मूळ लेखिका: हार्पर ली

अनुवाद: आश्लेषा गोरे

टू किल अ मॉकिंगबर्ड

back

 

.

वयाच्या साधारण तेराव्या वर्षी जेमचा म्हणजे माझ्या भावाचा हात बेक्कार मोडला. एकदाचा तो हात बरा झाला आणि आपल्याला आता कधीच फुटबॉल खेळता येणार नाही ही जेमची भीतीही जरा कमी झाली. त्यानंतर मात्र त्याला क्वचितच त्या दुखापतीची जाणीव व्हायची. त्याचा डावा हात उजव्या हातापेक्षा किंचित लहान होता. उभं राहिल्यावर किंवा चालताना त्याच्या हाताचा तळवा शरीराशी काटकोनात रहायचा आणि अंगठा मांडीला समांतर असायचा. अर्थात, जोवर फुटबॉल लाथेनं उडवता येत होता तोवर जेमला हाताची काही फिकीर नव्हती. 

पुरेसा काळ लोटल्यानंतर कधीतरी आम्ही त्या अपघाताला कारण ठरलेल्या घटनांबद्दल बोलायचो. त्या सगळ्या घटनांची सुरुवात एवेल्सनं केली असं माझं ठाम म्हणणं असायचं. पण माझ्याहून चार वर्षांनी मोठ्या असलेल्या जेमला मात्र वाटायचं की त्याच्याही खूप आधीपासून याची सुरुवात झाली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार उन्हाळ्यात डील आमच्याकडे आला आणि बू रॅडलीला बाहेर काढण्याची कल्पना त्यानं पहिल्यांदा आमच्या डोक्यात घुसवली त्यावेळी याची सुरुवात झाली होती.

मग मी असं म्हटलं की झाल्या गोष्टीचा असा व्यापक विचार करायचा असेल तर अँड्र्यू जॅक्सनपासून याची सुरुवात झाली असं म्हणायला पाहिजे. जर का जनरल जॅक्सननं क्रीक लोकांना कोंडीत पकडलं नसतं तर सायमन फिंच अलाबामात कसा काय पोहोचला असता? आणि तो तसा आला नसता तर आम्ही तरी कुठे असतो? आता मारामारी करून भांडण सोडवण्याइतके काही आम्ही लहान राहिलो नव्हतो. त्यामुळे आम्ही अॅटिकसकडे धाव घेतली. आमचा बाबा म्हणाला, तुम्हा दोघांचंही बरोबर आहे. 

हेस्टींग्जच्या लढाईत आमचे पूर्वज दोन्हीपैकी कोणत्याच बाजूनं लढल्याचा उल्लेख नव्हता. आमच्यासारख्या तद्दन दक्षिणवासी कुटुंबातल्या काही लोकांसाठी हे लाजिरवाणं होतं. आमच्या वाट्याला आला होता तो फक्त सायमन फिंच. औषधं तयार करून विकणारा, कॉर्नवॉलवरून आलेला, केसाळ प्राण्यांची शिकार करणारा. तो जितका श्रद्धाळू होता त्यापेक्षा कितीतरी अधिक चिक्कू होता. इंग्लंडमधल्या स्वतःला मेथॉडीस्ट म्हणवणाऱ्या लोकांचा उदारमतवादी बंधूंकडून होणारा छळ पाहून तो त्रस्त झाला होता. सायमन स्वतःला मेथॉडीस्ट समजत असल्याने अटलांटिकवरून फिलाडेल्फिया मग तिथून जमैका, तिथून मोबाईल आणि तिथून पार सेंट स्टीवन्सपर्यंत तो मजल दरमजल करत येऊन पोहोचला होता. मेथॉडीस्ट चळवळीचा प्रणेता जॉन विस्ली पैशांचा अतिहव्यास ठेवून केलेल्या व्यापारावर खरमरीत टीका करायचा. त्याच्याशी इमान राखत सायमननं व्यापाराऐवजी वैद्यकशास्त्राचा वापर करून बक्कळ पैसा कमावला. पण ते करत असताना तो तितकासा समाधानी नव्हता. आपल्याला कपड्यालत्त्याचा, सोन्यानाण्याचा मोह होईल आणि देव सापडण्याच्या मार्गात अडथळा येईल अशी त्याला भीती वाटायची. तेव्हा माणसांना गुलाम न करण्याचा आपल्या गुरूचा उपदेश सोयीस्करपणे विसरून सायमनने तीन गुलाम खरेदी केले. मग त्यांच्या मदतीनं अलाबामा नदीच्या किनाऱ्यावर सेंट स्टीवन्सपासून चाळीस मैल वरच्या बाजूला जमीनजुमला घेऊन तिथे घर बांधलं. स्वतःसाठी बायको शोधायला म्हणून तो एकदाच सेंट स्टीवन्सला परत आला आणि मग तिच्याबरोबर संसार करून त्यानं आपली वंशावळ पैदा केली. त्यात मुलींची संख्या चिक्कार होती. सायमन भरपूर जगला आणि चिक्कार पैसाअडका मागे ठेवून मेला. 

“फिंचचा घाट” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायमनच्या जमिनीवर रहायचं आणि कापसाची शेती करून आपला उदरनिर्वाह करायचा ही आमच्या कुटुंबातल्या पुरूषांमध्ये रीतच ठरून गेली होती. स्वयंपूर्ण म्हणावं असं हे ठिकाण होतं. आजूबाजूला पसरलेल्या शाही मालमत्तांच्या तुलनेत तसं ते अगदीच साधं होतं. पण बर्फ, गव्हाचं पीठ आणि कपडेलत्ते एवढं सोडलं तर जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी या घाटावर तयार व्हायच्या. या तीन गोष्टींचा पुरवठा मात्र मोबाईलवरून येणाऱ्या नावांमार्फत होई.

उत्तर आणि दक्षिणेत धुसफूस चालू झाली तेव्हा सायमन नव्हता ते बरंच. त्या धामधुमीत एक जमीन सोडून बाकी सगळं काही त्याच्या वारसांच्या हातातून गेलं. सायमनला हे कळलं असतं तर त्याचा फुकाचा संताप झाला असता. तरीही पार विसाव्या शतकापर्यंत त्याच्या घाटावर रहाण्याची परंपरा मोडीत निघाली नव्हती. विसाव्या शतकात मात्र माझा बाबा अॅटीकस कायद्याचा अभ्यास करण्यासाठी माँटगोमरीला गेला आणि त्याचा धाकटा भाऊ वैद्यकी शिकायला बॉस्टनला गेला. त्यांची बहीण अलेक्झांड्रा ही घाटावरच राहिलेली एकमेव फिंच उरली. तिनं एका अत्यंत घुम्या माणसाशी लग्न केलं होतं. नदीकाठच्या झुलत्या बिछान्यावर पडून आज जाळंभर मासळी सापडली असेल का, याचा विचार करण्यात तो बहुतेक सारा वेळ घालवी. 

बार कौन्सिलमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर बाबानं मेकोम्बला येऊन वकिली करायला सुरुवात केली. फिंचच्या घाटापासून साधारण वीस मैल पूर्वेला असलेलं मेकोम्ब हे मेकोम्ब तालुक्याचं प्रशासकीय केंद्र होतं. अॅटीकसच्या न्यायालयातल्या कचेरीत एक टोपी अडकवायची खुंटी, एक पिकदाणी , बुद्धिबळाचा एक पट आणि अलाबामाच्या दंडसंहितेची एक कोरी करकरीत प्रत सोडली तर फारसं काहीही नव्हतं. त्याच्या पहिल्या दोन्ही अशिलांना मेकोम्ब तालुक्याच्या तुरुंगात नुकतंच फाशी देण्यात आलं होतं. न्यायालयानं दिलेली दयेची संधी स्वीकारून दुसऱ्या दर्जाच्या खुनाची कबुली द्यावी आणि आपला जीव वाचवावा असं अॅटीकसनं त्यांना कळकळून सांगितलं होतं. पण ते पडले हॅवरफोर्डचे गावकरी. सबंध मेकोम्ब तालुका त्यांना शेखचिल्ली म्हणूनच ओळखायचा. एका रांडेला बळजबरीनं डांबून ठेवल्यावरून झालेल्या गैरसमजातून त्यांनी मेकोम्बच्या मुख्य लोहारालाच उडवलं होतं. एवढंच नाही तर हे काम तीन लोकांच्या साक्षीनं करण्याचा गाढवपणा सुद्धा केला होता. “भोसडीच्याची लायकीच तसली” एवढं कारण आपल्या बचावाला बास आहे की, असंही त्यांचं म्हणणं पडलं. तेव्हा पहिल्या दर्जाच्या खुनासाठी माफी मिळावी म्हणून अर्ज करण्याचा त्यांनी आग्रह धरला. त्यामुळे आपल्या अशिलांना फाशी देत असताना तिथे हजर रहाण्याव्यतिरिक्त अॅटीकसला त्यांच्यासाठी विशेष काहीच करता आलं नाही. गुन्हेगारी कायद्यांविषयी बाबाला मनापासून तिटकारा वाटायची सुरुवात बहुधा इथूनच झाली. 

मेकोम्बमधल्या पहिल्या पाच वर्षांमध्ये अॅटीकसने कायद्यापेक्षा अर्थशास्त्राचाच जास्त वापर केला असं म्हटलं पाहिजे. कारण त्यानंतरची अनेक वर्षं त्यानं त्याची कमाई भावाच्या शिक्षणात खर्च केली. जॉन हेल फिंच हा माझ्या बाबापेक्षा दहा वर्षांनी लहान होता. कपास काढण्यात काही दम उरलेला नाही हे बघून त्यानं वैद्यकीचा अभ्यास करण्याचं ठरवलं. पण जॅक काकाला मार्गाला लावल्यानंतर अॅटीकसने कायद्याच्या व्यवसायातून बऱ्यापैकी कमाई केली. त्याला मेकोम्ब आवडायचं. तो तिथेच जन्माला येऊन लहानाचा मोठा झाला होता, तिथल्या सर्व माणसांना ओळखून होता आणि ती देखील त्याला ओळखत होती. शिवाय सायमन फिंचच्या एकूण पसाऱ्यामुळे गावातील जवळजवळ प्रत्येक कुटुंबाशी अॅटीकसचं नातं होतं.

मेकोम्ब हे तसं जुनाट गाव होतं. माझी जेव्हा या गावाशी पहिली ओळख झाली तेव्हा तर त्याला अगदीच कळा आली होती. पावसाळ्यात रस्ते लालसर रंगाच्या पाण्याने भरून वाहायचे. रस्त्याच्या कडेला गवत उगवायचं आणि चौकातली न्यायालयाची इमारत पावसात निथळत उभी असायची. त्या काळी भारी उकाडा असायचा. उन्हाळ्यात काळी कुत्री हैराण व्हायची. खटारे ओढणारी हडकुळी खेचरं रणरणत्या उन्हात चौकातल्या डेरेदार ओक झाडांच्या सावलीत माशा वारत उभी रहायची. पुरूषांच्या कडक कॉलरी सकाळी नऊ वाजेपर्यंतच मरगळून जायच्या. बायका दुपार होण्याआधी एकदा अंघोळ करायच्या आणि दुपारी तीन वाजताची डुलकी काढून झाली की पुन्हा एकदा करायच्या. तरीही रात्रीपर्यंत त्या पार घामेघूम होऊन जायच्या आणि टाल्कम पावडरची सजावट केलेल्या मऊशार केकसारख्या दिसायच्या.

त्याकाळी माणसं निवांत होती. ती चौकात रेंगाळत चालायची, आजूबाजूच्या दुकानांमधून जा-ये करायची,  प्रत्येक गोष्ट भरपूर वेळ देऊन करायची. दिवस असायचा चोवीस तासांचा, पण खूप मोठा वाटायचा. कसलीच घाई नसायची. कारण कुठे जायचं नसायचं, काही विकत घ्यायचं नसायचं आणि विकत घ्यायला पैसेही नसायचे. मेकोम्बच्या बाहेर बघण्यासारखंही काही नसायचं. काही लोकांना मात्र विनाकारण कसलीशी आशा वाटत होती. आता भीतीलाच भिण्याचे दिवस आले आहेत असं नुकतंच सांगण्यात आलं होतं.

गावातल्या मुख्य रस्त्यावर आम्ही रहात होतो. अॅटीकस, जेम आणि मी. शिवाय आमच्याकडे स्वयंपाक करणारी कॅलपर्निया. जेमला आणि मला आमचा बाबा तसा ठीकठाक वाटायचा. तो आमच्याबरोबर खेळायचा, आम्हाला वाचून दाखवायचा आणि आमच्यात विनाकारण नाकही खुपसायचा नाही. 

कॅलपर्निया हे एक वेगळंच खटलं होतं. ती अगदी हडकुळी होती, तिला लांबचं दिसायचं नाही आणि ती काण्या डोळ्यानं बघायची. तिचा हात पलंगाएवढा रूंद होता आणि त्यापेक्षा दुपटीनं टणक होता. ती सतत मला स्वयंपाकघरातून बाहेर हाकलून द्यायची. जेम माझ्याहून मोठा आहे हे माहीत असूनही “तू त्याच्याइतकं शहाण्यासारखं का वागत नाहीस”, असं मलाच विचारायची आणि नको तेव्हा घरात बोलवायची. आमची भांडणं चांगली लंबीचौडी आणि एकतर्फी असायची. त्यात कायम कॅलपर्नियाच जिंकायची. यामागचं मुख्य कारण म्हणजे अॅटीकस कायम तिचीच बाजू घ्यायचा. जेमच्या जन्मापासून ती आमच्याकडे होती आणि मला आठवतंय तेव्हापासून तिचा हा जुलमी वावर मला जाणवायचा.

आमची आई गेली तेव्हा मी फक्त मी दोन वर्षांची होते. त्यामुळे मला तिची उणीव फारशी जाणवली नाही. मॉण्टगोमरीच्या ग्रॅहम लोकांपैकी ती होती. अॅटीकसची राज्य विधिमंडळात निवड झाल्यानंतर त्यांची भेट झाली होती. तेव्हा तो मध्यमवयीन होता आणि ती त्याच्यापेक्षा पंधरा वर्षांनी लहान होती. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षभरात त्यांना जेम झाला आणि चार वर्षांनी माझा जन्म झाला. त्यानंतर दोन वर्षांनी अचानक हृदयविकाराचा झटका येऊन आमची आई वारली. तिच्या घराण्यातच तो रोग होता म्हणे. मला तिची फारशी आठवण यायची नाही पण मला वाटतं जेमला यायची. त्याला ती स्पष्ट आठवायची. कधीकधी खेळताना मधेच तो एक लांबलचक सुस्कारा सोडायचा आणि तिथून निघून जाऊन मोटारी ठेवण्याच्या मागच्या जागेत एकटाच खेळत बसायचा. तो असं काहीतरी करायचा तेव्हा त्याला त्रास द्यायचा नाही हे मला चांगलंच माहिती होतं.

मी सहा एक वर्षांची आणि जेम दहा एक वर्षांचा असतानाची गोष्ट आहे. तेव्हा आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळायला जाण्यासाठी घरापासूनचं अंतर आखून दिलं होतं (हे अंतर म्हणजे कॅलपर्नियाची हाक ऐकू येईल इतपतच लांबचं असायचं) आमच्या घराच्या उत्तरेला दोन घरं सोडून असलेलं मिसेस हेन्री लफायते ड्युबोज यांचं घर आणि दक्षिणेला तीन घरं सोडून असलेलं रॅडलींचं घर एवढं ते अंतर होतं. हे अंतर ओलांडायचा आम्हाला कधीच मोह झाला नाही. रॅडलींच्या घरात एक गूढ प्राणी रहात होता आणि त्याचं नुसतं वर्णन जरी ऐकलं तरी पुढचे कित्येक दिवस आम्ही अगदी शहाण्यासारखं वागायचो. तर इकडे मिसेस ड्युबोजसारखी खवीस बाई दुसरी नसेल!

त्याच उन्हाळ्यात डील आमच्याकडे आला.

एके दिवशी सकाळी सकाळी आम्ही परसात खेळायला सुरुवात करत होतो. तेवढ्यात मला आणि जेमला शेजारच्या रेचल हॅवरफोर्डच्या कोबीच्या वाफ्यात खुसफुस ऐकू आली. रेचलच्या शिकारी कुत्र्याला पिल्लू होणार होतं. तेव्हा ते झालं की काय हे बघायला आम्ही तारेच्या कुंपणापाशी गेलो. तर त्याऐवजी एक कोणीतरी तिथे बसून आमच्याचकडे बघत असलेला दिसला. खाली बसलेला असताना तो काही कोबीच्या रोपट्यापेक्षा फारसा उंच दिसत नव्हता. आम्ही त्याच्याकडे एकटक बघत राहिलो. शेवटी त्यानंच बोलायला सुरुवात केली:

“अरे,”

“अरे, कोण तू?,” जेम आनंदानं म्हणाला.

“मी चार्ल्स बेकर हॅरीस, मला न वाचता येतं” तो म्हणाला.

“म?” मी म्हटलं.

“नाही, मला वाटलं, मला वाचता येतं हे ऐकून तुम्हाला छान वाटेल. तुम्हाला काही वाचून दाखवायचं तर मी दाखवीन ….”

“वय काय तुझं? साडेचार?” जेमनं विचारलं.

“सातवं लागेल आता मला.”

“हात्तिच्या, त्यात काय एवढं?” माझ्याकडे बघून हात उडवत जेम म्हणाला. “ही स्काऊट पार जन्मल्यापास्नं वाचतेय. अजून तर ती शाळेतही जात नाही. तुला सातवं लागणारे ? पण तू तर अगदीच बारक्यायस.” 

“मी लहान दिसत असलो तरी वयानं मोठाय,” तो म्हणाला.

त्याच्याकडे व्यवस्थित बघता यावं म्हणून जेमनं कपाळावरचे केस बाजूला सारले आणि म्हणाला, “बरंss चार्ल्स बेकर हॅरीस, येतोस खेळायला? आईशप्पथ, काय पण नाव ए.”

“तुझं नाव काय कमी गंमतशीर ए? रेचल काकू म्हणते, तुझं नाव जेरेमी अॅटीकस फिंच ए म्हणून.”

“माझं नाव मला शोभेल इतका मी मोठाय.” जेम गुरगुरत म्हणाला. “तुझं नाव तर शप्पथ तुझ्यापेक्षा फूटभर तरी लांब असेल.” 

“ए, तुम्ही मला डील म्हणा” कुंपणातून बाहेर यायची धडपड करत डील म्हणाला.

“कुंपणाखालनं नको येऊ. वरनं ये. पटकन येशील.” मी म्हणाले. “ए, तू कुठून आलास?”

डील मिसिसिपीमधल्या मेरिडीयन वरून आला होता. या उन्हाळ्याच्या सुट्टीत तो त्याच्या रेचल काकूकडे आला होता आणि आता इथून पुढची प्रत्येक उन्हाळी सुट्टी तो मेकोम्बमध्येच घालवणार होता. त्याचं कुटुंब मूळचं मेकोम्बचंच होतं. त्याची आई मेरिडीयन मधल्या एका छायाचित्रकाराकडे काम करत होती. तिनं सुंदर बालक स्पर्धेत डीलचं छायाचित्र पाठवून पाच डॉलरचं बक्षीस मिळवलं होतं. तिनं ते पैसे डीललाच दिले होते आणि त्या पैशातून तिकीट काढून तो वीसेक वेळा तरी सिनेमा पाहायला गेला होता.

“इथं कुठले सिनेमेच लागत नाहीत. कधीतरी कोर्टात जीझसचे सिनेमे दाखवतात तेवढंच” जेम म्हणाला. “चांगला सिनेमा पाह्यला का कुठला?”

डीलनं ड्रॅक्यूला पहिला होता. हे कळल्यावर त्याच्याकडे आदरानं बघत जेम म्हणाला, “आम्हाला त्याची गोष्ट सांग की मं”

डील हा एक अजब पोरगा होता. त्यानं तागाच्या कपड्यापासून बनवलेली निळ्या रंगाची अर्धी विजार घातली होती. ती बटणांनी त्याच्या शर्टाला जोडलेली होती. त्याच्या डोक्यावरचे केस बर्फासारखे पांढरे शुभ्र होते आणि मजेशीरपणे उभे राहिले होते. त्याच्यापेक्षा एक वर्षानं लहान असूनही मी त्याच्यापेक्षा उंच होते. ड्रॅक्यूलाची ती जुनीच गोष्ट सांगत असताना त्याचे निळे डोळे लकाकायचे, मध्येच अचानक तो मजेत हसायचा, कपाळावर मधोमध रुळणारी बट सवयीनेच ओढायचा.

तर डीलने ड्रॅक्यूलाला चीत केल्यानंतर जेमचं असं म्हणणं पडलं की पुस्तकापेक्षाही सिनेमा जास्त भारी वाटतोय. मी डीलला विचारलं, “तुझे बाबा कुठे असतात? त्यांच्याबद्दल काहीच बोलला नाहीस. “

“मला बाबा नाहीचेत. “

“म्हणजे वारले का ते?”

“नाही..”

“जर तुझे बाबा वारले नसतील तर ते आहेतच की!”

डील लाजला. जेमनं मला गप्प राहायला सांगितलं. डीलचा पूर्ण अंदाज घेऊन त्याला आमच्यात घेतल्याची ही अगदी पक्की खूण होती. त्यानंतरचा उरलेला उन्हाळा नेहेमीच्या उद्योगांमध्ये मजेत पार पडला. नेहमीचे उद्योग म्हणजे काय तर, परसातल्या दोन भल्यामोठ्या कडुनिंबाच्या झाडांमध्ये आम्ही एक ट्रीहाऊस बांधलं होतं. त्यात नवीन नवीन सुधारणा करायच्या आणि उगीच धांदल करायची. शिवाय ऑलिव्हर ऑप्टिक, व्हिक्टर अॅपलटन आणि एजर राईस बरोच्या लिखाणावर बेतलेली नाटकं बसवून ती करायची. नाटकाच्या बाबतीत बोलायचं तर डील आमच्याबरोबर होता हे नशीबच. याआधी मला ज्या पात्रांची कामं जबरदस्तीनं करायला लागायची ती तो करायला लागला, म्हणजे -टारझन मधला वानर, द रोव्हर बॉईज मधले मिस्टर क्रॅबट्री, टॉम स्विफ्ट मधले मिस्टर डेमन इत्यादी. त्यामुळे डील हा आम्हाला एक लहानसा चेटक्याच वाटायला लागला. त्याच्या डोक्यात कायम चित्रविचित्र बेत शिजत असायचे, कसल्यातरी वेगळ्याच गोष्टींची त्याला ओढ वाटायची आणि त्याच्या आवडीसुद्धा भारी चमत्कारिक होत्या.

ऑगस्टच्या शेवटी मात्र असंख्य नाटकं करून करून आमच्याकडच्या सगळ्या नाटकांचा साठा संपला. आणि तेव्हाच बू रॅडलीला बाहेर काढण्याची कल्पना डीलनं आमच्या डोक्यात घुसवली.

डीलला रॅडलींच्या घराविषयी भयंकर कुतूहल होतं. आम्ही पुन्हा पुन्हा सावध करूनही चंद्र जसा पाण्याला खेचतो तसं ते घर त्याला खेचून घेत होतं. अर्थात, रॅडलींच्या फाटकापासून सुरक्षित अंतरावर असलेल्या दिव्याच्या एका खांबापलीकडे काही तो खेचला जात नव्हता. त्या जाडजूड खांबाला विळखा घालून तो एकटक बघत विचार करत रहायचा.

रॅडलींचं घर आमच्या घरापलीकडे एक टोकदार वळण घेऊन बाहेर आलेलं दिसायचं. दक्षिणेला तोंड करून चालत गेलं की त्यांचा व्हरांडा समोर यायचा. बाजूचा रस्ता वळून घराच्या मागपर्यंत जायचा. घर तसं ठेंगणंच होतं. पुढचा व्हरांडा पुष्कळ मोठा होता आणि दारं हिरव्या रंगाची होती. एकेकाळी ते पांढरंशुभ्र असावं पण आता बऱ्याच काळापासून त्याचा रंग भोवतालच्या दगडी अंगणासारखाच करडा झाला होता. पावसानं कुजलेलं छप्पर व्हरांड्याच्या वळचणीवर येऊन झुकलं होतं. ओकच्या झाडांमागं सूर्यप्रकाश अडत होता. मोडकळीला आलेलं लाकडी कुंपण कसंबसं तग धरून पुढच्या अंगणाची राखण करत उभं होतं. त्या अंगणाला झाडूचा कधी स्पर्शही झाला नव्हता आणि सगळीकडं चिक्कार तण माजलं होतं.

त्या घरात एक दुष्ट भूत रहात होतं. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ते भूत अस्तित्वात होतं पण मी आणि जेमनं ते कधीच पाहिलं नव्हतं. रात्री आकाशात चंद्र वर आला की ते बाहेर पडतं आणि खिडक्यांमधून डोकावतं, असं लोक म्हणायचे. लोकांच्या बागेतली फुलझाडं गारठा पडून गोठून जायची कारण या भुताचा उच्छ्वास त्यांच्यावर पडायचा. मेकोम्बमध्ये कोणताही अनाकलनीय गुन्हा घडला की ती याचीच करणी असायची. मध्यंतरी गावात रात्रीच्या वेळेस भयानक घटना घडू लागल्या. सगळं मेकोम्ब भयभीत झालं होतं. कोंबड्यांची पिल्लं आणि घरातले पाळीव प्राणी कत्तल केलेल्या अवस्थेत सापडत होते. या सगळ्यामागे खरंतर वेडसर अॅडीचा हात होता. पुढे जाऊन त्यानं बार्करच्या भोवऱ्यात बुडी मारून जीव दिला. तरीही लोक मात्र आधीप्रमाणे रॅडलींच्या घराकडेच संशयाने बघायचे. कोणी निग्रो रात्रीच्या वेळेस रॅडलींच्या घरावरून जात नसे. तो रस्ता ओलांडून समोरच्या बाजूनं जायचा आणि चालता चालता शीळ घालायचा. मेकोम्बच्या शाळेचं मैदान रॅडलींच्या परसाला लागून होतं. रॅडलींच्या कोंबड्या ठेवायच्या जागेत असलेल्या अक्रोडाच्या दोन उंच झाडांची फळं शाळेच्या आवारात पडायची. पण मुलं त्यांना अजिबात हात लावायची नाहीत. रॅडलींचं अक्रोड खाल्लं असतं तर हमखास मरण नसतं का ओढवलं? रॅडलींच्या अंगणात जर का बेसबॉल गेला तर तो गेलाच म्हणून धरून चालायचं. शंकाच नको.  

जेमचा आणि माझा जन्म होण्याच्या कित्येक वर्षं आधी त्या घराच्या दुर्दशेला सुरुवात झाली. गावात कुठेही जायला आडकाठी नसणारे रॅडली लोक कोणात फारसे मिसळायचे नाहीत. असल्या छांदिष्टपणाला मेकोम्बमध्ये क्षमा नव्हती. मेकोम्बमधलं करमणुकीचं मुख्य ठिकाण असलेल्या चर्चमध्ये न जाता ते घरीच प्रार्थना करायचे. मिसेस रॅडली क्वचितच कधी रस्ता ओलांडून शेजाऱ्यांकडे सकाळची कॉफी प्यायला जायच्या आणि मिशनरी गोटात तर खासच सामील व्हायच्या नाहीत. मिस्टर रॅडली रोज सकाळी साडेअकरा वाजता तालुक्याला जायचे आणि बारा वाजता लगेच परत यायचे. कधीकधी त्यांच्या हातात खाकी रंगाच्या कागदाचं एखादं पुडकं असायचं. त्यात किराणासामान असावं असं शेजारपाजारचे धरून चालायचे. म्हातारे मिस्टर रॅडली त्यांची रोजीरोटी कसे कमवायचे हे मला कधीच कळलं नाही. जेम म्हणायचा “ते कापसाचा व्यापार करतात”. एखादा माणूस काहीही करत नाही असं सौम्य शब्दात सांगायचं असेल तर ते अशा पद्धतीनं सांगितलं जायचं. मात्र सगळ्यांना आठवत होतं तेव्हापासून मिस्टर रॅडली आणि त्यांची बायको आपल्या दोन मुलांबरोबर तिथेच रहात होते.

रॅडलींच्या घराची दारं खिडक्या रविवारी बंद असायची. मेकोम्बच्या वहिवाटीला धरून नसलेली ही आणखी एक गोष्ट. दार बंद आहे याचा अर्थ घरात कोणी आजारी आहे किंवा हवा खूपच थंड आहे एवढाच व्हायचा. रविवारचा दिवस हा एकमेकांच्या औपचारिक गाठीभेटी घेण्याचा असायचा. बायका आपापले ठेवणीतले झगे घालायच्या, पुरूषमंडळी कोट घालायची आणि मुलं बूट घालायची. पण रविवारी दुपारी रॅडलींच्या घरापुढल्या पायऱ्या चढून “काय म्हणता” अशी हाळी घालायचं काम कधीच कोणा शेजाऱ्यानं केलं नाही. रॅडलींच्या घराला बाहेरचं लोखंडी दार नव्हतंच. ते तसं आधी कधी होतं का असं मी एकदा अॅटीकसला विचारलंही. अॅटीकस म्हणाला, “होतं, पण तुझ्या जन्माच्या आधी.”

आसपास अशी वदंता होती की रॅडलींचा धाकटा मुलगा किशोरवयाचा असताना जुन्या सारम भागात राहणाऱ्या कनिंगहॅम लोकांशी त्याची ओळख झाली. कोणालाही भंजाळून टाकेल अशी ही अवाढव्य जमात देशाच्या उत्तर भागात रहायची. त्या सगळ्यांची मग एक टोळीच तयार झाली. गुंडांची म्हणावी अशी मेकोम्बनं पाहिलेली ही पहिलीच टोळी. ते फारसं काही करायचे नाहीत पण जे काही करायचे ते गावात चर्चा व्हायला आणि तीन धर्मोपदेशकांची जाहीर समज मिळायला पुरेसं होतं. न्हाव्याच्या दुकानाभोवती त्यांचा अड्डा जमायचा. रविवारी बस घेऊन ते अॅबॉट्सव्हीलला जायचे आणि सिनेमा बघायचे. नदीशेजारी असलेल्या ड्यू ड्रॉप इन आणि फिशिंग कॅम्प या तालुक्याच्या जुगारी अड्ड्यांवर होणारा नाच बघायला जायचे. शिवाय हातभट्टीच्या दारूचे प्रयोग करायचे. तुमच्या मुलाला वाईट संगत लागली आहे हे मिस्टर रॅडलींना सांगायची मेकोम्बमधल्या कोणाचीच हिंमत नव्हती.

एका रात्री उधार घेतलेली मोडकी मोटार घेऊन ही पोरं चिक्कार दारूच्या नशेत चौकात आली. वर्षानुवर्षं मेकोम्ब चर्चमध्ये रखवाली करणाऱ्या मिस्टर कॉनरनी त्यांना पकडायचा प्रयत्न केला. पोरांनी त्यांना अडवलं आणि न्यायालयाच्या देवडीवर डांबून ठेवलं. आता काहीतरी केलंच पाहिजे असं सगळ्या गावानं ठरवलं. आपण हे काम करणाऱ्या प्रत्येकाला ओळखतो असं मिस्टर कॉनरनी सांगितलं. ती पोरं आता निसटता कामा नयेत असा त्यांचा ठाम निश्चय होता. त्यामुळे पोरांना न्यायाधीशापुढे नेऊन उभं करण्यात आलं. बेधुंद वर्तन, शांतताभंग, हल्ला आणि मारपीट, तसंच बाईमाणसाच्या हजेरीत तिला ऐकू जाईल अशी शिवीगाळ करणे व असभ्य भाषा वापरणे ही कलमं त्यांच्यावर लावली. न्यायाधीशांनी शेवटचं कलम लावण्याचं कारण विचारलं तेव्हा मिस्टर कॉनर म्हणाले की, “ही पोरं इतक्या जोरजोरात शिव्या देत होती की मेकोम्बमधल्या प्रत्येक बाईनं त्या ऐकल्या असणार. शंकाच नको.” त्या पोरांना राज्यातल्या औद्योगिक शिक्षण देणाऱ्या शाळेत पाठवावं असं न्यायाधीशांनी ठरवलं. या शाळेत पोरांना पाठवण्याचं कारण बरेचदा दुसरंतिसरं काही नसून त्यांची खाण्यापिण्याची आणि रहायची बरी सोय व्हावी हेच असायचं. तो काही तुरुंग नव्हता आणि त्यात काही कमीपणाही नव्हता. पण मिस्टर रॅडलींना मात्र तो तसा वाटला. जर न्यायाधीशांनी आर्थरला सोडून दिलं तर तो पुन्हा त्रास देणार नाही याची हमी त्यांनी घेतली. मिस्टर रॅडलींचा शब्द म्हणजे करारनामा लिहून दिल्यासारखाच आहे हे माहित असल्यामुळे न्यायाधीशांनी आनंदानं हे मान्य केलं.

इतर पोरांनी औद्योगिक शाळेत प्रवेश घेऊन राज्यातलं सगळ्यात उत्तम शालेय शिक्षण मिळवलं. त्यांच्यापैकी एकानं पुढे ऑबर्नला जाऊन इंजिनियरिंगसुद्धा केलं. रॅडलींच्या घराची दारं रविवारबरोबरच आठवड्याच्या इतर दिवशीसुद्धा बंद रहायला लागली आणि मिस्टर रॅडलींचा मुलगा पंधरा वर्षात पुन्हा एकदाही दिसला नाही.

एके दिवशी मात्र बू रॅडलीचा आवाज ऐकू आला आणि अनेक लोकांनी त्याला बघितला सुद्धा. जेमला या प्रसंगाची धूसर आठवण होती. पण जेमला काही बू रॅडली दिसला नाही. अॅटीकस रॅडलींबद्दल फारसा बोलायचा नाही असं तो म्हणाला. जेमनं त्याबद्दल काही प्रश्न विचारला तर अॅटीकसचं एकच उत्तर असायचं, “तू तुझं काम कर आणि रॅडलींना त्यांचं करू दे. त्यांचा तो अधिकारच आहे.” पण ही घटना घडली तेव्हा मात्र अॅटीकसनं नुसतीच मान हलवली.

तेव्हा जेमला बहुतेक सगळी माहिती शेजारच्या मिस स्टेफनी क्रॉफर्ड नावाच्या भोचक बाईकडून मिळाली. “काय झालं ते मला सग्गळं माहीतेय,” असं तिचं म्हणणं होतं. मिस स्टीफनीच्या म्हणण्याप्रमाणे बू बाहेरच्या खोलीत “मेकोम्ब ट्रिब्यून” मधली काही कात्रणं चिकटवहीत चिकटवण्यासाठी कापत बसला होता. त्याचे वडील मिस्टर रॅडली खोलीत आले. ते शेजारून जात असताना बूनं आपली कात्री त्यांच्या पायात खुपसली, मग ती बाहेर ओढून आपल्या विजारीला पुसली आणि तो परत आपल्या उद्योगात गढून गेला.

“हा आर्थर आमचा जीव घ्यायला लागलाय,” असं ओरडत मिसेस रॅडली रस्त्यावर धावल्या. पण अंमलदारसाहेब तिथे पोहोचले तेव्हा त्यांना बू बाहेरच्या खोलीत बसून ट्रिब्यून मधली कात्रणं कापताना दिसला. तेव्हा तो तेहेतीस वर्षांचा होता.

मिस स्टीफनीनं आणखीही काही तपशील पुरवले. त्यानुसार, कोणीतरी असं सुचवलं की टस्कालुझामध्ये काही काळ घालवला तर बूला फायदा होईल. त्यावर मिस्टर रॅडलींचं असं म्हणणं पडलं की कोणताही रॅडली कुठल्याही वेड्यांच्या इस्पितळात जाणार नाही. बू काही वेडा नव्हता फक्त कधीकधी तो चटकन बेफाम व्हायचा. त्याला बांधून ठेवायला मिस्टर रॅडलींची काहीच हरकत नव्हती पण बूवर कोणताही आरोप दाखल करू नये असा त्यांचा आग्रह होता. तो काही गुन्हेगार नव्हता. त्याला निग्रो लोकांबरोबर तुरुंगात टाकायला अंमलदारही धजावला नाही. तेव्हा बूला न्यायालयाच्या तळघरात डांबून ठेवण्यात आलं.

बूची त्या तळघरातून परत घरी झालेली रवानगी जेमला पुसटशी आठवत होती. मिस स्टीफनी क्रॉफर्ड म्हणाली की नगरपरिषदेतल्या काही लोकांनी मिस्टर रॅडलींना सांगितलं, “तुम्ही आता बूला परत घेऊन गेला नाहीत तर दमट तळघरातल्या बुरशीमुळे त्याचा जीव जाईल. तालुक्याच्या मेहेरबानीवर बू काही आयुष्यभर तिथे राहू शकणार नाही.”

बू सर्वांच्या नजरेआड रहावा म्हणून मिस्टर रॅडलींनी त्याला कसल्या धाकात ठेवलं होतं ते कोणालाच माहीत नव्हतं. जेमचा असा अंदाज होता की मिस्टर रॅडली बहुतेक सगळा वेळ त्याला साखळीनं पलंगाला बांधून ठेवत असणार. पण अॅटीकसच्या म्हणण्याप्रमाणे तसलं काही नव्हतं. “माणसांना धाकात ठेवून त्यांचं भूत करायचे कितीतरी मार्ग असतात,” असं तो म्हणाला.

मला आठवतंय तेव्हापासून मी मिसेस रॅडलींना मधूनच पुढचं दार उघडून व्हरांड्याच्या कडेपर्यंत चालत येताना आणि तिथूनच त्यांच्या कर्दळीच्या झाडांना पाणी घालताना पाहिलंय. पण मिस्टर रॅडली मात्र रोजच तालुक्याला ये जा करताना आम्हाला दिसायचे. हा माणूस अगदी कृश आणि सुरकुतलेला होता. त्याचे डोळे इतके निस्तेज होते की त्यात जराही चमक दिसायची नाही. त्याच्या गालांची हाडं वर आलेली होती. जिवणी रुंद होती. त्याचा वरचा ओठ पातळ होता आणि खालचा ओठ मात्र चांगला फुगीर होता. मिस स्टीफनी क्रॉफर्डचं असं म्हणणं होतं की हा माणूस इतका सरळ आहे की तो फक्त देवाचा शब्दच प्रमाण मानतो. आमचाही तिच्या म्हणण्यावर अगदीच विश्वास बसला कारण मिस्टर रॅडली एखाद्या खांबासारखे सरळ उभे रहायचे.

ते आमच्याशी कधीच बोलायचे नाहीत. ते बाजूनं जात असले की आम्ही खाली बघत “गुडमॉर्निंग सर“ असं म्हणायचो. उत्तरादाखल ते नुसतंच खोकायचे. मिस्टर रॅडलींचा मोठा मुलगा पेन्साकोलाला रहायचा. ख्रिसमसकरता तो घरी यायचा. त्या घरात जा ये करताना दिसणाऱ्या अगदी थोड्या लोकांपैकी तो एक होता. ज्या दिवशी मिस्टर रॅडली आर्थरला घेऊन घरी गेले , त्या दिवसापासून त्या घराची कळाच गेली असं लोक म्हणायचे. 

मग एके दिवशी अॅटीकसनं आम्हाला दम भरला की अंगणात जाऊन जर काही आवाज केलात तर बघून घेईन. एवढंच नाही तर आम्ही आरडाओरडा केला तर त्यावर लक्ष ठेवायला म्हणून त्यानं स्वतःच्या गैरहजेरीत कॅलपर्नियाची नेमणूक केली. मिस्टर रॅडली मृत्यूशय्येवर पडले होते.  

मिस्टर रॅडलींनी हवा तेवढा वेळ घेतलाच. त्यांच्या घराच्या दोन्ही टोकांना दोन लाकडी टेकू रस्ता अडवून उभे होते. बाजूच्या रस्त्यावर गवताच्या काटक्या ठेवल्या होत्या. सगळी रहदारी मागच्या रस्त्याला वळवण्यात आली होती. डॉक्टर रेनॉल्ड्सनी आपली मोटार आमच्या घरासमोर लावली होती. बोलावणं आलं की ते दरवेळेस गाडीतून उतरून चालत रॅडलींच्या घराकडे जायचे. जेम आणि मी कितीतरी दिवस अंगणाभोवती दबक्या पावलांनी घिरट्या घालत होतो. शेवटी एकदाचे ते लाकडी टेकू उचलले. मिस्टर रॅडली आमच्या घरावरून त्यांच्या अखेरच्या प्रवासाला निघाले. मी आणि जेम पुढच्या व्हरांड्यात उभे राहून बघत होतो.

“खपला एकदाचा, काय वंगाळ माणूस पैदा केला देवानं!” कॅलपर्निया पुटपुटली आणि मग तंद्रीतच अंगणात थुंकली. आम्ही चकित होऊन तिच्याकडे बघत राहिलो. गोऱ्या लोकांच्या वागण्याबद्दल कॅलपर्निया क्वचितच काही बोलायची.

शेजारच्यांना वाटलं आता मिस्टर रॅडली गेल्यानंतर तरी बू बाहेर येईल. पण काहीतरी तिसरंच घडलं. बूचा मोठा भाऊ पेन्साकोलावरून परत आला आणि त्यानं मिस्टर रॅडलींची जागा घेतली. त्याच्यात आणि त्याच्या बापात जर काही फरक असेल तर तो फक्त वयाचा. जेम म्हणाला, “मिस्टर नॅथन रॅडलीसुद्धा कापसाचा व्यापार करतात.” आम्ही गुडमॉर्निंग केल्यावर मिस्टर नॅथन मात्र आमच्याशी बोलायचे. कधीकधी तालुक्याहून परत येताना त्यांच्या हातात मासिक असलेलं आम्हाला दिसायचं.

डीलला आम्ही रॅडलींबद्दल जितकं जास्त सांगत होतो तितकी त्याला त्यांची अजून माहिती करून घ्यावीशी वाटत होती, तितका जास्त वेळ तो कोपऱ्यातल्या दिव्याच्या खांबाला विळखा घालून उभा रहायचा आणि तितकं अधिक नवल करायचा.

“तो आत काय करत असेल काय की,” तो कुजबुजायचा. “नुसतंच दारातून डोकं बाहेर काढतो वाटतं. “

जेम म्हणाला , “बाहेर पडतो नं तो. काळाकुट्ट अंधार पडला की. स्टीफनी क्रॉफर्ड म्हणाली की एकदा मध्यरात्री तिला जाग आली. तर तो खिडकीतून तिच्याकडेच बघत होता.. त्याचं डोकं कवटीसारखंच दिसत होतं म्हणाली. डील, रात्री जाग आल्यावर तुला कधी त्याचा आवाज नाही ऐकू आला? असा चालतो बघ तो –” जेमनं वाळूवर पाय घासटून दाखवला. “तुला काय वाटतं, रेचल काकू रात्रीच्या वेळेस दारंखिडक्या इतक्या घट्ट कशाला लावून घेत असेल? त्याच्या पावलांचे ठसे मला कितीतरी वेळा सकाळी आमच्या परसात दिसलेत. एका रात्री मागच्या जाळीच्या खिडकीवर त्यानं खरखर केली, ती पण ऐकू आली होती. पण अॅटीकस पोचेस्तवर तो निघून गेला.”

“ए, तो कसा दिसत असेल नं?” डील म्हणाला.

जेमनं बूचं बरंच व्यवस्थित वर्णन केलं : त्याच्या पावलांच्या ठशावरून अंदाज लावायचा तर बू साडेसहा फूट तरी उंच होता, खारी आणि मांजरी पकडून तो त्या कच्च्याच खायचा. म्हणून तर त्याच्या हातावर रक्ताचे डाग दिसायचे – जर का एखादा प्राणी न शिजवता खाल्ला तर त्याचं रक्त धुवून निघत नाही म्हणे. त्याच्या चेहेऱ्यावर एक लांबच्या लांब दातेरी व्रण होता. त्याचे जे काही दात शिल्लक होते ते पिवळे पडलेले आणि किडलेले होते. त्याची बुबुळं बाहेर आलेली होती आणि बहुतेक वेळा त्याच्या तोंडातून लाळ गळत असायची. 

“चला, त्याला बाहेर काढता येतंय का बघू.” डील म्हणाला. “मला बघायचंय तो कसा दिसतो ते.”

जेम डीलला म्हणाला, “मरायचीच हौस असेल तर जा आणि त्यांच्या पुढच्या दारावर नुसती टकटक कर.”

“तुला रॅडलींचं फाटक ओलांडायला जमणारच नाही,” डीलनं जेमशी पैज लावली. पुढे गेला तर ग्रे घोस्ट हा सिनेमा नाहीतर टॉम स्विफ्ट मालिकेतली दोन पुस्तकं अशी ती पैज असल्यानेच खरंतर आमची पहिली मोहीम घडली. जेमनं जन्मात कधी कुठल्या धाडसाला नाही म्हटलं नव्हतं.

जेम तीन दिवस याचा विचार करत होता. मला वाटतं त्याला त्याच्या जीवापेक्षाही इज्जत अधिक प्यारी होती. कारण डीलनं त्याला अगदी सहज चीत केला. “तुला भीती वाटतेय नं” , पहिल्या दिवशी डील म्हणाला. “घाबरलो नाहीये, पण त्याला जरा मान देतोय” जेम म्हणाला. दुसऱ्या दिवशी डील म्हणाला, “तू इतका घाबरलायस की त्यांच्या पुढल्या अंगणात पाय काय, पायाचा साधा अंगठासुद्धा टेकवणार नाहीस.” जेम म्हणाला, “आपल्याला काही तसलं वाटत नाहीये. जन्मभर रोज आपण रॅडलींच्या घरावरनं शाळेला गेलोय.”

“मss, कायम पळत पळत..” मी म्हणाले.

पण तिसऱ्या दिवशी मात्र डीलनं त्याला पेचात पकडलं. तो जेमला म्हणाला की, “मेरिडीयनचे लोक काही मेकोम्बच्या लोकांइतके भित्रट नसतात काही. मेकोम्बच्या माणसांइतकी घाबरट माणसं आपण तर कुठेच नाही पाहिली ब्वा!” 

झालं. जेम तडक कोपऱ्यावर गेला आणि तिथल्या दिव्याच्या खांबावर रेलून घरगुती बिजागरीवर कशाबशा तोलून उभ्या राहिलेल्या त्या फाटकाकडे बघत राहिला.

“ओ डील हॅरीस, तो आपल्याला एकेकाला पकडून मारून टाकेल हे तुमच्या डोस्क्यात शिरलंय न?”, आम्ही दोघं तिथे पोहोचल्यावर जेम म्हणाला. “त्यानं तुझे डोळे ओढून बाहेर काढले तर मग बोलायचं काम नाही हां. तूच काडी लावलीयेस, लक्षात ठेव.”

“तुला अजूनही भीती वाटतेय न..” डील चिकाटीनं कुजबुजला.

आपल्याला कसलीच भीती वाटत नाही हे एकदाचं डीलच्या लक्षात आलंच पाहिजे असं जेमला वाटत होतं. “अरे, त्याच्या तावडीत न सापडता त्याला बाहेर कसं काढायचं? ते कळत नाहीये मला. मला माझ्या छोट्या बहिणीचाही विचार केला पाहिजे न.”

हे वाक्य ऐकल्यानंतर मात्र तो घाबरला आहे माझ्या लग्गेच लक्षात आलं. मी जेव्हा त्याला घराच्या छपरावरून खाली उडी टाकायला उचकवलं होतं तेव्हाही त्याला लहान बहिणीचा विचार करावासा वाटत होता. “मी मेलो तर म तुझं कसं होईल?” त्यानं विचारलं होतं. शेवटी एकदाची त्यानं उडी टाकली आणि कुठेही न धडपडता खाली आला. नंतर रॅडलींच्या घराची पैज लागेपर्यंत ही जबाबदारीची वगैरे जाणीव कुठल्याकुठं पळाली होती. 

“तू पैज लावणार नाहीस म्हणजे?” डीलनं विचारलं. “जर तसं असेल तर ..”

“अरे डील, सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो राव!” जेम म्हणाला. “जरा एक मिनिट मला विचार करूदे .. हे म्हणजे पाण्यातल्या कासवाला बाहेर काढण्यासारखंय..”

“ते कसं ब्वा?” डीलनं विचारलं.

“त्याच्या बुडाखाली काडी पेटवायची.”

“जर का तू रॅडलींच्या घराला आगबिग लावलीस तर मी जाऊन अॅटीकसला तुझं नाव सांगेन” मी जेमला बजावलं.

“कासवाच्या बुडाखाली काडी पेटवणं अगदीच दुष्टपणाचं आहे,” असं डील म्हणाला.

“दुष्टपणा काय त्यात… त्याला फक्त हुसकवायचं. आगीत ढकलून नाही द्यायचं.” जेम गुरगुरला.

“पण त्या काडीनं त्याला दुखापत होणार नाही हे तुला काय माहीत?”

“अरे मूर्खा, कासवांना असलं काही होत नाही काही.” जेम म्हणाला.

“तू कधी कासव होतास का, आॅं?”

“डील, तू पण नं राव! थांब जरा मला विचार करूदे. ..मला वाटतं त्याला हुसकावता येईल ..”

जेम इतका वेळ विचार करत राहिला की डीलनं त्याला बारीकशी सवलत सुद्धा दिली, “तू नुसता जाऊन त्या घराला हात लावून ये. तरीही तू पैज न घेता पळून गेलास असं मी म्हणणार नाही आणि तुला माझ्याकडचा ‘द ग्रे घोस्ट’ देईन.”

“बास, नुसता हात लावायचा?” जेमचा चेहेरा उजळला.

डीलनं मान हलविली.

“पण आता नक्की तेवढंच करायचं नं? नाहीतर तिथून परत आल्या आल्या काहीतरी तिसरंच ओरडायला लागशील. ते आपल्याला खपणार नाही.”

“हो, तेवढंच करायचं” डील म्हणाला. “तू अंगणात आलेला बघून एखाद वेळेस तो मागोमाग बाहेर येईल. मग मी आणि स्काऊट त्याच्यावर झेप टाकू आणि त्याला खाली दाबून धरू. नंतर सांगून टाकू की आम्ही तुला काही करणार नाहीयोत.”

आम्ही कोपऱ्यावरून पुढे सरकलो. रॅडलींच्या घराच्या पुढल्या बाजूला जाणारा रस्ता ओलांडला आणि फाटकाशी जाऊन थांबलो.

“चल नं, हो पुढं,” डील म्हणाला. “स्काऊट आणि मी आलोच मागून.”

“जातोय,” जेम म्हणाला, “घाई नको करू मला.”

तो तिथून दुसऱ्या टोकापर्यंत चालत गेला आणि परत मागे फिरला. मग कपाळाला आठ्या पाडून आणि डोकं खाजवत त्या साध्याशा इलाख्याकडे निरखून बघायला लागला. जसं काही आत कशी मुसंडी मारायची याचाच विचार चालला होता.

आता मात्र मी त्याच्याकडे कुत्सित नजर टाकली.

जेमनं फाटक उघडलं आणि तो घराकडे धावत सुटला. घराच्या एका भिंतीवर त्याने हाताचा तळवा जोरात मारला. मग मागे पळत येऊन आम्हाला ओलांडून तो पार पुढे निघून गेला. आपली चढाई फत्ते झाली का नाही हे पहायलाही तो थांबला नाही. डील आणि मी त्याच्या मागोमाग धावलो. आमच्या व्हरांड्यात सुखरूप पोहोचल्यानंतर धापा टाकत आम्ही मागे वळून पाहिलं.

ते जुनाट घर तसंच मरगळलेलं आणि कळाहीन दिसत होतं. पण रस्त्यावरून तिकडे टक लावून पहात असताना आम्हाला आतलं दार हलल्यासारखं वाटलं. खट्. एक बारीकशी, जवळजवळ अदृश्य म्हणावी अशी हालचाल झाली आणि घर पुन्हा एकदा निश्चल झालं.

 

.

सप्टेंबरच्या सुरुवातीला डील आम्हाला सोडून मेरिडीयनला परत गेला. पाचच्या बसला आम्ही त्याला निरोप दिला. डीलशिवाय मी अगदी रडकुंडीला आले होते. तितक्यात आठवड्याभरात आपली शाळा सुरू होणार हे माझ्या ध्यानात आलं. मी जन्मात कधी कोणत्या गोष्टीची इतकी वाट बघितली नव्हती. थंडीच्या दिवसात मी तासंतास ट्रीहाऊसमध्ये बसून शाळेच्या पटांगणाकडे बघत बसायचे. जेमनं दिलेल्या दुर्बिणीतून पोरासोरांच्या जथ्थ्यावर हेरगिरी करायचे, त्यांचे खेळ समजून घ्यायचे, आंधळी कोशिंबीर खेळताना गरगर फिरणाऱ्या गोलांमधून जेमच्या लाल जॅकेटचा पिच्छा करत रहायचे. त्यांची किरकोळ सुखदुःखं गुपचूप वाटून घ्यायचे. कधी एकदा त्यांच्यात जाऊन मिसळते असं मला झालं होतं.

पहिल्या दिवशी मला शाळेला घेऊन जायला जेम मोठ्या मनानं तयार झाला. हे काम सहसा पालक करायचे पण अॅटीकसचं असं म्हणणं पडलं की, “तुला तुझा वर्ग दाखवायला जेमला फार आवडेल.” मला वाटतं, या सौद्यात काहीतरी पैशांची देवाणघेवाण झाली असणार. कारण रॅडलींच्या घरापुढल्या कोपऱ्याशी आम्ही जरासं धावत वळलो तेव्हा मला जेमच्या खिशातून एक वेगळीच खुळखुळ ऐकू आली. शाळेच्या कुंपणाशी आल्यावर आमचा वेग कमी झाला आणि आम्ही चालायला लागलो. तेव्हा, “शाळेच्या वेळात मला त्रास द्यायचा नाही, टारझन आणि मुंग्यांएवढी माणसे या पुस्तकातल्या एखाद्या भागावर नाटक करून दाखव म्हणून माझ्यामागे लागायचं नाही, माझ्या घरातल्या वागण्याबद्दल काहीतरी बोलून फजिती करायची नाही किंवा मधल्या सुट्टीत आणि दुपारी माझ्या मागेमागे फिरायचं नाही,” असं मला बजावण्याची खबरदारी जेमनं घेतली. मी पहिलीच्या मुलांबरोबर रहायचं आणि तो पाचवीच्या मुलांबरोबर रहाणार. थोडक्यात मी त्याला एकटं सोडायचं होतं.

“म्हणजे आता आपण पुन्हा कध्धीच खेळायचं नाही?” मी विचारलं.

“घरी आपण नेहेमीसारखंच खेळू,” तो म्हणाला, “पण तुला कळेलच – शाळेत वेगळं असतं.” 

तसंच झालं. पहिल्याच दिवशीची सकाळ उलटायच्या आत मिस कॅरोलाईन फिशरनं, म्हणजे आमच्या बाईंनी, मला वर्गात पुढे बोलावून हातावर पट्टी मारली आणि दुपारपर्यंत मला कोपऱ्यात उभं केलं.

मिस कॅरोलाईनचं वय एकवीसपेक्षा जास्त नसावं. त्यांचे केस गडद तपकिरी रंगाचे होते, गाल गुलाबी होते आणि त्यांनी नखांना गडद लाल रंगाचं नेलपॉलिश लावलं होतं. शिवाय त्यांनी उंच टाचांचे बूट आणि लाल-पांढऱ्या रंगाचा पट्टेरी ड्रेस घातला होता. त्या एखाद्या पेपरमिंटच्या गोळीसारख्या दिसत होत्या आणि त्यांना वासही तसाच येत होता. आमच्या घरासमोर एक घर सोडून पुढे असलेल्या मिस मॉडी अॅटकिन्सच्या घराच्या वरच्या मजल्यावरच्या पुढल्या खोलीत त्या रहात होत्या. मिस मॉडीनं त्यांची आमच्याशी ओळख करून दिल्यानंतर पुढे कितीतरी दिवस जेम धुंदीतच होता.

फळ्यावर स्वतःचं नाव लिहून मिस कॅरोलाईन म्हणाल्या, “इथे असं लिहिलंय की, मी मिस कॅरोलाईन फिशर आहे. मी उत्तर अलाबामा मधल्या विन्स्टन प्रांतातून आले आहे.” सगळा वर्ग दबक्या आवाजात कुजबुजला. त्या प्रांताचे खास गुण यांच्यातही असले तर काय घ्या! (११ जानेवारी १९८१ ला अलाबामा राज्य युनियनमधून फुटलं तेव्हा विन्स्टन प्रांत अलाबामातून फुटला.  हे तर मेकोम्बमधल्या पोरांनाही माहीत होतं.) दारूचे धंदे, बड्या मालदार असामी, स्टीलचे कारखाने, रिपब्लिकन पक्षाचे अनुयायी, प्राध्यापक आणि रिकामटेकडी माणसं असल्या गोष्टी उत्तर अलाबामात पुष्कळ होत्या. 

मांजराची गोष्ट वाचून दाखवून मिस कॅरोलाईननी दिवसाची सुरुवात केली. गोष्टीतल्या मांजरी एकमेकांशी भारी बडबड करत होत्या. त्यांनी तोकडे आकर्षक कपडे घातले होते आणि स्वयंपाकघरातल्या शेगडीखाली असलेल्या एका उबदार खोपट्यात त्या रहात होत्या. मांजरीणबाईंनी औषधांच्या दुकानात फोन करून चॉकलेटमध्ये बुडवलेले उंदीर मागवले तोवर आख्खा वर्ग बादलीत ठेवलेल्या अळ्यांगत चुळबूळ करायला लागला होता. जाडेभरडे शर्ट आणि विटके सुती झगे घातलेल्या पहिलीतल्या फाटक्या पोरांचा काल्पनिक साहित्याशी काहीही वास्ता नाही हे मिस कॅरोलाईनच्या लक्षात आलं नसावं. त्यांच्यापैकी बहुतेकांनी चालायला लागल्यापास्नंच कापसाच्या शेतात काम करायला आणि डुकरांना सांभाळायला सुरुवात केली होती. मिस कॅरोलाईन गोष्टीच्या शेवटापर्यंत आल्या आणि म्हणाल्या, “अय्या, कित्ती छान होती न गोष्ट?”

मग त्यांनी फळ्यापाशी जाऊन त्यावर मोठ्या चौकोनी आकारात मोठ्या लिपीतलं एक अक्षर काढलं आणि वर्गाकडे वळून विचारलं, “हे काय आहे कोणाला माहितेय?”

सगळ्यांनाच ते अक्षर काय ते माहीत होतं. कारण पहिलीचा बहुतेक सगळा वर्ग मागल्या वर्षी नापास झाला होता.  

माझं नाव माहीत असल्यामुळे बहुधा त्यांनी मला धरलं असावं. मी ते अक्षर वाचलं तशी त्यांच्या भिवयांच्यामध्ये एक बारीकशी आठी उमटली. मग त्यांनी मला आख्खं माय फर्स्ट रीडर वाचायला लावलं आणि मोबाईल रजिस्टर मधले शेअर बाजाराचे आकडे माझ्याकडून मोठ्यांदा म्हणून घेतले. तेव्हा कुठे मला लिहितावाचता येत असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. नाराजीनं माझ्याकडे बघून त्या म्हणाल्या, “वडलांना जाऊन सांग, इथून पुढे मला शिकवू नका, नाहीतर मला नीट वाचता येणार नाही.“

“शिकवू नका?” मी आश्चर्यचकित. “पण मिस कॅरोलाईन, ते मला काहीच शिकवत नाहीत. अॅटीकसकडे शिकवायला वेळच नसतो,” मिस कॅरोलाईननं हसून मान हलवली. “रात्री परत आल्यावर तो इतका दमलेला असतो की बाहेरच्या खोलीत वाचत पडून राहातो. ” 

“मग कोण शिकवलं तुला?” मिस कॅरोलाईननं प्रेमानं विचारलं. “कुणीतरी शिकवलंच असणार. तू जन्मल्यापासून थोडीच मोबाईल रजिस्टर वाचायला लागली असशील?”

“जेम तर तसंच म्हणतो. त्यानं एका पुस्तकात वाचलं की मी फिंच नसून बुलफिंच होते. जेम म्हणतो की माझं नाव खरं तर जीन लुईस बुलफिंच आहे. जन्मल्यानंतर माझी अदलाबदल झाली आणि खरं म्हणजे मी..”

मी खोटं बोलतेय असं मिस कॅरोलाईनना वाटलं असावं. “बाळा, कल्पनाशक्ती उधळू नकोस,” त्या म्हणाल्या. “जाऊन तुझ्या वडलांना सांग की मला इथून पुढे शिकवू नका. कोरी पाटी ठेवून वाचायला सुरुवात करणं चांगलं. सांग की, आता इथून पुढे काय करायचं ते मी बघून घेईन आणि झालेलं नुकसान भरून…”

“मिस?”

“कसं शिकवतात हे तुझ्या वडलांना माहीत नाही. जा बस.”

माझी चूक झाली असं पुटपुटत आणि केलेल्या चुकीचा विचार करत मी जागेवर जाऊन बसले. मी काही मुद्दाम वाचायला शिकले नव्हते पण कशी काय माहीत, रोजची वर्तमानपत्रं मी बेकायदेशीरपणे अगदी मजेत पालथी घालत होते. चर्चमध्ये तासंतास घालवायचे – तेव्हा मी शिकले असेन का? बायबल वाचता येत नसल्याचं मला कधी आठवतच नाही. आता वाचण्याबद्दल विचार करायला भागच पडल्यानंतर असं लक्षात आलं की वाचन ही गोष्ट मला स्वाभाविकपणे येत होती. न अडखळता कपडे चढवायला किंवा बुटांच्या नाड्या एकत्र करून त्याचं फूल बांधायला जसं मी शिकले तसंच. अॅटीकसच्या फिरत्या बोटाच्या वर दिसणाऱ्या ओळींमधून शब्द कधी सुटे झाले ते मला आठवतही नाही पण माझ्या आठवणीतल्या सगळ्या संध्याकाळी मी त्यांच्याकडे टक लावून बघत आलेय. दिवसभराच्या बातम्या, कायद्यात रूपांतर करण्यासाठी मांडलेली विधेयकं, लॉरेन्झो डाऊच्या रोजनिशा, थोडक्यात, रोज रात्री मी अॅटीकसच्या मांडीवर जाऊन बसल्यानंतर तो जे काही वाचत असेल ते सगळं काही मी ऐकायचे. आपल्याला वाचता येणार नाही अशी भीती वाटेपर्यंत मला वाचायला कधीच आवडलं नव्हतं. श्वास घ्यायला कोणाला आवडतं का?

मिस कॅरोलाईनना राग येईल असं काहीतरी आपण केल्याचं मला समजलं होतं. त्यामुळे मी आहे त्या परिस्थितीला आणखी धक्का न लावता मधल्या सुट्टीपर्यंत खिडकीतून बाहेर बघत बसून राहिले. सुट्टीत जेमनं मला पहिलीतल्या मुलांच्या जथ्थ्यातून वेगळं काढलं आणि माझं कसं काय चाललंय ते विचारलं. मी त्याला काय ते सांगितलं.

“जेम, मला इथे थांबायला लावलं नसतं तर मी इथून निघून गेले असते. ती दुष्ट बाई म्हणते की अॅटीकस मला वाचायला शिकवतोय आणि त्यानं ते थांबवायला पाहिजे..”

“सोड ना तू, स्काऊट,” जेमनं माझी समजूत काढली. “आमच्या बाई म्हणतायत की मिस कॅरोलाईन नवीन पद्धतीनं शिकवतायत. त्या कॉलेजात शिकून आल्यायत ती पद्धत. आता लवकरच सगळ्या इयत्तांना तसंच शिकवणारेत. तसं झालं की जास्त पुस्तकं वाचायला लागणार नाहीत. म्हणजे समजा, गाईबद्दल शिकायचं असेल तर जाऊन एका गाईचं दूध काढायचं, कळलं?”

“हो जेम, पण मला गाईंबद्दल नाही शिकायचंय. मला..”

“शिकायचंच आहे की. तुला गाईंची माहिती पाहिजेच. गाई म्हणजे मेकोम्बमधल्या जगण्याचा एक मोठा भाग आहेत.”

“डोकंबिकं फिरलंय का तुझं?” एवढंच जेमला विचारण्यावर मी समाधान मानलं.

“ए हेकट, मी शिकवण्याच्या नवीन पद्धतीबद्दल नुस्तं सांगतोय तुला. त्याला ड्यूवी दशांश पद्धत म्हणतात.”

जेमच्या अशा जाहीर विधानांना मी कधीच आव्हान देत नसल्यामुळे आत्ताही तसं करायचं काही कारण नव्हतं. ड्यूवी दशांश पद्धतीचा एक भाग म्हणजे “तो” , “मांजर”, “उंदीर”, “माणूस” आणि “तू” असले शब्द छापलेले कागदाचे तुकडे मिस कॅरोलाईननी आमच्याकडे बघून फडकावले. आम्ही त्यावर काहीच बोलणं अपेक्षित नव्हतं आणि सगळा वर्ग गप्प बसून हे आगापिछा नसलेले साक्षात्कार करून घेत होता. मला कंटाळा आला म्हणून मी डीलला पत्र लिहायला सुरुवात केली. मिस कॅरोलाईननं मला लिहिताना पकडलं आणि “मला लिहायला शिकवू नका असं जाऊन तुझ्या वडलांना सांग,” असं सांगितलं. “शिवाय,” त्या म्हणाल्या, “आपण पहिलीत लिहीत नाही. छापून घेतो. तिसरीत जाईपर्यंत तुम्हाला लिहायची गरज नाही. “

आता हे मात्र कॅलपर्नियामुळे झालं होतं. मला वाटतं पावसाळ्याच्या दिवसात मी तिला हैराण करत असणार. त्यामुळे ती मला लिहायला बसवायची. पाटीवर सगळ्यात वरती एक अक्षर ठळक लिहून त्याखाली बायबलमधलं एक प्रकरण ती लिहून काढायची. तिचं लिखाण मी मनाजोगतं उतरवलं की लोणी, साखर लावलेला पाव बक्षीस मिळायचा. कॅलपर्नियाच्या शिकवण्यात भावनांचं फाजील प्रदर्शन नसायचं. मी तिला कधीतरीच खूष करायचे आणि ती ही मला कधीतरीच बक्षीस द्यायची. 

“जेवायला घरी कोण कोण जाणारे त्यांनी हात वर करा,” मिस कॅरोलाईन म्हणाल्या आणि कॅलपर्नियाबद्दलची माझी नवीन चिडचिड जरा मागे पडली. 

गावात राहणाऱ्या पोरांनी हात वर केले आणि बाईंनी आमच्याकडे नजर टाकली. 

“ज्यांनी डबा आणलाय त्यांनी आपापला डबा बाकावर ठेवा.” 

कुठून तरी काकवीच्या बाटल्या पैदा झाल्या. डब्यांमधून पलीकडे जाणारा उजेड छतावर नाचायला लागला. मिस कॅरोलाईन ओळीत पुढेमागे फिरून जेवणांच्या डब्यात डोकावून बघायला लागल्या. त्यातलं अन्न पसंत पडलं तर त्या मान डोलवायच्या नाहीतर त्यांच्या कपाळाला किंचित आठी पडायची. वॉल्टर कनिंगहॅमच्या बाकाशी त्या थांबल्या. “तुझा डबा कुठंय?” त्यांनी विचारलं. 

वॉल्टरच्या तोंडावरनं त्याच्या पोटात जंत झाल्याचं पहिलीतल्या प्रत्येक पोराला समजलं. त्याच्या पायात बूट नाहीत यावरनं त्याला जंतांची लागण कशी झाली असेल याचाही सगळ्यांना अंदाज आला. धान्याच्या कोठारात आणि डुकरं लोळणा-या चिखलात अनवाणी पायानं गेलं की लोकांना जंत व्हायचे. वॉल्टरकडे बूट असते तर त्यानं ते शाळेच्या पहिल्या दिवशी घातले असते आणि हिवाळा मध्यावर येईपर्यंत टाकून दिले असते. त्याचा शर्ट स्वच्छ होता आणि त्यावरून घातलेली विजारही निगुतीनं दुरुस्त केलेली होती. 

“आज डबा आणायला विसरलास का?” मिस कॅरोलाईननी विचारलं. 

वॉल्टर समोर बघत होता. त्याच्या हडकुळ्या जबड्यातला एक स्नायू हललेला मी पाहिला. 

“विसरलास का तू आज सकाळी?” मिस कॅरोलाईननं विचारलं. वॉल्टरचा जबडा पुन्हा वाकडा झाला.

“हां,” शेवटी तो पुटपुटला. 

मिस कॅरोलाईननी टेबलाशी जाऊन पर्स उघडली. “हे घे क्वार्टर (पंचवीस सेंट्स),” वॉल्टरला पंचवीस सेंट्स देत त्या म्हणाल्या. “शहरात जाऊन खाऊन ये. मला उद्या पैसे परत दिलेस तरी चालतील.”

“नको, थँक्यू, मिस,” मान हलवत वॉल्टर हळूच म्हणाला. 

मिस कॅरोलाईनच्या आवाजातला धीर सुटत चालला : “ये वॉल्टर, हे घे.”

वॉल्टरनं पुन्हा एकदा मान हलवली. 

वॉल्टरनं तिसऱ्यांदा मान हलवल्यावर कोणीतरी कुजबुजलं, “ए, जा ना स्काऊट, तूच जाऊन सांग त्यांना.”

मी वळून पाहिलं तर वर्गात असलेली गावातली बरीचशी जनता आणि पोरांचं शिष्टमंडळ माझ्याचकडे बघत होतं. मिस कॅरोलाईन आणि माझी एव्हाना दोनदा चकमक झडली होती. तेव्हा जितकी जास्त ओळख तितकं दुसऱ्याचं म्हणणं जास्त समजून घेता येतं अशा निरागस खात्रीपोटी ते माझ्याकडे बघत होते.

मी ऐटीत वॉल्टरच्या बाजूनं उभी राहिले. “अं ..मिस कॅरोलाईन ?”

“काय झालं जीन लुईस?”

“मिस कॅरोलाईन, तो कनिंगहॅम आहे.”

मी पुन्हा खाली बसले.

“म्हणजे काय जीन लुईस?”

आपण पुरेसं स्पष्ट सांगितलंय असं मला वाटत होतं. आम्हाला सगळ्यांनाच काय ते कळायला तेवढं पुरेसं होतं. वॉल्टर कनिंगहॅम तिथे डोकं खाली घालून बसला होता. तो जेवणाचा डबा आणायला विसरला नव्हता, त्याच्याकडे जेवणच नव्हतं. त्याच्याकडे आजही खायला काही नव्हतं, उद्याही काही नसणार होतं आणि परवाही नाही. जन्मात कधी त्यानं तीन क्वार्टर्स एकत्र बघितलेही नसतील.

मी पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहिला: “वॉल्टर म्हणजे कनिंगहॅम लोकांपैकी आहे, मिस कॅरोलाईन.”

“काय सांगतेयस तू जीन लुईस?”

“असू दे मिस. थोड्याच दिवसात तुम्ही सगळ्या गाववाल्यांना ओळखायला लागाल. कनिंगहॅम लोकांना जर एखाद्या गोष्टीची परतफेड करता येणार नसेल तर ते ती गोष्ट घेतच नाहीत. चर्चमधल्या बास्केट्स नाहीत की कागदी पैसे (आणीबाणीच्या परिस्थितीत सरकारनं तात्पुरते चलनात आणलेले कमी किमतीचे पैसे. महामंदीच्या काळात ते खूपदा वापरले जात) नाहीत. ते कोणाचं काही घेत नाहीत. त्यांच्याकडे जेवढं असेल त्यात ते भागवतात. त्यांच्याकडे फारसं काही नसतं पण त्यांचं त्यात भागतं.”

कनिंगहॅम समाजाबद्दलचं म्हणजे त्यांच्यातल्या काही लोकांबद्दलचं माझं हे खास ज्ञान मागच्या थंडीत घडलेल्या घटनेमुळे पक्कं झालं होतं. वॉल्टरचा बाप अॅटीकसच्या अशिलांपैकी होता. एका रात्री पुढल्या खोलीतली एन्टेलमेन्टविषयीची कंटाळवाणी चर्चा संपवून निघताना मिस्टर कनिंगहॅम म्हणाले, “मिस्टर फिंच, तुमच्या कामाची परतफेड मला कधी करता येईल काय माहीत.”

“वॉल्टर, त्याची जराही चिंता करू नकोस,” अॅटीकस म्हणाला.

एन्टेलमेन्ट म्हणजे काय, असं जेमला विचारल्यावर तो म्हणाला की, “जेव्हा तुमची शेपटी ढुंगणात अडकते तेव्हा त्याला एन्टेलमेन्ट म्हणतात.” ते ऐकल्यावर, “मिस्टर कनिंगहॅम आपले पैसे देणार का,” असं मी अॅटीकसला विचारलं.

“पैसे नाही देणार,” अॅटीकस म्हणाला, “पण या वर्षभरात माझ्या कामाची परतफेड झालेली असेल. तू बघ.”

आम्ही बघत राहिलो. एके दिवशी सकाळी जेमला आणि मला मागच्या परसात सरपणाचा ढीग दिसला. त्यानंतर मागल्या अंगाच्या पायऱ्यांवर हिकरीच्या फळांची पिशवी आली. ख्रिसमसबरोबर स्मिलॅक्स आणि होलीच्या झाडाची परडी आली. त्यावर्षीच्या वसंत ऋतूत मुळ्याच्या पाल्यानी भरलेलं एक पोतं मिळालं, तेव्हा अॅटीकस म्हणाला की मिस्टर कनिंगहॅमनी गरजेपेक्षा जास्तच परतफेड केलीये. 

“त्यांनी अशी का परतफेड केली?” मी विचारलं. 

“त्याला फक्त तशीच करणं शक्य आहे म्हणून. त्याच्याकडे पैसे नाहीत.”

“अॅटीकस, आपण गरीब आहोत?” 

अॅटीकसनं मान डोलावली. “आहोतच. “

जेमच्याकाला सुरकुत्या पडल्या. “आपण कनिंगहॅम लोकांइतके गरीब आहोत?”

“अगदी तसं नाही. कनिंगहॅम म्हणजे खेड्याकडचे लोक. शेतकरी आहेत ते आणि मंदीची सगळ्यात मोठी झळ त्यांनाच बसलीये.” 

अॅटीकस म्हणाला की व्यवसाय करणारे लोक गरीब आहेत कारण शेतकरी गरीब आहेत. मेकोम्ब प्रांत हा शेतीचा प्रांत आहे. डॉक्टर, दातांचे डॉक्टर आणि वकील या लोकांना पाच, दहा सेंट मिळणंही मुश्किल आहे. एन्टेलमेन्ट हा मिस्टर कनिंगहॅमच्या डोक्याचा एक ताप झाला. पण एन्टेलमेन्ट न झालेली शेतजमीन कर्जात बुडालीये. त्याला जी काही थोडीफार रोख रक्कम मिळते ती व्याजापोटी जाते. जरा हुशारीनं वागला तर त्याला बांधकाम मजूर (WPA) म्हणून काम करता येईल. पण जमीन सोडून गेला तर तिचा सत्यानाश होईल. आपली जमीन हाताशी ठेवण्यासाठी आणि मतदानाचा अधिकार शाबूत ठेवण्यासाठी उपासमार पत्करायला तो तयार होता. “मिस्टर कनिंगहॅमचा पिंड वेगळाच आहे,” असं अॅटीकस म्हणाला.

वकिलाला द्यायला पैसे नसल्यानं कनिंगहॅम लोकांनी त्यांच्याकडे जे देण्यासारखं होतं ते आम्हाला दिलं होतं. “तुला माहितेय,” अॅटीकस म्हणाला, “डॉ. रेनॉल्ड्स पण असंच काम करतात ते? एका बाळंतपणासाठी ते काही लोकांकडून एक बुशेल बटाटे घेतात. स्काऊटबाई, तुम्ही लक्ष देऊन ऐकणार असाल तर एन्टेलमेन्ट म्हणजे काय ते सांगतो. जेमनं सांगितलेले अर्थ कधीकधी खूपसे बरोबर असतात.”

मला हे सगळं मिस कॅरोलाईनना समजावून सांगता आलं असतं तर इतकी पंचाईत झाली नसती. शिवाय त्यानंतर मिस कॅरोलाईनना जसं अवघडायला झालं तसंही झालं नसतं. पण अॅटीकसइतकं छान समजावून सांगणं माझ्या कुवतीपलीकडे होतं. तेव्हा मी एवढंच म्हणाले, “तुम्ही त्याला लाजवताय मिस कॅरोलाईन. वॉल्टरकडे तुम्हाला देण्यासाठी पंचवीस सेंट्स नाहीयेत आणि सरपणाचा तुम्हाला काही उपयोग नाही.”

मिस कॅरोलाईन एकदम स्तब्ध उभ्या राहिल्या. मग त्या माझी कॉलर धरून मला फरफटत टेबलाशी घेऊन गेल्या आणि म्हणाल्या, “जीन लुईस, सकाळपासून तुझी फार नाटकं पाहिली. प्रत्येक वेळेस तू काहीतरी मोडता घालतेयस बाळा. हात पुढे कर.”

मला वाटलं की या त्यावर थुंकणार. मेकोम्बमध्ये कोणी हात पुढे केला तर तेवढ्यासाठीच. तोंडी करार पक्का करायचा असेल तर ही वर्षानुवर्षं चालत आलेली पद्धत होती. आपण काय सौदा केला असावा याचं नवल करत मी उत्तर मिळविण्यासाठी म्हणून वर्गाकडे नजर टाकली. पण सगळा वर्ग गोंधळून माझ्याचकडे बघत होता. मिस कॅरोलाईननं पट्टी उचलली, चटचट माझ्या हातावर अर्धा डझनवेळा मारली आणि मला कोपऱ्यात जाऊन उभं रहायला सांगितलं. मिस कॅरोलाईननं मला शिक्षा केली हे जेव्हा एकदाचं वर्गाला कळलं तेव्हा सगळा वर्ग हसून हसून फुटला.

मिस कॅरोलाईननं सगळ्यांनाच तशी शिक्षा करण्याची धमकी दिली आणि पहिलीचा वर्ग पुन्हा फुटला तो मिस ब्लाऊंटची सावली पडल्यावरच चिडीचूप झाला. मेकोम्बमध्ये उभं आयुष्य गेलेल्या मिस ब्लाऊंटना दशांश पद्धतीचं कोडं अजून सुटलेलं नव्हतं. कंबरेवर हात ठेवून त्या दारात उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, “आता या वर्गातून आणखी एक जरी आवाज आला तरी सगळ्यांना इथल्याइथे डांबून आग लावीन. मिस कॅरोलाईन, एवढ्या दंग्यात सहावीच्या मुलांना पिरॅमिडवर लक्ष देता येत नाहीये!”

माझा कोपऱ्यातला मुक्काम थोडाच वेळ टिकला. घंटा झाली आणि मी वाचले. मिस कॅरोलाईन जेवणासाठी बाहेर पडणाऱ्या वर्गावर लक्ष ठेवून होत्या. मी सगळ्यात शेवटी बाहेर पडले. त्यामुळे त्या मटकन खुर्चीवर बसून दोन्ही हातात डोकं खुपसून घेताना मला दिसल्या. माझ्याशी जरा प्रेमानं वागल्या असत्या तर मला त्यांच्याबद्दल वाईट वाटलं असतं. तशा बिचाऱ्या गोड होत्या.

 

.

वॉल्टर कनिंगहॅमला शाळेच्या मैदानात गाठल्यावर मला जरा बरं वाटलं. पण त्याला मी धूळ चारत असतानाच जेम मध्ये पडला आणि म्हणाला, “तू त्याच्यापेक्षा दांडगट आहेस.” 

“तुझ्याइतकाच असेल तो,” मी म्हणाले. “याच्यामुळं म्हणे मी मोडता घातला.”

“त्याला सोड स्काऊट. काय झालं?”

“त्यानं डबा आणला नव्हता,” असं म्हणून वॉल्टरच्या खाण्यापिण्याच्या भानगडीत मी कशी काय अडकले ते मी सांगितलं.

वॉल्टर जागचा उठला होता आणि गपचूप उभा राहून माझं आणि जेमचं बोलणं ऐकत होता. हे दोघं केव्हाही आपल्याला धरतील असं वाटून त्याच्या मुठी अर्ध्या वळलेल्या होत्या. त्याला पळवून लावायला म्हणून मी जोरात पाय आपटला पण जेमनं मला हाताला धरून थांबवलं. संशयानं वॉल्टरला न्याहाळत त्यानं विचारलं, “जुन्या सारममधल्या मिस्टर वॉल्टर कनिंगहॅमचा पोरगा का तू?” वॉल्टरनं मान डोलावली.

वॉल्टर माशांच्या खाण्यावर वाढला असावा असं वाटत होतं. त्याचे डोळे डील हॅरीससारखेच निळे आणि पाणीदार होते. डोळ्यांच्या कडा लालसर होत्या. त्याचा चेहेरा अगदी फिकुटलेला होता. नाकाचा शेंडा मात्र गुलाबीसर होता. तो अस्वस्थपणे अंगातल्या विजारीचे पट्टे कुरवाळत त्याचे हूक ओढत होता.

जेम एकदम त्याच्याकडे बघून हसला आणि म्हणाला, “वॉल्टर, चल आमच्या घरी जेवायला. आम्हाला आवडेल तू आलास तर.”

वॉल्टरचा चेहेरा उजळला आणि पुन्हा काळवंडला.

“अरे, तुझे बाबा माझ्या बाबांचे दोस्त आहेत. ही स्काऊट वेडपट आहे. ती आता आणखी भांडणार नाही तुझ्याशी.”  

“तसलं काही नक्की नाही हां,” मी म्हणाले. जेमनं परस्पर माझ्यावतीनं वचन देऊन टाकल्यानं माझी चिडचिड झाली होती पण दुपारचा मोलाचा वेळ वाया चालला होता. “ठीके वॉल्टर, मी पुन्हा तुझ्या अंगावर येणार नाही. ए, तुला वाल आवडतात? आमची कॅल फार भारी स्वैपाक करते.”

वॉल्टर ओठ दाबून धरत जागीच थांबला. जेमनं आणि मी त्याचा नाद सोडून दिला. आम्ही जवळपास रॅडलींच्या घरापाशी पोहोचलो तेव्हा मागून वॉल्टर ओरडला, “ए, मी येतोय!”

वॉल्टरनं आम्हाला गाठल्यावर जेम त्याच्याशी अगदी छान गप्पा मारत होता. “इथे ना एक खवीस रहातो,” रॅडलींच्या घराकडे बोट दाखवत त्यानं अगदी दोस्तीत सांगितलं. “तू ऐकलंयस कधी त्याबद्दल?”

“तर..” वॉल्टर म्हणाला. “शाळेत आलो त्यावर्षी त्यानं टाकलेले अक्रोड खाऊन मेलोच होतो. तो ते विषात बुडवतो आणि कुंपणातून शाळेच्या बाजूला टाकतो असं बोलतात ब्वा!”

मी आणि वॉल्टर शेजारून चालत असल्यामुळे जेमला आता बू रॅडलीची फारशी भीती वाटत नव्हती. मग काय, जेमच्या बढाया चालू झाल्या. “एकदा मी पार त्या घरापर्यंत गेलो होतो,” तो वॉल्टरला म्हणाला.

“एकदा कोणी घरापर्यंत जाऊन आलं असेल तर दरवेळेला त्या घरावरून जाताना पळायला नाही पाहिजे,” मी वरती ढगांकडे बघत म्हटलं.

“ए भोचक, कोण पळतंय इथे ?”

“तूच. बरोबर कोणी नसलं की.”    

आम्ही पुढल्या अंगणात पोहोचलो तोवर आपण कनिंगहॅम असल्याचं वॉल्टर विसरला होता. जेमनं स्वैपाकघरात पळत जाऊन कॅलपर्नियाला पाहुणा आल्याची वर्दी दिली आणि त्याचं एक ताट मांडायला सांगितलं. अॅटीकसनं वॉल्टरची विचारपूस करून पिकांबद्दल जी काही चर्चा सुरू केली ती मला अन् जेमला दोघांनाही समजत नव्हती.

“मिस्टर फिंच, दरसाल वसंतात मला घरी थांबावं लागतं. पपांना लाकूड तोडायला मदत करायला. म्हणून तर मी पहिलीत नापास झालो. पण आता शेतात काम करायला घरी आणखी एक पोरगा तयार झालाय.”

“तुम्ही त्याच्यासाठी बुशेलभर बटाटे दिलेत?” मी विचारलं पण अॅटीकसनं माझ्याकडे बघून मान हलवली.

वॉल्टर ताटात जेवणाचा ढीग वाढून घेत होता आणि एकीकडे तो आणि अॅटीकस एकमेकांशी मोठ्या माणसांसारखं बोलत होते. मला आणि जेमला त्याचं भारी नवल वाटलं. अॅटीकस शेतीतल्या अडचणींवर सविस्तर बोलत असताना त्याला मध्येच थांबवून “घरात काकवी आहे का,” असं वॉल्टरनं विचारलं. अॅटीकसनं कॅलपर्नियाला हाक मारली. ती काकवीचा कावळा घेऊन आली. वॉल्टरनं आपापलं वाढून घ्यावं म्हणून ती थांबली. वॉल्टरनं भाज्यांवर आणि मांसावर सढळ हातानं काकवी ओतली. “ओय, काय करतो तू,” असं मी विचारलं नसतं तर कदाचित त्यानं दुधाच्या ग्लासातही ती ओतली असती.

त्यानं कावळा खाली ठेवला तशी खालची चांदीची बशी किणकिणली. त्यानं चटकन हात मांडीवर घेतले आणि मान खाली घातली.

अॅटीकसनं पुन्हा एकदा माझ्याकडे बघून मान हलवली. “पण त्यानं सगळं जेवण त्या काकवीत बुडवलं,” मी निषेध नोंदवला. “त्यानं सगळीकडे ओतली ती…”

मग मात्र कॅलपर्नियानं मला स्वैपाकघरात बोलावणं धाडलं.

ती बेक्कार चिडली होती आणि चिडल्यावर कॅलपर्नियाचं व्याकरण गडबडायचं. शांत असताना मेकोम्बमधल्या इतर कोणत्याही माणसाइतकंच तिचंही व्याकरण चांगलं असायचं. कॅलपर्निया इतर बऱ्याच काळ्या माणसांपेक्षा जास्त शिकलेली आहे असं अॅटीकस म्हणायचा.

माझ्याकडे डोळे बारीक करून तिनं बघितलं तेव्हा तिच्या डोळ्याभोवतीच्या लहान लहान सुरकुत्या आणखी गडद झाल्या. “काही माणसं आपल्यागत खात नाहीत,” ती चिडून कुजबुजली, “तर काय जेवणाच्या ताटावर बसून त्यांना टोकायचं काम नाय. ते पोरगं तुमचं पाव्हणंय. तिथं बसून त्याला टेबलावरची चादर खाऊशी वाटली तर खाऊ द्यायची. ऐकलं का?” 

“तो काही पाहुणा नाहीये काही कॅल, तो तर कनिंगहॅम आहे …”

“तोंड बंद कर! कोणी असूदे, या घरात जो कोण पाय ठेवील तो तुमचा पाव्हणा. एss म्हाराणी असल्यागत त्यांच्याशी असलं बोललीस तर याद राख! तुमी लोक कनिंगहॅमपेक्षा गब्बर असाल पण तू त्यांचा असला अपमान केलास तर त्याचा काय फायदा नाय. टेबलावर बसून नीट जेवता येत नसेल तर इथे ताट घेऊन ये आणि स्वैपाकघरात बसून जेव!”

मला जोरात एक रट्टा मारून कॅलपर्नियानं जेवणाच्या खोलीत पिटाळलं. मी ताट घेऊन आले आणि उरलेलं जेवण स्वैपाकघरात बसूनच केलं. मात्र पुन्हा त्यांच्या समोर जाऊन अपमान करून घ्यावा लागला नाही याचं मला बरंच वाटलं. मी कॅलपर्नियाला सांगून टाकलं, “तू थांबच आता. मी बघते तुझ्याकडे. एक दिवस तुझं लक्ष नसताना मी जाऊन बार्करच्या भोवऱ्यात बुडी मारीन. मग तुला वाईट वाटेल.” शिवाय पुढे मी हेही म्हणाले की, “आधीच तुझ्यामुळे आज मला ओरडा बसलाय. तू मला लिहायला शिकवलंस. सगळी तुझीच चूक आहे.” “बडबड बंद कर,” ती म्हणाली.

जेम आणि वॉल्टर माझ्याआधी शाळेत गेले. मला मागे थांबून कॅलपर्नियानं केलेल्या अन्यायाचा पाढा अॅटीकसला वाचून दाखवता आला. मग त्यामुळे नंतर रॅडलींच्या घरावरून पळतपळत जावं लागलं तरी हरकत नव्हती. “तसंही तिला माझ्यापेक्षा जेमच जास्त आवडतो,” अशी मी तक्रार केली आणि, “तू तिचं सामान आवरून तिला लग्गेच घालवून दे,” असंही अॅटीकसला सांगून टाकलं.  

“तू तिला जेवढी काळजी करायला लावतेस त्याच्या अर्ध्यानंही जेम करायला लावत नाही. याचा तू कधी विचार केलायस का?” अॅटीकस कडक आवाजात म्हणाला. “तिला घालवून द्यायचा माझा अजिबात इरादा नाही. आत्ताही नाही आणि कधीच नाही. कॅलशिवाय आपल्याला एक दिवसही काढता येणार नाही ते लक्षात आलंय का तुझ्या? कॅल तुझ्यासाठी किती करते त्याचा विचार करायचा आणि तिचं ऐकायचं, कळलं?”

मी शाळेत परत गेले आणि मनातल्या मनात कॅलपर्नियाचा अखंड रागराग करत राहिले. अचानक एक किंकाळी ऐकू आली आणि तात्पुरता मी माझा राग विसरले. वर मान करून बघितलं तर मिस कॅरोलाईन खोलीच्या मध्यात उभ्या होत्या. त्यांचा चेहेरा भीतीनं आक्रसला होता. पण बहुधा त्या थोड्या सावरल्या असाव्यात.

“ईईई, ते जिवंत आहे!” त्या किंचाळल्या.

वर्गातली पोरं त्यांच्या मदतीला धावली. अरे देवा, या उंदराला घाबरलेल्या दिसतायत, मी विचार केला. बारक्या छू हा पोरगा सर्व प्रकारच्या सजीव प्राण्यांशी काहीच्या काही सबुरीनं वागायचा. त्यानं विचारलं, “कुणीकडं गेला तो मिस कॅरोलाईन? कुठं ते पटकन सांगा आम्हाला. डी सी,” मागच्या पोराकडे वळून तो म्हणाला, “डी सी, दार बंद कर. आपण धरू त्याला. मिस पटकन सांगा, कुठे गेला?”

मिस कॅरोलाईननी थरथरत जमिनीकडे किंवा बाकाकडे बोट न दाखवता मला माहीत नसलेल्या एका आडदांड पोराकडे बोट दाखवलं. बारक्या छू चा चेहेरा आक्रसला आणि तो हळूच म्हणाला, “हा? हो… तो जिवंतंय. त्यानं घाबरवलं तुमाला?”

मिस कॅरोलाईन घायकुतीला येऊन म्हणाल्या, “मी बाजूनं चालले होते तेव्हा ते त्याच्या केसातून सरपटत बाहेर आलं…..केसातून चक्क सरपटत बाहेर आलं…”

बारक्या छू लांबरुंद हसला. “मिस, उवेला कशाला घाबरायचं. कधी पायली नाई? आता घाबरू नका. जा टेबलाशी जा आणि आणखी थोडं शिकवा.” 

आपल्या पुढल्या जेवणाची सोय माहीत नसलेल्या जनतेतला बारक्या छू हा आणखी एक गडी. पण गडी हाडाचा सभ्य. मिस कॅरोलाईनचं कोपर धरून तो त्यांना वर्गासमोर घेऊन गेला. “मिस, आता अजिबात घाबरायचं नाय. मी तुमाला गार पाणी आणतो.” त्या उवेच्या आश्रयदात्यानं स्वतः घडवून आणलेल्या दंग्यात जराही रस घेतला नव्हता. त्यानं केसातून हात फिरवून आपली पाव्हणी हुडकून काढली आणि अंगठ्याच्या न् पहिल्या बोटाच्या मध्ये धरून चिरडली.

मिस कॅरोलाईन भीतीनं अवाक होऊन हा प्रकार बघत होत्या. बारक्या छू एका कागदी कपात पाणी घेऊन आला आणि त्यांनी हायसं वाटून ते प्यायलं. एकदाचा त्यांना कंठ फुटला. “तुझं नाव काय बाळा?” हळूवार आवाजात त्यांनी विचारलं. 

त्या पोराच्या डोळ्यांची उघडझाप झाली. “कोणाचं माझं?” मिस कॅरोलाईननं मान डोलावली. 

“बुरीस एवेल.”

मिस कॅरोलाईननं हजेरीची वही तपासली. “इथे एवेल आडनाव आहे पण नाव लिहिलेलं नाही.. तुझ्या नावाचं स्पेलिंग सांगतोस?” 

“मला नाय माहीत. मला घरी बुरीसच म्हणतात.”

“ठीके बुरीस,” मिस कॅरोलाईन म्हणाल्या, “मला वाटतं आता उरलेला दिवस तू घरी जा. घरी जाऊन केस धू.” 

टेबलावरून त्यांनी एक जाडजूड पुस्तक काढून त्याची पानं चाळली आणि थोडावेळ वाचली. “यासाठी चांगला घरगुती उपाय म्हणजे .. बुरीस, घरी जाऊन उवांसाठीच्या साबणानी केस धू. ते झालं की डोक्याला केरोसीन लाव. “

“कशाला मिस?” 

“त्या.. अं .. ऊवा घालवायला. कसंय बुरीस, इथे इतर मुलांच्याही डोक्यात होतील नं त्या. तसं नको नं?” 

तो पोरगा उभा राहिला. इतका गचाळ माणूस मी आत्तापर्यंत पाहिलाच नव्हता. त्याची मान गडद करड्या रंगाची होती, हातांची मागची बाजू बुरसटली होती आणि नखं आतपर्यंत काळीकुट्ट होती. चेहेऱ्यावरच्या मूठभर स्वच्छ जागेतून त्याने मिस कॅरोलाईनकडे पाहिलं. सकाळभर मी आणि मिस कॅरोलाईननं बरीच करमणूक केल्यानं  कदाचित कोणाचंच त्याच्याकडे लक्ष गेलं नसावं. 

“आणि बुरीस, उद्या यायच्या आधी आंघोळ करून ये हं.” मिस कॅरोलाईन म्हणाल्या.

तो पोरगा आगाऊपणे हसला. “ओ बाई, तुम्ही मला घरी पाठवायची गरज नाही. मी निघालोच होतो. माझी वर्षाची हजेरी झालीये.” 

मिस कॅरोलाईन गोंधळलेल्या दिसल्या. “म्हणजे काय?”

त्या पोरानं काहीच उत्तर दिलं नाही. तो नुसताच तुच्छतेनं हसला.

वर्गातल्या मोठ्या पोरांपैकी एकानं त्यांना सांगितलं, “तो एवेल्स आहे मिस.” मगाशी माझा अगदी असाच प्रयत्न पार वाया गेला होता. आता याचंही तेच होतंय का ते मी बघायला लागले. पण मिस कॅरोलाईनना ऐकून घ्यायची इच्छा दिसत होती. “एवेल्सची पोरं शाळाभर आहेत. दरवर्षी ते शाळेच्या पहिल्या दिवशी येतात आणि मग निघून जातात. त्या सामाजिक काम करणाऱ्या बाई त्यांना अंमलदाराची भीती घालून इथे घेऊन येतात पण या पोरांना इथे टिकवून ठेवायचा नाद सोडलाय त्यांनी. त्यांना पहिल्या दिवशी इथे आणून त्यांची नावं नुसती हजेरीपटावर आली की आपलं काम झालं असं त्या धरतात. बाकीचं वर्ष त्यांची रजा लावायची….”

“पण त्यांच्या पालकांचं काय?” मिस कॅरोलाईननं अगदी काळजीनं विचारलं.

“आई नाही त्यांना,” उत्तर आलं, “आणि बाप भारी भांडकुदळ आहे.”

आपलीच कहाणी ऐकून बुरीस एवेल खूष झाला. “गेली तीन वर्षं पहिल्या दिवशी पहिलीच्या वर्गात येतोय,” त्यानं बिनधास्तपणे सांगितलं. “या वर्षी हुशार झालो तर मला दुसरीत घालतील…”

मिस कॅरोलाईन म्हणाल्या, “बुरीस, पुन्हा जागेवर जाऊन बस,” आणि त्याक्षणी त्यांनी फार मोठी चूक केल्याचं माझ्या लक्षात आलं. त्या पोराचं आदबशीर वागणं जाऊन तिथे संताप दिसायला लागला.

“ओ बाई, बसवून तर बघा मला जागेवर,”

बारक्या छू उभा राहून म्हणाला, “त्याला जाऊदेत मिस. फार बेकार आहे. काहीतरी भांडण उकरून काढेल. इथे बारकी बारकी पोरंपण आहेत.”

बारक्या छू अगदी किरकोळ होता पण बुरीस एवेल त्याच्याकडे वळला तसा त्याचा उजवा हात खिशात गेला. “बुरीस, दमानं घे,” तो म्हणाला, “बघता बघता जीव घेईन तुझा. चल जा घरी.”

आपल्याहून निम्म्या उंचीच्या पोराला बुरीस घाबरत होता असं दिसलं. मिस कॅरोलाईननं त्याच्या घुटमळण्याचा फायदा घेतला : “बुरीस, घरी जा. गेला नाहीस तर मुख्याध्यापकांना बोलवीन,” त्या म्हणाल्या. “असंही मला याची तक्रार करावीच लागणार आहे.”

तो पोरगा हसला आणि रमतगमत दाराशी गेला.

धोक्याच्या टप्प्यातून एकदा बाहेर गेल्यानंतर तो ओरडला: “जा कर तक्रार आणि मर! आपल्यावर रुबाब झाडणारी रांडीची एकपण शेंबडी मास्तरीण पैदा नाही झाली अजून! ए बाई, तू काय मला घालवून देते. ध्यानात ठेव, तू काय मला घालवत नाय!” 

त्या रडायला लागल्याची खात्री पटेपर्यंत तो थांबला आणि मग तिथून बाहेर पडला.

थोड्याच वेळात आम्ही त्यांच्या टेबलाशी जमून त्यांना धीर द्यायला लागलो. “बुरीस फार बेकार पोरगाय..किती घाणेरडं बोलला..तुम्ही काही इथे असल्या पोरांना शिकवायला आला नाहीत..मिस कॅरोलाईन, ही काही मेकोम्बची पद्धत नाही.. खरंच..आता तुम्ही आणखी जीवाला लावून घेऊ नका बरं. मिस कॅरोलाईन, तुम्ही आम्हाला गोष्ट का नाही वाचून दाखवत? ती सकाळची मांजरींची गोष्ट खरंच छान होती..”

मिस कॅरोलाईन हसल्या आणि नाक शिंकरत म्हणाल्या, “किती गोड पोरं आहात तुम्ही,” आम्हाला जागेवर पाठवून त्यांनी एक पुस्तक उघडलं आणि एका मोठ्या दिवाणखान्यात राहणाऱ्या बेडकाची मोठ्ठी गोष्ट सांगून पहिलीच्या वर्गाला एकदम झपाटून टाकलं.

त्या दिवसातून एकंदर चौथ्यांदा आणि धूम ठोकत दुसऱ्यांदा रॅडलींच्या घरावरून जाताना मी त्या घराइतकीच उदास होते. शाळेच्या उरलेल्या वर्षात आजच्या इतकाच तमाशा होणार असेल तर कदाचित जरा करमणूक होऊ शकेल पण नऊ महिने न लिहिता वाचता काढायचे या विचारानंच मला पळून जावंसं वाटत होतं.

दुपार उतरेपर्यंत माझे प्रवासाचे सगळे बेत करून झाले होते. कामावरून घरी येणाऱ्या अॅटीकसला भेटायला मी आणि जेमनं रस्त्याकडेनं शर्यत लावली खरी, पण मी काही जेमला फारशी खुन्नस दिली नाही. अॅटीकस लांब कोपऱ्यावर पोस्ट ऑफिसशी वळताना दिसला की धावत जाऊन त्याला भेटायचा आमचा शिरस्ता होता. दुपारी मी सगळ्यांना तोंडघशी पाडल्याचं अॅटीकस विसरलेला दिसत होता. तो शाळेबद्दल खूप सारे प्रश्न विचारत होता. मी मात्र एका शब्दात उत्तरं देत होते. त्यानंही मला जास्त खोदून विचारलं नाही.

माझा दिवस फारसा चांगला गेलेला नाही हे बहुधा कॅलपर्नियाच्या लक्षात आलं असावं : संध्याकाळचा स्वैपाक करत असताना तिनं मला तिथेच बसून तो बघू दिला. “डोळे मिट आणि ‘आ’ कर. तुला एक गंमत देते,” ती म्हणाली. 

ती कुरकुरीत ब्रेड फार कमी वेळा बनवायची. कधी वेळच मिळत नाही असं म्हणायची. आज मात्र आम्ही दोघं शाळेला गेल्यामुळे तिला मोकळीक मिळाली. मला कुरकुरीत ब्रेड भारी आवडतो ते तिला माहीत होतं.

“मला आज तुझी खूप आठवण आली,” ती म्हणाली, “दुपारी दोनपर्यंत तर घरात इतकं एकटं वाटायला लागलं की मला रेडिओ लावायला लागला.”

“का? पाऊस नसेल तर मी आणि जेम कधीच घरात नसतो.”

“ते खरं,” ती म्हणाली, “पण तुमच्यापैकी एकजण तरी हाकेच्या अंतरावर असतो. माझा दिवसातला किती वेळ नुस्ता तुम्हाला हाका मारण्यातच जातो. असूदे,” स्वैपाकघरातल्या खुर्चीवरून उठत ती म्हणाली, “कुरकुरीत ब्रेड करायला तेवढा वेळ पुरतो गं. आता पळ, मला जेवणाची तयारी करू दे.”

कॅलपर्नियानं खाली वाकून माझी पापी घेतली. हिला काय झालं, असा विचार करत मी पळाले. माझ्याशी समझोता करायचा असणार, दुसरं काय. ती नेहमी माझ्याशी अशी दुष्ट वागायची. असला दुष्टपणा करण्यातली चूक तिला कळली असणार एकदाची. तिला वाईट वाटत असणार, पण तसं कबूल करायची नाही. दिवसभरातल्या चुकांनी मी दमले होते.

जेवण झाल्यावर अॅटीकस वर्तमानपत्र घेऊन बसला आणि त्यानं हाक मारली, “स्काऊट, चलायचं का वाचायला?” आता मात्र देवानं माझा अंत पाहिला होता. मी तडक पुढल्या ओसरीत गेले. अॅटीकस मागोमाग आला.

“काही झालंय का स्काऊट?”

“मला फारसं बरं वाटत नाहीये. तुला चालणार असेल तर इथून पुढे मी शाळेला जाणार नाही.” मी अॅटीकसला सांगितलं.

अॅटीकस पायावर पाय टाकून झोपाळ्यावर बसला. त्याची बोटं खिशातल्या घड्याळाशी चाळा करायला लागली. “विचार करताना मला असा चाळा लागतो,” तो म्हणायचा. तो शांतपणे प्रेमानं वाट बघत राहिला आणि मी माझा मुद्दा आणखी पुढे रेटला: “तू कधीच शाळेला गेला नाहीस आणि तरी तुझं छान चाललंय. मग मी पण घरीच थांबेन. आजोबांनी जसं तुला आणि जॅककाकाला शिकवलं तसं तू मला शिकव.”

“नाही, ते जमायचं नाही,” अॅटीकस म्हणाला. “मला काम करून पैसे मिळवायला लागतात. शिवाय, तुला घरी ठेवलं तर मला तुरूंगात टाकतील. रात्री औषधाचा एक डोस घ्यायचा आणि उद्या शाळेला जायचं.”

“पण मी बरीये, खरंच.”

“वाटलंच मला. मग काय झालंय?”

एकेक करून मी त्याला दिवसभरातल्या दुर्दैवी कहाण्या ऐकवल्या. “..आणि ती म्हणाली की, तू मला सगळं चुकीचं शिकवलंयस म्हणून. त्यामुळे आता आपल्याला पुन्हा कधीच वाचता येणार नाही. मला परत नको पाठवू तिकडे, प्लीज.”

अॅटीकस उठून ओसरीच्या टोकापर्यंत चालत गेला. भिंतीवरच्या वेलीची अगदी बारकाईनं पाहणी करून झाल्यावर तो चालत चालत पुन्हा माझ्यापाशी आला.

“पहिली गोष्ट,” तो म्हणाला, “स्काऊट, तू जर का एक साधी सोपी युक्ती शिकून घेतलीस तर सगळ्या प्रकारच्या माणसांशी तुझं बरंच बरं जमेल. एखाद्या माणसाचं वागणं समजून घ्यायचं असेल तर त्याच्या दृष्टीकोनातून विचार केल्याशिवाय ते जमत नाही..”

“बाबा?”

“..म्हणजे जोवर तुम्ही त्याच्या अंगात शिरून इकडेतिकडे फिरत नाही तोवर ते जमत नाही.” 

अॅटीकसच्या म्हणण्याप्रमाणे मी आज बऱ्याच गोष्टी शिकले होते आणि स्वतः मिस कॅरोलाईन सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकल्या होत्या. कनिंगहॅम नावाच्या माणसाला कोणतीही गोष्ट देऊ करायची नाही हे त्या शिकल्या होत्या, हे एक झालं. पण मी आणि वॉल्टरनं त्यांच्या जागी जाऊन विचार केला असता तर लक्षात आलं असतं की त्यांच्याकडून नकळत चूक झाली होती. एका दिवसात त्यांना मेकोम्बच्या सगळ्या रीती समजाव्यात अशी अपेक्षा करता येणार नाही. काही माहीत नसेल तर त्यासाठी त्यांना जबाबदार ठरवता येणार नाही.

“मी नाहीच जाणार,” मी म्हणाले. “त्यांना वाचून दाखवायचं नाही हे मला तरी कुठे माहीत होतं. त्यांनी नाही का मला त्याची शिक्षा दिली ? हे बघ अॅटीकस, मी शाळेत जायलाच पाहिजे असं काही नाही!” माझ्या डोक्यात अचानक एक किडा आला होता. “बुरीस एवेल आठवतोय? तो फक्त पहिल्या दिवशी शाळेला जातो. त्याचं नाव हजेरीपटावर आलं की त्या सामाजिक काम करणाऱ्या बाई कायदा पाळला असं समजतात….” “तुला तसं करता येणार नाही, स्काऊट,” अॅटीकस म्हणाला. “कधीकधी काही खास बाबतीत कायद्यातून पळवाट काढणंच चांगलं असतं. तुझ्या बाबतीत मात्र कायदा वाकवता येणार नाही. तेव्हा तुला शाळेला जावंच लागेल.”

“त्याला न जाऊन चालत असेल तर मला का नाही चालणार?”

“ऐक मग.”

अॅटीकसनं मला सांगितलं की, एवेल्स कुटुंबानं गेल्या तीन पिढ्या मेकोम्ब गावाला वात आणला होता.  त्याच्या आठवणीत त्यांच्यापैकी एकानंही प्रामाणिकपणे काम केलं नव्हतं. तो म्हणाला की, “आता एखाद्या ख्रिसमसला झाड आणायच्या वेळेस मी तुला घेऊन जाईन आणि ते लोक कुठे आणि कसे रहातात ते दाखवीन.” ती होती माणसंच पण रहायची मात्र जनावरासारखी. “त्यांना हवं तेव्हा ते शाळेत जाऊ शकतात. शिक्षण घ्यायची एवढीशी जरी इच्छा त्यांनी दाखवली तरीही,” अॅटीकस म्हणाला. “त्यांना जबरदस्तीनं शाळेत ठेवता यावं म्हणून काही मार्ग आहेत. पण एवेल्ससारख्या लोकांना एखाद्या नवीन वातावरणात बळजबरीनं रहायला लावणं मूर्खपणाचं आहे..” 

“पण मी उद्या शाळेला गेले नाही तर तू मला मात्र बळजबरीनं पाठवणार.”

“असं म्हणता येईल,” अॅटीकस उपरोधानं म्हणाला. “मिस स्काऊट फिंच, तुम्ही सामान्य माणसांपैकी आहात. तुम्हाला कायदा पाळलाच पाहिजे. एवेल्स म्हणजे एवेल्स लोकांच्या खास समाजापैकी आहेत. काही विशिष्ट प्रसंगात सामान्य माणसं शहाणपणानं वागून त्यांना काही विशिष्ट अधिकार देतात. त्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे एवेल्सचे काही कारनामे नजरेआड करायचे. एक म्हणजे शाळेत जाण्याची त्यांच्यावर सक्ती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बुरीसच्या बापाला म्हणजे मिस्टर बॉब एवेलला बिगरहंगामी शिकार करायला परवानगी आहे.”

“अॅटीकस, पण हे चूक आहे,” मी म्हणाले. मेकोम्ब प्रांतात बिगरहंगामी शिकार करणं हा कायद्यानं गुन्हा होताच शिवाय सामान्य लोकांच्या मतेही तो घोर अपराध होता.

“हो, तसं करणं बेकायदेशीर आहे,” बाबा म्हणाला, “आणि ते चूकच आहे. पण जेव्हा एखादा माणूस त्याला मिळालेले भत्त्याचे पैसे दारूवर उडवतो तेव्हा त्याची पोरंबाळं भुकेनं रडत असतात. त्याच्या पोरांना खायला मिळणार असेल तर आसपासचा एकही जमीनदार त्याला शिकार करण्यापासून रोखणार नाही.”

“पण मिस्टर एवेलनी असं नाही करायला पाहिजे नं..”

“नाहीच केलं पाहिजे. पण त्याचं वागणं काही सुधारणार नाही. मग त्याबद्दलची नाराजी तू त्याच्या पोराबाळांवर काढणार का?”

“नाही,” मी पुटपुटले आणि शेवटचा पवित्रा घेतला : “पण मी जर का शाळेत जात राहिले तर आपल्याला इथून पुढे वाचताच येणार नाही..”

“तुला त्याची जास्त काळजी वाटतेय, होय?”

“हो.”

अॅटीकसनं माझ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहेऱ्यावर असे भाव दिसले की मला एकदम उत्सुकता वाटायला लागायची. “तुला तडजोड म्हणजे काय माहितेय?” त्यानं विचारलं.

“कायद्यातून काढलेली पळवाट?”

“नाही, दोघांच्या संमतीनं केलेला करार. म्हणजे असं,” तो म्हणाला. “जर तू शाळेत जायचं कबूल केलंस तर आपण नेहमीसारखंच रोज रात्री वाचत जाऊया. सौदा मंजूर?”

“हो बाबा!”

“नेहेमीचा रिवाज न पाळताच हा सौदा पक्का झाला असं आपण समजूया,” मी थुंकण्याच्या तयारीत असल्याचं बघून अॅटीकस म्हणाला.

मी पुढचं दार उघडलं तसा अॅटीकस म्हणाला, “आणि स्काऊट, आपल्या या कराराबद्दल तू शाळेत काही बोलली नाहीस तर बरं.”

“का?”

“कारण काही विद्वान अधिकारी आपल्या कारवायांबद्दल तीव्र नापसंती दर्शवतील.”

मृत्युपत्रात लिहिलेल्या वाक्यांसारखी वाक्यं बोलण्याची आमच्या बाबाची सवय माझ्या आणि जेमच्या अंगवळणी पडली होती. तेव्हा त्याचं बोलणं आमच्या डोक्यावरून सुसाट निघून गेलं की त्याला केव्हाही थांबवून त्याचं भाषांतर करून घेण्याची आम्हाला मुभा होती.

“अं? म्हणजे?”

“मी कधी शाळेत गेलो नाही,” तो म्हणाला, “पण मला असं वाटतंय की आपण रोज रात्री वाचतो असं तू मिस कॅरोलाईनना सांगितलंस तर त्या माझा पिच्छा पुरवतील आणि त्यांनी माझा पिच्छा करावा असं मला अजिबात वाटत नाही.”

त्या दिवशी संध्याकाळी अॅटीकसनं आम्हाला भरपूर हसवलं. त्यानं अगदी गंभीरपणे आम्हाला एका माणसाची गोष्ट वाचून दाखवली. तो माणूस कोणत्याही खास कारणाशिवाय झेंड्याच्या खांबावर बसून राहिलेला असतो. त्यानंतरचा आख्खा शनिवार वरती ट्रीहाऊसमध्ये बसून काढण्यासाठी जेमला एवढं कारण पुरेसं होतं. सकाळचा नाश्ता झाल्यानंतर सूर्य बुडेपर्यंत जेम तिथेच बसून राहिला. अॅटीकसनं त्याचं खाणंपिणं बंद केलं नसतं तर तो रात्रभर तिथेच राहिला असता. जवळजवळ सबंध दिवस मी वर खाली करण्यात, जेमची लहानमोठी कामं करण्यात, त्याला पुस्तकंच आणून दे, खायलाच आणून दे, पाणीच दे असलं करण्यात घालवला. रात्री त्याच्यासाठी अंथरूण पांघरूण घेऊन जात असताना अॅटीकस मला म्हणाला, “तू लक्ष दिलं नाहीस तर जेम आपोआप खाली येईल.” अॅटीकसचं बरोबरच होतं.

(क्रमशः)

 

छायाचित्र: टू किल अ मॉकिंग बर्ड या चित्रपटातून साभार

टू किल मॉकींगबर्ड ही हार्पर ली या अमेरिकन लेखिकेनं १९६० साली लिहिलेली पुलित्झर विजेती कादंबरी. कादंबरीत वर्णन येते ते १९३० च्या दशकातले. ही कथा आणि त्यात येणारी पात्रं लीच्या लहानपणाच्या अनुभवावर आणि निरीक्षणावर बेतलेली आहेत. ती साधारण १० वर्षांची असताना अलाबामा राज्यातल्या मन्रोव्हील नावाच्या तिच्या गावात घडलेल्या एका घटनेभोवती ही कथा फिरते.

स्काऊट नावाच्या एका सहा वर्षाच्या मुलीच्या दृष्टीकोनातून आपण ही गोष्ट ऐकतो. तीसच्या दशकातली जागतिक आर्थिक महामंदी, वर्णद्वेष, बलात्कार अशा गंभीर विषयांची पार्श्वभूमी असूनही नर्मविनोदी शैलीतल्या या कादंबरीनं झपाट्यानं लोकप्रियता मिळवली आणि आधुनिक अभिजात वाङ्मयात स्थान मिळवलं.

दक्षिण अमेरिकेतल्या मेकोम्ब नावाच्या एका निवांत काल्पनिक गावातली माणसं, त्यांच्या वागण्यातले बारकावे, स्काऊट, तिचा भाऊ जेम आणि त्यांचा मित्र डील यांचे निरागस खेळ आणि निरीक्षणं, हळूहळू तो निरागसपणा संपत जाऊन त्यांना येत जाणारी समज, स्काऊट आणि जेमचा वकील बाप अॅटीकस, त्याचं आपल्या मुलांबरोबर असलेलं नातं, त्याची न्याय्यी वृत्ती, दक्षिण अमेरिकेतले गोरे शेतकरी आणि काळे मजूर ह्यांचे परस्परसंबंध, आर्थिक महामंदीची झळ बसल्यानं आलेली भयंकर गरिबी अशा कितीतरी गोष्टी या कादंबरीतून समोर येतात.

हार्पर ली या लेखिकेची ही पहिली आणि एकमेव कादंबरी. त्याचा पहिला खर्डा तिनं ‘गो सेट अ वॉचमन’ या नावानं लिहिला होता. दोन वर्षापूर्वी तिच्या निधनानंतर तो प्रकाशित करण्यात आला.  

आश्लेषा गोरे पुण्यात वास्तव्यास असून त्यांनी केलेली मराठी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत.  वाचन, भाषाभ्यास आणि नाटक यामध्ये त्यांना रुची आहे.

 

 

2 comments on “टू किल अ मॉकिंगबर्ड: हार्पर ली/आश्लेषा गोरे

 1. प्रभाकर नानावटी

  एका सुंदर पुस्तकाचा अनुवाद करत असल्याबद्दल धन्यवाद.
  अपल्या अनुवादातून स्काउटची प्रतिमा चांगल्यापैकी उभी झालेली आहे.
  पुढील भागाच्या निरीक्षेत.

  Reply
 2. सुनिल काशीकर

  अनुवाद एकदम फक्कड झाला आहे. शुभेच्छा.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *