मूळ लेखिका: हार्पर ली

अनुवाद: आश्लेषा गोरे

टू किल अ मॉकिंगबर्ड

back

भाग २

शाळेचे बाकीचे दिवसही पहिल्या दिवसापेक्षा फार बरे नव्हते. सारखे कधीही न संपणारे प्रकल्प चालू असायचे. मला चार पोरांच्या समूहात काम करणं शिकता यावं असा अलाबामा राज्याचा उदात्त पण निष्फळ हेतू होता.त्यासाठी आमचं राज्य मैलोन् मैल अंतर झाकेल एवढा कागद आणि तेलकट खडू खर्च करत होतं. जेम म्हणायचा ती ड्यूवी दशांश पद्धत माझी पहिली संपेपर्यंत सबंध शाळेत शिकवायला लागले होते. तेव्हा शिकवण्याच्या इतर पद्धतींशी तिची तुलना करून बघण्याची संधी मला मिळालीच नाही. मी फक्त माझ्या भवतालचं निरीक्षण करत होते. अॅटीकस आणि माझा काका. ते दोघंही घरीच शिकले होते आणि त्यांना सगळं काही येत होतं. निदान एकाला जे येत नसेल ते दुसऱ्याला यायचं. शिवाय माझ्या बाबानं कितीतरी वर्षं राज्य विधानमंडळात काम केलं होतं. दरवेळेस बाबा बिनविरोध निवडून येत होता पण उत्तम नागरिक होण्यासाठी आमच्या बाईंना ज्या गोष्टी आवश्यक वाटत होत्या त्या त्याला माहीतही नव्हत्या. अर्धं शिक्षण दशांश पद्धतीनं आणि अर्धं शिक्षण डन्स कॅप पद्धतीनं घेतलेला जेम एकटा काय किंवा समूहात काय दोन्हीकडे व्यवस्थित काम करताना दिसत होता. अर्थात जेमचं उदाहरण तितकंसं बरोबर नव्हतं. शिक्षणाची कुठलीही पद्धत त्याला पुस्तकांपासून दूर ठेवू शकत नव्हती. माझ्याबद्दल बोलायचं तर टाईम मासिकातलं लिखाण पालथं घालायचं आणि घरी जे हाताला लागेल ते वाचून काढायचं यापलीकडे मला दुसरं काही ठाऊकच नव्हतं. पण मेकोम्बमधल्या शिक्षण पद्धतीच्या चरकात संथपणे पिळून निघत असताना आपली फसवणूक होतेय असं वाटल्याशिवाय मला रहावलं नाही. नक्की कसली फसवणूक होतेय ते काही मला समजत नव्हतं. मात्र मी पुढली बारा वर्षं मी अशी कंटाळवाणी काढावीत अशी अलाबामा राज्याची योजना असेल यावर माझा विश्वासच बसेना.

त्या वर्षी माझी शाळा जेमच्या अर्धा तास आधी सुटायची. त्याला तीन वाजेपर्यंत थांबावं लागायचं. रॅडलींच्या घरावरून जाताना मी जी धूम ठोकायचे ती थेट आमच्या व्हरांड्यात पोहोचेपर्यंत थांबायचेच नाही. एके दिवशी दुपारी असंच धावत जात असताना, माझ्या नजरेला काहीतरी पडलं. मी एक खोल श्वास घेऊन आजूबाजूला नीट बघितलं आणि पुन्हा मागे फिरले.

रॅडलींच्या घराच्या एका टोकाला ओकची दोन झाडं होती. त्यांची मुळं शेजारच्या रस्त्यापर्यंत पसरून त्या रस्त्यावर उंचवटे तयार झाले होते. त्या झाडांपाशी असलेल्या कशानं तरी माझं लक्ष वेधून घेतलं होतं.

वरच्या ढोलीतून चंदेरी कागदाचा एक तुकडा बाहेर डोकावत होता. ती ढोली माझ्या नजरेच्या टप्प्याच्या जरा वरच्या बाजूला होती. तो कागदी तुकडा जणू दुपारच्या उन्हात माझ्याकडे बघून डोळेच मिचकावत होता. मी चवड्यावर उभी राहिले. घाईघाईनं पुन्हा एकदा आजूबाजूला बघितलं आणि ढोलीत हात घालून दोन च्युईंगम बाहेर काढली. त्यांचं वेष्टण दिसत नव्हतं.

मला आधी ते च्युईंगम तोंडात टाकायची घाई झाली होती. तेवढ्यात आपण कुठे आहोत ते माझ्या ध्यानात आलं. मी घराकडे धावले आणि पुढल्या व्हरांड्यात उभी राहून ताब्यात घेतलेली लूट तपासायला लागले. च्युईंगम अगदी नवीन दिसत होता. मी तो हुंगून बघितला. वास तर ठीकठाक होता. मग मी तो थोडासा चाटून बघितला आणि थांबले. तरीही मी मेले नाही. मग मात्र मी तो च्युईंगम तोंडात कोंबला. डबल मिंट.

घरी आल्यावर जेमनं मला मिळालेल्या खजिन्याची चौकशी केली. मी त्याला तो च्युईंगम कुठे सापडला ते सांगितलं.

“स्काऊट, रस्त्यात पडलेल्या गोष्टी खात जाऊ नकोस.”

“पण हा रस्त्यावर नव्हता पडला काही. झाडात होता.”

जेम नुस्ताच गुरगुरला.

“म काय तर,” मी म्हणाले. “त्याs तिकडच्या झाडात होता. शाळेतून परत येताना लागतं न त्या.”

“आत्ताच्या आत्ता थुंकून टाक तो!”

मी च्युईंगम थुंकून टाकला. असंही त्याची आंबटगोड चव आता कमी झाली होती. “दुपारभर मी तो चघळतेय आणि अजून मेलेले नाही. आजारीही पडले नाहीये.”

जेम पाय आपटत म्हणाला, “तुला कळत नाही? त्या झाडांना हात नाही लावायचा ते? मरशील ना !”

“तू लावलास की एकदा त्या घराला हात !”

“ते वेगळं ! जा आत्ताच्या आत्ता गुळण्या कर. कळलं?”

“नाही ब्वा ! चव जाईल माझ्या तोंडाची.”

“नको करू. कॅलपर्नियालाच तुझं नाव सांगतो थांब !”

कॅलपर्नियाच्या भानगडीत अडकण्यापेक्षा मी जेमच्या सांगण्याप्रमाणे केलं. काय असेल ते असो पण मी शाळेत जायला लागल्यापासून आम्हा दोघींचे संबंध बरेच बदलले होते. कॅलपर्नियाची चिडचिड, जुलूम आणि सारखं सारखं माझ्या गोष्टीत नाक खुपसणं जरा कमी झालं होतं. त्याची जागा सौम्य कुरकुरीनं घेतली होती. माझ्याबाजूनं सांगायचं तर ती डिवचली जाऊ नये म्हणून मी बऱ्यापैकी काळजी घेत होते.

उन्हाळा येऊ घातला होता. मी आणि जेम आतुरतेनं वाट बघत होतो. उन्हाळा आमचा अगदी आवडता ऋतू. उन्हाळा म्हणजे व्हरांड्याला पडदे लावून बाजल्यावर केलेली लोळंपट्टी. उन्हाळा म्हणजे ट्रीहाऊसमधल्या झोपा. उन्हाळा म्हणजे मस्तपैकी खाऊ. उन्हाळा म्हणजे रखरखत्या सृष्टीने उधळलेले हजारो रंग आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं – उन्हाळा म्हणजे डील.

शाळेच्या शेवटल्या दिवशी आम्हाला लवकर सोडलं. मी आणि जेम एकत्रच चालत घरी निघालो. “डील उद्या येईल न,” मी म्हणाले.

“एखादवेळी परवा येईल. मिसिसिपीत त्यांना एक दिवस उशीरानं सोडतात.” जेम म्हणाला.

रॅडलींच्या घराजवळ असलेल्या ओकच्या झाडांपाशी आल्यावर मी शंभराव्यांदा तरी जेमला ती झाडातली ढोली दाखवली असेल. मला खरंच तिथे ते च्युईंगम सापडलं होतं यावर त्याचा विश्वास बसावा म्हणून. तर तिथे आणखी एक चकचकीत कागदाचा कपटा ठेवलेला दिसला.

“ए स्काऊट, दिसला.. मलाही !”

जेमनं आजूबाजूला पहात हात वर केला आणि हळूचकन् ते लहानसं पुडकं खिशात टाकलं. आम्ही धावत घरी आलो. व्हरांड्यात आल्यावर आम्ही त्या लहानशा डबीकडे पाहिलं. त्यावर च्युईंगमच्या चकचकीत कागदाचे बारीक बारीक तुकडे लावून नक्षी केली होती. अंगठीची डबी असते तसली ती डबी दिसत होती. जांभळ्या रंगाची मखमली डबी. तिला एक लहानसा खटका होता. जेमनं तो खटका दाबून डबी उघडली. आतमध्ये घासूनपुसून लख्ख केलेली दोन नाणी एकावर एक ठेवली होती. जेमनं ती तपासून पाहिली.

“रेड इंडियन्सचे मुखवटे” तो म्हणाला. “एकोणीसशे सहामधले. स्काऊट, यातलं एक तर पार एकोणीसशे सालातलंय. केवढी जुनी नाणीयेत.”

“एकोणीसशे,” मी त्याच्या मागोमाग म्हणाले. “म्हणजे..”

“श्शू..थांब जरा. मी विचार करतोय.”

“जेम, कुणाचीतरी वस्तू लपवायची जागाय का ती?”

“छ्या, तिथून फारसं कोण जातच नाही. मोठी माणसं सोडून.”

“हं ..मोठ्या माणसांकडे तर अशा लपवायच्या जागा नसतात. जेम, आपण हे ठेवून घ्यायचं?”

“मला काय समजत नाहीये ब्वा! ते परत तरी कोणाला देणार? तिथून कुणीही जात नाही हे नक्की. सिसिल तर पार मागल्या रस्त्यानं जाऊन शहराला वळसा घालतो आणि म घरी जातो.”

सिसिल जेकब आमच्याच रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला पोस्ट ऑफिसशेजारी रहायचा. रोज शाळेला जाताना रॅडलींचं आणि म्हाताऱ्या मिसेस हेन्री लफायते ड्युबोजचं घर टाळायला म्हणून तो मैलभर चालत जायचा. मिसेस ड्युबोज आमच्या घरापासून दोन घरं सोडून वर राहायच्या. त्यांच्याबद्दल ‘भारी खडूस बाई’ असं शेजारीपाजारी सगळ्यांचंच एकमत होतं. अॅटीकस बरोबर नसेल तर जेम त्यांच्या घरावरून जायचाही नाही. “जेम, काय करायचं?”

मालकी सिद्ध होत नाही तोवर ज्याला सापडेल त्याचीच ती वस्तू. अधूनमधून कॅमेलियाची फुलं तोडणं, उन्हाळ्यातल्या एखाद्या दिवशी मिस मॉडी अॅटकीन्सच्या गाईचं दूध पिळून ते पिणं, कोणाचीतरी द्राक्षं तोडून ती खाणं हे सगळं आमच्या नैतिक कल्पनेत बसत होतंच. पण पैशाची गोष्ट निराळी होती.

“हे बघ,” जेम म्हणाला, “शाळा सुरू होईपर्यंत आपण हे ठेवून घेऊया. शाळा सुरू झाल्यावर सगळीकडे फिरून पोरांना विचारू की हे तुमचंय का म्हणून. कदाचित बसमधल्या एखाद्या पोराचं असेल. त्याला शाळेतून बाहेर पडायची इतकी घाई झाली असेल की विसरला असेल. कोणाचीतरी ती आहेत नक्कीच. कशी घासलीत पाहिलंस का? कोणीतरी जपून ठेवली असणार ही.”

“हं, पण मग ते च्युईंगम का असं ठेवलं असेल? ते तर रहाणार नाही माहितेय.”

“काय माहीत. पण कोणासाठी तरी हे फार महत्त्वाचंय..”

“का? असं का..”

“आता हे बघ. इंडियन्सचे मुखवटे. रेड इंडियन लोकांचे असतात ते. त्यात जबरी जादू असते. शुभ असतात म्हणे ते. म्हणजे त्यांच्यामुळे तळलेलं चिकन वगैरे किरकोळ गोष्टी मिळत नाहीत पण भरपूर आयुष्य, चांगली तब्येत, परीक्षा पास होणं असं काय काय होतं. असल्या गोष्टी चिकनपेक्षा जास्त महत्त्वाच्या असतात. मी हे माझ्या ट्रंकेत ठेवून देणारे.”

खोलीत जाण्याआधी जेम बराच वेळ रॅडलींच्या घराकडे टक लावून बघत राहिला. बहुधा पुन्हा कसलातरी विचार करत असावा.

दोन दिवसांनी डील आला तो उड्या मारतच. तो मिसिसिपीवरून मेकोम्बपर्यंत ट्रेन घेऊन आपापला आला होता. (हे मेकोम्ब जंक्शन अॅबॉट प्रांतात होतं) तिथे मेकोम्बमधलीच टॅक्सी घेऊन मिस रेचल त्याला आणायला गेली होती. तो बाहेर हॉटेलात जेवला होता. बे सेंट लुईसला एक सयामी जुळं त्याला गाडीतून उतरताना दिसलं होतं. बऱ्याच धमक्या देऊनही त्यानं काही ही गोष्ट रचून सांगितल्याचं मान्य केलं नाही. त्यानं निळ्या रंगाची अर्धी चड्डी सोडून पट्टा असलेली खरीखुरी पँट घातली होती. उंची वाढली नसली तरी तो जरासा गुटगुटीत झाला होता. वडलांना भेटून आल्याचंही त्यानं सांगितलं. डीलचे बाबा आमच्या बाबापेक्षा उंच होते. त्यांना दाढी होती. काळी आणि टोकदार. ते एल अँड एन रेलरोडचे अध्यक्ष होते.

“मी थोडे दिवस तिकडच्या इंजिनियरला मदत केली,” जांभई देत डील म्हणाला.

“हो तsssर. गप आता.” जेम म्हणाला. “आज काय खेळूया?”

“टॉम, सॅम आणि डिक,” डील म्हणाला. “ए, चला पुढल्या अंगणात जाऊ.” डीलला रोव्हर बॉईजच खेळायचं होतं कारण त्यात तीन चांगली कामं करायला मिळाली असती. त्याला आमच्या नाटकातून चरित्र भूमिका करून कंटाळा आला होता.

“मला त्याचा कंटाळा आलाय,” मी म्हणाले. मला टॉम रोव्हरचं काम करायचा कंटाळा आला होता. सिनेमा चालू असताना मध्येच त्याला काही आठवेनासं होतं आणि मग शेवटपर्यंत तो सिनेमात परत येतच नाही. अगदी शेवटी तो अलास्कात सापडतो.

“जेम, तू मनानंच काहीतरी गोष्ट तयार कर न,” मी म्हणाले.

“मला त्याचा कंटाळा आलाय.”

अगदी काही दिवसांपूर्वीच सुट्टी लागली होती आणि लगेच आम्हाला कंटाळाही आला होता. आता उरलेला उन्हाळा कसा जाणार असा मी विचार करू लागले.

आम्ही फिरत फिरत पुढल्या अंगणात गेलो. डील रॅडलींच्या उदासवाण्या घराकडे बघत उभा राहिला. “मला..वास येतोय..मरणाचा,” तो म्हणाला. “खरंच येतोय, शप्पथ,” मी त्याला गप बसायला सांगितलं तसा तो म्हणाला.

“म्हंजे कोणीतरी मरत असेल तर तुला त्याचा वास येतो?”

“नाही, म्हंजे असं की कोणी मरणार असेल तर मला त्याच्या वासावरून कळतं. मला एका म्हाताऱ्या बाईनं शिकवलंय ते.” डीलनं वाकून मला हुंगलं आणि म्हणाला, “जीन ..लुईस..फिंच, तू तीन दिवसात मरणार.”

“डील, गप बस नाहीतर तंगड्या तोडून हातात देईन. शप्पथ..” 

“ए, गपा रे,” जेम गुरगुरला. “काय भुताटकीवर विश्वास असल्यासारखं करताय..”

“आणि तू काय विश्वास नसल्यासारखं करतोयस..?” मी म्हणाले.

“भुताटकी?” डीलनं विचारलं.

“तू रात्री कधी सुनसान रस्त्यावरून चालत जाताना एखाद्या गरम वाटणाऱ्या जागेजवळून गेलायस?” जेमनं डीलला विचारलं. “भुताटकी म्हणजे ज्याला कोणाला मेल्यावर स्वर्गात जाता येत नाही तो. अशी भुतं सुनसान रस्त्यांवर फिरत बसतात. जर का कोणी त्यांच्यातून आरपार गेलंच तर मेल्यावर तोही तसाच होतो. मग तो ही रात्रभर सगळीकडे फिरत बसतो आणि माणसांचे प्राण शोषून घेतो…”

“मग भुतातून आरपार न जाण्यासाठी काय करायचं?”

“तसं नाहीच करता येत,” जेम म्हणाला. “कधीकधी ते रस्ताभर पसरलेले असतात. पण त्यांच्यातून जायची वेळ आलीच तर म्हणायचं, ‘राम राम राम, मेलेल्यातला प्राण, सोड माझी वाट, नको रोखू माझा श्वास’ म्हणजे मग ते भवती गोळा होत नाहीत..”

“त्याचं काही ऐकू नकोस तू डील,” मी म्हणाले. “कॅलपर्निया म्हणते.. हा सगळा अडाणीपणाय.”

माझ्याकडे खुनशी नजरेनं बघत जेम गुरगुरला आणि म्हणाला, “आपण आता खेळणारोत का नाही?”

“चला, टायरमध्ये बसून फिरायचा खेळ खेळू,” मी म्हणाले.

सुस्कारा सोडत जेम म्हणाला, “मी आता मोठाय तुला माहितेय न.”

“तू ढकल म नुस्तं.”

मी धावत मागच्या परसात गेले आणि कारचा एक जुनाट टायर ओढून काढला. ढकलत ढकलत मी तो पुढल्या अंगणात आणला. “मी आधी जाणार,” मी म्हणाले.

डील म्हणाला, “मी आत्ताच इथे आलोय, तेव्हा मी आधी जाणार.”

जेमनं निकाल दिला. मी आधी जायचं आणि डीलवर पाळी आली की त्यानं जास्त वेळ टायरमध्ये बसायचं. मी अंगाचं मुटकुळं करून टायरमध्ये बसले.

मगाशी मी भुताटकीवरून जेमशी वाद घातला ते त्याला बरंच लागलं असावं. तो शांतपणे माझं उट्टं काढायची संधी शोधत होता. त्यानं प्रत्यक्षात काही करेपर्यंत माझ्या ते लक्षातच आलं नव्हतं. पण माझा सूड उगवायला म्हणून त्यानं सगळी ताकद पणाला लावून टायर रस्त्याच्या कडेनं ढकलून दिला. जमीन, आकाश, घरं सगळं वेड्यागत एकात एक मिसळून गेलं. कान भणाणले आणि मी गुदमरायला लागले. छाती आणि गुडघ्यांच्यामध्ये माझे हात अडकले होते. त्यामुळे ते बाहेर काढून मला थांबताही येईना. जेम पुढे जाईल किंवा रस्त्याकडेच्या एखाद्या उंचवट्याला अडखळून आपण थांबू एवढीच मला आशा वाटत होती. मागून ओरडत धावत येणाऱ्या जेमचा आवाज मला ऐकू येत होता.

खडीवरून गचके खात टायर रस्त्यावरून गडगडत गेला आणि एका अडथळ्यावर आपटला. मी बाटलीच्या बुचासारखी उडून बाहेर पडले. माझं डोकं गरगरत होतं आणि पोटात डचमळायला लागलं होतं. त्या सिमेंटच्या रस्त्यावर तशीच पडून मी मान झटकली आणि कानातली भणभण शांत केली. तेवढ्यात जेमचा आवाज ऐकू आला:

“स्काऊट, पळ तिथून, पटकन !”

मी मान वर केली आणि समोरच मला रॅडलींच्या घराच्या पायऱ्या दिसल्या. मी तशीच थिजले.

“चल, स्काऊट, नुस्ती पडून राहू नको तिथं !” जेम किंचाळत होता. “कळत नाही तुला? उठ.” मी उठून उभी राहिले. माझे पाय थरथरत होते.

“टायर घेऊन ये !” जेम ओरडला. “येताना टायर आण! काय कळतं का नाही तुला?”  

दिशेचं भान आलं तशी लटपटत्या पायांनी मी जमेल तितक्या जोरात धूम ठोकली आणि त्यांच्यापाशी गेले.

“टायर का नाही आणलास?” जेम किंचाळला.

तू का नाही जाऊन आणत म?” मी ही किंचाळले.

जेम गप्प झाला.

“जा न, फाटकातून फार आत नाहीये. तू तर एकदा त्या घरालाही हात लावून आलायस, हो न?”

जेमनं चिडून माझ्याकडे पाहिलं. त्याला नाही म्हणता येईना. तो रस्त्याच्या कडेनं धावत सुटला. फाटकाशी साचलेलं पाणी ओलांडून आत शिरला आणि टायर घेऊन परत आला.

“पाह्यलं?” जेम विजयी मुद्रेनं गुरगुरत म्हणाला. “त्यात काय एवढंय? शप्पथ स्काऊट, कधीकधी तू पण इतकी पोरींगत वागते न राव. आपल्याला तर भीतीच वाटते ब्वा!”

त्याला माहीत नसलेलं आणखीही काही होतं पण मी काही त्याला ते सांगितलं नाही.

कॅलपर्निया पुढल्या दाराशी येऊन ओरडली, “चला, सरबत प्यायची वेळ झाली! उन्हात भटकू नका. शिजून निघाल नुस्ते!” सकाळच्या वेळात लिंबाचं सरबत पिणं हा उन्हाळ्यातला ठरलेला कार्यक्रम असायचा. कॅलपर्नियानं सरबताचं भांडं आणि तीन ग्लास व्हरांड्यात ठेवले आणि ती आपल्या कामाला निघून गेली. जेमला डिवचल्याची मला विशेष चिंता वाटत नव्हती. सरबत पिऊन झाल्यावर तो पुन्हा ताळ्यावर आला असता.

सरबताचा दुसरा ग्लास रिकामा केल्यावर जेम छातीवर हात मारत म्हणाला, “मी सांगतो काय खेळायचं ते. काहीतरी नवीन. काहीतरी वेगळं.”

“काय?” डीलनं विचारलं.

“बू रॅडलीचा खेळ.”

कधीकधी जेमच्या डोक्यात काय चाललंय ते स्वच्छ दिसायचं. आपल्याला रॅडलींची मुळ्ळीच भीती वाटत नाही आणि मगाशी तू जो घाबरटपणा केलास तसला आपण कधीही करत नाही हे मला दाखवून देण्यासाठीच त्यानं हा खेळ सुचवला होता.

“बू रॅडलीचा खेळ? कसा?” डीलनं विचारलं.

जेम म्हणाला, “स्काऊट, तू मिसेस रॅडली हो..”

“मला नाही खेळायचं. मला ना..”

“काय झालं?” डील म्हणाला. “अजूनी घाबरलीयेस?”

“अरेs, आपण झोपलो की रात्री तो बाहेर पडेल न..” मी म्हणाले.

जेम खुसफुसला. “स्काऊट, आपण काय करतोय ते त्याला कसं कळणारे? आणखी, मला नाही वाटत तो अजून तिथं आहे म्हणून. त्याला मरून चिकार वर्षं झाली. त्यांनी त्याला धुराड्यात ठासून भरलाय.”

डील म्हणाला, “जेम, आपण दोघं खेळू. स्काऊटला भीती वाटत असेल तर तिला नुस्तं बघूदे.”

बू रॅडली त्या घरातच असल्याची माझी पक्की खात्री पटली होती. पण तसं म्हटलं असतं तर माझ्यावर भुताटकी मानत असल्याचा आळ आला असता. शेवटी मी तोंड बंद ठेवायचं ठरवलं. दिवसाढवळ्या मला भुतांची मुळीच भीती नव्हती. 

जेमनं आम्हाला आमची कामं समजावली. मी मिसेस रॅडली असणार होते. मला फक्त बाहेर येऊन अंगण झाडायचं काम होतं. डील होता मिस्टर रॅडली. त्यानं रस्त्यानं जा-ये करायची आणि जेम त्याच्याशी काही बोलला की खोकायचं. जेम साहजिकच बू होता. तो पुढल्या पायऱ्यांच्या खाली लपून अधूनमधून गळा काढून रडायचा.

जसजसा उन्हाळा पुढे सरकत होता तसतसा आमचा खेळही रंगायला लागला. आम्ही त्यात आणखी सुधारणा केल्या. संवाद आणि गोष्टी घातल्या. शेवटी आमचं एक लहानसं नाटकच तयार झालं. त्यात आम्ही रोज काही ना काही बदल करायचो.

डील म्हणजे पट्टीचा नट होता. त्याला दिलेल्या कोणत्याही भूमिकेत तो घुसायचा. एखादं पात्र खूप उंच असल्यामुळे त्याची भीती वाटते असं दाखवायचं असेल तर डील उंचसुद्धा वाटायचा. अगदी उत्तम अभिनय करायचा तो. नाटकात अधूनमधून डोकावून जाणारी बायकांची पात्रं मी नाईलाजानं वठवत होते. मला मुळीच टारझनइतकी मजा आली नाही. “बू रॅडली मेलेला आहे. दिवसा मी आणि कॅलपर्निया असतो. रात्री अॅटीकस घरी असतो. त्यामुळे कोणीही तुझा पाठलाग करत येणार नाही”, असं जेमनं पुन्हा पुन्हा सांगूनही त्या उन्हाळ्यात खेळताना मी जराशी अस्वस्थच असायचे.

जेम तसा पहिल्यापास्नंच धीट होता.

शेजारपाजारच्या लोकांकडून ऐकलेल्या अफवांचे आणि कहाण्यांचे तुकडे जोडून केलेलं ते एक उदास  नाटुकलं होतं. मिसेस रॅडली फार सुंदर होत्या. नंतर मात्र त्यांचं मिस्टर रॅडलींशी लग्न झालं आणि हातचे सगळे पैसे गेले. मग त्यांचे बहुतेक सगळे दात पडले, केस गेले आणि उजव्या हाताचं पहिलं बोटही गेलं (ही भर डीलनं टाकली होती. एका रात्री बूला मांजरी आणि खारी खायला मिळाल्या नाहीत म्हणून त्यानं ते बोटच खाऊन टाकलं म्हणे.) त्यांच्या घराच्या पुढल्या बाजूच्या खोलीत बसून त्या बहुतेक सगळा वेळ रडत असायच्या. दुसरीकडे बू एकेक करून घरातलं सामान कमी करत असायचा.

आम्ही तिघं त्या गुंड मुलांची सोंगं वठवायचो. मी कधी नव्हे ते जरा बदल म्हणून न्यायाधीशांचं पात्र वठवलं. डीलनं जेमला नेऊन पायऱ्यांच्या खालच्या भागात डांबलं. तो त्याला झाडू घेऊन सतत ढोसत रहायचा. जेम जसं लागेल तसं कधी अंमलदाराची, कधी शहरातल्या माणसांची तर कधी मिस स्टीफनी क्रॉफर्डची भूमिका वठवायचा. रॅडलींबद्दल मेकोम्बमधल्या इतर कोणाहीपेक्षा मिस स्टीफनी क्रॉफर्डला पुष्कळच माहिती असायची.

मिस्टर रॅडलींच्या पायात कात्री खुपसण्याचा बूचा महत्त्वाचा प्रसंग वठवायची वेळ आली की जेम हळूच घरात घुसायचा. कॅलपर्नियाची पाठ फिरली की शिवणाच्या मशीनच्या कपाटातून कात्री चोरायचा आणि मग झोपाळ्यावर बसून वर्तमानपत्रं कापायला लागायचा. डील शेजारून चालत जायचा, जेमकडे बघून खाकरायचा आणि जेम डीलच्या मांडीत कात्री खुपसल्याचा अभिनय करायचा. माझ्या जागेवरून बघितलं तर ते अगदी खरंच वाटायचं.

रोजच्या शिरस्त्याप्रमाणे मिस्टर नॅथन रॅडली शहरात जायला निघाले की ते नजरेआड होईपर्यंत आम्ही शांत उभे रहायचो. त्यांना जर आपला संशय आला तर ते काय करतील याचं नवल करायचो. शेजारचं कोणी येताना दिसलं की आमची गडबड बंद व्हायची. एकदा तर मला मिस मॉडी अॅटकीन्स रस्त्यापलीकडून आमच्याचकडे टक लावून बघताना दिसली. तिच्या हातातली फांद्या कापायची कात्री हवेतल्या हवेतच राहिली होती.

एक दिवस आम्ही ‘वन मॅन्स फॅमिली’ च्या दुसऱ्या भागातलं पंचविसावं प्रकरण करण्यात गढलो होतो. अॅटीकस रस्त्याच्या कडेला उभा राहून आमच्याचकडे बघत असल्याचं आम्हाला दिसलंच नाही. गुंडाळी केलेलं एक मासिक गुडघ्यावर आपटत तो उभा होता. सूर्य दुपारचे बारा वाजल्याचं सांगत होता. 

“काय खेळताय तुम्ही?” त्यानं विचारलं.

“काही नाही,” जेम म्हणाला.

जेमचा एकूण उडवाउडवीचा पवित्रा बघून हा खेळ गुप्त असल्याचं माझ्या लक्षात आलं. तेव्हा मी गप्प बसले.

“मग ती कात्री घेऊन काय करताय? ते वर्तमानपत्र कशाला फाडताय? आजचं वर्तमानपत्र असेल तर फटके देईन हां.”

“काही नाही.”

“काही नाही काय?” अॅटीकस म्हणाला.

“काही नाही.”

“दे इकडे ती कात्री,” अॅटीकस म्हणाला. “ती काय खेळायची गोष्टंय? याचा रॅडलींशी काही संबंध नाही ना?”

“नाही,” लालेलाल होत जेम म्हणाला.

“नसेल तर ठीकच,” अॅटीकस तुटकपणे म्हणाला आणि घरात गेला.

“जेssम..”

“गप बस! तो पुढल्याच खोलीतेय. आपलं बोलणं ऐकू येईल त्याला.”

अंगणात जाऊन सुरक्षित अंतरावर उभं राहिल्यानंतर डीलनं जेमला विचारलं, “आपल्याला खेळता येईल ना रे परत?”

“काय की. खेळायचं नाही असं तर काही अॅटीकस बोलला नाही..”

“जेमs,” मी म्हणाले, “मला वाटतं अॅटीकसला काय ते माहितेय.”

“छ्या. माहीत असतं तर बोलला असता न तसं.”

मला तितकीशी खात्री वाटत नव्हती. पण जेमचं असं म्हणणं पडलं की, “पोरींसारखी वागतेयस तू. पोरी मनातल्या मनात सारख्या काहीतरी कल्पना करत बसतात. म्हणून लोकांना त्या मुळ्ळीच आवडत नाहीत. तुला तशा पोरींसारखं वागायचं असेल तर फूट इथून. दुसरं कोणतरी शोध जा खेळायला.”

“बरं बरं. तू बघच आता.” मी म्हणाले. “कळेल तुला.”

मला तो खेळ खेळायचा नव्हता याचं दुसरं कारण म्हणजे अॅटीकस तिथे आला होता हे. पहिलं कारण घडलं ते ज्यादिवशी मी रॅडलींच्या अंगणात गडगडत गेले तेव्हा. तिथे बसून मान झटकत असताना, पोटात डचमळत असताना आणि जेमचा आरडओरडा चालू असताना मला आणखी एक आवाज ऐकू आला होता. तो इतका बारीक होता की शेजारच्या रस्त्यावरून जाताना तो ऐकू येणं शक्यच नव्हतं. कोणीतरी त्या घरात हसत बसलं होतं.

 

हळूहळू जेमवर माझ्या कटकटीचा परिणाम झालाच. तसा तो होणार हे मला माहीतच होतं. थोडेदिवस आम्ही तो खेळ कमी केला आणि मला हायसं वाटलं. तरीही खेळायचंच नाही असं अॅटीकस म्हणाला नव्हता. तेव्हा आपण अजूनही खेळू शकतो, हा हेका जेमनं सोडला नाही तो नाहीच. शिवाय अॅटीकसनं हाच खेळ खेळायला मनाई केली तर जेमनं त्यावर उपायही शोधून ठेवला होता. त्यातल्या पात्रांची नावं फक्त बदलायची म्हणजे मग कोणीच आपल्याला काही म्हणू शकणार नाही.

डीलला ही योजना अगदीच पसंत पडली होती. डील आता अगदी जेमच्या पावलावर पाऊल टाकून वागायला लागला होता. त्यामुळे तो ही तसा तापदायकच झाला होता. त्यानं उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मला लग्न करण्याबद्दल विचारलं होतं आणि लगेचच ते विसरूनही गेला होता. त्यानं मला हेरून माझ्यावर मालकी हक्क दाखवला होता. तू सोडून मी दुसऱ्या कोणत्याच पोरीवर प्रेम करणार नाही असं सांगितलं होतं आणि मग माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करून टाकलं होतं. मी दोनदा त्याला बदडून काढलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याची आणि जेमची गट्टी आणखीनच वाढली. ते दिवसच्या दिवस ट्री-हाऊसमध्ये घालवायला लागले. तिथेच बसून ते कसलीतरी खलबतं करत रहायचे आणि तिसरा माणूस हवा असला तरच मला बोलवायचे. काही दिवस मीही त्यांच्या हास्यास्पद बेतांपासून लांब राहिले. शिवाय मला पोरगी म्हटल्याचं वाईटही वाटलं होतं. त्यामुळे मी त्या उन्हाळ्यातल्या उरलेल्या संध्याकाळी मिस मॉडी अॅटकीन्सबरोबर तिच्या घरापुढल्या व्हरांड्यात बसून घालवल्या.

जेमला आणि मला मिस मॉडी अॅटकीन्सच्या अंगणात मन मानेल तसं भटकायला नेहमीच आवडायचं. तिच्या फुलझाडांपासून दूर राहिलो तर आम्हाला तसं करायला मिळायचंही. पण तिची आणि आमची अजून नीटशी ओळख झालेली नव्हती. जेम आणि डीलनं मला एकटं पाडेपर्यंत आमच्या दृष्टीनं ती शेजारच्या इतर कोणत्याही बाईसारखीच होती. फक्त त्यामानानं निरुपद्रवी होती एवढंच.

वेलींच्या मांडवावरून उड्या मारायच्या नाहीत आणि मागल्या अंगणात फिरकायचं नाही, तसं झालं तरच हिरवळीवर खेळायला मिळेल आणि बागेतली द्राक्षं खायला मिळतील असा मिस मॉडी आणि आमच्यात अलिखित करार होता. या करारातल्या अटी इतक्या किरकोळ होत्या की आम्ही कधी मिस मॉडीशी बोलायलाही जायचो नाही. आमच्या नात्यातला नाजूक तोल सांभाळण्याविषयी आम्ही तेवढे दक्ष होतो. पण जेम आणि डीलच्या वागण्यामुळे माझी तिच्याशी घसट वाढली.

मिस मॉडीला तिचं घर बिलकूल आवडायचं नाही. तिच्या दृष्टीनं घरात बसून वेळ घालवणं म्हणजे वेळ वायाच घालवणं होतं. ती एक हरहुन्नरी विधवा बाई होती. जुनी वेताची टोपी घालून आणि पुरुषांसारखी पँट घालून ती फुलांच्या वाफ्यात काम करायची. संध्याकाळी पाचची अंघोळ झाली की मग मात्र ती व्हरांड्यात बसून ऐटीत समोरच्या रस्त्यावर लक्ष ठेवून असायची.

जमिनीत उगवणारी प्रत्येक गोष्ट तिला भयंकर आवडायची. एका गोष्टीचा अपवाद सोडून. नागरमोथ्याचं एक पातं जरी बागेत दिसलं तरी युद्धाची परिस्थिती निर्माण व्हायची. पत्र्याचं एक भांडं घेऊन ती त्या गवतावर झडप घालायची आणि खालून विषारी औषधाचा मारा करायची. “हे औषध फार जालीम आहे हां. वाटेतून बाजूला झाला नाहीत तर तुम्हीही मराल,” असं ती आम्हाला सांगायची. 

“तुम्ही ते नुस्तं उपटून नाही काढत?” एका जेमतेम अर्धा वीत उंच असलेल्या पात्याविरुद्ध चाललेली लढाई बघून मी एकदा विचारलं.

“उपटून? उपटून?” तिनं एक मरगळलेला कोंब उचलला आणि बोटानं दाबला. त्यातून बारीक बारीक बिया बाहेर आल्या. “पाहिलंस? नागरमोथ्याच्या एका बारक्याशा शेंगेनं सगळी बाग बरबाद होऊ शकते. हे बघ. पानगळ सुरू झाली की ही वाळते आणि वाऱ्याबरोबर मेकोम्बभर उधळते!” हे सांगत असताना एखाद्या साथीच्या रोगाबद्दल बोलावं तसा मिस मॉडीचा चेहेरा झाला होता.

मेकोम्बमध्ये राहणाऱ्या इतर माणसांच्या मानानं मिस मॉडीचं बोलणं बरंच चटपटीत होतं. आम्हाला ती आमच्या पूर्ण नावानं हाक मारायची. हसताना तिच्या सुळ्यांना अडकवलेल्या दोन लहानशा सोनेरी तारा चमकायच्या. एकदा मी त्या तारांचं बरंच कौतुक केलं आणि मलाही कधीतरी अशा तारा हव्यायत असं म्हटलं. तेव्हा “हे बघ,” असं म्हणून तिनं जीभेच्या एका हालचालीत त्या तारा बाहेर काढून दाखवल्या. तिच्या अशा प्रेमळ वागण्यानं आमच्या मैत्रीवर शिक्कामोर्तबच झालं.

जेम आणि डील आपापले उद्योग थांबवून तिथे यायचे तेव्हा मिस मॉडी त्यांच्याशीही दिलखुलासपणे वागायची. आत्तापर्यंत आम्हाला पत्ताही नसलेल्या तिच्या कौशल्याची फळं आम्ही चाखत होतो. ती उत्कृष्ट केक करायची. आमच्या गोटात सामील झाल्यानंतर कधीही केक करायला घेतला की ती एक मोठा केक आणि तीन लहान केक करायची. मग रस्त्यापलीकडून आम्हाला हाका मारायची, “जेम फिंच, स्काऊट फिंच, चार्ल्स बेकर हॅरीस, या इकडे!” लगबगीनं गेलो की आम्हाला आमचं बक्षीस मिळायचं.

उन्हाळ्यातल्या संध्याकाळी मोठ्या लांबलचक आणि शांत असतात. अधूनमधून मी आणि मिस मॉडी तिच्या व्हरांड्यात शांत बसून रहायचो. सूर्य अस्ताला जाताना आकाशाचा रंग पिवळ्याचा गुलाबी होताना बघायचो. अगदी खालून उडत जाणारे आणि शाळेच्या छतामागे अदृश्य होणारे पक्ष्यांचे थवे बघत रहायचो. 

“मिस मॉडी,” एके दिवशी संध्याकाळी मी विचारलं, “बू रॅडली अजून जिवंतय? तुम्हाला काय वाटतं?”

“त्याचं नाव ऑर्थर आहे आणि तो जिवंतय,” ती म्हणाली. ओकच्या एका मोठ्या खुर्चीत ती सावकाश डुलत बसली होती. “तुला माझ्या लाजाळूच्या फुलांचा वास आला का गं? असा संध्याकाळच्या वेळात तो वास आला की प्रसन्न वाटतं.”

“हो. तुम्हाला कसं माहीत?”

“काय कसं माहीत बाळा?”

“की, ब..मिस्टर ऑर्थर जिवंत आहेत ते?”

“काय अघोरी प्रश्न विचारते गं. पण तो विषयही तसाच अघोरी आहे म्हणा. जीन लुईस, तो जिवंत असल्याचं मला माहितेय कारण त्याला मसणात घेऊन जाताना अजून मी पाहिलेलं नाही.”

“कदाचित तो मेला असेल आणि त्यांनी त्याला धुराड्यात ठासून भरलं असेल.”

“हे कोणी भरवलं तुझ्या डोक्यात?”

“जेम म्हणतो असं.”

“स्स्सss..दिवसेंदिवस तो अगदी जॅक फिंचच्या वळणावर जायला लागलाय.”

मिस मॉडी अॅटीकसच्या भावाला म्हणजे जॅक फिंचला लहानपणापासून ओळखत होती. ते दोघं साधारण एकाच वयाचे होते आणि फिंचच्या घाटावर एकत्रच लहानाचे मोठे झाले होते. मिस मॉडी ही शेजारचे जमीनदार डॉक्टर फ्रँक बफर्ड यांची मुलगी होती. डॉक्टर बफर्डचा तसा वैद्यकीचा व्यवसाय होता पण जमिनीतून उगवणारी प्रत्येक गोष्ट त्यांना भुरळ पाडायची. त्यामुळे ते गरीबच राहिले. जॅककाकानं त्याची खोदकामाची आवड नॅशव्हीलच्या घराच्या खिडकीतल्या कुंड्यांपुरतीच ठेवली. त्यामुळे तो पैसेवाला झाला. दर ख्रिसमसला जॅककाका आम्हाला भेटायचा. दर ख्रिसमसला तो ओरडून मिस मॉडीला हाक मारायचा आणि “माझ्याशी लग्न करतेस का?” असं विचारायचा. तिकडे मिस मॉडीही ओरडून उत्तर द्यायची, “ए जॅक फिंच, जरा आणखी जोरात हाक मार म्हणजे पोस्टापर्यंत आवाज ऐकू जाईल तुझा. काय बोलतोस ते मला काही ऐकूच आलं नाही!” एखाद्या बाईला लग्नाचं विचारायची ही पद्धत मला आणि जेमला जरा विचित्रच वाटायची. अर्थात जॅककाकाही तसा विचित्रच होता. “मी जरा चिडवतोय मिस मॉडीला,” तो म्हणायचा. “गेली चाळीस वर्षं फुकट प्रयत्न करतोय. ती माझ्याशी कधीच लग्न करणार नाही पण कोणाची खेचायची म्हटली की सगळ्यात आधी तिला मी आठवतो. मग तिच्याशी दोन हात करायचे तर आधी आपणच तिच्यावर जोरदार हल्ला चढवायला पाहिजे.” आम्हाला हे सगळं अगदी छानच समजलं होतं.  

“ऑर्थर रॅडली घरातच बसून रहातो इतकंच,” मिस मॉडी म्हणाली. “तुला बाहेर पडायला नको वाटलं तर तू नाही का घरात बसून रहाणार?”

“हो, पण मला बाहेर पडावंसं वाटेलच मुळी. त्याला का नाही वाटत?”

मिस मॉडी डोळे बारीक करत म्हणाली, “ते तर तुलाही माहितेय की.”

“नाही ब्वा. ते कोणीच नाई सांगितलं मला.”

मिस मॉडीनं दातांच्या तारा नीट केल्या. “तुला माहितेय? मिस्टर रॅडली कट्टर बाप्टिस्ट होते..”

“तुम्ही पण आहात न कट्टर बाप्टिस्ट?”

“माझी कातडी इतकी गेंड्याची नाहीये बाळा. मी नुसतीच बाप्टिस्ट आहे.”

“ज्या ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ते सगळं पाप आहे असं या कट्टर लोकांना वाटतं. तुला माहितेय? त्यांच्यातले काही जण एका शनिवारी जंगलातून आले आणि इथून जाताना मला म्हणाले की, ‘तुम्ही आणि तुमची फुलं नरकात सडाल.’”

“फुलं पण?”

“होय स्काऊट बाईसाहेब, तीही माझ्याबरोबरच जळून खाक होणार. मी देवानं निर्माण केलेल्या निसर्गात खूप जास्त वेळ घालवतेय. घरी बसून बायबल वाचायला पुरेसा वेळ देत नाहीये, असं त्यांना वाटत होतं.”

मिस मॉडी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटेस्टंट नरकात यातना भोगतेय या दृश्याची कल्पना करून माझा बायबलवरचा विश्वास डळमळीत झाला. तिची जीभ भारी तिखट होती हे खरंय. शिवाय स्टीफनी क्रॉफर्डसारखी ती शेजारीपाजारी मदतही करायची नाही. पण थोडाफार शहाणा असलेला माणूसही मिस स्टीफनीवर विश्वास ठेवायचा नाही. मिस मॉडीवर मात्र जेमला आणि मला पुष्कळच भरवसा होता. तिनं कधी आमच्या चहाड्या केल्या नव्हत्या, आमच्यावर कधी पाळत ठेवली नव्हती, आमचं काय चाललंय यात मुळीच नाक खुपसलं नव्हतं. ती आमची मैत्रीणच होती. इतक्या समंजस बाईच्या वाट्याला कायमच्या नरकयातना कशा येतील हे समजण्याच्या पलीकडे होतं.   

“हे बरोबर नाही हं, मिस मॉडी. तुम्ही किती चांगल्या आहात.”

मिस मॉडी हसली. “आभारी आहे बाईसाहेब. त्याचं असंय की, कडव्या बाप्तिस्त लोकांना वाटतं, बायका या शब्दाची व्याख्याच मुळात ‘पाप’ अशी आहे. ते बायबलचा अगदी शब्दशः अर्थ लावतात.”

“म्हणून मिस्टर ऑर्थर घरीच थांबतात? बायकांपासून लांब रहायला?”

“मला माहीत नाही गं..”

“मला नाही पटत. जर मिस्टर ऑर्थरना स्वर्गाचाच सोस असेल तर त्यांनी निदान व्हरांड्यात तरी यायला हवं. अॅटीकस म्हणतो की तुमच्यासारखी देवाला आवडणारी माणसं स्वतःवर प्रेम करतात..”

मिस मॉडी डुलायची थांबली आणि गंभीरपणे म्हणाली, “मी काय बोलतेय ते कळायला तू फार लहान आहेस अजून. पण कधीकधी एखाद्या माणसाच्या हाती बायबल असणं हे..हे म्हणजे तुझ्या वडलांसारख्या माणसाच्या हातात व्हिस्कीची बाटली असण्यापेक्षा बेकार आहे.”  

मला धक्काच बसला. “अॅटीकस नाही व्हिस्की पीत,” मी म्हणाले. “त्यानं आयुष्यात एक थेंबही घेतलेला नाही. नाही तसं नाही, घेतलाय म्हणजे. एकदा त्यानं थोडीशी प्यायली होती आणि त्याला ती आवडली नाही.”

मिस मॉडी हसली. “मी तुझ्या बाबाबद्दल बोलत नव्हते गं,” ती म्हणाली. “मला म्हणायचं होतं की, जरी अॅटीकससारखा माणूस पार झिंगेपर्यंत प्यायला तरीही तो इतका वाईट वागणार नाही, जितका एखादा माणूस चांगला शुद्धीत असताना वागेल. काहीकाही माणसं मरणानंतरच्या आयुष्याची इतकी चिंता करतात की आताचं आयुष्य कसं जगायचं हे त्यांना समजलेलंच नसतं. मग त्याचे हे असे पलीकडच्या घरात दिसतायत तसे परिणाम दिसतात.”  

“तुम्हाला ते सगळं खरं वाटतं? ब..मिस्टर ऑर्थरबद्दल लोक बोलतात ते?”

“काय सगळं?”

मी त्यांना काय ते सांगितलं.

“यातल्या पाऊण कहाण्या काळ्या लोकांनी पसरवल्यात आणि पाव स्टीफनी क्रॉफर्डनं,” मिस मॉडी गंभीरपणे म्हणाली. “स्टीफनी क्रॉफर्ड तर मला सांगत होती म्हणे, “एकदा मध्यरात्री मला जाग आली तेव्हा तो खिडकीतून माझ्याचकडे बघत होता”. मी म्हटलं, ‘तू काय केलंस म, स्टीफनी? पलंगावर सरकून त्याला जागा करून दिलीस?’ मग तिचं तोंड जरा बंद झालं.”

झालंच असणार. मिस मॉडीचा आवाज कोणाचंही तोंड बंद करायला पुरेसा होताच.

“नाही बाळा,” ती म्हणाली, “ते घर भारी उदास आहे. मला लहानपणचा ऑर्थर रॅडली आठवतो न. माझ्याशी तो नेहमी छान बोलायचा. लोक त्याच्याबद्दल काही का बोलेनात. सगळी रीतभात माहीत असल्यासारखा छान बोलायचा.”

“तो वेडा वाटतो तुम्हाला?”

मिस मॉडीनं मान हलवली. “नसेल तरी एव्हाना झाला असेल. लोकांचं कधी काय होईल सांगता येत नाही. घरांच्या बंद दरवाजांमागे काय काय चालतं, कोणती रहस्यं दडलेली असतात..”

“अॅटीकस जेमशी आणि माझ्याशी जसं घराबाहेर वागतो तसंच घरातही वागतो,” आपल्या बाबाची बाजू घेणं कर्तव्य असल्याचं वाटून मी म्हणाले.

“अगं पोरी, मी आपली माझेच विचार उगाळत बसले होते गं. तुझ्या बाबाचा विचारही आला नव्हता माझ्या डोक्यात. पण आता तू विषय काढलाच आहेस तर सांगते: अॅटीकस फिंच जसा चारचौघात वागतो तसाच घरीही वागतो. ताजा केक केलाय मी. थोडा घरी घेऊन जातेस?”

मला ते आवडलंच एकदम.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तेव्हा जेम आणि डील मागच्या अंगणात एकमेकांशी बोलण्यात गढून गेलेले दिसले. मी त्यांच्यात गेल्यावर नेहमीप्रमाणेच त्यांनी मला तिथून निघून जायला सांगितलं.

“मी नाही जाणार. जेम फिंच, हे अंगण तुझ्याइतकंच माझंय. इथे खेळायचा मलाही तुझ्याइतकाच हक्काय.”

डील आणि जेमनं आपल्या खलबतातून डोकी वर काढली. “तुला थांबायचं असेल तर आम्ही सांगतो तसं करावं लागेल,” डीलनं धमकी दिली.

“हो का?” मी म्हणाले, “आता कोण आगावपणा करतंय? आं?”

“आम्ही सांगू तसं वागायचं कबूल कर. नाहीतर आम्ही तुला काहीही सांगणार नाही,” डीलनं हेका सोडला नाही.

“असं करतोय जसा काही एका रात्रीत पार मोठ्ठा झालायस! ठीके, काय करायचंय?”

जेम शांतपणे म्हणाला, “बू रॅडलीला एक चिठ्ठी द्यायचीये.”

“कशी काय?” मी मनातल्या मनात आपोआप उसळणाऱ्या भीतीला आवर घालायचा प्रयत्न करत होते. मिस मॉडीला नुस्तं बोलायला काय जातंय..ती म्हातारी आपली आरामात व्हरांड्यात बसून बोलणार. आमची गोष्ट वेगळी होती.

जेम ती चिठ्ठी नुसती माशाच्या गळाला अडकवून खिडकीच्या झडपेतून आत सारणार होता. तेवढ्यात कोणी आलंच तर डील त्याला सावध करणार होता.

डीलनं उजवा हात दाखवला. त्याच्या हातात माझ्या आईची चांदीची जेवणाची घंटा होती.

“मी घराच्या एका बाजूला जातोय,” जेम म्हणाला. “काल आम्ही रस्त्यावरून पाहिलं तर खिडकीची एक झडप सैल झालीये. निदान खिडकीच्या खालच्या बाजूला तरी चिठ्ठी अडकवता येईल.”

“जेम..”

“आता तू आमच्यात आलीयेस. आता नाही बाहेर पडायचं. आम्ही सांगतो ते करावंच लागेल. कळलं का? आगाव कुठली!” 

“ठीके, ठीके. पण जेम, मला नाही लक्ष ठेवायचंय. कोणीतरी न..”

“नाही, तुला मागच्या बाजूला लक्ष ठेवावंच लागेल. डील घराच्या पुढल्या भागावर आणि रस्त्यावर लक्ष ठेवणारे. कोणी आलंच तर तो घंटा वाजवेल. कळलं?”

“ठीके. काय लिहिणार तुम्ही त्याला?”

डील म्हणाला, “आम्ही त्याला अगदी प्रेमानं सांगणारोत की, कधीकधी तू बाहेर येत जा. आत काय करत असतोस ते आम्हाला सांग. आम्ही लिहिलंय की, आम्ही तुला अजिबात त्रास देणार नाही. आम्ही तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येऊ.”

“दोघांनाही वेड लागलंय तुम्हाला. तो मारून टाकेल आपल्याला!”

डील म्हणाला, “माझीच युक्तीये ही. मला वाटतं, तो जरा बाहेर येऊन आपल्याबरोबर बसला न तर बरं वाटेल त्याला.” 

“त्याला आत्ता बरं वाटत नाहीये हे तुला काय माहीत?”

“तुला जर कुणी शंभर वर्षं डांबून ठेवलं, मांजरी सोडून आणखी काही खाऊ दिलं नाही, तर तुला कसं वाटेल? आं? मी पैज लावतो, त्याला दाढीसुद्धा आली असणारे..” “तुझ्या बाबांसारखी?”

“त्यांना दाढी नाहीये, त्यांना..” डील काहीतरी आठवत असल्यागत थांबला.

“हा हाss, पकडलं,” मी म्हणाले. “गाडीतून उतरायच्या आधी तू म्हणालेलास, बरंय बाबांना काळी दाढी आहे ते..”

“तुला काय करायचंय? त्यांनी मागच्या उन्हाळ्यात काढली दाढी! आणि माझ्याकडे पत्र आहे पुराव्याचं. त्यांनी मला दोन डॉलर्स सुद्धा पाठवलेत!”

“कायपण सांगतो..त्यांनी तुला पोलिसांचा ड्रेसही पाठवला होता न! कधी दिसला तर नाही तो? तू नुस्ता फेक हां..”

डील हॅरीस चांगल्या लंब्याचवड्या बाता मारायचा. तो म्हणे पत्रांची वाहतूक करणाऱ्या विमानात एकूण सतरा वेळा बसला होता. नोव्हा स्कॉटियाला गेला होता. शिवाय त्यानं हत्तीही पाहिला होता आणि त्याचे आजोबा म्हणजे ब्रिगेडियर जनरल जो व्हीलर होते. त्यांनी त्यांची तलवार डीलसाठी ठेवली होती. 

“तुम्ही जरा गपा,” जेम म्हणाला. तो घराखालून सरपटत वर आला. त्याच्या हातात बाबूंची एक पिवळी काठी होती. “बाजूच्या रस्त्यावर उभं राहून आत जाईल का ही?”

“कुणी त्या घराला हात लावून येण्याइतकं शूर असेल तर माशाचा गळ कशाला पाहिजे?” मी म्हणाले. “जाऊन पुढल्या दारावर टकटक कर की.”

“हे..वेगळंय..” जेम म्हणाला, “कितीवेळा सांगायचं तुला?”

डीलनं खिशातून कागदाचा एक तुकडा काढून जेमला दिला. आम्ही तिघं हळूच त्या जुनाट घराकडे निघालो. डील घराच्या पुढल्या कोपऱ्यात असलेल्या दिव्याच्या खांबाशी थांबला. जेम आणि मी घराशेजारच्या रस्त्यावरून सरकायला लागलो. मी जेमच्या पुढे जाऊन वळणावरचं दिसेल अशा बेतानं उभी राहिले.

“कोणी येत नाहीये,” मी म्हणाले.

जेमनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डीलकडे पाहिलं. त्यानं मान डोलावून खूण केली.

जेमनं माशांच्या गळाला चिठ्ठी लावली, तो गळ त्यानं अंगणापलीकडे ठरलेल्या खिडकीच्या दिशेनं फेकला. गळाची लांबी पुष्कळच कमी पडत होती, जेम जमेल तितका पुढे झुकलेला असूनही. बराच वेळ त्याला धडपडताना बघून मी माझी जागा सोडली आणि त्याच्याकडे गेले.

“ही चिठ्ठी पडतच नाहीये,” तो पुटपुटला. “किंवा पडली तरी खिडकीवर रहात नाहीये. स्काऊट, तू जा परत तिकडे.”

मी परत फिरले आणि रिकाम्या रस्त्यावरच्या वळणाकडे नजर टाकली. अधूनमधून मी जेमकडे नजर टाकत होते. तो चिकाटीनं खिडकीच्या चौकटीत ती चिठ्ठी ठेवायचा प्रयत्न करत होता. ती उडून जमिनीवर पडायची आणि जेम पुन्हा ती धरायचा. शेवटी मला वाटायला लागलं की, आता बू रॅडलीला जरी ती चिठ्ठी मिळाली तरी त्याला ती वाचताच येणार नाही. मी रस्त्यावर लक्ष ठेवून होते तेवढ्यात घंटा वाजली.

खांदे ताठ करून मी बू रॅडलीला आणि त्याच्या खुनी पंजाला तोंड द्यायला सज्ज झाले. बघते तर काय, डील सगळी ताकद एकवटून अॅटीकसच्या तोंडापुढेच घंटा नाचवत उभा होता.

जेमची अवस्था अगदी भयानक झाली होती. हातातला गळ रस्त्यावर घासटत तो पाय ओढत तसाच पुढे आला.

“ती घंटा बंद कर,” अॅटीकस म्हणाला.

डीलनं घंटेचा आवाज बंद केला. त्यानंतर पसरलेल्या शांततेत यानं पुन्हा ती घंटा वाजवली तर बरं असंच मला वाटून गेलं. अॅटीकसनं डोक्यावरची हॅट मागे टाकली आणि तो कंबरेवर हात ठेवून उभा राहिला.

“जेम, काय चाललंय तुझं?”

“काही नाही.”

“तसलं काही ऐकायचं नाहीये मला. नीट सांग.”

“मी..आम्ही फक्त मिस्टर रॅडलींना काहीतरी देत होतो.”

“काय देत होतात?”

“एक पत्र फक्त.”

“बघू मला.”

जेमनं खराब झालेला तो चिठोरा पुढे धरला. अॅटीकसनं तो हातात घेऊन वाचायचा प्रयत्न केला. “तुला कशाला मिस्टर रॅडली बाहेर यायला हवेत?”

डील म्हणाला, “आम्हाला वाटलं त्यांना मजा येईल आमच्यासोबत…” अॅटीकसनं त्याच्याकडे पाहिलं तसा तो गप्प झाला.

“पोरा,” तो जेमला म्हणाला, “मी तुला एक सांगतो, शेवटचं: त्यांना त्रास देणं बंद करा. आणि तुम्हाला दोघांनाही मी तेच सांगेन.”

मिस्टर रॅडलींनी काय करावं हा त्यांचा प्रश्न होता. त्यांना बाहेर यायचं असेल तर ते येतील. आमच्यासारख्या आगाऊ कारट्यांसमोर न येता घरातच थांबायचा त्यांना पूर्ण अधिकार होता. शिवाय आमच्यासारख्या पोरांसाठी ‘आगाऊ’ हा शब्द तसा सौम्यच म्हटला पाहिजे. समजा, रात्री आम्ही आपापल्या खोलीत आहोत आणि अॅटीकस दारावर टकटक न करता आत घुसला, तर चाललं असतं का आम्हाला? मग आम्हीही मिस्टर रॅडलींच्या बाबतीत तेच करत होतो. मिस्टर रॅडलींचं वागणं आम्हाला विचित्र वाटलं तरी त्यांच्या दृष्टीनं ते विचित्र नसावं. शिवाय, दुसऱ्याशी बोलायचं असेल तर बाजूच्या खिडकीतून न जाता पुढल्या दारानं जावं एवढा साधा शिष्टाचार आम्हाला कळू नये? शेवटचं सांगायचं तर कोणी आपणहून बोलवेपर्यंत आम्ही त्या घरापासून लांब राहिलेलंच उत्तम. असले गाढवासारखे खेळ आम्ही पुन्हा खेळू नयेत. शिवाय या रस्त्यावर किंवा या शहरात राहणाऱ्या कोणाचीही टर उडवू नये..

“आम्ही त्यांची टर उडवत नव्हतो काही. त्यांना हसतही नव्हतो,” जेम म्हणाला. “आम्ही फक्त..”

“हं! म्हणजे तेच करत होतात, नाही का?”

“काय? टर उडवत होतो?”

“नाही,” अॅटीकस म्हणाला, “त्यांचं आयुष्य असं उघड्यावर टांगून ते सुधारायला बघत होतात.”

जेमची छाती किंचित फुलली. “मी कधीच असं म्हटलं नाही. अजिबात नाही!”

अॅटीकस कोरडेपणानं हसला. “आत्ताच तर म्हणालास तू तसं,” तो म्हणाला. “ताबडतोब हा मूर्खपणा थांबवा.”

जेम ‘आ’ वासून त्याच्याकडे बघतच राहिला.

“तुला वकील व्हायचंय ना?” बाबाचं तोंड घट्ट मिटलेलं दिसत होतं. संशय येईल इतपत. जसं काही तो ते सरळ ठेवायची धडपड करत असावा.

आणखी वाद घालण्यात अर्थ नाही हे जेमच्या लक्षात आलं. तो गप्प झाला. सकाळी कामावर जाताना विसरलेली फाईल न्यायला अॅटीकस घरात गेला. तेव्हा कुठे जेमच्या लक्षात आलं की जगातल्या सर्वात जुन्या वकिली काव्यानं आपण गंडलोय. पुढल्या पायऱ्यांपासून योग्य अंतर राखून तो उभा राहिला. अॅटीकसला घरातून बाहेर पडून शहराकडे जाताना त्यानं बघितलं. अॅटीकस ऐकू येण्याच्या टप्प्यातून लांब गेल्यानंतर त्याच्याकडे बघत जेम ओरडला, “मला वकील व्हायचं होतंss पण आता माझं नक्की नाही!” 

 

आज डीलची मेकोम्बमधली शेवटची रात्र. “आम्ही डीलबरोबर मिस रेचलच्या माशांच्या तलावाशी बसू?’ जेमनं बाबाला विचारलं. “हो. त्याला माझ्याकडून अच्छा सांगा. पुढल्या उन्हाळ्यात भेटू म्हणावं.”

मिस रेचलचं अंगण आणि आमचा गाडीरस्ता याच्यामध्ये एक बुटकी भिंत होती. आम्ही त्यावरून उड्या टाकल्या. जेमनं शीळ घातली आणि डीलनं अंधारातूनच त्याला प्रतिसाद दिला.

“एक पान हलत नाहीये,” जेम म्हणाला. “तेss तिकडे बघ.”

त्यानं पूर्वेकडे बोट दाखवलं. मिस मॉडीच्या अक्रोडांच्या झाडामागून मोठ्ठा वाटोळा चंद्र उगवत होता. “तो चंद्र पाहिल्यावर तर आणखीच शिजून निघाल्यागत वाट्टंय,” तो म्हणाला.

“क्रॉस दिसतोय का चंद्रावर आज?” डीलनं वर न बघताच विचारलं. तो वर्तमानपत्राचा कागद आणि दोरा वापरून सिग्रेट तयार करत होता.

“अं हं. नुस्तीच ती बाई आहे. ए डील, पेटवू नको ते. इकडे सगळीकडे वास पसरेल.”

मेकोम्बमधून पाह्यलं की चंद्रावर एक बाई दिसायची. ती ड्रेसिंग टेबलाशी बसून केस विंचरत असायची.

“तुझी खूप आठवण येणारे आम्हाला,” मी म्हणाले. “मिस्टर एव्हरींवर लक्ष ठेवायला हवं का रे?”

मिस्टर एव्हरी हे मिसेस हेन्री लफायते ड्यूबोजच्या घरासमोर रहायचे. दर रविवारी चर्चच्या देणगीच्या थाळीत बंदे टाकून सुट्टे परत घ्यायचे आणि रोज रात्री नऊ वाजेपर्यंत व्हरांड्यात शिंकत बसायचं एवढंच त्यांचं काम होतं. पण एका संध्याकाळी मात्र आम्ही त्यांची जी कामगिरी पाहिली तशी पुन्हा कधी बघता आली नाही. कौतुकास्पद म्हणावी अशी त्यांची तेवढी एकच कामगिरी असेल. पुन्हा कधीच आम्हाला तो प्रकार बघता आला नाही. एकदा रात्री मी आणि जेम मिस रेचलच्या घरापुढल्या पायऱ्या उतरत होतो. तेवढ्यात डीलनं आम्हाला थांबवलं : “च्यामारी, तिकडे बघा,” त्यानं रस्त्यापलीकडे बोट दाखवलं. पहिल्यांदा आम्हाला वेलीनं झाकलेला व्हरांडा सोडून दुसरं काहीच दिसलं नाही. पण नीट बघितल्यावर असं लक्षात आलं की झुडपांमधून पाण्याची एक कमान येऊन रस्त्यावरच्या दिव्याच्या पिवळ्या गोलात पडत होती. आमच्या अंदाजाप्रमाणे ती दहा फूट तरी अंतरावरून येत असणार. जेमचं म्हणणं होतं, मिस्टर एव्हरी तिकडे लपलेत. डील म्हणाला, ते दिवसाला निदान गॅलनभर पाणी पीत असणार. त्यानंतर कोणाची धार किती अंतर जाते आणि कोणाची ताकद किती असल्या चर्चेमुळे मला पुन्हा बाजूला पडल्यासारखं वाटायला लागलं. मला त्या विषयातलं काहीच येत नव्हतं.

डील आळस देत अगदी सहज बोलल्यासारखं म्हणाला, “चला.. जरा चालून येऊ.”

मला त्याचं बोलणं जरा संशयास्पदच वाटलं. मेकोम्बमध्ये कोणीच असं नुस्तं चालून वगैरे यायचं नाही. “कुठे जायचंय डील?”

डीलनं दक्षिणेकडे खूण केली.

जेम म्हणाला, “ठीके.” मी विरोध केल्यावर तो अगदी गोड आवाजात मला म्हणाला, “तू यायलाच पाहिजे असं काही नाही, राणी.”

“नका न जाऊ. आठवतंय का..”

जेम काही जुन्या चुका उगाळत बसणारा नव्हता. त्या दिवशी अॅटीकसकडून तो बहुधा फक्त उलट तपासणीची कला शिकला होता. “स्काऊट, आम्ही काहीही करणार नाहीयोत. फक्त रस्त्यावरच्या त्या दिव्यापर्यंत जाऊन परत येणार.”

आम्ही काहीही न बोलता रस्त्याने चालत राहिलो. शेजारच्यांचे झोपाळे वजनाच्या भारानं कुरकुरताना ऐकू येत होते. रस्त्यावरून चालणाऱ्या मोठ्या माणसांची कुजबुज एकमेकांत मिसळून जात होती. मधूनच मिस स्टीफनी क्रॉफर्डच्या हसण्याचा आवाज येत होता.

“म?” डील म्हणाला.

“चालेल,” जेम म्हणाला. “स्काऊट, पळ घरी.”

“तुम्ही काय करणारात?”

डील आणि जेम त्या झडप निसटलेल्या खिडकीतून नुस्तं डोकावून बू रॅडली दिसतो का ते बघणार होते. मला तिकडे जायचं नसेल तर मी सरळ घरी जाऊन तोंड बंद ठेवायचं होतं. बस्स !

“अरेच्चा, तुम्ही आज रात्रीपर्यंत कशाला थांबलात म?”

कारण आज रात्री कोणालाच ते दिसले नसते. अॅटीकस हातातल्या पुस्तकात इतका गढून जायचा की एखादं सैन्य चालून आलं तरी त्याला कळायचं नाही. शिवाय बू रॅडलीनं मारून टाकलंच तर सुट्टीऐवजी शाळा तरी बुडली असती आणि अंधाऱ्या घरातलं काही दिसायला हवं असेल तर दिवसापेक्षा रात्री ते जास्त सोपं होतं. मला काही कळत होतं की नाही?

“जेम, प्लीज..”

“स्काऊट, मी तुला शेवटचं सांगतोय. तोंड बंद कर नाहीतर घरी जा. ..देवाशप्पथ, तू दिवसेंदिवस कैच्या कै पोरींसारखी वागायला लागलीयेस!”

आता मात्र मला त्यांच्याबरोबर जाणं भागच होतं. रॅडलींच्या घरामागच्या कुंपणाखालनं गेलं तर बरं पडेल असं आम्हाला वाटलं. कोणाला दिसून येण्याची शक्यता तरी कमी होती. कुंपणाच्या आतल्या बाजूला मोठी बाग आणि एक अरुंद लाकडी आऊटहाऊस होतं.

जेमनं सर्वात खालची तार उचलून डीलला त्याखालून जायची खूण केली. मागोमाग मी आत गेले आणि जेमसाठी वायर उचलून धरली. त्याला ती फट जेमतेमच पुरली. “अजिबात आवाज करू नको,” तो कुजबुजला. “वाट्टेल ते झालं तरी कोबीच्या वाफ्यात घुसू नकोस. त्या आवाजानं मढंसुद्धा उठून बसेल.”

हे सगळं डोक्यात असल्यानं मी मिनिटाला एक पाऊल या गतीनं चालले होते. चंद्रप्रकाशात जेम खाणाखुणा करताना दिसला तेव्हा माझा वेग वाढला. बाग आणि मागच्या अंगणाच्या मधोमध असलेल्या फाटकाशी आम्ही आलो. जेमनं हात लावला तसं ते फाटक कुरकुरलं.

“थुंका त्यावर.” डील म्हणाला.

“जेम, तू अडकवलंस राव,” मी पुटपुटले. “इथून काही चट्कन बाहेर पडता यायचं नाही.”

“श्शू.. तू थुंक बरं, स्काऊट.”

आम्ही तोंड कोरडं पडेपर्यंत थुंकलो. मग जेमनं हळूच फाटक उघडलं आणि उचलून कुंपणाला टेकवलं. आम्ही मागच्या अंगणात आलो होतो.

रॅडलींच्या घराची मागली बाजू पुढल्या बाजूपेक्षा कमी आकर्षक होती. व्हरांडा मोडकळीला आलेला होता. त्याला दोन दारं होती. त्या दारांच्या मधोमध दोन गडद रंगाच्या खिडक्या होत्या. छताच्या एका बाजूला खांबाऐवजी लाकडी टेकू दिलेला होता. व्हरांड्याच्या एक कोपऱ्यात एक जुनाट स्टोव्ह होता. वरती टोप्या अडकवायची खुंटी होती. त्याला लटकवलेल्या आरशात चंद्राचं प्रतिबिंब पडलं होतं. ते भारी भयानक दिसत होतं.

“अर्रर्र..” जेम पाय उचलत हळूच म्हणाला.

“काय झालं?”

“कोंबडीची पिल्लं,” तो खुसफुसला.

पुढे गेलेल्या डीलनं मागे वळून हवेतल्या हवेत ‘अरे देवा’ अशी खूण केली. सगळीकडून धोका असल्यामुळे जपून चालायला हवं हे आम्हाला त्यावरून नीटच कळलं. आम्ही घराच्या एका बाजूला सरपटत गेलो आणि लटपटती झडप असलेल्या त्या खिडकीशी पोहोचलो. ती झडप जेमपेक्षाही कितीतरी उंच होती.

“आम्ही उचलतो तुला,” तो डीलच्या कानात कुजबुजला. “थांब, थांब,” जेमनं स्वतःचं डावं आणि माझं उजवं मनगट धरलं. मी माझं डावं आणि जेमचं उजवं मनगट धरलं. आम्ही खाली वाकलो आणि डील आमच्या पाठीवर चढला. आम्ही त्याला उंच केला आणि त्यानं खिडकीची चौकट धरली.

“आवर पटकन,” जेम कुजबुजला. “आम्हाला फार वेळ असं थांबता यायचं नाही.”  

डीलनं माझ्या खांद्यावर दाब दिला आणि आम्ही त्याला खाली उतरवलं.

“काय दिसलं?”

“काहीच नाही. नुस्ते पडदे. आत कुठेतरी एक बारकासा दिवा लागलाय.”   

“चला निघूया इथून,” जेम धपापत म्हणाला. “पुन्हा मागल्या बाजूला जाऊया. श्शू..” मी विरोध करणार हे बघून त्यानं मला दमात घेतलं.

“मागल्या खिडकीनं बघूया.”

“डील, नको रे,” मी म्हणाले.

डीलनं थांबून जेमला पुढे जाऊ दिलं. जेमनं खालच्या पायरीवर पाय ठेवला तशी ती पायरी कुरकुरली. तो स्तब्ध उभा राहिला आणि हळूहळू त्या पायरीवर वजन टाकायला लागला. पायरीचा आवाज आला नाही. जेमनं एका दमात दोन पायऱ्या चढून व्हरांड्यात पाय ठेवला. मग त्या पायावर त्यानं सगळा भार टाकला आणि बराच वेळ हेलकावत उभा राहिला. मग तोल सावरून तो गुडघ्यावर बसला. रांगत रांगत खिडकीपाशी जाऊन त्यानं मान उंचावली आणि आत डोकावलं.

मग मला ती सावली दिसली. हॅट घातलेल्या एका माणसाची ती सावली होती. पहिल्यांदा मला ते एखादं झाडच वाटलं. पण वारा साफ पडला होता आणि झाडांचे बुंधे तर काही हिंडत-फिरत नाहीत. मागचा व्हरांडा चंद्रप्रकाशात न्हाऊन निघाला होता. ती सावली व्हरांड्यातून जेमच्याच दिशेनं येऊ लागली. ती आता अगदी ठळक दिसून येत होती.

त्यानंतर ती सावली डीललाही दिसली. त्यानं चेहरा हाताच्या तळव्यात लपवला.

ती सावली जेमला ओलांडून पुढे गेली तेव्हा त्याचं तिकडे लक्ष गेलं. डोक्यावर हात घेऊन तो स्तब्ध उभा राहिला.

ती सावली जेमच्या पुढे फूटभर अंतरावर जाऊन थांबली. एका बाजूनं हात बाहेर काढून तिनं तो खाली सोडला आणि तसाच राहू दिला. मग वळून ती पुन्हा जेमकडे आली. व्हरांड्यातून चालत चालत घराच्या एका बाजूला गेली आणि जशी आली होती तशीच परत गेली.

जेमनं व्हरांड्यातून उडी टाकली आणि तो आमच्याकडे धावत सुटला. त्यानं फाटक उघडून मला आणि डीलला पळवत नेलं. डोलणाऱ्या कोबीच्या वाफ्यांमधून जाताना आवाज केल्याबद्दल आम्हाला दटावलं. त्या वाफ्यांमधून जात असताना अर्ध्या वाटेत मी अडखळले. तेवढ्यात बंदुकीचा आवाज घुमला.

डील आणि जेम दोघं माझ्या दोन बाजूंना झेपावले. जेमचे हुंदके ऐकू येत होते. “शाळेकडचं कुंपण ! .. स्काऊट लवकर!” 

जेमनं खालची तार उचलून धरली. मी आणि डील त्याखालून सरपटत बाहेर पडलो. शाळेच्या आवारातल्या एकुलत्या एका ओकच्या झाडाकडे जात असताना अर्ध्या वाटेत लक्षात आलं की जेम आपल्याबरोबर नाहीचे. आम्ही धावत मागे गेलो. तो कुंपणाशी धडपडत होता. बाहेर पडता यावं म्हणून त्यानं पँट पायांनी झटका देऊन काढली आणि तसाच अर्ध्या चड्डीत तो ओकच्या झाडाकडे धावत सुटला.

एकदाचे त्या झाडामागे पोचून आम्ही बधीरसारखे उभे राहिलो. जेमच्या डोक्यात मात्र चक्रं फिरत होती. “आधी घरी पोचलं पाहिजे आपल्याला. नाहीतर लोकांच्या लक्षात येईल.”

आम्ही शाळेचं मैदान ओलांडून धावलो. कुंपणाखालनं सरपटत घरामागच्या कुरणाशी आलो आणि मग कुंपणावरून चढून मागल्या पायऱ्यांवर एकदाचे पोचलो. तोवर जेमनं आम्हाला श्वास घ्यायचीही फुरसत दिली नव्हती.

धाप कमी झाल्यावर आम्ही तिघं जमेल तितक्या आरामात पुढल्या दारी आलो. रस्त्यावर पाहिलं तर रॅडलींच्या पुढल्या फाटकाशी शेजाऱ्यांचं कोंडाळं जमलं होतं.

“आपणही तिकडंच जाऊ,” जेम म्हणाला. “दिसलो नाही तर लोकांना संशय येईल.”

मिस्टर नॅथन रॅडली फाटकाच्या आत उभे होते. त्यांच्या हातात बंदूक होती. अॅटीकस मिस मॉडी आणि मिस स्टीफनी क्रॉफर्डच्या शेजारी उभा होता. मिस रेचल आणि मिस्टर एव्हरीही जवळच होते. त्यांच्यापैकी कोणीच आम्हाला येताना बघितलं नाही.

आम्ही मिस मॉडीच्या शेजारी जाऊन उभे राहिलो. त्यांनी वळून बघितलं. “कुठे होतात तुम्ही? आरडाओरडा ऐकू नाही आला?”

“काय झालं?” जेमनं विचारलं.

“मिस्टर रॅडलींनी कोबीच्या वाफ्यात एका निग्रोवर गोळी झाडली.”

“हो? लागलं त्याला?”

“नाही,” मिस स्टीफनी म्हणाली. “हवेत गोळी झाडली. पण त्याला चांगलाच घाबरवला. आजूबाजूला कोणी पांढराफटक पडलेला काळा दिसला, तर तो तोच असणार म्हणे. बागेत आणखी आवाज ऐकू आला तर त्यांच्याकडे गोळ्यांचा अजून एक बार भरलेलाय म्हणे. आणि म्हणे पुढल्या वेळेस हवेत बार नाही काढणार. कुत्रा असो नाहीतर निग्रो, नाहीतर..जेम फिंच!”

“काय काकू?” जेमनं विचारलं.

अॅटीकस म्हणाला, “पँट कुठे गेली तुझी?”

“पँट?”

“हो, पँट.”

काही उपयोग नव्हता. तो सगळ्यांसमोर अर्ध्या चड्डीत उभा होता. मी सुस्कारा सोडला.

“अं..मिस्टर फिंच?”

डील काहीतरी थाप तयार करत असल्याचं मला रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेडात दिसलं. त्याचे डोळे विस्फारले होते, गुबगुबीत चेहरा आणखीनच वाटोळा दिसत होता.

“काय झालं, डील?” अॅटीकसनं विचारलं.

“अं..ती मी जिंकली,” त्यानं मोघम काहीतरी उत्तर दिलं.

“जिंकली? कशी काय?”

डील डोक्याची मागची बाजू खाजवायला लागला होता. तो हात त्यानं कपाळावरून पुढे घेतला. “आम्ही तिकडे माशांच्या तलावापाशी पोकर खेळत होतो. त्यात जिंकली.”

जेमला आणि मला हायसं झालं. शेजाऱ्यांचंही समाधान झालेलं दिसत होतं. तेवढ्यात ते सगळे गंभीर झाले. आता हे पोकरचं काय प्रकरण होतं?

आम्हाला ते समजून घ्यायला वेळच मिळाला नाही. मिस रेचलनं भोंगा सुरू केला: “अरे देवा, डील हॅरीस ! माझ्याच माशांच्या तलावाशी बसून जुगार खेळतो? थांब, आता बघते तुझ्याकडे !”

तेवढ्यात अॅटीकसनं डीलचा तात्पुरता बचाव केला. “एक मिनिट, मिस रेचल,” तो म्हणाला. “मी याआधी तर कधी यांना असलं काही खेळताना पाह्यलं नाहीये. तुम्ही पत्ते खेळत होतात?”

जेमनं डोळे मिटून डीलच्या थापेबाजीत भर घातली. “नाही, काडेपेटीतल्या काड्या घेऊन खेळत होतो.”

मला माझ्या भावाचं फारच कौतुक वाटलं. काड्या धोकादायक होत्याच पण पत्ते म्हणजे फारच भयंकर!

“जेम, स्काऊट,” अॅटीकस म्हणाला, “मला यानंतर पुन्हा कसल्याही प्रकारच्या पोकरचं नाव ऐकू यायला नकोय. डीलकडे जाऊन तुझी पँट घेऊन ये. तुमचं तुम्ही काय ते मिटवा.”

“सोड रे डील,” आम्ही रस्त्यावरून पाय ओढत जात असताना जेम म्हणाला, “ती नाही ओरडायची तुला. अॅटीकस समजवेल तिला. पण तू जाम हुशारी केलीस हं. ते बघ.. ऐकलंस?”

आम्ही थांबलो. अॅटीकसचा आवाज ऐकू येत होता. “..एवढं काही गंभीर नाहीये..सगळेच असं काहीतरी करून बघतात, मिस रेचल..”

डीलला जरा बरं वाटलं. पण मला आणि जेमला मात्र वाटलं नाही. उद्या सकाळी जेमनं पँट कुठून आणायची हा प्रश्न होताच.

“मी माझी एखादी पँट देईन तुला,” मिस रेचलच्या पायऱ्यांशी पोहोचल्यावर डील म्हणाला. जेम म्हणाला, “थँक्स, पण मला व्हायची नाही ती.” आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि डील घरात गेला. तेवढ्यात आपण दोघांनी लग्न करायचं ठरवलंय ते त्याला आठवलं असणार. कारण धावत येऊन त्यानं जेमसमोरच माझी पप्पी घेतली. “पत्र लिहाल न?” तो मागून ओरडला.

जेमची पँट त्याच्याचकडे असती तरीही आम्हाला फारशी झोप लागलीच नसती.

पलंगावर पडल्या पडल्या मागल्या अंगणातून येणारा प्रत्येक आवाज मला तिपटीनं मोठा वाटत होता. जसं काही वाळूवर उमटणारा प्रत्येक ओरखडा म्हणजे सूड घ्यायला आलेल्या बू रॅडलीनंच काढला असावा. रात्रीच्या वेळेस हसत हसत जाणारा प्रत्येक निग्रो म्हणजे आमचा पिच्छा करण्यासाठी मोकाट सुटलेला बू रॅडलीच असणार. पडद्यावर येऊन आपटणारे किडे म्हणजे तारेचे तुकडे तुकडे करणारी बू रॅडलीची बोटंच वाटत होती. लिंबोणीची झाडं जिवंत झाल्यासारखी आणि म्हणून भयानक वाटत होती. झोप आणि जागेपणाच्या सीमारेषेवर मी घुटमळत असतानाच जेमची कुजबुज ऐकू आली.

“झोपलीस का गं..?”

“वेडबीड लागलंय का तुला?”

“श्शू. अॅटीकसचा दिवा बंद झालाय.”

क्षीण होत जाणाऱ्या चंद्रप्रकाशात जेम उठून उभा राहिलेला दिसला.

“मी पँट परत आणायला जातोय,” तो म्हणाला.

मी ताडकन उठून बसले. “नाही हं. मी नाही जाऊ देणार तुला.”

तो धडपडत शर्ट घालत होता. “जावंच लागेल मला.”

“जाच तू. मी अॅटीकसलाच उठवते.”

“उठवच तू. जीवच घेईन तुझा.”

मी त्याला खेचून शेजारी बसवला आणि त्याचं मन वळवायचा प्रयत्न करू लागले. “मिस्टर नॅथनना ती पँट सकाळी सापडणारचे. तुझी पँट गेलीये हेही त्यांना माहितेय. त्यांनी ती अॅटीकसला दाखवली की बराच राडा होईल. पण तेवढंच होईल न. जा जाऊन झोप.”

“ते मला माहीतीचे.” जेम म्हणाला. “म्हणूनच मी पँट आणायला चाललोय.”

मला कसंतरीच व्हायला लागलं. एकट्यानं त्या तसल्या ठिकाणी जायचं म्हणजे..मला मिस स्टीफनीचं बोलणं आठवलं: मिस्टर नॅथनकडे बंदुकीच्या गोळ्यांचा आणखी एक बार शिल्लक होता. पुन्हा नुस्ता आवाज व्हायची खोटी..मग तो निग्रो असो नाहीतर कुत्रा.. जेमला तर ते माझ्याहीपेक्षा चांगलं माहीत होतं.

मी काकुळतीला आले होते. “हे बघ जेम, ते इतकं महत्त्वाचं नाहीये. अगदी थोडासाच त्रास होईल. जेम ऐक ना, तू उगीच डोकंबिकं फोडून घेशील. प्लीज..”

त्यानं शांतपणे सुस्कारा सोडला. “मी..म्हणजे त्याचं असंय स्काऊट,” तो पुटपुटला. “मला आठवतंय तेव्हापास्नं अॅटीकसनं मला कधीच मारलेलं नाही. आत्ताही मला ते तसंच रहायला हवंय.”

आता हे काहीतरी भलतंच होतं. जसं काही अॅटीकस आम्हाला रोजच धाकदपटशा दाखवायचा. “म्हणजे त्यानं तुला आतापर्यंत पकडलं नाहीये असं म्हण.”

“तसंही असेल..पण मला ते तसंच रहायला हवंय. आपण आज हे असलं काही केलं नस्तं तर बरं झालं असतं.” 

मला वाटतं तेव्हापासूनच मी आणि जेम एकमेकांपासून दूर जायला लागलो. कधीकधी त्याचं काय चाललंय ते मला समजायचं नाही हे खरं. पण ते नवल जास्त वेळ टिकायचं नाही. हे मात्र मला समजण्याच्या पलीकडे होतं. “प्लीज,” मी गयावया करत म्हटलं, “जरा मिनिटभर विचार कर न. ..त्या तसल्या जागी एकट्यानं जायचं म्हणजे..”

“गप गं तू !”

“अॅटीकस काही तुझ्याशी बोलायचं बंद वगैरे करायचा नाही. ..जेम, मी त्याला जाऊन उठवणारे. शप्पथ..”

जेमनं माझी कॉलर घट्ट धरली. “मग मी ही येणार तुझ्याबरोबर..” माझा जीव गुदमरला.

“मुळीच नाही. तू नुस्ता आरडाओरडा करशील.”

माझ्या बोलण्याचा काही उपयोग नव्हता. तो हळूच पायऱ्या उतरून जाईपर्यंत मी मागचं दार उघडून ते धरून ठेवलं. रात्रीचे दोन वाजले असावेत. चंद्र मावळत होता. एकमेकांत गुंतलेल्या सावल्या धूसर होत शून्यात विरून चालल्या होत्या. जेमच्या पांढऱ्या शर्टाचं टोक वरखाली होताना दिसत होतं. फटफटल्यावर उड्या मारत पळून जाणाऱ्या एखाद्या किरकोळ भुतासारखं. वाऱ्याची हलकीशी झुळूक आली आणि माझं घामेजलेलं अंग गार करून केली.

जेम मागच्या बाजूनं गेला. तिथलं कुरण पार करून शाळेचं मैदान ओलांडायचं. मग कुंपणाला वळसा घालायचा. निदान तो त्याच बाजूला गेला असावा असं मला वाटलं तरी. त्याला बराच वेळ लागणार होता. तेव्हा अजून काळजी करायची वेळ आली नव्हती. ती वेळ येईपर्यंत आणि मिस्टर रॅडलींच्या बंदुकीचा आवाज येईपर्यंत मी वाट बघत राहिले. मला मागच्या कुंपणाशी खुसफुस ऐकू आल्यासारखी वाटली. तो भासच निघाला.

मग मला अॅटीकसच्या खोकण्याचा आवाज ऐकू आला. मी श्वास रोखून धरला. मध्यरात्री उठून शूची वारी करायची वेळ आली की कधीतरी तो आम्हाला वाचताना दिसायचा. म्हणायचा की, “मला बऱ्याचदा रात्रीतून जाग येते. मग मी तुमच्या खोलीत डोकावून जातो आणि पुन्हा झोप येईपर्यंत वाचत बसतो.” त्याच्या खोलीतला दिवा लागायची मी वाट बघत राहिले. डोळे ताणून बाहेरच्या खोलीत उजेड पडायची चाहूल घेत राहिले. लांब जाऊन मी पुन्हा एक हलकासा निःश्वास सोडला. रातकिडे चिडीचूप झाले होते. पण वारा हलला की पिकलेल्या लिंबोण्या छतावर आपटत होत्या. दूरवर भुंकणाऱ्या कुत्र्यांमुळे अंधार आणखीनच भयाण वाटत होता.

आणि मग मला जेम येताना दिसला. मागच्या कुंपणाशी पाहिलं तर त्याचा पांढरा शर्ट ठिपक्याएवढा दिसत हळूहळू मोठा व्हायला लागला होता. मागच्या बाजूच्या पायऱ्या चढून तो आत आला आणि दरवाजा बंद करून पलंगावर बसला. एक शब्दही न बोलता त्यानं त्याची पँट मला दाखवली आणि मग तो आडवा झाला. थोडावेळ मला त्याच्या पलंगाच्या कुरकुरण्याचा आवाज येत होता. लवकरच तो आवाज शांत झाला. पुन्हा काही मला जेमची चुळबूळ ऐकू आली नाही. 

(क्रमशः)

टू किल मॉकींगबर्ड ही हार्पर ली या अमेरिकन लेखिकेनं १९६० साली लिहिलेली पुलित्झर विजेती कादंबरी. कादंबरीत वर्णन येते ते १९३० च्या दशकातले. ही कथा आणि त्यात येणारी पात्रं लीच्या लहानपणाच्या अनुभवावर आणि निरीक्षणावर बेतलेली आहेत. ती साधारण १० वर्षांची असताना अलाबामा राज्यातल्या मन्रोव्हील नावाच्या तिच्या गावात घडलेल्या एका घटनेभोवती ही कथा फिरते.

स्काऊट नावाच्या एका सहा वर्षाच्या मुलीच्या दृष्टीकोनातून आपण ही गोष्ट ऐकतो. तीसच्या दशकातली जागतिक आर्थिक महामंदी, वर्णद्वेष, बलात्कार अशा गंभीर विषयांची पार्श्वभूमी असूनही नर्मविनोदी शैलीतल्या या कादंबरीनं झपाट्यानं लोकप्रियता मिळवली आणि आधुनिक अभिजात वाङ्मयात स्थान मिळवलं.

दक्षिण अमेरिकेतल्या मेकोम्ब नावाच्या एका निवांत काल्पनिक गावातली माणसं, त्यांच्या वागण्यातले बारकावे, स्काऊट, तिचा भाऊ जेम आणि त्यांचा मित्र डील यांचे निरागस खेळ आणि निरीक्षणं, हळूहळू तो निरागसपणा संपत जाऊन त्यांना येत जाणारी समज, स्काऊट आणि जेमचा वकील बाप अॅटीकस, त्याचं आपल्या मुलांबरोबर असलेलं नातं, त्याची न्याय्यी वृत्ती, दक्षिण अमेरिकेतले गोरे शेतकरी आणि काळे मजूर ह्यांचे परस्परसंबंध, आर्थिक महामंदीची झळ बसल्यानं आलेली भयंकर गरिबी अशा कितीतरी गोष्टी या कादंबरीतून समोर येतात.

हार्पर ली या लेखिकेची ही पहिली आणि एकमेव कादंबरी. त्याचा पहिला खर्डा तिनं ‘गो सेट अ वॉचमन’ या नावानं लिहिला होता. दोन वर्षापूर्वी तिच्या निधनानंतर तो प्रकाशित करण्यात आला.  

आश्लेषा गोरे पुण्यात वास्तव्यास असून त्यांनी केलेली मराठी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत.  वाचन, भाषाभ्यास आणि नाटक यामध्ये त्यांना रुची आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *