्युभोवतीच्या विधीला दररोज सामोरे जाताना सामान्य माणसाला पडणारे प्रश्न ते स्मशानात काम करणा-या डोमाला आणि पुरोहिताला विचारतात. मृत्युच्या भयकारी रूपाला भिडण्यातून मिळणारे वेगवेगळे प्रतिसाद घोष यांची चित्रे आणि प्रश्नोत्तरातून समोर येतात. 

‘समाज कुठेय दाखवा’ असं म्हटलं तर आपल्याला बावचळून जायला होईल. पण, दररोजचं जगणं, नाते-संबध आणि सामान्यत्व यातून समाजाचं एक वेगळं रूप दाखवता येईल. हे जगणं एखाद्या घटनेला वा प्रसंगाला दिलेला फक्त प्रतिसाद नसतो. त्यापलीकडे जाऊन सभोवतालचे ताणेबाणे, राजकीय आणि सामाजिक व्यवहार-रचना यांचा प्रभाव जगण्यात दिसत राहातो. अर्थात, ही एवढी सहज स्पष्ट करता येईल अशी प्रक्रिया नसते. पण, ती उलगडून दाखवून या प्रक्रियेत नक्की काय घडते याचे विश्लेषण रुमी समाधान यांच्या Contemporary Indian Art:  Revolt and Rupture चिकित्सा-लेखात आपल्याला वाचायला मिळते. ‘हाकारा’ ला अभिप्रेत असणा-या दररोजच्या जगण्यातल्या शोषण व्यवहाराला भिडताना कलाकार आपली बंडखोरीची रूपे कशी निर्माण करतो याचे नेमके विश्लेषण अमोल पाटील यांच्या कलानिर्मितीची चर्चा करताना समाधान देतात. नेहमीचा व्यवहार जसा विचार आणि भावनांचा असतो तसा तो साधन-सामग्रीचाही असतो. ही सामग्री कधी जपलेली असते, कधी टाकून दिलेली असते किंवा सामाजिक व्य़वहारातून नाकारलेली असते. अशी सामग्री, या लेखात नोंदवल्या प्रमाणे, समाज आणि व्यक्तीच्या ओळख आणि अस्तित्व-संघर्षात असते. समाधान यांनी उपस्थित केलेले मुद्दे या लेखात चर्चा केलेल्या कलाकारांपुरते आणि त्यांच्या अस्तित्ववादी संघर्षात राहात नाहीत तर ते दररोजचे जगणे, सामान्यपणात सामील असलेली साधन सामग्री, जात-धर्माची उतरंडीची शोषित व्यवस्था आणि कलात्म अभिव्यक्ती अशा व्यापक पटलावर जातात.

समाज कोणत्या त-हेच्या ‘सामान्य’पणाला मान्यता देतो वा देत नाही? कलाकार कुठल्या मान्यता मिळालेल्या वा मान्यता न मिळालेल्या दररोजच्या आयुष्यातल्या स्त्रोतांना सामोरे जात आपली निर्मिती करतो? दररोजच्या जगण्यातील बहुआयामी  साधनसामग्रीलाच भिडत दृक-श्राव्य-लिखित वा सादरीकरणाच्या कला परंपरांचे आकलन करून घेतले जाते काय? की विशिष्ट व्यवस्थेने मान्यता दिलेल्या साधन-सामग्रींना आणि जीवन व्यवहारांना मान्यता देत कला रूपे आकाराला येतात? अशा प्रश्नांना, बदलत्या काळात पुनःपुन्हा भिडावे लागणार. त्या दिशेने ‘हाकारा’चा हा एक छोटा प्रयत्न.

प्रतिमा सौजन्य

मुखपृष्ट प्रतिमा: दिव्या पांडे, ओबाया पुत्तुर आणि अंजू चंद्रन

विभागवार प्रतिमा: नईम मोहैमेन, रंजिता सिंग, प्रसांता घोष, आदिती जोशी, श्रुती महाजन, आणि दिव्या पांडे.

One comment on “सामान्य काहीतरी: आशुतोष पोतदार

  1. Siddharth Naik

    छान लिहिलंय. स्तुत्य उपक्रम आहे आपला.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *