आर्या रोठे

किना

back

माझी किनाशी पहिली ओळख २०१४ मध्ये एका ओल्या, थंड रात्री झाली. मी नुकतीच डॉक्युमेंटरी फिल्ममेकिंगमध्ये मास्टर्स करायला युरोपात गेले होते आणि पहिले सहा महिने आम्ही लिस्बनमध्ये शिकणार होतो. पाठीवर शेवाळं आलेल्या वृद्ध कासवांसारखं लिस्बन आळशीपणे नोव्हेंबर मधल्या पावसाचा, वाऱ्याचा आणि थंडीचा मार खात पहुडल होतं. अशाच एका वादळी रात्री मी माझ्या पोर्तुगीज मित्राला फोन केला. तो ज्या बार मध्ये बसला होता, तिथे त्याने मला बोलावलं. चढावरच्या त्या रस्त्यावर मी पोचले तेव्हा तो चढाचा रस्ता मला ओळखीचा वाटला. मी आधी तिथून एक दोनदा चालत गेले होते पण कोपऱ्यातल्या पाटी नसलेल्या दाराकडे, पडक्या खिडकीतून येणाऱ्या पिवळा मंद प्रकाशाकडे आणि अस्पष्ट ऐकू येणाऱ्या गाण्यांकडे माझं याआधी लक्ष गेलं नव्हतं. लिस्बनच्या रंगीबेरंगीत किलबिलाटात काहीसा बुजलेला हा म्हातारा म्हणजे कॅफे एस्तादिओ. या बारमुळे  माझं  लिस्बनमधलं  सहा महिन्यांचं वास्तव्य खूप समृद्ध झालं. कॅफे एस्तादिओ हा जवळपास शंभर वर्षं जुना बार आहे. आधी म्हणे तिथे बेकरी होती. नंतर एक वेश्यागृह आणि आता मळलेला, काळाने केलेला ऱ्हास मिरवणारा असा अत्यंत सिनेमॅटिक बार. तिथे एक जुना ज्यूकबॉक्स आहे. संपूर्ण लिस्बनमध्ये उरलेला हा एकच ज्यूकबॉक्स आहे असं तिथले लोक नेहमीच अभिमानानं म्हणतात. त्यात खूप सुंदर जुनी दुर्मिळ पोर्तुगीज गाणी ऐकता येतात . गेली अनेक वर्ष लोकं त्यांची मोडलेली स्वप्नं घेऊन कॅफे इस्तादिओमध्ये येतायत. त्यातले काही दारू प्यायल्यावर त्या स्वप्नांत सामावून जातात, तर काही हीच स्वप्नं विसरण्यासाठी रोज पितात. आपल्या सगळ्यांच्या शहरात असा एक बार असतो आणि अशी स्वप्नं असतात. अशाच एका टेबलावर माझ्या शेजारी बसलेल्या मैत्रिणीच्या कॅमेऱ्याला किना सापडली. ज्यूकबॉक्सवर चाललेलं गाणं ऐकत ती स्वतःशीच रडत होती. रडता रडता तिने वर पहिलं आणि तिच्याकडे बघणारा कॅमेरा तिला दिसला. नवलाची गोष्ट अशी की ती त्यामुळे बिचकली नाही की रागावली नाही. खूप वर्षांची मैत्री असल्यासारखी ती आमच्याकडे बघून हसली आणि परत स्वतःच्या वेदनेत रमून गेली. तिच्या प्रामाणिक नजरेने मी स्तिमित झाले. गाणं संपल्यावर ती उठली आणि बारबाहेर गेली. न राहावून मी तिच्या मागे गेले. बिचकत मी तिला विचारलं “तुला इंग्लिश येतं का?” “मोडकं तोडकं”, ती म्हणाली. तिथून आमच्या गप्पांना जी सुरूवात झाली ती पुढचे सहा महिने चालूच राहिली. आम्ही दोघी इस्तादिओत बसून तासंतास बोलायचो. किनाचा पोर्तुगीज काव्याचा अभ्यास गाढा आहे. तिने मला अनेक पोर्तुगीज कवी आणि कवयित्रींशी ओळख करून दिली. फर्नांदो  पेसोआ, आल्बेर्तो, सोफीया अँडरसन, आना लुई अमाराल यांचे शब्द चढलेत की वाईन हे मध्यरात्र उलटल्यावर कळणं अवघड व्हायचं. पोर्तुगीज कवितेत एक विलक्षण कारूण्य आहे. आणि पोर्तुगीज लोकांमध्ये ते कारुण्य साजरं करायची अद्वितीय वृत्ती असते. Saudade (सौदादे), म्हणजेच इंग्लिशमधील yearning, आणि vergonha (वेर्गोनिया) म्हणजेच shame किंवा शरम हा किनाला भावणाऱ्या सर्व कवितांचा गाभा होता. या कवितांचे तिच्यावर खूप खोलवर पडसाद उमटले होते. त्या कवींचं अंतरविश्व, त्यांच्या अपूर्ण इच्छा आणि वेदना तिला स्वतःच्या वाटायच्या. तिच्या घरातलं, नोकरीतलं  आणि शहरातलं तिचं अस्तित्व, तिने पूर्णपणे नाकारलं होतं. तिचं  जगणं फक्त एस्तादिओमध्ये वाईनबरोबर तिच्या सारख्याच अडकलेल्या कवितांमधे होतं. ज्या बाहेरच्या जगाने तिचं बेभान जगणं नाकारलं होतं ते या एका जागेने स्वीकारलं आणि एस्तादिओ किनाचं गेली १५ वर्षांचं घर बनलं. 

माझ्या अनेक रात्री किना आणि तिच्या इतर मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यात जायच्या आणि दिवस कॉलेजमध्ये पोर्तुगीज आणि  इतर डॉक्युमेंटरी सिनेमांचा अभ्यास करण्यात जायचे. किनामुळे लिस्बनने मला त्याच्या पर्यटन स्थळांपासून खूप दूर छोट्या गल्ली बोळांमध्ये, चोरबाजारांमध्ये, जुन्या बागांमध्ये, दिवाणखान्यात मांडलेल्या बेकायदेशीर रेस्टोरन्ट्समध्ये, पडक्या माहीत नसलेल्या पण ऐतिहासिक जागांमध्ये, आणि पोर्तुगीज लोकांच्या उपजत प्रेमळ आणि कवी मनांमध्ये नेलं. माझ्या लिस्बनमधल्या शेवटच्या महिन्यात परीक्षेसाठी आम्हाला कॉलेजने एक शॉर्ट डॉक्युमेंटरी करायला सांगितली. मी ती अर्थातच किनावर करायची असं ठरवलं. वेळ खूप कमी होता आणि मला खूप काही सांगायचं होतं. काही दिवस मी तिचं दिनमान शूट केलं. पण त्यात तिचं अंतर्मन आणि त्यातला  कोलाहल कुठेच नव्हता. लिस्बन सोडायची आणि परीक्षेची वेळ आठवड्यावर आली पण माझ्याकडे काहीच नव्हतं. माझी काळजी वाढायला लागली. किनाच्या मी पाहिलेल्या भावविश्वाला मला पकडायचं होतं पण सुरूवात कुठे करावी ते कळेना. असेच एका रात्री आम्ही एस्तादिओ मध्ये असताना किना कायम पुटपुटायची तशी एक कविता आताही पुटपुटत होती.  

Ficar so a pensar em partrir

Ficar e ter razao

Ficar e more menos

मी तिला त्याचा अर्थ विचारला,

Stay only to think about leaving

Stay and be right

Stay and die less

या फर्नांडो पेसोआच्या “There, do not know where ” या कवितेतल्या या काही ओळी. मला तेव्हा जाणवलं की किनावरची शॉर्ट फिल्म ही फक्त एक कविताच होऊ शकते. संदर्भाची गरज नसलेली, फक्त भावनांना हात घालणारी अशी किनासारखीच कविता. किंवा एखादं अपूर्ण चित्र बघणाऱ्याला स्वतःच्या डोक्यात पूर्ण करायला लावेल अशी किनाला साजेशी रचना. त्यामुळे ही शॉर्ट फिल्म माझ्यासाठी एक खूप मोठ्या चित्रातला एक अल्पसा तुकडा आहे. 

 

या फिल्मचा शेवट ही खरं तर माझ्या आणि तिच्या पहिल्या भेटीची पावती. आमची ओळखी आधीची ओळख. बाहेर पडणारा पाऊस गाण्यातून तिला आत भिजवतोय असं वाटून रडणारी किना! मनातला कोलाहल जपून ठेवणारी, भूतकाळाच्या ओसरलेल्या वैभवात जगणारी किना! तिला मी शेवटची लिस्बन सोडून जायच्या एक दिवस आधी भेटले. एस्तादिओ सोडून अजून कुठे भेटणार! तिने मला सांगितलं की ती ही फिल्म कधीच बघणार नाही कारण आमच्या भेटीची कविता ती जागलीये आणि तिला ती शब्दात किंवा चित्रांमध्ये बंदिस्त करायची नाहीये. आम्ही जाताना परत कधी भेटणार हे बोललो नाही, फक्त ती म्हणाली, ‘तुला माझा पत्ता माहिती आहे. परत आलीस तर इथे येताना तुझ्या देशातून एक छोटा दगड घेऊन ये, आपण तो एस्तादिओमध्ये ठेऊ.’

मी लिस्बन सोडल्यानंतर एका वर्षात कॅफे एस्तादिओ बंद झाला. आता तिथे बाहेर मोठ्ठी हिरवी निऑन साईन लावलेला कॅफे बनलाय असं मी ऐकलं. किना आता कुठे जाणार हा प्रश्न मी स्वतःला विचारत नाही. त्यांच्या आठवणींनी  मनात कळ येण्याची आता तीन वर्षात सवय झालीये. एक मात्र झालं, एस्तादिओ बंद झाल्यावर मला खूप अनोळखी आणि ओळखीच्या लोकांचे लिस्बनमधून मेसेजेस आले, त्यांना ही फिल्म हवी होती, एस्तादिओची आठवण म्हणून. पोर्तुगाल मध्ये, इतर युरोपात आणि लॅटिन अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी ही फिल्म पोचली. माझ्यासाठी हे अनपेक्षित होतं, कारण खरंतर मी ती फक्त माझ्या एस्तादिओमधल्या मित्रमैत्रिणींसाठी आणि माझ्या आठवणी पुरती बनवली होती. त्यातल्या अनेक शॉट्सचे संदर्भ फक्त आमच्या पुरते आहेत त्यामुळे खूप लोकांनी लिहिलेले प्रेमळ निरोप, फिल्म विषयी बांधलेले तर्क आणि त्यांचे अनुभव वाचून फिल्मबरोबर माझा नव्याने परत संवाद झाला. फिल्ममेकर म्हणून मी तेव्हा पहिल्यांदा माझ्या भाषेपासून, ओळखीच्या संदर्भांपासून आणि परिसरापासून दूर जाऊन काम करत होते त्यामुळे हे अनुभव खूप शाश्वती देऊन गेले की माणसं या सगळ्या पलीकडे सगळ्यात आधी भावनांनी जोडलेली आहेत . 

ही फिल्म खरंतर पुस्तक वाचता वाचता बाजूला काढलेलं रेखाटन आहे, काहींसाठी ती पूर्ण तर काहींसाठी अपूर्ण आहे, काहींसाठी निरर्थक तर काहींसाठी अनुभूती आहे, पण माझ्यासाठी ती एक खूप जिवलग अनुभवाची आठवण आहे. माझ्यातल्या तेव्हाच्या एकटेपणाला, कोलाहलाला पोर्तुगीज कवितांनी आणि किनानी प्रेमानी आपलंसं केलं आणि त्यातून माझा डॉक्युमेंटरी सिनेमाबरोबर संवाद चालू झाला. डॉक्युमेंटरी सिनेमाबद्दल्या पूर्वलिखित व्याख्या पडताळून, कधी मोडून, वाकवून स्वतःच्या सीमा विस्तारायला आणि नवीन वाटा शोधायला मजा येते. तो मला सतत माझा comfort zone मोडायला आणि माझ्या सभोवतालशी असलेलं माझं नातं पडताळायला भाग पाडतो. आणि या प्रवासाची सुरूवात किनामुळे झाली म्हणून खास तिच्याविषयी मनात राखून ठेवलेला जिव्हाळा आहे. सोफिया अँडरसन म्हणून गेली तसं,  

É esta a hora das longas conversas

Das folhas com as folhas unicamente.

É esta a hora em que o tempo é abolido

E nem sequer conheço a minha face.

 याचा अर्थ,

This is the hour of the long conversations

Held from a leaf to a leaf.

This is the hour when time gets abolished

And I do not even know my own face.

 

आर्या रोठे डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आहेत. त्यांनी युरोपात डॉक्युमेंटरी फिल्मचे प्रशिक्षण घेतले असून सध्या त्या विविध डॉक्युमेंटरी प्रकल्पांवर काम करत आहेत.

4 comments on “किना: आर्या रोठे

 1. SHANTI

  अतिशय व्यक्तिगत अनुभव, पण सुयोग्य शब्दातून, पूर्ण उत्कटतेने पोहोचलाय.
  एस्टडीओचा माहौल ही, नेहेमीच्या लोकांमध्ये होणारे निःशब्द संवाद, आणि किना चं भावदर्शन स्पर्शील
  आर्या, थँक्स

  Reply
 2. Rajendra Inamdar

  खुपच सुंदर शब्दबद्ध केलायस आर्या… तुझा क्याफे एस्तादीओ… अन … किना बरोबरचा सहवास… अन…. संवाद.. डोळ्यासमोर उभं राहिलं चित्र.. न जाताही…. खुप छान…
  Thank you for sharing… 👍🏻👍🏻👍🏻

  Reply
 3. दिलीप फुले

  किनाचं भावस्पर्शी शब्दचित्र मनाला भिडलं. ओघवती भाषा शेवटापर्यंत खेचुन नेते. पुढील लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा!!

  Reply
  • Ganesh Visputay

   अद्भुत. लय आणि नियंत्रित चौकटीत त्याबाहेरचीही खळबळ पोचवणारी फिल्म.

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *