मूळ कवी: एड्रीएन रिच्

मराठी भाषांतर: आरती वाणी

प्रतिकाराची खूण आणि इतर कविता

back

कसा काळ हा

एक जागा आहे
त्या झाडांच्या दोन रांगांमध्ये जिथे गवत उगवते टेकडीच्या उतरणीवर
आणि जुना क्रांतिकारी रस्ता सावलीत लोपतो
त्या सुरक्षित घराजवळ जे सोडून अत्याचार पीडित अदृश्य झाले सावलीत

मी फिरले आहे तिकडे अळंबी वेचत भीतीच्या किनाऱ्याने, पण फसू नका
ही काही रशियन कविता नाही, हे कुठेतरी नाही, इथेच आहे
आपला देश जो हळूहळू सरकतोय स्वतःच्या सत्याकडे, अन् भयाकडे
त्याच्या आपल्या पद्धती आहेत, लोकं अदृश्य करण्याच्या

सांगणार नाही मी तुला कुठेय ती जागा जिथे  
किट्ट जाळे झाडीचे भेटते प्रकाशाच्या अचिन्हीत तिरीपेस
भूताखेतांनी पछाडलेला चौरस्ता, पालापाचोळ्याचा स्वर्ग
अगोदरच माहितीये मला कोण ती विकत घेणार, कोण विकणार, कोण अदृश्य करणार

अन् सांगणार नाही मी तुला कुठेय ती जागा, पण मग सांगतीये तरी का मी
काहीतरी? कारण तू ऐकतोयस अजून. कारण आजच्या काळात
तुला एेकत ठेवायचं असेल तर गरजेचं
आहे बोलणं, झाडांबद्दल.

***

फ्रॉम ए सर्व्हायवर

आपण जो करार केला होता तो सामान्य होता
त्याकाळच्या स्त्री-पुरूषांसारखा
काय समजलो होतो आपण स्वतःला
की आपली व्यक्तिमत्वं
विरोध करू शकतील आपल्या वंशाच्या अपयशाचा

आपण नशीबवान की फुटक्या नशीबाचे
माहितच नव्हतं आपल्याला
आपल्या वंशाचं अपयश यवढं असेल
आणि  आपणही भागिदारी करू त्यात
इतरांसारखंच, आपणही स्वतःला खास मानलं
तुझं शरीर स्पष्ट आहे माझ्यासाठी
नेहमी असायचं तसं: जरा जास्तच

कारण त्याविषयी मला जे वाटतं ते अधिक स्वच्छ आहे:
मला माहितीये ते काय करू शकते काय नाही
आता राहिलेलं नाही ते
एखाद्या देवाचे शरीर
किंवा असं काही 
ज्याचा अधिकार आहे माझ्यावर
पुढच्या वर्षी २० पूर्ण झाली असती
तू मात्र नाहक गेलास
तुला जमलं असतं खरंतर झेप घेणं
ज्याविषयी आपण बोललो, फार उशिरा
आता मी जगतेय ती
झेप म्हणून नाही
– तर एकामागून एक येणारा
छोटा, अद्भुत क्षण म्हणून,
जो शक्य करतो पुढचा प्रत्येक क्षण.

***

प्रतिकाराची खूण

दगडावर दगड ठेऊन रचते मी
माझ्या उद्दिष्टांचे स्मारक
दुपारच्या उन्हाचे ओझं घेऊन पाठीवर
उघड्या, असुरक्षित
शेताच्या उतारावर, जे प्रिय असून
वाचवता येत नाहीत मला
येऊ घातलेल्या पुरांपासून;
फक्त रोवून ठेवता येतात
कष्टाने जुळवलेले हे दगड
ह्याआधी अस्तित्वात नसलेल्या
आकारात.
दगडांचा ढीग: एक विधान
– भूमीच्या ह्या तुकड्याला महत्त्व आहे
मोठ्या अन् साध्या कारणांसाठी.
प्रतिकाराची खूण: एक चिन्ह

 

एड्रीएन रिच् (१९२९- २०१६) ह्या नामवंत अमेरिकन कवीच्या या दोन अनुवादित कविता. कवी, लेखक, विचारवंत, शिक्षक, प्रेयसी, आई अशा अनेक भूमिका रिचने साकारल्या. तिच्या लेखणीत स्त्रीवादी आणि डाव्या विचारसरणीचा प्रभाव दिसून येतो. सामाजिक विषमता, अन्याय, युद्ध, क्रांती, स्वत्त्व, लैंगिकता, प्रेम इ. विषयांवर भाष्य करणारी रिचची लेखणी आधुनिक जगाशी सरळ भिडते, प्रश्न विचारते. लग्न आणि तीन मुलं झाल्यानंतर वयाच्या चाळीसाव्या वर्षी आपली प्रेयसी मिशेल क्लीफ् ह्या जमैकन लेखिकेबरोबर रिचने राहण्यास सुरूवात केली. समलिंगी प्रेमावरच्या तिच्या ‘ट्वेंटी वन लव्ह पोएम्स’, तसेच “कम्प्लसरी हेट्रोसेक्शुअॅलीटी अॅंड लेस्बिअन एक्सपीरीएंस” हा लेख प्रसिद्ध आहे. ह्या शिवाय ए चेंज ऑफ वर्र्ल्ड, डायमंड कटर्स अॅंड अदर पोएम्स, स्नॅपशोट्स ऑफ ए डॉटर-इन-लॉ, डायविंग इन टू द रेक  इत्यादि कविता संग्रह प्रसिद्ध आहेत.

भाषांतर करताना कल्याणी झा आणि आशुतोष पोतदार यांनी दिलेल्या सूचना आणि त्यांच्याबरोबर वेळोवेळी झालेल्या चर्चेबद्दल दोघांचे मनापासून आभार. 

 

आरती वाणी पुण्यातील सिंबायोसिस कॉलेज अॉफ आर्ट्स अॅंड कॉमर्स येथे इंग्रजी विषयाचे अध्ययन करतात. केंब्रिज युनिवर्सिटी प्रेसने अलीकडेच त्यांचे फॅंटसी अॉफ मॉडर्निटी: रोमॅंटिक लव इन द बॉंबे सिनेमा अॉफ द १९५० हे पु्स्तक प्रकाशित केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *