अलिनाला कडकडून भूक लागली होती. वर्गात गणिताच्या बाईंचे इंटिजरचे ‘उद्याच हवे असलेल्या’ होमवर्ककडे तिचे अजिबात लक्ष नव्हते. शाळा सुटल्याची घंटा ऐकताच तिच्या पोटातूनही तिला तोच आवाज ऐकू आला. तिने आपल्या दप्तरात पैसे आहेत का हे चाचपले तेव्हा तिला आपल्याला अलीकडे पॉकेट-मनी मिळालाच नाही हे जाणवले. तिच्या सारख्या बारा वर्षाच्या मुलीला फक्त दहा रुपयाचा पॉकेट-मनी मिळाला तरी खूप भाव मिळून जाई. प्रत्येक मुलीचा तसा बारा वाजताच्या सुट्टीत खायला स्वतःचा डबा असेच. पण बऱ्याच जणी पहिल्या दोन तासातच त्याचा चट्टामट्टा करीत असत. मग, शाळा सुटायच्या वेळेला तेथे जणू भुकेने गांजलेल्या मुलींचे कळपच बाहेर पडत असत!
अशा वेळेस, जवळ जर दहा रुपये असले तर ते नेमके याच वेळी उपयोगी पडत. मोज्यामध्ये जपून ठेवलेल्या दहाच्या नोटेत बरंच काही दिसत असे. उदाहरणार्थ: तीन सामोसे वर एका टॉफीची मोड, दोन कोला आईस लॉलीज, एक चॉको- बार आईसक्रीम, दोन चमचे भरून चाट किंवा दहा रुपयेवाल्या चिप्सचा पुडा ..
काही मुलींना पटकन खाण्यासाठी आईस्क्रीम हवं असे. पण स्मार्ट मुलींना मात्र पाऊण तास– बसने घरी पोहोचायला लागणाऱ्या वेळात पंचेचाळीस मिनीटे पुरवून चघळून खायला काही तरी हवे असे. काहीतरी थोडं-थोडं, चिकट झालेली बोटे चाटत- चाटत चवीचवीने खायला हवं असे. यासाठी चिप्स शिवाय आणि काय असणार! शिवाय, त्यात उरलेला चुराही मिळणार! अलिनाच्या डोळ्यांपुढे मसाला लावलेले कांडीवरचे कुरकुरे आले! तिच्या तोंडाला पाणी सुटले. जवळ तर पैसे नव्हते. मग कुणाचा बकरा करायचा याचा विचार तिच्या डोक्यात आला. शाळेच्या इमारतीतून बाहेर पडून अलिना बसेसच्या दिशेने चालत गेली. कुणी बकरा सापडतो का म्हणून ती इकडेतिकडे बघायला लागली. शाझिया तेथेच उभी होती. तिच्याकडे तीन सामोसे होते. अलिनाने हसत हसतच तिच्याकडून एखाद सामोसा मागितला. शाझिया पण कसली चिवट! एका शिक्षिकेसाठी आपण ते सामोसे विकत घेतले आहेत आणि ते त्यांच्यापर्यंत नीट पोहोचवायचे आहेत अशी थाप मारून ती तेथून निसटली.
आज इंशाचा वाढदिवस होता आणि ती सगळ्यांना आईस्क्रीम देत होती. तिच्याशी गेल्या महिन्यातच अलिनाचे भांडण झाले होते. अलिना तिच्याकडे बघून हळूच हसली पण इंशा उद्धटपणे मागे फिरली. ‘ठीक आहे, तिला याचा अंदाज थोडाच आला असता?’
कंटाळून ती शाळेच्या बसमध्ये चढली आणि जागा शोधू लागली. तिच्या तीन बस-मैत्रिणी होत्या. तो त्यांचा स्वतःचा असा वेगळा गट होता. बसमधून उतरल्यावर त्यांचे जग वेगेवेगळे होते. त्या बहुतेक बसमध्येच वेळ घालवत “हँग आउट” करायच्या. बस-मैत्री ग्रुपसाठी चार ची संख्या अवघड होती कारण बसमध्ये तर जागा तीन आणि दोन अशा असतात. याचा अर्थ पहिल्या तिघींना त्यातल्या त्यात ऐसपैस जागा मिळत असे आणि चौथीला त्यांच्यासोबत बसण्यासाठी त्यांच्या सीटभोवतीच जागा शोधावी लागे.
त्यांच्यापैकी तिघींना आधीच जागा मिळाली होती. अलिनाने उसासा टाकला. आज तिच्या वाट्याला काहीच येत नव्हते. आता तिचे दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे ज्याच्याकडे काही खायला मिळतंय का असा चांगलासा बकरा पकडणे. बसच्या मधोमध उभे राहून तिने नीट सगळीकडे निरखून पाहिले. काही नाही. इथेसुद्धा कुणीच नव्हते!
दोन-सीटच्या बाकावर बसलेल्या हनीजवळची सीट रिकामीच होती. ‘कुणी बसलं आहे का?’ विचारल्यावर हनीने नकारार्थी मान हलवली. अलिना हनीच्या शेजारी बसली. हनी तिच्याहून दोन – तीन वर्ग मागे होती. ती एक शांत व गुबगुबीत, गप्पामध्ये विशेष भाग न घेणारी मुलगी. पण, आजूबाजूच्या गप्पा ऐकून गालातल्या गालात तिला हसू मात्र येत असे.
भुकेल्या आणि फुगून बसलेल्या अलिनाने खिडकीबाहेर पाहिले तेव्हा बस शाळेच्या गेट मधून बाहेर पडत होती. ‘तुला चिप्स हवे आहेत का?’ असे विचारेपर्यंत ती गप्पच बसून होती. अलिनाने जरा वळून शेजारी पाहिलं तर तिला हनीने आपल्या गुबगुबीत, प्रार्थनेसाठी पुढे केलेल्या ओंजळीसारख्या हातात पुढे केलेला कुरकुरेचा पुडा दिसला !
अलिना स्वतःच्या नशीबावर खूष होऊन मनोमनी आनंदून गेली. हात पुड्यात घालून तिने हावरटासारखी बेफिकीरपणे मोठी मूठ भरून घेतली. घाईघाईने बकाणा भरला. मग तिच्या लक्षात आले की घर यायला अजून चाळीस मिनीटे आहेत. हनीकडे बघून ती हलकेच हसली आणि कुरकुरे खाऊ लागली.
बस चालू असताना अलिनाला खिडकीतून बाहेर पहायला आवडत असे. बाहेर कोवळे ऊन पडले होते व फुलांचा छानसा सुगंध जाणवत होता. बस जाण्याचा मार्ग रमणीय असल्यामुळे तिला हा प्रवास नेहमीच आवडतो. शाळेची बस झेलम नदीवरुन जात असताना नदीच्या किनाऱ्यावर ओळीने मांडलेले शिकारे असत. त्यात कश्मीरी लोक राहत असत. ऊंच झबरवान डोंगरांच्या छायेतून वाट काढत दल-लेक पर्यंत बस जात असे. इथेसुद्धा स्थानिक कश्मीरी लोक हाऊसबोट्स मध्ये राहत असत. दल-लेक वर टूरिस्ट लोकांसाठी खास हाऊसबोट्स सजवून ठेवल्या जात असत. पण टूरिस्ट कमीच असल्याने बरेचदा रिकाम्याच राहत.
आज रस्त्यावर नेहमीपेक्षा गाड्यांची खूपच गर्दी होती. ट्रॅफिकमधून बस हळूहळू पुढे सरकत होती. ड्राइवरसुद्धा भलताच वैतागला होता. ‘फाटक्या तोंडाचा’ म्हणून तो साऱ्या बस ड्राइव्हर्समध्ये कुप्रसिद्ध होता. बस चालवताना शिवीगाळ करतो म्हणून शिक्षकही चिडून त्याला अधूनमधून दम देत असत. मग ते गप्प बसेपर्यंत त्यांच्याकडे तो डोळे वटारून बघे. बस अब्दुल्ला – ब्रिजवरून पुढे जाऊ लागली तेव्हा नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे जाणवत होते. आज इथे खूपच गजबज होती. जणू प्रत्येकाला या भागातून लवकरात लवकर निघायची घाई झाली होती. एरवी शाळा सुटल्यावर टूरिस्ट रिसेप्शन सेंटरच्या कारंजा भोवती ट्रॅफिक रेंगाळल्यासारखाच वाटत असे. मोठ्या शाळांच्या बसेस इथे एकदम गोळा होत, मग गाड्यांचे ड्राइवर ट्रॅफिकमधून वाट काढत गर्दीबद्दल कुरकुर करत. रेसिडेन्सी रोड पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर हातगाड्या लागत. त्यावर एक्स्पोर्ट साठी नाकारलेला माल विकला जात असे. नीट शोधले तर एखादवेळी चांगला नवा कोटही मिळे.
बस आता पुलाजवळच्या कारंजाकडे पोहोचली होती. इतका वेळ येत असलेला फुलांचा छान वास आता जाणवत नव्हता. त्या ऐवजी आता कसलातरी उग्र दुर्गंध येत होता. अलिनाने खिडकीतून डोके बाहर काढून वर आकाशाकडे पाहिले. समोर काळ्याकुट्ट धुराचे झोम्बणारे लोट च्या लोट येताना दिसत होते. टूरिस्ट रिसेप्शन सेंटरला चक्क आग लागली होती ! तिचा विश्वासच बसेना. मान झटकून तिने परत बाहेर नीट बघितले. खरोखरीच जेथून ती रोज दिवसातून दोनदा जात असे त्या इमारतीला दुपारच्या उन्हासारख्या लाल लाल आगीने वेढले होते. त्या आगीला जणू काही आकाशापर्यंत पोहोचायचे होते, पण ट्रॅफिकच्या संथ वेगाप्रमाणेच धुराच्या लाटा आळसावल्यासारख्या वर जात होत्या. ट्रॅफिक हळूहळू पुढे सरकत होता, आणि फक्त आग विझवायला आलेल्या माणसांमुळे नव्हे. तेथे गर्दी जमली होती. लोकं आरडाओरडा आणि नारेबाजी करीत होते. खाकी गणवेश घातलेली काही लोकं अलिनाला दिसली, (बहुतेक पोलीस असावेत) जे गर्दी आवरायचा प्रयत्न करीत होते. पण गर्दी बरीच मोठी होती आणि वाढतच होती. पोलीसांना जमाव आवरत नव्हता म्हणून बस पुढे सरकत नव्हती.
अलिनाचे लक्ष आता आजूबाजूच्या खाजगी गाड्यांकडे गेले. ड्राइवर मात्र तिला एरवी वैतागलेले दिसायचे तसे आज काही दिसले नाहीत. त्यांनाही आपण या ट्रॅफिकमधून लवकर सुटावे अशी उतावीळ झाली होती. तिने मग आपल्या बसमधल्या मुलींकडे बघितले. प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती होती. रस्त्यावर चाललेल्या कल्ल्यापेक्षा आगीने वेढलेल्या इमारतीकडेच त्या टक लावून बघत होत्या.
“आत्ताच्या आत्ता खाली उतरा!” ड्राइवरच्या खणखणीत आवाजाने त्या साऱ्या तंद्रीतून जाग्या झाल्या. नेहमीपेक्षा कितीतरी पटीने तो जास्त चिडला होता. पण त्याच्या डोळ्यात मात्र पूर्वी कधीच न बघितलेली गोष्ट त्यांना दिसली: चिंता! तेवढ्यात कुठेतरी एक मोठा स्फोट झाला. बरोबर काहीतरी फुटल्याचाही आवाज आला. मुली पटापट आपापल्या सीटखाली लपल्या. अचानक ती बस विचित्र दिसू लागली – पुढे ड्राइवर आणि आत कुणीच नाही, डोकं उडाल्यासारखी.
ड्राइवरने जोरजोरात हॉर्न वाजवला. बस ला जागा करून द्यायला गाड्या पटापट बाजूला झाल्या. रस्त्यावरील लोकांनी सुद्धा बस ला शक्य तितकी जागा करून दिली. ड्राइवरचा आरडाओरडा आणि शिवीगाळ ट्रॅफिकच्या आवाजावरून सगळ्यांना ऐकू येत होता. “त्रठ पेयन, या खुदाया रहम!” (वीज कोसळूदे ह्यांच्यावर, दया कर रे देवा!) म्हणून तो देवाचे नाव घेत होता. जणू त्याला कशापासून तरी दूर, अगदी दूर जायचे होते. अलिनाला वाटले की रस्त्याच्या पलीकडची आग आपल्यापर्यंत तर काही पोहोचणार नाही. मग ड्राइवर एवढा का म्हणून घाबरलाय? आणि त्याचवेळी बसमध्ये कसलातरी अगदी विचित्र वास येऊ लागला.
हा धूर तर नव्हे? असा विचार करत अलिनाने हनीचा हात घट्ट धरून ठेवला. पण धुरापेक्षा तो वास खूप वेगळा होता. उग्र आणि बोचरा नव्हता. आत्तापर्यंत तिला कधीच असा वास आला नव्हता. तिने सीटखालून वर डोकावून इकडे तिकडे पाहिले तर बसमध्ये सुद्धा काळा धूर अजिबात पसरला नव्हता. हनी घाबरलेली होती. तिच्या शेजारीच चिप्स चा पुडा पडला होता. अलिनाला अजूनही भूक लागली होती. संधी साधून तिने चिप्स वर ताव मारला आणि कुरकुरेची कांडी चाटून खाऊ लागली. एक- दोनच पोटात गेल्यावर तिचा डोळ्यांतून अचानक पाणी येऊ लागले.
आई कांदे चिरत असताना अलिना बरेचदा स्वयंपाकघरात गेली होती तेव्हा तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी यायचे. मोठी होईन तेव्हा मी कधीच स्वयंपाक करणार नाही- कशाला ते उगाच डोळ्यात पाणी, काही नको, असे ती ठामपणे म्हणे. पण हा अनुभव काहीतरी वेगळाच होता आणि हे तर काही स्वयंपाकघर नव्हते बाहेर पळून जायला. तिचे डोळे आता चुरचूरू लागले आणि डोळ्यांतले पाणी अजिबात थांबेना. तिच्याजवळ आज हातरुमाल सुद्धा नव्हता. दुसऱ्या इयत्तेनंतर तिने बरोबर हातरुमाल ठेवणे सोडून दिले होते. मग अचानक आलेल्या शिंकांचे करावे तरी काय?
काही क्षणांपूर्वीच आपण अगदी धडधाकट होतो आणि आता एकाएकी छाती दुखून ‘अटॅक’ आला आहे, असे तिला वाटले. तेव्हा ती आपल्या सीटखाली लपलेल्या बरोबरच्या मुली ठीक आहेत की नाही ते वाकून बघू लागली. तर काय? तिच्यासारख्याच मुली खोकत तर होत्याच, बऱ्याच जणी रडत होत्या किंवा रडण्याचा तयारीत होत्या. अलिनाला आजपर्यंत असा अनुभव आला नव्हता, ना तिच्या सोबतच्या कुठल्याही मुलीला. शिंका आणि खोकल्याच्या तडाख्यातून कसेबसे डोके वर करून त्या एकमेकींकडे पाहण्याचा प्रयत्न करीत होत्या. आपल्याला नेमकं काय झालंय याच विचाराने त्या बावरून गेल्या होत्या. अलिनाने मग डोळे मिटले आणि प्रार्थना केली, ‘ट्रॅफिकमधून ही बस आता कशीतरी बाहेर पडू देत!’
किती वेळ लागला, माहीत नाही. पण काही मिनीटातच ड्राइवरने शिताफीने बस टूरिस्ट रिसेप्शन सेंटरच्या भागातून बाहेर काढली. बस आता दलगेटला पोहोचली होती! एका शिक्षिकेने मुलींना प्रेमाने हाका मारत सीटखालून बाहेर यायला सांगितले. अलिना चिप्स खात होती आणि खूप दमलेली होती. घाबरत घाबरतच ती इतर मुलींप्रमाणेच सीटखालून बाहेर आली. धुळीने भरलेल्या हातांनीच सगळ्या मुलींनी एकदमच हाताने नाके पुसली आणि शाळेच्या युनिफॉर्मला हात पुसले. एका शिक्षिकेने बसच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकपर्यंत पर्यंत नीट बघत चक्कर मारली आणि नंतर हसत-हसत मुलींना सांगितले ‘आता सगळं ठीक आहे!’ तिच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र मुलींना नेहमीप्रमाणे छान मुळीच वाटलं नाही! त्या हास्यात काहीतरी आक्रसलेले होते. आणि तो विचित्र वास कसला होता तेही तिने सांगितलं नाही, त्याऐवजी ‘घाबरू नका, आता आपण लवकर घरी पोचू’ इतकेच म्हणाली. मग तो वास निघून जावा म्हणून मुलींना खिडक्या उघडायला सांगितल्या.
शिक्षिका परत येऊन आपल्या जागेवर बसल्या. मुलींची जोरजोरात ‘तो’ घाण वास कसला होता आणि त्यामुळे डोळ्यांतून असे पाणी का आले यावर चर्चा सुरु झाली. कुणालाही काही नीट ठरवता येत नव्हते. पण घडलेला प्रकार अद्भुत होता आणि आपण काहीतरी मोठा पराक्रम गाजवलाय, मोठ्या संकटातून वाचलोय यावर मुलींचे एकमत झाले. पण नेमकं काय झालंय ते कुणालाच कळेना. नाहीतरी, वाहणारे नाक, डोळ्यांत थोडंसं पाणी याला काय घाबरायचे, नाही का?
ड्राइवरने मात्र मागे अजिबात वळून बघितले नाही. मुलींना शक्य तितक्या लवकर घरी पोहोचवले पाहिजे अशा एकाग्रतेने तो बस चालवत होता. मुलींनी त्याच्यासाठी अगदी मनापासून टाळ्या वाजवल्या. आज तो “हीरो” ठरला होता. त्यानेही जरा संकोचून मुलींकडे पाहिले. त्याचे डोळे सगळ्यात जास्त लालभडक झाले होते. त्यांच्या लक्षात आले होते की त्या अनामिक धुरा-वासाचा सगळ्यात जास्त त्रास त्यालाच झाला असावा. तरीसुद्धा त्याने बस किती शिताफीने चालवली होती! त्याला भरून आले आणि परत स्टीयरिंग-व्हील कडे तो वळला. यानंतर कुणालाही तो कधीच इतका हळवा झालेला दिसला नाही. सेवानिवृत्त झाला त्या दिवशी सुद्धा नाही!
हळूहळू तो वास कमी झाला. मुलींचेही सूं-सूं करणे आणि खोकणे खूपच कमी झाले होते. अलिनाने चिप्सचा पाऊण-एक पुडा फस्त केला होता. हनी आपला हातरुमाल शोधत होती. आता दुपारच्या जेवणापर्यंत अलिनाचे पोट भरले होते. बस मध्ये अजूनही एक वेगळेच रोमांचक वातावरण होते. तिला वाटले, आजचा दिवस एकूण चांगलाच गेला! हनीच्या चिप्सवर आपण असा हावरटासारखा डल्ला मारला आणि तिचा विचारच केला नाही म्हणून अलिना थोडी वरमली. पण हे हनीच्या लक्षातच आले नव्हते म्हणून अलिनाने तो विषय डोक्यातून काढून टाकला.
हनीला एकदाचा आपला हातरुमाल सापडला. अलिना तिला “ठीक आहेस ना?” म्हणून विचारत छानशी हसली. हनीच्या मूक होकाराने तिला खूपच बरे वाटले. ती वळून पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागली.
आता त्यांची बस दल-लेक वरून चालली होती. नेहमीप्रमाणे पाणी अगदी शांत, निश्चल होते. तिला ‘डूबलू’ नावाची एक ओळखीची हाउसबोट दिसली. अलिना गालातल्या गालात हसली. तिला नेहमी वाटायचे – बोटीचे कुणी असे विचित्र नाव ‘डूब -लू’ का म्हणून ठेवेल? नावाप्रमाणे हाऊसबोट अशी बुडणार थोडी होती? ती बाहेरच बघत राहिली.
काही वेळाने तिच्या बहिणीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. बस-स्टॉप आला होता. त्या दोघी उतरल्या. हात हलवीत मैत्रिणींना ‘बाय’ म्हटले आणि घराकडे पळाल्या. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. शाळा सुटली!
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram